रंग मावळतीचे

 रंग मावळतीचे

✍️ प्रतिभा परांजपे

                    शरयूला जाग आली, क्षणभर तिला कळलेच नाही कि ती कुठे आहे!  काळ्या चिमणीच्या कु-कू s आवाजाने तिच्या लक्षात आले ती आपल्याच घरी आहे . ही चिमणी आजकाल पाच वाजले की जणू अलार्म लावल्यासारखी ओरडायची...

       शरयू कालच रात्री नाशिकहुन भोपाळला परत आली. राजू तिचा धाकटा भाऊ व वहिनीने रहाण्यासाठी खूप आग्रह केला. " सुट्टी आहे ना ताई अजून,  मग रहा ना थोडे दिवस. पण कां कोण जाणे शरयूचे मन  तिथे रमत नव्हते.

          कालपासून मनात एक अनामिक बैचेनी जाणवत होती...

       चहाचा कप घेऊन शरयू बाल्कनीत आली. आजूबाजूच्या घरातून बच्चे कंपनी शाळेत निघालेली दिसत होती, त्यांचे आई-बाबा त्यांना टाटा बाय करत होती...            

      बरेच वेळ मग सर्व गंमत पहात शरयू उभी राहिली.

          देवाची पूजा करून एक फुलांचा हार बाबांच्या फोटोलाही घातला ..

      आज 28 तारीख आजच्याच दिवशी बाबा गेले .बाबा इतक्या अचानक, इतक्या आधी गेले नसते तर......

       शरयू कितीतरी वेळ फोटोतल्या बाबांकडे पाहात बसून राहिली. सर्व आठवणी माळेतल्या  एक एक फुलाप्रमाणे मनात उमलत गेल्या.

        

            शरयू मॅट्रिक परीक्षा पास झाली. अकरावीत तिने गणित व सायन्स विषय  घेतले.         

        दहावीपर्यंत सोपे वाटणारे गणित आता खूपच अवघड वाटू लागले.        

         वर्गातल्या तिच्या मैत्रिणी अलकाने तिला सुचवले, "अगं, तुमच्या कॉलनी दिलीप पटवर्धन राहतात ना , ते खूप छान गणित शिकवतात मी त्यांच्याकडे ट्युशनला जाते तू ही ये ".

       शरयूने बाबांना विचारले , बाबांनी होकार देताच शरयू ही ट्युशनला जाऊ लागली....

       दिलीप स्वतः एम .एस सी करत होते व ट्युशन ही घेत. त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच छान होती. हळूहळू कठीण वाटणारे गणित जमायला लागले तिची व दिलीप सरांची ट्यूनिंग जमू लागली तिला कळलेच नाही की ती दिलीपकडे हळूहळू ओढली जात आहे. तेही तिच्या येण्याची वाट पाहत असत. हळूहळू मनं मोकळी होऊ लागली.

       दोघं एकमेकांच्या मनातले ओळखू लागले.

        बारावीची फायनल परीक्षा सुरू व्हायच्या आधी काही डिफिकल्टी असल्यास यावे असे सरांनी सांगितले आहे असा अलकाने शरयूला निरोप दिला.

 इतर पेपरांच्या तयारीमुळे बरेच दिवस शरयू ट्युशनला गेली नव्हती.

      गणिताच्या प्रॉब्लेम्स सोडवून झाल्यावर वही तपासायला शरयूने दिलीप कडे दिली परत घेऊन पाहताच खाली एक गणित दिसले.

    २+२=४   माझ्या मनात तू आहेस......

            ......तुझा काय आहे विचार ?

         शरयूने उत्तरात लिहिले,

   ३+२=५, भाव मनीचे माझ्या डोळ्यातून वाच.

             दोघांनाही आता एकमेकांशिवाय करमत नसे.

   परीक्षा झाली अभ्यास नसल्याने भेटण्याचे नेमके असे कारण मिळत नसे तरीही पेपर दाखवायला शरयू गेली. दिलीप व ती मग बरेच वेळ सोबत होते.

   बारावीचा निकाल मनाप्रमाणे लागला गणितात शरयूला विशेष योग्यता मिळाली  पेढे घेऊन ती दिलीपकडे गेली.

       दिलीपचे ही कॉलेजमध्ये नोकरीसाठी सिलेक्शन झाले. दोघे नवजीवनाचे स्वप्न रंगवू लागले.

          "पहिल्या पगाराचे पेढे घेऊन मी तुझ्या घरी येऊन तुझ्या बाबांशीआपल्या लग्नाचे बोलेन..." असं दिलीपने शरयूला वचन दिले.....    

           पण नशिबाचे फासे उलटे पडले.

        बाबा ऑफिसमध्ये कामात असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला व ते तिथल्या तिथे गेले.

              सर्वच संपले घराचा आधारस्तंभ कोसळला. सर्व जबाबदारी  शरयूवर आली. भाऊ बहीण लहान , आईही फारसं  शिकलेली नव्हती.

शरयूला अनुकंपा म्हणून बाबांच्या जागी काम मिळाले , घर तर सावरले पण शरयूच्या स्वप्नांचा महाल ,पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.

           भावाचे, लहान बहिणीचे शिक्षण करण्यात स्वतःचा विचार करायला सुचलेच नाही बाबांच्या अशा अचानक जाण्याने आईची तब्येत ही ढासळली. कॉलेजचे शिक्षण एक स्वप्नच ठरले.

दिलीपने तिला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण आता स्वतःच्या जीवनाचा विचार करायला शरयू ला वेळच नव्हता...

       एक दोन वर्षे अशीच गेली. लहान भाऊ कॉलेजला पोहोचला , छोटी बहिण बारावीला आली.

 दिलीपच्या घरच्यांना त्याच्या लग्नाची घाई होती शरयूला लग्न करणे शक्य नव्हते. शेवटी तिनेच त्यांना सुचवले कि  घरच्यांना दुखवू नका.

दिलीपचे लग्न झाले थोड्याच दिवसात त्याने दुसरीकडे घर घेतले.

             कर्तव्यापुढे प्रेमाला तिलांजली देऊन शरयूने भावा बहिणीचे शिक्षण पूर्ण केले.

भावाचे शिक्षण होऊन तो नोकरीला लागला व दुसऱ्या गावी शिफ्ट झाला. त्याने  तू लग्न कर मी आईला सांभाळेन असे आश्वासन दिले, पण दिलीपशिवाय दुसऱ्या कोणाला ही शरयू मनात स्थान देऊ शकली नाही

        छोट्या बहिणीने पण वयात येताच लग्न केले कालांतराने आई देवाघरी गेली .आता मात्र शरयू खरोखरच एकटी झाली....

       फोनच्या ट्रिंग ट्रिंग  आवाजाने  शरयू भानावर आली.

      अलकाचा फोन होता, "कुठे आहेस? परत केव्हा येणार..?"

      "मी कालच आले ग... का कोण जाणे माझे मन कालपासून अशांत आहे."

       "ऑफिसला जातेस का?"

       "हो ---- घरी राहून काय करू?"

        शरयूची अजून दोन-तीन वर्षं नोकरीची उरली होती .

       लंच अवर मध्ये अलका व ती  भेटल्या.

       "बरेच दिवसापासून तुला सांगावेसे वाटत होते पण तुला दुखवायचे नाही असा विचार करून बोलले नाही"... अलका  म्हणाली .

       "काय-- झाले सांग ना?"

        "अगं,काल आम्ही कॉलनीतल्या मंडळाच्या बायका वृद्धाश्रमात गेलो होतो."

         "हो --कां, काही भेटवस्तू द्यायला?"

       "हो पण---तिथे मला दिलीप सर दिसले ग!"

    "काSय--तिथे--- कसं शक्य आहे?"

       "हो ना-- मलाही आश्चर्य वाटले त्यांची तब्येत बरीच खालावली आहे. मुलगा व सून दोघं नोकरी करतात. घरी पाहायला कोणी नाही........."

     "पण---बायको?......."

      "अगं,ती दोन वर्षापूर्वीच गेली.

.....पण मी तुला मुद्दामच नाही सांगितले उगाच जखमेची खपली का काढावी ?"

      ......अलकाला दोघांचे प्रेम ठाऊक होते.

         घरी आल्यापासुन शरयुचे मन कशातच लागत नव्हते . आता तिला लक्षात येऊ लागले....... कालपासून  मन असे कातर कां होते आहे . डोळे पाण्याने भरून आले कितीतरी वेळ नि:शब्द अश्रु गाळत होती. सारी रात्र उशी ओली होत  गेली...

      मनाशी ठरवून दुसऱ्या दिवशी शरयू, अलकाला घेऊन वृद्धाश्रमात गेली. दिलीपला कितीतरी वर्षांनी ती पहात होती अजूनही तिचे हृदय त्याला पाहताच धडधडत होते .

अलका त्या दोघांना एकटे सोडून  बाहेर बागेत गेली.

कितीतरी वेळा शरयू दिलीपचा हात हातात घेऊन निस्तब्ध बसली होती.

               निघताना शरयूने तिथल्या संचालकांची गोष्टी केल्या त्यातून समजले दोन वर्ष झाली दिलीप येथे आहेत. घरचे सुरुवातीला आले, पण नंतर मुलाची बदली दुसऱ्या गावी झाल्याने कधीतरी फोन येत असे. आताशा तोही नाही.

        नंतर बरेचदा शरयू वृद्धाश्रमात गेली तिथल्या डॉक्टरांना भेटून दिलीपच्या तब्येतीविषयी चौकशी केली.

 डॉक्टर म्हणे रोग, आजार असा काही नाही एकटेपणामुळे मन सैरभैर झाले आहे.

      मग मात्र शरयूने मनाशी निर्णय केला वृद्धाश्रमातल्या संचालकांना सत्य परिस्थितीची जाणीव देऊन ती दिलीपला आपल्या सोबत घरी घेऊन आली....

       एकदा दिलीप म्हणाले सुद्धा,   "आता मी तुला काय सुख देणार शरयू ? माझा तुला त्रासच होईल मी आहे तिथेच राहू दे."

      "दिलीपचा हात हातात घेत शरयू म्हणाली, असं नको बोलू, नशिबाने मला एकदा परत तुझी साथ संगत बहाल केली आहे तेव्हा हे दान तरी माझ्या पदरात टाक ना."

     "सप्तपदी नाही चालू शकले तुझ्यासोबत, तुझ्या संगतीत आयुष्याचे उरलेले क्षण तरी घालवू दे ना,‌...."

     "आता आयुष्याच्या संध्याकाळी मी तुला काय देऊ शकेन ?" दिलीप ने विचारले....

     "सकाळच्या उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आपण दोघं एकमेकांचे झालो..... दुपारच्या रखरखत्या उन्हात मी तुला सावलीसम साथ नाही देऊ शकले, पण तरीही या मावळत्या सूर्याच्या साक्षीने, आकाशातील उमटलेले मावळतीचे सुंदर रंग  तुझ्या सोबत मला पाहू दे."

दिलीपच्या खांद्यावर आपले डोके ठेवून शरयू म्हणाली. "बघ अजूनही किती सुंदर रंगाची उधळण पसरली आहे गगनात.

 पक्षीसुद्धा  दिवस भर फिरून विसाव्याला आपल्या घरट्यात परतत आहेत. सर्व सृष्टी आपल्या या मिलनाला साक्ष देत आहे, तुझ्या संगतीत हे मावळतीचे दृश्य मला डोळे भरून पाहू दे,

 या रंगांनी आपली ही जीवन संध्या रंगून जाऊ दे...."

    ___________________

लेखिका...सौ.प्रतिभा परांजपे

 वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post