परीक्षा

परीक्षा 

✍️ अनघा लिखिते 

          प्रतिभा हताशपणे हॉलमध्ये बसलेली होती. एकुलता एक मुलगा अभिराम याचं इतके धुमधडाक्यात लग्न केले होते. त्याला साजेशी मुलगी सुन करून आणली होती. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती, दिवसभर ती शांत दिसत होती. चेहरा प्रफुल्लीत दिसत नव्हता. प्रतिभाला वाटले की नवीन घर, सगळी अनोळखी लोकं, लग्नाचा थकवा म्हणून असेल कदाचित. त्यांनी दुर्लक्ष केले. पण राहून राहून वाटत होतं की मनस्वी तर लग्न ठरल्यानंतर एक - दोन वेळा आली होती. तेव्हा छान फ्रीली बोलत होती. तशाही आजकालच्या मुली लाजत थोडी बसतात. त्यांच्यात आत्मविश्वास भरपूर असतो.

          मनस्वी आईशी काही तरी बोलत होती. त्यांना निरोप देऊन आल्यावर तिचे डोळे पाणावलेले दिसले. प्रतिभाला वाटलं की होत असं... आई-वडील जेव्हा सोडून आपल्या घरी जातात आणि हे अपरिचित घर आपलसं करुन घ्यायच्या वेळी, भावना डोळे अश्रुवाटे व्यक्त होतात, पण रडणाऱ्या मनाला नवऱ्याच्या भक्कम आधाराची गरज असते.

          तिकडे अभिराम इतर पाहूण्यांना निरोप देण्यात मग्न असतो. नंतर मित्रांशी गप्पा गोष्टींमध्ये रंगला असतो, त्याच्या ध्यानी मनी सुद्धा नसतं की तिला वेळ द्यावा.

          सगळे पाहूणे आपापल्या गावी रवाना झाले. घरात फक्त प्रतिभा, त्यांचे पती प्रभाकरराव, अभिराम आणि सुन मनस्वी...

          दुसऱ्या दिवशी सकाळी मनस्वी लवकर उठली. प्रतिभा पूजा करत होती, प्रभाकरराव पेपर वाचनात दंग होते. अभिराम खोलीच्या बाहेर नव्हता आला, म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागरण झालं, असा विचार प्रभाकररावांनी केला. मनस्वीने ब्रश, आंघोळ आटपून घेतली. तोवर प्रतिभाची पूजा आटोपली होती.         

          प्रतिभा, "मनस्वी, चल चहा ओतला आहे. तुझ्या ऑफिसचे टायमिंग सांग. म्हणजे तसं तुला डबा करून देत जाईन आणि हो पुढच्या आठवड्यात सुट्टीचा अर्ज टाक." 

          मनस्वी आली आणि टेबलवर बसली. चहा घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले.

           मनस्वी रडवेल्या आवाजात म्हणाली, "आई - बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे..." 

          प्रतिभा तिच्या खुर्ची जवळ आली आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "घरची आठवण येतेय ? संध्याकाळी दादा येणार आहे नं मांडव परतणी साठी...." 

          मनस्वी प्रतिभा कडे बघून म्हणाली, "माझी परतणी ही न येण्यासाठी आहे आई... 

          प्रतिभाला तिच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही. ती तिच्या जवळ खुर्ची वर बसत म्हणाली, "काय बोलते आहेस मनस्वी ? मला नाही कळलं." 

           प्रभाकररावांनी पेपर बाजूला करत तिच्या कडे पाहीले. ते सुद्धा तिच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसले. 

          मनस्वी, "अभिरामने माझ्याशी लग्न फक्त तुमची मर्जी राखण्यासाठी केलंय. ते दुसऱ्या मुलीवर प्रेम करतात. ते मुंबईत लिव-ईन मध्ये राहतात. तुम्ही लोकांनी आम्हाला आधी का नाही सांगितलं ? का फसगत केली. मी काल रात्र माहेरी निघून जाणार होती. मी संयम बाळगला. पण मी डिव्होर्स घेण्याचा निर्णय घेतला आहे." 

          प्रतिभाच्या कानावर विश्वास बसत नव्हता. 

          प्रभाकरराव, "अगं त्याने गंमतीने म्हटलं असेल. त्याला मस्करी करायची सवय आहे." 

           मनस्वी, "बाबा, लग्नाच्या पहिल्या रात्री अशी मस्करी कोण करतं ?"

          प्रतिभा, "मनस्वी इकडे ये. आपण जरा बोलु. अहो, तुम्ही सुद्धा या." असं म्हणून ते तिघेही प्रतिभाच्या बेडरूम मध्ये गेले.

काही वेळानंतर...

          मनस्वी तोंड फुगवून बसली होती. प्रतिभा स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. प्रभाकरराव आपल्या खोलीत मासिक वाचत बसलेले होते. अभिराम बाहेर आल्या आल्या नेहमी प्रमाणे आईला म्हणाला, "आई, चहा - नाश्ता देते नं ?"

          प्रतिभाने आतुन म्हटलं, "तुझ्या हक्काचं व्यक्ती आलंय नं घरात. तरी आईच्या नावाने घोष कशाला ?"

          अभिरामने मनस्वी कडे पाहीले, तिने रागाने तोंड फिरवून घेतलं. मग प्रतिभानेच चहा - नाश्ता दिला. अभिराम न बोलता ऑफिसमध्ये निघून गेला. दुपारी मनस्वीने मन मारूनच जेवण केले आणि दादाची वाट पाहत बसली. तिला त्याच्या वागण्याचा थांगपत्ता लागत नव्हता. पण आईंवर विश्वास ठेवणं जरूरी होतं... कारण, माहेरी कायमचं निघून जाणं, तिच्या वहीनीच्या वागण्यामुळे शक्य नव्हतं. तिला दादा-वहीनीचे लग्न आठवलं. किती छान सांभाळून घेतलं होतं दादानी. पण आता वहीनी बिलकुल जुमानत नाही कोणाला. आईला काल सांगितले की मी माहेरी कायमची येते तर तिला टेंशन आलं होतं. बाबासुद्धा म्हणाले की वहीनीला खपणार नाही. एक वेळ हक्काचे असणारं माझं घर, परकं झालं होतं आता. चार वाजता दादा आल्यावर त्याच्या सोबत निघून गेली.

          रात्रीच्या जेवणाला मनस्वीच्या माहेरी सर्व आमंत्रित होते. अभिराम सगळ्यांशी मिळून मिसळून बोलत होता. कोणाला वाटणार सुद्धा नाही त्याच्या मनात काय शिजतंय ते.

          जेवण आटपून रात्री ते दोघे बाईकवर आणि प्रतिभा व प्रभाकरराव कारने निघाले.

          मनस्वी, "अभिराम, मला पुढून राईट घेऊन माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅट वर सोड..."

          त्याला आश्चर्य वाटले की हिला अचानक काय झालं.

          अभिराम, "तिला भेटायला जायचं आहे का आपल्याला ?"

          मनस्वी, "नाही... भेटायला यायचं नाही आहे तुला. मला कायमचा निरोप द्यायचा आहे. मी तुझ्याशी डिव्होर्स घेतेय. पण मी माहेरी नाही राहू शकत आणि आपल्यात काही नातं उरलं नाही म्हणून तुझ्या घरी पण नाही राहू शकणार.."

          त्याने एकदम बाईक थांबवली. "अगं मी तुझ्या सोबत मस्करी केली होती. माझं खरंच असं काही नाही. मी मुंबईत माझ्या मावशीकडे राहतो."

          "पण मी गंमत नाही करत आहे. माझं बोलणं झालं आहे मैत्रीणी सोबत.", मनस्वी फणकाऱ्याने म्हणाली.

          "तिला सांगता येईल की मी नाही येत. प्लीज असं नको करू. मी फक्त तु किती संयम राखु शकते, हे पाहण्यासाठी तुझी परिक्षा घेतली. चल, असं वेडेपणा नको करू... घरी आई - बाबा काय म्हणतील.", अभिराम तिला मनवु लागला.

          "ते काय म्हणतील याचा तु आधीच विचार करायला नको होता का ? आता तुझी चुक तु निस्तर. चल इथुन वॉकींग डिस्टन्सवर आहे, जाते मी. तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. 💐", मनस्वी हार मानणारी नव्हती.

          ती वळाली, मनांत खुप हसु येत होतं. आईंनी सांगितलेली मात्रा बरोबर लागू पडली. आता किती या विषयाला खेचायचे हे आपल्या वर आहे. त्याने पूर्ण दिवस घेतला. पण मी येवढा वेळ नाही घेणार. पण सबक तर नक्की शिकवेल.

          त्याने पटकन बाईक स्टॅण्डला लावली आणि तिच्या मागे पळत आला, "मनु ऐक ना.. नको असं करू. वाटल्यास तर आपण बसुन बोलु. चल त्या कॅफेत जाऊ."

          मनस्वी, "पण आता काय बोलायचं तुझ्याशी ?"

          अभिराम, "तु नको बोलूस हवं तर. नुसतं ऐक."

          ते दोघे एका कॅफेत गेले. अर्धा तास लागला तिला मनवायला. शेवटी ती तयार झाली. त्या साठी तिने अटी घातल्या.

          मनस्वी, "अभिराम, तु हे जे वागला ते बिलकुल योग्य नव्हते. कारण, मी तुमच्या घरी नवीन होते. आईचं घरं सोडून यायचं ही सोपी गोष्ट नाही आणि मी माझ्या आईला सांगितले तेव्हा तिचं बी.पी. वाढलं होतं. काही झालं असतं तर. माझा संयम तपासायला आयुष्य पडलं होतं. आता तु यापुढे अशी फालतू मस्करी करणार नाही आणि सर्वप्रथम माझ्या आईची माफी मागावी लागेल. कारण, तिचं चित्त थाऱ्यावर नव्हते."

          अभिराम खजील झाला होता. अभिराम, "चल आत्ताच जाऊ."

          ते दोघे युटर्न घेऊन परत मनस्वीच्या घरी गेले. घरी पोचल्यावर दादा वहिनीला आश्चर्य वाटले..

          दादाने भित भित, "काय झालं मनु ?..."

          मनस्वीने हसून म्हटले, "काही नाही दादा... अभिराम आईला नमस्कार करायला विसरला. मी म्हटलं की आपण नंतर जाऊ तेव्हा कर. पण त्याने ऐकलेच नाही आणि आलो आम्ही."

          वहीनी रिलॅक्स झालेली दिसली...

          मनस्वी अभिरामला वर नेत म्हणाली, "चल अभि, आई वर झोपली असेल."

          ते खोली जवळ पोहचतात, तर आई-वडीलांचे बोलणं ऐकू येते.

          आई, "अहो... आपल्या मनु चे कसं होणार ? ती वेगळं रहायचं म्हणतेय... तिला असं दु:खी नाही पाहू शकत. मला कसंतरीच होतंय.."

          वडील, "नको काळजी करू. मी बोलतो जावईबापूंशी ? झोप तू."

          आई, "झोप नाही लागत हो... मनुचा रडवेला चेहरा डोळ्यासमोर येतो. मगाशी पाहीलं नाही का ? किती उदास वाटत होती."

          अभिराम आत येऊन आधी पाया पडला, मग सगळं सांगितलं. वडिलांच्या पाया पडून माफी मागतो आणि वचन देतो की यापुढे मनस्वीच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही.

          दोघे आनंदाने घरी परततात. घरी आल्यावर आई त्याचा क्लास घेतात, तो वेगळाच. बाबा आणि मनस्वी गालातल्या गालात हसु लागतात.

समाप्त.


सदर कथा - "परिक्षा" माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

वरील कथा अनघा लिखिते यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिके कडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post