मला कुणी समजुन घेईल का?
प्रांजली लेले
आज चिंटू ची परत तक्रार आली होती टीचर कडे. वर्गातील मुले पण त्याच्या खोडकरपणामुळे त्याच्यापासून दोन हात दूरच राहत. चिंटू आणि खोड्या हे जणु समीकरणच बनले होते. त्यामुळे त्याला फार मित्र पण नव्हते. येताजाता तो वर्गात इतर मुलांना त्रास देई. टीचर त्याला मग सारखी वर्गाबाहेर काढत आणि रोजच त्याला या ना त्या कारणाने शिक्षा करत.आपल्याशी कुणीही नीट वागत नाही असा त्याचा समज झाला होता. त्या भावनेपोटी तो मग सर्वांशी अधिकच विक्षिप्त वागे. यावेळी तर त्याने कहरच केला होता, चक्क एका मुलाला त्याने कंपास बॉक्स फेकून मारला होता. टीचर ने यावेळी मात्र त्याच्या पालकांना बोलावून घेतलं शाळेत.
चिंटू चे आई बाबा टीचरला भेटायला आले. टीचर बरोबर कौन्सेलर पण होती यावेळी कारण त्यांना चिंटू बद्दल टीचर आणि इतर मुलांनी पण बराच सांगितलं होतं. टीचर पालकांना काही सांगणार त्याआधी त्याची आईच म्हणाली, आम्ही पण कंटाळलो आहोत त्याच्या उपद्व्यापाना.. इतका मार खातो पण काही फरक पडत नाही त्याच्या वागण्यात..त्याचा मोठा भाऊ मात्र त्याच्या अगदी विपरित आहे. खूप समंजस आहे. चिंटूला सारखं सांगतो की त्याच्यासारखा वाग जरा पण नाही ..हा तर त्याला पण त्रास देतो. चिंटू काही आपला खोडकरपणा सोडायला तयार नाही त्यामुळे याच्या वडिलांनी तर ठरवलं आहे की पुढच्या वर्षी त्याला बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवू. आत्ता लहान आहे तेव्हा तिथे गेल्यावर तिथल्या शिस्तीत त्याला जरा चांगल्या सवयी लागतील. नाहीतर इथे पोरगं हाताबाहेर जायचं.
कौन्सेलर नी त्या पालकांना सांगितले की तुम्ही शाळेत आलात आणि आम्हाला भेटला तेव्हा चिंटू ची काय प्रतिक्रिया असते? तसे त्याचे बाबा म्हणाले, बेदम मार खातो तो माझ्या हातून आणि मग रडत बसतो एका कोपऱ्यात. कितीदा सांगितलं असा वागावच कशाला ज्याने तुझी कंप्लेंट करतील मुले पण नाही याच्यां डोक्यातच शिरत नाही..असाच त्रास देऊ कार्ट आहे ते..
आईवडिलांनी त्याचा जो काही उद्धार केला ते बघून कौन्सेलर ने त्यांना चिंटू शी जरा बेताने वागायचा सल्ला दिला. त्याला अजीबात काही बोलू नका. अगदी नॉर्मल वागा त्याच्याशी. मी बोलेन त्याच्याशी उद्या शाळेत. काही दिवस त्याला मी माझ्याकडे बोलवून त्याला जाणण्याचा प्रयत्न करीन. बघुया काय समस्या आहे त्याची. तुम्ही पण जरा धीर धरा. त्याला मारू किवा रागवू नका. आपण हा प्रयोग करून बघुया.
घरी चिंटू शाळेतून आल्यावर खरतर बाबांना नेहमी प्रमाणे त्याला बदडायचे होते पण कसे बसे त्यांनी स्वतः ला आवरले. आज शाळेत अगदी काहीच झाले नाही या आविर्भावात सगळे जण होते. चिंटू साठी हि नवीन बाब होती. त्यामुळे तो ही जरा बुचकळ्यात पडला होता. त्याने गुपचूप हातपाय धुतले, आईने दिलेले खाल्ले आणि खेळायला बाहेर पळाला. आज बाहेर मित्रांसोबत क्रिकेट मध्ये त्याचे काही मन लागे ना..आई बाबा एवढे शांत कसे आणि मला त्यांनी मारले नाही की ओरडले देखील नाही सारखं हाच विचार त्याच्या मनात डोकावत होता. आजपर्यंत असे क्वचितच झाले होते.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्याला मधल्या सुट्टीनंतर कौन्सेलर कडे पाठविले. इतर टीचर प्रमाणे आता मला या टीचर पण रागावणार असा विचार करतच तो आत शिरला. तो दिसताच अनु टीचर ने त्याला हसत गूड मॉर्निंग म्हंटले. तसे त्याने पण लगेच त्यांना विश केले. चिंटू ये बस इथे, आज आपण एक छान गेम खेळणार आहोत तो म्हणजे "स्पिन अ टेल". यात मी स्टोरी चे एक वाक्य म्हणेल आणि तू त्याचे पुढचे वाक्य जोडायचे असे करत आपण एक छान गोष्ट तयार करूया. आहे ना मजेदार..चल मग सुरू करूया..
असे म्हणत अनुने गोष्ट चालू केली. एक खूप हुशार मुलगा होता. चिंटू लगेच पुढचे वाक्य म्हणाला, त्याचे नाव अजू होते..अजु आईबाबांना खूप लाडका होता. अनु म्हणाली, अजुला एक गोड भाऊ होता. चिंटू लगेच म्हणाला, त्याचे नाव विजू होते. तो खूप खोडकर होता..त्याला सगळे खूप चिडवत असे..त्यामुळे तो पण सगळ्यांना खूप त्रास देत असे..त्याच्यावर कुणी कुणी देखील प्रेम करत नसे..आईबाबांना पण अजुच आवडे आणि विजुला मात्र ते सारखे रागावत.. त्यामुळे विजू ला खूप राग येई आणि तो मग सर्वांना खूप त्रास देई...ते ऐकून अनु लगेच पुढचे वाक्य म्हणाली, अरे पण आपल्या गोष्टीतला विजू तर खूप समंजस होता. त्याला आपण वागतोय ते बरोबर नाही हे कळायचे आणि मग त्याने स्वतः ला बदलायचे ठरविले…अशी ती गोष्ट पुरी करता करता अनुला चिंटूच्या नेमका प्रॉब्लेम काय ते लगेच लक्षात आले. तिने त्याचे खूप छान गोष्ट बनवल्या बद्दल कौतुक केले आणि त्याला उद्या पण क्लासला यायला सांगितले. आणि गोष्टीतील समजदार विजू सारखे वागायला पण सांगितले.
आज चिंटूची बऱ्याच दिवसांनी कुणी दखल घेतली होती. त्याने घरी येऊन लगेच आईला सांगितले की त्याचे टीचर ने छान गोष्ट लिहिलय बद्दल कौतुक केले. ते ऐकून आईला पण आनंद झाला. तिने पण त्याचे कौतुक केले आणि असाच छान वाग म्हणून सांगितले. खरं तर कौन्सेलर ने त्यांनां फोन करून आधीच आजचा रिपोर्ट घरी दिला होतं. आणि चिंटू च्या प्रॉब्लेम बद्दल पण डिस्कस केले होते. त्याची मोठ्या भावाशी अजिबात तुलना करायची नाही ही सक्त ताकीद पण दिली.
तिने सलग एक आठवडा चिंटूला तिच्याकडे बोलावले आणि विविध खेळा मार्फत तिने त्याचे मन जाणण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलतं केलं. त्याच्या सारखे अनेक मुलांची कंप्लेंट तिच्याकडं आधीही आलेली होती. त्यामुळे तिने काय प्रॉब्लेम आहे ते अचूक हेरले. आणि त्याप्रमाणे काही सूचना त्याच्या
घरच्यांना दिल्या.
त्याचे असे पराकोटीला वागण्याचे मुळ कारण म्हणजे घरी त्याची प्रत्येक बाबतीत मोठ्या भावाशी होणारी तुलना.. तो किती छान वागतो आणि ती अगदी विपरित असे सारखे सांगून तसेच त्याच्या मनावर बिंबविल्या गेले होते. त्यामुळे आपसूकच भावाच्या इर्षे पोटी तो अजुनच त्रासदायक वागता असे. आणि त्याला कोणी समजूनच घेत नव्हते म्हणून दुसऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी चिंटू सतत काहीतरी खोड्या करत असे.
आई वडिलांना पण त्यांची ही होणारी चूक अनु टीचर ने लगेच दाखविली आणि त्यांना चिंटू शी कसे वागायचे याबद्दल सल्ला दिला. आणि थोड्याच दिवसात सगळ्यांच्या वागण्यात झालेला बदल बघून चिंटू देखील आपोआपच नीट वागू लागला. त्याची आता प्रत्येक बाबतीत कुणाची बरोबरी होत नसे. तो त्याच्यापरीने अभ्यासात आणि खेळात पण हुशार आहे असे आई बाबांचे बोलणे ऐकून त्याला मनातून खूप आनंद झाला. आणि खोडकर चिंटूचे हळूहळू समंजस चिंटूत रूपांतर झाले.
©प्रांजली लेले
वरील कथा प्रांजली लेले यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.