हे बंध रेशमाचे भाग एक

 #हे_बंध_रेशमाचे  भाग एक


✍️ बीना बाचल

रमा आणि गिरीजा दोघीही सख्य्या शेजारणी. शिवाय दोघीही  परदेशात असल्याने एकमेकींचा फार आधार वाटायचा दोघींना. सतत एकमेकींकडे  जाणं येणं, weekend ला एकत्र बाहेर फिरणं हे ओघानेच व्हायचं. दोन्ही घराचे  छान सूर जुळले होते आणि त्यात अजून सुखद धक्का म्हणजे गिरीजाकडे गोड बातमी आली, झालं रमाने तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे केले . आणि थोड्याच महिन्यात रमाकडेही छोट्या पाहुण्याची चाहूल लागली, रमा आणि गिरीजाच्या आनंदाला पारावर उरला नाही. दोघीही एकमेकींची काळजी घ्यायच्या. एकमेकींचे डोहाळे पुरवायच्या!! एक दिवस दोघी एकत्र होत्या,छान पदार्थाचा आस्वाद घेताना रमाला काय सुचलं कोण जाणे, ती गिरीजाला म्हणाली, "गिरीजा, समज आपल्याला मुलगा,मुलगी झाले तर आपण त्यांचे  लग्न लावून देऊ!! बघ म्हणजे कायम एकत्र राहू आणि देवाने आपल्याला नात्यात बांधले नाही तर आपणच तो योग जुळवून आणू, काय म्हणतेस?"


गिरीजा ने तिचे म्हणणे हसण्यावारी नेले, "रमे काहीतरीच बघ तुझं!! दोघींना मुलंच झाली किंवा मुलीच झाल्या तर काय करशील?"
"नाही हा गिरीजा,तुझं नाही माझं म्हणणंच खरं होणार बघ!"
" बरं बाई ,तुझं तर तुझं खरं!! आधी आपली पिल्लं ह्या जगात तर येऊ देत. जगात बालविवाह होत असत हे ऐकून होते पण इतक्या बालपणी ते ठरत असतील ह्याची कल्पना नव्हती बाई" इति गिरीजा!!

असे हसत खेळत दिवस जात होते आणि गिरीजाचा सातवा महिना सुरू झाला आणि  अचानकच तिच्या नवऱ्याची भारतात बदली झाली.

दोघा मैत्रिणींची ताटातूट होणार होती. फार जीवावर आलं होतं दोघींना निरोप घेणं, पण अटळ होतं. शेवटी कायम संपर्कात राहू, फोन करू वगैरे ठरवून एकमेकांनी निरोप घेतला.

गिरीजा आणि रमा पहिले काही दिवस अगदी रोज एकमेकींशी बोलायच्या, विचारपूस करायच्या.

पण नंतर दोघींच्या डिलिव्हरीनंतर दोघीही आपल्या बाळांसोबत रमल्या, गिरीजाला गोड मुलगी झाली, तिनं लेकीचं नाव नक्षत्रा ठेवलं.नावाप्रमाणेच नक्षत्रा गोड होती. तिकडे रमालाही मुलगा झाला, तिनं त्याचं नाव इंद्रनील ठेवलं. दोघीही आपल्या संसारात रमल्या, मुलं हळूहळू मोठी होऊ लागली.

इकडे गिरीजाच्या लक्षात आलं, की नक्षत्रा छान हसते खेळते, पण हुंकार देत नाही. तिनं खूप धीराने घेतलं की थोडे दिवसांनी होईल सगळं ठीक, पण नक्षत्रा बोलण्याचे नाव घेईना. मग डॉक्टरांकडे नेल्यावर निदान झालं की नक्षत्रा बोलू शकत नाहीये, ती जन्मतःच मुकी आहे. गिरीजाच्या पायाखालची वाळूच सरकली. सुरुवातीचे काही दिवस तिनं फार दुःखात काढले, रडली, स्वतःच्या नशिबावर चिडली, देवाशी रोज भांडली. पण वेळ जाईल तसे तिच्या लक्षात आले की त्रागा करून काहीही होणार नाही. आहे ती परिस्थिती मान्य करायला हवी, आणि तिनं ती मान्यही केली.

इकडे रमाचा मध्ये अधे फोन यायचा तेव्हा ती चिडवायची गिरीजाला "काय करताहेत आमच्या सुनबाई?"

  एक दिवस गिरीजाने मनाचा निश्चय करून रमाला नक्षत्राबद्दल सांगितलं, ऐकून रमालाही धक्का बसला. तिनं धीर दिला गिरीजाला, पण हळूहळू रमाचे फोन कमी होऊ लागले. गिरीजा काय ते समजून गेली. आणि अशीच काही वर्षं लोटली....

नक्षत्रा अगदी दिसामासाने मोठी होऊ लागली, नेटका बांधा, सुंदर लांबसडक केस, टप्पोरे  बोलके डोळे ,अगदी समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेणारे!! परमेश्वर ही बहुदा तिला दिलेल्या कमतरतेची भरपाई करत असावा.. इतकी  सुंदर नक्षत्रासारखी 'नक्षत्रा'!!

जो कोणी तिच्या संपर्कात येई त्याला ती आपलेसे करी. पण मनातून तिच्या मुकेपणाबद्दल सगळेच हळहळत. पण स्वतः नक्षत्राला मात्र तिच्या ह्या वैगुण्याचे कधीच वाईट वाटले नाही. ती नेहमीच हसतमुख असायची. गिरीजाचा जीव मात्र नेहमी तुटायचा, देवा का रे माझ्या इतक्या गोड लेकीवर असा अन्याय केलास? इतकं सारं दिलंस त्यात फक्त वाचा दिली असतीस तर कुठे बिघडणार होतं तुझं?' असो, पुन्हा गिरीजा आपल्या कामाला लागत असे.

नक्षत्रा आता हळूहळू उत्तम sign language शिकली होती, शिक्षण ही उत्तम सुरू होतं तिचं. अशातच एक दिवस नक्षत्रानेच विषय काढला की तिला पुढील शिक्षणासाठी परदेशात जायला आवडेल. एवढाले मोठे डोळे करून आईकडे बघत तिनं तिचं म्हणणं पोहोचवलं, पण 'परदेश' हा शब्द ऐकताच गिरीजाच्या मनात कालवाकालव झाली, 'परदेशात मुळीच नाही, जे शिकायचं आहे ते इथेच शिक' गिरीजा ने स्पष्ट केले. नक्षत्राला समजेना कशालाच नको न म्हणणारी आपली आई 'परदेशात' जायला इतका विरोध का करतेय!! तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, मूकपणे तिनं त्यांना वाट करून दिली. दुसऱ्या दिवशी मात्र पुन्हा ती काही झालेच नाही ह्या अविर्भावात कॉलेजला पळाली.

गिरीजाला तिच्या नवऱ्याने समजावलं 'गिरीजा, तू उगाच परदेशाचा आणि रमाचा संबंध जोडू नकोस,तो भूतकाळ होता, आता आपण फार पुढे निघून आलोय, नक्षत्राला तर ह्यातले काही माहीत देखील नाही,उगाच तिचा हिरमोड करू नकोस, जाऊ दे तिला शिक्षणासाठी बाहेर!'

पण गिरीजाच्या मनाची जणू खपलीच निघाली ह्या प्रसंगाने, ती भूतकाळात गेली आणि फोन ची रिंग वाजली. 'हॅलो 'म्हणत गिरीजा ने फोन घेतला" पलीकडून ओळखीचा आवाज आला "गिरीजा,मी रमा बोलतेय" ही कसली "telepathy" म्हणत गिरीजा स्तब्ध झाली. तिकडे रमा पुढे बोलू लागली, "गिरीजा, अग तुझ्याशी बोलायचं होतं. माझा मुलगा....."
तिला पुढे बोलू न देताच गिरीजा ने फोन ठेवला." इतक्या वर्षांनी फोन केला, तेही मुलाबाबत बोलण्यासाठी म्हणजे नक्कीच त्याचे कुठेतरी लग्न जुळवले असणार हिनं, आपल्याला फक्त सांगण्यासाठी फोन केला असणार!! अजून काय, एके काळी हिला आपली नक्षत्रा सून करून घ्यायची होती आणि आज.... ती केवळ... म्हणून.. असे' गिरीजाच्या मनात वाईटसाईट विचारांचे जणू वादळच घुमू लागले.

तो प्रकार नवऱ्याला सांगून तिनं तो विषय तिथेच थांबवला.

इकडे नक्षत्रा पुढे शिकायचे आणि इथेच शिकायचे तेव्हा इथले उत्तम कॉलेज शोधू यात म्हणून कामाला लागली. प्रयत्न करून तिला एका उत्तम कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली, इथे सगळेच नवीन.. वातावरण, मित्र मैत्रिणी अगदी सगळेच!!

पण नक्षत्राने लवकरच सर्वांना आपलेसे केले आणि खूप मित्र मैत्रिणी जमवल्या.  पण आज काहीतरी विशेष घडत होतं.आज कॉलेजमध्ये पोहोचताच तिची एका नवीनच तरुणाशी नजरभेट झाली. तिनं त्याला आधी कॉलेजमध्ये पहायल्याचे आठवेना पण तरीही 'पहिल्या नजरेतले प्रेम वगरे जे म्हणतात' तसे काहीसे झाले दोघांचे!! इतका देखणा, राजबिंडा तरुण,आपल्या कॉलेजमध्ये दिसला नाही आधी की आपलं लक्ष नव्हतं कोण जाणे!! 

इकडे त्या तरुणाची ही अवस्था वेगळी नव्हती 'तिचा तो लांबसडक केशसंभार, आणि टपोरे डोळे पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला!!'

नक्षत्रा तर आज जणू तरंगतच घरी आली, कशातच लक्ष लागत नव्हते तिचे!! डोळ्यासमोर फक्त तोच दिसत होता,उद्या कधी उगवतो आणि पुन्हा तो कधी दिसतो असे झाले होते तिला!!

सकाळी नक्षत्रा नेहमीपेक्षा लवकरच तयार झाली, आई म्हणालीही तिला 'आज काही विशेष आहे का कॉलेज मध्ये?आज अधिकच सुंदर दिसते आहेस म्हणून विचारलं ग!!"

नक्षत्राने तिचे डोळे मोठे करून आईकडे पाहिले आणि हसतच बाहेर पडली. काल तो जिथे दिसला होता तिथेच घुटमळत राहिली ती,पण lecture ची वेळ होत आली तरीही तो दिसला नाही, शेवटी नाईलाजाने ती class कडे वळणार तेवढ्यात तो येताना दिसला. नक्षत्राच्या हृदयाची धडधड वाढली, तिनं उगाच वेळ काढूपणा केला, पण तोही संकोचाने पुढे आला नाही, लांबूनच तिच्याकडे पाहत राहिला.अखेर नक्षत्रा आत गेली lecture साठी.

आता हे रोजचेच झाले, दोघांनी एकमेकांना नुसते डोळे भरून पहावे आणि आपापल्या मार्गाने जावे! पण एक दिवस तो हिम्मत करून तिच्या जवळ आला, त्याच्या हातात सुंदर सुगंधी फुलांचा गुच्छ होता. नक्षत्रा मनोमन सुखावली ही होती आणि घाबरली ही होती, तो पुढे होऊन तिला म्हणाला' ही फुलं खास तुमच्यासाठी, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, आपण कॉफी घेऊ यात का एकत्र?"

त्याने विचारले मात्र, नक्षत्राला काय झाले कोणास ठाऊक' तिचे डोळेच भरून आले आणि तिथून ती निसटली.

त्याला हा प्रकार समजेना, नक्की काय झाले? ही इतकी प्रेमाने बघत होती आपल्याकडे आणि आता अचानक अशी पळून गेली!!

नक्षत्राला घरी आली तरी रडू आवरत नव्हते, कोणाला काय सांगणार होती? "जो आपल्याला आवडला तो तरुण अस्खलित बोलत होता आणि जेव्हा त्याला समजेल की मी बोलू शकत नाही तेव्हा तो असेच प्रेम करू शकेल का आपल्यावर? का त्याची फसवणूक करायची? का त्याला आपल्यात गुंतू द्यायचे? नकोच ते!! त्या पेक्षा त्याच्या पासून लांब राहिलेलेच बरे, "

आज पहिल्यांदा तिला आपल्या मुकेपणाचा इतका राग आला की बस्स!! 

तिनं त्याला विसरायचं ठरवलं, ती सगळे लक्ष अभ्यासात देऊ लागली, तो दिसायचा तिला बऱ्याचदा पण ती शक्यतो टाळायची त्याला.

अखेर एक दिवस त्याने तिला गाठलेच!! "तू अशी लांब का धावते आहेस माझ्यापासून?अजून आपण काहीही बोललो नाही त्या आधीच तू पळालीस? माझा विचार केलास , माझे काय झाले असेल तेव्हा?" त्याचे प्रश्न थांबत नव्हते, थोड्या वेळाने नक्षत्राच्या लक्षात आले की तो तोंडाने तिच्याशी बोलत नव्हताच मुळी, तिच्या सारखाच तोही sign language मध्ये बोलत होता!! एवढ्या गोंधळात ही तिला आश्चर्य वाटले की हा काय चमत्कार!! 

अखेर तो बोलला, "नक्षत्रा, त्या दिवशी तू निघून गेल्यानंतर मला समजले की तुला बोलता येत नाही, म्हणून इतके दिवस मोठ्या कष्टानं ही sign language शिकलोय, केवळ तुझ्यासाठी!! माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि त्याचा तुला बोलता येत नाही ह्या गोष्टीशी काहीही संबंध नाही!! ती गांधारी होती ना दिसत असून डोळ्यावर पट्टी बांधणारी तसाच मीही आयुष्यभर तुझ्यासाठी ह्या sign language मध्ये बोलायला तयार आहे, मला तू हवी आहेस बस्स, माझी सहचारिणी म्हणून!!"

नक्षत्राला काय करावे सुचेनासे झाले, ती स्तब्ध बघत राहिली त्याच्याकडे!

पुन्हा त्यानेच सांगितले की मी माझ्या आई बाबांना घेऊन येतोय तुझ्या घरी ,तेव्हा बोलूच..असेच!!

नक्षत्रा घरी आली, झाला प्रकार आई बाबांच्या कानावर घातला. कोण कुठला तरुण ,तो काय करतो,कोण आहे काहिही माहीत नाही आणि सरळ लग्नासाठी विचारतो म्हणजे काय!! 

पण बघू यात घरी आल्यावर, गिरीजाने ठरवले ", तो तयार असला तरीही त्याचे आई बाबा तयार हवेत ना! आपली नक्षत्रा कितीही चांगली असली तरी अशा मुलीला कोण स्विकारेल? " गिरीजाचे विचार सुरूच होते.

शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली , आणि.....

क्रमशः 

पुढील भाग

✍️ बीना बाचल

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post