खिडकी

 

खिडकी...   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

©️®️ दीपाली थेटे-राव

 'का हा असा मनाला वेडा चाळा लागला आहे? किती वेळा ठरवलं.. त्या खिडकीतून नाही बघायचं तरीही परत परत नजर जातेच.


 आणि हा तरी..कधीही बघा.. आहेच.. सतत.


काम-धंदा करतो की नाही कोण जाणे?' 


पहात राहतो नुसताच एकटक.. या खिडकीतून.. 


आरपार..


आपल्या मनाच्याही...


कसंनुसं होऊन जातं.


रजनीशला जाऊन सात वर्ष झाली...


 याआधी कधीही अशी वेडेपणाने वागण्याची संधी मनाला दिलीच नाही आपण. कित्येक ठिकाणी स्वतःला कठोरपणे सावरलं. 


मग आताच हे असं का घडतंय?'


 मिताचा स्वतःशीच संवाद चालू होता.


' स्वरालीला कळलं तर? जाणती होत आहे तीही आता.'


विचारासरशी केवढ्यानं दचकली ती.


     झटकन मान वेळावत खिडकी लावून टाकली. 


ती नजर तरीही पाठलाग करतच राहिली.


'का हे असं होतं? आपलीही नजर परत परत तिथेच का भिरभिरतीये?'


झटका बसावा तशी बावरली ती.


 'हो.... त्याच्यात आणि रजनीशच्यात साम्य आहे बरंच. 


म्हणूनच तर मन त्याच्याकडे ओढ घेतं सारखं सारखं.


तीच लकब.. तशीच बघण्याची स्टाईल. हेअर स्टाईलही बरीच रजनीशशी मिळतीजुळती. 


त्याचं ते खिडकीतून बघून हळुवार हसणं.. तसंच जीवघेणं.


रजनीश का रे सोडून गेलास मला असा?'


     स्वराली शाळेत गेली होती. घरी मिता एकटीच होती. सुट्टी घेतली होती ऑफिसला तिने. रजनीश आणि तिच्या लग्नाचा वाढदिवस होता आज.  


तिचा बांध सुटला. सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा नजरेसमोर घडत आहेत अशा आठवायला लागल्या.


'मिता आणि रजनीश.. दोघांचा कॉर्पोरेट जॉब. स्वरालीला तिच्या आजोबा-आजीकडे सोडून जायचे दिवसभरासाठी. मिता रोज स्वरालीला आईकडे पोहोचवायची सकाळी ऑफिसला जाताना.


संध्याकाळी ऑफिसमधून येताना दोघांपैकी कोणीही तिला घरी घेऊन यायचे. 


या दिनक्रमाची आता सगळ्यांना सवय झाली होती. 


     आजोबा शाळेत न्यायचे-आणायचे.


आजी आजोबांचीही लाडकी होती स्वरा.


कधी कधी सुट्टी असेल तरी घेऊन जायचे तिला. 


मग रजनीशच्या वेडेपणाला उधाण यायचं आणि मिता सुखावून जायची..


फुलपाखरी रंगबिरंगी दिवस...


प्रेमात बुडालेले...


वेळेचं गणित जमलं की तिघेही गाडी काढून आऊटिंगला जात. 


रजनीश आणि मिता दोघांनाही फिरण्याचं वेड.


फुल टू धमाल.


मज्जानू लाईफ......

    त्यादिवशी मिताला मिटींगमुळे ऑफिसमधून परतायला उशीर होणार होता. स्वरालीला रजनीशच घरी घेऊन जाणार होता.


   मिटिंग संपेपर्यंत जवळजवळ आठ वाजले आणि तिचा फोन खणखणला... 


'रजनीश? 


हा का फोन करत आहे? स्वरालीला घेतलं की नाही यानं?'


विचारातच तिने फोन उचलला. पलीकडून कोणीतरी अनोळखी इसम बोलत होता,


" हॅलो कोण बोलतंय?"


"मी हा फोन ज्यांचा आहे त्यांची पत्नी बोलत आहे. आपण? तेही रजनीशच्या फोनवरून? रजनीश कुठे आहे?"


 "त्यांचा स्टेशनरोडवर अॅक्सीडेंट झालाय. आम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा."


पायाखालची जमीनच सरकली मिताच्या. 


     समोरच जोशी बसले होते. तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून त्यांना लगेच कल्पना आली.


 मिताच्या हातून फोन घेऊन त्यांनी सविस्तर माहिती घेतली. सगळा स्टाफ मिताच्या मदतीला धावला.


पण...


ते हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सगळंच उरकलं होतं. रजनिश होत्याचा नव्हता झाला होता.


आभाळंच कोसळलं होतं.


बातमी मिळताच मिताचे आईबाबाही धावतच हॉस्पिटलमधे पोहोचले.


स्वराली बाबाकडे पाहून रडत होती.


" याला असं झाकून का ठेवल आहे? त्याचं पांघरूण काढ ना. त्याला नाही आवडत असं तोंडावर पांघरून घेऊन झोपायला." 


ती सारखी रजनीशकडे पळायला बघत होती.


कोण कोणाला सावरणार होतं? सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता....


दिवस सरत होते.रजनीशची आठवण मन पिंजून काढायची...


कधी घरी तो लवकर आला तर तिच्यासाठी तिच्या आवडीचा शिरा करून ठेवायचा... 


त्याचं अवतीभवती वावरणं... त्याचं हसणं.. बोलणं.. त्या दोघींची काळजी घेणं... सांभाळणं...


त्या तिघांचं एक वेगळंच विश्व होतं... एकमेकांत गुंफलेलं...


आता या साऱ्या आठवणींच्या गुंत्यातून कसं सोडवणार होती ती स्वतःला....


स्वरालीकडे बघून मिता कशीबशी दुःखातून सावरत होती.


    तिने रजनीशच्या आठवणी असलेलं ते घरही बदललं. 


त्या घरात, तिच्या आणि स्वरालीच्या मनात ओतप्रोत भरुन राहिला होता तो.... 


    कित्येक रात्री स्वराली जोरात ओरडत उठायची..रडायची..


" बाबा कुठे आहे?


 किती दिवस अजून तसं हॉस्पिटलमध्ये डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपणार आहे ? मला आत्ताच्या आत्ता बाबा पाहिजे."


फारच अवघड होतं मितासाठी हे सगळं. 


पण मित्र-मैत्रीणी आणि आई-बाबांच्या मदतीने ती रेटत होती सगळं. 


आता त्या दोघीही बऱ्याच सावरल्या होत्या.


     कित्येकदा आई-बाबांनी तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढून पाहिला. पण मिता ठाम होती. रजनीश व्यतिरिक्त तिच्या मनातील ती जागा कोणाचीही नव्हती आणि.. 


 स्वरालीही कितपत अडजस्ट झाली असती हाही प्रश्नच होता......


    आठवणींचा पाऊस डोळ्यांतून कधी बरसू लागला तिचे तिलाच कळले नाही.आज हे अश्रू कोणापासून लपवण्याची तिला गरज वाटत नव्हती. 


 रीतं रीतं होऊन जायचं होतं तिला....


    बेल वाजली तशी मिता भानावर आली.


'अरे बापरे! किती वेळ आपण अशाच बसून आहोत आज. साडेबारा वाजलेकी. 


स्वराली आली असेल शाळेतून.'


डोळे आणि चेहरा स्वच्छ पुसत तिने जाऊन दार उघडलं. 


"आई आज तू घरीच? 


म्हणूनच मला आजोबांकडे निरोप देऊन इथे घरीच यायला सांगितलं होतं ना?


बरं वाटतंय ना तुला? का काही होत आहे म्हणून सुट्टी घेतली आज?"


"काही होत नाही ग बाळा. म्हंटलं आज स्वराशी गप्पा मारू.. धम्माल करू...संध्याकाळी छान फिरायला जाऊ. आईस्क्रीम खाऊ.."


स्वरालीला जवळ घेत ती उत्तरली.


"वाॅव! किती मज्जा! आई आज ना खूप मस्ती करू."


हातपाय धुवून आवरून स्वराली जेवायला आली तोपर्यंत मिताने भराभरा थालीपीठं करायला घेतली. गप्पा मारत मारत मस्त दही, गरमागरम थालीपीठ, लोणचं खाऊन दोघीही तृप्त झाल्या.


संध्याकाळी खूप फिरल्या दोघी. भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम.. सॉल्लिड धम्माल.


 कितीतरी दिवसांनी त्या अशा मुक्त फिरत होत्या. 


तरीही त्या कातरवेळी रजनीशच्या आठवणीने डोळे पाणावलेच आणि एक चुकार अश्रू गालावरून घरंगळलाच मिताच्या.


स्वरालीच लक्ष दुसरीकडे आहे असं पाहून मिताने त्याने हळूच डोळे पुसले.


    घरी परतेपर्यंत उशीरच झाला. दुसर्यादिवशी रविवार असल्याने दोघीही निवांत होत्या.


   दमलेली स्वरा कपडे बदलून झोपी गेली. पाणी प्यावं आणि थोडी झाकपाक करावी म्हणून मिता स्वयंपाकघरात आली. 


खिडकी लावताना समोरचा अंधार डोळ्यात खूपला. दिवा मालवून परत एकदा खिडकीपाशी येऊन तिनं अंदाज घेतला.


'अरेच्या! कुठे गेला असेल आज हा?


शी! काय तरी हा चाळा लागलाय मनाला.' 


मनातले विचार झटकून ती झोपायला गेली.


नंतर सोसायटीमधल्या मैत्रिणीकडे तिने अडूनअडून चौकशी केली. 


"अग तो ना! शी! विचित्रच आहे.


अजिबात बोलू नको त्याच्याबद्दल. सतत मुलींकडे पाहत असतो. जरा म्हणून लाज नाही मेल्याला. बदफैली कोणीकडचा...


पण तू का ग विचारते आहेस?"

"अहं.. सहजच." म्हणत मिताने विषय टाळला पण आता तिने स्वतः ला आणि स्वराला त्याच्या नजरेपासून दूर ठेवायचे ठरवले.


तिनं ती खिडकी लावून टाकली.


 कायमचीच....


त्यादिवशी आजीआजोबांना कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. मिताने स्वरालीला शाळा सुटल्यावर घरीच जायला सांगितले होते..

तीही लवकरच घरी परतणार होती.

पण नेमका त्याचदिवशी उशीर झाला. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसतशी तिची बेचैनी वाढत होती.

  घरी पोहोचली तोपर्यंत बरच अंधारलं होतं.

पाहिलं तर दरवाजा नुसताच लोटलेला होता.

शंकाकुशंकांनी मनात घर केलं..

'त्या' एका विचारासरशी अंगावर सर्रssकन काटा आला. तशीच धावत आत गेली.

"तो" स्वराचा हात हातात घेऊन बेडरूममध्ये तिच्या बाजूला बसला होता...

आणि स्वरा.. 

बेडवर झोपली होती.

काही कळायच्या आत मिताने त्याच्या खाडकन मुस्कडात लगावली आणि पोटात सणसणून लाथ घातली.

   झालेल्या अनपेक्षित वाराने तो बाजूला जाऊन हेलकांडला. धक्क्याने टीपॉयवरचा फ्लॉवरपॉट खाली आदळून फुटला.

त्याचे डोळे आग ओकत होते.

"मम्मा आलीस तू?" म्हणत आवाजाने जाग्या झालेल्या स्वराने तिला घट्ट मिठी मारली.

तिने झटकन स्वरालीला आपल्या पाठीशी घातलं आणि बाजूला पडलेली फुटक्या फ्लॉवरपॉटची मोठी काच बचावासाठी हातात घेतली.

"काय झालं मम्मा? अंकल असा काय कोपऱ्यात पडला? उचल त्याला." 

ती अंकलकडे धावली.

"स्वराssss" मिता किंचाळत होती.

"मॅडम पहिल्यांदा तुम्ही हे ओरडणं थांबवा" त्याच्या तोंडातून शब्द निघाले आणि ती जराशी सावरली.

"हे पहा! आज स्वरा शाळेतून घरी आली त्यावेळी मी नुकताच कामं उरकून परतत होतो. 

पाहिलं....तिचा ड्रेस मागून खूप खराब झाला होता...आणि जाणीव झाली "त्या" गोष्टीची. 

ती मात्र बावचळली होती. 

कदाचित बसमधेच... 

कदाचित हा तिचा पहिलाच अनुभव होता बहुतेक..

मी थांबून चाहूल घेत होतो.. अन् जाणवलं की तुम्हीही घरात नाहीत. मग तिला विश्वास दिला आणि प्रेमाने हाताला धरून घरी घेऊन आलो. फ्रेश व्हायला सांगून धावतपळत मेडिकल स्टोअर गाठलं. 

 you tube वर पिरीयड्स बद्दलची माहिती लावून देऊन सॅनिटरी नॅपकिन्सचा पॅक तिच्या हातात दिला आणि गरम दूध पाजून झोपवलं

 तेवढ्यात तुम्ही आलात."

आता मात्र मिता नरमली. केल्या कृत्याचा पश्चात्ताप व्हायला लागला...

"मला माहित आहे..

सोसायटीमधे मी बदफैली म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच तुम्ही आज जे वागलात ते त्यायोग्यच.

पण मी असा नाही हो...

 मला मुलाबाळांची खूप आवड...खरंतर मुलींची...

कारण मी एकटाच..अनाथ...

पण नयनाला करीयर जास्त महत्वाचं वाटायचं.

लव्ह मॅरेज होतं आमचं... तरीही..

 तिनं केलेलं अॅबॉर्शन...त्या नंतरची कॉम्प्लिकेशन्स...ती पुन्हा आई होऊ न शकणं...आमचा डिव्होर्स.....

या सगळ्यामुळे मी अलिप्त होत गेलो. जग काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करत आपल्याच दुनियेत जगत होतो...

अन् एकदिवस तुम्ही समोर रहायला आलात...

ती खिडकी..

त्यातून दिसणार्या तुम्ही दोघी...तुमची लाडकी स्वरा... तुम्ही दोघी एकमेकींची घेत असलेली काळजी...तुमचं नातं ...

सारं सारं मला भुरळ पाडू लागलं....

वेडच लागलं बघायचं...

आज माझं बाळही स्वरा इतकंच .." त्याचे शब्द गोठले.

ती ही नि:शब्द ...

पुढे काहीच न बोलता तो निघून गेला...

तिच्यासारखीच त्याचीही अवस्था...

आधाराची गरज....तीच अस्वस्थता.... 

    स्वरा खाऊन झोपी गेली. मिता स्वयंपाकघरात आली....

खिडकी....

 पुढे होऊन तिने "खिडकी" उघडली... कायमसाठी.....

थंड वार्याची झुळूक अंगावर गोड शहारा आणत आत शिरली... 

त्याबरोबरच त्याची शांत..संयत नजरही...

 आणि सोबतीला तेच जीवघेणं हसू.....

🙏🙏

दिपाली राव थेटे

3 Comments

  1. खिडकी: अतिशय सुंदर कथा.

    ReplyDelete
  2. अप्रतिम 👌👌

    ReplyDelete
  3. Last line nhi samjli

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post