दोष ना कुणाचा

 दोष ना कुणाचा

✍️ Aparna D P

सकाळची सगळ्यांची महागडबडीची वेळ. 


ऑफिसला जाण्याआधी प्रोजेक्ट काॅल मिटिंगज्  त्यामुळे निखिल उठल्यापासून त्याच्या फोन ला आणि लॅपटाॅपला चिकटून होता.


एकीकडे नेत्राची कसरत चालू होती पार्थला महत्प्रयासाने उठवून त्याचे आवरून, त्याचा टिफिन, वाॅटर बाॅटल रेडी ठेऊन बळजबरीने त्याला दुध प्यायला लावून स्कूल बसच्या स्टाॅपला सोडून या, आल्यावर चहा  ब्रेकफास्ट ला काहितरी बनवणे, स्वतः चे घाईने आवरा, निखिलचा स्वतःचा टिफिन पॅक करणे . सासुबाईंना चुळ भरायला पाणी देणे ,चहा देणे. त्यांची औषधं , खाणं त्यांच्या खोलीत ठेऊन देणे. सगळं उरकून मधे वेळ मिळालाच तर कसे बसे दोन घास पोटात घालणे नाहितर तसंच घाईनं ऑफिसला पळणं. तीच्या पाठोपाठ निखिलही धावत त्याच्या ऑफिसला पळत असे . हे नेत्रा ,निखिलच आणि त्यांच्या पार्थ चे रोजचेच रूटिन . नेत्राच्या सासुबाई प्रभाताई मात्र निवांत सगळं पहात बसायच्या, वाटायचं खुप.. आपण काहितरी मदत करावी नेत्राला, पण गेले दहा वर्षा पासुन त्यांची हालचाल मंदावली, तोल जाऊ लागला.. पार्किनसन्स डिसिज चे निदान झाले. मग त्यांना एका जागी बसून रहाणेच भाग पडले. उठून कही करायला गेल्याच तर निखिल त्यांना ओरडायचा:


"आई तू नको स्वतःहून काही करायला जाऊस आमची गडबडीची वेळ आमचं आवरू का तुझ्याकडे लक्ष देऊ . बस ना तुला देतीय ती सगळं आणून."


  मग काय बसून रहाण्याशिवाय पर्याय नसायचा. 


  हे दोघं गेल्यावर सुरेखा त्यांची मोलकरीण  यायची तीही भरा भरा कामं उरकायच्या मागे असायची. मशिनला कपडे लावयची, तोपर्यंत सिंक मधली भांडी, झाडू फरशी, डस्टींग   मग प्रभाताईंच्या मागे लागायची "चला आजी आंघोळीला उठा" "लवकर खुर्चीत बसा" मग प्रभाताई खुर्चीत बसायच्या सुरेखा ती खुर्ची बाथरूम मधे ओढत न्यायची, पटापटा आंघोळ उरकायची त्यांना कपडे घालून वेणी फणी करून द्यायची तो पर्यंत कपडे धुवून व्हायचे ते भराभरा वाळत घालायची. वाऱ्यासारखी यायची आणि निघून जायची. प्रभाताई समोर ठेवलेलं खाऊन घ्यायच्या मग त्यांच्या रूमच्या खिडकी जवळ उभं राहून थोड्यावेळ बाहेर बघत रहायच्या .थोडा वेळ पेपर वाचन. पण वेळ काही पुढे सरकायचा नाही. एवढा मोठा दिवस कसा पुढे जातोय त्याची वाट बघत बसायच्या. संध्याकाळी नेत्रा पार्थला डे केअर मधून घेऊन घरी यायची मग त्याचं खाणं पिणं उरकून लगेच ट्यूशनला पाठवायची. तो गेला की हिचं चहा पाणी ते  उरकलं की संध्याकाळच्या जेवणाची तयारी.निखिल आला की तो परत फोन वर बिझी!


    प्रभाताईं मुळच्या खुप बडबड्या गप्पा गोष्टी करण्याची फार आवड पण दिवसभर कोणालाच वेळ नसायचा , सुरेखाशी बोलायला गेल्या तर ती म्हणायची "आजी चला पटापटा अजून चार ठिकानी जायचय, तुम्हाला हाय वेळ गप्पा मारायला आमाला नाय". 


  नेत्रा निखिल तर  कधी रिकामे नसायचेच. पार्थ ही त्याची शाळा ट्युशन होमवर्क मग दमुन झोपून जायचा. टि व्ही तरी किती बघायचा? पेपर कितीवेळा वाचायचा? एकदाचा दिवस पार पडला की रात्र ही फार मोठी असायची लवकर डोळाही लागायचा नाही. 


बरं सुट्टीच्या दिवशी तरी पण.. 


 नेत्रा कपाट आवरणे इस्त्रीचे कपडे काढणे , घराची स्वच्छता मग पार्थ ला हाॅबी क्लास ला घेऊन जा आणा यात बीझी असायची तर निखिलचा अर्धा दिवस झोपेत जायचा आणि संध्याकाळ टि व्हि नाहितर मित्रांना भेटण्यात जायची. गेले कित्येक वर्ष असच चाललेलं असायचं. प्रभाताई फक्त पहात आल्या कुठे बाहेर पडायचे तर एक माणूस सतत आपल्याबरोबर गुंतलेला असायला हवा. लग्ना कार्याला समारंभाला जाणे देखिल अवघड असायचे. चालताना पाय अडकायचे सतत कोणीतरी आधार द्यायला हवे मग त्यांनी बाहेर पडणेच बंद केले. एकेक दिवस कसाबसा ढकलत होत्या त्या. बरं नेत्रा निखिल सतत कामात व्यग्र म्हणून घरी देखिल कोणाचे येणे जाणे नसायचे फारसे. हात लटपट कापायचे म्हणून वीणकाम भरतकाम ही करता यायचे नाही . त्यांना जगणेच नको वाटायचे पण मरण देखिल आपल्या हातात नाही!!


  एक दिवस टि व्ही वर बातम्यांमधे कुठल्याशा वृद्धाश्रमाची डाॅक्युमेंट्री दाखवत होते. तसा रेसिडेन्शियल पण होता आणि वृद्धांचे डे केअर सेंटर म्हणता येईल असा हि होता.बरेचसे समवयस्कर मजेत आनंदात तिथे रहात होते.तब्बेतीची काळजी घ्यायला  डाॅक्टर्स ,नर्सेस होते.व्हिलचेअर्स होत्या, त्यामधून गार्डन मधे फेरफटका मारून येता येत होता.  आठवड्यातून एकदा किर्तन, कथाकथन असे कार्यक्रम देखिल होत होते. मुख्य म्हणजे गप्पा गोष्टी करायला बरीच रिकामी मंडळी होती!!


   प्रभाताईना ती डाॅक्युमेंट्री पाहुन जरा उत्साह आला, आनंद वाटला. 


संध्याकाळी निखिल , नेत्रा घरी आल्यावर त्यांनी दोघांना हाक मारून त्यांच्या खोलीत बोलावले म्हणाल्या तुमच्या बीझी शेड्युल मधला थोडासा वेळ मला द्या अत्ता मला!!


   काही महत्वाचं बोलायचय. 


  दोघंही त्यांच्या जवळ बसले!


    आई बोल काय बोलायचय निखिल म्हणाला :


मी आज विचार करून एक निर्णय घेतलाय त्याचा तुम्ही आनंदाने स्विकार करावा असं मला वाटतय. तुम्ही दोघंही खुप चांगले आहात माझी तुमच्या बद्दल तक्रार नाही. 


तर ऐका मला तुम्ही थोडे दिवस वृद्धाश्रमात ठेवाल का?


त्यावर निखिल म्हणाला आई काय झालं? आमचं काही चुकतय का?


  नेत्राकडे कटाक्ष टाकून त्याने विचारले कोणी काही बोललय का तुला? 


  त्यावर त्या म्हणाल्या नाही रे बाळा तुम्ही दोघंही खुप करता माझ्यासाठी. ती नाही रे काही बोलली . मी तुमची धावपळ रोज बघते रे.. ह्या बिचारीची तर तारेवरची कसरत असते.


  सगळ्यांचं करता करता नीट खाण्यापिण्याकडे पण लक्ष नसतं स्वतःच्या. 


  मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही याचच वाईट वाटतय मला. तुमची तरी काय चुक रे दोघांनी कमावण्या शिवाय हल्ली पर्यायच नाही . 


  अरे दिवसभर एकटीच असते कोणी बोलायला नाही, काही काम नाही घर खायला उठतं रे मला!!


   .कुठे येणं जाणं नाही . रात्री पण डोळा लागत नाही लवकर! . माझा तिथे वेळ जाईल बोलायला मित्र मैत्रिणी असतील इतरही काही अॅक्टिवीटीज असतात. 


  मला तिथे आनंदच मिळेल. मान्य करा माझा निर्णय.  पाहिजे तर थोडे दिवस राहून बघते मी. त्यावर निखिल ने विचार केला. आईचं ही खरं  आहे. ती कंटाळून जात असेल दिवस भर . पण असं वृद्धाश्रम वैगरे नव्हतं पटत मनाला. काय करावं? त्यावर तो आई ला म्हणाला मी बघून येतो कशा सोयी सुविधा आहेत तिथे मग ठरवतो. तुझं खरं आहे पण तुला असं लांब पाठवणं???


    त्यावर प्रभाताई म्हणाल्या अरे मुलांना नाही का आपण डे केअर मधे ठेवतो , बोर्डिंग ला पाठवतो तसच काहीसं . सणावाराला वीकेंडला येणारच ना मी. 


शनिवारी वेळ काढून निखिल तो वृद्धाश्रम बघून आला.


  वृद्धाश्रमाचे नाव होते आनंदवन


   व्यवस्था , सोयी सुविधा रोजचे शेड्युल खरोखरच वाखाणण्या जोगे होते. समवयस्क समविचारी लोक आनंदाने रहात होते. मुलं नातवंड जवळ नाहित याची अजिबात खंत नव्हती. त्याने विचार केला आई म्हणतीय तर थोडे दिवस तीच्या म्हणण्या प्रमाणे करून बघू. अर्थिक अडचण पण नव्हती प्रभाताईंना स्वतःची पेन्शन मिळायची. 


त्यानंतरच्या वीकेंडला नेत्रा निखिल त्यांना तिथे सोडून आले.थोड्याच दिवसांत त्या तिथे रमून गेल्या नविन मैत्री झाली. मन प्रसन्न रहात होते. झोप चांगली लागत होती. औषध पाणि खाणेपिणे वेळच्या वेळी होत होते. त्यामुळे तब्येतीत ही सुधारणा होत होती. पण इकडे नेत्रा आणि निखिल ला अपराधी पणाची टोचणी लागली होती. महिना भरा नंतरच्या वीकेंडला त्यांना घरी घेऊन आला आणि म्हणाला आई तुझ्या मनासारखं करून बघितलं आपण महिनाभर, आता बास तू इथेच रहा. प्रभाताई म्हणाल्या अरे मी खुप आनंदी आहे!! माझ्याकडे बघ . 


माझे नविन फ्रेंडस् वाट बघत असतील रे.


  मला जायला हवं रे . आपण भेटूच की शनिवार रविवार. तू कोण काय म्हणेल त्याचा विचार करू नकोस . माझ्यावर प्रेम आहे तुम्हा दोघांचही तर माझ्या आनंदाचा विचार करा. माझ्या मनात कोणताही सल नाही. माझी ही सेकंड इनिंग मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू दे.


शनिवार रविवार पार पडले सोमवारी सकाळी ऑफिसला जाताना निखिल आईला तीच्या आनंदवनात सोडून आला. प्रभाताई फारच आनंदात होत्या. चेहऱ्यावर अतीव समाधान होते.

समाप्त

©Aparna….(ADP)


वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

तुम्हाला ही कथा वाचायला आवडेल.

नाण्याची खरी बाजू

Post a Comment (0)
Previous Post Next Post