नाण्याची खरी बाजू

 नाण्याची खरी बाजू     (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ सुतेजा फडके 


'आई,आई$$

अगं कोण आलंय बघ तरी!

आई,बघ ओळखता येतंय का?'..

नुकत्याच शुद्धीवर आलेल्या मोहिते मॅडम डोळे उघडून फक्त बघू लागल्या..

भोवती त्यांची दोन्ही मुलं, नमिता आणि विनय दिसले त्यांना..

पण त्यांच्या शेजारी जी उभी आहेत ती कोण?..आपण नाही ओळखत त्यांना..

त्यांनी बुद्धीला ताण द्यायचा प्रयत्न केला,पण शिणल्या त्या..

नमिता त्यांच्याजवळ आली,तिनं तोंडावरून हळुवार हात फिरवला,आणि कानाजवळ तोंड नेत म्हणाली,'आई,या दोन्ही डॉक्टर आहेत..कालपासून त्याच तुझी काळजी घेत आहेत'...

मॅडमनी उठायचा प्रयत्न केला,पण तितकी ताकदच नव्हती त्यांच्यात..

डॉ.बर्गे जवळ आल्या आणि म्हणाल्या,'असुदे,नका उठू तुम्ही.पडून रहा..

तुम्हाला आरामाची आवश्यकता आहे..

यांना थोड्या थोड्या वेळाने सरबत,ज्यूस देत रहा'.

आम्ही येतो,असे म्हणून डॉ.बर्गेआणि  त्यांच्याबरोबर असलेल्या इंटर्नशीप च्या डॉ.वैशाली पुढच्या पेशंट ना तपासण्यासाठी गेल्या..मात्र जाताना डॉ.वैशाली मागं मागं वळून पाहत काहीतरी तोंडात पुटपुटत गेल्याचे नमिताला जाणवलं.

विनय आणि नमिताला खूप आनंद झाला होता, कारण दोन दिवस शुद्धी बेशुद्धीच्या हिंदोळ्यावर झुलत असलेली त्यांची आई आज पूर्णपणे शुद्धीवर आली होती..

शाळेत शिक्षिका असलेल्या मोहिते मॅडम दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसोबत सहलीला गेल्या होत्या..

नृसिंहपूर,खिद्रापूर,कोल्हापूर अशी दोन दिवसांची सहल होती..

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर दाखवता दाखवता त्यांना काहीतरी दिसले..

खूप घाबरल्या त्या..

अक्षरशः थरथर कापू लागल्या..

अचानक विचित्र बडबड करू लागल्या आणि तिथेच आकडी आपल्यासारख्या वाकड्यातिकड्या होत खाली कोसळल्या..

सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी घाबरून गेले..

तिथंच सहलीला आलेल्यांपैकी काही जणांनी त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी उपाय करून पाहिले..कुणी तोंडावर पाणी मारलं तर कुणी चप्पल हुंगायला सांगितलं..

जमलेल्या गर्दीत डॉ.वैशाली पण होती..ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर पिकनिकला आली होती..

ते दोघेही मेडिकलचे विद्यार्थी होते..

त्यांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं..

पुढं होऊन वैशालीनं सूत्र आपल्या हातात घेतली..

डॉ.अविनाश च्या मदतीनं आधी गर्दी दूर केली..

मॅडम सोबत असलेल्या सहकारी शिक्षकांना धीर दिला..त्यांना मुलांना घेऊन बाजूला झाडाखाली बसायला सांगितलं..

मॅडमना सुद्धा सावलीत आणलं..त्यांची नाडी तपासली..तातडीनं दवाखान्यात नेणं गरजेचं होतं..

एकीकडं ऍम्ब्युलन्स ला फोन करत दुसरीकडं शिक्षकांच्या मदतीनं मॅडमच्या नातेवाईकांना फोन केले..

ऍम्ब्युलन्स येताच कोल्हापूर गाठत त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं..

डॉ.वैशाली त्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशीप करत असल्यामुळं उपचारासाठी विलंब लागला नाही..

मॅडमची दोन्ही मुलं हॉस्पिटलमध्ये पोचली..

कशाचा तरी जबरदस्त धक्का त्यांना बसला असावा असं डॉ.चं म्हणणं पडलं..नेमकं काय घडलं हे कुणालाच सांगता येत नव्हतं..काय घडलं हे फक्त मोहिते मॅडमच फक्त सांगू शकत होत्या..

गेले दोन दिवस डॉ.नी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज मॅडमनी डोळे उघडले..

थोडा ज्यूस पोटात गेल्यावर त्यांना तरतरी आली..

शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळं त्या अगदी गळून गेल्या होत्या..

दुपारी पुन्हा डॉ.वैशाली भेटीला आली..

केसपेपरवर पाहून घेतले..

नमिता आणि विनय तिथंच होते..

नमिताशी बोलावं की नको अशा मनस्थितीत एक दोन मिनिटं गेल्यावर तिनं नमिताला बाजूला बोलावलं आणि विचारलं,

'तुझं पूर्ण नाव काय?'

'का हो डॉक्टर?'..

नाही,असंच विचारलं..

'नमिता समाधान कदम'.

'मग तुझ्या आईचं?..मोहिते?'...

'डॉक्टर, आईचं माहेरचं नाव शाळेत आहे..तेच नाव इथं दिलं गेलंय'..

आता वैशालीच्या मनात जी शंका होती तिला बळकटी मिळाली..

तिनं मनातल्या मनात चुटकी वाजवली आणि मी आलेच म्हणून तिथून निघाली..

अवीला भेटायलाच हवं असं मनाशी ठरवून तिनं ऍक्टिव्हा काढली आणि निघाली त्याच्या हॉस्पिटलकडं...

मनात विचारांची दाटी झाली होती...

दोन दिवसांपूर्वी जेव्हा मॅडमना इथं भरती करण्यासाठी आपण त्यांच्यासोबत आलो..

अविनाश त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेला..

मॅडमची मुलं समोर आली आणि आपल्याला आश्चर्यच वाटलं..

नमितापेक्षा तिचा भाऊ विनय आणि अविनाश किती सारखे दिसतात..

चालण्याची लकब,हावभाव अगदी सारखे..

रंगही तसाच,सावळा..

पण आपल्याला वाटतेय ते कसं खरं असेल?..

म्हणजे..नाव तर तेच...बाबांचं..

समाधान..आडनाव पण तेच,कदमच..

पण अवी तर म्हणतो,तो एकटाच आहे..

त्याला बहीण भाऊ नाहीत..

आणि त्याची आई तर....

आपण किती तरी वेळा गेलोय त्यांच्या घरी..

आई बघितलीय, बाबा बघितलेत,अगदी आजी सुद्धा..

दोघांनी एकमेकांना पसंत केल्यावर त्यांच्या घरी नेलं होतं अवीनं...

जास्त बोलले नाहीत त्याच्या घरचे,पण विरोधही नाही केला..

आपल्या घरचा तर प्रश्नच नव्हता..

एकटे बाबाच..

त्यांनी आपल्याला मोकळीक दिली..

अवी आवडला त्यांना..

थोडा कमी बोलणारा पण प्रचंड हुशार..

आपणही त्याच्या हुशारीवरच तर आधी फिदा झालो होतो..

तो आपल्या मागं लागण्याऐवजी आपणच त्याच्या मागं लागलो..

मितभाषी असला तरी प्रेमळ मात्र खूप आहे..

मेडिकल क्षेत्रातलं बोलायला लागलं की ऐकत रहावं..

पण घरच्यांबद्दल बोलायला नाखूष असतो..

घरचेही तितके मोकळे वाटले नाहीत..

विचारांच्या धुंदीत ती कधी अवीच्या हॉस्पिटलमध्ये पोचली तिलाच समजलं नाही..

अवी नुकताच राऊंड घेऊन आला होता..650

वैशालीनं गडबडीनं त्याला बाहेर बोलावलं...दोघेही आवारात असलेल्या वडाच्या झाडाखाली बसले..

'अवी,एक विचारू?'

'काय?..इतक्या घाईघाईनं आलीस,आणि लगेच प्रश्न?..आज काय वेगळाच मूड दिसतोय तुझा!'..

'हे बघ,मी आज खरंच चेष्टेच्या मूडमध्ये नाहीये'..

'बरं बाई,विचार काय विचारायचंय?'

'खरं सांग,तुला बहीण भाऊ आहेत का?'..

'वैशू, मी तुला आधीच याचं उत्तर दिलंय..

मी एकटाच आहे..मला बहीण,भाऊ नाहीत..

आज तुला का पुन्हा हा प्रश्न विचारावा वाटला?'..

'अवी,त्या दिवशीच्या मोहिते मॅडम आठवतात,खिद्रापूरला बेशुद्ध झालेल्या'..

'न आठवायला काय झालं?..दोन दिवसांपूर्वीचीच तर गोष्ट आहे ती..

तू त्यांच्यासोबत गेलीस आणि आपलं पिकनिक'......

'बरं बरं.. ते महत्वाचं नाही..मी सांगतेय ते ऐक'..

असं म्हणून वैशालीनं तिला जे दिसलं,जे वाटलं ते सगळं अवीला सांगितलं..

विनयचं दिसणं,बाबांचं नाव,आडनाव त्यातला सारखेपणा हे सगळं ती सांगत होती आणि अवी हळुहळू तिची नजर चुकवत खाली बघत होता..

'अवी,आता तरी खरं सांग..इतकं साम्य कसं असू शकतं?..

एकवेळ नाव,आडनाव असू शकेल सारखं, पण दिसणं!..ते कसं?'..

अवी काहीच बोलत नव्हता..

'खरं सांग अवी..काय प्रकार आहे?..

तू माझ्यापासून काय लपवतो आहेस?'..

'ऐक वैशू...

खरं तर मला नव्हतं सांगायचं..खूप वाईट बालपण होतं माझं..

माझी आई मला एकट्याला सोडून गेली..

माझे बाबा तिला आवडत नव्हते..

तिला पैसा प्यारा होता आमच्यापेक्षा..

शेतकरी नवऱ्याची लाज वाटायची तिला..

मी अगदी तान्हा होतो..

मला ती आठवत सुद्धा नाही..

आधी आजीनं मला सांभाळलं..नंतर बाबांनी दुसरं लग्न केलं..

काकूच्या बहिणीबरोबर..

तीच माझी आई आहे..

पण तू म्हणतेस तशी मला भावंडं असल्याचं माझ्या बाबांनी किंवा आजीनं मला कधी सांगितलं नाही..

तिनं कदाचित दुसरं लग्न केलं असेल..

तिची ती मुलं असतीलही..

पण मी तिला आई मानत नाही आणि आता हा विषय बंद कर'..

'अरे पण अवी..तो विनय तर'..

'बास.... यापुढं हा विषय नको..

मला घरी जायचंय..

आपण उद्या भेटू'.असं म्हणून वैशालीला एकटं सोडून अवी तिथून निघून गेला..

काहीतरी चुकतंय.

अवी म्हणतो तसं असेल तर विनय लहान हवा..

पण मला तर तो आणि नमिता सुद्धा मोठे वाटले...

नक्की काय प्रकार आहे?..

याच्या मुळाशी जायलाच हवं असा विचार करत वैशाली परत फिरली..

आज कालच्यापेक्षा मोहिते मॅडमची तब्येत खूपच सुधारली..

त्या उठल्या..स्वतःचे स्वतः आवरले..

मुलांशी गप्पा मारल्या..

जेवणही व्यवस्थित केलं..

डॉ.म्हणाले,'आता तुम्ही घरी जायला हरकत नाही,आज सुट्टी मिळतेय तुम्हाला'..

विनय आणि नमिताची धांदल उडाली..

बील भरून ते आईला घेऊन जायच्या तयारीत असताना वैशाली आली..

नमिता म्हणाली,'डॉ.तुमच्या प्रयत्नांमुळं आईला लवकर उपचार मिळाले..तुमचे खूप खूप आभार'..

मॅडमनी सुद्धा वैशालीला जवळ बोलावलं..

'डॉ.तुम्ही खूप केलंत हो..एखादे दिवशी या आमच्या घरी..इथून जवळच आहे आमचं घर'..

'मॅडम,माझ्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती,जिनं तुम्हाला मदत केली'..

'मग त्यांना पण घेऊन या तुमच्यासोबत..

कोण आहेत ते?'..

'अविनाश समाधान कदम 'असं वैशू म्हणताच मॅडमचा चेहरा पांढराफटक पडला..

'पुन्हा सांग नाव?'..

विनय म्हणाला..

'अविनाश समाधान कदम',वैशूने पुन्हा नाव प्रत्येक शब्दांवर जोर देऊन सांगितलं..

मॅडम एकदम हंबरडा फोडून रडू लागल्या..

त्यांच्या डोळ्यासमोर खिद्रापूर,ते मंदिर आलं..

विद्यार्थ्यांना मंदिराची माहिती गाईड सांगत होता..एकेक खांब बघत सगळे पुढं जात होत..इतर लोकही त्यात होते..

त्यातच तो समोर आला..

अगदी तरुणपणातला समाधानच..

तीच अंगकाठी,तोच चेहरा...

आणि त्यांना आठवला तो प्रसंग...

आत्ताही त्यामुळेच त्या रडू लागल्या..

अचानक आईला काय झालं हे मुलांना समजेना..

'आई,रडू नकोस..

काय झालंय?..

या नावाशी तुझा काय संबंध आहे?..

जरा शांत हो आणि सांग आम्हाला..

असं रडलीस तर कसं समजणार गं?'...

नमितानं असं म्हणताच वैशालीही पुढं झाली..

'मॅडम,काय आहे हा प्रकार?..मलासुद्धा हे माहिती हवंय..कारण मीसुद्धा या नावाशी जोडली गेलेय'..

मॅडमनी थोडं पाणी पिलं..

दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागल्या..

मी नयन..सांगलीच्या मोहिते पाटलांची मोठी मुलगी..

माझ्या पाठीवर अजून तीन बहिणी आणि दोन भाऊ..

घरची बरीच शेती..पण बागायती कमी..पण खाऊनपिऊन सुखी असं आमचं कुटुंब..

वडिलांना म्हणजे अण्णांना एकच बहीण..

भावाची लाडकी..कोल्हापुरात दिलेली..मोठं तालेवार कदम घराणं..

दोन्हीकडं आत्याचं चालायचं..तिच्या मोठ्या मुलाला मला द्यायचं वचन अण्णांनी दिलं होतं..

मी शाळेत हुशार होते..

दहावी नंतर डी. एड.केलं आणि लगेच शाळेत लागले शिक्षिका म्हणून..

लगेच अण्णांनी लग्न करून दिलं..

मला नोकरी सोडायला लावली आत्यानं..

तालेवार घर कदमांचं,पण मुलाचं कर्तृत्व शून्य..

दिवसभर मित्र,पत्ते यात रमायचं.. रात्री मर्दुमकी गाजवण्यापूरतं जवळ यायचं..

आत्याजवळ विषय काढला तर ती मलाच नावं ठेवायची..

तो लहान आहे,येईल समज हळुहळू असं म्हणून अण्णा मला समजवायचे..

विनय,नमिता आणि अविनाश तीन मुलं जन्माला घालूनसुद्धा त्यांच्या रंगिल्या स्वभावात फरक नाही पडला..

सतत वाद व्हायला लागले..

शेतीचा तुकडा विकत घर भागवायचं असं सुरू झालं..

दीर वेगळे निघाले..पण जाऊबाईंची बहीण यांना आवडू लागली..

आपलं कसं होणार याविचारानं मी रात्रंदिवस झुरू लागले..

तान्ह्या अवीला दूध पाजायला अपुरी पडू लागले..

एकदा अण्णा भेटायला आले,त्यांनी हे सगळं डोळ्यानं बघितलं..मला घेऊन तडक सांगली गाठलं..

दोन,तीन महिने मी माहेरीच राहिले..

पण न्यायला कुणी आलं नाही..

एक दिवस अचानक हे दारात हजर झाले..

मुलांना न्यायला आलो म्हणाले...

अण्णा म्हणाले,'मी पाठवतो,पण तुमचा खुशालचेंडूपणा जाणार आहे का?..

माझी पोरगी कशी होती?..तिचं वाळलं चिपाड केलंत तुम्ही..

मुलांचं भविष्य काय?..

तिची नोकरी होती चांगली,तर सोडायला लावलीत,स्वतः काहीच करत नाही..असं कसं चालेल?'

एवढं बोलल्यावर त्यांना राग आला..

'माझी बायको,माझी पोरं.. मी कशीही सांभाळीन..तुम्ही विचारणारे कोण?.. म्हणून हुज्जत घालू लागले..

तान्हा अवी माझ्या पदराखाली होता...

'आत्ताच्या आत्ता माझी मुलं मला दे,तू यायचं तर ये नाहीतर नको येऊस,' असं म्हणून ते माझ्या मांडीवरून अवीला ओढू लागले..

तो बिचारा दूध पिता पिता ओढताणीमुळं जोरजोरात टाहो फोडून रडू लागला...

शेवटी माणसाची ताकद बाईपेक्षा जास्तच...

त्यांनी निर्दयपणे अवीला ओढलं आणि निघाले..

मी उठून उभी राहिपर्यंत बाहेर सुद्धा पडले...

'नका हो नेऊ माझ्या अवीला$$'...असं जोरजोरात ओरडत मी अंगणात धावले,पण हाय रे दुर्दैव!..

माझा आवाजच निघेना..

अण्णा मागून येइपर्यंत ते लांब ढांगा टाकत गेले सुद्धा...

दोन चिल्ली पिल्ली माझ्याजवळ सोडली आणि तान्ह्या अवीला माझ्यापासून तोडून घेऊन गेले..

तिकडं ते माझा तान्हा घेऊन गेले आणि इकडं माझं स्वरयंत्र बंद झालं..

जवळपास चार महिने मला बोलता येत नव्हतं..

पाण्यासारखा पैसा खर्च करून अण्णांनी माझे उपचार केले..

चार महिन्यांनी शेवटी बाळाच्या ओढीनं अण्णांसोबत मी कोल्हापूर गाठलं..

घरात तर येऊच दिलं नाही..आत्या भर घालत म्हणाली,

'चार महिने कशी राहिलीस, आता जन्मभर रहा', म्हणत दार लावून घेतलं...

अवीला एकदा बघूद्या म्हणून हातापाया पडलो पण त्याला जाऊबाईंची बहीण घेऊन त्यांच्या घरात जाऊन लपून बसली..

दिवसभर बिना अन्नपाण्याचे राहिलो आम्ही..मुलांची पण कीव आली नाही त्यांना..

शेवटी पोटचा गोळा डोळ्यांना सुद्धा दिसू दिला नाही त्या नीच लोकांनी..

निराश मनाने आणि रिकाम्या हाताने परत आलो..

आता पुन्हा तिथं जायचं नाही असं ठरवून टाकलं..

माझ्या मुलांचाआणि माझा वडिलांवर भार नव्हता टाकायचा मला..

मी प्रयत्न करून पुन्हा नोकरी मिळवली..

कायदेशीररित्या विभक्त नव्हतो झालो आम्ही,तरीही जावेच्या बहिणीबरोबर लग्न केलं त्यांनी..

खरं तर गुन्हा होता हा,पण माझ्यात आता लढण्याची इच्छा नव्हती..

कोणत्याही प्रकारे त्यांचं तोंड बघायचं नव्हतं मला..

अवीच्या आठवणीनं कित्येक रात्री तळमळत काढल्यात..

माझ्या डोळ्यासमोर तो छोटा तान्हा अवीच आहे..

नंतर इतर नातेवाईकांकडून तिकडच्या बातम्या कळायच्या..लग्नकार्यात त्याला कधीच येऊ दिलं नाही..

तो माझ्या नजरेसमोर येणार नाही याची पुरेपूर काळजी आत्या आणि त्यांनी घेतली..

मी पण मग स्वाभिमानाने मुलांना वाढवलं..

विनय इंजिनिअर झालाय,तर नमू प्राध्यापिका..

अवी?'..

'तो डॉक्टर झालाय मॅडम!'..

'किती वर्षांत पाहिलं नाही त्याला..

त्या दिवशी तो समोर दिसला पण मी ओळखू शकले नाही त्याला..पण नवऱ्याचेच हुबेहूब रूप बघून तो प्रसंग डोळ्यासमोर मात्र आला आणि पुढं काय झालं ते समजलंच नाही...

मी किती दुर्दैवी आहे,माझं बाळ माझ्यासमोर येऊनसुद्धा मला ओळखता नाही आलं..कधी भेटेल तो मला?'..

असं म्हणून मॅडम पुन्हा ओक्साबोक्शी रडायला लागल्या..

सगळे निःशब्द झाले होते..

त्यांना शांत होऊ देणं गरजेचं होतं..

थोड्याशा शांत झाल्यावर त्यांनी वैशालीला विचारलं..'पण तू अवीला कशी ओळखतेस?'..

वैशाली म्हणाली,'मी आणि अवी लग्न करणार आहोत..

मी तुमची होणारी सून आहे'...

त्यांना नमस्कार करून ती म्हणाली,'मॅडम,तुमच्या मुलाची आणि तुमची भेट घडवून आणण्याची जबाबदारी आता माझी..

मला आशीर्वाद द्या..

मॅडमच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या..

विनय आणि नमिता हे सगळं ऐकून अचंबित झाले होते..

आपल्या आईनं किती सोसलंय या विचारानं त्यांचेही डोळे ओलावले..

आणि धाकट्या भावाला भेटायला मिळणार म्हणून त्यांना आनंदही झाला..

मॅडमनी वैशालीला पोटाशी धरलं आणि म्हणाल्या,नक्की करशीलच तू हे..

त्या विश्वनियंत्यानंच पाठवलं तुला..

त्याच्याजवळ न्याय आहे...

वैशाली अवीला भेटायला आतूर झाली..

नाण्याची दुसरी बाजू तिला समजली होती..जी खरी होती..

ती बाजू अवीला सांगणं गरजेचं होतं..

तिची जबाबदारी वाढली होती..

'मॅडम तुम्ही निर्धास्तपणे घरी जा..

लवकरच तुमचा अवी तुम्हाला भेटेल,'असं म्हणून ती निघाली पुढच्या कामगिरीवर..

कामगिरी ओळखली असेलच..

मिशन मायलेक भेट...

सौ.सुतेजा सुनीलदत्त फडके

Post a Comment (0)
Previous Post Next Post