नाण्याची खरी बाजू भाग दोन

 नाण्याची खरी बाजू भाग २

प्रिय वाचक,

"नाण्याची खरी बाजू" ही कथा मी स्पर्धेसाठी लिहिली..

"मिशन मायलेक भेट" असा शेवट कथेचा केला..

परंतु अनेक वाचकांनी कथेचा पुढील भाग वाचायला आवडेल,पुढचा भाग लिहा अशी विनंती केल्यामुळे पुढचा आणि शेवटचा भाग देत आहे..

पहिला भाग

सर्वांना हा भाग आवडेल अशी आशा आहे..

नाण्याची खरी बाजू

भाग २

नमिताला स्वतःचा फोन नं. देऊन तिचा नं. घेऊन भेटते लवकरच असं म्हणून ती निघाली..

 डोक्यात विचारांच्या असंख्य माशांचे मोहोळ उठलं होतं वैशूच्या..

आपल्याला वाटतं तितकं साधं सरळ आयुष्य नसतं सगळ्यांचं..

खिद्रापूर ला फिरायला म्हणून जातो काय आणि हे सगळं घडतं काय!..

दैवगती म्हणतात ती अशी?..

अवीला किती चुकीची माहिती सांगून आईबद्दल मन कलुषित केलं या लोकांनी!...

त्याला ही दुसरी बाजू कळायलाच हवी..

आई आणि मुलाची झालेली ताटातूट वाईटच होती,पण आतातरी त्यांची भेट व्हायला हवी..

विचारांच्या नादात कधी घरी पोचली ते तिला समजलंच नाही..

नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमधल्या घडामोडी बाबांना सांगणारी ती,आजमात्र गप्पगप्प होती..

बाबांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही,पण थकली असेल असा विचार करून त्यांनीही तिला काही न विचारता गप्प बसणं सोयीस्कर समजलं..

उद्या सकाळीच अवीला भेटलं पाहिजे,गरम असेपर्यंतच घाव घालणं गरजेचं..नाहीतर उपयोग होणार नाही हे तिला माहिती होतं..

अवीशी फोनवर बोलून उद्याच्या भेटीबद्दल ठरवू म्हणून तिनं त्याला फोन लावला..

बराच वेळ रिंग गेली,पण पलीकडून उचलला गेला नाही..

दोन,तीन वेळा तिनं प्रयत्न केला पण अवीने फोन उचलला नाही..

शेवटी तिनं मेसेज केला"उद्या भेटूया"..आणि ती पण झोपली..

सकाळी उठल्यावर तिनं पहिल्यांदा फोन हातात घेतला..अवीने मेसेज वाचलाच नव्हता..निळी खूण दिसली नाही..आता मात्र वैशूला काळजी वाटली..

तिनं स्वतःचं सगळं आवरलं..चहा घेत असतानाच बाबा उठून आले..

"वैशू,कालपासून बघतोय,तू थोडी अपसेट दिसतीयस..

काय झालंय?..काळजी करण्यासारखं आहे का काही?"..

बाबांची काळजी ती समजू शकत होती आणि त्यांच्यापासून काही लपवायची गरजही नव्हती..

गेल्या चार पाच दिवसांमध्ये काय काय घडलं ते तिनं सविस्तर सांगितलं बाबांना..

ऐकून बाबा निःशब्द झाले..

पाच मिनिटं शांतच बसले आणि मग स्वतःला सावरून म्हणाले,

"वैशू,जगात किती प्रकारचे लोक असतात नाही!..

आपल्या समोर जे दिसतं तेच आपण खरं समजतो..

पण अशाप्रकारे दुसरी बाजू अचानक समोर आली तर कसं सामोरं जावं गं?..

पण जे सत्य आहे ते समोर यायलाच पाहिजे..

मला वाटतंय,तू अवीच्या घरी जा..

तिथं गेल्यावर प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे ते तुला समजेल..

पण अवीला हे सगळं सांगताना त्याच्या मनस्थितीचाही तुला विचार करावा लागेलच..

हळुहळू त्याच्या कलाने,त्याचा मूड बघून त्याला हे सांग.."

"हो बाबा,हे त्याला समजायलाच हवं..फार वेळही करून उपयोग नाही.

मी त्याच्या घरीच जाते आणि काय परिस्थिती आहे ते बघते",असं म्हणून ती अवीच्या घरी जाण्यासाठी निघाली..

अवीच्या घरात शांतता होती नेहमीप्रमाणे..

बाबा पेपर वाचत होते..

अवी कुठे आहे बाबा?..

"त्याच्या रूममध्ये आहे..जा तिकडेच",असं म्हणून त्यांनी पुन्हा पेपरमध्ये तोंड खुपसलं..

ती आल्याचा फ़ार काही आनंद झालेला नव्हता त्यांना..

अवी रूममध्ये झोपलेलाच होता..

"अवी,अरे किती वाजलेत बघ!..अजून उठला नाहीस?..

झोप झाली नाही की काय!.."असं म्हणत ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवू लागली..

अवीचं अंग थोडं कोमट वाटलं तिला..

"काय झालं रे ?..

बरं वाटत नाहीये का?.."

अवी अगदी मलूल झाला होता..

तो हळूच उठून बसला..

"ये वैशू..बस.."

"बरं नाही वाटत तर कळवायचंस ना!..मी आले असते ना लगेच..म्हणूनच फोन घेतला नाहीस आणि मेसेजसुद्धा बघितला नाहीस वाटतं?.."

"अगं तसं काही नाही वैशू!..

थोडा थकवा आलाय इतकंच..

एवढी काळजी नको करुस.."

"बरं बरं.. उठ मग..

चहा घे,मग बरं वाटेल तुला.."

जशी आज्ञा राणी सरकार,असं म्हणून तो उठला आणि आवरण्यासाठी गेला..

अवी थकलेला वाटतोय..

काय झालं असावं?..

इथं नीट आणि मोकळं बोलता येणार नाही..

आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बोललं पाहिजे..

फ्रेश होऊन परत आलेल्या अवीला ती म्हणाली,

"अवी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय..

आपण नाश्त्यासाठी बाहेर जाऊया का?.."

"चालेल..

मी आईला सांगतो तसं.."

नाश्त्यासाठी बाहेर चाललोय असं सांगून दोघेही बाहेर पडले..

नेहमीच्या कॅफे सम्राट मध्ये गेले..

नाश्त्याची ऑर्डर देऊन निवांत बसले..

"हं,सांग आता..तुला काय बोलायचं होतं महत्वाचं?.."

"ते बोलणारच आहे मी..पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी..

तू असा मलूल का दिसतोयस?..

काय होतंय तुला?..

काही घडलंय का घरात?..

कारण बाबा माझ्याशी नीट बोलले नाहीत..

मला खरं सांग.."

अवी थोडं ताठ होऊन हाताची घडी घालत कसं सांगावं याचा विचार करत बसला..

दोनेक मिनिटं शांतता पसरली..

वैशूनं त्याच्या कलानं घ्यायचं ठरवलं होतं..

ती पण शांत बसली..

"वैशू,त्या दिवशी तू त्या बाईंबद्दल सांगितलंस..

खरं तर मी आईला बघितलंच नव्हतं..

समज आली तेव्हापासून जी समोर दिसली तिलाच आई मानलं..

त्यात आई माझ्याशी इतकं वाईट वागली,त्यामुळं तो विषयच माझ्यासाठी बंद झाला होता..

पण जखमेवरची खपली काढल्यावर जसं हुळहुळतं तसं माझं झालं..तू विषय काढलास, मी तुला गप्प करून घरी गेलो खरा,पण डोळ्यासमोर सतत तू आणि त्या बाई येत होत्या..माफ कर मला,मी त्यांना आई म्हणू शकत नाही..

रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही ..

सकाळी धीर एकवटला आणि सकाळी बाबांच्या समोर बसलो,त्यांना विचारलं..

"बाबा,एक विचारू का?.."

"विचार ना!.."

"मी एकटाच आहे ना?..की मला अजून एखादा भाऊ आहे?.."

असं विचारून मी बाबांकडं बघितलं..

वैशू,बाबांनी एकदम चमकून माझ्याकडं बघितलं..क्षणात बाबांचा चेहरा इतका बदलला..अक्षरशः पांढरेफटक पडले ते..

त्यांना काहीच बोलता येईना..

हा प्रश्न अपेक्षित नव्हता की अजून काय हे त्यांनाच माहीत!..

अचानक जागेवरून उठले आणि आरडाओरडा करत ते म्हणाले,

"डोकं फिरलंय का काय तुझं?तू काय विचारतोयस हे तुला तरी समजतंय का?.."

"इतकं ओरडण्यासारखं काय आहे बाबा?..मी फक्त..."

"चूप!..एक शब्द सुद्धा बोलू नकोस यापुढं!.."

असं म्हणून ते उठून जाऊ लागले..मी आईकडं वळलो..

"आई,हे असे का चिडतायत?..मी तर फक्त विचारतोय की.."

माझं बोलणं तोडत आई म्हणाली,"चांगले पांग फेडतोयस रे बाबा..

आपल्या जन्मदात्यावर शंका घेतोयस.."

मी काही बोलायच्या आत दोघेही तिथून निघून गेले..

पण दोघांच्याही चेहऱ्याचा उडालेला रंग हेच सांगत होता की ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत..

आणि आता तर कालपासून ते माझ्यासमोर पण येत नाहीयेत..

ते निघून गेले आणि मला तुझं बोलणं आठवायला लागलं..

पण खरं काय हे काहीच समजेनासं झालंय..

विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलीय..

वैशू,काय लपवत असतील गं हे माझ्यापासून?..

आणि त्यामुळेच माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय..

वैशूनं अविचा हात हातात घेतला,हलकेच थोपटत ती म्हणाली,

"अवी,तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत..

मी आता तुला जे सांगणार आहे,ते ऐकून तुला खूप धक्का बसणार आहे,कारण आत्तापर्यंत तुझ्यावर जे बिंबवलं गेलंय ते सगळं कसं खोटं होतं हे समोर येणार आहे..

अवी,तू जिला आई म्हणायला नकार देतोयस ना,ती खरंच खूप चांगली आहे..

आई कधी वाईट नसते रे!..

मी प्रत्यक्ष त्यांना भेटून आलेय..

त्यांनी त्यांची बाजू मला सांगितलीय..

असं म्हणून तिनं सगळी गोष्ट हळुहळू सविस्तरपणे अवीला सांगितली..

सांगताना तिला भरून येत होतं,तर अवीची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती..

ती सांगत होती आणि अवीच्या डोळ्यासमोर सगळी कथा जिवंत होऊन दिसत होती...

"अवी,तुला भेटण्यासाठी ती माऊली अक्षरशः तळमळतेय रे!..

गेल्या कित्येक वर्षांपासून तिनं हे दुःख आपल्या हृदयात बंदिस्त केलं होतं..

तुझ्या भावंडांना पण ही गोष्ट माहिती नव्हती,कालच समजलीय..

कसा वियोग सहन केला असेल तिनं तुझा..आपल्याला एक भाऊ आहे हे समजल्यावर

ती  तुझी दोन भावंडं तुला भेटण्यासाठी आतुर आहेत..

तू एकदा भेट त्यांना..

तुला समजेल,आई काय असते आणि भावंडं कशी असतात ते!..

अवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते..पण त्यांना थोपवावं असं त्याला वाटत नव्हतं..

बराच वेळ तो रडत होता...

"थँक्स वैशू,तुझ्यामुळं माझा खरा भूतकाळ तरी समजला मला..

आपण जाऊया भेटायला त्यांना..

पण कसा संपर्क साधायचा त्यांच्याशी?.."

"त्याची काळजी तू नको करुस..

मी नमिताला ,तुझ्या बहिणीला फोन करून आपण येतोय हे कळवते..तिचा नं. आहे माझ्याकडं."

असं म्हणून वैशालीनं नमिताला फोन केला आणि रविवारी भेटायला येते असं सांगितलं..

अगं, तू भेटायला येते म्हणालीस,मी पण सोबत येतोय हे का नाही सांगितलंस?..

अरे,ते सरप्राईज असेल माझं,तुझ्या आई आणि भावंडांना..

बरं बाई,तू म्हणशील तसं.. अवी आता थोडा नॉर्मल झाला होता..

रविवारी सकाळी फोन करून अर्ध्या तासात येते असं कळवलं आणि अवी वैशू मोहिते मॅडमच्या घरी निघाले..

"नमू,त्या डॉ.वैशूने केला असेल का गं काही प्रयत्न?..

भेटवेल का गं ती अवीला?..

"काय माहिती आई?..

ती आल्यावरच कळेल आपल्याला की ती अवीला भेटली की नाही?..

पण ती येतेय म्हणतेय म्हणजे काहीतरी बातमी आणलीच असेल तिनं..

काहीतरी नक्की समजेल आपल्याला..

दादा,तू काहीच बोलत नाहीस!.."

"काय बोलू?..

इतकं अचानक हे सगळं आपल्यासमोर आलंय.. मला तर कसं काय घडलंय हेच समजेनासं झालंय..

पण हे ही तितकंच खरं की मी पण उत्सुक आहे माझ्या छोट्या भावाला भेटायला..आईच्या चेहऱ्यावर आलेला आनंद मलापण बघायचाय.."

आई,गाडीचा हॉर्न वाजला,आली बहुतेक ती..असं म्हणून वैशूनं दार उघडलं..

वैशू आत आली..

"ये गं!..तुझी वाटच बघत होतो आम्ही सगळे.."

नमितानं आणलेलं पाणी पिऊन झाल्यावर मॅडमनी विचारलं..

"भेटला का गं अवी तुला?..

सांगितलंस का त्याला माझ्याबद्दल?..

काय म्हणाला गं तो?.."

"अहो,किती प्रश्न विचारताय?..

सांगते सगळं..".असं म्हणून वैशू गंभीर चेहरा करून खाली मान घालून बसली..

एक एक शब्द सावकाश उच्चारत म्हणाली,

"मी आधी त्याला फोन केला,पण त्यानं उचलला नाही..मग घरी गेले त्याच्या,."

असं म्हणून तिनं आवंढा गिळला..

"त्याला तुमच्याबद्दल सांगितलं, तो ..."

मुद्दामच अर्धवट बोलून तिनं मॅडमकडं बघितलं...

मॅडमच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता...

"पटली नाही त्याला माझी बाजू?..."

"असं नाही..पण..."

"पण काय?..काय म्हणाला तो?..."

"तो म्हणाला....

म्हणाला...

कसं सांगू तुम्हाला?.."

"अगं, काय म्हणाला तो?..

सांग की लवकर.."

"तो म्हणाला,

मला प्रत्यक्षच भेटायचंय.."

"काय?$$..."

असं एकदम सगळेच ओरडले..

"अवी$$,अवी$$..ये आता आत.".

असं वैशू म्हणतेय तोच दारात अवी उभा दिसला..

नमिता,विनय धावले तिकडं......

मॅडम जागेवरून उठल्या आणि दोन्ही हात पसरून हाक मारु लागल्या,

......, ......,

तोंडातून आवाजच निघेना त्यांच्या..

अवीची पण तीच अवस्था होती..

मॅडम जवळ आल्या,तो ही आवेगाने त्यांच्या कुशीत शिरला..

गंगाजमुना वाहत होत्या...

क्षणभर मॅडमना वाटलं,आपला आवाज परत गेला की काय?..

पण ज्या आवाजाची इतकी वर्षं आतुरतेनं वाट पाहिली, तो आवाज आला,

"आई!$$"

लेकाच्या आर्त हाकेने माऊलीनंही मग प्रतिसाद दिला,

"अवी!$$.माझं बाळ!$$"..

मायलेकाच्या भेटीचा अनुपम सोहळा वैशू बघत होती आणि हळूच डोळे पुसत होती..

समाप्त

सौ.सुतेजा फडके

वरील कथा सुतेजा फडके यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post