ते वयच वेडं असतं... २
✍️ दीपाली थेटे राव
.......
......अरविंद भारावून पुढे झाला.....
समोर पाहतो तर अनुष्का !
"म्हणजे अनुष्का.... ती.... तू? म्हणजे तू ती पत्र... " त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. त्याने अनुष्काला घट्ट मिठी मारली.
" माझी अनामिका....माझी अनु"
सावनी झाडामागून अवाक होऊन पहातच राहिली. समोर घडतय ते खरं की आपल्याला काही भास होतोय. अनुष्का तू असं करू शकत नाही. तू तर माझी चांगली मैत्रीण आहेस. माझ्या मनातलं गुपित कुठलाही आडपडदा न ठेवता मी तुझ्या पुढे उघड केलं आणि तू ..
नाही ....नाही ....तू असं नाही वागू शकत.
तुला माहित आहे अनु, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय...
आणि अचानक सावनीच्या फोनवर मेसेज टोन वाजला.
"Everything is fair in Love & war साऊ...
तुझी पत्रं पोहोचवता पोहोचवता मी कधी अरूच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाले..कळलच नाही ग.
मी... मी मरून जाईन तो नाही मिळाला तर
Hopefully तू समजून घेशील..
तुझी बेस्ट फ्रेंड
अनुष्का
"
आपण एखाद्या गोष्टीच्या मागे जीव खाऊन धावावं अन् ती गोष्ट हातात येतीय म्हणता म्हणता सारं काही निसटून जावं.....
मऊशार वाळूसारखे....क्षण..बोटांच्या फटींतून ओघळत हरवून गेले.
ती खिन्न होऊन मावळत्या सुर्याच्या साक्षीने एकमेकांच्या मिठीत सामावलेल्या त्या लव्हींग कपलकडे पहात राहिली...
दुसऱ्या दिवशी अनुष्का आणि अरु दोघेही हसत हसत कॉलेजमध्ये आले. सगळ्या मित्र-मैत्रिणींनी त्याला गराडा
घातला.
"कुठे आहे ती? तिला घेऊन येणार होतास ना? "
त्यानं अनुष्काची सगळ्यांना नव्याने ओळख करून दिली.
ती गुलाबी पत्र.. त्यातल्या प्रेम कविता.. ते शब्दांच्या जादुने भारलेलं प्रेम...
सारं सारं काही त्यानं मित्रांसोबत शेअर केलं.
" तुझं दिसणं....
तुझं माझ्या भवती वावरणं
आता माझा श्वास झालंय
तुझं असणंच खरंतर
माझ्यासाठी जगणं झालंय
प्रेमाच्या या अल्लड सरींनी
मन माझं चिंब न्हालयं
आता ग्रीष्माची चिंता कशाला
सारं आयुष्यच श्रावण झालंय... "
कविता सादर केल्यानंतर अरुनं
सावनीकडे पाहिलं आणि अनुष्काचा हात धरून तिला उभं केलं. अनुच्या डोळ्यातला प्रेमाचा होकार पाहून त्याचं मन थुई थुई नाचू लागलं.
सावनीच्या डोळ्यातला अश्रूंचा पूर त्याला कळलाच नाही.
इकडे सावनीच्या बाकीच्या मैत्रीणी मात्र वेड्यासारख्या जे घडतंय ते पाहत राहिल्या.
स्मिता सांगायला उठली,
"हे सगळं खोटं आहे... त्या सार् या चिठ्ठ्या...त्या कविताही... साऊच्या...
आणि अरू...तू..
तू ही आमच्या साऊचाच रे"
ती काही बोलायच्या आत सावनीने तिला हाताला ओढून खाली बसवले.
"पण.. साऊ अग..
बोल ना काहीतरी. सांग ना सगळं खर खर .
सांग त्याला आत्ताच्या आत्ता.. इथेच.. सगळ्यांसमोर.. की तू माझं प्रेम आहेस."
अश्विनी बोलत होती पण सावनी काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हती.
सगळे निघून गेल्यावर ती स्मिताला म्हणाली..
"मला अरु हवाय ग पण पूर्णतः माझा. आत्ता मी त्याला सगळं खरं खरं सांगितलं तर तो द्विधा मनस्थितीत पडेल.
त्याचं मन कायम संदिग्ध राहिल. .कोण खरं..कोण खोटं याचा शोध घेत राहिल.
त्यापेक्षा जर तो माझा असेल..माझ्या नशिबात असेल ..तर तो माझा होईलच. आणि तेव्हा त्याला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
मी वाट पाहीन..
कितीही वेळ लागला तरी चालेल
मी त्याची वाट पाहीन.... "
आता अरु आणि अनुष्का सतत एकत्र दिसू लागले.
कॉलेजमध्ये,कॅन्टीनमध्ये
एकमेकांबरोबरच राहण्यात त्यांना मजा येत होती.
सकाळ झाली की आवरणे, कॉलेजला जाणे, संध्याकाळी आल्यावर थोडा इकडेतिकडे टाईमपास करून अभ्यास करणे आणि झोपणे ...या अरुच्या दिवसभराच्या रूटीनमध्ये आणिक दोन गोष्टी ॲड झाल्या होत्या.........अनु ला भेटणे आणि तिच्या आठवणीत रात्री गाणी ऐकत झोपणे. पूर्वी कधीही मन लावून गाणी न ऐकणारा अरु आता कडव्यातल्या मधल्या मधल्या ओळी मनापासून गुणगुणू लागला होता. त्यामध्ये स्वतःला आणि अनुष्काला गुंफुन बघत होता.
स्वतःला कोणत्याही वस्तू किंवा कपडे
खरेदी करतानाही तो अनुचा विचार करु लागला. हा रंग तिला आवडेल का? ही स्टाईल पसंत पडेल का? आणि काय काय...
त्याच्या कवितांसाठी तिच्या डोळ्यांतून मिळणारी दाद त्याला खूप खूप महत्वाची वाटत होती पण अनुष्का मात्र कंटाळायची.
"काय सारख्या कविता करतोस रे. जरा reality मध्ये जगायला शिक"
मग मात्र तो हिरमुसून जायचा.
त्याला प्रश्न पडायचा
"हीच का ती...जी तिचं प्रेम सुंदर सुंदर कवितांमधून व्यक्त करायची. .. "
इकडे सावनीची अवस्था बिकट झाली होती. सुचायचंच नाही काही.
जळी स्थळी अरूचाच भास व्हायचा तिला.
कॉलेजमध्ये गेल्यावर एकाच ग्रुप मध्ये असल्यामुळे त्याच्याशी भेट व्हायचीच.
कितीही नको वाटत असलं आणि त्याच्याशी आणि अनुष्काशी बोलावं लागायचं.
तिचाच निर्णय होता ना तो....पण आता सारं निभावून नेणं अशक्य होत चाललं होतं.
मैत्रिणींनीही आता तिच्याशी या विषयावर बोलणं बंद केलं होतं. मनातल्या मनात घुसमट होत होती सावनीची. तरीही ती मोकळेपणाचा भाव चेहऱ्यावर आणत कॉलेजमध्ये वावरत राहायची.
"आज अरूचा वाढदिवस आहे."
उठल्याउठल्या सावनीला आठवलं. तिने त्याला फोन लावला. सकाळी सकाळी फोन आला म्हणून धावत पळत अरुने फोन उचलला
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरु.
खूप संपन्न, निरोगी, दीर्घायुष्य तुला लाभू दे. "
ती पुढे काय बोलते आहे हे ऐकून घेण्याच्या आतच तो म्हणाला
"ओह सावनी! मला वाटलं एवढ्या सकाळी सकाळी माझ्यासाठी अनुचाच फोन असेल. Anyways thanks for wishes. " आणि त्याने फोन ठेवूनही दिला. खूप एकटं पडल्यासारखं वाटायला लागलं सावनीला.
खरंच मैत्रिणी सांगत होत्या ते बरोबर होतं का? सगळं खरं खरं सांगायला हवं होतं का आपण अरूला?
कळेनासंच झालं तिला
सुन्न मनाने ती उठून आवरायला गेली.
कॉलेजला तर जावंच लागणार होतं. परीक्षा जवळ आली होती.
खूप वेळ वाट पाहून शेवटी अरूनेच अनुष्काला फोन लावला
" हॅलो मॅडम! काय करत आहात. काहीतरी विसरलात तर नाही. बघा काही आठवत आहे का? "
नुकत्याच झोपेतून उठलेल्या अनुष्काने वैतागून विचारलं
" काय आहे रे आज? आणि सकाळी सकाळी फोन करून झोप मोड काय करतोस? एकतर रात्री पिक्चर टाकून उशिरा झोपले होते मी. आज ठरवलं होतं की कॉलेजलाही दांडी मारायची, मस्त पडी टाकायची अन् तू हे असं आत्ता फोन करून कचरा केलास झोपेचा. "
"अनु अगं असं काय करतेस. आज माझा वाढदिवस आहे. मला वाटलं सकाळीच लवकर फोन करशील. नाही आला ... म्हणून मग मीच केला तुला."
"अरे सॉरी.. सॉरी यार!
तुझा वाढदिवस आहे ना?
ओके..ओके
Many many happy returns of the day dear. सांग कुठे जाऊया. आजचा दिवस फक्त तू आणि मी
शॉपिंग..पिक्चर आणि हॉटेलिंग
फुल टू धमाल
मी आवरते पटकन
तू मला तासाभरात पिकअप कर "
"ए ..ए ..थांब अगं ! आज सगळ्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी हवी आहे. त्यामुळे कॉलेजवरच जाऊया. सगळे एकत्र एन्जॉय करू आणि नंतर माझ्या घरी जाऊया. आई-बाबांनी बोलवलं आहे तुला. त्यांना भेटायचे आहे तुला. संध्याकाळी वाढदिवसाच्या औक्षणासाठी तुलाही घेऊन ये असं आईने बजावलंय. हो आणि जेवायलाच ये असं सांगितलंय"
"शी! हे काय बोर प्लॅनिंग आहे रे!
बरं जाऊ दे ते. तू ये तर खरं मग ठरवू. "
तासाभरात अरु तिच्याकडे पोहोचला.
"शी SSs! आज वाढदिवस आहे ना तुझा. मग हे असले कपडे काय घातले आहेत? हे काय मॅचिंग आहे ? so...irritating... rubbish.
Go & change this. किंवा असं करूया मीच तुला माझ्या चॉईसचे कपडे घेऊन देते.
अगदीच बकवास चॉइस आहे तुझा. "
"अनुष्का हे कॉम्बिनेशन माझ्या आईने केलं आहे. हा तिचा चॉईस आहे आणि तो बकवास असूच शकत नाही.
सावनी ही मागे एकदा म्हणाली होती..
हा रंग मला सूट करतो म्हणून"
" हो का? मग जा ना सावनीच्याच बरोबर.
इथे काय करतो आहेस....mamaa's boy... "
एवढे बोलून ती आत निघून गेली. त्याचा मूडदेखील खराब झाला.
आता बर्थडे सेलिब्रेशनमध्ये काही इंटरेस्टच उरला नव्हता त्याला.
"ही नक्की तीच का...."
तो मनोमन स्वतःलाच पडताळून पाहू लागला.
"आपलाच चॉईस तर चुकला नाही ना? "
कॉलेज वर न जाता घरीच गेला तो.
आई परत परत विचारत राहिली ...पण थोडं बरं वाटत नाहीये ....असं सांगून रूम मध्ये जाऊन पडून राहिला. थोड्यावेळाने मोबाइलवर मेसेज टोन वाजला.
अनुष्का चा मेसेज होता ....
रात्री नऊ वाजता तिने सिटी बाहेरच्या रेस्टो बारमध्ये त्यांच्यासाठी डिनर अरेंज केलं होतं. उशीर होईल म्हणून सांगूनच ये लिहिलं होतं. येणार् या फोन कॉल्स ना आणि मेसेज मेसेजेसना रिप्लाय करत अरूनं असाच दिवस घालवला. रात्री नऊ वाजता तो त्या रेस्टॉरंटपाशी पोहोचला.
मित्र- मैत्रिणींच्या घोळक्यात ड्रिंक्स घेणारी अनुष्का त्याला दिसली.
त्याला पाहताच ती पुढे झाली
"Hello everyone! Here is the celebrity of the day. Please wish him a luck & a blasting birthday . Cheers🍻 everybody"
तिने पुढे होऊन त्याच्या हातात ग्लास दिला
"मी...मी घेत नाही.
मी कधीच drinks घेतले नाहीत."
"Ohh!
किती शाळू आहेस रे तू. कोई बात नही. आजपासून सुरुवात कर. आज तुझा वाढदिवस आहे ना. so let's celebrate. Let the music on. Come on everybody let's dance & have fun. "
त्या सगळ्यांच ते पिणं आणि नाचणं बघून तो हबकला.
अनुष्काच हे रूप त्याला नवीनच होतं. नाही..नाही.ही अशी मुलगी माझी लाईफ पार्टनर असूच शकत नाही.
तो कोणालाच न सांगता पार्टीतून निघून गेला. ......
दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्येही तो अनुष्काशी अजिबातच बोलला नाही. ग्रुपमध्ये एकत्र असूनसुद्धा तो तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिला. त्याच्यातला हा चेंज सगळ्यांना जाणवला..
पण त्यांना अस वाटलं..झाल असेल काहीतरी दोघांच्यात.
बाकीच्यांनीही मग ते मनावर घेतलं नाही. दिवसेंदिवस अरविंद आणि अनुष्का मधली दरी वाढतच होती.
शेवटी अनुष्कानंच सगळं संपवायचं ठरवलं.
त्यादिवशी कट्ट्यावर सगळे बसले असताना ती अचानक आली. तिच्याबरोबर तिचा कोणीतरी नवीनच मित्र होता.
"अरु!
I am really sorry but we are not made for each other. तुझे आणि माझे likings...living style सगळंच different आहे. माझ्या जगण्याच्या कल्पनेमध्ये तू नाही बसू शकत.
तू प्रत्येक गोष्ट फार विचार करून...तोलून-मापून करतोस
& I want to live my life easy going... Cool...
आयुष्य जसं वहात जाईल तसं त्याच्या बरोबर आपणही वाहायचं..बेफाम ...
तू हे नाही करू शकत
तू स्मार्ट आहेस, हुशार आहेस ...सगळं काही खरं
पण तुझी आणि माझी जगण्याची स्वप्न फार वेगवेगळी आहेत
एकदम contrast.
So let's get seperate.
तू सावनीसाठीच योग्य आहेस.
Good byee dear. "
हे काय चालू आहे. .ती काय बोलली... अरूच्या डोक्यात पूर्णपणे शिरेपर्यंत ती गेली सुद्धा.
निश्चल होऊन तो दगडासारखा एकाच जागी खिळून राहिला. मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला.
"अरे काय बोलतेय ही?
असं कसं करू शकते
नाती इतक्या झटकन तोडता येतात का ? कळत कसं नाही हिला
प्रेम म्हणजे चेष्टा वाटते का ?
कोणाच्यात इतका गुंतलेला जीव सहजासहजी सोडवता येतो?
काय...काय म्हणाली ही शेवटी?
तू सावनीसाठीच योग्य आहेस ?
म्हणजे ?
काय....अर्थ काय होतो याचा ?"
तो वेड्यासारखा बरळत होता.
मित्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.
असेच दिवस जात होते. अनुष्काच्या वागण्यामुळे फार दुखावला गेला होता अरु. तसाही तो खूपच हळव्या मनाचा आणि sensetive होता. हे सर्व प्रकरण त्याने फारच मनाला लावून घेतलं होतं.
खरंतर आता परीक्षांचे दिवस होते. खूप अभ्यास करणारा तो...निदान पास तरी होईल का नाही अशी शंका वाटू लागली होती. त्याचं लक्ष अभ्यासातून पूर्णपणे उडालं होतं.
खिन्न मनानं तासंतास एकाच जागी बसून राहायचा.
त्यातच अनुष्काच्या वडिलांची बदली झाल्यामुळे ती कॉलेजही सोडून गेली. आता तर तो पूर्णपणे खचला. निदान समोर तरी दिसत होती ती.
बोलली नाही तरी बघता येत होतं.
आता तेही उरलं नाही.
... सगळेजण कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसले होते अन् रव्या घाबराघुबरा धावत धावत तिथे आला
" चला यार सगळेजण हॉस्पिटलमध्ये जायचंय.
अरुनं सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय. विष प्यायल त्यानं"
सुरुवातीला सगळ्यांना कळलच नाही आपण काय ऐकतोय ते
जेव्हा भान आलं तेव्हा सगळे हॉस्पिटलकडे धावत सुटले
"अर् या लेका मूर्ख झालास का तू?
पोरीसाठी जीव देतो होय?
अरे अशा लाख भेटतील तुला
आणि मित्र...मित्र काय मेले होते का रे? आमच्याशी का नाही बोललास?
हे असं करणं शोभत का तुला?
अरे आई-वडिलांचा तरी विचार करायचास.
खेळ वाटतो का आयुष्य म्हणजे
प्रेम म्हणजे सगळं काही नसतं रे
जगण्याला ध्येय असावं....तूच बोलायचास ना रे.. "
मित्र नुकत्याच शुद्धीवर आलेल्या अरुला झापत होते. त्याच्या आई-वडिलांची परिस्थितीही बिकट झाली होती. खूप भावनाविवश झाले होते दोघेजण. रडून-रडून आईचा चेहरा सुजला होता.
त्यांना धीर देत आणि अरूला यातून बाहेर काढण्याचे वचन देऊन मित्रांनी त्यांचा निरोप घेतला.
हळूहळू अरु या सगळ्यातून बाहेर येत होता. सगळे मिळून त्याची खूप काळजी घेत होते.
सावनी तर अजूनही त्या धक्क्यातून सावरली नव्हती. ती खूप वेळ त्याच्याच बरोबर असायची. त्याला हवं नको ते पाहत होती. या सगळ्यातून त्याच mind divert करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होती.
म्हणता म्हणता परीक्षा तोंडावर आली. परीक्षेच्या काळात देखील सावनीने अरूला खूप मदत केली. ती दोघं चांगल्या मार्कांनी पास झाली.
नकळत ते एकमेकांच्या जवळ आले. अरुला तिचा खूप आधार वाटायचा. तिच्या बरोबर असताना एक secured फिलिंग यायचं.
" मला खरंतर अशीच गर्लफ्रेंड हवी होती..अगदी सावनीसारखी. "
त्याच्या घरच्यांनाही सावनी आवडू लागली होती.
एके दिवशी सुट्टीत सगळेजण मिळून oneday trip ला गेले.
सगळ्यांच्या समोरच गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल हातात घेत अरुनं एकदम फिल्मी स्टाईलनं सावनीला प्रपोज केलं.
"दर दर की ठोकर खाके अब आया सही मकाम पे। " स्मिता आनंदाने ओरडली.
" अरे अरु! यही तो तेरी सही मंजिल थी। पर तु ही समज नही पाया और भटकता रहा इधर उधर। "
म्हणजे?
"अरे ! ती तुला पूर्वी लिहिलेली गुलाबी पत्र ..त्या कविता...ते सगळं सावनीचचं प्रेम तर होतं.
त्या दिवशीही तुला भेटायला आलेली मुलगी सावनीच होती
पण अनुष्कानं असा गेम केला की एकाच वेळी साऊची मैत्री आणि प्रेम दोन्ही हरवून गेलं.
सावनीने या सगळ्यातून स्वतःला कसं कसं बाहेर काढलं याचे आम्ही साक्षीदार आहोत.
बर तुला आम्ही सांगायचं म्हटलं तर त्यालाही तिने मनाई केली होती.
हा तिचाच तर विश्वास होता की एक दिवस तिला तिचं प्रेम नक्की मिळेल
& finally...today you proposed her."
"आईशप्पथ! हे तर आम्हालाही माहीत नव्हतं यार. "
सगळेच मित्र अचंबित होऊन ओरडले "होऊन जाऊ दे अर् या.
कर तिला प्रपोज दणक्यात.
अरे अब हम साथ है तो किसी की मजाल है जो तुम दोनो को अलग कर दे।"
खरी गोष्ट कळल्यानंतर अरुचे डोळे भरून आले
त्याच्या प्रेमासाठी फार मोठी किंमत मोजली होती सावनीनं
"I love you सावनी.
माझी साऊ..... "
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते...
पण ते प्रेम परिपक्व होतं..
समजूतदार होतं..
जोडीदाराचा अध:पात होऊ न देता यशाकडे नेणारं होतं.
हेच तर हवं होतं अरविंदला
उशिरा का होईना पण त्याला त्याचा खरा solemate मिळाला होता.
सावनीची देखील यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती.
आग उधर भी बराबर लगी थी l उगाच येताजाता आरशात पाहणे. आत्ता या क्षणाला तो बरोबर असता तर त्यानं काय केलं असतं... याचा विचार करत राहणं... स्वतःला सतत त्याच्या विचारांशी आजमावून पहात राहणे यामध्येच तिचा सगळा वेळ जात होता.
दिवस सरत होते तसं त्यांचं प्रेमही बहरत चालल होतं. हळूहळू बातमी घरापर्यंत पोहोचली.
सावनीच्या बाबांनी त्यांना बाईकवरून एकत्र फिरताना पाहिलं. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी तिला याबद्दल विचारणा केली. सावनीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. आई आणि बाबांनी तिला याबाबत ओरडायला सुरूवात केली. ती खूपच रडवेली झाली तशी त्यांनी तिला जवळ घेतले आणि गंमत करत असल्याचे सांगितले. त्यांनी अरविंदच्या घरी जाउन त्याच्या घरच्यांशी रितसर बोलणी केली. दोघांच्याही घरून होकारच मिळाला. मग काय विचारता? आता फक्त कॉलेज संपायची खोटी होती. मग सावनी कायमचीच अरुची होणार होती. तोपर्यंत अरूही त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालू लागला होता.
एके दिवशी....
दोघंजण सुट्टी म्हणून गडावर फिरायला गेले. वातावरणाचा अंमल दोघांवरही चढला होता. हातात हात घालून फिरताना, एकमेकांच्या मिठीत बेधुंद होत निसर्गाच्या साक्षीने ते कधी एक झाले त्यांचे त्यांनाच कळले नाही....... निघता निघता थोडा उशीरच झाला.
"अरु, अरे गाडी थोडी हळू चालव ना. मला भीती वाटते आहे. "
"घाबरतेस काय वेडे!!अगं घट्ट धरून बस मला. त्यातच तर खरी मजा आहे." डोळा मारत अरू बोलला.
"अरु!!!! काय रे हे? " सावनी चक्क लाजली. प्रणयाची लाली तिच्या गालांवर चढली होती.
तिच्या मोहक चेहर्याकडे अरु पाहातच राहिला अन् वळणावर तो समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक.......
आणि नंतरचा अपघात........
अरुची शुद्ध हरपली. जाग आली ती हॉस्पिटलमध्ये. त्याची तब्येत आता हळूहळू सुधारत होती. शुद्धीत आल्या-आल्या त्यानं सावनीबद्दलच विचारायला सुरूवात केली.......
..............
...............
....... "अरु sss ऐकतोयस ना? अरे आतातरी नाद सोड आणि लग्नाला तयार हो. "आई कळकळीने सांगत होती.
पण अरुच लक्षच नव्हतं. आता या वाक्यांची त्याच्या घराला ही सवय झाली होती. काही केल्या तो बधत नव्हता...................................
. .................
..................
...... "बाबा, काय करतो आहेस? आवर ना पटपट. एकतर पहिल्यांदाच आज तू sss मला कॉलेजला सोडतोयस. मला लवकर पोहोचायचं आहे. कॉलेजमध्ये दिवाळीनिमित्त कवितांचा कार्यक्रम ठेवला आहे. आज मी ती... तुला आणि आईला आवडणारी तुझी कविता वाचणार आहे.
खरं सांगू का?...
तु मला सोडायला यावं या हट्टामागे वेगळेच कारण आहे. माझे सगळे मित्र मैत्रिणी फॅन आहेत तुझ्या शब्दांचे . त्यांना भेटायचं आहे तुला. तुझ्यामुळे माझी कॉलर एकदम टाइट" अवनी अरुच्या खोलीत येऊन बोलत होती.
"ती कविता नाही का? तू आईसाठी लिहीली होतीस. अरे ती रे.. ..
मनात होते तुझ्या तरीही
तू काही बोललीच नाही
मीच म्हणालो प्रीत माझी तुजवरी
अन् तुझे डोळे बोलून गेले बरंच काही.
......
"कित्ती रोमँटिक कविता आहे रे बाबा. सुरूवातच एकदम भारी खरंच सांग ना.. आई काय म्हणाली मग?
ए सांग ना रे. आता मी काही कुक्कुलं बाळ नाहीये. मोठी झालीये. आता तरी सांगशील का मला? " अवनीचा किलकिलाट चालूच होता.
त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह झळकलं
खरंच? इतकी मोठी झाली लेक ?
काळ कसा भुरकन उडून गेला कळालच नाही
"तिला" विसरण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून घेतलं पण तरीही मनाच्या तळाशी घट्ट उरून राहिलीये ती..
कितीही नाही ठरवलं तरी तळ ढवळून उफाळून येते वरती अन् मग ठरवूनही मी माझा उरत नाही.
आता लेकीला पाहताना तिलाच तर शोधतो आहे या चेहऱ्यात.
छे !छे ! काय होतंय हे सगळं
असं या क्षणी तरी माझे अश्रू लेकीच्या आनंदावर विरजणासारखे नको सांडायला.
अवनीचा चेहरा जरी तिच्यासारखा असला तरी अस्तित्व वेगवेगळी आहेत दोन्ही. . . .
अवनीला तीचं स्वतंत्र आभाळ असायलाच हवं
मी नाही आता लेकीमध्ये "साऊ " ला शोधणार. ..
अरुनं लक्ष न दिल्यासारखं केलं आणि तो स्वतःचं आवरू लागला.
आजही त्याचं मन सावनीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेलं होतं. आताही त्याला तिच्याकडेच जाण्याची ओढ लागून राहिली होती.
.....लवकरच येणाऱ्या दिवाळीचा आनंद चहूकडे सळसळत होता. सगळं वातावरण उत्साहाचं आणि प्रसन्न होतं.
आईनं केलेल्या फराळाला आजही ती झक्कास चव होती. थोडं फराळाचं त्यानं सावनीसाठीही बांधून घेतलं होतं आईकडून. दिवाळीसाठीच्या सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तूही त्याने कालच दिल्या होत्या.
आता फक्त "ती" च राहिली होती.
अरू तयार होऊन खाली आला आणि पार्किंग मधून कार काढायला गेला.
दोन्ही आजी आजोबांना नमस्कार करून नटलेली, सजलेली अवनी बाहेर आली.
" लाडोबा आहे नुसती. आईचंच रूप घेतलय लेकीनं ", आजीने तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला.
अवनीला कॉलेजमध्ये सोडलं आणि अरू हरखून सभोवार पहातच राहिला. त्या वातावरणात हरवून भूतकाळात गेला....... बराच वेळाने भानावर आला आणि कोणालाही न भेटता तिथून निघाला. .
"तिच्या " ओढीने तिच्याकडे...
. .......
.....आज दिवाळी पाडवा होता.
"सावनी, अग बघ ना ग मी काय आणलंय तुझ्यासाठी!
वाढदिवसाला ड्रेस आणला होता पण दिवाळी सणाला मात्र तुझ्यासाठी साडीच घेतो नेहमी. खरं की नाही?
बघ ना गं ! हा रंग तुला पसंत पडतो आहे का
आणि हे फराळाचे पदार्थ
आणि हो नेहमीसारखीच तुझ्यासाठी एक सुंदरशी कविताही करून आणली आहे.
खरतर या आणलेल्या सगळ्या गोष्टी सावनी च्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या त्यालाही कळत होतं तरीही....
तो दरवर्षी आणतच होता... माहित नाही किती काळ जाणार आहे
साऊ तुझं ते डोळ्यातून व्यक्त होणं...
मला आज ही आठवतं..वेड लावतं...... "
। ।
तुझ्या नि माझ्या नात्यातील
विण अजून घट्ट आहे
तुझ्यात गुंतून राहण्याचा
तसा हा माझा जुनाच हट्ट आहे .... । ।
अरु बोलत होता आणि त्याच्या डोळ्यांतून सावनीवरचं प्रेम ओसंडून वाहत होतं.
सिटी हॉस्पिटलच्या बेडवर कित्येक वर्षे पडून असलेल्या सावनीची तब्येत गेल्या काही दिवसात थोडी थोडी सुधारत होती. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत होते. डॉक्टरांच्या दृष्टीने मिरॅकलच होतं ते.
.....त्या अपघातात तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. ती कोणालाही ओळखत नव्हती. स्मरणशक्तीच गमावून बसली होती.
अरू...त्यांच प्रेम... त्यांच नातं आणि त्यांची अवनी...
अरविंद आणि सावनीची
"अवनी...."
त्यांच्या त्या गडावरच्या प्रेमाच्या उत्कट क्षणांची आठवण...अवनी
डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जगवलेली.......अवनी
सारंं काही हरवलं होतं.....
पण त्यांचं प्रेम जिवंत होतं
अवनीच्या रूपानं...
अरूची सावनीशी असलेली प्रेमाची कमिटमेंट त्याला तिच्यापासून सुटू देत नव्हती...
तिच्या परत येण्याची आशा तग धरून होती त्याच्या मनात..
जसा विश्वास त्याला मिळवण्यासाठी सावनीच्या मनात होता....
म्हणूनच तर आज इतक्या वर्षांनंतरही तो सावनीच्या मोठ्या-मोठ्या काळ्याभोरं पण निस्तेज, निर्विकार डोळ्यांमध्ये त्याचं प्रेम.. तिच्या आयुष्यातील त्याची जागा...शोधत होता.
आणि आता डॉक्टरांच्या प्रयत्नांना यशही येत होतं. कदाचित ते डोळे पुन्हा नव्याने बोलते होणार होते.
खरोखरंच ते वयच वेडं होतं...
अन् तसंच राहील.....
त्या दोघांसाठी......
कायमचं... ..
(कथेचे सर्व हक्क राखीव आहेत. या कथेतील पात्र तसेच घटना काल्पनिक असून त्यांचे कुठल्याही व्यक्ती वा प्रसंगाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
✍️ दीपाली थेटे- राव
वरील कथा दीपाली थेटे राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.