ओंजळ

 ओंजळ 

       लेखिका - वर्षा नेरेकर

"आजी चल जाऊ.. " चार वर्षांचा मल्हार बाहेर जाण्यासाठी तयार, त्यालाही वेळ लक्षात यायची. पारापाशी गेला तसे त्याच्या इवल्याशा ओंजळीत हातातली फुले निशिगंधा देवू लागली. तो प्रत्येकापाशी जाऊन देत राहिला. सर्व त्याचे कौतुक करत नाव विचारायचे त्याला घराबाहेरील जगाची ओळख होऊ लागओंजळली.थोडा वेळ ती तिथेच रमून परत कामात मग्न व्हायची. 

"बरं वाटतं हो इथे बसायला, उन्ह उतरल्यावर जरा फिरावे म्हणून आलो."काका 

"हो खरयं वसंताची बहार रंगीबेरंगी फुलांनी श्रृंगारीक मोहक सजते अवनी" ती

"घ्या" तिची ओंजळ पुढे, "अरे वा करवंद.. अहो हल्ली दुर्मिळ झाला रानमेवा जंगल नाही. घरी जाऊन हिला लोणचे करायला सांगतो. एक काळ होता पूर्वी गावी डोंगरावर हिंडत असू आम्ही करवंद, काजू आंबा, जांभूळ, आवळे, आळू, आंबोळ्या, भोकरे गोळा करायला. आता सोनेरी आठवणी क्षणी सुखावतात मनाला" "अहो काका अजून थोडी घ्या". काका हसले. चार वर्षांपूर्वी ओळख झाली रिटायर्ड शिक्षक आता लहान मुलांना बोध कथा सांगायचे सायंकाळी देवळात, मुलांवर तेवढेच संस्कार. 

"तुम्हाला सांगते इतका छान सुगंध दरवळतो. मला आवडतात फुले, आमचे पूर्वी कोकणात घर होते. "

"हो का, कोणती फुले आवडतात तुम्हाला...हो का?,छान "ती

"आज उशीर झाला गं, कीती छान मोगरा फुलला कुठेतरी " तेवढ्यात तिने ओंजळ पुढे केली "घ्या " ती हसली "अय्या, अगं बट मोगरा" ओंजळीतल्या शुभ्र चांदण्या सायंकाळच्या सोन किरणांत चमकल्या तशीच काकूंची भावकलिका खुलली... 

"मावशी रामासाठी तुळस घेऊन जा" राम नवरात्र असते ना तुमच्या घरी." 

कधी फुले, फळे, भाजी, तुळस, बेल तर अगदी कढीपत्ता सुद्धा तिच्या ओंजळीत असायचा. त्या पारावर अनेक ओळखी झालेल्या. "निसर्ग" संस्था स्थापून त्या माध्यमातून उपक्रम सुरू मधूनच एखाद्या शाळेच्या मुलांची अभ्यास सहल, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिकांची, कॉर्पोरेट कंपन्यांची ते अगदी परदेशी प्रवाश्यांची सहल यायची. छोटी प्रयोगशाळा तिथे चालणारे नवीन प्रयोग, कलमे करणे, टिश्यू कल्चर, खत कारखाना सर्व माहिती दिली जायची. छोट्या नर्सरीत रोपे विकली जायची. मुलांना जंगल आणि पर्यावरण महत्त्व कळावे यासाठी तिची धडपड. जंगल, स्वर्ग इथे, वन्य जीवन, वनीकरण, झाडे वाचवा, आपली वसुंधरा असे लघुपट मुलांना दाखवले जायचे. वनस्पतींची माहिती शास्त्रीय नावे, प्रजाती उपयोग सर्व सहजतेने त्यातून सांगत झाडे लावावीत मार्गदर्शन. शहरात घराच्या गच्ची, टेरेस, सोसायटी कंपाऊंडमधे झाडे लावावीत प्रसार प्रचार करायची. सहलीला आलेल्या मुलांना एक तुळशीचे रोप दिले जायचे. काही शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी वनीकरण करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन सेवा फोनवर उपलब्ध केली त्याचा देशभर उपयोग होऊ लागला. डीजीटल माध्यमातून सोईचे झाले परत हळूहळू सृष्टी हिरवाईने मनोहर दिसेल खात्री होती तिला.

गेले काही वर्ष निशिगंधाने बंगल्या समोरील जागेत बांधलेल्या चार पाच पारावर अनेकजण विसावत. चार वर्षांपूर्वी ती त्या बंगल्यात आली. विक्रांत व ती परदेशात नोकरी करणारे, विक्रांत सॉफ्टवेअर इंजिनिअर तर ती एन्व्हायर्नमेंट रीसर्चर काम करत होती. भारतात विक्रांतची जमीन होतीच रिटायर्ड झाल्यावर भारतात यायचे पर्यावरण संदर्भात कार्य करायचे आधी ठरलेले. सर्व जमापुंजी खर्ची घालून कर्ज घेत नोकरी करताना दोन हेक्टर जमीन घेतलेली. जगभर फिरले आणि इतरत्र चाललेली जंगल तोड होणारे घातक परिणाम बघून आपल्या देशात थोडे का होईना आपण जंगल वाचवू हेच ध्येय ठरले. सासरे इतर नातेवाईक ते येईपर्यंत लक्ष घालत होते. कारण सुविधा करायला पैसा हवा नोकरी करून शक्य झाले. दरम्यान मोठे शेततळे केले , झरे शोधून पाईप टाकले, ओढ्यावर छोटे पूल बांधले. छोट्या राहुट्या, झाडांवर मचाण उभारले, छोट्या विहिरी खोदल्या त्यामुळे मुबलक पाणी. पक्षांच्या किलबिलाटाने सकाळ प्रसन्न वाटायची. हरणे, माकडे, ससे असे प्राणी जीव भयमुक्त बागडत होते. रिटायर्ड होण्याआधी बांधकाम आणि रिटायर्ड झाली तसे गृहप्रवेश करत कुटुंब सुखावले. नवीन परीसर ओळख फार नाही. तशी ती खूप विनाकारण बडबड करणाऱ्यातली नसली तरी माणसे जोडणारी मनमिळावू. विक्रांतच्या रिटायर्डमेंटच्या आधीच ती भारतात आली आणि पर्यावरण क्षेत्रात प्रोजेक्ट करू लागली. काही सरकारी प्रोजेक्ट मिळाले सर्वोत्तम कामगिरी केली, पुरस्कार मिळाला. 

निशिगंधाने छोटा बगीचा करायचे स्वप्न म्हणून बंगल्या भोवती मोकळी जागा, तशीच बंगल्या पुढेही सोडलेली. जमीन वीस वर्षांपूर्वी जंगल बघून घतलेली बाभूळ, शिरीष, बोर, अर्जुन, साग, खैर, पळस, बांबूची बेटे, वड, पिंपळ, चिंच, बाभूळ, भोकर, आवळा बहुतांश वृक्ष जंगलात होते. त्यात तिने बकुळ, आंबा, गुलमोहर, सोनटक्के, चाफा, कवठ, नारळ, अशोक, बदाम, बरीच देशी विदेशी झाडे अधूनमधून येवून लावली. पारीजात, बहावा, रातराणी, रानजाई, चमेली, तगर पसरले होते. परीसर मोठा घरामागे जंगलच तिथे पावसाळ्यात फिरून बी टाकणे, नवीन झाडे लावणे चालायचे, झाडे पर्यावरणाचा समतोल राखतात जंगल पृथ्वीचा श्वास तो जपला तर मानव श्वास घेऊ शकेल. रहायला आली तशी माळ्याच्या मदतीने काही विभाग करत एका आडोशाला नाजूक रोपे इनडोअर, तर कोरफड, हळद, आले, गवतीचहा, शतावरी इ. औषधी वनस्पती ते अगदी कॅकटसची छोटेखानी बाग केली. पंचवीस पन्नास आंब्याची वेगवेगळी कलम लावलेली आता फळावर आली. डाळिंब, चिक्कू, संत्री, लिंबू, पेरू इ. एक छोटा भाग भाजीपाला मिरची, रताळे, टोमॅटो,कांदे, कार्ली, भोपळा, भुईमूग, हादगा, घोळू, केनीकुर्डु ची भाजी, काकडी , डबल बी लावायची काही भाज्या आज लोकांना माहिती नाहीत त्या इतर ठीकाणी शोधून लावल्या त्याचे बी जतन केले. घराशेजारी झेंडू, गुलाब, शेवंती, कन्हेर, निशिगंध, बकुळ, मधुमालती, मोगरा, कुंद, बट मोगरा काही मोसमाप्रमाणे बहरायचे. शेजारी छोट्या तळ्यात कमळे. ती आणि तिची बाग, जंगल आनंदात. तिचा कोमल स्पर्श आणि अंतरीचे भाव जणू त्या वृक्ष वेलींना कळायचे. तीनही ऋतूत गंधील लहरींनी बगीचा बहरलेला. 

तिला लाभलेला तिने जपलेला वनीकरणाचा वारसा पुढे देत होती वसुंधरेशी आपली नाळ जोडली आहे हे सिद्ध करत होती. आपण सृष्टी जपली तरच भावी काळात मानव जिवंत राहू हे तिच्या सारख्या काहींना जाणवत होते. सुजलाम सुफलाम आपला भारत हिरवा गर्द पाचू सारखा दिसावा त्या ॲमेझॉनच्या जंगलासम. जिथे पाऊस नाही ओरडा तिथे वृक्ष जंगल दाट झाले तर पावसाची आणि प्रदूषणाची चिंता राहणार नाही सभा, चर्चा सत्रात 'जंगल जपा' संदेशाचे बीज रूजवून यायची. घरचीच थोडी भाजी, फुले, फळे. आणि याचमुळे तिच्या ओळखी झाल्या. तिचा बंगला तसा आत असला तरी रोड लगत, घरा समोर थोड्याच अंतरावर देऊळ. देवळात येणारे जाणारे बाल्कनीतून ,आवारातून दिसत. जुन्या पद्धतीने चौसोपी बांधलेला बंगला सासूबाई सासरे बंगला बघून तिचे खूप कौतुक करत होते. सुरूवातीला ओळख नव्हती ती सायंकाळी वेळ काढून मुद्दाम बंगल्यापुढील गुलमोहोराच्या पारावर जायची. तिथे येजा करणारे विसावत मग गप्पा व्हायच्या. काही नियमित येणारे बागेतली फुले पाहून, शांत सुगंधी परीसर यामुळे क्षणिक सुखावत. बागेतील लाल, केशरी गुलमोहर आणि गुलाबी, पिवळ्या, लाल शंकासूराच्या पाकळ्यांच्या पायघड्या रस्त्यावर असायच्या वाटसरूंसाठी आणि मुख्य दाराजवळील संपूर्ण कंपाऊंड वर वेगवेगळ्या रंगाची बोगनवेल स्वागताला सज्ज. आतून हळूच डोकावणारे हिरवाईत बहाव्याची पिवळी झुंबरे, बॉटलब्रशचे लाल गुच्छ लक्ष वेधत. 

कधी कोणती जास्त फुले असतील तर कींवा हंगामात येणारा भाजीपाला, फळे शेजारी, ओळखीतल्यांना वानोळा द्यायची. आताशा अल्प उत्पन्न मिळू लागले. असे काम करताना सुखद समाधानाची भावना अवनी कडून मिळालेले जीवन सार्थकी लागले धरणीचे ऋण फिटते म्हणायची, निशिगंधा नावाप्रमाणेच इतरांच्या स्मृतीत दरवळायची निसर्ग सेवा कार्यामुळे. वर्षा ऋतू तिचा आवडता हिरवाईत झरणाऱ्या अमृतधारा झेलत झोपाळ्यावर झुलायला आवडायचे. तो पाऊस तर अमृतदान द्यायचा आणि जंगलाचे हिरवे राजस रूप नजर वेधायचे. चराचरात चैतन्य अविष्कार अन् नव जीवन श्वास घ्यायचे त्या वसुंधरेच्या कुशीत. रानवाऱ्यात फिरता तिच्या मनावर दिसायचे ओले हिरवे गोंदण. धरती मातेस सेवा अर्पण करत वसुंधरेचा नववधूसम हिरवा शालू बघताना निशिगंधाची विजयी मुद्रा चमकायची. सृष्टीवर कृपा करत देवाने अक्षय पात्र केली होती तिचीही ओंजळ. 

लेखिका - सौ. वर्षा प्रशांत नेरेकर🙏


स्वलिखित. 

वरील कथा वर्षा नेरेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post