प्रेमात पडताना

 प्रेमात पडताना….! 

✍️ चित्रा नानिवडेकर

     ‘समजतो काय हा स्वतःला…..! असेल साहेब, असेल मोठा ऑफिसर…! म्हणून काय आम्ही लल्लू वाटलो का ह्याला…. मी.. अज्जिबात जाणार नाहिये परत बंगल्यावर सांगून ठेवते. ‘आणि बोलणार तर अज्जिबात नाहिये '

   गळ्याच्या शिरा ताणून ताणून  अवनीने चप्पल भिरकावली आणि दाणकन बॅग सोफ्यावर टाकली. जणू आकाशसमोर बसलाय आणि त्याच्यावर ती चप्पल किंवा बॅग आदळणार आहे. कोपर्‍यात तांदूळ निवडत असलेल्या माईना हसू आवरत नव्हते. ‘आज कोण सापडला आता हिच्या तावडीत…? ‘किंचित दुर्लक्ष करीत असल्याचा बहाणा करून त्यांनी तांदुळ निवडायला घेतले. पण अवनी नक्कीच आपल्या कडे येणार. ही खात्री होती. त्यांच्याकडे मोर्चा वळवत, अवनी म्हणाली ‘तू… तू हसू नकोस माई.. मी खरंच सांगते. त्या खडूसला माझ्यापेक्षा ती कुत्री प्रिय असेल तर म्हणावं.. घेवून बस तिलाच जवळ…. मला सुद्धा भाव देणारे पुष्कळ आहेत. ‘

      घाव खूप वर्मी लागलेला दिसतोय बाईंच्या. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत “कुत्री “वगैरे शब्द हिच्या तोंडून येणार नाहीत. माई तिच्या जवळ जाऊन  पाण्याचा ग्लास देत म्हणाल्या ‘काय झालं अवनी… आकाश कडे गेली होतीस ना ?मग.. ह्या ग्रीष्माच्या वाफा का म्हणते मी?  ‘

     सहा  महिन्यापूर्वी आकाश म्हणजे अप्पासाहेब राणे ह्यांचा मुलगा ईकडे PSI म्हणून रुजू झाला.. जुन्या ओळखीतला. त्याच्या येण्यामूळे नविन उजाळा मिळाला.

अवनीच्या बाबांना तर त्याच्या येण्यामुळे खूप आनंद झाला. रविवारी  व्हॉलीबॉल, बुद्धिबळ ह्यासाठी हक्काचा भिडू मिळाला. आकाशसुद्धा घरचाच असल्यासारखा वावरत असे. 

 अवनी आणि तो छान मित्र झाले. घरातील सगळे ह्या मैत्रीवर खूश होते, आकाशचे वडील आणि अवनीचे डॅडी लहानपणापासून मित्र आहेत. आकाश एक मॅच्युर  आणि जबाबदार ऑफिसर आहे. माईना माहीत होते की अवनी आपल्या अल्लड स्वभाव प्रमाणे उगाचच चिडचिड करत असणार. अवनीच्या मित्र मैत्रिणी माईना माहिती असायच्या. तिच्याकडे विशेष लक्ष देणारा तो विकी की फिकी, झालच तर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला तिच्या बरोबर डान्स करणारा किरण, आणि आजकाल त्या फेसबुकमध्ये सतत तिच्याशी चॅटिंग कि काय करणारा काय बरं नाव म्हणाली पार्थ की कोण. पण हा आकाश आल्यापासून जरा जमिनीवर आल्यात बाईसाहेब. 

  “ह्म्म!! बोला काय झालं?.... आमच्या राणीसरकार का रागावल्या? “

‘माई… तो.. तो चक्क मी त्याच्या समोरच आहे हेच विसरून जातो. मी ऑफिस सुटल्यावर कित्ती फोन केले, साधे उचलण्याची तसदी घेतली नाही. म्हणून मी घरी गेले तर महाराज कुठे असतिल सांग?... सांग.. सांग? अग, मला वाटलेलं अचानक टूर वर गेला की काय पण नाही चक्क घरी होता, पण मला कळवणे  तर दूरचीच गोष्ट माझा फोन पण घेतला नाही.? ‘

      आपल हसू दाबत माई म्हणाली ‘अग, कामात असेल. म्हणून फोन उचलला नसेल. ‘तू त्याचीच बाजू घेणार. तुमच्या सगळ्यांचा लाडका आहे ना तो म्हणजे  त्याचीच बाजू घेणार." आपलं अपर नाक उडवत ती अजूनच  उसळून म्हणाली '‘हो.. हो.. त्या गार्डन मधील प्राणी, पक्षी, फुलं, माती, दगड धोंडे, कुत्री, मांजर सगळे जण महत्त्वाचे. मी सोडून…. माई त्याला मी म्हणजे काय ते.. हे… ख.. पदार्थ वाटले का ग! "

    “क:पदार्थ… म्हणतात ग सोने…! “

     हो तेच ते. गेल्या वेळी  सुद्धा माहिती आहे तूला त्यानं काय केलं ते? त्या जर्मन क्रॉफर्ड की काय तो कुत्रं घेऊन डॉक्टरकडे जायचं होतं. माई!!!मी गाडीमधे चक्क मागे बसले अन ते कुत्रे त्याच्या मांडीवर डोके ठेवून आरामात झोपले होते. “

    “अगबाई!!! म्हणजे तूला का मांडीवर त्यानं बसवून घ्यावे वाटत्ये की काय? 

   “शी s…. बाई तू काय पण बोलते माई.. मला असं  नव्हतं ग  म्हणायचं… “चल मी खोलीत जाते कशी. मला कोणी समजून घेत नाही. पार्थ असेल नेटवर मी त्याच्याशी बोलते. निदान तो मला निगलेक्ट तरी करत नाही. “

तेव्हाच बाहेर हॉर्न वाजला....  खिडकीतून बाहेर बघत मान उडवून तिने म्हटले , “आला बघा तुमचा लाडका. “माई पुढे होऊन आकाशसाठी दार उघडत हळूच त्याला म्हणाल्या “पाणी फारच तापले आहे बरं का… जरा जपून “

    मान मागे टाकत मिस्किलपणे हसत तो म्हणाला “कल्पना आहे… मघाशी माझ्यावर तोफ झाडून झाली. म्हणूनच तर तातडीने आलो. “त्याच्या मागून जेनि त्याची जर्मन शेफर्ड डॉगी बरोबर होतीच.

   आत जाता जाता तीरासारखी बाहेर येत अवनी किंचाळली “माई.. माई आधी तिला.. तिला कुत्र्याला बाहेर काढा… ती ती.. माझ्या अंगावर येईल “... माई च्या मागे लपून ओरडली. प्रेमाने जेनि ला जवळ घेत हासत आकाश म्हणाला “जेनि… कोणाला चावत नाही. ती फक्त प्रेम करते…! हो ना जेनि? “

   माई त्याच्यासाठी चहा करायला आत जाताना म्हणाल्या, “ये आकाश.. आत्ताच तुझी आठवण काढली… आज मस्त थालीपीठ आणि लोण्याचा बेत आहे. गरम गरम खायला देते."

    “वा...वा… माई! मस्तच आत्ताच पाणी सुटले तोंडाला… “माईंच्या पाठोपाठ किचनमध्ये जात तो म्हणाला. माईनी अवनीकडे बघत म्हटल 

   “चल अवनी मला बारीक कांदा चिरुन दे “ 

    “माय गॉड… माई हे असं सगळे पण जमत? मला वाटलं फक्त…. 

   “फक्त भांडण म्हणायचे ना… तुला?.. स्वतः आधी असे वागायचे. “हळूच ती त्याच्याजवळून जात पुटपुटली. 

   आकाश सरळ किचन कट्ट्यावर बसत म्हणाला 

  “माई! लोकं उगाचच कुत्र्याला घाबरत असतात कुत्र्याएवढे मायाळू प्राणी कोणी नाही, खरतर कुत्र्यांची सायकॉलॉजी काय असते माहित आहे का? तुम्हाला सांगतो… आमच्याकडे एक दिवसाच्या पिल्लूपासून ह्या जेनिपर्यंत पाच सहा कुत्रे आहेत. चार मांजरी आहेत. लहानपणापासून मला ह्या प्राण्यांच्या बरोबर इतके खेळायला आवडत असे, आत्ता पण मिरजेत गेलो की मित्रांना कमी ह्या सवंगडीना भेटले की बरं वाटतं…. काही काही माणसं असतात… तिरप्या नजरेने अवनीकडे पाहत.. प्राणी घाणी. “

    माई म्हणाल्या, प्राणी घाणी… हे काय नवीन? 

   “माई माणूसघाणी नसतात का काही माणसं तशी हो. "

“अच्छा.. असं होय. मी म्हटलं हे काय नविन? "

  अवनीला ओठांवर हसू येत होतं. कसला माणूस आहे हा? एवढा सहा साडेसहा फुटी वाढलाय पण मन मात्र लहान मुलाचे, आपण कितीही रागवायचे ठरवले तरी ह्याचा राग येत नाही. तिचे हासू त्याच्या नजरेतून सुटले नाही. ओट्याच्या कट्ट्यावरुन उडी मारून तिच्या जवळ उभा राहत हळूच स्वतःच्या कानाच्या पाळीला हात लावत तो पुटपुटला “सॉरी" तिने मान उडवत निषेध दर्शवत माईला कांद्याची प्लेट देत म्हंटल, “माई मला नको तुझ ते थालीपीठ… “ 

    “माई माझी आई म्हणते उपाशीपोटी जास्त राग येतो. खरं आहे का ते? "

  “आकाश मला वाटते कोपर्‍यावरच्या स्टोअरजवळ जे आईस्क्रीम पार्लर आहे ना तिथलं आईस्क्रीम खाल्लं की माझ तरी डोकं शांत रहात… आणखी कोणाचं डोकं शांत करायला हवं असेल तर आइस्क्रीम आणू या का? “

     “कळलं बरं… जातेय आणायला. पण आधीच सांगून ठेवते मला जे आवडतं, तेच मी आणणार  बाकी कोणाला काही पाहिजे असेल ते त्यांनी पहावं "

    “माई ही काय जबरदस्ती… माई मी पण जातो तुम्हाला कोणततं फ्लेवर पाहिजे सांगा आणि काका काकूंना कोणता ते पण सांगा. आमच्यात अस नसतं बरं!!! आलो आम्ही."

 ती हॉल मध्ये आली, त्याने तिच्या  पाठोपाठ येत म्हटल.. "डार्लिंग …! “अवनीच्या अंगावर रोमांच उभे राहिले… माय गॉड केवढी ही धिटाई म्हणते मी.. आत दहा पावलावर माई आहे ह्याचे पण भान नसावे? लाजून लाल होत तिने मागे वळून पाहिले…  तर महाराज जेनिच्या पाठीवर हात फिरवत बघत मात्र तिच्याकडे होता. मिस्किलपणे हासत परत एकदा म्हणाला “डार्लिंग.. अर्ध्या तासात येतोय शांत रहायचे काय? “

  "हूं ss!!अर्धा तास कशाला.. हे समोर तर दुकान आहे." पण त्यानं गाडीचं दार उघडून कुरनिसात करत तिच्याकडे बघितलं मात्र मुकाट्याने ती आत बसली. त्याने कॅडबरी बार पुढे करत म्हटल , “सॉरी... मघाशी बंगल्यावर आलीस तेव्हा खरंच माझ्या लक्षात नव्हत आज आपण भेटायचं होतं ते. अग…! आमच्या बागेत एक सुंदर पक्षी आला होता दुपारी. तू बघितला असतास तर तू पण प्रेमात पडली असतीस. अवनी, अग! त्याच्या निळ्याशार पंखा वर पांढरे ठिपके उठून दिसत होते, बिच्चारे जखमी झाले होते ग! म्हणून मी त्याला औषध वगैरे लावायला गेलो ….. अरे..! मीच बोलत बसलो मघापासून , बोला काय म्हणताय राणी सरकार? कसा गेला आजचा दिवस?"

   त्याच्या राणी सरकार ह्या संबोधनामूळे लाल झाले ले गाल लपवणार तरी कसे? 

“खास नाही नेहमीप्रमाणे… आमच्याकडे काही तुमच्या सारख्या एक्सायटिंग गोष्टी थोड्याच घडतात? पण आकाश तूला का म्हणून ह्या पक्षी, प्राणी ह्यांचे एवढे प्रेम वाटते रे? “

  “फक्त प्राणी, पक्षी? … असंच काही नाही..सुंदर, मोहक खळी पडणाऱ्या मुलीसुद्धा मला प्रिय आहेत. तिरप्या नजरेनं तिच्याकडे पहात हसत तो म्हणाला…"

आता अशा मिस्कील बोलणाऱ्या माणसावर राग तरी कसा धरणार बाई..अवनीच्या मनात शेकडो सतारीच्या तारा झंकारल्या.

    त्याच्या आवडत्या छंदाविषयी बोलण्यामूळे तो एकदम खुलला. नकळत ती चार महिन्यापूर्वी त्याच्या येण्याआधीच आपलं आयुष्य आठवत होती.  पहिल्या वर्षाला असताना भेटलेला किरण. त्यांच्या असण्याने आपले आयुष्य ढवळून गेलं होतं, तो आपल्या वर हुकुमत गाजवत असे, परंतु त्यात प्रेमापेक्षा जास्त अरेरावी असे. पहिल्यांदा आपल्याला वाटायचे की आपल्या प्रेमापोटी हक्क गाजतोय पण अति झालं. किरण अचानक तिच्या आयुष्यातून गेला ते ब्रेकअप खूप मनाला लावून घेतल होत आपण. आत्ता कुठे पार्थबरोबर थोडी वेव्हलेंग्थ जुळतेय असं वाटत होते. तिला तिच्याच कॉलेज मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून जॉब मिळाला. एकुलती एक असल्याने तशी ती लाडोबाच.

  बाबा म्हणत, “आपण आपल्या बच्चा साठी घर जावई बघणारे.   आई बाबा, माई येता जाता एकेक स्थळ आणून बेजार करत होते. नातेवाईक पण अधून मधून स्थळ सुचवित. कंटाळा आला होता. बर अजून स्वतःला समजत नव्हते की नक्की आपल्याला काय पाहिजे.. आपण एकदा किरणचा अनुभव घेतला होता, पण त्याच्या नंतर कोणी कधी जोडीदार म्हणून निवडला नाही. कधी वाटे बाबा सारखाच ऑफिसात काम करणारा असावा, कधी वाटे आपला स्वप्नातली राजकुमार मिळे पर्यंत ठामपणे थांबावे. पण नक्की स्वप्नातली राजकुमार मिळेल का? बरोबरच्या एक दोघींचे लग्न ठरले आणि घरून जास्तच उलाढाल सुरू झाल्या. 

    आणि त्या दिवशी गम्मतच झाली. नुकतीच कॉलेजहून आली होती. माईने नेहमीप्रमाणे गरम गरम खायला केले. मस्तपैकी अंगणात आई, ती आणि माई चहा घेऊन निवांत गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात गेटवर पोलिसांची जीप उभी राहिली. माई आणि आई तर घाबरून गेल्या. आईने धसक्याने विचारले ‘का… काय झाले… कोण पाहिजे?... हे… हे घरी नाहियेत. “

  आकाश जऽऽरा कडक आवाजात म्हणाला… मिस्टर देसाई इथेच राहतात ना? त्यांच्या विरुध्द सर्च वॉरंट आहे.  अगबाई!!... आई मटकन खालीच बसली.. माईने तर डोळ्यांना पदर लावून रडायला सुरुवात केली. पण… अवनीने धीर गोळा करून पुढे येत जरा जोरात म्हंटल, “ओ   मिस्टर.. कोण तुम्ही? तोंड सांभाळून बोला. सभ्य माणसं राहतात इथे. द…. द  दाखवा नोटीस… पाहू  कसले वॉरंट आहे."

    खो खो हासत कॅप काढत मिस्कीलपणे तो कंबरेत वाकून म्हणाला, “चिल.. बेबी चिल..माई… काकू.. माफ़ करा मी जरा जास्तच नाटक केलं. मी.. आकाश देशमुख. … अप्पासाहेब देशमुखांचा मुलगा. मिरजेतील वाड्यात आपण रहात होतात…!! “

   “अगबाई… आकाश? अरे!! केवढा ताड माड उंच झालास की. ये ये…!"

   “आई काय हे.. ह्यांनी एवढ घाबरवून सोडलं आणि तू चक्क स्वागत करतेस… चांगल आहे." थोड्या रागाने अवनी म्हणाली होती. 

  “सॉरी… सॉरी. माई, काकू मी थोडी मस्करी केली. “अरे!! सोड ते.. तू आलास ह्यात सगळ आल. ये ये सुनंदा वहिनी कशा आहेत?”

    त्या दिवशी आकाशच्या येण्यामुळे अख्ख्या घरादाराला चैतन्य निर्माण झाले. त्याच्या पाठोपाठ एकदोनदा अप्पासाहेब, सुनंदा वहिनी आल्या. त्यांना अवनी फार फार आवडली, अवनी होतीच देखणी चंद्रासारखा वाटोळा चेहरा, गालावर मोहक खळी, केसांच्या लडिवाळ बटा, गर्द तपकिरी डोळे आणि निर्व्याज हसू.  आकाशच्या अपेक्षा काय आहेत हे विचारण्यासाठी संधी शोधत होते.. पण अजून आकाश आणि अवनी मात्र एकमेकांना चाचपडत होते.  बाबा अजूनही गांभीर्याने अवनीच्या लग्ना बद्दल ठरवत नव्हते. माईना मात्र आकाश आणि अवनी एकमेकांना पूरक आहेत असे वाटत होते. 

    अवनीला वाटे त्यानं आपल्या बद्दल बोलत रहावे, आपली तारीफ करावी आत्ता पर्यंत घरी दारी तिच्या सौंदर्याची चर्चा करत असत आत्तापर्यंत तिच्या कानावर सतत गोड गुलाबी वाक्य पडत असत . आणि हा मात्र एकदा सुद्धा आपल्याला “छान दिसते" म्हणाला नाही. आज आत्तासुद्धा त्याला आपल्यापेक्षा कोण तरी ते हरीण आठवतेय. जाऊ दे झालं, त्याच्याबरोबर जायलाही आपल्याला कित्ती आवडते, स्टिअरिंगवरील त्याच्या सावळ्या रुंद मनगटावर नजर स्थिरावली आणि त्यांच्या घनगंभीर स्वरातला गोडवा पुन्हा पुन्हा तिला अनुभवायला मिळाला. 

    “ बरं का अवनी..आमच्या मिरजेच्या वाड्यात एकदा माझे आजोबा जखमी हरीण घेऊन आले, आम्ही त्याच्या दुखापत झालेल्या पायावर इलाज केला. आज्जी रोज त्याला गरम गरम पेज देत असे. माझी आई कुठून कुठून त्याच्यासाठी कोवळी पाने, कणसे, दुर्वा असा खुराक आणून चारायची त्याला. मी तर शाळेतून आल्या आल्या त्याच्या बरोबर खेळत  असे. आमचे बाबा मात्र जेव्हा ते बरं झाल्यावर जंगलात सोडायला घेऊन गेले, मी खूप दंगा केला. आज्जी तर म्हणाली ठेवा गोठ्यात बांधुन कोणाला  कळणार आहे ? पण कायद्याने गुन्हा आहे म्हणुन बाबा मात्र त्याला जंगलात सोडून आले. अवनी तू विश्वास नाही ठेवणार दोन दिवसांत ते आमच घर शोधत आले."

  “मग?"  आता तिला पण उत्सुकता निर्माण झाली. 

  “मग काय मी ट्रेनिंगला जाई पर्यंत होते. मग बिचारे मेले. आमच्या बागेत आंब्याच्या झाडाखाली पुरले. पण बाबा म्हणाले ज्या दिवशी ते गेलं त्या वेळी गोठ्यातल्या गाई वासरू, प्रताप कुत्रे, मोती मांजर कोणी अन्नाला तोंड लावलं नाही. ह्या मुक्या प्राण्यांच्या जगात केवढी माणुसकी आहे. शिवाय त्या वर्षी पासून आंब्याला भरघोस फळ धरायला लागले….

   आमच्या आजोबांना ना प्राण्यांच्या आजारा बद्दल खूप समजत असे. त्याकाळी veterinary डॉक्टर नसत गावांत पण मग कोणाची म्हैस अडली, गाय आजारी असली की लोकं बैल गाडीत टाकून आमच्या अंगणात आणत असत. त्यांची इच्छा मी जनावरांचा डॉक्टर व्हावी हीच होती. 

    “मग तू कसा काय इन्स्पेक्टर झालास? “

   “खाकी वर्दीच्या प्रेमाने", तो मिस्कील हासत तिच्याकडे पाहात म्हणाला. “जोक्स अपार्ट.. मला असेच डॅशिंग प्रोफेशन पाहिजे होते. मी इथे नसतो गेलो तर सैन्यात भरती झालो असतो… पण मग मला तू कशी भेटली असतीस?"

  “का  कुणीतरी काश्मिरी वगैरे भेटली असती ना… माझ्यात काय आहे? 

“ना.. बाबा आपल्याला अशी जराशी वेगळी थोडी तिखट, थोडी गोड…!" कच्चकन ब्रेक दाबून त्याने गाडी थांबवली. पोलीस स्टेशनवरुन फोन आला होता. त्याला अर्ध्या तासात निघावे लागणार होते. घाई घाईत घरी थालीपीठ खाऊन त्याने निरोप घेतला. अवनी मात्र त्याच्या स्पष्ट संकेत देऊन बोलण्याने खुश होती. “आज मै उपर आस्मा नीचे…"  मस्त तान घेऊन ती नाचत होती. माई हळूच हसत म्हणाल्या ‘स्वारी खुश दिसते.. काय कःपदार्थ काय म्हणतोय?"  तिच्या पदरात तोंड लपवत अवनी म्हणाली “तू.. जा ग माई.. तू माझी चेष्टा करतेस ना?" माई हसत हसत झोपायला गेल्या. 

    पण त्या मध्यरात्री एक विचित्र फोन आला आणि सगळ्या घरादाराची झोप उडवून गेला. त्या संध्याकाळी आकाश पोलीस ठाण्यात गेल्या गेल्या त्याला एक ऑर्डर मिळाली की पूर्व किनारपट्टीवर संशयास्पद हालचाली सुरू आहेत. तो साथीदारांना घेऊन गस्त घालत होता आणि मागून त्याच्या खांद्यावर हल्लेखोरांनी वार केला. तरीही त्याने शिताफीने हल्लेखोरांना मुसंडी मारत पकडून जेरबंद केले. आपल्या साथीदारांच्या ताब्यात देऊन मगच हॉस्पिटल गाठले. ह्या वेळेपर्यंत खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध गेली. त्यानंतर हवालदार बाळा शिंदे यांनी ताबडतोप देसाई यांच्या घरी फोन केला. 

    रात्रभर अवनी आणि तिच्या घरचे हॉस्पिटल मध्ये अस्वस्थ मनस्थितीत बसून होते. आकाश बेशुद्ध होता, खूप रक्तस्त्राव झाल्या मुळे त्याची शुद्ध गेली होती. अवनीचा जीव नुसता वर खाली होत होता. हृदयात काहीतरी तुटल्यासारखे झाले होते. 

    ICU च्या दारावरील एवढ्याश्या काचेच्या तुकड्यातून जीवनमरणाच्या दारात झुंजणारा आकाश पाहून तिला जाणिव झाली की हा आपल्या साठी काय आहे. घशाशी येणारे आवंढे गिळत, डोळ्यांत येणार्‍या पाण्याला परतवत ती सतत मनाला बजावत होती… हा लौकरच  बरा होणार आहे.  देवा एवढा निष्ठुर नको होऊ, आकाश एकदा फक्त एकदाच डोळे उघडून माझ्याकडे पहा रे!!! नको माझी स्तुती करूस, नको मला भाव देऊन पण मला तू डोळे उघडून एकदा तरी पहा रे!!! 

    “ साहेबांचे कपडे" एका शिपायाने तिच्या स्वाधीन आकाश चा uniform केला. तो uniform छातीशी कवटाळून तिने भिंतीचा आधार घेत डोळ्यांत येत असलेल्या अश्रूंना मुक्त वाहू दिल. तिच्या बाबानी खांद्यावर थोपटत म्हटले “जा बेटा घरी जाऊन आराम कर थोडा. मी आहे बाबासाहेब येतीलच एवढ्यात."

मानेनं नकार देत ती म्हणाली “प्लीज बाबा राहू दे ना मलाही इथे….! "

  “बेटा रात्रभर उभी आहेस इथे. थोडा आराम केला की परत सुनंदा वहिनीबरोबर परत ये. वाटल्यास बंगल्यावर जाऊन त्यांना मदत कर माईपण तिथे गेलीय." 

   

    बंगल्याच्या आवारात प्रवेश केला आणि बागेपासूनच तिला उघडं उघडं वाटू लागलं. दिवाणखान्यात जेनि मान टाकून दरवाज्यात बसली होती. अवनीला बघताच टुणकन  उठून उभी राहिली. तिच्या पायाला आपलं अंग घासून,तिच्या हाताला चाटून जणू काही ती आकाश कुठे हे विचारत होती. अचानक तिला आठवलं.. परवाच आकाश सांगत होता, मुक्या प्राण्यांना आपल्याला काही सांगायचं झालं तर ते असे चाटून आपल्या भावना व्यक्त करतात. माणसं उदासीनता, अस्वस्थता दाखवण्यासाठी मिठी मारून भावना व्यक्त करतात पण कुत्री त्याच्या आवडत्या व्यक्तीला चाटून भावना व्यक्त करतात. त्यामुळे आपल्य सुद्धा मूड बदलण्याची सुरवात होते. आणि.. खरंच आत्ता अवनीला  ते जाणवत होते…..! 

जणू तिला विचारत होती, कुठेय माझा धनी. अवनीने तिच्या मानेवर आकाश जसा मायेनं हात फिरवतो  तसाच तिने हात फिरवला आणि काय आश्चर्य जेनि तिच्या अंगाशी अंग घासून शेपूट हलवून उड्या मारायला लागली. बाजूला ताटलीत खाणे तसेच पडले होते. “ताई बघा ना काल पासून साहेबांच्या वाटे कडे डोळे लावून बसलीये…. अन्नाला तोंड लावलं नाही, परसात सारखी येरझारा घालते, रडत होती सकाळ पासून." ऑर्डरली सखाराम अवनीला सांगत होता.

   पुन्हा नव्याने अवनीचे डोळे भरून आले. जेनि आणि आपली परिस्थिती सारखीच झाली आहे आज. नकळत तिने जेनिला कवटाळून घेतले. आणि चक्क आकाश सारखे तिच्याशी बोलायला लागली. “डार्लिंग, लौकरच तो घरी येणार आहे. बघच तू अस आपण त्याला शांत थोडीच झोपू द्यायचे? चल शहाण्या सारख थोड खाऊन घे बघू. मी मग तूला घेऊन जाईन हॉस्पिटल मध्ये."

त्या मुक्या प्राण्याला जणू तिचं आर्जव समजलं लपलप ताटातलं खाऊ लागली जेनी.

    घरातल्या देवासमोर माई आणि वहिनी देव पाण्यात घालून अखंड देवाचा धावा करत होत्या. तिथेच जाऊन अवनी बसली. तेवढ्यात फोन वाजला. आणि हॉस्पिटलमधूनच होता आकाशला शुद्ध आली. माई ला घट्ट मिठी मारून ती म्हणाली “बघ! तरी बाबांना म्हटल मी तिथेच थांबते. मला आत्ताच्या आत्ता भेटायचे आहे त्याला. “

   सुनंदा वहिनींनी तिला जवळ घेत म्हटले “हो ग! माझी बाय ती. चल पटकन नाश्ता कर तू आंघोळ करून घे मी पण येतेच आपण लगेच निघू." 

  दिवस रात्र आकाशकडे विशेष लक्ष देणार्‍या अवनीबद्दल दोन्ही घरच्या लोकांना आता तिच्या डोळ्यात आकाशबद्दल असलेलं प्रेम दिसत होतं. 

   आकाश आता अवनीच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. अवनी बरोबर आपल्या लाडक्या जेनिला बघून त्याला नवल वाटले. “हे… बेबी…! 

हे.. कस काय? आय मीन दोघींची मैत्री कशी झाली? “ 

  जेनिच्या पाठीवर प्रेमाने थोपटत अवनी हळुवारपणे म्हणाली, “आम्हाला आता प्रेमात पडायला आवडू लागले. हो ना राणी?"

   तिच्या हातून जेनिला घेता घेता अवनी च्या हाताला धरून आपल्या जवळ खेचून तिच्या डोळ्यात थेट पाहत तो म्हणाला… “ह्या डोळ्यांच्या प्रेमात तर आपण पहिल्या दिवसापासून आहोत..हो ना जेनि.. पण एका माणसाच्या नाकावर सतत राग असायचा."

  “आपण पक्षी, प्राणी ह्यातून बाहेर कुठे पाहत होतात आमच्याकडे. सतत आपलं किडा, मुंगी आणि उरलेल्या वेळात ड्युटी."

“आमच्या जेनीला विचारा तिला आम्ही असे हृदयाशी धरून सतत अवनी… अवनी  म्हणायचो की नाही. “ 

शहाणी जेनि हळूच त्याच्या हातातून उडी मारून बाहेर गेली आणि खरच त्याने अवनीला मिठी मध्ये गोळा करून प्रेमाने म्हटलं, “आवडेल का तूला ह्या पक्षी, प्राणी आवडणार्‍या आकाश बरोबर रहायला?"

  तिने त्याला बिलगत होकारार्थी मान हलवली. 

  दाराबाहेर इमानी जेनि राखण करीत आपल्या लाडक्या धान्याला पाहत होती. 

✍️ चित्रा अविनाश नानिवडेकर 

वरील कथा चित्रा नानिवडेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
   

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post