निर्णय

 निर्णय

✍️ अनघा लिखिते

          साधना आपल्या खोलीत बसली होती. अंधार पडला होता, दिवेलागणीची वेळ झाली, तरी तिचं लक्ष नव्हतं. प्राजक्ताला आश्चर्य वाटले. तिने येऊन लगेच दिवा लावला.

          प्राजक्ता, "साधना काकु, हे काय गं ? आज संध्याकाळीची दिवाबत्ती करायला विसरली की काय ?"

          साधना एकटी रहायची. प्राजक्ता पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. प्राजक्ता सुशील, सुंदर आणि बोलघेवडी, त्यामुळे साधनाला आवडायची. तिचं नीटनेटके रहाणं, घरकामात मदत करणं, महीन्याच्या पहिल्या तारखेला न चुकता भाडं देणं, नाव ठेवायला काहीच जागा नाही. फर्स्ट ईयर पासून नोकरी लागेपर्यंत प्राजक्ताने तिथेच राहणं पसंत केले. प्राजक्ताचे आई-वडील सुद्धा रिलॅक्स होते. साधनाला सुद्धा तिची सवय झाली होती.

          प्राजक्ताचे लग्न ठरले. आज सकाळी प्राजक्ताने साधनाला पेढे देऊन ही आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा पासून साधनाचं चित्त थाऱ्यावर नव्हते. उद्या तिचे सासरची मंडळी खास साधनाला भेटायला येणार होती.

          प्राजक्ता आता सासरी जाणार याने तिचं मन बेचैन होतंच, पोरी सारखी माया लावली होती. पण यापेक्षा तिचं लक्ष उडाले होते, कारण हातखांब्याच्या अच्युतराव देशपांडे यांच्या मुलाशी प्राजक्ताचे लग्न ठरलं हे ऐकून. ती भूतकाळात गेले.....

१९७०-८० चा काळ...

          प्रभाकर कुलकर्णी, त्यांची पत्नी 'रसिका', मुलगा 'शेखर' आणि मुलगी 'साधना' असं हे सुखवस्तू कुटुंब पुण्यात राहत होते. शेखर हा शिक्षणासाठी अमेरिकेत गेला तो तिथेच स्थायिक झाला.

          साधना बारावी पास झाल्या झाल्या वडीलांनी स्थळं पाहणं सुरू केलं. अच्युत देशपांडे या मुलाचं स्थळ आलं. मुलाचं ग्रॅज्युएशन झालं होतं. स्वतःचे दुकान होते. घर म्हणजे मोठा बंगलाच, शेती, शिवाय एकुलता एक मुलगा, म्हणजे येवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक तो एकटाच, सासु नसल्याने आपल्या मुलीला सासुरवास सुद्धा नसणार, असा सारासार विचार करून त्यांनी हे लग्न ठरवलं. साधनाला मुळीच पसंत नव्हते, तिला दादा सारखा शिकलेला मुलगा हवा होता. पण वडील कडक शिस्तीचे, त्यांनी ठरवलं ते ठरवलं.

          झालं... अक्षता पडल्या, सर्व विधी यथासांग पार पडले. दादाने वहीनीला हनिमूनला स्वित्झर्लंडला नेले होते, तिकडे गेल्यावर. साधनाने सिनेमात पाहून आणि कथा कादंबऱ्या मध्ये वाचून छान गुलाबी स्वप्न रंगविली होती पहील्या रात्रीची.

          पण अच्युत अगदी साधा सरळ, अगदी अन-रोमॅन्टीक. त्याला फक्त एकच मित्र, त्याचे लग्न झालेले. लग्नानंतर दिवस आपले साधेच जात होते. गावात फिरण्यासारखं काहीच नव्हते, सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायची. तेव्हा नवऱ्याशी बोलणं व्हायचं नाही, सासरे असायचे. नंतर सासरे लवकर घरी परतायचे. मग जेवणं उरकली की सगळं आवरून थकवा यायचा. तो सुद्धा थकलेला असायचा. असे महीने - दोन महिने उलटून गेले.

          सासरे किर्तनाला जाणार होते, ते काही रात्री अकरा वाजेपर्यंत येणार नव्हते. साधनाला छान संधी मिळाली होती, आपल्या नवऱ्यासोबत वेळ घालवायची. तिने खोली सुंदर सजवली होती. बागेतील मोगऱ्याची फुलं आणून ठेवली होती दुपारीच. जेवण वगैरे आटोपलं, सासरे निघाले. अच्युत त्यांना मंदीरात सोडून येतो म्हणून सांगुन निघाला.

          साधना छान तयार झाली, लांब सरळ केस मोकळे सोडले, छानसं परफ्यूम लावलं, ओठांवर लिपस्टिक, खास गाऊन तिच्या वहीनीने गिफ्ट केलं होतं, ते घातलं. त्यात तिचं सौंदर्य खुलून दिसत होते. बिछान्यावर मोगऱ्याची फुलं पसरवून ठेवली होती.

          आरशात स्वतःची छबी पाहून, "हे नक्की घायाळ होतील आपलं रूप पाहून." ती पुटपुटली आणि छानशी लाजली.

          अच्युत वडिलांना सोडून आला, त्याने दाराला कडी घातली. सुगंध दरवळत होता, त्याला आश्चर्य वाटले. तो खोलीत आला, डीम लाईट लागला होता. साधना बिछान्यावर बसली होती,कपडे बदलत.

"साधना, अत्तराची बाटली सांडली का गं?"

          ती धक्का बसला की यांना काहीच समजू नये, म्हणजे कमाल आहे.

          तो खिडकीजवळ गेला, खिडकी उघडायला, "खिडकी बंद करून ठेवली आहे, म्हणून वास कोंडला आहे, मोकळी हवा येऊ दे..."

          साधनाने पटकन जाऊन थांबवलं. तो तिच्या या रूपाकडे विचित्रपणे पाहत म्हणाला, "तु हे काय ओंगळवाणे रूप घेऊन बसली आहे. अगं पहीले नीट कपडे घाल पाहू." असं म्हणून त्याने लाजेने तोंड फिरवले.

          साधनाने दुर्लक्ष करून, मनाचा हिय्या करून म्हटले, "अहो ! आपण कुठेतरी फिरायला जाऊया नं..."

          अच्युत, "का ? मला काम सोडून जाता नाही येत. मी तुला पुण्याच्या गाडीत बसवून देतो. तु आई कडे राहून ये काही दिवस. म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर येईल."

          साधना त्याच्या जवळ आली आणि गच्च मिठी मारली, "अहो, हे काय ! मी आपण दोघं जाऊ म्हणतेय आणि आपलं लग्न झालंय, आपल्या मध्ये आता कोणताच दुरावा नको. किती दिवस मला तुम्ही असं दूर ठेवणार आहात. अशाने आपला वंश कसा चालेल ?"

          शेवटी तिनेच पुढाकार घेतला, पण अच्युत अपात्र ठरला. ती फार दुखावली गेली. दिवसा मागे दिवस जाऊ लागले. पण पाळणा हलतच नव्हता. लग्नसमारंभात, सणासुदीला बायका साधनालाच कोसु लागल्या. 'बांझ' म्हणून तिचीच हेटाळणी होऊ लागली. कमी अच्युत मध्ये होती, पण भरडल्या साधना जात होती.

          शेवटी कंटाळून तिने कायमचे निघून जाण्याचा निर्णय घेतला. अच्युत खुप दुःखी झाला होता. त्याने तिला खूप विनवण्या केल्या, पण शेवटी त्यांचा घटस्फोट झाला.

          ती परत कायमची माहेरी आली. वडिलांना धक्का बसला.

          शेवटी ते म्हणाले की साधना मी चुकलो, माझा निर्णय चुकीचा ठरला. मला माफ कर. येवढं बोलून त्यांनी अंतिम श्वास घेतला.

          दादा - वहीनीने ते पुण्याचं घर रितसर तिच्या नावाने केले. साधनाने परत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. नंतर ती नोकरी करू लागली. कालांतराने आई गेली, दादा तीन वर्षांतून एकदा यायचा, एक वेळ ती जायची.

          शेवटी तिने पेईंग गेस्ट ठेवणं सुरू केले, पेन्शन आणि भाडं दोन्ही मुळे घर नीट चालायचे.

          मग आली प्राजक्ता. तिच्या मध्ये काय जादू होती, की साधना पुन्हा छान आनंदाने राहू लागली. तिचं लग्न एक ना एक दिवस होणारच होतं. पण ते अच्युत देशपांडे यांच्या मुलाशी !!!

          कसं शक्य आहे ? तेव्हा तर.... जाऊ दे माझ्याच नशीबात नसेल मातृसुख... आता प्राजक्ता समोर हे सगळं येणार. ती काय विचार करेल माझ्या बद्दल ? तेव्हा तर हे चकार शब्दाने बोलले नाही कधी. त्यांचा पुरूषी अहंकार स्वतःचा दोष स्विकारत नसे.

          असो तेव्हा ही माझी चूक नव्हती. बाबांनी माझ्या मनाविरुद्ध लग्न करून देऊनही, मी मनाने स्विकारले होते. उद्याचा दिवस कसा उजाडणार आहे ? कोण जाणे....

          दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून साधना आणि प्राजक्ता पटपट आवरून छानसे जेवण बनवतात. अच्युतरावांना श्रीखंड पुरी आणि सुकी बटाट्याची भाजी, सोबत भजी हा आवडता मेनू असतो. साधना आवर्जून हा बेत ठेवते.

          ते दोघे बरोबर अकरा वाजता येतात. प्राजक्ता साधना काकुंची ओळख करून देते. अच्युतराव साधनाला पाहून अवाक होतात. त्यांच्या तोंडून निघतंच, "साधना तु ?"

          साधना, "हो..."

          प्राजक्ताला आनंद होतो, "अय्या बाबा ! तुम्ही काकुंना ओळखता ?"

          अच्युतराव हिंमत करून, "हो प्राजक्ता तु जसं सांगितले तसा मी चांगला अनुभव घेतला आहे. तिच्या अशा नीरस आयुष्याला मीच कारणीभूत आहे. आमचं लग्न झालं... पण तिला कधीच सुखी नाही ठेवू शकलो."

          प्राजक्ता आणि अच्युतरावाचा मुलगा सुहास पाहातच राहिले.

          सुहास, "हे काय बोलताय बाबा तुम्ही ? या माझ्या आई आहेत. मग मला जन्म देऊन सोडून का गेल्या ?"

          साधनाला नवल वाटले की हा स्वतःला माझा मुलगा का म्हणतोय ? जेव्हा कि आमच्यात काही संबंध बनले नव्हते आणि यांनी दुसरं लग्न नाही केलं ?

          साधनाचा सुर नाराजीचा होता, "नाही तु माझा मुलगा नाहीये. तसं असतं तर मी सोडून नसते आले तुला."

          सुहास वडिलांच्या जवळ जाऊन, "बाबा, मग माझी आई नक्की कोण आहे ? तुम्ही नेहमी म्हणत आले होते की आई देवाघरी गेली. जेव्हा कि या आहेत आणि आपल्या कडे आजी आजोबांचा फोटो आहे. पण माझ्या आईचा नाही."

          त्याला स्वतःच्या जवळ बसवत, "आता काही गोष्टींचा उलगडा झाला आहे. तर सगळंच सांगतो...."

          अच्युतराव सगळं सांगतात. वातावरण उदास झालेलं होतं.

          सुहासला खुप वाईट वाटले, जेव्हा त्याला कळलं की आपण अनाथ होतो, पण आजपर्यंत बाबांनी आपल्याला जाणीव करून दिली नाही. ते नसते तर आपण इतर अनाथ मुलांप्रमाणे अनाथाश्रम वाढलो असतो. प्राजक्ता बोलायला लागली, तेव्हा तो भानावर आला...

          प्राजक्ता, "आय थिंक जे झालं, जे आपण चेंज नाही करू शकतं. पण आपण पुन्हा आयुष्याची घडी नीट बसवू शकतो. नाही का सुहास ?"

          सुहास, "अं... हो.. हो..."

          साधना, "नाही.. नाही... प्राजक्ता आता ते शक्य नाही. यांना पाहून मला त्याच गोष्टी आठवत राहतील. माझं उजाड झालेलं आयुष्य कधी परत येणार नाही याची खंत वाटत राहील."

          अच्युतराव, "मी पण तुझ्या शिवाय पण सुखी नव्हतो. मग सुहासला दत्तक घेतले. मग रमलो त्याच्या बालपणात. जे झालं त्याच्या बद्दल मी तुझी माफी मागतो. मला फक्त एक चान्स दे. मी उरलेलं आयुष्य सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहील."

          प्राजक्ता, "काकु, जसं तुम्हाला सासु नव्हती. त्या असत्या तर एखाद्या वेळेस आपला मुलगा कुठे चुकतोय, त्याचा संसार वाचविण्यासाठी त्या धडपडल्या असत्या. तुम्ही जर माझ्या सासु झाल्या तर किती छान होईल, आपलं या पाच वर्षांत किती छान बॉन्डीग झालं. विचार करा की आपण नेहमी सोबत राहू, आपण छान फिरायला, नाटकाला, हॉटेलिंग सोबत करू, सुखदुःखात सोबत असु. काकु मी गेल्यावर तुम्ही अजुन कोणी पेईंग गेस्ट ठेवाल. पुन्हा त्यांच्याशी नव्याने जुळवून घ्यायचे, मग त्या गेल्या की पुन्हा तेच, असं बंद करण्याची संधी आहे. तुम्हाला तुमच्या हक्काची नाती नव्याने मिळतात आहेत, नका नाकारू."

          सुहास, "आई, मला प्राजक्ता मुळे आईचं प्रेम मिळणार आहे, ते नाकारू नकोस. ते घर आजही तुझंच आहे. मला आज कळलं त्या घराचं नाव साधनालय का आहे. तुझ्या येण्याने त्या घराला घरपण येईल."

          अच्युतराव, "साधना तु आली तर मी स्वतःला माफ करू शकेल. मी तुला वचन देतो, यापुढे तु दु:खी होशील असं काही होणार नाही."

          साधनाला गहीवरून येतं. अच्युतराव तिला मुलांसमोर न लाजता जवळ घेतात. तेव्हा तिला विश्वास येतो.

काही दिवसांनी....

          सुहास, प्राजक्ता, प्राजक्ताचे आई-वडील, साधनाचे दादा-वहीनी पुन्हा त्यांचे आनंदाने लग्न करून देतात.

          नंतर सुहास आणि प्राजक्ताचे ठरल्या प्रमाणे धुमधडाक्यात लग्न होतं आणि ते सर्व सुखानी नांदु लागतात.

समाप्त.

अनघा लिखिते ✍🏻

सदर कथा - "निर्णय" माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने ती "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.

Post a Comment (0)
Previous Post Next Post