गुरुदक्षिणा

 गुरूदक्षिणा 

✍️ रश्मी कवीश्वर पिंप्रीकर

आर्या  !! उठ ग लवकर...सकाळ चे साडे नऊ वाजत आले....वंदना ने लेकी ला आवाज दिला. दहावी ची परिक्षा नुकतीच आटोपली होती, सुट्ट्या सुरू होत्या, त्यामुळे निवांत होता. 

उठ बरं लवकर ,आज काय करू स्वयंपाक? ये मदती ला....

वंदना च असं पक्क मत होतं कि मुलगा असो केव्हा मुलगी, गरजे पुरता स्वयंपाक आलाच पाहिजे. एकटी रहायची वेळ आली तर, कसं होणार?  सतत बाहेरच खाणे ही योग्य नाही. 

आई, झोपू दे गं  !! दोनच तर दिवस झाले आहेत परिक्षा संपून...डोक्यावर पांघरूण घेऊन आर्या परत झोपली. 

त्यात भर म्हणजे, आर्या चे वडिल...शरद राव, ते ही म्हणाले, अग..झोपू दे, कालच तर परिक्षा संपली, शिकेल ती, काय घाई आहे? 

वंदना बडबड करत होती, खूप लाडावून ठेवलंय लेकी ला, हो नाही करता करता, आता दिवस जातील...जर तिनं कधी केलंच नाही तर तिला येईल कसं?  पण माझं कोण ऐकतेय...हा, वाद संवाद नेहमीचाच झाला होता जणू काही. 

तरी पण लहान सहान कामे, आर्या च्या सवडीने, वंदना करून घ्यायची.

वंदनाचा मुलगा, मोहित तो देखील इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षा ला, या वर्षी कॅम्पस इन्टरव्यूह मधे सिलेक्शन झालं आणि नोकरी मिळाली. 

मोहित ला पण वंदना ने कुकर लावणे, भाजी चिरणे आणि करणे, सैंडविच बनवणे, स्वतः पुरते कणिक भिजवणे, पोळ्या लाटणे....गोल झाल्या नाही तरी चालेल, येतील हळू हळू....या अनुषंगाने शिकवले कि उद्या नोकरी निमित्त एकटी रहायची वेळ आली तर गैरसोय व्हायला नको. त्याने देखील हे सर्व आनंदाने आत्मसात केलं.

वेळ आणि वर्ष पुढे सरकत होते. दुसरी कडे आर्या ला सी. ए .व्हायचं होतं. बारावी ची परिक्षा, आर्या नव्वद टक्के नी उत्तीर्ण झाली. वंदना आणि शरद रावां ना खूप आनंद झाला. 

आर्या ने काॅलेज मधे एडमीशन घेतली आणि संध्याकाळी सी. ए.च्या कोचिंग क्लास करता जायची, त्यामुळे घरी आल्यावर खूप दमून जायची. 

वंदना, रविवारी आणि सुट्टी च्या दिवशी, तिला खूप सांगायची कि....अग, अमुक एक भाजी अशी करतात, ये माझ्या सोबत येउन उभी रहा आणि बघ...तुला समजेल. 

वंदना पण कमाली ची जिद्दी आणि चिकाटी ची होती. ती पण आर्या ची वेळ आणि मूड पाहून गोडी गुलाबी ने, स्वयंपाकाच्या लहान सहान गोष्टी सांगत रहायची.

कधी कधी तर, आर्या पण दाद द्यायची नाही. क्लासेस आहे...परिक्षा आहे...सबमीशन आहे म्हणून पळ काढायची. नाहीतर शरदराव जोडी ला असायचे.... करेल ग ती  !! किती अभ्यास असतो, आता आपल्या वेळेस सारख नाही राहिले....असं म्हणून आर्या ची साथ द्यायचे.

बघता बघता, दिवस आणि वर्ष संपत होते...लेक मोठी होत होती. मोहित ला पण नोकरी लागली आणि तो त्याच्या कामात व्यस्त झाला. 

दुसरी कडे आर्या, सी. ए. पास झाली आणि मुबंई ला एका फर्म मधे नोकरी मिळाली, घरातल्या सर्वानं ला खूप आनंद झाला. 

मुंबई ला जायची तयारी सुरू झाली, वंदना ला वाटलं ही तर आयती संधी चालून आली आहे, वाया घालवायची नाही. शरद राव, वंदना आपल्या लेकी सह मुंबई करता निघाले.

एका नातेवाईकांन कडून ओळखी ने बोरीवलीत भाड्याने घर घेतलं. आर्याच ऑफिस मुबंई सेंट्रल ला आहे.सोमवार पासून आफिस सुरू होणार तर,आदल्या गुरुवारी तिघं ही बोरीवलीत पोहचले. तीन-चार दिवस घर लावण्यात गेले. 

लोकल चा प्रवास सुरू होणार होता. हे, तरूण वय ...जग जिंकायचे स्वप्न पाहण्यात, आर्या च्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू होणार होता. 

नवीन जागा, माणसं, शेजारी, आफिस  या सर्वांनशी ताळमेळ बसवायला तिला वेळ लागेल, हे वंदना जाणून होती...म्हणून वंदना महिनाभरा च्या मुक्कामा साठी आली होती. शरद राव लगेच पंधरा दिवसांनी वापस गावी जाणार होते, कारण घरची आणि शेती ची बरीच कामं खोळंबली होती.

शेजारी रहात असलेले जोशी कुटुंबाची, वंदना ची आता ओळख झाली होती. त्यांनची मुलगी विनया, पण नोकरी करत होती. मुंबई सेंट्रल यायच्या एक स्टेशन आधी, ती उतरणार होती...त्यामुळे दोघींना एकमेकीं ची सोबत होती. आर्या ला बोरीवली ते मुबंई सेंट्रल लोकल चा प्रवास करायचा होता, कसं होणार लेकीचं? जमेल का तिला? या काळजीत वंदना आणि शरद राव होते. 

आफिस करता निघालेली आर्या ,मनात धाकधूक होती...कसे जाऊ आपण, लोकल सुटून तर जाणार नाही नं ,पळापळ होईल का आपली?  या सर्व गोष्टी मनात येत होत्या. विनया सोबती ला होती, म्हणुन थोडा धीर होता. 

स्टेशन वर आल्यावर, अमाप गर्दी पाहिल्यावर थोडी बावरलीच आर्या .लहान शहरात वाढलेली, कधी योवढी धावपळ केली नाही, शाळा, कॉलेज आणि अभ्यास या व्यतिरिक्त काही जग नहव्त. 

विनया ने तिचा हात घट्ट धरला होता, गाडी आल्यावर खेचत तिला डब्यात चढविले आणि मग आर्या ला अगदी हुश्श झालं. हा एक टप्पा पार पडला, आता स्टेशन वर उतरायची मोहिम फत्ते करायची होती. विनयाचं स्टेशन आलं आणि ती उतरली, आणि वीस मिनीटांनी मुबंई सेंट्रल वर आर्या उतरली. स्टेशन हून वीस मिनिटां च्या अंतरावर आफिस होतं.

आफिस मधे पोहचल्यावर, ताबडतोब तिनं घरी आई ला वाॅट्सएप वर मैसेज केला कि मी सुखरूप पोहचले, काही त्रास झाला नाही,लंच टाईम मधे फोन करेन, बाय.....

वंदना आणि शरद राव याच मैसेज ची वाट पाहत होते, आता दोघांनच्या जीवात जीव आला...चला लेक सुखरूप पोहचली. दोन दिवसांनी शरदराव घरी परत जाणार होते,वंदना चा मुक्काम आजून पंधरा दिवस होता. 

संध्याकाळी झाल्यावर दोघं ही आर्या, आफिस मधून यायची वाट बघत होते. कसा गेला असेल दिवस? हिला जमलं असेल का? नविन लोकं, जागा...काय म्हणते आर्या?  या कडे दोघांनच लक्ष लागले होतं. 

त्योवढयातच आर्या आली आणि खूप दमली होती. थोडक्यात तिनं सांगितल कि दिवस चांगला गेला, आज पहिला दिवस म्हणून सर्वानंच्या ओळखी झाल्या, आज जास्त काम दिलं नाही...पण उद्या पासून जोमात सुरुवात होणार.

चला, होईल हळू हळू...नवीन आत्मसात करायला थोडा वेळ लागतोच,तु तर आज लोकल ची मोहिम फत्ते करून आली, त्यातच सगळ आलं ...शरद राव म्हणाले. 

दोन दिवसांनी शरद राव गावी गेले. आता घरी वंदना आणि आर्या दोघीच असायच्या, त्यात आर्या आफिस ला गेल्यावर, वंदना असायची. जोशी कुटुंबा शी आता जवळीक झाली होती. त्यांना तिनं काळजी पोटी, आमच्या आर्या कडे लक्ष असू द्या, असं सुचविले. मी तर काय दहा-बारा दिवसांनी घरी परतेन. जोशी कुटुंबानी देखील आपलंसं केलं होतं, त्यामुळे कुठेतरी मनात एक समाधान होतं.

आर्या ला थोडं का असेना पण स्वतः पुरते स्वयंपाकातील समजायचं, आता आपल्यालाच करावे लागेल, या हेतु ने रोज काही न काही करू लागली. स्वतः चा डबा करून घेऊ जाऊ लागली. हे पाहून वंदना ला समाधान वाटायच. यूट्युबवर पाहून नवीन काही शिकायचे,प्रयत्न करू लागली....आणि शेवटी वंदना महिन्या भरा चा मुक्काम संपवून वापस घरी परतली. 

रोज फोन वरून गंमती जंमती समजत होत्या, कधी पदार्थ जमायचा तर कधी फसलेला पण आर्या चे प्रयत्न सुरूच होते. अधूनमधून जोशी कुटुंबा कडून समजायचे कि आर्या ने आज अमुक भाजी छान केली ,तेव्हा कुठे समाधान वाटायच. 

आता पाहता पाहता तीन महिने झाले मुबंईत येउन, आर्या चांगलीच रमली...नवीन जागा आणि तिथल्या परिस्थितीशी छान जुळवून घेत होती. 

अचानक कोविड पेनडेमिक च्या बातम्या येत होत्या. लाॅकडाउन होणार, या बातम्या टीवी वरून समजत होत्या. वंदना ला आता काळजी वाटू लागली. 

संध्याकाळी आर्या चा फोन आला कि फर्म नी त्यांना थांबायला सांगितल आहे, नंतर काय घडेल त्यावर निर्णय होईल, तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करायचे आहे. 

आर्या, आता घरूनच काम करू लागली. तिच्या सोसायटीत ओळखी वाढू लागल्या, बर्‍याच मैत्रिणी जमल्या. 

दोन महिन्या नंतर, वंदनाच्या फोन वर मैसेज आला कि मी संध्याकाळी सहा वाजता विडीयो काॅल करेल, तुम्ही दोघं ही हजर रहा...बाय.

ठरल्या प्रमाणे आर्या चा काॅल आला,मला तुम्हा दोघांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे, हे बघा...मला ट्रॉफी मिळाली ,मी इथल्या सोसायटीच्या कार्यक्रमात भाग घेतला...पाककला स्पर्धा होती, वयगट  18-25  ,यात माझ्या कृति ला पहिलं बक्षीस मिळालं....

वंदना आणि शरद राव अगदी भारावून गेल्या सारखे ऐकत होते. वंदना च्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते, आज खऱ्या अर्थाने लाडोबा लेक नी गुरूदक्षिणा दिली होती, ज्या साठी वंदना ची तळमळ होती, त्या परिक्षेत वंदना ही पास झाली होती. 

सौ.रश्मी कवीश्वर पिंप्रीकर 


वरील कथा रश्मी पिंप्रीकर यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


Post a Comment (0)
Previous Post Next Post