खेळ हा दैवाचा*
✍️ प्रतिभा परांजपे
शैला ताईंचा मोबाईल वाजत होता.
हात धूवून येईपर्यंत बंदही झाला.
एक मेसेज त्यावर आला,-- रात्रीच्या फ्लाईटने मी परत येत आहे
-- सुरभि .…
शैला ताईंना काहीच उलगडा झाला नाही. परत येते म्हणजे??
त्यांनी सुरभिला री-कॉल करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता.
सुरभि शैलाताई व सुरेश रावांची एकुलती एक कन्या. सुंदर, स्मार्ट,
एक वर्षापूर्वी तिचे लग्न रोहनशी झाले. सुरभिने एम .एससी नंतर एम.सीए. केले व एका मल्टिनॅशनल कंपनी काम करत होती.
रोहन अमेरिकेतल्या एका कंपनीत होता. हे स्थळ मेट्रिमोनियल विवाह संस्थेवर पाहून दोघांच्या पसंतीने झाले.
मुलगी इतकी दूर जाते ह्या दुःखापेक्षा योग्य स्थळ मिळाल्याचा आनंद शैलाताई व सुरेश रावांना होता.
मधून मधून व्हिडिओ कॉलवर गप्पा होत, तेव्हा रोहन ही त्यांच्याशी बोलत त्यावरून सर्व छान चाललंय असंच चित्र दिसत होत.
पुढे मागे आपण ही फिरायला म्हणून मुलीकडे जाऊ असे मनसुबे दोघे रचत होते आणि--- अचानक असा फोन??
त्यांनी सुरेश रावांना सांगितले," अग आठवण येत असेल तिला आपली म्हणून येत असेल. सरप्राईज म्हणून आधी बोलली नाही" असे म्हणून त्यांनी शैला ताईंचे समाधान केले.
सुरभि आली तीच वादळ घेऊन त्या वादळाने तिच्या सकट सर्वच कोलमडले.
" मी आता परत रोहन कडे जाणार नाही मला डिव्होर्स हवाय" .
'अग पण असं काय-'-----?
"सांगेन ग -- आत्ता नको ग मला विचारू" म्हणत आईच्या कुशीत शिरून सुरभि रडू लागली.
हळूहळू सगळा उलगडा झाला. रोहन जरी हुशार, प्रेमळ दिसत होता तरी सुरभिला त्याने खूप त्रास दिला.
सुरुवातीला तिला अमेरिकेत नोकरी नाही त्यामुळे ती घरातले काम करून वेळ घालवत असे. पण नोकरी लागल्यानंतर घरकाम व नोकरी दोन्हीमध्ये तिची ओढाताण होत होती . त्यात रोहनचे काहीच को ऑपरेशन नव्हते.
सुरभि तिथल्या वातावरणात रुळलीही नव्हती.
विकेंडला रोहनला मजा करायची सवय . सुरभिला जमत नाही पाहून एकटाच निघून जायचा.
हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागले त्याच्या तिथे बऱ्याच गर्लफ्रेंड होत्या तो त्यांच्यासोबत असायचा.
सुरभि बरेचदा ह्या वरुन रोहनशी बोलली. पण " मी तर असाच आहे तुला सवय करावी लागेल "म्हणून त्यांनी तिचे बोलणे उडवून दिले.
दिवस आपल्या गतीने चालले होते . सुरभिचा धीर सुटत चालला.
तशातच तिला दिवस राहिले, खूप थकवा यायचा, मळमळ व्हायची,अशा दिवसात रोहनने तिची काळजी घ्यावी तिला आराम द्यावा अशी तिची अपेक्षा होती पण-- त्याने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मग दोघात भांडण व्हायला लागली.
सुरभि आता या सर्वाला कंटाळली तिने त्याला' तुझे असे वागणे मला पसंत नाही तू मला फसवले'. असे म्हणताच "तुला राहायचे तर राहा नाहीतर चालती हो असे उर्मट पणे उत्तर देताच सुरभिचा उरला सुरला धीर संपला. आपण फसलो याची तिला पूर्ण जाणीव झाली .आता इथून बाहेर नाही पडलो तर आपला हा असाच अपमान करेल ह्याला आपली गरज नाही असे जाणवले आणि तिने परत यायचा निर्णय घेतला….
"आपण रोहन च्या आई-बाबांशी बोलूया कां? पाहू ते काय म्हणतात" सुरेश राव म्हणाले.
" मला नाही वाटत काही फायदा होईल ते मुलाची बाजू घेणार .जाऊ द्या थोडे दिवस .सुरभि ला थोडे महिने राहू द्या. .कदाचित रोहनला आपली चूक कळेल व तो सुरभिला परत बोलावेल शैला ताईंना आशा वाटत होती..
या आशेवर बरेच दिवस गेले. एक दिवस सुरभि म्हणाली" आई मला नाही वाटत मी रोहन कडे परत जावे .मला त्याच्याकडून डिव्होर्स हवा आहे.
आणि दुसरं म्हणजे मला त्याचे हे बाळही नकोय, मला एबार्शन करायचे आहे. आपण आजच डॉक्टर कडे जाऊ या."
काय बोलते ?"या सगळ्यात त्या जीवाचा काय गुन्हा ते तुझंही आहे ना ?
कदाचित बाळाच्या ओढीने रोहन सुधारेलही."
"' तो कसला सुधारतो, आणि-- खरं सांगू आता मलाही हे सगळं नकोय मला नाही वाटत मी आता रोहन बरोबर सुखात राहू शकेन. मग त्याचा हा अंशही मला नकोय, त्या रूपात तो मला सतत दिसत जाणवत राहील .
मला त्याच्या आठवणीही नकोय" बोलता बोलता सुरभि रडू लागली..
तिला जवळ घेत शैलाताई म्हणाल्या "बर-बर-- आपण आजच डॉक्टर सानेकडे जाऊ, त्या आपल्या ओळखीच्याच आहेत पाहू त्या काय म्हणतात.
सुरभीला तपासत डॉक्टर साने नी विचारले" किती महिने झाले??"
" नेमके आठवत नाही पण-- तीन झाले असावे ¡
तपासून झाल्यावर त्या म्हणाल्या" एकूण पाहता आता हे शक्य दिसत नाही तुझ्या मोजण्यात काहीतरी चुकले वाटते तेव्हा एबार्शनचा विचार करू नको."..
सुरभि चिडून बाहेर येऊन बसली.
शैलाताई डॉक्टर सानेना म्हणाल्या " तिला नको आहे बाळ, पण आता काय करावे तुम्ही सांगा.."
" हे बघ शैला आता बाळाला जन्म देणे हाच एक मार्ग आहे. कदाचित तोपर्यंत काही चांगले घडेल. नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे बाळ आश्रमात किंवा कुणी एडाप्ट करणार पहावे.
कसे बसे नऊ महिने पार पडले या काळात रोहनने एकदाही फोन केला नाही.
सुरभीच्या सासरच्यांशी सुरेशराव बोलले पण त्यांनी त्यांच्या हातात काहीच नाही असे सांगितले...
सुरभीला डिव्होर्स मिळाला, तिने सुटकेचा श्वास सोडला.
एक बंधन सुटले तरी हे दुसरे पाश इतक्या सहजासहजी सुटणारे नव्हते .
मुलगी झाल्याचे डॉक्टरांनी शैला ताईंना सांगितले, सुरभिने मुलीकडे डोळे उघडून ही नाही पाहिले.
शैलाताईंनी एकदा नातीला डोळे भरून पाहिलं व नर्सकडे सोपवले.
. एक महिना उलटताच सुरभीने परत रिझ्युमे भरून नवीन कंपनीला पाठवला तिचा बायोडाटा व जुना एक्सपिरीयन्स पाहता तिला लगेच काम मिळाले.
आजूबाजूच्या नातेवाईकांच्या प्रश्नांना उत्तर देणे शैलाताईंना खूप जड जात होतं असे काही महिने गेले.
एक दिवस सुरभीने तिला एका प्रोजेक्टसाठी कंपनी जपानला पाठवत असल्याचे घरी येऊन आई-बाबांना सांगितले व जाण्याची तयारी केली.
" आई मी इथून दूर गेले की तुझ्या मागचे प्रश्न विचारणारे कमी होतील आणि मलाही नव्या वातावरणात मोकळं वाटेल…"
सुरभी टोकियोच्या कंपनी ला जॉईन झाली. नवा देश नवे वातावरण, काम यात तिने स्वतःला झोकून दिलं.
जुन्या आठवणींना मनात गाडून टाकल
.सुबीर चक्रवर्ती तिचे बाॅस होते, खूप वर्ष झाली त्यांना भारत सोडून .
खूपच शिस्तप्रिय ,हुशार पण स्वभावाने मनमोकळे.
त्यांनी तिला काम समजावून दिले व काही अडचण असल्यास मदत मिळेल हे आश्वासन दिले .
हळूहळू सुरभी तिथल्या वातावरणात रुळली. सर्व स्टाफ इथला होता त्यामुळे तिला सुरुवातीला करमत नसे, पण कामाव्यतिरिक्त कोणाशी इतर संबंध नको असे धोरण तिने ठेवले.
.आई-बाबांशी दर दोन-चार दिवसांनी बोलणं होई, हळूहळू त्याची इंटेसिटी कमी होत गेली .
सुबीर सर तिच्या कामातल्या चुका तिला समजावून सांगत, हळूहळू त्यांच्या सहवासात ती ट्रेंड होत गेली .दोघं मोकळेपणाने बोलू लागू लागले .
सुबीर ना एक मुलगा व एक मुलगी मुलगी कॉलेजला तर मुलगा स्कूलमध्ये बायको पाच वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली, दोघांचे लव मॅरेज होते.
सुरभीच्या बोलण्यात सुबीर सरांचा बरेचदा उल्लेख असे.
एकदा बाबांनी तिला सहज विचारले "काही आहे का तुमच्या दोघात??"
तिला आश्चर्य वाटलं. तिने नाही मला त्यात आता पडायचं नाही असे स्पष्ट सांगितलं .
एक वर्षांनी तिचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला तशी ती भारतात परत आली. मधून मधून सुबीर आणि तिचे बोलणे व्हायचे.
बरेच दिवस सुधीरचा काही फोन नाही आला . आता तिला काळजी वाटू लागली .काहीतरी मिसिंग होतंय असं आतून जाणवु लागले. हे काय होतंय त्यांच्या फोनची कां मी वाट पाहते असे तिचे मन तिला विचारू लागले.?
त्याच रात्री त्यांचा कॉल," हॅलो सुबीर कुठे आहात ?कसे आहात ? किती दिवस झाले फोन नाही, मी केला तर बंद, मी खूप मिस---बोलता बोलता सुरभि अडखळली.
अरे हो हो किती प्रश्न? तुझ्यासारखीच माझी स्थिती झाली.
मुद्दामच मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करत नव्हतो, स्वतःला तपासून पाहत होतो. नेमकं आपल्यात काय आहे ते!
पण-- उत्तर मिळाले तुझ्याकडूनच!
आता सुरभी लाजली.
"मलाही अंदाज नव्हता माझ्या फिलिंग्सचा".
" ओके-- तर मग आता कळलं ना?
हो.
, "पहा, पण माझ्या तुझ्या वयात बरं अंतर आहे, मला दोन मोठे मुलं आहेत. तुझ्या पेरेंट्सना चालणार आहे कां?"
" मी विचारते पण ते हो म्हणतील मला वाटतं ."
एक गोष्ट मला पण तुम्हाला क्लिअर करावीशी वाटते.
" सांग, मला पण सांगायचे आहे .
मला एक मूल झालेल आहे, मी ते स्वीकारले नाही .तुम्हाला आधी माहिती हवं असं मला वाटतं.
" मलाही दोन मुलं आहे, दुसऱ्या मुलाच्या वेळी शलाकाची तब्येत खूप खराब झाली होती.
डॉक्टरने आता परत मूल होऊ देऊ नका यांच्या जीवाला धोका आहे असे सांगितले .
. शलाकाची तब्येत आधीच नाजूक म्हणून मग मीच फॅमिली प्लॅनिंगच ऑपरेशन करून घेतलं .तरीही आमचे सहजीवन फार वर्ष---
" काय झालं त्यांना?
"तिला युटेरस् चा कॅन्सर डिटेक्ट झाला. माझं प्रेम माझा पैसा काहीही तिला वाचवू शकले नाही ती अर्धा संसार सोडून गेली."
मुलं धड लहान पण नाही धड मोठे पण नाही
हळूहळू सावरलो आम्ही."
"मुलांना चालेन कां मी"? आईची जागा देतिल??
मुल आता बरीच मॅचुअर आहे ,आई नाही तरी माझी बायको ह्या नात्याने तुला नक्कीच मान देतिल.
सर्व सहमतीने सुरभी आणि सुबीर विवाह बद्द झाले आणि त्यांच्याच कंपनी सुरभि काम करु लागली.
सुबीर बरोबरच वैवाहिक जीवन खूपच सुखमय झाले एका नवऱ्याकडून ज्या अपेक्षा सूरभि ने ठेवल्या होत्या त्याहीपेक्षा भरभरून त्यांनी दिले.
मुलंही तिच्याशी खूप प्रेमाने वागत . लवकरच सुबीरने स्वतःची कंपनी सुरू केली.
सुरभिची साथ होती, मुळातच हुशार सुरभि बरंच काही शिकली.
पाहता पाहता वीस वर्षे झाली लग्नाला. मुलं आपल्या आपल्या आयुष्यात सेटल झाली व दूर निघून गेली .
मधल्या काळात शैला ताईंच निधन झाले.
एक दिवस सुबिर कंपनीच्या कामाने मास्कोला गेले, दोन दिवसांनी सुरभिला फोन, मी दोन तासाने पोहोचतो मग दोन दिवस सुट्टी काढतो आपण कुठेतरी फिरायला जाऊ .
सुरभीने घरी जाऊन जेवणाची तयारी केली सुबीरला आवडते म्हणून फिश फ्राय करवली आणि वाट पाहू लागली तासाभरानेच इमर्जन्सी फोन हवामान खराब झाले आणि प्लॅन क्रेश झाल्याची खबर .
एका क्षणात होत्याचे नव्हते झाले . कुठला कोण हेही ओळखू येत नव्हते.
मुल आली आणि दोन दिवस राहून गेली. सुरभीला खरच वाटत नव्हते पलंगावर अजून काढून ठेवलेली लाल साडी सुबीरची वाट पाहत होती.
बाबांनी तिला परत ये असे सांगून पाहिले आधिच बाबा खूप थकले आहे त्यातून हा मानसिक धक्का.
पण सध्या तरी येणे शक्य नव्हते. एवढा मोठा बिझनेस कंपनीचे काम वाईंडअप करेपर्यंत बराच काळ गेला. सुरभीला पदोपदी सुबीर दिसत होता, त्यांनी तिला प्रत्येक काम प्रत्येक व्यवहार नीट शिकवला होता त्याच्या नीटनेटकेपणामुळे तिला अवघड गेले नाही.
भारतात येऊन तिला चार महिने झाले मुलं मधून मधून फोन करत . इतक्या आरामाची सवय सुरभिला नव्हती. वेळ जाता जात नसे. सतत सुबिरची कमतरता जाणवत होती .इतके प्रेम आणि सुबत्ता देऊन गेला की उरलेले आयुष्य तेवढ्या जमा पूंजीत सहज घालवू शकत होती पण स्वतःला बीजी ठेवणे जरुरी आहे ही जाणीव ठेवून तिने एका कंपनीला जॉईन व्हायचे ठरवले .
तिचे नाव प्रतिष्ठा,काम करण्याचा एक्सपिरीयन्स सर्वच तिच्या फेवर मध्ये होते तिला काम मिळाल.
आता सकाळी दहाला ऑफिसला पोहोचायचे ते सात आठ पर्यंत काम .
रात्री मात्र डिनर बाबांसोबत.
एक दिवस हेड ऑफिस मध्ये तिला कामाला जावे लागले केबिनमध्ये बसून ती फाईल पाहत होती बाहेर काही New Comers बोलत होते. .नवीन प्रोजेक्टवर चर्चा चालली होती.
एका आवाजाने सुरभीचे लक्ष वेधले.
तिने विंडोचिक सरकवून पाहिलं ती जडवत झाली. डोळ्यावर विश्वासच बसेना तिचीच प्रतिकृती समोर .फरक फक्त रहाणीचा
जणू तीस वर्षे आधीची सुरभी समोर उभी आहे तिने चष्मा पुसून परत पाहिल. भूतकाळाच्या आरशासमोर ती उभी आहे ते रूप पाहून सुरभी चे डोळे दिपले.
रजिस्टरमध्ये नाव पाहिलं नयना साठे.
सुरभीला मनात आलं बाहेर जाऊन तिला पहावे, ओळख काढावी . कोणाची मुलगी? पण मग वाटले उगाचच गुंता वाढत जाईल.
नको असलेला भूतकाळ सुखद भविष्य बनवून समोर उभा होता पण त्यावर तिचा हक्क नव्हता.
नितळ पाण्यात दिसणार प्रतिबिंब किती जरी सुंदर असल तरी एका छोटासा खडा पडताच ते विद्रूप होऊन जातं
त्यावेळी नाकारलेली तिचीच प्रतिकृती आता तिच्या समोर अभिमानाने उभी आहे. जे "नाकारले त्यावर आता कुठल्या नात्याचा साज चढवणार "असे जाणवतात सुरभि परत खुर्चीवर येऊन बसली.
________________________
लेखिका सौ.प्रतिभा परांजपे.
वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.