ऊन पाऊस

 ऊन-पाऊस

✍️ सचिन देशपांडे

धडाम्मकन आवाज झाला... आणि पाठोपाठ आवाज आला, रोहिणीबाईंच्या जोराने कळवळल्याचा. रघुनाथराव दचकुनच उठले... पलंगावर बाजुला रोहिणीबाई न दिसून, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. ते त्यांच्या वयाच्या मनाने जरा जोरातच चालत, बेडरुमच्या बाहेर आले. आणि दिसल्या त्यांना रोहिणीबाई पार आडव्या पडलेल्या, बाथरुमच्या दारातच. आता पंच्याहत्तरीचे रघुनाथराव, रोहिणीबाईंना काय उचलणार... आणि काय त्या अडुसष्टच्या रोहिणीबाई आपणहून उठणार... सगळी पंचाईतच होती. रोहिणीबाईंच्या दंडाला धरत, त्यांना बसवण्याचा निष्फळ प्रयत्न केला रघुनाथरावांनी. पण पाच मिनिटांच्या अथक परिश्रमांनंतर... हे आपल्याने जमण्यासारखं नाही हे लक्षात येताच, रघुनाथराव दरवाजा उघडून बाहेर गेले. त्यांच्या शेजारी रहाणार्‍या कर्णिकांची बेल मारत, तेजश्रीला घडला प्रकार सांगितला त्यांनी. तेजश्री तशीच पळत आली रघुनाथरावांच्या घरी. रोहिणीबाईंना धिर देत तेजश्रीने... डाव्या हाताने त्यांच मनगट पकडलं, आणि उजवा हात त्यांच्या बखोटीखाली घालून... पुर्ण जोर लावत रोहिणीबाईंना बसवलं. थोडावेळ त्यांना तसंच बसवून... तेजश्री पुन्हा जोर लावत रोहिणीबाईंना, उठवून उभं करायला पाहू लागली. रघुनाथराव जागच्या जागीच डोलत... "हं शाब्बास.. हं व्हेरी गुड" म्हणत, रोहिणीबाईंचा धिर वाढवत होते. 


अखेरीस तेजश्रीला यश आलं... नी ते दोघं दोन बाजुंना पकडून, रोहिणीबाईंना बेडरुममध्ये घेऊन गेले. पलंगावर हळूहळू बसवलं त्यांना. रघुनाथरावांनी रोहिणीबाईंच्या डोक्याला मागच्या बाजुने हात लावत, कुठून रक्त वैगरे येत नाहीयेना तपासलं. तेजश्रीने मग हळूहळू करत रोहिणीबाईंना झोपवलं. कण्हत्या गळ्याने रोहिणीबाईंनी, आणि दाटल्या गळ्याने रघुनाथरावांनी... तेजश्रीचे आभार मानले. रघुनाथरावांनी तिला दरवाजापर्यंत सोडलं... हात केला... नी ते आले परत बेडरुममध्ये. रोहिणीबाईंच्या बाजूला बसत, रघुनाथरावांनी ब्रुफेन दिली त्यांना. त्यांचा हात हातात घेत, हलकेच थोपटला. त्या मूक दिलाशावर रोहिणीबाईंना, पुढे चारेक तास शांत झोप लागली होती. रघुनाथरावांनी मात्र तळमळतच संपवली होती रात्र. 

सकाळी रोहिणीबाईंना जाग आली, ती स्वैपाकखोलीतून ऐकू येणार्‍या खुडबूडीनेच. रघुनाथरावांंना हाक मारतच, एकीकडे त्या हळूहळू उठून बसल्या. उभ्या राहिल्या पण... चालताच येईना त्यांना... अगदी भिंतीला धरुनही. त्या पुन्हा पलंगावर बसल्या. त्यांच्यापाशी येऊन उभ्या राहिलेल्या रघुनाथरावांनी, त्यांच्याकडे बघितलं. रोहिणीबाईंच्या कपाळावरुन हात फिरवून... रघुनाथरावांनी पुन्हा एकदा मान हलवत, दिलासा दिला त्यांना. रघुनाथरावांनी रोहिणीबाईंचा डावा हात आपल्या खांद्याभोवती टाकला... आणि उठवलं त्यांनी रोहिणी बाईंना. कसबसं चालत नेत... बेसिनपाशी घेऊन गेले. रोहिणीबाईंना आपले हातही उचलता येईनात... तेव्हा रघुनाथरावांनी आपल्या ओंजळीत पाणी घेत, रोहिणीबाईंना चूळ भरवली. ब्रशवर टुथपेस्ट घेऊन त्यांचे दात घासले. रोहिणीबाईंना धरत, पुन्हा पलंगावर आणून बसवलं. रोहिणीबाईंसाठी चहा घेऊन आले रघुनाथराव... बशीत तो ओतत... फुंकर मारुन त्यांनी तो पाजला बाईंना.


  रोहिणीबाईंच्या डोळ्यांतून, अपार कौतुक दाटून आलं यजमानांबद्दल. रघुनाथराव कपबशी घेऊन आत गेले... आणि रोहिणीबाईंना पुन्हा खुडबूड ऐकू येऊ लागली. दहा मिनिटांत रघुनाथराव बायकोसाठी, दही दूध पोहे घेऊन आले. स्वतःच्या हातांनी ते पोहे, त्यांनी बाईंना भरवले. लेकाला फोन करुन सांगायला हवं... असं रघुनाथराव बोलले रोहिणीबाईंजवळ, तर त्यांनी अडवत ठाम नकार दिला यजमानांना... अन् म्हणाल्या "डाॅक्टरलाही फोन करायची घाई करु नका... संध्याकाळपर्यंत बघू वाट... सांधे अवघडलेत... होतील मोकळे". रघुनाथरावांनी मानेनेच दुजोरा देत, विषय फार वाढवला नाही. लेक वेगळा झाल्याचं, अजुनही पचवू शकल्या नव्हत्या रोहिणीबाई. 

एका तसराळ्यात कोमट पाणी घेऊन आले रघुनाथराव, रोहिणीबाईंना स्पंजिंग करण्यासाठी. "ईश्श्य" करत मोठ्याने लाजल्याही होत्या बाई मग. स्पंजिंग झाल्यावर रोहिणीबाईंना... त्यांच्या आवडत्या सुमती क्षेत्रमाडेंचं 'महाश्वेता' देऊन, रघुनाथ राव पुन्हा स्वैपाकखोलीत गेले. रोहिणी बाई पुस्तकात ज्या गुंतल्या होत्या, त्या भानावर आल्या कुकरच्या शिट्टीनेच. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं... "बाई बाई.. बारा वाजून गेले की... जेवणाच बघायला हवं... पण हे काय करतायत?... आणि कुकर कोणी लावला?... अहो ऐका जरा". रघुनाथराव आत आले... खांद्यावर फडकं टाकलेले... नाकाला पिठ लागलेले. यजमानांचा हा अवतार बघून, रोहिणीबाईंना हसू आवरेना. कसंबसं ते हसू दाबत त्यांनी सांगितलं... "अहो मला धरुन आत न्या... मी बघते स्वैपाकाचं... आणि तुमचं काय चाल्लय काय नेमकं?... काय हा अवतार म्हणायचा". हे एवढं बोलून त्या पुन्हा खळखळून हसू लागल्या. 

रघुनाथरावांनी उजव्या खांद्यावरचं फडकं, अगदी ऐटीत डाव्या खांद्यावर टाकलं... "मस्त तुपाच्या फोडणीची आमटी केलीये टाॅमॅटो घालून... वांग्याचं भरीत केलंय दह्यातलं... जमतील तशा पोळ्या केल्यायत, भुमितीतल्या सगळ्या आकाराच्या... आणि मस्त बासमती लावलाय... चार शिट्ट्या झाल्याचेयत... आता जरा  वाफ निघाली, की आणतोच जेवण वाढून". रोहिणीबाईंच्या विस्फारल्या डोळ्यांना, आणि आ वासल्या तोंडाला... फक्त हलकीशी मान हलवून अॅकनाॅलेज करत, रघुनाथराव भर्रकन आतही गेले. 

पंधरा - विस मिनिटांतच ते आले, मस्त वाढलेलं ताट घेउन. पोळीचा तुकडा तोडत... तो भरतात बुडवून त्यांनी, रोहिणीबाईंच्या तोंडाशी नेला. रोहिणीबाई रघुनाथरावांचा हात अडवत बोलल्या... "तुमच्याआधी कधीतरी लागलाय का जेवणाचा घास माझ्या तोंडी?". तो घास आपल्या हातात घेत रोहिणीबाईंनी... व्यवस्थित हात उचलत आपला, तो रघुनाथरावांना भरवला. आणि आ केला मग, स्वतःच्या तोंडाचा. "हिला हात कसा बरं उचलता आला एवढा?" हे आश्चर्य डोळ्यांत घेऊनच, रघुनाथरावांनी रोहिणीबाईंना घास भरवला. यजमानांचा अगदीच आश्चर्याने ग्रस्त चेहरा बघून, रोहिणीबाईंना पुन्हा एकदा हसू फुटलं. आपले दोन्ही हात व्यवस्थित वर उचलत... त्यांनी रघुनाथरावांच्या चेहर्‍यावरुन हलकेसे फिरवले, आणि आपल्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना आणत कडाडकन्न बोटं मोडली. बोटांचा आवाज ऐकून आणिकच भांबावलेल्या रघुनाथरावांकडे बघत, रोहिणीबाई बोलू लागल्या... 

"काल मध्यरात्री बाथरुममध्ये पाण्याने भरलेली बादली, मीच जोरात पाडली... नी पाठोपाठ किंचाळलेही... तुम्ही येईपर्यंत दोनेक मिनिटं तरी जाणार हे माहित होतं... सो तेवढ्या वेळेत बाथरुमच्या दाराशी जमिनीवर झोपले कण्हत, विव्हळत... तुम्ही काल आलात माझ्यापाशी त्या क्षणापासून... ह्या आत्ताच्या क्षणापर्यंत, तुम्ही माझ्याशी अक्षरशः स्वप्नवत वागलायत... मला धरुन उचलायचा प्रयत्न केलात... तुमच्याने झालं नाही तर... तुमचा कमालीचा भिडस्त नी अबोल स्वभाव दूर सारत, शेजारच्या तेजूला घेऊन आलात... मला खोक वैगरे तर पडली नाही ना, हे बघायला माझ्या डोक्यामागे हात लावलात... इतरवेळी स्वतःच्या औषधांसाठीही माझ्यावर अवलंबून असलेल्या तुम्ही... मला आपणहून गोळी दिलीत...  नंतर मला थोपटतही होतात तेही कळलं बरं मला... सकाळी चक्क माझे दात घासून दिलेत... म्हणजे नुकतंच लग्न लागलेल्या, नी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्यांनाही हे करायची घाण वाटेल... पण तुम्ही मनापासून केलत ते... 

मला चहा पाजलात, फुंकरीने तो गार करत... दुध दही पोहे करुन भरवलेत मला... आणि आता हा ईतका केलेला स्वैपाक... मी खरंच उंच उंच विहरतेय हो आकाशात... तुमच्या स्वभावानुसार तुम्ही मला विचारणारही नाही, की हे सगळं मी का केलं?... पण मीच सांगतीये ऐका... दाखवून द्यायचं होतं मला... आपल्या एकुलत्या एक लेकाला... मागल्या आठवड्यात फोन करुन ओरडायला लागला मला... 'तू खाली उतरतेस... बाहेरुन कळलं मला... लोक काय म्हणतील मला... दिवस किती वाईट आहेत... अंथरुणाला खिळलीस तर कोण करणार तुझं?... आणि काही बरं - वाईट झालं तुझं... तर बाबांचं कोण करणार?... आयुष्यात कधी एक ग्लास ईकडचा तिकडे केला नाही त्या माणसाने... आयुष्यभर तुझ्याशिवाय पान हललं नाही त्यांचं... कशाला फुकट उतरायचं खाली'... वैगरे बोलला हो तो... जसे काय आई - बाप हवेवरच जगतात ह्याचे... दोन महिन्यांपासून एकदाही आला नाही बघायला आपल्याला... घरी तर नाहिच... निदान बिल्डिंगखाली येऊन हाक तर मारायचीस... चार - चार दिवस हा फोन नाही करत... मग बाहेरुनच कळणार ना ह्याला आपल्याबद्दल... आणि वर काळजी, लोक ह्याला काय म्हणतील त्याची... काय फायदा आहे ह्याचा, आपल्यापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर राहून... म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं... 

मला तुमच्याबद्दल असलेली खात्री कनफर्म करायला... नी त्याला तुमच्याबद्दल नसलेली खात्री ईनफाॅर्म करायला... त्याला दाखवून द्यायला की बघ... मी अंथरुणावर खिळले, तर माझा नवरा माझं सगळं करायला समर्थ आहे... आणि स्वतःचंही करायला खंबीर आहे माझा नवरा, जर का मी उद्या गेले... तुझ्यावर नाही पडणार काही... बरं हे एक कारण झालंच... पण तुम्हाला माहितीये का... की काल रात्रीपासून आत्तापर्यंत, किती स्पर्श केलेत तुम्ही मला.... जे फार मागे आयुष्याच्या कुठल्याशा टप्प्यावर, विसरुन आलो होतो आपण... एकमेकांसोबत चोविस तास रहायचं, एकाही स्पर्शाशिवाय... का म्हणुन?... वय झालं आता म्हणून?... ह्यॅट्ट... याला काय अर्थ आहे... पण हा मात्र अनपेक्षीत धनलाभच होता माझ्यासाठी बरं का... ते राशी भविष्यात सांगतात ना तसा". 

हे बोलून रोहिणीबाईंनी, चक्क डोळा मारला रघुनाथरावांना. आणि रघुनाथ रावांनी एक हात मारला आपल्या कपाळावर... तर एका हाताने मारती टपली रोहिणीबाईंना. दोघांचही खळाळतं हसू सांडू लागलं मग, दोघांच्याही भरुन आलेल्या डोळ्यांतून... जसं 'ऊनपाऊस' एकत्रच आलेलं श्रावणातलं.

---सचिन श. देशपांडे

वरील कथा सचिन देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post