उपकार

 उपकार......

✍️ योगेश साळवी 


  "अहो, लवकर या इकडे... आपल्या बाथरूम मध्ये बघा केवढे पाणी साठलेय. "


     बायकोची हाक ऐकताच मी लगबगीने आमच्या बाथरूमच्या इथे आलो. पूर्ण बाथरूमची फरशी पाण्याने भरलेली होती. अतिरिक्त पाणी जे तिथे मावत नव्हतं ते हळू हळू किचन आणि पॅसेज मध्ये शिरू पाहत होतं.


     नीट पाहिलं असता बाथरूम मधील पाण्याचा जिथून निचरा होतो त्या जागेतून पाणी बाथरूम मध्ये आत शिरत होते. म्हणजे ड्रेनेज चा पाईप मधूनच हे पाणी आत येत होतं. बाहेरून पाणी आत येत असल्यामुळे ही समस्या अंतर्गत दुरुस्तीची नव्हती... हे काम सोसायटीच्या अखत्यारीत येत होते. सोसायटीच्या सेक्रेटरी ना त्वरित संपर्क साधण्याचा निर्णय घेतला... सेक्रेटरी शेजारीच राहत होते त्यामुळे फोन करायच्या भानगडीत न पडता सरळ त्यांच्या घरची बेल वाजवली. दार उघडताच विचारलं.


      "काका आहेत का? "


     "नाही रे ते कामावर गेले कधीच. काय काम होतं का?"काकींनी विचारलं.


     "काकी... आमचं बाथरूम पाण्याने तुंबले आहे. पाणी किचनमध्ये शिरतय.  काय करायचं ते काकांना विचारणार होतो... बाहेरच्या ड्रेनेजच्या पाईप मधून लिकेज होतंय... नाहीतर मी आमच्या प्लंबरला बोलवून काम करून घेतलं असतं...." मी म्हणालो.


      " असं बघ... ते तिसऱ्या मजल्यावर नवीन झालेले चेअरमन मेहता आहेत... त्यांना विचार... काय म्हणतात ते बघ."  काकींनी पर्याय दिला.


        मी तातडीने मेहतांकडे गेलो. मेहतांनी दार उघडलं. मेहता साठ... पासष्ट चा वाटत होता. त्याचा चेहरा निर्विकार होता.


      मी त्यांच्या कानावर काय समस्या निर्माण झाली आहे ते सविस्तर घातले.


       चेहऱ्यावरची सुरकुती देखील हलवू न देता मेहताने गुजराती मिश्रित हिंदीत सांगितलं.


      "  आप बाहर से प्लंबर बुला के काम करवा के लो... जितना पैसा होता है वो सोसायटी को चार्ज कर दो... सोसायटी दे देगा...." नेताच्या बोलण्यात गुजराती उच्चार मधून डोकावत होते. " चाहिये तो प्लंबर का नंबर मै देता हु..." मेहता पुढे म्हणाले.


      मेहताने मग मणी नावाच्या प्लंबर चा फोन नंबर दिला. मेहतांचे आभार मानून मणी ला फोन केला. मणी आला. एक दीड तास खटपट करून त्यांना बाहेरच्या पाईप मधून होणारे लिकेज थांबवलं. ड्रेनेजचा पाईप चोकअप झाला होता त्यातून कचरा बाहेर काढला.. तो आम्हाला दाखवला देखील... बाथरूम मधील पाण्याचा आता व्यवस्थित निचरा होऊ लागलेला होता. मी मणीला किती पैसे झाले विचारलं.. मणी म्हणाला साडे चारशे रुपये...


        मणीला त्याचे पैसे देणे गरजेचे होतं. त्याने तास ..दीड तास केलेली खटपट.. मेहनत आम्ही पाहिली होती.


        " मै आपका पैसा देता हुं... आप मुझे एक कागज पे बिल बना के दो... क्यूकी सोसायटीचे पैसा लेना पडेगा.." मी मणी ला म्हणालो.


     मणी ने लगेच एका पाचच्या कागदावरती बिल बनवून दिलं. खाली सही म्हणून स्वतःचं नाव लिहिलं... मणी अय्यर असं... मी त्याचे चारशे पन्नास रुपये काढून दिले. मणी आभार मानून निघून गेला.


     आता मेहता ची सही बिल सँक्शन होण्यासाठी घेणं गरजेचं होतं. म्हणून मग मी ते बिल घेऊन मेहता ची बेल वाजवली.


      मेहता त्रासिक चेहऱ्याने बाहेर आला. मी ते बिल 


मेहताला दाखवलं.


      "सरजी.. हमने काम करवा लिया है मणी प्लंबर ने ये बिल दिया है... आप ये संक्शन करवा दो..." 


      मेहता ने बिल हातात घेतलं. बिलावरील चारशे पन्नास रुपये किंमत वाचताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या.


        "इतना पैसा कैसा हुआ....? ?" मेहताच्या आवाजात अविश्वास होता.


      " मेहता जी ... आप  चाहो तो मणी से फोन करके पूछो.. उसने बाहर जाके.. झोला लगाके... बारीश मे झोले  पे बैठके पाईप का काम किया हुआ है... पाईप साफ करके अंदर से चोकअप निकाला हैं..." मी स्पष्टीकरण दिलं. खरं तर मला त्याच्या प्रश्नाचा राग आला होता.. पण वाद नको म्हणून मी शक्यतो शांत राहण्याचा निर्णय घेतला.


      "अरे ...मैं क्यूँ फोन करूँगा? तुम कुछ भी बिल बनवा के लायेगा और मैं उस पे थोडी ना साईन दूंगा... ऐसा थोडी ना होता है...?"मेहताच्या आवाजात एक प्रकारची कुत्सिकता तर आल्यासारखं वाटत होतं.


      " देखिये मेहेताजी.... सोसायटी के ड्रेनेज पाईपसे प्रॉब्लेम हुआ था... हमको परेशानी हो रही थी.. सच पूछो तो सोसायटीने रिपेअर करवा के देना चाहिये था..." मी पण हट्टाला पेटलो.


     "अरे तो प्लंबर का नंबर मैने आपको दिया था... काम करवाके लेने का सलाह मैने दिया था..." मेहता म्हणाला.


      " तो नंबर दिया तो क्या उपकार किया....?" मी पण भडकून बोललो.


      " उपकार... उपकार बोलता है... ठीक है.. मै तुमको उपकार दिखाता हुं I जाओ मैं नही करता साइन... तुम सेक्रेटरी के पास जाके पूछो....." 


        झालेल्या अपमानाने माझ्या अंगाची लाही लाही झाली होती.  साडे चारशे रुपये देत नाही म्हणजे काय... सोसायटी कडून ते वसूल करायचेच हे तेव्हाच ठरवलं. संध्याकाळी सेक्रेटरी आले तेव्हा झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने ते साडेचारशे रुपये सोसायटीच्या मेंटेनन्स मधून कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.


      भांडण विसरून जाता येतं पण झालेले शब्दांचे वार विसरता येत नाहीत. मेहतांनी माझ्याकडे पाहताना ठेवलेली ती हेटाळणी युक्त नजर... आणि मग तुमको उपकार क्या होता है दिखाता हुं.... हे म्हटलेलं माझ्या आजही लक्षात आहे.


      चार एक दिवस झाले असतील. बिल्डिंगच्या परिसरात कोणा मयताची तयारी चाललेली दिसली. चौकशीत कळलं की मेहता गेले. म्हणजे ज्या माणसाशी मी हमरी तुमरी वर येऊन भांडलो तो माणूस अनंतात विलीन झाला. क्षणभर मनात आलं त्या दिवशी पैसे जास्त झाले म्हणून भांडला .. दोनेक दिवसात त्याला मृत्यू कवटाळणार होता... कुठे घेऊन जाणार होता ते पैसे... उगाच जाता जाता माझ्या मनात स्वतःबद्दल कटूता मात्र निर्माण करून गेला.. जाऊदे ईश्वरेच्छा बलीयसी झालं.....

      मेहताच्या पार्थिवाला गेलो. जैन धर्मियांमध्ये कशाप्रकारे पार्थिव करतात ते मला पहिल्यांदाच बघायला मिळालं. मेहताच्या मागे त्याची पत्नी आशाबेन आणि दोन मुली होत्या. दोन्ही मुली लग्न होऊन सासरी गेल्याने आशाबेन आता एकटीच मागे उरली... वाईट वाटलं.


      दोन-तीन दिवसांनी सोसायटीत रुग्णवाहिका आलेली दिसली.. रुग्णवाहिकेच्या विशिष्ट आवाजामुळे पटकन लक्ष गेलं. आशा बेनला हार्ट अटॅक आला म्हणून अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये दाखल करायला घेऊन गेले. मेहता कुटुंबीयामागे शुक्ल काष्ट लागलेले दिसत होतं. नेमकं माझ्याशी वादविवाद झाल्यानंतरच्या लगतच्या कालखंडात.


      मला ते पूर्वीचे दुर्वास.. विश्वामित्र वगैरे थोर ऋषी आठवले. कोणावर क्रोधित वगैरे झाले की कमंडलू तले पाणी मंत्र म्हणून अंगावर शिंपडून शाप देऊन मोकळे होत. तसा शाप मी काही मेहतांना दिला नव्हता ना... मी स्वतःची चाचपणी केली... नाही... तसं नव्हतं माझा राग तात्कालीक होता. आपण नाही का रोज ट्रेनने प्रवास करताना..., बसमध्ये वगैरे शेजाऱ्याशी ... सहप्रवाशाशी भांडतो ... आणि मग तो प्रवास संपल्यावर विसरून जातो त्या प्रकारचा. असा राग मनात दाबून पण ठेवत नाही... उलट भांडून मोकळं झाल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतात कुठेतरी वाचलेलं ऐकलेलं होतं. रागाचे दमन केल्याने उलट मानसिक शारीरिक आजार वाढतात.


  संध्याकाळी दादरला ऑफिस सुटल्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आशाबेन ची विचारपूस करायला जायचं मी नक्की केलं. अंधेरी ला जायचे म्हणून ऑफिसमधून पण जरा लवकरच निघालो. कुठल्या मजल्यावर आशा बेन ला दाखल केले याची सविस्तर माहिती घेऊन नेमक्या रूम मध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांना पण बरं वाटलं असणार... अर्थात त्याला भेटणं माझं कर्तव्य होतं... माणुसकीच्या नात्याने सुद्धा .... मलाही भेटल्यावर बरं वाटलं.


      आशाबेन चे अगदी हातावर मोजण्या इतके नातेवाईक आले होते. ते सर्व रात्री हॉस्पिटलमध्ये थांबणार होते. रात्रीचे नऊ सव्वा नऊ झाले असतील... आशाबेन च्या भावाने मला जवळ बोलावले.


       "अभी पुरी रात हम इधर है.. जलपा को आप जरा मुलुंड ले जाओगे...?? क्या है क्या उसका हजबंड गुजरात गया हुआ है... उसकी छोटी भी जलपा के साथ है करके चिंता होती है I "... जलपा चा मामा मला करत असलेली विनंती मी मान्य केली. नाहीतर आता मुलुंडला घरी ट्रेनने जायचं म्हणजे वैतागच होता. मी एकटा गेलो असतो तरी रिक्षा करूनच जाणार होतो. मी जलपाला बरोबर घेऊन जायचं मान्य केलं.


      जल्पा म्हणजे मेहता दांपत्याची मोठी मुलगी... दुसरे कोणी रात्रीच्या वेळेस बरोबर नसल्याने जलपाची आणि तिच्या दोन अडीच वर्षाच्या मुलीला घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर होती. कोकिलाबेन इस्पितळासमोरच मला रिक्षा मिळाली. जलपाने माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये मुलीला बसवलं. त्या दोघांची रिक्षामध्ये अखंड बडबड सुरू होती. मुलगी काहीतरी प्रश्न विचारायची आणि मग जनता तिच्या बालबुद्धीला पटेल असं काहीतरी उत्तर द्यायची. माझी तेवढीच करमणूक होत होती. कांजूरमार्ग गेल्यावर रिक्षा लालबहादूर शास्त्री रोडवर येताच जल्पा म्हणाली.


       " भाईसाहब... रिक्षा का भाडा मैं दे दूंगी..."


       " अरे नही.. जलपा जी... मै तो ऑटो करने वाला ही था... अच्छा हुआ के आप दोनो की कंपनी मुझे मिली..." मी प्रांजळपणे सांगितलं.


        जलपा म्हणाली... "अच्छा फिर आधा आधा करेंगे.."


एवढं बोलून तिने दोनशे ची नोट माझ्याकडे देऊ केली.


      स्त्री दाक्षिण्य म्हणून अर्थातच मी ती नाकारली. एखाद्या स्त्री कडून व्यवहार म्हणून अर्धे पैसे या अडचणी च्या वेळी घेणे मला संयुक्तिक वाटत नव्हतं.


       थोड्याच वेळात मुलुंडला आमची सोसायटी आली. जल्पा पुन्हा पुन्हा माझे आभार मानून रिक्षातून उतरली आणि पुढे गेली.


       ती गेली बघताच मी रिक्षावाल्याला त्याचे मीटर प्रमाणे किती पैसे होतात ते विचारलं. साडेचारशे रुपये झाले होते.


साडेचारशे ची रक्कम रिक्षावाला देऊन मी निघालो तेव्हा साडेचारशे वरून मला काहीतरी आठवलं... काही दिवसांपूर्वीच साडेचारशे वरून मेहतांशी झालेला वाद ... ती शाब्दिक बाचाबाची... उपकार संदर्भात आलेला राग... शाळेत शिकलेला ऊर्जा अक्षयतेचा नियम माझ्या डोक्यात वेगळ्या प्रकारे घोळू लागला..


     'पैसा निर्माण होत नाहीं तसेच नष्ट करता येत नाहीं... फक्त त्याचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत राहते...' 


     आणि मग मी स्वतःशीच हसलो.

समाप्त 

      वरील कथा योगेश साळवी यांची असून लेखकाच्या परवानगीने आम्ही ती शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत.  कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


      


Post a Comment (0)
Previous Post Next Post