साकव

                साकव

✍️ स्मिता मुंगळे

         अनुजा ऑफिसला जाताना वत्सलाकाकू तिला रोज दारात बसलेल्या दिसायच्या.कधी भाजी निवडत असायच्या तर कधी वाती करत बसायच्या.तिने काकूंना रिकामे बसलेले मात्र कधीच पाहिले नव्हते.बऱ्याच वेळा त्यांच्या आजूबाजूला त्यांचा अडीच वर्षांचा नातू खेळत असे.काम करता करता त्या नातवाला गोष्टी सांगायच्या.नातूदेखील असंख्य प्रश्न विचारारून आजीला भंडावून सोडत असे.पण काकू मात्र न कंटाळता नातवाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी आनंदाने देत असत.त्या आजी नातवामधला तो प्रेमळ बंध बघून अनुजाला खूप छान वाटे.अनुजाला बघून काकू प्रसन्न हसायच्या,कधी तिला वेळ असेल तर ती दोन मिनिटं थांबून काकूंची चौकशी करे तर कधी गडबडीत असल्यास फक्त हात करून पुढे जाई.वर्षानुवर्षे ती काकूंना बघत होती पण कधी त्या थकलेल्या जाणवलं नाही की कधी तोंड पाडून बसलेल्या. सगळ्यांशी प्रेमाने बोलणं,प्रत्येकाला वेळप्रसंगी मदत करणं आणि  प्रसन्न हसणं हे काकूंचे वैशिष्ट्यच होतं.

      मात्र गेले दोन चार दिवस अनुजाला काकू गप्प गप्प वाटत होत्या.फारसे बोलत नव्हत्या ना त्यांचे ते नेहमीचे प्रसन्न हसणे. सुरुवातीला तिच्या हे लक्षात आले नाही पण नंतर मात्र ती मुद्दाम थांबून काकूंना बोलतं करण्याचा प्रयत्न करु लागली. पण त्यांचे काहीतरी बिनसले होते हे मात्र नक्की.अनुजाला तर उत्साही काकू बघूनच पुढे ऑफिसला जाण्याची जणू सवय झाली होती.सकाळी काकूंना भेटल्यावर तिचा पुढचा सगळा दिवस छान जात असे.काकूंमधला बदल जाणवत होता पण विचारायचे कसे,हा मोठा प्रश्न अनुजाला हल्ली भेडसावत होता. तरी तिने बोलताना थोडा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण काकूंच्या बोलण्यातून काही वेगळं जाणवलं नाही.उलट त्यामुळे अनुजा जास्तच अस्वस्थ झाली.दोन चार दिवस बघूया काकू पूर्वीसारख्या हसतात,बोलतात का ते नाहीतर स्पष्टच विचारुया असा विचार करून ती शांत बसली.

        आठ पंधरा दिवस असेच गेले. आता मात्र काकूंना बोलतं केलं पाहिजे असे तिने मनाशी पक्के केले."आपल्या लक्षातच आले नाही,आताशा काकू एकट्याच अंगणात बसलेल्या दिसतात. त्यांचा नातू अवतीभवती खेळताना वा काकूंना प्रश्न विचारताना दिसत नाही."...रात्री झोपताना ती स्वतःशीच म्हणाली.नक्कीच काहीतरी गडबड दिसते.कधी एकदा सकाळी आवरून बाहेर पडते अन काकूंशी बोलते असे तिला झाले होते.

        रविवारची सुट्टी असूनही ती नेहमीप्रमाणे उठली.एकीकडे हाताने काम चालू होते पण मन मात्र सारखा काकूंचा विचार करत होते.स्वयंपाक पटापट आवरून ती काकूंच्या घरी गेली.जाताना रविवार म्हणून खास बनवलेले छोले ती काकूंसाठी घेऊन गेली होती. काकू घरी एकट्याच होत्या त्यामुळे अनुजाला हायसे वाटले.

      "काकू,काय करताय?घरी एकट्याच आहात का?",असे अनुजाने विचारताच ..."हो ग,एकटीच आहे.माझा मुलगा आणि सून नातवाला घेऊन सिनेमाला गेलेत.येताना बाहेरच जेवून येणार असं सांगून गेले आहेत जाताना",काकू म्हणाल्या.पण हे बोलताना त्या अनुजाची नजर चुकवत आहेत असे तिला जाणवले.या अशा सांगणार नाहीत,डायरेक्ट विचारावं लागेल असा विचार करून अनुजा म्हणाली,"काकू,काय झालंय?हल्ली तुम्ही गप्प गप्प असता.काही प्रॉब्लेम आहे का?असेल तर सांगा ना मला.तुम्हाला असे हिरमुसलेले बघायची सवय नाहीये हो.""अग, वेडी आहेस का?काही नाही ग...मस्त मजेत आहे मी",खाली मान घालून काकू म्हणाल्या तशी अनुजा म्हणाली "काकू,मग हे माझ्याकडे बघून सांगा बरं.मुलगी मानता ना मला.मग आपल्या लेकीला पण नाही सांगणार का?"

      आता मात्र काकूंचा बांध फुटला. अनुजाने त्यांना जवळ घेतले तसे त्या तिच्या मिठीत शिरून लहान मुलाप्रमाणे हुंदके देऊन रडू लागल्या. अनुजाने त्यांना शांत केले,प्यायला पाणी दिले आणि म्हणाली,"काकू,आता शांतपणे सांगा बरं काय झालंय."

     काकू म्हणाल्या,"तू तर बघतेसच, माझी सून नोकरी करते.भरपूर शिकलेली आहे,हुशार आहे....मला अभिमानच आहे ग त्याचा.तिच्या करिअर करण्याला मी कायमच पाठिंबा देत आले.मी त्याकाळची पदवीधर, पण घरात आवडत नाही या कारणास्तव मला क्षमता असूनही घरात बसावं लागलं.कायम सासूबाईंच्या धाकात वावरत असे मी.घरात केवळ त्यांचाच वरचष्मा. सणवार,व्रतवैकल्ये, आला गेला यांत अर्ध्याच्या वर आयुष्य निसटून गेलं बघ.आपण काहीच केलं नाही याची बोच मनात रहाते ते वेगळंच.म्हणून कायम सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. तिला घरकामात फारसे अडकू दिले नाही.कष्टाने काही आपण झिजत नाही ग.म्हणून घरची जबाबदारी स्वतःवर घेत काम करत राहिले.एवढा गोड, गुणी नातू माझा...तो वर्षाचा असल्यापासून दिवसभर मी एकटी त्याला सांभाळते.पण आता सुनेने नवीनच सुरू केलंय, म्हणे माझ्या लाडाने तो बिघडतो.त्याला तुमचं 'डे केअर' का काय त्यात मागच्या आठवड्यापासून ठेवायला सुरुवात केलीये......." बोलताना काकूंना दम लागत होता.

      अनुजाने त्यांना शांत केले पण आज त्यांना गप्प राहायचे नव्हते.बरेच दिवस मनात साठलेले आज अनुजासमोर बाहेर येत होते.काकू पुढे बोलू लागल्या....."अग, लहान लेकरू ते,गोड खायला मागणारच, त्याला काय कळतंय?तर म्हणे आजीच्या लाडामुळे खाण्याच्या चांगल्या सवयी लागत नाहीत.हट्टीपणा करतो,ऐकत नाही... एक का दोन.लेकराच्या वागण्याचं सगळं खापर माझ्यावरच फोडायचं.तिला आता माझ्या वागण्यात सारख्याच चुका दिसायला लागल्यात."

      "अनुजा तुला सांगू का.....माणूस ज्या रंगाचा चष्मा घालतो ना तशीच त्याला दुनिया दिसते",काकू पोटतिडकीने बोलत होत्या.अनुजाला नक्की काय बोलावे अन काकूंची समजूत कशी घालावी हेच कळेना.खरे तर काकूंचा समजूतदार स्वभाव तिला चांगलाच माहिती होता.पण म्हणतात ना नातं बदलले की समोरच्या माणसाचे वागणे बदलते.पण इतकी वर्ष ती दोघी सासू सुनांना बघत आलीये,कधी फारसं भांड्याला भांड लागलेलं पाहिलं नव्हतं.

      "अनुजा,माझ्या सासूबाई खूप कडक स्वभावाच्या आणि शिस्तीच्या होत्या ग.त्यांच्यापुढे ह्यांचेदेखील कधी काही चालले नाही.सगळं घर जणू सासूबाईंच्या दहशतीखाली असायचं आणि त्यांच्याच तालावर नाचायचं.तेव्हाच कुठेतरी मनात पक्क केलं होतं,जेव्हा कधी आपल्याला सून येईल तेव्हा तिच्या आणि माझ्यात तणावाचे नाही तर मैत्रीचे नाते असेल.सुरुवातीपासून मी तशीच वागत आले ग तिच्याशी पण मी तिची आई किंवा मैत्रीण नाही होऊ शकत हे आता कळले आहे मला.माझ्या मुलाकडे आणि नातवाकडे बघून मी गप्प बसत आले पण आता माझ्या नातवालाही ती माझ्यापासून दूर करतीये याचं जास्त वाईट वाटतंय.काय चुकले ग माझे? मी आधीची पिढी आणि पुढची पिढी यातील पूल बनू पहात होते, नव्हे तो पूल मी बनलीये या गोड गैरसमजूतीत वावरत होते पण आत्ता लक्षात येतंय की तो पूल नाही तर 'साकव' होता."    

      असं किती नी काय काय काकू सांगत राहिल्या.अनेक दिवसांपासून मनात साठून राहिलेले आज बाहेर आले होते. 'साकव'......म्हणजे 'तात्पुरता पूल' हे कधीकाळी शाळेत असताना मराठीच्या बाईंनी उदाहरणासहीत शिकवलेले अनुजाला क्षणभर लख्ख आठवून गेले. तिच्या मनात आले,ही आजची तरुण मंडळी मोठ्यांचा असा तात्पुरता, कामासाठी वापर करुन घेतात की काय?  शेवटी अनुजा म्हणाली,"काकू,कळतंय मला तुमचं म्हणणं आणि मला ते मान्य देखील आहे.पण आपण कसं वागावं हे जसे आपल्या हातात आहे तसे सुनेने तुमच्याशी कसे वागायचे ते ती ठरवणार,आपण नाही तिला बदलवू शकत. तेव्हा आता या गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा मिळालेला रिकामा वेळ ही नवीन काहीतरी करण्याची संधी समजा आणि आत्तापर्यंत करायच्या राहून गेलेल्या, तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करण्यासाठी तो वेळ वापरा."

      अनुजाच्या अशा बोलण्याने काकूंच्या मनात आणि डोळ्यात आनंदाच्या चांदण्या लुकलुकल्या.निराशा झटकत त्या म्हणाल्या,"अग, हे माझ्या लक्षातच आले नव्हते.इतक्या वर्षांच्या सवयीने मी आपली घर,संसार आणि मुलं, नातवंड हेच जग समजून चालले होते. कितीतरी छंद होते ग मला लग्नापूर्वी पण पुढे नाही जोपासले गेले ते छंद.आता आहेच वेळ तर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करेन.तसेही कोणतीही चांगली,आवडती गोष्ट करायला वयाचं बंधन कुठे असतं?"

      काकूंचे स्वप्नाळू डोळे लकाकले.आता त्यांना मागे वळून बघायचेच नव्हते.उगाच आपण इतकी वर्ष घर संसार आणि माझी माणसं असं म्हणत घालवली असे त्यांना वाटून गेले. अनुजाने आज काकूंना एक नवी दृष्टी दिली होती आणि जगण्याचे भान ज्यात नवीन काहीतरी करण्याचे ध्येय होते.

        हसता हसता डोळे पुसत काकू म्हणाल्या,"अनुजा,थांब मस्त आवळ्याचे सरबत करते.मी पण घेईन तुझ्यासोबत. आणि हो संध्याकाळी येशील का माझ्याबरोबर? लायब्ररीत जाऊन तिथे पैसे भरून सभासद होईन म्हणते.कितीतरी पुस्तकं वाचायची राहिली आहेत."

      अनुजाने छानसं हसत मानेनेच होकार दिला.तिला कल्पनेत डोळ्यासमोर स्वतःसाठी जगणाऱ्या, आनंदी आणि समाधानी काकू दिसत होत्या.

     दोन पिढ्यांमधला पूल बनू पाहणाऱ्या काकू आता स्वतःसाठीच नवी वाट निर्माण करणार होत्या.

    ✍️ सौ.स्मिता मुंगळे.

वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

       

4 Comments

 1. छान एक नवीन दृष्टी दिली काकूंना

  ReplyDelete
 2. Khup chhan katha aahe, kahi goshti mala majhya ayushyashi nigdit vaatlya

  ReplyDelete
 3. खूप सुंदर विचार.

  ReplyDelete
 4. खूप छान निराशेत न जगता जिवनातला खरा आनंद शोधला

  ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post