हे बंध रेशमाचे भाग अंतिम

 #हे_बंध_रेशमाचे भाग अंतिम 

✍️ बीना बाचल

मागील भाग

बेल वाजताच नक्षत्रा आत पळाली.  कोण जाणे का पण आज तोच दारापाशी आला असावा असं तिला मनोमन वाटत होतं. गिरीजाने डोळ्यानेच तिला दटावले देखील, 'हा काय पोरकटपणा! दार वाजल्यानंतर दार उघडायचे की असे आत पळून जायचे!"

असो, गिरीजा दार उघडायला गेली, तिने दार उघडले तर दारात एक अतिशय देखणा तरुण आणि त्याच्या सोबत एक मध्यमवयीन स्त्री होती. "आम्ही आत येऊ का?" त्या तरुणाने गिरीजाची तंद्री भंग केली. सावरत गिरीजाने त्यांना आत येऊ दिले, दोघेही समोर सोफ्यावर बसले. गिरीजा आणि तिचे यजमान ही तिथेच बसले होते. पण हॉलमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. कोणी सुरुवात करावी हेच कळत नव्हते. गिरीजाने  त्या दोघांना नीट न्याहाळत मनात विचार केला, "हा तरुण इतका देखणा,उंचा पुरा, त्या स्त्रीशी काहीच साधर्म्य दिसत नाही. शिवाय नक्षत्रा म्हणाली होती की तो तरुण स्वतःच्या आईला घेऊन येणार होता पण ही स्त्री त्याची आई वाटावी इतकीही मोठी दिसत नाही, नक्की काय प्रकार आहे हा?"

शेवटी त्या तरुणानेच बोलायला सुरुवात केली, "नमस्कार काकू, मी इंद्रनील!" पुढचे गिरीजाला ऐकूच आले नाही.

गिरीजाला हे नाव ऐकून भांबावल्या सारखे झाले.

' रमाच्या मुलाचे नाव ही इंद्रनीलच होते ना? नक्की आठवत नाही पण बहुदा... इंद्रनीलच होते. काय अजब योगायोग आहे हा'

 तो पुन्हा बोलू लागला' काकू , मी काही महिन्यांपूर्वीच भारतात आलो. आणि ह्या माझ्यासोबत आलेल्या काकू इथे माझ्या शेजारीच राहतात. मी त्यांना आईच मानतो कारण माझ्या आई बाबांचे निधन झाले काही वर्षांपूर्वी आणि आज मी एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी इथे येणार होतो म्हणून मग कोणीतरी मोठे सोबत असावे म्हणून मी ह्यांना सोबत घेऊन आलो.

गिरीजा ह्या संवादाने थोडी सैलावली. रमाचा मनात डोकावणारा विचार तिच्या मनातून बाजूला झाला.

आता गिरीजा त्यांना चहा पाणी आणायला उठली, चहा घेऊन झाल्यावर गिरीजाच्या यजमानांनी विषय पुढे नेला, "बेटा, एक पाहुणा म्हणून आम्ही तुझे स्वागत करतो पण तू जे नक्षत्राशी बोलला आहेस त्या बाबत आता आपण सविस्तर बोलायला हवे. हे बघ तू कोण आहेस? कुठून आलास? तू जगण्यासाठी काय उद्योग धंदा करतोस?तुला आमची नक्षत्रा कुठे भेटली? तिची सगळी माहिती आहे का तुला? असे कितीतरी प्रश्न आमच्यासमोर आहेत.

शिवाय एका' विशेष' मुलीचे आई बाबा म्हणून आमची काळजी थोडी जास्त आहे.

तुझ्याशी सविस्तर बोलल्या शिवाय आम्हाला कुठल्याही निष्कर्षापर्यंत येता येणार नाही.

तेव्हा तू प्रथम तुझी सगळी माहिती सांग."

इंद्रनील पुढे बोलू लागला, "काका, तुमचे सगळे प्रश्न अगदी रास्त आहेत आणि मला ही मनात कसला ही किंतु न ठेवता तुम्हांला सगळे काही व्यवस्थित आणि खरे सांगायचे आहे"

गिरीजा , तिचे यजमान आणि आतल्या खोलीत दारात उभी असलेली नक्षत्रा तिघेही सावरून बसले.

इंद्रनील पुढे काय सांगतो हे ऐकण्यासाठी ते आतुर झाले.

इंद्रनीलने शेजारी बसलेल्या बाईंना खूण केली आणि त्या इंद्रनीलच्या मदतीला पुढे झाल्या.

"काका, काकू सगळी माहिती सांगण्यापूर्वी मला तुम्हांला एक सत्य सांगायचे आहे, असे म्हणून त्याने त्याचा उजवा पाय वर घेतला, त्या पायकडून पॅन्ट थोडी वर घेतली आणि स्वतःचा कृत्रिम पाय अलग केला. हा प्रकार पाहून गिरीजा आणि तिचे यजमान घाबरलेच!! हे आपल्या समोर काय घडतंय त्यांना सुचेनाच.....


गिरीजा आणि तिचे यजमान त्याला मदत करण्यासाठी पुढे झाले पण तो म्हणाला, "काका-काकू , डोन्ट वरी, मी आता बऱ्यापैकी शिकलोय हे सगळे manage करायला! हे सगळे सांगण्यासाठीच तर मी आज घरी आलोय"

काका काकू ऐका, "मी जन्मापासूनच परदेशात होतो, तिथेच लहानाचा मोठा झालो. माझे शिक्षण ही तिथेच झाले.असेच आमचे आयुष्य एका संथ गतीने पण अगदी सुरळीत सुरू होते.

एक दिवस आम्ही असेच तिघेही आमच्या गाडीने बाहेर पडलो, आणि अचानक एका भरधाव गाडीने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली, अपघात इतका जबरदस्त होता की माझे बाबा जागेवरच गेले , मी आणि आई गाडीत अक्षरशः अडकून पडलो होतो पण आम्हाला medical help मिळाली, पण गाडीची अवस्था इतकी वाईट होती की त्यातून बाहेर काढेपर्यंत माझा उजवा अर्धा पाय पूर्ण चिरडला गेला होता आणि नंतर operation करून तो कापवाच लागला. आईला जबरदस्त धक्का बसला होता, एक तर बाबा असे अचानक गेले आणि मीही पाय कापल्याने कित्येक दिवस जागेवर पडून, तीही एका जागी झोपून.

आमच्या घराचे होत्याचे नव्हते झाले. माझी आई दिवस न रात्र अश्रू गाळायची , ती जवळजवळ डिप्रेशनमध्येच गेली होती. तिच्यासाठी मी मनाची तयारी केली आणि हळूहळू उठून बरा झालो, पुढे मी हा artificial limb वापरून पूर्ववत होऊ बघत होतो, सुरुवातीला फार त्रास झाला पण माझ्याकडे पर्याय नव्हता, आईसाठी मला हे करावेच लागणार होते, माझ्याकडे बघून तीही थोडी उभारी धरू लागली, पण ती मध्ये अधे 'गिरीजा, गिरीजा' अशा हाका मारायची.

हे नाव मी पूर्वी तिच्या तोंडून कधीच ऐकले नव्हते. एकदा मी तिला विचारले, "आई,गिरीजा कोण आहे?तू सतत का नाव घेतेस हे? "

तेव्हा माझी आई अक्षरशः रडू लागली, "बेटा, मी खरं तर हे फार पूर्वी सांगायला हवं होतं तुला, पण माझा स्वभाव आड आला, फार चुकीची वागले मी तिच्याशी." असे म्हणत तिनं तुम्हा दोघींची घट्ट मैत्री, तुम्ही pregnent असताना मजेने ठरवलेले तुमचे गुपित आणि नंतर तुमची मुलगी बोलू शकत नसल्याने तिने जाणून बुजून तुमच्याशी तोडलेले संबंध... सगळं सगळं सांगितले तिने. पुढे असेही म्हणाली, "इंद्रनील, ज्या लेकराचा काहीही दोष नसताना निसर्गाने तिला वाचा दिली नाही ह्यात दोष कुणाचा? आज तुझा एक पाय गेल्याने ही गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय मला, तुझा तरी काय दोष होता रे पण हे सगळे तुझ्या नशिबात आले , गिरीजाला किती वाईट वाटले असेल मी तिच्याशी अशी वागली असेन तेव्हा! एक दिवस एकमेकांशिवाय निघायचा नाही आमचा आणि इथे मी वर्षानुवर्षे तिच्याशी बोलणे टाळले. तिची मुलगी वाढवताना काय काय सहन करावे लागले असेल तिला, किती गरज असेल तेव्हा तिला माझी, पण मी अशी निष्ठुर वागले, कदाचित म्हणूनच म्हणूनच देवाने मला ही शिक्षा दिली"

"आई काहीतरी बोलू नकोस, तू वागलीस हे चूकच पण त्याचा ह्या घडल्या गोष्टींशी संबंध जोडू नकोस, तुला तिची आठवण येतेय ना मग  तू बोल तिच्याशी , तुला नक्की बरं वाटेल."

म्हणून मग तिनं तुम्हांला फोन केला, पण तेव्हा तुम्ही तिचा फोन घेतला नाहीत . ती काय ते समजली. पुढे पुढे तिने ही गोष्ट फार मनाला लावून घेतली, एक दिवस मला जवळ बोलावून म्हणाली, "बेटा इंद्रनील, मी माझे वचन पूर्ण करू शकले नाही , ते पूर्ण करशील का?"

मी साफ नकार दिला. जिला मी कधीही पाहिलेही नाही, तिच्याशी लग्न!! शक्यच नाही. फार फार तर मी भारतात जाऊन त्या familyची मनापासून माफी मागेन , पण लग्न वगैर मला जमणार नाही. मी असे वचन देऊ शकत नाही. आई मला माफ कर ग.

ती फार काही बोलली नाही, आणि एक दिवस झोपेतच ती .....

गिरीजाचे अश्रू थांबत नव्हते हे सारं ऐकताना, तिला एक हुंदका आला, तिच्या यजमानांनी तिला सावरले.

इंद्रनील पुढे बोलू लागला, "काकू मी भारतात आलो ते तुम्हा सर्वांची माफी मागण्यासाठी!! पण नक्षत्रा ज्या कॉलेज मध्ये शिकते तिथेच माझा एक मित्र होता त्याला भेटण्यासाठी म्हणून तिथे गेलो आणि तिथेच नक्षत्रा दिसली, तिला पाहता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. मग रोज तिला बघण्यासाठी मी तिथे जाऊ लागलो. पण माझे हे अचानक आलेले अपंगत्व मला पुढे जाऊ देत नव्हते, पण अखेर एक दिवस मी हिम्मत करून तिच्या समोर आलो, पण तेव्हा हीच तिथून निघून गेली. मग मी चौकशी केल्यावर मला समजले की नक्षत्रा बोलू शकत नाही कदाचित म्हणून तीही ह्या प्रेमाचा स्वीकार करत नसावी. मी निश्चय केला की आपण नक्षत्रा चे प्रेम मिळवायचेच ! मी त्या साठी sign language शिकलो , खूप मेहनत घेतली. माझे भारतातले वास्तव्य वाढवले तिच्यासाठी.

अखेर मी तुमच्या घराचा पत्ता शोधला आणि मला  आश्चर्याचा धक्का बसला!! आईच्या डायरी मधून जो पत्ता मी घेऊन आलो होतो तोच हा पत्ता होता!! काकू माझ्यावर विश्वास ठेवा इथे येईपर्यंत मला ठाऊक नव्हते की आईने सांगितले ले कुटुंब ,ती मुलगी हे सगळे तेच आहेत.

मी फक्त नक्षत्रा मनापासून प्रेम केले, त्या मागे कसलाही हेतू नाही.ती जशी आहे तशीच ती मला आवडली आहे.तिचा मुकेपणा आमच्या आयुष्यात कधीच अडथळा आणू शकणार नाही. मी वचन देतो की तिला खूप जपेन,कधीही दुखावणार नाही.हा आता त्यासाठी तुम्हाला माझे हे अपंगत्व मान्य असेल तरच...."

इंद्रनील बोलायचा थांबला, 

इकडे गिरीजा, तिचे यजमान आणि गिरीजा तिघांचे डोळे वाहत होते. गिरीजाला तर शब्दच सुचत नव्हते. आपली मैत्रीण चुकली पण आपण ही तिच्या बाबत खूप अन्याय केला. जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी तिच्याशी बोलले देखील नाही. त्या दिवशी तिचा फोन घेतला असता, तिच्याशी बोलले असते तर आज कदाचित ती आपल्यात असती. छे फार चुकले माझे!! तिला स्वतःचा राग येत होता.

शेवटच्या दिवसात का होईना पण रमेला तिच्या वागण्याचा पश्चताप झाला होता. आता माझी जबाबदारी आहे की मी तिला, तिच्या ह्या मुलाला माफ करावं आणि आपणही त्यांची माफी मागावी.

गिरीजा पुढे सरसावली, ' इंद्रनील बेटा, आम्हाला ही माफ कर. मी एवढी जिवलग मैत्रीण असूनही रमेची,तुझ्या आईची मदत करू शकले नाही बाळा, माफ कर बेटा"

गिरीजाने आपल्या यजमानांकडे पाहिले ,ते पुढे येऊन म्हणाले, "इंद्रनील ,अरे तू आणि नक्षत्राने एकत्र यावे हा कदाचित ईश्वरी संकेतच असावा, बघ ना तू काहीही न ठरवता देखील नियतीने तुला आणि नक्षत्राला एकमेकांसमोर आणून उभे केले आहे, तेव्हा तुम्हा दोघांच्या एकत्र येण्याला आमची पूर्ण संमती आहे."

इंद्रनील पुढे होऊन त्या दोघांना वाकून नमस्कार करावा म्हणून आला तर त्याचा तोल गेला पण तेवढ्यात नक्षत्रा आतून धावतच आली आणि तिने त्याला सावरले.

गिरीजाने नक्षत्राला पुढे होत सांगितले, "नक्षत्रा अशीच जन्मभर एकमेकांना साथ द्या, हे रेशमी बंध नाजूक असतात हो पण एक दुसऱ्यांच्या साथीने ते मजबूत होतात, अशीच एक दुसऱ्याची उणीव भरून काढा,आणि सुखी राहा"

अखेर रमा आणि गिरीजाने गमतीत ठरवलेला हा ' बालविवाह' खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेला.

गिरीजाने देवापुढे दिवा लावला आणि हात जोडले, "देवा, लेकरांना सांभाळ. त्यांचा संसार सुखाचा कर" मनापासून हात जोडताना गिरीजला रमा ही आपल्या बाजूला उभी राहून देवाला हात जोडतेय असा भास झाला.

समाप्त

सौ बीना समीर बाचल

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

2 Comments

  1. अप्रतिम कथा आहे

    ReplyDelete
  2. खुप च सुंदर आहे!

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post