अदिती.....
✍️ योगेश साळवी
दरवाज्याची बेल वाजली तशी अदितीने कचऱ्याची बादली दाराशी ठेवली. दार बंद करताना कुणीतरी रोखून आपल्याकडे पाहिलं असं तिला वाटलं. नकळत तिचा हात गळ्याच्या ...मानेच्या जवळ गेला. सकाळच्या घाईच्या वेळी आता तिच्या लक्षात आलं की निळ्या रंगाचा नवीनच घेतलेला तिचा गाऊन हा बंद गळ्याचा नव्हता. खरंच सकाळच्या या गडबडीच्या वेळी लक्षातच आलं नव्हतं की.. वाकताना गळ्याजवळ हात ठेवायला पाहिजे होता. घाईघाईत स्वतःचे सारं काही आटपून चिन्मयची पण लगोलग तयारी करणं.. शाळेत जाण्यासाठी.. आणि मग पवईला असलेलं हॉस्पिटल गाठणं म्हणजे तारेवरची कसरतच होती. तिने तेवढ्यात स्वतःकडे आरशात पाहिलं.. विस्कटलेले केस... चुरगळलेला गाऊन... कदाचित काल थोडी जास्त झोप झाल्यामुळे सुस्तावलेले डोळे.. सकाळी अगदी अवतारात असतो आपण... अदिती स्वतःशीच म्हणाली.
त्यांच्या सोसायटीच्या प्रत्येक मजल्यावर तीन फ्लॅट होते. त्यापैकी दोन फ्लॅट समोरासमोर यायचे... म्हणजे अदितीच्या फ्लॅटच्या समोर एक फ्लॅट आणि त्या दोन फ्लॅटच्या मध्ये अजून एक फ्लॅट अशी एकूण रचना होती .
अदितीच्या घरी कोणी दार उघडलं.. आणि नेमकं त्याच वेळेला समोरच्या ब्लॉकचं दार उघडलं गेलं तर घरातल्या माणसांना समोरच्याच्या हॉलमधलं दर्शन व्हायचं. नव्वद सालाआधी बांधल्या गेलेल्या बऱ्याच सोसायट्या त्या काळात अशाच बांधल्या जायच्या. मघाशी कचऱ्याची बादली बाहेर ठेवताना अदिती वाकली तेव्हा पांढऱ्या रंगाची बनियन आणि लुंगी घातलेली कोणी व्यक्ती दारात उभी असलेली तिला अस्पष्टसं आठवलं.
आपण हल्ली फारच विचार करतो लहान सहान गोष्टींचा... अदिती मनातल्या मनात म्हणाली. कौस्तुभने पांच वर्षांपूर्वी अमेरिकेहून मेल केला होता की त्याला आता भारतात तिच्याकडे परत येणे शक्य नाहीये म्हणून... तेव्हापासून विचार करायची सवय तिला लागूनच गेली होती. नंतर पुढे त्या अनुषंगाने त्याने फोनही केला होता... की वाईट वाटून घेऊ नकोस... सध्या त्यांने कामात स्वतःला वाहून घेतले आहे... कसलं तरी मोठं पुस्तक पण लिहितोय.. त्यासाठी जरा फोकस ची आवश्यकता आहे अशा अर्थाचा... तेव्हापासून अदितीच्या डोक्यात भलते सलते विचार येऊ लागले. फार हळव्या झालो का आपण.?
... कौस्तुभ आणि तिचा प्रेम विवाह .कौस्तुभ उच्चशिक्षित.. विज्ञानात डॉक्टरेट मिळवलेला आणि अदिती तर डॉक्टर झालेली. पवईला एका नामांकित इस्पितळात अप्रेंटिसशिप करत होती तेव्हा... तिच्या उमेदवारीच्या त्या कालखंडात तीच मागे लागलेली कौस्तुभच्या की लग्न करू आपण म्हणून... कौस्तुभ तेव्हा ही संशोधनात बुडून गेलेला असायचा. शेवटी लग्न झालं... अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने.. मग वर्षभरात चिन्मय चा जन्म झाला. चिन्मय चा जन्म कौस्तुभ ला अगदी भाग्यशाली वाटला. त्यानंतर दोन एक महिन्यात त्याला अमेरिकेतून कोण्या संशोधन करणाऱ्या कंपनीतून मोठ्या पगाराची आणि अधिकार पदाची ऑफर आली. अदिती आणि तिच्या घरचे सर्वजण आई ,बाबा , तिचा भाऊ... छोट्या चिन्मयला बरोबर घेऊन कौतुक आणि विमानतळावर निरोप द्यायला गेलेले.. सहा महिन्यांनी सुट्टीवर परत येणार असलेला कौस्तुभ नंतर गेली सहा वर्ष परत तिला प्रत्यक्ष भेटलाच नव्हता.
नको ती आठवण.. अजून सगळी तयारी व्हायची आहे आणि पवई गाठायची आहे. अदितीची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू झाली.
" आई ग झाला का डब्बा..? " तिने आईला विचारलं. कौस्तुभ गेल्यानंतर.. मग त्याची यायची शक्यता धुसर झाल्यावर तिची आई आणि बाबा आधी तिच्याकडेच राहायला आले होते.
" हो ग बाई,.. आधी आंघोळ आटप त्यालाच तासभर लागतो तुला..." आई स्वयंपाक घरातून बोलली.
आपलं सारं आटपून आदिती घराबाहेर पडली तेव्हा सकाळचे पावणेदहा झाले होते. अकराची ड्युटी होती. इस्पितळाने आता तिला कायम केलं होतं.. तसेच अधिकारात आणि इतर भत्त्यात वाढ दिली होती. तरी अजूनही आपल्या स्कुटीवरूनच ती मुलुंड वरून पवईला जायची. एकदा तिथे पोहोचली की मात्र ड्युटीवर वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही. घरून आईने निगुतिने दिलेला डबा पण कधी कधी खायला वेळ मिळायचा नाही.
आजही ती संध्याकाळी साडेसातला काम आटपून घरी निघाली ती साडेआठच्या सुमारास घरी पोहोचली. स्कुटी पार्क करून ती जिने चढू लागली .. इतक्यात समोरच्या फ्लॅट मधला तो सकाळचा गृहस्थ जिन्यावर दिसला.
"आता येता हो कामाहून...बरोबर आहे ट्रॅफिक भरपूर असणार यावेळी ".. त्याने विचारले.
ओळखपाळख नीटशी झालेली नसताना केवळ आपण समोरच्या घरात राहतो हा धागा पकडून त्याचे चौकशी करणं तिला जरा अगोचरपणाचं वाटलं.
" हो.. काय करणार.." असा अगदी मोघम बोलत असल्यासारखं दाखवून ती बाजूने वर निघून आली.
सकाळी दाराला लावलेली दुधाची पिशवी आत घेताना समोरचे दार नेमकं उघड होतं. तोच कालचा काळा माणूस तोंड वेंगाडत हसत होता. अदिति त्याची दखल घेतल्यासारखं करून दार बंद करणारच होती इतक्यात...
" मिस्टर दिसत नाही तुमचे...? इथे नसतात वाटतं..."
अदितीच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहत त्याचा सावध प्रश्न आला.
" ते परदेशात असतात.." एक जुजबी उत्तर देऊन आदितीने दार लावून घेतलं. नेमकं आपली दार उघडण्याची वेळ आणि तो समोर येण्याची वेळ एकच असावी या योगायोगाचे तिला नवलच वाटलं.
" अग आई कोण आपल्यासमोर आलाय हा उपटसुंभ माणूस...? सारखा फालतू चौकशा करत असतो.." डोक्यात तिडीक जाऊन तिने विचारलं.
" अग तो शेलार... भोळे काकांनी भाड्यावर ठेवलाय भाडेकरू म्हणून... त्याच्या बायकोशी कालच बोलणं झालं माझं..." आई म्हणाली.
"हो पण किती चौकशी करत असतो..." शेलार आदितीच्या चांगलाच डोक्यात गेलेला दिसत होता.
"असते काही जणांची सवय अघळ पघळ बोलायची. तू नको त्रास करून घेऊ..." आई समजावणीच्या सुरात म्हणाली.
आदिती संध्याकाळी घरी आली तेव्हा शेलार दार उघड ठेवून उघडा लुंगी वर बसून दात कोरत खुर्ची टाकून बसलेला आढळला.
" वहिनी.. कधी कधी ..चहाला बोलवा आम्हाला ..म्हणजे त्या निमित्ताने ओळख वाढेल."
आदिती दाराजवळ उभी राहून दार कधी उघडले जाईल याची वाट पाहत असताना शेलारने तिच्याशी बोलायची संधी साधली.
पुढे मग अशा अनेक संध्या शेलार स्वतः निर्माण करू लागला. कधी जिन्यात ती वर चढत असताना उगाचच मध्ये वाट अडवून काहीतरी बोलायचा प्रयत्न करू लागला. कधी स्कूटी पार्किंग मधून काढायच्या वेळी हा नेमका तिथे उभा असे. तिच्या कडे बघून लोचटासारखा हसे. नक्कीच या ना आधी तिचा नवरा तिच्याबरोबर कित्येक वर्षापासून नसतो ही माहिती मिळवली असणार.
अदितीला या सगळ्याचा त्रास होऊ लागला. तिला भोळे काका आणि काकू आठवल्या. कोणाच्या अध्यात नाही का मध्यात नाही. चिन्मय अगदी लहान असताना त्यांच्याकडेच पडीक असायचा. चिन्मयला आवडतो म्हणून गोडाचा शिरा,,तर कधी शेवया.. खीर लापशी वगैरे घरी आणून द्यायच्या काकू. पण कधी त्यांनी एका वाक्यानेही कधी आदितीच्या नवर्याबद्दल विचारलं नव्हतं. नव्हे.. ते त्यांच्या स्वभावातच नसणार... मग पुढे त्या अनुषंघाने येणारे खोचक प्रश्न तर फार दूरची गोष्ट होती. काका काकूंनी कधी चौकशी केली तर अदितीच्या आई-बाबांच्या प्रकृतीची ..नाहीतर चिन्मय शाळेला जाऊ लागल्यावर त्याच्या शाळेची चौकशी ते करत... म्हणूनच त्यात वावगे कधीच वाटलं नव्हतं कुणाला.
वर्ष सहा महिन्यापूर्वी भोळे काका काकू नागपूरला गेले... त्यांच्या मुलाकडे. तेव्हापासून त्यांचा ब्लॉक रिकामाच होता... आणि आता हा शेलार येऊन महिना दोन महिन्यातच डोईजड होऊ लागला होता.
शेलार विषयी एक अनामिक भीती अदितीच्या मनात झिरपू लागली. नेहमी अगदी वेळेवर तर कधी उशिरा कामावर निघणारी अदिती शेलारला टाळायला खूप लवकर कामावर निघू लागली. मुद्दाम उशिराने घरात परतू लागली. स्कुटी बाहेर काढताना पण ती आधी ढकलत ला मंत्रावर घेऊन जाईल आणि मग सुरू करे... आवाज होईल म्हणून. रात्री आपण आल्याचं शेलारला कळू नये यासाठी मग लांब स्कुटी बंद करायची आणि मग आवारात ढकलत आणून पार्क करायची. स्वतःहून तिने कधी दार उघडलं तर पटकन बंद करायची.
अदिती स्वतःशीच विचार करू लागली... शेलार पासून कशी सुटका करायची... दादाला.. मनोज ला सांगायचं का... पण तो आहे जन्मजात सज्जन माणूस... तो काही बोलला तर बरं... नाही तर वर आपल्यालाच दुर्लक्ष करून बघ म्हणुन सांगायचा. आणि असं बघ... शेलार पासून एक वेळेस सुटका होईल तुझी.. पण बाहेर असे अनेक शेलार आहेत जे तुझ्यावर डोळे ठेवून असणार आहेत... त्यांचं काय? कौस्तुभ ने तिला तो येणार नसल्याचे कळवले होते तेव्हा तिला रागच आलेला होता त्याचा एकदम. अरे भाडखाउ येऊ शकत नाही म्हणजे काय...? कुठल्या मुलीत गुंतला आहेस का...? का माझा कंटाळा आलाय... तसं असेल तर रीतसर काडीमोड घे की... असं अधांतरी का जीव टांगणीला लावून ठेवलास... नवरा बरोबर दिसत नाही म्हटल्यावर तिच्या अनोळखी माणसांच्या नजरेत सुद्धा तिच्याबद्दल प्रश्न दिसू लागले होते. ओळखीचे लोक तर तिला विचारायचेच खोदून खोदून ती कौस्तुभ कधी येणार.. त्यातल्या काहींनी तर दुसरा लग्नाचा पर्याय पण अजमावून
पाहायला सांगितलेला. त्या ओघात दोन-तीन बीजवर स्थळही चालून आलेली. पण गळ्यात एक मूल असलेली परित्यक्ता स्त्री लग्नाच्या बाजारात उभी राहिलेली पाहून... अटी आणि शर्तींची पण बोली लागू लागली... आणि पुढे पुढे तर तिला तिटकारा येऊ लागला या सगळ्याचाच.
रविवारची संध्याकाळ होती. चिन्मय दूध पिऊन खाली खेळायला गेला होता. आई बाबा कुठल्या लग्नाला का तशाच समारंभाला गेलेले. आदितीने मनाशी ठरवलं. घरच्याच गाऊन वर असताना शेलारच्या घरची बेल वाजवली. दार उघडलं गेलं. शेलारची बायको दारात उभी होती.
" आहेत का घरात...? " बायकोला लगेच कळलं की कोणाला विचारत आहे ते.
" हो आहेत ना... या या आत या.."
अदिती आत आली आणि सोफ्यावर बसली.
शेलारच्या दोन मुली आणि मुलगा काहीतरी टीव्हीवर पाहत बसले होते. आदिती घरात येताच उठून उभे राहिले. शेजार पण उघडा लुंगी वर बसला होता... त्याला बायको ने आत जाऊन शर्ट घालून यायला पिटाळले.
थोड्या वेळाने शेलार बाहेर हॉलमध्ये आला आणि तिच्यासमोर बसला.
" मी आदिती देशपांडे .आज मोकळा वेळ मिळाला म्हणून भेटायला आली तुम्हाला." आदिती शेलारच्या डोळ्याला डोळा भिडवत म्हणाली.
शेलार चांगलाच भांबावला होता. आदिती आता कसला स्फोट करेल याची वाट बघत डोळे मोठे करून पाहत राहिला.
" मी एमबीबीएस केलं... मुंबई युनिव्हर्सिटी मधून.. गायनॅकॉलॉजी स्पेशलिटी आहे माझी. पवई ला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. " अदिती भराभर बोलू लागली. शेलार ऐकत होता.
"तुम्ही कुठे काम करता.. काय शिक्षण झाले तुमचं?" अदिती ने शेलारला चांगलाच फैलावर घेतला.
मग शेलारने तोंड उघडलं. तो जेमतेम नववी पास होता. त्याचे बाबा लवकर वारल्यावर त्यांच्या जागी लिफ्टमन म्हणून त्याची वर्णी लागलेली मंत्रालयात... अनुकंपा तत्त्वावर.
मग एखाद्या फोलफटाला पाहाव तसं शेलार कडे पाहत अदितीने त्याला सर्व विचारून घेतलं. शेलार तिच्यासमोर एखाद्या क्षुद्र कचऱ्यासारखा वाटू लागला होता. त्याची लायकी थोड्याच वेळात आदितीने त्याला जाणवून दिली.
तीही एकही कठोर शब्द न बोलता... शेलार पुरता
नामोहरम झाला तेव्हा तिने मोर्चा मुलींकडे वळवला.
" जरा अभ्यास करत नाही या दोघी... चार विषयात नापास झाल्यात... सारख्या टीव्ही समोर असतात..."
शेलारची बायको तक्रारीच्या सुरात म्हणाली.
" या दोघींना पाठवून द्या संध्याकाळी माझ्या घरी. मी हॉस्पिटल मधून घरी आले की मुलाचा अभ्यास घेते तेव्हा या दोघींचाही घेत जाईन. "आदिती खेळकरपणे हास्य करत म्हणाली.
मग त्या दिवसापासून शेलारच्या दोन्ही पोरी आदितीकडे अभ्यासाला येऊ लागल्या. तिच्यामुळेच त्या दोघी पास झाल्या असं शेजारच्या बायकोला शंभर टक्के वाटतं. शेलार तर अदितीच्या पाया पडायचाच बाकी राहिला होता. पुढे मग यथावकाश शेलार दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. पण आताही कधी रस्त्यात भेटला तर आधी तिचे पुन्हा पुन्हा वाकून आभार मानतो.
आकाशस्थ देवी देवता प्रत्यक्षात खाली येत नसतील कदाचित... पण त्या मानवाच्या जीवनात परिस्थीती नामक एक बागुल बुवा निर्माण करतात. एकदा का या बागुल बुवा वर मात केली की मानसिक बळ नावाचं एक अस्त्र त्या देवता आपल्याला देत असाव्या... आणि तोच त्यांचा मानवाला आशीर्वाद असतो.
योगेश साळवी.
वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.