केशरी दूध
✍️बीना बाचल
पद्मजा सुभेदार एक मोठी प्रसिद्ध असामी! मोठे सावकार श्री प्रतापराव सुभेदारांच्या सुविद्य पत्नी आणि स्वकर्तुत्वाने ही तितक्याच मोठ्या समाजसेविका अर्थात पद्मजा जी! त्यांचं कर्तृत्व तर मोठं होतंच पण लोकांना भरभरून मदत करण्याची दानत ही होती. कोणीही त्यांच्या दारातून रिकाम्या हाती जात नसे.त्यांच्या वाड्यावरचे नवरात्र तर पंचक्रोशीत प्रसिध्द होते.यांच्या घरचा नवरात्रीच्या अष्टमी दिवशी चा सोहळा पूर्ण परिसरात अगदी पाहण्यासारखा असे .
नवरात्र सुरू झाले की आजूबाजूचे लोक सुभेदार बाईंच्या घरच्या अष्टमी सोहळ्याचे वर्णन करू लागत. काहींच्या मते 'हा केवळ फार्स ' तर काहींच्या मते ' हा दानशूर पणाचा अदभूत सोहळा' असायचा. कारण काहीही असो, पण अष्टमी च्या दिवशी सुभेदार वाड्यात जी कोणी स्त्री येईल तिचा यथोचित सत्कार केला जायचा, आणि सर्वात म्हणजे प्रत्येकाला प्रसाद म्हणून खास 'केशरी आटीव दूध' दिले जायचे तेही अगदी चांदीच्या पेल्यातून! अगदी गरीबातील गरीब स्त्री देखील त्या दिवशी स्वतः ला काही क्षणांसाठी ' आपण ही कोणीतरी' आहोत असं मनोमन मानायची!!
आज ही अष्टमी होती आणि सुभेदार वाड्यावर पहाटे पासून नुसती धांदल सुरू होती. पद्मजा ताई जातीने सगळीकडे लक्ष देऊन होत्या.त्यांना श्वास घ्यायला फुरसत नव्हती. अष्टमी ला जणू दूध गंगा वाहत असे वाड्यावर. आजही त्याला अपवाद नव्हता. आचारी दूध आटवत होते आणि खास काश्मिरी' केशर 'त्यात मिसळले जात होते, त्या दुधाचा दरवळ पार वाड्याबाहेर पोहोचला होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला क्षणभर का होईना तिथे जाऊन दूध चाखावे वाटेल असा तो आटीव दुधाचा सुगंध संपूर्ण आसमंतात भरून जात होता!!
पद्मजा त्या सुगंधा ने समाधान पावली ,तिनं एक खोल उसासा टाकला आणि पुढची कामं करायला निघून गेली.
पद्मजा दिवाणखान्यात येऊन बसली तो तिची लाडकी लेक तिच्या जवळ येऊन म्हणाली '"आई, दरवर्षी आपल्या कडे अष्टमीला इतकी धांदल असते त्यात सगळ्यात तुझा सहभाग असतो ,पण प्रसादाच केशरी दूध मात्र तू कधीही चाखत नाहीस ! केवळ त्याचा मनाजोगता सुगंध घेतलास की तेवढंच पुरे होतं तुला !असं का ?"
पद्मजा नं हे वाक्य ऐकलं आणि ती कित्येक वर्षं मागे गेली.
' पद्मा, आज माझ्या सोबत देशमुख वाड्यावर चल बाई , तेवढीच मदत होईल मला, बाई साहेबांकडे आज हळदी कुंकू असतं आणि तिथे फार कामं असतात ,तू आलीस तर माझा भार हलका होईल '
' आई ,आज देशमुख काकू बायकांना केशरी दूध देतात ना? मला देतील का ग थोडं प्यायला? त्याचा काय सुगंध पसरतो त्यांच्या घरात !त्या वासानं असं वाटतं की घडाभर दूध मिळालं तरी कमीच!'
' पद्मा ,बाळा आपण नोकर माणसं आहोत ,अशी मालकांच्या खाण्यात आशा ठेवू नये बाळा , त्यांनी दिलं तर घ्यावं नाहीतर खाली मान घालून आपलं घरी यावं.' आई असं म्हणाली पण पद्मजा ला ते फारसं पटलं नाही. ती त्या वाटीभर दुधाच्या अपेक्षेने आणि आईला मदत म्हणून देशमुख वाड्यावर गेली. दुपार पासून संध्याकाळ होत आली तरी कामं सुरूच होती, पद्मा आणि आई येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना दूध,फराळ देत होत्या. शेवटी सर्व बायका येऊन गेल्या आणि पद्मा आणि तिची आई जायला निघाल्या. पद्मा ची नजर दुधाच्या भांड्यावर खिळली होती पण तिच्या आईनं डोळे मोठे करून तिला दटावल . देशमुख बाईंनी थोडं फार शिल्लक राहिलेलं खाणं हातात देत दोघींची बोळवण केली. पद्मा फार दुखावली होती, त्या दुधाच्या भांड्यात 'केशरी दूध' शिल्लक असूनही आपल्याला त्यातलं काहीच न देता त्यांनी पाठवलं, आईनं इतकं काम केलं पण तिलाही ते मिळू नये!
आईनं पद्मा ला समजावलं" पद्मा बाळा ,' केशरी दूध' म्हणजे श्रीमंती थाट !आपल्या सारख्या गरिबाला कशाला ग मिळतोय त्याचा स्वाद! आपण आपलं दोन वेळ पोट भरायचं काम करायचं बस्स तेच आपलं नशीब!"
पद्मजा च्या कानात रात्र भर तेच ऐकू येत होतं, पण तिनं मनोमन काही ठरवलं आणि दुसऱ्या च दिवसापासून कामाला लागली.
पुढं बरीच वर्षे गरिबीत गेली पण पद्मा निर्धाराने खूप मेहनत करून शिकली, प्रसंगी पडेल ती कामं केली, दैवाने ही मग तिला हात दिला. खूप मोठ्या हुद्द्यावरची नोकरी, मनाजोगता जोडीदार आणि त्याच बरोबर भरभरून वैभव श्रीमंती!
पद्मजा नं लग्न ठरतानाच आपल्या भावी नवऱ्याला सांगितलं होतं की ' वर्षभर किती देव देव करेन माहीत नाही पण नवरात्रीच्या अष्टमी ला माझ्या दारात येणाऱ्या कोणालाही मी रित्या हाताने पाठवणार नाही आणि ' केशरी दूध' प्यायल्याशिवाय माघारी पाठवणार नाही, माझा वसा समजा हवं तर याला!"
तिचा भावी जोडीदार थोडा चक्रावला होता ह्या मागणी मुळे पण काही 'हरकत नाही ' म्हणत त्याने होकार दिला होता.
पद्मा नेही आपली लहानपणी अर्धवट राहिलेली ईच्छा आणि ती केशरी दुधाची ओढ अशा वेगळ्या रीतीने पूर्ण केली.आज ईतक्या वैभवात होती की तिला ती लहानपणी ची ना भूक राहिली होती ना कुठली आस!!पण आपल्या सारखं कोणी त्या दूधला पारखं होऊ नये ही तिची तळमळ होती.
आज इतकी वर्षं पद्मजा ने तिचा हा वसा मोडला नाही.
फरक इतकाच की आता तिला ते 'केशरी दूध 'पिण्याची आवश्यकता राहिली नव्हती!!
सौ बीना समीर बाचल
वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
ही कथा सुध्दा वाचून पहा.