माफी

 'माफी'

सचिन देशपांडे

शाल्मली आॅफिसमध्ये मस्त महिन्याभराची सुट्टी टाकून, पुण्याहून मुंबईला माहेरपणाला निघाली होती. तिचे बाबा गेल्यानंतर... त्यांचं कार्य पार पाडून ती जे गेली होती पुण्याला स्वतःच्या घरी, ती आत्ता येत होती मुंबईला... जवळपास आठेक महिन्यांनी. बाबांमागे एकट्या पडलेल्या आईसोबत, शाल्मलीचं राहणं असं झालंच नव्हतं. अर्थात तिचा फोन मात्र, दिवसाआड तरी असेच आईच्या चौकशीचा. आणि आता ह्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तर, शाल्मली अगदीच काटेकोर लक्ष ठेऊन होती आईवर... भले दिडशे किलोमिटर्सवरुन का होईना. तर स्वतःच्याच संसारात गुरफटून गेलेल्या शाल्मलीने, अगदी ठरवून महिन्याची सुट्टी टाकली होती आॅफिसमध्ये. आणि नवर्‍याकडे अन् सासू - सासर्‍यांकडे... अनुक्रमे बारा आणि आठ वर्षांच्या आपल्या दोन्ही लेकींना सोपवून, ती मुंबईला निघाली होती. आईकडे निदान तीनेक आठवडे तरी रहाण्याचा, मानस होता शाल्मलीचा. अर्थात सासूबाईंनी... "निश्चींत होऊन जा, नी चांगली लठ्ठ होऊन ये" असं सांगत शाल्मलीला निर्धास्त केलं, तेव्हाच तिचा पाय तिथून निघाला होता. 

माहेरी पोहोचल्या पोहोचल्या आईशी भरपुर गप्पा - टप्पा झाल्यावर, शाल्मलीने स्वैपाकघराचा ताबा घेतला. त्यावेळी रात्रीचे आठ वाजायला आले होते. फर्मास स्वैपाक जमून आला होता. लेकीच्या हातचं बर्‍याच महिन्यांनी खाऊन, आईचाही जिव सुखावला होता. अकराच्या सुमारास उरलेल्या गोष्टी फ्रिजमध्ये ठेऊन, ओटा आवरुन... शाल्मली नी आई निजायला गेल्या. पुन्हा मग माय - लेकीत गप्पांची एक फैर झडली, आणि पावणेबारा वाजता आईला गुडनाईट करुन... बेडरुमचा दिवा बंद करत शाल्मली उशी, अंथरुण - पांघरुण घेऊन हाॅलमध्ये आली. आता इथे असेपर्यंत शाल्मली डोक्यावरचा पंखा, बिंधास्त फुल्ल स्पिड ठेऊन झोपणार होती. पुण्यात असा पंखा सोडणं म्हणजे, 'अरमान ही रह गये' टाईप्स होतं शाल्मलीसाठी. सोफ्याचा डबलबेड करत, शाल्मली पडली त्यावर... नी नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने हातात पुस्तक घेतलं वाचायला. पंधरा मिनिटांतच डोळे जड झाले तिचे... आणि पुस्तक बाजूला ठेऊन, चश्मा काढून तो उशाशी ठेवत, दिवा बंद करुन... सव्वाबाराच्या सुमारास शाल्मलीने डोळे बंद केले. डोक्यावरील फुल्ल हवा, आणि माहेरपणातली उब... मिनिटभरातच गाढ झोपेत परावर्तित झाली. 

भुवया वक्र होऊन त्यांची प्रश्नचिन्ह होत, बंद डोळे आक्रसत, तोंडावर "काये हे?" असे भाव उमटत... अचानक जाग आली शाल्मलीला. 'कर्रर्रssss.. कर्रर्रssss.. कर्रर्रssss' असा आवाज येत होता कुठूनसा. शाल्मली जागी झाली. सुरुवातीला तिला वाटलं, स्वप्न वगैरे पाहिलं असावं आपण. पण तोच आवाज तिला आता, अधिक स्पष्ट येऊ लागला होता. शाल्मलीने दिवा लावला, आणि ती खोलीत बघू लागली इथे - तिथे. घड्याळात अडीच वाजल्याचं दिसलं तिला... नी तिला जाणवलं आवाज तर, फ्रेंच विंडोज बाहेरुन येतोय. शाल्मलीने कान त्याबाजूला थोडा कलता करत, आणिक निट अंदाज घेतला. आणि तिची खात्री पटली की, आवाज बाहेरुनच येतोय. शाल्मलीने विंडोजचा एक आयत सरकवत, बाजूला केला... आणि बाहेर डोकावली ती. थोडसंच चांदणं पडलेलं... पण तिला नक्की कळलं की आवाज, खालच्या मजल्यावरच राहणार्‍या सान्यांकडून येतोय. शाल्मली दोनेक मिनिटं, उभी राहिली तशीच. आणि मग उघडलेली काच बंद करत, पुन्हा आडवी झाली ती सोफ्यावर. आवाजाची दिशा कळलेली, पण स्त्रोत कळला नव्हता... त्यामुळे अजूनही तशी बेचैनच होती शाल्मली. बराचवेळ आवाज येत होता मग खालून. आणि शाल्मली इथे वर जागीच होती तळमळत. चारच्या सुमारास कधीतरी आवाज बंद झाला, आणि शाल्मलीचा डोळा लागला. 

स्वैपाकघरातील आईच्या वावरानेच, शाल्मलीचा डोळा उघडला. सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून कोवळी उन्ह घरात शिरुन, मस्त थंडगार लादीवर पहुडली होती. आळोखे पिळोखे देत, दोन्ही हातांनी मोकळे केस एकत्र करुन ते चापात अडकवत, शाल्मली जागची उठली. फ्रेश होऊन ती येईपर्यंतच, वाफाळते कांदेपोहे तयार होते टेबलवर. "आहाहा!... आईच्या हातचा गरमागरम नाश्ता... वाह" हे मनात येऊन शाल्मलीला अगदी, 'याच साठी केला होता अट्टाहास' वगैरे फिलींग आलं. ते आईच्या हातचे स्वर्गिय पोहे खात असतांनाच, शाल्मलीला त्या कालच्या मध्यरात्रीच्या आवाजाचं आठवलं... आणि तिने तसं सांगितलं आईला. आई म्हणाली... "अग त्या साने काकू त्यांच्या घरी लावलेल्या झोपाळ्यावर बसतात, आणि त्या झोपाळ्याच्या कड्या करकरतात अगं". शाल्मली कपाळावर हात मारल्यासारखं करत म्हणाली... "कर्म... आणि रात्री ह्यांच्या झोपाळ्याने, माझ्या झोपेचं खोबरं केलं.. पण आई रात्री अडीच वाजता कोणी झोपाळ्यावर बसतं का?... तेही पाच - दहा मिनिटांकरता नाही, तर आॅलमोस्ट फाॅर वन अँड हाफ आवर्स". आई म्हणाली... "अगं साने काकूंना नाही येत झोप... त्या हाॅलमध्ये झोपतात नी काका आत... बोलायला सोडच, नुसतं बघत बसावं म्हंटलं तरीही कोणी नसतं बाजूला... मग काय?... बसतात झोपाळ्यावर झोके घेत... त्यातून तो झोपाळा, साने काकांना अजिबात चालत नाही... झोके वगैरे घेतले की, चक्करच येते त्यांना... कानाच्या पडद्याचा काहीतरी प्राब्लेम आहे म्हणे त्यांचा... आता एवढा घेतलेला झोपाळा वसूल करावा, म्हणून काकूच बसतात मग सदान् कदा त्यावर". शाल्मली किंचितसा चमचा प्लेटमध्ये आपटत बोलली... "अगं पण दुसर्‍यांना का त्रास?... तू बोलायचंस ना काकूंना की, ह्या आवाजाने झोपमोड होते आमची... की मी बोलू आता?". आईने शाल्मलीला अर्ध्यावरच थांबवत सांगितलं... "अगं मी एकटीच, त्यातून झोपते आतल्या खोलीत... मला नाही काही त्रास वगैरे होत हो... आणि तू गप्प रहा बरं... चाळीस वर्षांपासूनचे घरोब्याचे संबंध आहेत आपले... उगिच कशाला कोणाला दुखवायचं?... मी एकटी असतांना, आता शेजार - पाजार्‍यांचाच तर आधार असतो मला... तू काय जाशील आज ना उद्या". शाल्मलीला आईचं म्हणणं पटलं... नी "बरं गं बाई नाही बोलत काही कोणाला" म्हणत, ती पोहे संपवू लागली. 

पाचेक दिवस असेच तब्येतीत गेले शाल्मलीचे. ताटावरुन पाटावर, नी पाटावरुन ताटावर असे. आणि आईकडून मुबलक कोड कौतुकं करुन घेण्यातही. ह्या पाचही दिवशी शाल्मलीला... सान्यांकडून मध्यरात्री तो झोपाळ्याच्या कड्या करकरण्याचा आवाज, आला होताच. आताशा तर त्या आवाजाची सवय होऊन, शाल्मलीला झोपही येऊ लागलेली त्या तालावरच. आणि एके सकाळी तिला घरात, आईची लगबग जाणवली. मग जाणवली कूजबूज कोणांततरी, दबक्या आवाजात झालेली. थोडक्यात नेहमीपेक्षा वेगळी सकाळ जाणवली शाल्मलीला. डोळे उघडून ती अंथरुणावर बसली. शाल्मलीला जागं झालेलं पाहून, आई लगबगीनेच तिच्याजवळ आली नी म्हणाली... "शामे... सानेकाकू गेल्या अगं... पहाटे चारच्या सुमारास, झोपाळ्याच्या कड्यांना डोकं टेकूनच". आणि आई हमसाहमशी रडायला लागली. शाल्मलीच्या छातीत धस्स झालं होतं. आईला सावरत, शाल्मलीने शांत केलं तिला. आणि पटापट आवरुन ती खाली सान्यांकडे गेली. 

शेवटपर्यत होती मग शाल्मली तिथेच. सान्यांच्या दोन्ही मुली, शाल्मलीच्या बालमैत्रीणीच. एक तिच्याहून वर्षभराने पुढे, तर एक दोन वर्षांनी मागे. सगळे सोपस्कार आटोपल्यावर... आंघोळी - पांघोळी उरकून, शाल्मली पिठलं - भाताचा डबा देऊन आली खाली. त्यानंतर पुढचे चारेक दिवस, शाल्मलीचे बेचैनीतच गेले. कारण तिला सवय झालेला तो झोपाळ्याच्या कड्यांचा आवाज, आता यायचा बंद झाला होता काकूंच्या माघारी. यथावकाश साने काकूंची, सगळी कार्य पार पडली. आणि त्यांच्या दोन्ही मुली, आपापल्या घरी गेल्या. जाण्यापुर्वी सान्यांच्या शेजारी राहणार्‍या देशमुखांना, आणि शाल्मली नी शाल्मलीच्या आईला... काही दिवस निदान बाबांकडे लक्ष द्यायला सांगून गेल्या त्या. त्या रात्री शाल्मलीनेच सगळा स्वैपाक बनवत, तो साने काकांना नेऊन दिला. सगळं आटोपून झोपेपर्यंत, बारा वाजून गेले होते. बेदम दमलेली शाल्मली, अंथरुणावर पाठ टेकल्या टेकल्याच गाढ झोपी गेली. आणि अचानक जाग आली शाल्मलीला, साधारण दिडच्या सुमारास. सान्यांकडच्या झोपाळ्याच्या कड्या, बर्‍याच दिवसांनी करकरु लागल्या होत्या. 

शाल्मलीला पहिल्यांदा कळेचना, वास्तव आहे की भास. पण मिनिटभर चित्त एकाग्र केल्यावर कळलं तिला की, आवाज खरंच येत होता. शाल्मलीला काही सुचेना. "सान्यांच्या घरीतर फक्त काकाच आहेत... आणि ते आजतागायत कधी बसले नाहीयेत झोपाळ्यावर... कारण त्यांना चक्कर येते असं आई म्हणत होती... मग... काकू?... छ्या... काहीही". MSc Physics असलेल्या शाल्मलीच्या मेंदूने... ह्या अशा पॅरानाॅर्मल गोष्टीच्या शक्यतेवर, लागलीच फुली मारली होती. "मग आईला उठवूया का?... पण नकोच... ती ही बिचारी फार दमते". ह्या सगळ्या विचारांतच, शाल्मली येराझारा घालत होती घरी... नी तेवढ्यात तिला धप्प करुन आवाज आला, सान्यांकडून. रात्रीच्या त्या निरव शांततेत, अगदी आपल्याच घरुन तो आवाज आल्यासारखं वाटलं शाल्मलीला. 

आता मात्र आणिक वेळ न दवडता, शाल्मली आतल्या खोलीत पळतच आईकडे गेली. आईला घाईघाईने उठवलं तिने, थोडक्यात सगळं सांगितलं. आईकडे असलेली सान्यांची किल्ली घेतली शाल्मलीने, आणि ती खालच्या मजल्यावर पळाली. शाल्मलीने आधी बेल वाजवली, पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच कोणीही दरवाजा उघडला नाही. "आतून लॅच डेड केलेलं नसो" अशी मनाशीच प्रार्थना करत, शाल्मलीने दरवाजाला किल्ली लावली. तोपर्यंत शाल्मलीची आई हळूहळू पायर्‍या उतरत, तिच्यापर्यंत आली होती. दरवाजा उघडला, आणि शाल्मली तिरासारखी आत घुसली. आईला ओरडूनच सांगितलं तिने... "शेजारच्या देशमुखांच्या अक्षयला बोलाव... त्याची मदत लागेल". सानेकाका खाली जमीनीवर, पालथे पडले होते.... झोपाळ्यापासून जरा लांब. शाल्मलीने त्यांची पल्स चेक केली, हार्टबिट्स चेक केल्या. तेवढ्यात देशमुखांकडचे सगळेच, लगबगीने आत आले. शाल्मलीने ओरडूनच सांगितलं अक्षयला... "लवकर गाडी काढून विंगपाशी आण... मोठं गेटही उघडून ठेव". देशमुख काकांना आणि अक्षयच्या बायकोला, शाल्मलीने तिला मदत करण्यासाठी बोलावलं. त्या तिघांनी साने काकांना उठवून उभं केलं. त्यांना पकडून बाहेर नेत, लिफ्टमधून खाली आणलं. तोपर्यंत अक्षयही गाडी तयार ठेऊन आलाच होता. चौघांनीही मग सानेकाकांना, गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं. त्यांच्या बाजूला काकांचं डोकं खांद्यावर घेऊन, शाल्मली बसली. देशमुख काका पुढे अक्षयशेजारी बसले. सानेकाका पडल्याच्या आलेल्या आवाजापासून अर्ध्या तासाच्या आत, शाल्मलीच्या धावपळीमुळे सानेकाका हाॅस्पिटलमध्ये अंडर आॅब्झर्व्हेशन होते. 

प्रकृती स्थिर होती सानेकाकांची आता. देशमुखांकडच्या सगळ्यांनी आणि... शाल्मलीच्या आईनेही, सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण शाल्मलीला मात्र चैन पडणार नव्हतं... सानेकाका नक्की कसे बेशुद्ध पडले हे कळल्याशिवाय. तिने सगळ्यांना घरी जायला सांगितलं, अगदी आपल्या आईलाही. आणि वाट पहात बसली शाल्मली बाहेर, सानेकाकांची प्रकृती काहीतरी सांगण्याईतकी सुधारण्याची. स्टाफला तिने तसं सांगुनही ठेवलेलं. सकाळी सहाच्या सुमारास... तिला निरोप आला की, साने आता बोलू शकतील. शाल्मली त्वरीत आत गेली. सानेकाकांनी तिच्याकडे पाहिलं... नी क्षीणसं हसत तिला खुणेनेच, आपल्या बाजूला बसायला सांगितलं. काकांच्या बाजूला त्यांचा हात हातात धरत शाल्मली बसली, काकांच्या दोन्ही लेकींना फोन केल्याच सांगितलं तिने त्यांना. आणि विचारलं की नेमकं काय झालं होतं? 

काका बोलू लागले... "मुली जायची वाटच बघत होतो गं मी... तुझ्या काकूशी खूप बोलायचं राहिलेलं... आयुष्यात कधी तिच्याशी धड असा बोललोच नव्हतो मी... फार हिडीस फिडीस केलं मी तिला कायमच... तिला हाक मारतांनाही मी ए मुर्ख, ए अक्कलशुन्य अशी हाक मारत असे... पुरुषी अहंकार अगदी चोवीस तास, फणा काढून असे माझा... मी माझ्या बायकोला ना कधी सुखात ठेऊ शकलो, ना माझ्या लेकींशी कधी मायेने वागू शकलो... कायमच मी त्यांनाही तुच्छतेचीच वागणूक दिली... पण इतकं असूनही त्या तिघींनी मात्र, माझा कायम आदरच केला... बायकोने अगदी तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत, माझी काळजी घेतली... म्हणजे त्या दिवशी ती पहिल्यांदाच, मला माझी बिपी ची गोळी द्यायची विसरली... मी वाट्टेल तसं बोललो तिला... आणि स्वतःच गोळी घेतली पाकीटातून, रात्री सव्वा दोन वाजता... पण एवढं होऊनही, माझ्यासाठी पाणी तिच घेऊन आली होती... माझ्या हातात पाण्याचं भांडं दिलं, नी तशीच हाॅलमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसली ती... आणि... आणि...". इतकं बोलून सानेकाका, ओक्साबोक्षी रडू लागले. शाल्मलीने काकांच्या छातीवरुन हात फिरवत, त्यांना शांत केलं. त्यांना पडल्या पडल्याच पाणी पाजलं शाल्मलीने. जरासं सावरल्यावर सानेकाका पुढे बोलू लागले... "आपापल्या घरी परततांना... आमच्या दोन्ही लेकींनीही, चिक्कारच आग्रह केला हो त्यांच्या घरी चलण्याचा... पण कसा जाणार मी?... आमच्या हिच्याशी खूप बोलायचं जे शिल्लक होतं माझं... माफी मागायची जी बाकी होती... मग काल रात्री मी, पहिल्यांदाच झोपाळ्यावर बसलो एका बाजूला चिकटून... त्याच्या करकणार्‍या कड्यांतून, आमची हिच जणू बोलत होती माझ्याशी... उभ्या आयुष्यात प्रथमच इतके मोकळेपणाने, बोलत होतो मी तिच्याशी... मग काय गप्पांचा ओघ वाढला, नी तसाच वाढला झोक्यांचा वेगही... कधी चक्कर येऊन खाली पडलो, कळलंच नाही... पण त्यामुळे हिची माफी मागायची मात्र राहीली गं, आणि ही बोच कायम राहील मनात जिवंत असेपर्यंत... आता थोड्या वेळेतच दोन्ही पोरी येतील, नी मला काही एकट्याला त्या आता घरी सोडणार नाहीत". 

शाल्मलीचे डोळे भरुन आले होते एव्हाना. मनाशी काहीतरी विचार करत, तो पक्का केल्याचे भाव उमटले शाल्मलीच्या चेहर्‍यावर. काकांसमोरच तिने त्यांच्या मोठ्या लेकीला फोन केला. "हॅलो... शाल्मली बोलतीये... काका आता ओके आहेत पण... पण त्यांची कोविडची टेस्ट करावी लागणारेय... आणि CT स्कॅनिंगही, टू बी हंड्रेड पर्सेंट शुअर... तर मी काय म्हणतेय आता कालपासून काकांजवळ मीच असल्यामुळे, तशीही मला सुद्धा टेस्ट करावीच लागणारेय... तर मग आणिक तुम्हाला कोणाला ती करायला लागायला नको... म्हणून मग तुम्ही कोणीच दोन दिवस तरी काही इथे येऊ नका... मी अगदी 24*7 आहे काकांजवळ... त्यांच्या सगळ्या टेस्ट्स करुन घेऊन, मी तुम्हाला अपडेट देईनच... सो प्लिज... तुम्ही कोणीही आत्ता इथे येणं, अॅडवाईजेबल नाहीये... ओके देन... बाय". एवढं म्हणत शाल्मलीने फोन कट केला. आणि तिच्याकडे 'आ' वासून बघणार्‍या सानेकाकांकडे पाहून, डोळा मारला शाल्मलीने. दोघेही खो खो हसू लागले. काका म्हणाले... "अगं पण दोन दिवसांनी कळेलच की लेकींना, हे सगळं खोटं होतं म्हणून". सानेकाकांच्या हातावर हलकसं टॅप करत, शाल्मली म्हणाली... "पण त्याआधी तुमची काकूंकडे माफी मागून झाली असेलच की... अँड युवर बोथ द डाॅटर्स विल फिल प्राऊड आॅफ देअर डॅड फाॅर धीस... आय गॅरेन्टी यू".


.


.


.


रात्री दिडच्या सुमारास, शाल्मलीला पुन्हा आवाज आला झोपाळ्याच्या कड्यांचा. साने काकांना त्रास होऊ नये, आणि त्यांची माफीही मागून व्हावी म्हणून... झोपाळ्यासमोर तिनेच ठेवलेल्या खुर्चीवर सानेकाकांना बसायला सांगून, रिकाम्या झोपाळ्याला झोके द्यायला सांगितलं होतं त्यांना शाल्मलीने. 'रिकाम्या झोपाळ्याला' असं बोलून गेल्यावर, आपल्या दातांखाली जिभ चावली होती शाल्मलीने. कारण MSc Physics असूनही तिला माहित होतं की, सानेकाकांसाठी तो झोपाळा रिकामा खचितच नव्हता.


---सचिन श. देशपांडे


वरील कथा श्री सचिन देशपांडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

2 Comments

  1. छान आहे" माफी" ही कथा...
    शब्द मांडणी पण खूप छान....

    ReplyDelete
  2. नेहमी प्रमाणेच मस्त कथा...

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post