वसा

 वसा!

✍️ संभाजी बबन गायके 

दोन वर्षांच्या खंडानंतर दिंडी जाणार म्हणून यंदा संख्या जवळजवळ दुपटीनं वाढली होती. एप्रिलमध्येच माऊली-तुकोबारायांच्या महिन्याच्या वारीला जाऊन आलेले विष्णुबोवा आषाढीची तयारी मनात ठरवूनच गावी परतले होते. दिंडीसाठीचे तंबू दोन वर्षे पडून राहिल्यनं खराब स्थितीत होते. गावातल्या सुरेशला पाठवून विष्णुबोवांनी तंबूच्या ताडपत्र्या तालुक्यातून दुरूस्त करून आणल्या, नव्या खुंट्या,नवे दोरखंड आणवले. श्रीपतच्या पोराचा मालट्रक त्याने मुंबई-नागपूर लाईनवर लावला होता,त्याला निरोप देऊन जून महिन्यात वारीसाठी ट्रक सांगून ठेवला. 


नेहमीचा माळकरी ड्रायवर सोबत येईल अशी व्यवस्था करून घेतली. पालखी सोहळ्याचं वेळापत्रक पाहून हॅन्डबील छापून घेतली. आळंदीतून वारकरी शिक्षण संस्थेमधील भजनकरी,पखावजे यांना निरोप देऊन त्यांना दिंडीत चालायची विनंती करून ठेवली. नवीन तुळशीवृंदावन करायला सांगून ठेवले. पखवाजांना नवीन कापडी आच्छादनं शिवायला दिली, पखवाजांना शाई भरून घेतली. दिंडीला पंगती देणा-यांची यादी,पंगतीची ठिकाणं,पदार्थ निश्चित करून ठेवले. ट्रकवर लावायचे बॅनर तयार करून घेतले. वीजेची सोय करण्यासाठी वायरचा बंडलही नवा घेतला. ऐनवेळी उपयोगी पडतात म्हणून कंदील घेतले. यंदा महागाईमुळे भिशीची रक्कम वाढवावी लागणार होती, पण पदरचे पैसे घालू एकवेळ पण वारक-यांना तोशीस लागू नये अशी तयारी बोवांनी ठेवली होती.

नेहमीचा आचारी त्याच्या कोकणातल्या गावी कोरोनामुळे परतला होता, त्याला फोन लावला आणि वारीसाठी बुक करून ठेवला. गावातील दानशूरांनी किराणा देऊ केला तो स्विकारला,साठवून ठेवला. बाकी किराणा विकत घेतला. गॅस सिलिंडर, गरज पडल्यास जळणासाठी लाकडं जमवून ठेवली. एकंदरीतच पंढरीला पायी जाण्याची जय्यत तयारी सुरू होती. विष्णुबोवांची दिंडी प्रमुख म्हणून हे काही पहिली वारी नव्हती! वडीलांसोबत दिंडीत चालायला सुरूवात केली ती वयाच्या विसाव्या वर्षी. आता उमर होती एक्काहत्तर...म्हणजे ही एक्कावन्नावी वारी झाली असती कोरोना नसता तर. 

विष्णुबोवांचे वडील वैकुंठवासी झाल्यानंतर दिंडीचा वीणा विष्णूबोवांच्या गळ्यात आपसूकच आला होता आणि तो त्यांच्या कंठी शोभलाही होता. पंचक्रोशीत विष्णुबोवा दिंडीचालक म्हणूनच ख्यातकीर्त होते. भेटणारा प्रत्येक मनुष्य त्यांच्या पायाशी वाकायचाच. बोवांना एक मुलगा आणि एक मुलगी. पत्नी जाऊन दहा बारा वर्षे झाली होती. मुलगी वारक-याच्या घरात दिलेली. चिरंजीव महिपती फौजेत होते. त्यांनाही एक मुलगा एक मुलगी. महिपतीरावांची पत्नी आणि मुलं विष्णुबोवांची नीट काळजी घेत असत. महिपतरावांच्या रिटायरमेंटला दीड वर्षे राहिलेली. आणि आता महिन्याभरच्या रजेसाठी ते गावाकडे यायचे होते. बोवा वारीला गेल्यावर शेतमळा,गुरं-ढोरांकडे बघायला कुणी बाप्यामाणूस पाहिजे म्हणून वारीच्या आसपासच सुट्टी मिळेल अशी योजना करायचे महिपती आणि पांडुरंगाच्या कृपेने आजवर सर्व तसेच घडत होते.

पालखी मार्गावरच्या गावातील मुक्कामाच्या जागा त्यांच्या मालकांना भेटून निश्चित करण्यासाठी बोवांनी जीपमधून पंढरीपर्यंत एक फेरीही मारली होती. वारकरी आपल्या मातीत उतरतील, त्यांच्या पायाने पुण्यच चालत येईल, अशा भावनेने कुणी नकार कधी देत नाही. बोवांनी पंढरीतील त्यांच्या गावकीनं बांधायला घेतलेल्या धर्मशाळेच्या बांधकामाचं कुठवर आलंय हेही पाहून घेतलं. तिथल्या सेवेक-यांना आवश्यक सूचनाही देऊन झाला आणि बोवा गावी परतले होते. अष्ट्मीला तुकोबाराय पंढरीसाठी प्रस्थान ठेवणार...दोन दिवस आधीच देहूत राहुट्या पडल्या पाहिजेत. अष्टमीला आणखी उणेपुरे चौदाच दिवस उरलेले होते. बोवांच्या काळजाची उलघाल एखाद्या वधुपित्याच्या काळजासारखी होत होती. भेटीलागी जीवी लागलीसे आस हे तुकोबारायांचे शब्द त्यांना राहून राहून आठवायचे!


  गावातल्या पांडुरंगाच्या मंदिरात आता बोवाचां बरासचा वेळ जाई. त्यादिवशीही मंदिरातील सायंकाळचा हरिपाठ उरकून बोवा घराकडे परतत होते. ठेच लागायचं निमित्त झालं आणि बोवा रस्त्यातच कोसळले. लोकांनी त्यांना लगबगीनं घरी आणलं. बोवा ओसरीवरच्या खाटेवर लवंडले. “काही नाही झालं,थोडी चक्कार आल्यासारखं वाटलं” असं सांगून बोवांनी सुनेच्या “डॉक्टरांना बोलावून आणू का?” या प्रश्नाला बगल दिली. भूक नाही असं म्हणून बोवा रामकृष्णहरी म्हणत झोपले. सोनबाईंना त्यांच्या अंगावर घोंगडी पांघरली आणि त्या झोपण्यास गेल्या.सासरेबुवा सकाळी तसे लवकरच उठतात, नित्यनेमाचे अभंग म्हणतात. पण आज उशीर का झाला म्हणून सूनबाईंनी ओसरीवर येऊन त्यांना हाक मारली...हाकेला प्रतिसाद मिळाला नाही!

गावात बातमी गेली. विष्णुबोवा गेले! पंचक्रोशी जमा झाली. दिंडी भजन लावून बोवांच्या पार्थिवाला चितेपर्यंत नेण्यात आले. महिपतरावांना खबर पोहोचवण्यात आली. पण त्यांची अंत्यसंस्कारापर्यंत गावी पोहोचण्याची शक्यता नव्हती. नातवाने अग्निडाग दिला. दुसरे दिवशी सकाळी राख सावडण्याचा विधी पार पडला. यांना अंत्यसंस्काराला यायला जमले नव्हते अशी अनेक मंडळी आज उपस्थित होती. तिसरे दिवशी महिपती गावी पोहोचले. दशक्रियेला आळंदीतील प्रसिद्ध प्रवचनकारांचे प्रवचन झाले. बोवांच्या विषयी बोलताना गावाचा गळा दाटून आला होता. 


दिंडी निघायला दोनच दिवसांचा अवकाश होता आणि दिंडी चालक देवाघरी गेले होते. बोवांचा फोटो एका खुर्चीवर हार घालून ठेवण्यात आलेला होता. शेजारीच दिंडीचा वीणा दुस-या एका खुर्चीवर आडवा ठेवून त्याला हार घालण्यात आलेला होता. आता ही परंपरा कोण पुढे नेणार असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता. पिंडाला कावळा शिवला नाही बराच वेळ. लेकीने,सुनेने,नातवाने आणि महिपतरावांनी पिंडाला वारंवार नमस्कार केला. कावळे जवळच्याच झाडावर गर्दी करून होते. होते...डोमकावळाही होता. पण त्याच्या आज्ञेशिवाय इतर कावळे पिंडाच्या जवळही फिरकत नाहीत, असा लोकांचा अनुभव होता.


  गर्दीत अस्वस्थता पसरत चाललेली असतानाच महिपतराव पुन्हा पिंडापाशी गेले....”आबा...मी चालवीन तुमची पंढरीची वारी शेवटपर्यंत!” रडत रडत महिपती म्हणाले. आणि त्यांनी वीणेवर डोके ठेवून वाटीतला अबीर आपल्या कपाळी लावला....डोमकावळ्याने पिंडाच्या दिशेने भरारी घेतली...पिंडात हलकेच चोच घुसवली आणि चोचीत भाताची चार शिते घेऊन तो पिंपळाच्या फांदीवर जाऊन बसला...लोकांनी भक्तीभावाने हात जोडले...पुंडलिका वरदे हरीविठ्ठल चा गगनभेदी गजर त्या स्मशानात उमटला!

दोनच दिवसांनी दिंडी देहूकडे मार्गस्थ व्हायची होती. आता बोवा निर्धास्तपणे आपल्या परलोकीच्या मार्गाला लागणार होते...त्यांचा वसा महिपतीने स्विकारला होता...आणि महिपतरावांच्या लेकाच्या गळ्यात तर त्याच्या जन्माच्या पाचवीलाच विष्ण्बोवांनी तुळशीमाळा घातली होती....महिपतरावांच्या नंतरही दिंडी चालण्याची व्यवस्था पांडुरंगाने करून ठेवली होती! दिंडी चालली..चालली!


✍️ संभाजी बबन गायके

वरील कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी लेखकाचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post