ते वयच वेडं असतं... १

  ते वयच वेडं असतं...

✍️ दीपाली थेटे- राव


गोरीपान,लांब केसांची आणि मोठ्या 


मोठ्या काळ्याभोर बोलक्या डोळ्यांची 


सावनी पेंडसे..


 निम्म कॉलेज सावनी वर फिदा होतं. ती होतीच तशी...दिलखुलास, लाघवी हसणं...तिची थेट हृदयावर आरपार वार करणारी नजर... तिचा कमनीय बांधा. .तिचं चालणं..बोलणं..उफ्


     पण सावनी मात्र कोणालाही भीक घालत नव्हती. तिच्या स्वप्नातला राजकुमार ज्याच्यासाठी ती वेडी होती त्याचंच तर मन जिंकायचं होतं तिला.     


     अरु....अरविंद साने...


  बी.ए. च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सावनी पहिल्या वर्षाला. कॉलेज जॉईन केल्यापासून तिने त्याच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. त्याचं दिसणं, बोलण्याची स्टाईल आणि त्याच्या कविता.....भारावून गेली होती सावनी. त्याच्या समोर जाण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची एकही संधी ती वाया जाऊ


 देत नव्हती. एक अजाणत आकर्षण तिला 


त्याच्याबद्दल वाटू लागलं होतं.


 मग मुद्दाम तो जिथे असेल तिथे मैत्रिणींसोबत जाऊन उभं राहणं, त्याच्या नोट्स मागणं...


      हळूहळू सावनी ने त्याच्याशी मैत्री 


वाढवली. 


"अरु! आय मिन अरविंद साने. मला तुमच्या नोट्स द्याल का मानसशास्त्रच्या. ते मला जरा थोडं अवघड वाटतं आहे. कोणीतरी सांगितलं की तुमच्या नोट्स अगदी छान असतात. " सावनी अरुला न्याहाळत बोलत होती. 


   तिकडे बाकीच्या तिथे उभ्या असलेल्या पोरांचा कलिजा खल्लास. अरविंदही बावचळला, "हो! हो! देईन की. बाय द वे, तुमचं नाव काय?"


  " मी....मी सावनी पेंडसे." 


   आता मात्र ती चिडली होती. याला काय अर्थ आहे. निम्म कॉलेज माझ्या मागे गोंडा घोळत फिरत असतं आणि याला साधं माझं नावही माहीत नसावं? 


हा खरच इतका इनोसेंट आहे की नाटक करतोय? 


    "कसला विचार करतेस? माझ्या मागच्या वर्षीच्या नोट्स देईन मी तुला. भेटू आपण उद्या कॅन्टीनमध्ये. " एवढे बोलून तो निघूनही गेला. 


   इकडे सावनी हवेत तरंगत होती. आता उरलेला दिवस काढणं तिला अशक्य वाटू लागलं होतं.. . .    दुसऱ्या दिवशी सावनी अरुच्याही आधी कॅन्टीन मध्ये जाऊन पोहोचली. मैत्रिणींबरोबर सँडविच आणि कॉफी घेत गप्पा मारत असताना नजर मात्र सारखी दाराकडे लागून राहिली होती. 


"सावने ! आज कशी काय ग एकदम उदार झालीस ? आम्हाला असं ट्रीट वगैरे..


काय स्पेशल आहे ते खरं खरं सांग. नाहीतर तुझी काही खैर नाही बघ नंतर समजलं तर" मैत्रिणी खोदून खोदून विचारत होत्या. इतर वेळी भाव खाणारी सावनी आज स्वतःहून मैत्रिणींना कॅन्टीनमध्ये घेऊन आली होती. 


  पण त्या काय बोलतायत याकडे लक्षच कुठे होतं तिचं. 


  कसलीशी अनामिक हुरहुर मन अस्वस्थ करत होती आणि तिकडे रेडिओवर वेड लावणाऱ्या स्वर्गिय मधुर आवाजात लता "आंधी" पिक्चर मधलं गाणं जणू काही फक्त तिच्याचसाठी गात होती.... तुम आ गए हो


नूर आ गया है


तुम आ गए हो


नूर आ गया है


नहीं तो चरागों से


लौ जा रही थी


जीने की तुमसे


वजह मिल गयी है


बड़ी बेवजह जिन्दगी जा रही थी


तुम आ गए हो


नूर आ गया है  गाण्याच्या ओळींनी धुंदी चढली होती मनावर. .. पहला नशा.. पहला खुमार... 


आणि दारातून अरु आत आला. केवढ्याने बावरली ती. 


हातातलं सँडविच खाली डिशमध्ये गळून पडलं


 पटकन सावरलं तिने स्वतःला. आपलं लक्ष नाहीये असं दाखवत मैत्रिणींशी गप्पा मारण्यात रंगल्याचं नाटक करू लागली. 


    अरुनं चौफेर नजर फिरवली. सावनी दिसल्यावर तिच्या टेबलपाशी येऊ लागला, तस तिच्या ह्रदयाचे ठोके धडधड वाढू लागले. काय होतय समजेच ना.


अरू जवळ आला. 


त्याने शर्टवर मारलेल्या परफ्यूमचा सुगंध.. 


'हाय! आज तो कत्ल करने का इरादा रखके आए है जनाब।'...  "हाय !" टेबलपाशी आल्यावर तो म्हणाला


 "अरे अरु! हाय!


बस ना काय घेणार तू? कॉफी?" 


सावनी उत्तरली 


"नको.. अगं मला काहीच नको.


थँक्यु! यु ऑल एन्जॉय. 


 तसाही लेक्चरला जाण्यासाठी उशीरच झालाय मला आज जरा. 


या घे नोट्स. 


याच हव्या होत्या ना बघ तुला 


काहीही अडलं तर कधीही विचार


 ऑल द बेस्ट"


रसिकाने घशात खरखर आल्यासारखा आवाज काढून सावनीला भानावर आणलं. 


"अरे हो माझ्या मैत्रिणींशी ओळख करून देते तुझी"


तिने सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. 


मैत्रिणींनीही एकमेकींना डोळा मारत "नवीन" ओळख करून घेतली. 


सगळ्यांना हाय-हॅलो करून अरु तिथून लगेच निघाला. 


त्याचेही मित्र बाहेर वाट पाहत होते. 


"तर अशी गोष्ट आहे मॅडमजी...


आजच्या या उदारपणाच रहस्य हे होतं तर"


 आता मैत्रिणी तिला खेचायला लागल्या. 


 तिनं ही आढेवेढे घेत अरु तिला आवडत असल्याचं कबूल केलं. 


आता नोट्स घेण्याच्या निमित्ताने. .. काहीतरी शंका विचारण्याच्या निमित्ताने.. अरु आणि सावनी एकमेकांना भेटत राहिले. त्यांची चांगली मैत्री झाली. एक छान ग्रुपच तयार झाला सगळ्यांचा मिळून. 


 मग अनेकदा एकत्र पार्टी करणे


 पिक्चरला जाणे...  


एकमेकांच्या घरीही जाणं-येणं होऊ लागलं.  


तिला अनेकदा वाटे की त्याच्याकडे 


आपलं मन मोकळं करावं. त्याला सांगून टाकावं की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मला तू फाSSSर आवडतोस. पण मग वाटे...हे सांगितलं आणि अरुला आवडलं नाही तर तो आपली मैत्रीही सोडून टाकेल. कुठल्याही परिस्थितीत तिला अरुचा दुरावा नको होता.........कॉलेजमध्ये गॅदरिंग सुरू झालं. मंतरलेलं…..जादुई वातावरण. उत्साहाचा सळसळता झरा सगळीकडे ओसंडून वाहत होता.


      प्रत्येक जण त्या धुंदीत तरंगत होता. नजरा एकमेकांना शोधत होत्या आणि नजरेत गुंतून पडण्याचा खेळ सर्वदूर चालू होता. या भारलेल्या वातावरणात अनेक प्रेमीवीर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर होते.  


     आज कविता वाचनाचा दिवस होता.


अरुही कविता सादर करणार होता.


 सावनी तिच्या मैत्रिणींसोबत 


पहिल्या रांगेत बसायचं म्हणून हॉलमध्ये जरा लवकरच जाऊन पोहोचली होती.
"सावनी तू अरुला सांगून का नाही टाकत ?" अश्विनीनं तिला परत एकदा विचारलं.    "नाही ग, तो नाही म्हणाला तर... मला भीती वाटते. जाऊ दे न !" सावनी उत्तरली.    तितक्यात तिथे अरु आला. "ए सावनी, इथे काय करताय ? मी तुम्हाला कुठे कुठे शोधत होतो.पप्याला पाहिलं का कुठं? या सलवार कुर्त्यावर 


जॅकेट हवं होतं. त्याला आण म्हटलं तर कुठे जाऊन बसलाय कोण जाणे. आत्ता कार्यक्रम सुरू होईल. "  पप्याला धावत येताना बघून अरु तिकडे पोहोचला.


 "पप्या,च्यायला कुठे कडमडला होतास आणि जॅकेट कुठे आहे ? " " हे घे शहाण्या ! कार्यक्रम यांचा आणि धावपळ मात्र आमची. " पप्या म्हणाला. सावनीनं अरुला जॅकेट घालायला मदत केली आणि तो विंग कडे पळाला.    किती स्मार्ट दिसतोय अरु....


काही केल्या याच्याशी बोललं पाहिजे..... सावनी विचार करत होती.


ती ही काही कमी सुंदर दिसत नव्हती. काळ्‍या रंगाच्या साडीवर बारीक लाल फुलांच नक्षीकाम. . त्याला मॅचिंग काळे कानातले आणि गळ्यातलं नाजुकसं पेंडंट. हातात तसलंच बारीक घुंगरू असलेलं ब्रेसलेट,प्रत्येक वेळी हात हलवल्यानंतर त्याची होणारी हलकिशी किणकिण. 


क्षणभर अरूला देखील ती जॅकेट घालायला मदत करत असताना त्या किणकिणणार्या नाजुक हातांचा मोह पडला होता.. पण त्या भावना मनातच दडपून तो विंगेकडे पळाला.     अरु स्टेज वर आला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. सारं कॉलेज त्याच्या कवितांसाठी वेडं होतं.....ते वयच वेडं असतं


कुणी मोहवूनी जातं


मन स्वप्नात तरंगत रहातं


मुग्ध गंधात गंधूनी जातं


ते वयच वेडं असत......


का जाणे कशासाठी


मन सैरभैर धावतं


सगळं मागे सोडून 


मला कुणाकडे खेचतं


ते वयच वेडं असत......


कुणी म्हणा प्रेम बावरा


भान जगाचं नसतं


कळत असत सारं तरीही


वळत काहीच नसतं


ते वयच वेडं असत......


कुठल्या प्रेमाच्या अवकाशात


मन पाखरू भिरभिरतं


ना मिळे ते हसू चोरटे


उगाच हताश हळहळतं


ते वयच वेडं असत......


अचानक गहीवरतं मन


कुणी हळूच मला खुणावतं


डोळ्यातील त्या जादुने


हे अंग मोरपीस बनतं


ते वयच वेडं असत......


हातातील त्या हाताने


एक नव नात खुलतं


मला छोटासा कोपरा हवा म्हणताना


सारं आभाळच मिठीत येतं


ते वयच वेडं असत......


सगळ्या जाणीवा बधीर होतात


त्या एका शब्दासाठी कान आतुरतात


प्रेमात पडल्यावर जाणवतं


ते हुरहुरणं खरं तर याचसाठी असतं


ते वयच वेड असत......


ते वयच वेड असत......टाळ्यांचा कडकडाट झाला. 


मुलं अरविंद सानेला भेटण्यासाठी स्टेजकडे धावली. 


खरोखरीच वेड लागलं होतं मुलांना. अगदी मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यानं कवितेतून.  "अरे यार !!काश ही कविता माझ्यासाठी केली असती. काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. " सावनी मनातल्या मनात म्हणाली.      दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अरूचीच हवा. कॉलेजात पोहोचल्यावर ती अरुला शोधत राहिली. 


लेक्चरला वेळ होता. 


कॅन्टीनमध्ये डोकावलं...


 लांबूनच दिसला तो.


तसही तो कुठेही असता तरी तिने शोधून काढल असतं त्याला.


त्याच्यातलं अद्रुश्य चुंबक तिला त्याच्यापर्यंत खेचून घेऊन आलं असतं. 


ती ही वाहावत होती. 


आज त्याच्यापर्यंत आपलं प्रेम पोहोचवायचच.


पण त्याला नाही आवडलं तर.. 


कोणी दुसरच त्याच्या मनात असेल तर.. 


त्याच्या मनातलं कसं ओळखायचं?  


 शेवटी मैत्रिणींकडे मनातलं गुपित उघड केलं तिने. 


"प्लीज मदत करा ना गं. त्याच्या मनात काय आहे हे काढून घ्यायला हवं. "


पार्टीच्या बेटवर मैत्रिणींनी मदत करायला रुकार भरला. 


 संध्याकाळी कट्ट्यावर भेटायचं ठरलं होतं सगळ्यांचं. निरुची पार्टी होती. संध्याकाळी सगळे एकत्र भेटल्यावर


स्मितान हळूच अरुला विचारलं


" काय अरु! सध्या काय बाबा तुमचीच हवा आहे कॉलेजमध्ये. मग कोणासाठी केली होतीस ती कविता? 


सांग ना रे आम्हाला पण


 कळू तर देत आम्हाला कोण आहे ती तुझ्या मनातली स्वप्न परी, जिच्यासाठी इतकं झुरतोय तु"


मग सगळे मिळून त्याची चेष्टा करू लागले. 


"अरे सांग की आऱ्या. आज बोल हि दे तू दिल की बात. "


"ऐका ना रे. 


खरंच असं काहीही नाहीये" तो काकुळतीला येऊन म्हणाला. 


"हो का? बरा सिंगल राहशील तू इतक्या तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या ब्युटी क्वीन्सच्या मैफिलीत. "


 इतका गोड लाजला तो...


सावनीला वाटलं असंच जावं आणि घट्ट मिठी मारावी त्याला. 


सांगून टाकावं मनातलं बेधडकपणे


 जो होगा देखा जायेगा


 पण नाहीच जमलं..


सगळे मनाचे इमले.. 


  "अरे काय छळताय रे त्याला. ते येडं असंच राहणार इतक स्मार्ट असून सुद्धा आणि इथे बघा, 


हम तो दिल हथेली पे ले के खडे है, लेकिन कोई भाव नही दे रहा है। "


" एक गप रे ! तुला कोण भाव देणार" अशाच गप्पा टप्पा चालू राहिल्या.


स्मितानं सावनीचा हात दाबला आणि हळूच कानात पुटपुटली 


"सावने तुझ्यासाठी रस्ता क्लीअर आहे ग. मार तुझ्या प्रेमाची गाडी सुसाट."


दोघीही खसखसून हसल्या. 


"अरु मला सोडशील ना रे घरी जाताना?मी गाडी नाही आणलीये." स्मिता कडे नजर टाकत सावनीने विचारले. 


"हो त्यात काय एवढं. सोडेन की"


 गाडीवर त्याच्यामागे बसताना तिला एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटायला लागलं. मंद वाऱ्याची झुळूक आणि ही शांत संध्याकाळ...सोबतीला हवाहवासा वाटणारा त्याचा सहवास..


तिने हात हलकेच त्याच्या खांद्यावर ठेवला. एक अनामिक हुरहुर जाणवू लागली होती. 


"एक विचारू अरु? तुझ्या मनातली ती...


कशी असावी असं तुला वाटतं?" सुरुवातीला तो काही बोलेचना पण मग तिने त्याच्या मागे लकडाच लावला. 


"मला ना एकदम साधी सरळ मुलगी हवी आहे. छान राहणारी..शांत...


सगळ्यांच्या मनात घर करेल अशी..


तिचं मन इतकं मोठं असावं की फक्त मीच नाही माझ्या आजूबाजूचं सगळं जग तिच्या मनात सामावून जावं


 ती आली की तिच्या येण्याने माझा मनमोर मुग्ध व्हावा 


तिच्या हसण्याने आयुष्याचा श्रावण व्हावा 


थोडक्यात काय एकदम नेक्स्ट डोअर गर्ल हवी आहे. 


 कुठलाही छानछोकीपणा नसलेली एकदम सहज साधी मुलगी मला हवीशी वाटेल"


 त्याच्या बोलण्याने ती त्याच्या जास्तच प्रेमात पडली.


तिलाही असाच मुलगा तर नवरा म्हणून हवा होता. आता तिनं पक्कं केलं. 


याला सांगायचच पण वेळ घेऊन हळूहळू...


पोहोचू दे या ह्रदयीचे त्या ह्रदयी 


शब्दही न बोलता.. जोर का धक्का धीरे से. .. 


प्यार का मजा इसी में है बाबू।


ये शाम थोडी और हसीन होने तो दो... 


 जरा बेकरारी बढने तो दो। ...आता सावनीने वेगळाच मार्ग अवलंबायचा ठरवला. 


तिने आणि तिची मैत्रिण अनुष्काने प्लॅन केला. 


दुसर्या दिवशी काॅलेजमध्ये गेल्यावर त्यांनी अरूला कँटीनमधे बोलावलं. 


खूप अर्जंट काम आहे सांगितल्यावर तो ही धावत पळत आला. 


मग अनुष्काने सावनीला खूप चक्कर येतीये, अजिबात बरं वाटत नाहीये सांगितले. 


  तिच्यासाठी कॉफी आणायला सांगून तेवढ्या वेळात पटकन त्याच्या सॅक मध्ये 


एक गुलाबी पत्र टाकलं.


"थोडी कॉफी घे सावनी. बरं वाटेल तुला"


"हो ना रे. अचानक असं कसं झालं कळतच नाहीये" ती ही खोट्या खोट्या रडवेल्या आवाजात म्हणाली. 


"ठीक आहे ग! होतं कधी कधी असं. काही स्ट्रेस आहे का? परीक्षेचे टेन्शन आलंय? नको घेऊस ग इतक टेन्शन. होईल अभ्यास छान."


तो सावकाशीने तिच्याशी बोलत होता. मग तिला बरं वाटत आहे याची खात्री करून गाडीवर बसवून तिला घरी सोडण्यासाठी निघाला.. .. 


अनुष्का त्याच्याकडे पाहातच राहीली. 


" किती चांगला मुलगा आहे हा. मनाने किती निर्मळ. अजून सावनीचं आणि याचं काहीच नाही तरीही किती काळजी करतो तिची. लगेच घरी सोडायला गेला... 


मागे सगळेजण पिक्चरला गेलो होतो तेव्हाही नाही का बसताना देखील स्वतः या बाजून अन पप्प्याला दुसऱ्या बाजूनं बसवलं होतं सगळ्या मुलींना कव्हर करत. 


 किती रिस्पेक्ट देतो हा लेडीज ना 


खरंच लक्की आहे सावनी"....  .... घरी गेल्यानंतर अरूनं ते पत्र पाहिलं. "हे कुणाचं पत्र?"।। 


 अरविंद, काय म्हणू तुला प्रिय म्हणू कि सख्या म्हणू.... 


खरतर मला एवढेच म्हणायचे आहे की माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.. तू होऊन पाऊस


माझ्यावरी बरसला


चिंब अल्लड सरींनी


माझ्या मनात भिजला........ 


.. ❤❤❤ ।। गंमत वाटली त्याला ते निनावी प्रेमपत्र 


 वाचून. त्यानं ही गोष्ट सगळ्या


 मित्र मैत्रिणींपासून लपवून ठेवली.


"काय अरू? 


स्पेशल दिसतय काहीतरी आज


 चेहरा का एवढा चमकतोय तुझा? 


सांग ना ?


लपवतोयस का आमच्यापासून काही?"


दुसर् यादिवशी कॉलेजात गेल्यावर सावनीने अनुष्काकडे मिश्किलपणे पहात अरुला विचारले. 


अं?... नाही... नाही 


काहीच तर नाही 


कसनुसं हसत त्यानं वेळ मारून नेली. 


सगळा दिवस बेचैनीतच गेला त्याचा.. 


 "कोण असेल ती? 


कोण असेल जिने इतकं मनापासून प्रेम व्यक्त केलंय पत्रातून? 


दिवसभर तो शोधक नजरेने तिचा शोध घेत राहिला.... मग मधून मधून त्याच्या सॅकमध्ये अशी गुलाबी पत्र आपोआप यायला लागली.


    आता तर तो ही या पत्रांची आतुरतेने वाट पाहू लागला. पागल झाला होता तो त्या गुलाबी पत्रांसाठी.... 


आणि ती लिहीणा-यासाठी सुद्धा...  "अरे! लक्ष कुठेय तुझं? काय चालू आहे सध्या? 


एकदम शांत शांत असतोस. " राघव विचारत होता,


"हो ना असं वाटतंय ग्रूपकी जान ही निकल गई है। "


"अरे यार। टेन्शन आहे का काही. बोल की घडाघडा."


सगळे विचारत होते


 पण अरूच लक्षच नव्हतं.सगळे विचारत होते...


पण उत्तर फक्त अनुष्का अन् सावनीलाच माहित होतं. त्या ही त्याला चिडवत गालातल्या गालात हसत होत्या.दिवस जात होते 


अन् अरू......


त्याला आता तिच्याशिवाय जगणं अशक्य झालं होतं. 


"अग कुठे आणि कसं शोधू तुला? 


मला भेटायचय तुला. "


 तो फक्त शोधक नजरेने तळमळत भिरभिरत राहिला


आग दोनो तरफ बराबर लगी है...


 जाणवलं तिलाही..


      शेवटी पत्रातून तिने त्याला भेटण्यासाठी लिहीलं. अरुची स्वारी एकदम खुश होती आज.ती...त्याच्या स्वप्नातली अनामिका त्याला आज भेटणार होती. कॉलेजच्या मागच्या टेकडीवर तिने त्याला


संध्याकाळी बोलावलं होतं.

आज अरूचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.  "कशी असेल? ती कशी दिसत असेल? असुदे! कशीही असू दे. माझं खुप प्रेम आहे तिच्यावर. ती जशी असेल तसं मी तिला स्विकारायला तयार होईन. ". खुप चलबिचल चालु होती त्याच्या मनात. आज त्यानं त्याच्या मनातलं हे गुपित 


मित्र-मैत्रिणींना देखील सांगितलं.  "अरे शहाण्या इतके दिवस आमच्यापासून हे लपवून ठेवलस काय?


चल आता पार्टी काढ पहिले. "  मग काय विचारता सगळेच 


त्याच्याबरोबर तिला भेटायला जायला तयार झाले. 


 कसबस त्यांना थोपवून ठेवत त्यानं


 दुसऱ्या दिवशी तिला त्यांना भेटवायचे 


वचन दिलं. लेमन यलो कलरचा शर्ट, निळी जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि डोळ्यावरती रेबॅन गॉगल चढवून अरु संध्याकाळी ठरवलेल्या वेळा पेक्षा थोडा लवकरच त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. हे वाट पाहणं फार जीवघेणं वाटत होतं 


त्याला. 


 येणारी प्रत्येक मुलगी तीच असेल का? अशा विचारानं थोडा पुढे व्हायचा आणि निराशा व्हायची त्याची.   लांबूनच त्यानं सावनीला येताना पाहिलं. "अग तू कशाला आली आहेस इथे? मी सांगितलं ना, उद्या तिला सगळ्यांना नक्की भेटवीन म्हणून." तो घाईघाईने पुढे जाऊन म्हणाला.  "अरे! हो- हो. थोडातरी धीर धर. मी या झाडामागे लपून लांबूनच बघते. मला पण बघायचं आहे रे तिला. " असं म्हणून ती दूरच्या एका झाडामागे जाऊन उभी राहिली.  अरु कितीतरी वेळ वाट पहात उभा होता. अंधार पडू लागला तशी त्याची बेचैनी वाढू लागली आणि अचानक त्याला त्याच पत्रात लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी ऐकू यायला लागल्या.....         ।। फक्त तू आणि मी         मनमोर लुब्ध होतो......         हलके तरंग मनावर        जगपसारा क्षणात स्तब्ध होतो ।।...........


 तो भारावून पुढे गेला.


सावनी झाडामागून हळूच बाहेर आली.. "आता त्याला भेटायचं. त्याला सांगायचं सगळं खरं खरं आणि त्याचा हात हातात घेऊन प्रेमाची कबुली द्यायची "....अन् समोर च दृश्य बघून तिला धक्काच बसला 


भान हरपल्या सारखी ती एकाच जागी थिजून गेली........


क्रमशः

पुढील भाग

✍️ दीपाली थेटे राव


वरील कथा दीपाली थेटे राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित. 


4 Comments

  1. ते वयच वेडं असतं चा पुढचा भाग पोस्ट करा ना प्लीज

    ReplyDelete
  2. पुढचं भाग पोस्ट करा n plz

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post