खरी मानकरी

   खरी मानकरी (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍🏻 सौ. मंजुषा गारखेडकर

                  आज  मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर लगेच आवरा आवर केली आणि लगेच छोटी बॅग घेऊन निघालो. जवळच स्टेशनवर रिक्षा मिळाली. जाताना घरोघरी तिरंगा लावलेला दिसत होता, कुठे तिरंगी फुग्यांच डेकोरेशन केलेलं दिसतं होत, चौका चौकात देशभक्तीपर गाणी लावली होती. सरकारी इमारतींवर तिरंगी दिव्यांची रोषणाई केलेली होती. सगळं कसं देशभक्तीमय वाटत होतं. देशभक्ती अंगात भिनली आहे असं वाटतं होतं. आजादी का अमृत महोत्सव सगळ्यांनी जरा जास्तच मनावर घेतला होता.
        स्टेशन कधी आलं मला कळलंच नाही. स्टेशन वरही फुगे आणि फुलांच सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. गाडी कधी येते याची मी वाट पाहत होतो. लवकर पोचलो तर रात्री जरा विश्रांती घेता येईल. शिवाय मला जरा आपल्या भाषणाचा सरावही करायचा होता. काही मुद्दे काढून ठेवले होते त्यासाठी. दुसऱ्या दिवशी जायचं होतं ना मला झेंडावंदनाला प्रमुख पाहुणे म्हणून...'आझादिका  अमृत महोत्सव' असल्याने भाषणही जोरदार असायला हवं ना....
      गाडी आली तसे सगळे घाई घाईने गाडीत चढले. मला जवळच्याच एका लहानशा गावी स्वातंत्र्य दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून जायचे होते. गाडी हळूच निघाली. मीही माझ्या विचारांमध्ये गुंतून गेलो. चालता चालता गाडीची चाल मंद झाली तशी माझी तंद्री भंग पावली. एक लहानस स्टेशन आलं होतं. गाडी थांबली तशी एक म्हातारी आजी दोन लहान मुलांना घेऊन गाडीत चढली. एक अगदीच लहान आजीच्या कडेवर तर एक मुलगी दुसरी तिसरीत असावी. आजी चढली तसं लोकांनी कटकट करायला सुरुवात केली... हा रिझर्व्हेशन चा डबा आहे इथे कुठे आलात तुम्ही....आजी म्हणाली,"अरे बाबा या लेकरांना घेऊन मी म्हातारी कुठं जाऊ?? समोर जो डब्बा आला तिकडं चढली बाबा... माफ कर मला..." तसे सगळे गप्प बसले..पण म्हातारीवर उपकार केल्याची भावना मात्र होतीच सगळ्यांच्या डोक्यात...
        जरा वेळाने म्हातारी जवळचं लेकरू रडू लागले. म्हातारी त्याला समजावत होती पण काही केल्या ते ऐकेना... सगळे परत म्हातारीवर डाफरयला लागले... माझी पण चिडचिडच झाली. मला भाषणाची तयारी करायची होती ना....ती खूप प्रयत्न करत होती... शेवटी ती त्या पोराला घेऊन उभी राहिली. तरी पोराचं रडणं थांबेना. ती तरी बिचारी काय करणार?? मी त्या पोराला बिस्कीटं दिली, पाणी प्यायला दिलं तेव्हा तो गप्प बसला. बरोबरची पोरगी बिचारी तशीच झोपून गेली... लहानस लेकरूच ते...
        माझं स्टेशन आलं. तसं मी माझं समान घेऊन उतरायला लागलो. म्हातारीने त्या पोरीला उठवलं. तिलाही त्याच स्टेशनवर उतरायचं होतं. पोराला कडेवर घेतलं अन् पोरीचा हात तिने धरला.पोरगी झोपेतच होती. जवळ एक गाठुड पण होत. कशी बशी सावरत ती दाराकडे निघाली. मी तिला मदत म्हणून त्या पोरीला कडेवर घेतले आणि तिचं सामनही घेतलं. म्हातारी उतरल्यावर तिचं समान आणि पोरगी तिच्या हवाली केली आणि माझ्या मार्गाला लागलो. मला उगीचच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वंध्येला खूप मोठं काम केल्यासारखं वाटत होतं. रेल्वेच्या अंधुक उजेडात मला म्हातारी आणि पोरांची  तोंडं नीटशी दिसली नव्हती. भराभर चालत मी माझ्या ठिकाणी पोचलो. झाली घटना मी नंतर विसरून गेलो.
        पहाटे उठून आवरा वर केली आणि गाडीची वाट पाहत बसलो. शाळेचे लोक गाडी पाठवणार होते. गाडी बरोबर सात वाजता माझ्या विश्रांतीगृहा समोर हजर होती. मी माझा कोट नीट केला आणि त्यावर एक छोटासा झेंडा लावला. अभिमानाचा दिवस होता आजचा. सकाळी सकाळी रस्त्यावर जागोजागी देशभक्तीपर गीतं लावली होती. ऊर कसा अभिमानाने भरून गेला होता. गाणी ऐकून देशाभिमान कसा उफाळून आला होता. शाळकरी मुलं रस्त्याने नीटनेटके परिटघडीचे गणवेश घालून शाळेकडे निघाली होती. किती उत्साह होता त्यांच्यात.... कोणी स्वागत गीत म्हणणार होतं तर कोणी भाषण देणार होतं, कोणी स्वातंत्र्य संग्रामात लढवय्यांच्या शुरपणाच्या कहाण्या सांगणार होतं तर कोणी देशभक्तीपर गीत गाणार होतं. ही पिढी म्हणजे उद्याचे देशाचे आधारस्तंभ.... अगदी असेच असावे असं मला वाटून गेलं. सगळ्या रस्त्याने मुलांचा गलका ऐकू येत होता. आमची गाडी शाळेच्या रस्त्यावर पोचली होती. मला आज ज्ञानेश्वर विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. अशी ही माझी पहिली वेळ नव्हती पण आज पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाला मी प्रमुख पाहुण्यांचे पद भूषविणार होतो.
       आम्ही तिथे पोहोचलो, तिथे हेडसर आमची वाटच पाहत होते. त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही ऑफिसच्या दिशेने निघालो. ऑफिसमध्ये आमची व्यवस्था केली होती.  तिथे हेड सरांनी माझी इतर सगळ्यांशी ओळख करून दिली. तोपर्यंत झेंडावंदनाची सगळी तयारी झाली होती. शिपाई बोलवायला आला तसे आम्ही ग्राउंड वर निघालो. ग्राउंड वर झेंडा वंदना ची सगळी व्यवस्था चोख होती. झेंड्याच्या सभोवती फुलांची सुंदर रांगोळी काढली होती. झेंडा योग्य पद्धतीने घडी घालून दोरीला अडकवून ठेवला होता. जवळच एका तबकात नारळ, फुले, अगरबत्त्या,हळदी, कुंकू सगळं कसं नीटनेटकेपणाने ठेवलं होतं. क्रीडा  शिक्षकांनी जोरात आरोळी देऊन सावधान विश्राम च्या ऑर्डर दिल्या. आम्ही सर्वांनी मिळून पूजा केली आणि मी दोरी ओढून झेंडा फडकवला.  त्यानंतर राष्ट्रगीत झाले ते सुद्धा अगदी वाद्यांच्या गजरात आणि तालासुरात. किती अभिमानाचा क्षण होता तो माझ्यासाठी. मी आज माझ्या हस्ते राष्ट्र ध्वज फडकवला होता. लहान पणापासून दरवर्षी झेंडावंदनाला हजर असायचो पण स्वहस्ते कधी झेंडावंदन केले नव्हते.
        आता स्वागत गीताला सूरवात झाली. ते सुद्धा सुरेल. त्यानंतर एका मुलाने खड्या आवाजात देशभक्तीपर गीतं गायलं. आजचा दिवस कसा छान उगवला होता. सकाळ पासून प्रसन्न वातावरण आणि त्यात ही गुणी मुलं... भारवून गेलो होतो मी... मग एका मागोमाग एक मुले येत होती भाषणे देत होती. बिचारे किती तरी दिवसांपासून त्याची तयारी करत असतील. सगळी माहिती जमवून भाषण लीहेपर्यंत आणि ते सादर करेपर्यंत किती मेहनत घेतली असेल त्यांनी.
       मला माझ्या लहानपणचे दिवस आठवले. मी ही लहानपणी वडिलांसह बसून भाषणाचे मुद्दे ठरवीत असे. तेव्हा इंटरनेट नसल्या मुळे मोठे आणि पुस्तकांच्या मदती शिवाय हे शक्य होत नसे. आमच्या वडीलांचं वाचन दांडग असल्याने ते सहज मुद्दे सांगायचे. हे सगळं ते खूप उत्साहाने करायचे. मग त्यांच्याच मदतीने सगळे भाषण लिहून झाले की वाचन करून काही कमी जास्त हवे का यावर चर्चा असायची आणि शेवटी पाठांतर असायचे. या मुलांची तयारी मात्र माझ्यापेक्षा खूपच जास्त वाटत होती. आजकालची मुलं फारच धीट आहेत असं मला वाटून गेलं. आपल्यात तो धिट पणा नव्हता. बुजरे होतो आपण... पण या मुलांचा धीटपणा, मेहनती वृत्ती हे गुण जपले गेले पाहिजे असंही मला वाटून गेलं.
         एकेकाची भाषणं सुरू होती. तितक्यात एक लहानशी मुलगी जरा चुरगळलेल्या गणवेशात पुढे आली. वाटलं ही चिमुरडी काय बोलणार?? पण तिने,"आदरणीय प्रमुख पाहुणे....... अशी सुरवात करून, आपले शुर विर सैनिक आपल्यासाठी कसं बलिदान देतात आणि त्यामुळे आपण कसे सुरक्षित राहू शकतो हे एका छोट्याशा गोष्टी द्वारे सांगितलं." मी तर भारवूनच गेलो. ती एवढीशी चिमुरडी स्पष्ट आवाजात आणि मोठ्या आत्मविश्वासाने सगळं बोलत होती.
         कार्यक्रम संपल्यावर मी तिच्या विषयी हेड सरांना विचारलं आणि मी तिला भेटायची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा हेड सरांनी तिला बोलावून घेतलं. तिच्या सोबत तिची आजी पण होती. तिच्या आजीला तिच्या पालकांबद्दल विचारले असता तिने सांगितले की,"अवो सर मीच तिची पालक हाय. बोला की काय काम व्हतं??" "अहो तसं नाही आजी, मुलीचे आई वडील असतील ना??"मी. "अवो ती माय संगट ऱ्हाते." "मग तिचे आई वडील?? ते कुठे असतात?" मी. "आवो काय सांगू सर तुम्हास्नी पोरीचा बाप मिलिटरीत सैनिक होता. काश्मीर मधी लढता लढता सत्ताविसाव्या वर्षी शहीद झाला. लई चांगलं पोरगं होतं. देश सेवा करायच लई म्हणजे लईच मनात व्हतं तेच्या. लई मनमिळाऊ लोकांला मदतीला धाऊन जायाचा. कधी पण सांगा कोनत्या पन कामासाठी तयार असायचा. गावात आला की गावातल्या पोराईला देशसेवेच म्हत्त्व सांगायचा. त्यानला देशासाठी लढताना कोणत्या परसंगांना तोंड दिलं ते  सांगायचा. काय यायचा अंगाव. पोरांनला चांगल्या चारदोन गोष्टी शिकवायचा. देशासाठी लई सोसलं त्यानं. लई हाल झालं त्याचं. गोळ्यांनी पूर्त्या चिंधड्या चिंधड्या झालत्या पोराच्या. कसं सईन केलं असलं पोरंनं?? गुंडळून आनला तेला. आजी डोळे पुसत सांगत होती." सगळं चित्र जणू काही तिच्या डोळ्यासमोर घडतंय.  त्या पोरांची माय त चक्कर यीऊन पडली त शुद्धीवराच यीना. मंग डाक्टर आणले थे मने का ही बी गेली हाट अटॅक नं. दोन गोजिरवाने लेकरं मागं ठीऊन गेली दूरदेशिला. कोणाकड पाहतील लेकरं ती?? दोघांचा सरकारी इतमामात विधी झाला. लई उर भरून आला सायेब. पोरांकड पाहून लईच रडू ये. पोरं बिचारी लईच ल्हान व्हती." म्हातारी डोळं पुसत म्हणाली. "तुम्ही त्यांची आजी आहात का?" मी.  "तसच समजा... मयाच जवळ राहत्यात ते लेकरं." "म्हणजे मी समजलो नाही" मलाही उत्कंठा लागली होती. "आई बापाचे दिवस झाले तवर गावातले लोकं करायचे समद... समदे नातलग गेले निघून शान..... कोनीच निना पोरानला. मंग म्याच ठरोल आपनच थ्या लेकरांसाठी उभं राहाचं. या देशाचा सेवक त्यो, त्याचे लेकरं काय रस्त्यावर राहतीन काय?? आपनच त्यांचं मायबाप व्हायाचं.अव ती पोरं देशासाठी लढत्यात, माय बाप लेकरं बाळं समद्यासनी सोडून जात्यात शिमेवर लढायला. भूक न्हाई का तहान न्हाई झपाटल्यागत देशासाठी लढत्यात. सन न्हाई की वार न्हाई... लगीन न्हाई काय कार्य न्हाई... मजा मस्ती त दूरच...  पोरं पन बिचारे बापाच्या सुखा पासून लई दूर असत्यात. बाप असून  बिना बाप असल्यागत जीवन जगत्यत..... बाईकुच म्हणाल त ती बिचारी सगळं घर सांभाळीते. कशासाठी त नवरा मिलिटरीत देशाची सेवा करतो म्हनून.... सारं काई सईन करते... तिचं कष्ट कोनी धेनात घेत न्हाई....त्या पोराचं काय चुकलं.... त्यो बिचारा गेला लढायला सारी सुखं बाजूला सारून... त त्याच्या पोरांच्या नशिबी काय रस्त्याव रहान असावं काय??त्यो  खरा शेवक हाय देशाचा... पोरांची आबाळ झाली तर त्यो माफ करील काय आपल्याला.... अन् कोनी त्यापुढ जाईन का मिलिटरीत?? म्हनून म्या ठारोल की ह्या पोरानले आपण सांभाळायचं.... चांगलं मोठं कराच. मले बी कोनी न्हाई. माझं पोरग बी तेविसाव्या वर्षी शहीद झालं देशासाठी. त्याची लेकरं असती त म्या संभाळीच असती का नाय? माह लेकरु गेलं म्हणून म्या लई रडले बागा सायेब, पण या पोराइचं त सगळंच गेलं. त्यानला त काई बी समजत नाय. देवाघरची फुलं हायती. म्या त्यानला लई मोठं करनार हाय. त्यांचं सगळं झाल्या बिगर प्राण नाई सोडायची मी. काल गावाकड गेलती म्या पन पोरीचं भाषन होतं म्हणून शान रातच्याला आली बगा रेल्वे गाडीन." म्हणजे काल माझ्या बरोबर आली ती हीच आजी होती. मी खात्री करून घेतली. आणि मनातल्या मनात खजील झालो. मला वाटलं होतं की तिला रिझर्व्हेशनच्या डब्यात बसू देऊन आणि गाडीतून उतरायला मदत करून आपण खूप मोठं काहीतरी केलं. पण त्या आजीने दाखवलेल्या धाडसाची गोष्ट ऐकवून चांगलीच माझ्या कानशिलात लगावली होती. धन्य ती आजी. स्वतःचं दुःख विसरून त्या लहानशा लेकरांचं पालकत्व त्या अशिक्षित आजीने किती सहजतेने स्वीकारलं आणि शिवाय त्याचा उल्लेख करण्याचीही तिची इच्छा नव्हती. आम्ही विचारलं नसतं तर तेही तिने सांगितलं नसतं. अशा माता आहेत हेच भारताचं वैभव आहे. शतशः नमन त्या आजीला..... वय हा फक्त आकडा असतो हे तर आजींनी सिद्ध केलच पण मनाची श्रीमंती हीच खरी हे ही दाखवून दिलं. खरं तर ती आजीच आजच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाची खरी मानकरी होती. 

सौ मंजुषा गारखेडकर ©®

3 Comments

  1. वाह मस्त कथा ! सुंदर मांडणी !

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच छान कथा... सुंदर फुलवली

    ReplyDelete
  3. खूप छान कथा, अशा देशभक्तीला शतशः नमन 🙏🙏

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post