एका ‘पा’ वर दोन ‘पा’
✍️ वंदना धर्माधिकारी
फाटकाची कडी वाजवायचा आवाज हळूहळू होता होता चांगलाच मोठा झाला. बिल्डींग मधल्या बारा घरांपैकी सहा सात जणांची झोप मोडलीच. स्वतंत्र वॉचमन काही नसायचा. सगळ्या कॉलनी साठीचा गुरखा कधी तरी काठी आपटतं जायचा. इतक्या वर्षात कधीच इतक्या सकाळी सकाळी फाटक वाजलं नसेल. तशी काल रात्री उशीराच झोप लागली होती सगळ्यांना. गप्पांना अगदी ऊत आला होता. विषय एकच होता पाटीलकाका आणि सुमाकाकू.
“कोण असेल आत्ता भलत्या वेळेला?” जरा नाराजीनेच मंदाताई बाल्कनीत आल्या. खाली वाकून बघितलं तर कोणी अनोळखी माणूस कडी वाजवीत होता. दारात टॅक्सी उभी दिसली. इतक्या पहाटे, म्हणजे किती वाजले असतील, मंदाताईंनी हॉल मध्ये डोकावून बघितलं तर पाच वाजून गेलेले. म्हणजे उजाडेल आता. तशा त्या लवकरच उठायच्या. आज मात्र या कोणीतरी परक्याच इसमाने उठवलं?
क्षणभर विचार करून त्यांनी आवाज दिला, “कोण आहे? कोणाकडे आलात? कोण पाहिजे? कोण आलं आहे?” एका दमात प्रश्न विचारले सगळे. अंधार असला तरी आवाजाच्या दिशेने त्या व्यक्तीने मान वळवली.
मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. प्रसाद अंधारे नाव माझं. दार उघडता का? तुमच्या इथे राहणारे पाटील काका काकू ...
“हो, ते कालच अमेरिकेला गेले. त्यांचा मुलगा आला होता त्यांना घ्यायला. तुम्ही आज कसे काय आलात त्यांनी न्यायला...” त्या टॅक्सी ड्रायव्हरला बोलू न देता मंदाताई बोलतच सुटल्या.
“आहो, काकू, तेच दोघे परत आलेले आहेत. त्यांनीच पत्ता दिला आणि, सलोखे कोण त्यांच्या कडे जायचं म्हणाले.”
“ काय म्हणता. ते परत आलेत. आहो कसं काय? मीच सलोखे. थांबा. दाखवा बरं कुठे आहेत ते. बोलवा
त्यांना बाहेर गाडीच्या.” असं जरा ठसक्यात म्हणाल्या मंदाताई. उगीच कोणीतरी काहीतरी करायचं. फसवणूक कधीही होते. अशी शंका अर्धवट झोपेत देखील मंदाताईंच्या डोक्यात आली.
क्षणार्धात पाटीलकाका उतरले, मागून हळूच सुमांकाकुंची साडी गाडीबाहेर दिसू लागली. तेच होते, तीच साडी नेसून गेल्या होत्या. काका असे खाली काय बघतात? काय झालं?
काही क्षणाची शांतता भयानक काहीतरी झाल्याची नोंद करीत होती. काकांनी नजर वर केली. तेच आहेत याची खात्री झाली. तरीपण मंदाताईंनी डोळे चोळले. प्रत्यक्ष चिमटा नाही घेतला, पण मनातल्या मनात नक्कीच चाचपणी केली.
“होय, तेच आहेत. कालच मुलाबरोबर कायमचे अमेरिकेला जाण्यासाठी आपले घर, आपला देश सोडून मुंबईला विमानतळावर दुपारी गेलेले पाटीलकाका व सुमाकाकू.”
“आलेच..... “ म्हणत मंदाताई घरात आल्या. दिवा लावला. तसे त्यांचे यजमान… त्यांना सगळेच अप्पा म्हणायचे… तेही उठले होते.
“आहो, पाटीलकाकाकाकू आलेत बघा. दार उघडा खालचं.”
“ झोपेत आहेस का? जागी हो. ते अजून पोचले नसतील अमेरिकेला. भास होतोय तुला. झोप आणि मलाही झोपू देत.”
“नाही. आहो, खरंच सांगते मी. टॅक्सीतून आत्ताच उतरलेत. वाट बघतात खाली. मी म्हंटल उघडते दार. चला तुम्ही बरोबर... काय झालं असेल कोण जाणे?” काळजीचा सूर अप्पांनी हेरला आणि ताडकन उठून बाल्कनीत आले. समोर काका काकू पाहताच, “आलोच...” आणि धावत सुटले किल्ली घेऊन.
दोघेही खाली आले, बोलले कोणीच नाही. न बोलता काकांनी कितीतरी मणाचं पाऊल फाटकातून आत टाकलं. ना त्यांनी मागे बघितलं....ती येते कशी ते. सुमाकाकू गाडीतून उतरलेल्या त्यांना समजलं होतं. तिच्याकडे न बघता, अप्पांच्या मागे मागे उचलत राहिले काका मणामणाचे दगड. मंदाताईंनी सुमनकाकूंचा हात धरला क्षणभर. जरा गरम लागला खरा. रात्रीचा प्रवास, शिवाय आधीची केव्हढी ती धावपळ आणि दगदग. थकल्या होत्या. मुक्यानेच कधी जीना चढला, आणि सोफ्यावर कोसळले दोघे. हे त्यांनाही नाही समजलं. कोसळले हेच खरं.
टॅक्सी ड्रायव्हर सगळं समान घेऊन वर आला. सालोख्यांचा घरातच सामान ठेवलं. पाटीलकाका पैसे देऊ लागले, तर त्याने घेतले नाहीत. कितीही विचित्र बिकट प्रसंग असला तरी पैशाचा व्यवहार करावाच लागतो. त्याचे भान काकांना होतेच. कधीच ते व्यवहार सोडून वागले नाहीत. तर आत्ता तरी कसे वागणार? इथेही काका काही म्हणाले नाहीत, त्याला. कोणी काहीच बोलत नव्हतं. अप्पांनी ड्रायव्हरला पैसे देऊ केले, तेही त्याने घेतले नाहीत. मग, अप्पांनी त्याला बसायला सांगितलं. मंदाताई स्वयंपाकघरात गेल्या, चहा ठेवायला.
पुर्णत: मनाने खचलेल्या सुमाकाकू उठल्या. प्रवासात एकदाच बाथरुमला गेल्या होत्या. वय वाढलं की सारखं जावं लागतं. हॉलमध्ये तीन पुरुष उरले फक्त. काहीतरी कोणीतरी बोलावं..... पण नाहीच. तिघेही गप्प गप्प...... सुन्न दिसतं होते पाटीलकाका. त्यांची नजर खाली गेलेली. काय लपलं असेल त्या नजरेत. अश्रू, अपमान, फसवणूक, बेघर झाल्याची खंत, तिरस्कार, संताप, घृणा, एकाकी पडल्याची भावना.... की आणखीन काही. काहीच अंदाज अप्पांना लागत नव्हता. त्यांनी ड्रायव्हरला पाणी देत विचारलं, “ काय झालं?”
“ काय ते मला माहित नाही. पण विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मला सांगितलं यांना घरी पोचवायला. नीट ने, थकलेत खूप. इतकंच बोलले. जास्तीचं मी काय सांगू.....” असं म्हणून त्यानं आपलं कार्ड दिलं.
“केंव्हाही फोन करा. मी येत जाईन.” अप्पा... म्हणजे नंबर कोणालाही न देणार्यातले, तरीही तिथेच पडलेले स्वत:चे कार्ड दिलं पटकन. बसा... “ चहा घेऊनच जा.”
चहा आला, सुमाकाकू पण आल्या, मंदाताई - अप्पा सगळ्यांनी चहा घेतला. अगदी गरज होती काकांना चहाची. चहा पोटात जाताच काका उठले बाथरूमला जाण्यासाठी. प्रसाद कडे नजर टाकली, आणि गेले आत.
“ येतो मी. माझा नंबर आहे तुम्हाकडे.” प्रसाद .... तो टॅक्सी ड्रायव्हर निघून गेला.
विषयाला तोंड कसं काढायचं? काय झालं असेल. चहा संपताच मंदाताई सुमाकाकुंच्या जवळ आल्या.
काही बोलल्या नाहीत. नुसत्या बसल्या. तसा एक हुंदका बाहेर पडला. काकू कोसळल्या क्षणार्धात. कितीतरी वेळ रडत होत्या. काका अगदी शांत, निश्चल बसलेले. बायकोला शांत केले नाही, की का रडतेस विचारले पण नाही. रागावले नाहीत, कावले नाहीत, मस्करी नाही, काही काही नाही. रडून मोकळं होवू देतं तिला...असच वाटलं असेल कदाचित त्यांना. पदराला नाक पुसाल्याचा फुसफुस आवाज, मोठ्यांदा रडणं आणि हुंदके. भल्या पहाटे घर त्यांने भरून गेले. भरून आलेलं रीत झालं आणि सुमाकाकू शांत झाल्या. कारण माहित नसताना सुद्धा दुसऱ्याला रडताना पाहून रडायला येतेच. तसेच काहीसे अप्पा आणि मंदाताईंचे झाले. कोरडे ठाण डोळे होते पाटीलकाकांचे. असं कसं. सुमाकाकू रडतात, काका शांत. काहीतरी भयंकर, कल्पनाशक्तीच्या पलीकडले असणार.
आणि...अप्पा पाटीलकाकांचे जवळ आले. दोघेही एकाच सोफ्यावर बसलेले. मधली जागा मोकळी होती. अप्पा सरकले, त्यांनी काकांचा हात हातात घेतला. तसे पाटीलकाका अप्पांच्या खांद्यावर डोकं ठेऊन आक्रोश करू लागले. उभ्या आयुष्यात आलेल्या भल्या मोठ्या संकटांपुढे न थकलेले पाटीलकाका एखाद्या लहान मुलासारखे अप्पांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागले. काय काय भरलं होतं काकांच्या आवाजात, रडण्यात? इतका खंबीर माणूस असा रडू शकतो? बापरे... हे काय असेल?
खूप थकले होते ते दोघे. विमान रात्री दोन वाजता सुटणार होतं. हे दोघं आणि त्यांचा मुलगा अक्षय काल
दुपारीच मुंबईला निघाले होते. जायची किती किती तयारी केली होती या दोघांनी. आता कायमचंच मुलाकडे जायचं होतं. तेंव्हा सर्वच गोष्टींची निरवानिरव करून जायला हवं होतं. मागील दोन महिने नुसती गडबड होती दोघांची. सगळीच आवराआवर. मिसळणाच्या डब्यापासून बँकेचा लॉकर. घरही विकून झालं. वरच्या मजल्यावर भाड्याने मागील तीन वर्षे राहत असलेल्या रवी आणि सुगंधा पानसे यांनी घर घेतलं. दोन बेड रूमचा नेहमी असतो तसाच, ना फार मोठा, ना लहान असा एक व्यवस्थित फ्ल्याट. त्यांना पण धावपळ करावी लागली होती. सोसायटी त्यांना आवडलेली, माणसे कशी एकमेकांना धरून राहणारी म्हणून तर घेतला फ्ल्याट लगेचच. बँक कर्जासह जुळवाजुळव केली दोघांनी. पाटीलांनी जसं मांडलं होतं तसं घर दिलं. अगदी लोणच्या मुराम्ब्यांच्या बरण्यांसह. वर्षभराच्या भरलेल्या तांदळापासून ते मेतकूटा पर्यंत परिपूर्ण असलेलं अन्नपूर्णेचे घर जसेच्या तसे दोघांच्या स्वाधीन केलं होतं. कशात काय आहे हे नीट समजावून दिलं... पण त्याचा हिशोब नव्हता केला दोघांनी. आणि.....आज अचानक पहाटे पहाटे सलोख्याच्या घरात.
सगळ्या गावाला सांगून झालं होतं, “ आम्ही दोघं अमेरिकेला अक्षय कडे कायमचे राहायला जाणार आहोत. नातवंडांच्या बरोबर आता आम्हाला पण राहायला मिळेल. असे किती राहिलेत आमचे. सत्तरी तर ओलांडली आम्ही दोघांनी. उरलीसुरली काही वर्षे घालवू मुलांच्या बरोबर, दोन्ही नातवंडामध्ये जीव अडकतोच आजीआजोबांचा. कधी कोणी तिकडे आलात, तर राहायला यायचं आमच्याच घरी.”
किती सहजपणे ते अमेरिकेतील न पाहिलेलं घर आमचं म्हणायचे दोघेही. अक्षयने नुकतेच मोठ्ठे घर घेतले होते. वॉशिंग्टन डी सी जवळ मेरी लँड मध्ये. एका सॉफ्टवेअर कंपनीतर्फे एका प्रोजेक्टच्या कामासाठी वर्षाच्या मुदतीत तो अमेरिकेत गेला. गेला आणि तिकडचाच झाला. ती नोकरी सोडली, दुसरी घेतली. तिथे त्याला प्रिया भेटली. चेन्नईची राहणारी. दोघांनी अमेरिकेतच रजिस्टर लग्न केलं. तसे लग्नानंतर दोघेही आले होते पुण्याला. दोन्ही कुटुंबांनी आपापल्या लोकांना बोलवून मोठ्ठी पार्टी दिली होती. सगळे सोपस्कार लग्नाचे केले होते. सुनेला जे द्यायचं ठरवलं होतं त्यापेक्षा जास्तच देऊ केलं होतं सुमाकाकूंनी. लग्नाला दहा वर्षे झाली, दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी विआन आणि नेहा. सुंदर गोड मुलांना आता मांडीवर घेता येणार या आनंदात होते आजी आजोबा. आणि त्याचं विमान चुकलं. चुकलं कसलं मुद्दाम चुकवलं हेच योग्य होईल. विमान वेळेवर गेलं. फक्त दोघे मागेच राहिले. कसं जाणार ते तरी. तिकीट काढलच नव्हतं दोघांचं.
त्यांना घेऊन जाण्यासाठी तर आला होता अक्षय. मुद्दाम एक महिना सुट्टी काढून. सगळी निरवा निरव करून जाताना आधीच खूप जड गेलं होतं दोघांना. ५४ वर्षांना संसार. एकुलता एक मुलगा. तोही शिकायला तिकडे गेला, तो तिकडचाच झाला. हे दोघं एकदा गेले होते अमेरिकेला. राहिले होते चार महिने. त्यांना ठीक वाटलं होतं. त्यालाही झाली असतील साधारण सात एक वर्षे. नंतर काही जाणं झालं नाही, आणि अक्षय प्रिया दोघांनी खूप आग्रहाने कोठं बोलावलं होतं म्हणा. तशी काकूंची तब्येत पण बरी नसायची. म्हणूनही असेल, गेले नाहीत परत कधी तिकडे हे मात्र खरं. प्रियाच्या भावाच्या लग्नाच्या वेळी दोन वर्षापूर्वी सगळे आले होते भारतात. रजा नव्हती फार म्हणून फक्त तीन दिवस राहिले पुण्यात. लग्नघरीच जास्त मुक्काम करावा लागला. तसं पाटील कुटुंबियांना निमंत्रण होतंच. दोघेही गेले होते चेन्नईला चार दिवस. तरी तिथल्या तुटक तुटक सहवासा समाधान देण्यास कमी पडला हे कितीदा बोलून दाखवलं होतं
पुण्यातलं सगळंच आवरून कायमचे मुलाकडे राहायला जायचं हे नक्की झालं, आणि धावपळ सुरु झाली. किती गोतावळा इतक्या वर्षांचा. स्वभाव तर असा मधाळ, मधमाशा मोजता येतील एखाद्याला पण पाटलांची माणसं मोजली, तरी कोणीतरी राहणारच. बातमी झोतासारखी सगळ्यांच्यात पसरली. आनंद वाटला, अक्षयचे कौतुक अनेकांनी केले. तो जरा अबोल झाला असे वाटत होतं सगळ्यांनाच. तेव्हढ्यास तेव्हढे बोलायचं. मनमुराद गप्पा झाल्या नाहीत, पण वेळ तरी कोणाला होता चकाट्या पिटायला. त्यामुळे अक्षयच्या मनातलं कोणाला काही उमजलंच नाही. कामं किती होती खंडीभर, कोण करणार. आणि सगळे पैशाचे व्यवहार, नीट व्हायला पाहिजेत ना. म्हणून जातीने लक्ष घालीत होता अक्षय. घरात निवांत थांबायला देखील मिळाले नाही त्याला. खूपच धावपळ झाली सगळ्यांची महिनाभर. आणि आत्ता एकदम शांत शांत. फक्त नाकाची फुसफुस, बसल्या बसल्या इकडचा पाय सरळ करून दुसरा वाकडा करणं.
सुमाकाकुनी एकदिवस कपाटातल्या सगळ्या साड्या काढल्या. अक्षयच्या लग्नातली पैठणी काढली, नेसली आणि सगळे दागिने चढले त्या लक्ष्मीच्या देहावर.. पाटील काकांनी सुद्धा त्यांचा ठेवणीतला कोट काढला. धोतर, शर्ट आणि त्यावर कोट घातला. काकांनी लगेच रिक्षा बोलावली, दोघे गेले जवळच्याच स्टुडीओमध्ये आणि खूप फोटो काढले दोघांचे त्याच्या खूप प्रती काढल्या, भेटायला येणाऱ्या सगळ्यांना एकेक देत होते. देताना खुशीत सांगायचे, “ हा फोटो मुद्दाम देतो तुम्हाला. काय सांगा, तिकडे जाऊन आम्ही गोरे झालोत तर, आपलं आधीचं रुपडं कसं होतं त्यासाठी मुद्दाम काढला. आपली गाठभेट पुढे कधी होईल सांगता नाही येतं. पण काही बोलावंस वाटलं, सांगावंस वाटलं तर या फोटोतल्या आमच्याशी बोला. आम्हाला समजेल, मग, आम्ही तुम्हाला तिकडून फोन करू. तुम्ही कोणी फोन करायच्या भानगडीत पडू नका. खुप महाग जातं ते. महाग गेलं तर एकदाच फोन कराल. तुम्ही फोटोशी बोललात की मी फोन करीन. आम्हाला तिकडून भारतात फोन करण स्वस्त असतं. घ्या. आम्हाला खूप आठवण येईल तुम्हा सर्वांची.” भेटणारा प्रत्येकजण नमस्कार केल्यावर तोंड भरून आशीर्वाद घेत होता, पुन्हा येउच तुम्ही जायच्या आधी असे म्हणून जात होता. घरात ही गर्दी होतं होती. क्षणाची उसंत नव्हती मिळाली दोघांना, आता मोठ्ठी पोकळी भेटली उरल्या सुरल्या क्षणांसाठी छळायला. काहीच गरज नव्हती ह्या असल्या खटाटोपाची. काय करणार?
घरात ही गर्दी होतं होती. गर्दीत मिसळत नव्हता तो फक्त अक्षय. अलिप्तपणे सर्व बघत होता. का बरं असं वागत होता तो, पूर्वी असा नव्हता, म्हणजे फार अघळपघळ कधीच बोलला नाही. तसाच या वेळेइतका गप्प सुद्धा कधी राहिला नव्हता. माणसं बदलतात, असं सोसायटीतील एकाने स्पष्ट बोलूनही दाखवलं होतं. पण हे असं इतकं बदलणं. जन्मदात्या आईवडिलांना फसवून त्यांना अमेरिकेला नेणार असं खोटं सांगून विमानतळावर नेलं. त्यांच्या बॅगा भरतानाच वेगळ्या भरलेल्या. ‘दागिने माझ्याकडे असू देतं, कस्टम वाले काहीतरी विचारतील’, असं म्हणून तेव्हढे मात्र त्याने स्वत:जवळ ठेवले. ‘बरं’ म्हणून दिलं सगळं ताब्यात लेकाच्या. बँक खाती, थोड्याफार असलेल्यां फिक्स्डच्या पावत्या. बहुतेक सगळ्या मोडल्याच. अगदी एखादी दुसरी राहिली तशीच. बँकेत जायला जमलंच नाही या दोघांना आणि बँकेत अक्षयचं काही चाललं नाही. तशा सह्या करून दिल्या होत्या पावत्या. पण, तिथल्या बाईंनी आग्रह धरला आजी आजोबांनी स्वत: यायला पाहिजे म्हणून. तेव्हढीच पंधरा हजाराची पावती बँकेत जीवंत राहिली. पेन्शनच्या खत्यात असेच चारपाच हजार. बँकेत जाऊन काय कसं करायला पाहिजे, तिकडून कसे पैसे काढणार, त्यासाठी कार्ड घेतले. एका खात्यात अक्षयचे नाव जास्तीचे घातले. एकुणात काय, जिथे जिथे माल होता, त्याची नीट काळजीपूर्वक तजवीज अक्षयने केली. कदाचित त्या कामात असल्याने गप्पागोष्टीत वेळ वाया घालवणे ठीक नसेल वाटले त्याला. निघायच्या अगदी आधी फक्त अर्धा तास तो घरात आला, ही घाई केली सगळ्यांना. विचारू नका. जे कोण काय म्हणेल, त्याला तोंड देखल्यासारखं काहीतरी सांगायचा. बाय केलं आणि भरल्या डोळ्यांनी काकाकाकू आणि चिरंजीव गाडीत बसले. ते पहाटे पहाटे त्यातले दोघे पुन्हा परत यावेत, जड मनाने सालोख्यांकडे बसावेत. टाचणी टोचता फुग्यातली हवा भस्स बाहेर येते....तसं, मंदाताईंचा हात लागताच सुमाकाकुनी हे असं इतक रडावं. सगळंच समजण्याच्या पलीकडले झालेले.....
पाटील काका काकू आले आहेत, हे सगळ्या बिल्डींगला समजलं होतं. थोड्याच वेळात एकेक करीत दारात थबकत होते. रडण्याचा आवाज ऐकून आत न येत बाहेरचं थांबली मंडळी. प्रसाद, त्या ड्रायव्हरने दार नुसतं ढकललं होतं. तरीही कोणी आत आलं नाही, जरा अंदाज घेतं होते. कालचा गडबडीचा दिवस अजून मावळला नव्हता कोणाच्याही मनात. तर असा उजाडला दुसरा दिवस. कुठला दिवस कसा उजाडेल हे सांगता का येतं कोणाला? जसा येईल तसा आपला म्हणायचा इतकंच असतं आपल्या हातात. होय, तसंच असलं पाहिजे, म्हणून तर या वृद्ध पुण्यवान जोडीला असा दिवस बघावा लागावा.
सालोख्यांचा दारासमोरची मोकळी जागा पूर्ण भरली. साधारण अर्धा पाउण तास झाला असेल त्यांना येऊन. आतली फुसफुस पण कमी होत होती. बाहेर अंदाज आलाच, मुलाने फसवले असणार. सगळी घरं एकमेकांना सांभाळून अगदी प्रेमाने आपुलकीने रहात होती तिथे. आजच्या कोरड्या जमान्यातही भरुपूर ओलावा प्रत्येक घरात होता आणि तोच शेजारच्या उंबऱ्यात ओतणारी ही सगळी मंडळी होती. जणू त्या एकोप्यालाच, त्या प्रेमालाच कोणा मेल्याची नजर लागली आणि आजचा दिवस उजाडला. तरीही नक्की काय कसं झालं असेल ते विचारता येत नव्हतं, कळेल, थोड्या वेळाने, दोघांना होऊ देत मोकळं... हळूहळू बाहेरचे आत येत होते. बसतं होते. आधीच्या शांततेत भरच घातली सगळ्यांनी. आणि दार ढकलून सगळे आत आले, जागा मिळेल तसे बसले.
शेजारची रेखा सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आली. सकाळचे आठ वाजले, फारसे कोणी बोलतं नव्हते. वार होता बुधवार. काहींना ऑफिसला जायचे होते, तरीही तेथून ते हालले नाहीत. कशाने बांधून ठेवले होते सगळ्यांना? मानसीने मस्तपैकी गरमागरम पोहे आणले. मंदाताईंच्या स्वयंपाकघराचा ताबा तरुण मुलींनी घेतला. सुमाकाकुंच्या जवळ बसलेल्या मंदाताईसह कोणीही अजिबात उठलं नाही.. उठले फक्त पानसे रवी आणि सुगंधा. जाताना शेजारीच बसलेल्या जयंताला फक्त “आलोच” असं म्हणाला रवी. आणि पाचदहा मिनिटात परत आला. बरोबर सुगंधा होतीच.
आले ते दोघेही. काका काकू जवळ गेले. अप्पा आणि मंदाताई बाजूला झाल्या. एक नाही दोन नाही. रवीने खिशातून किल्ली काढली आणि पाटील काकांचा हात हातात घेऊन हातावर ठेवली. सुमाकाकुंचा हात सुमेधाने हातात घेतला. तिलाच रडायला यायला लागले. चौघेही, नव्हे चाळीस पन्नास लोकं मूकपणाने रडतं होते.
“ अरे, तुला पैसे कसे परत करू? तो नीच सगळे पैसे घेऊन गेला.” कसंतरी काका बोलले. मोठ्ठ आवंढा गिळला त्यांनी.
“ पैशाचं काही नाही. तुम्ही तुमच्याच घरात राहायचं.” रवी म्हणाला.
“ होय, तुम्ही तुमच्याच घरात रहायचं. आमचं आम्ही बघू.” सुगंधाही असंच बोलली.
कशी कोण जाणे पहिल्यांदा कोणी टाळी वाजवली. पाठोपाठ टाळ्यांचा नुसता कडकडाट झाला आणि पहाटे पासूनची शांतता भंग पावली.
एक स्मितरेषा अनेकांच्या चेहऱ्यावर उमटली. मानसी रेखा आत पोह्यांच्या बशा भरीत होत्या. त्याही बाहेर आल्या, सगळ्यांनी पोह्यावर ताव मारला. पुन्हा एकदा चहा झाला. मग मात्र एकेक करीत आपापल्या उद्योगाला जाऊ लागले. मोजकीच मंडळी सालोख्यांच्या घरात बसली.
“ तुम्ही सकाळची बिपी ची गोळी घेतली का? कुठे आहे? देते मी.” मानसी ने दोघांना औषध काढून दिलं.
“ मला नको. मी कुठलंच औषध घेणार नाही. मी संपले आता. नाही सहन होणार मला.” असं म्हणून सुमाकाकुंना पुन्हा रडू कोसळलं. सांत्वन तरी कुठल्या शब्दात करायचं दोघांच?
काकांनी स्वत:च्या हातात गोळी घेतली, “ सुमा, मी आहे तो पर्यंत तुला औषध घ्यायलाच पाहिजे. घे.”
एखादी चिमुरडी चिकटावी बापाला तशा सुमाकाकू काकांना बिलगल्या. आवेगानं सुमाला मिठीत घेतलं आणि काका आईला घट्ट धरून मुलगा रडतो तसे रडले. हेलावून सोडलं घर.
आवेग ओसरे पर्यंत एकमेकांच्या मिठीत होते ते दोघं. त्या दिवशी दोघेही तिथेच राहिले. त्यांच्या स्वत:च्या घरात पाउल टाकायचं धैर्य नव्हतं गोळा झालेलं अजूनही. सालोख्यांनीही त्यांना एकट्यांना सोडलं नाही. बाकीचे येत जात होते. जेवणं झाली, जेवणं कसली, काहीतरी पोटात ढकललं, तेही इतरांच्या आग्रहाखातर. बास. देहधर्म सरणावर पडल्यावर जातो, तोपर्यंत पिच्छा पुरवतं राहतो क्षणोक्षणी.
दुपारी मंदाताईंनी दोघांना गोळी दिली, आणि आत बेडरूम मध्ये विश्रांती साठी हाताला धरून नेलं. मोठी बहिण जसं झोपवते लहान भावंडांना तसंच फक्त वयात आदलाबदल. लहानीनं मोठ्यांना झोपायला लावलं.
सलोख्याच्या घराबाहेर, वरच्या मजल्यावर सोसायटीच्या अध्यक्षांच्या घरात सर्व एकत्र जमले. तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सगळा राग, संताप, चीड, ओकली गेली. संताप संताप होत होता, तरीपण बिल्डींगला आग नाही लागली. अघटीट प्रसंग असेच दबून बसलेले असतात, अचानक सामोरे येऊन सगळ्यांना सैरभैर करून नामानिराळे गंमत बघत बसतात. तसेच काहीसे.
दातेआजीनी सुचवलं, “ त्याला ताबडतोब ईमेल करा, त्यांने सगळे पैसे पाठवलेच पाहिजेत. नाहीतर त्याला कोर्टात खेचा. दोघांना असं वाऱ्यावर सोडायचं नाही. शिवाय पानसे मुलांनी काय करायचं. कर्ज घेतलं दोघांनी. त्यांचाही विचार केलाच पाहिजे.”
यावर साधक बाधक चर्चा झाली. प्रत्येकाने आपापल्या परीने हव्या त्या भाषेत, अक्षयला इमेलवर सुनावले. चोवीस तासात किमान पंधरावीस मेल केले गेले, मोठा दबाव अक्षयवर टाकायचं ठरलं. बिल्डींग मधील लहान मोठ्या सगळ्यांनी आपला संताप व्यक्त करणारे इमेल वाचून अक्षय नक्कीच ताबडतोब पैसे पाठवून देईल असे वाटत होते.
जोशींनी, म्हणजे सोसायटीच्या अध्यक्षांनी सोसायटीच्या लेटरहेड वर खरबरीत ऑफिशिअल लेटर लिहले. “आम्ही पुढे जाऊन काय करू हे ठरवलेलं नाही, परंतु जर आपली सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नाही तर मात्र कडक निर्णय घेऊन सरकारी यंत्रणेनुसार कारवाई करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही.” या वाक्याने शेवट करणारे पत्र लिहिले. तसेच, मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांना आभार व्यक्त करणारे पत्र पाठवले. “विमानतळावर जे काही घडले ते आम्हाला पाहिजे आहे. तसेच तेथील सीसीटीव्ही मधील आजीआजोबांचे फुटेज सुद्धा हवे आहे. आम्हाला ते त्यांच्या मुलाला पाठवायचं आहे. आपल्या सहकार्याची गरज आहे.”
अमेरिकेला जायची बातमी जरी सगळ्या गावात पसरली, त्याच्या दसपट गतीने ते परत आल्याची बातमी कानोकानी झाली. हळहळ, संताप, राग वाटून कित्येकांनी बोटं सुद्धा मोडली. त्यात, अक्षयचा एक मित्र सतीश होता. तो धावतच भेटायला आला दोघांना. दोन दिवस झाले होते परतीला. स्वत:च्या घरात जायची हिम्मत नव्हती झालेली दोघांचीही. सतीशला अक्षयचा संशय आलाच होता. त्याची सगळी काळीबेरी पिलावळ सतीशला माहित होती. पण, मागील बरेच वर्षात दोघांचा संपर्क नव्हता. अक्षय बरोबर असलेली मैत्री खूप जपावी असं सतीशला वाटलंच नाही. आणि म्हणूनच अंतर वाढलं, अक्षय तर स्वत:हून कधीच कोणाला विचारीत नव्हता, तर सतीशला कशाला फोन करेल?
झालेल्या प्रकारची सतीशने गंभीर दखल घेतली. अक्षयच्या तमाम सर्व मित्रांना झालेला प्रकार कळवला. त्यांनीही एकत्रितपणे विचार करून अक्षयला मेल पाठवले. काहींही फोन केले, सज्जड दम भरला की, “याचे परिणाम तुला अतिशय वाईट रीतीने भोगावे लागतील. मुकाट्याने जितके पैसे नेलेस, ते परत कर, व्याज घेत नाही तुझ्याकडून जर लगेच पाठवलेस तर. नाहीतर, इथे बसून तुझे जिणे तिकडे हराम करून सोडू.”
बुधवारी पहाटे पासून शुक्रवार संध्याकाळ पर्यंत सालोख्यांच्याच घरात मुक्काम होता पाटीलकाका आणि सुमाकाकुंचा. अगदी आस्थेने त्यांना राहून घेतलं होतं सलोखे दाम्पत्यांनी. शुक्रवार संध्याकाळी रवी आणि सुमेधा आले. “चला, आपल्या घरात जायचं आहे.” म्हणाले.
‘आपल्या घरात’ शब्दातला अर्थ नीट उलगडला नव्हता. पण, रवी सुमेधाने जे काय ठरवलं होतं ते त्यांनी अप्पा व मंदाताईंना सकाळीच सांगितलं होतं. पाटील, पानसे आणि सलोखे तिन्ही जोड्या पाटील यांच्या घरात गेले. रवी सुमेधा... या मुलांनी सलोख्याच्या घरातलं सगळं सामान या घरात आणलं. घर मांडलेलं होतंच. मोडलेलं नव्हतं. मोडले होते घरातले दोन समाधानी आनंदी जीव. तीनचार दिवसापुरते इथे राहणारे जणू गावाला गेले होते. आले परत, तसंच होतं सगळं.
रवी सुमेधा ने आज सुट्टी घेतली होती. आज त्यांना त्यांनी नुकत्याच विकत घेतलेल्या पण परत केलेल्या घरात गृहप्रवेश करायचा होता. स्वयपाक केलेला होता. प्रसाद म्हणून शिरा केलेलं पातेलं सुमेधाने उचललं आणि आपल्या नव्या घरात आली. पाठोपाठ इतर पातेली, डबे सुद्धा आले. टेबलावर सगळं मांडलं.
सुमेधानं घरात देवापुढे दिवा लावला. तशा सुमाकाकू पुढे आल्या. देवासमोर बसल्या. हात जोडले, डोळे मिटले. काय मागणं मागितलं कोणास ठावून. उठल्या तशा टेबला भोवती उभ्या राहिल्या. आणि.... सरासर त्या अन्नपूर्णेचा हात ताटं, वाट्या, चमचे, डाव यांच्याशी बोलू लागले.
जवळ जवळ सातशेहून अधिक इमेल्स अक्षयला केले गेले होते, तेही एका आठवड्यात. कोणाच्याही इमेलला उत्तर आले नव्हते. एकेकाने दहा पंधरा इमेल्स पाठवले होते त्याला. अगदी भंडावून सोडले, धमक्या दिल्या, शिव्या वहिल्या. सतीशने लिहिले होते, “तू जर पैसे पाठवले नाहीस, तर तुझ्या आईबाबांना मी माझ्या घरी राहायला आणीन. आणि, नंतर सर्व मित्र मिळून असेच थोडे थोडे दिवस त्यांना सांभाळू. तुझी तू नसताना धिंड गावभर काढू. तुझे तूच ठरवं. दहा दिवसाची मुदत देत आहोत.” अक्षयने ते इमेल्स वाचले की डिलीट केले हे दहा दिवसात कळणार होते. तोपर्यंत पुढील कारवाई काय करायची हे शिजत होते.
आणि अक्षयची मुदत संपली. आज शेवटचा दिवस. जोशी काकांना एक ईमेल आला. “पैसे पाठवले आहेत. दोन दिवसात मिळतील.” नमस्कार चमत्कार शून्य. खाली नावसुद्धा नाही. आणि झालं ही तसचं. पैसे आले, तेही सगळे. जेव्हढी रोख रक्कम त्याने डॉलर मध्ये करून नेली होती, तीच पुन्हा रूपयांमध्ये रुपांतरीत होऊन आली. पैसे आले, पण अक्षय दुरावला हे सत्य स्वीकारण्या इतकी कणखरता पाटीलकाकांच्यात आली होती. आता काकांनी स्वीकारली तर सुमाकाकुंना सुद्धा स्वीकारायला हवीच होती.
किती अवघड जात होतं ते हे जाणवत होतं.
वादळ जरासं निवळलं. आतल्या आत फटकारे बसतं होतेच. त्याला कोणाचाही इलाज नव्हता. डुगडुगत्या पायांनी का होईना... उभं राहायलाच पाहिजे, ह्याची जाणीव घराला आली. ... आणि बरोबरो आठ दिवसांनी पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी. रवी आणि सुमेधा ऑफिसमधून परत आले, दोघांनाही दारातच उभे केलं. पटकन घरात घेतलंच नाही. “काय झालं?” काही क्षण मोठ्ठा प्रश्न आक्राळ विक्राळ आ करून उभा राहिला रावि सुमेधा पुढं. तसं, दुसऱ्या मिनिटाला सुमाकाकू बाहेर आल्या. सुमाकाकुंनी त्यांच्या पायावर दुध घातले, भाकरतुकडा ओवाळला आणि आत घरातल्या लेकरांना घरात घेतलं. दोघेही एकमेकांकडे बघत होते. हे काय झालं. असं एकदम काकू काय करतात.
चौघेही एकत्र बसले. कोणीच काही बोलू शकत नव्हते. कृतीमधून काकूंनी काय सांगायचं ते दाखवलं होतं दोघांना. काकांची तेव्हढी आतल्या खोलीत ये जा झाली एकदोनदा. तसं पाहिजे ते दुपारीच लिहून ठेवलं होतं, देवाला दाखवून टेबलावर ठेवलेलं. काकांनी घेतलेल्या पैशांचा चेक हातात न दिसेल असा आणला. बसले रवीजवळ. आणि तो चेक रवीला देऊ केला. पण... आता, रवी काय करणार. कर्जात पूर्ण बुडलेला तरुण. पण, रवीने तो चेक नाकारला.
“ मी हे घर घेतलं त्याचे पैसे तुम्हाला दिले. वरचा फ्ल्याट मी खाली केला आहे. पुरंदरे काकांना तो पाहिजे होता. आता याच घरात मी राहणार, आणि तुम्ही पण इथे राहायचं. तुम्हाला दुसरा मुलगा असता, तर त्याला आणि सुनेला बाहेर नसतं ना काढलं? तसंच समजा. आम्ही दोघांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्याला धक्का नका देऊ. आम्हाला आपलं समजा. आम्ही तर त्याच भावनेनं मागल्या शुक्रवारी तुम्हाला घेऊन आलोत तुमच्याच घरात.” काका आणि रवी बोलतं होते.
“ अरे, पण तुझे कर्ज.... ते घेतलेले पैसे तर घे.”
“ नको, कर्ज मला फेडायचं आहेच. हप्प्ता जाईल पगारातून. तुम्ही का देता मला?”
“ हे बघं, हे घर आता माझं नाही राहिलं. तुला मी विकलं. तुला खूप देणं आहे, हे मला माहित आहे. आणि आता आपण चुढे इथेच एकाच घरात राहणार आहोत. नशिबानं दोन बेडरूमचा फ्ल्याट घेतला होता तो अशाच साठी होता असं वाटू लागलं मला.”
“ खरचं... आपण राहू या एकत्र. आम्हाला आवडेल तुमच्या बरोबर राहायला.” सुमेधला गप्प बसवेना.
“ सुमेधा, अगं तू सुमनची लेक झालीस गं. या घरात माझ्याही मागं सुमाच राहणार. हो ना गं पोरी?
हे घर सुमाचंच.” सुमन चं घर सुमेधाचं, नव्हे एकचं घर दोघींचं. हो एकचं घर दोघींचं.
“ रवी सुमा... सुमेधा. तुम्ही दारावरची पाटी नाही बघितली? जा बरं पटकन बघून या इकडे आणि सांगा काय आहे ते.” गंभीर होतं चाललेलं वातावरण एकदम हलकं फुलकं केलं काकांनी.
दारावरील पाटीवर लिहिलं होतं ......”पाटील आणि पानसे”
“काय लिहिलं आहे, सांगा बरं.” लहान मुलांना विचारवं, त्यांनी बरोबर उत्तर द्यावं, आजीआजोबांनी म्हणावं “बरोबर. शाब्बास.” ... अगदी तस्संच झालं.
“ काय लिहिलं पाटीवर?” सुमाकाकुंचा चेहरा एकदम खुलला. जणू नातीला विचारीत आहेत, “सांग बघू मला उत्तर. काय आहे ते?”
“ पाटील आणि पानसे.” सुमेधाने बरोबर उत्तर दिलं.
सगळ्यानीच हसून तिच्या उत्तराला दाद दिली.
“ एका पा वर दोन पा.” रवी ने जाहीर केलं
अरे व्वा...रवी तू तर एकदम हुश्शार.” काकांनी रविला टाळी दिली. सुमेधाची कळी खुलली. पाटीलकाकांना हसू आलं. आणि सुमाताई .... इतक्या खुश झाल्या कि सुमेधाला जवळ खेचलं. एक पप्पी घेतली, आणि दोन आनंदाश्रू पडले एका सुमाचे दुसऱ्या सुमाच्या गालावर.......
लेखिका - वंदना धर्माधिकारी
"घायाळांची मोट " कथासंग्रहातून
वरील कथा वंदना धर्माधिकारी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
ही कथा वाचून पहा.