स्वभाव

 स्वभाव..  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ माधवी खडक्कार

"आई ,ही माझ्या ऑफिसमधेच काम करते."मकरंदने गणपतीच्या प्रसादासाठी घरी बोलवलेल्या आपल्या मित्रमैत्रिणीची ओळख करून देतांना मोहिनीची आईला ओळख करून दिली.
एकंदर मोहिनीची ओळख करून देतांना मकरंदच्या
चेह-यावरील भाव चाणाक्ष प्रमिलाने ओळखले.तशी चारचौघीत दिसायला छानच होती मोहिनी.थोडी जुजबी चौकशी करून ती स्वयंपाकघराकडे वळली.
"आपल्या लेकावर मोहिनी घातलेली दिसते .".मनाशीच बोलली प्रमिला..इतर मित्रमैत्रिणीही फराळ,प्रसाद घेवून घरी निघाली.मोहिनीला घ्यायला तिचे बाबा येणार असल्याने ती थांबली.कपबश्या, डिश नेण्यासाठी प्रमिला आली तशी "तुम्ही राहू द्या काकू मी नेते.".मोहिनी म्हणाली..
"अग तु असू दे आमची अमृता नेईल."तिला अडवत प्रमिला म्हणाली.अमृता मकरंदची लहान बहिण.
हे काय ग आई ,किती काम सांगतेस..मोबाईल मधून डोके वर न काढताच ती म्हणाली.."बर असू दे.." मी करते बेटा.
तितक्यात खालून गाडीचा हाॅर्न ऐकू आला.
"काकू,निघते मी." बाबा आले आहेत.
"अग,प्रसाद घ्यायला वरती बोलव न त्यांना.ओळखही होईल. पुस्तक वाचत बसलेले मनोहरपंत म्हणाले.
"अग हो खरंच की.."प्रमिलानेही नव-याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तसे सुनिलराव घरात आले.त्यांना पाहताच अरे तुम्ही..जर मी चुकत नसेल माझ्या प्रणिता ताईच्या इथल्या एकसष्टीच्या कार्यक्रमाला तुम्ही होता.
हो..हो..बरोबर बिल्डिंग मधला आणि त्यात प्रणिता ताई कडचा कार्यक्रम म्हणजे घरच्या सारखाच त्या दोघांचा स्वभाव आम्हाला आवडतो.सदैव मदतीसाठी तत्पर असतात दोघेही.मग आपणही नको का मदत करायला.पाण्याचा ग्लास ठेवत सुनिल राव म्हणाले.आता या एकदा त्यांच्याकडे आलात की.
"प्रसाद घेवून चला निघतो मनोहरपंत ..मकरंद.." सुनिलराव म्हणाले.
हो..हो..ठीक आहे..आणि ती दोघे निघाली निघताना मोहिनीने दोघांना नमस्कार केला..
छान आहे हो..मुलगी..आणि संस्कारही आहेत..असे म्हणत मकरंद कडे प्रमिलानी एक कटाक्ष टाकला.
"आई.."असे म्हणत मकरंद तिथून रूममध्ये गेला..
मकरंदसाठी मुली बघायला सुरूवात करावी का..?असा मागच्याच महिन्यात तिच्या आणि मनोहरपंतामध्ये विषय ही झाला..पण आधी मकरंदसोबत बोलू यावर दोघांचेही एकमत झाले होते..आणि आज मोहिनी मकरंदच्या मनात आहे याचा अंदाज तिला आला..
संध्याकाळी गॅलरीत बसून चहा घेतांना मनोहरपंताना ती याबाबत बोलली.
"मुलगी चांगली आहे..मकरंदलाही ती आवडलेली दिसते आहे शिवाय ताईच्या बिल्डींग मध्ये च आहे तर इतर चौकशीही करू शकतो."
"हो..हो..ते ठीक आहे पण आधी मकरंद सोबत आपण सर्व सविस्तर बोलू या.." मनोहरपंत म्हणाले.
संध्याकाळी मकरंद घरी आल्यावर एकदम खूश होता.फ्रेश होऊन काॅफी घेत घेत तो प्रमिलाला म्हणाला अग् तु म्हणत होतीस ना..मोहिनी बद्ल आजच मी बोललो तिच्यासोबत
.आम्ही लग्न करण्याचा विचार पक्का केला .तिच्या बाबांनाही मान्य आहे.
"प्रतिक्षा ताई सोबत एकदा सर्व सविस्तर बोलून घेवू या".प्रमिला मनोहरपंताना म्हणाली.हो..चालेल की..
फोनवर बोलण्यापेक्षा तिच्या घरीच जावू या असा विचार तिच्या मनात आला.पण मनोहरपंताना सुट्टी नसल्याने ती आणि अमृता प्रतिक्षाकडे गेल्या.
निवांत गप्पा झाल्या.मोहिनीचे आणि तिच्या घरच्या लोकांचे प्रतिक्षाने सांगितले खूप चांगली फॅमिली आहे.सर्वासोबत मिळूनमिसळून राहणारी..मदत करणारी आणि मुख्य म्हणजे मोहिनीचा स्वभाव ही छान आहे.आपल्या अमृता सोबतही छान जमेल तिचे.ताईच्या बोलण्यानी प्रमिला मनोमन सुखावली..
रितसर एकमेकांच्या घरी जावून भेट घेवून अगदी आनंदी वातावरणात लग्नाचे ठरले आणि मोहिनी मकरंदचे लग्न सोहळा थाटामाटात पार पडला..दोन्ही कडील मंडळी हौसी .
गावातच लेक असल्याने सुनिलराव आणि सविता ताईंना पण बरे वाटले.सुट्टी संपताच मकरंद मोहिनीचे ऑफिस रूटीन सुरू झाले.
मनोहरपंताचेही ऑफिस अमृताचे काॅलेज सुरू झाले सर्वजण आपापल्या कामास लागली.प्रमिला ताईचा वेळही घरकामात जाई..
"तुम्ही राहू द्या संध्याकाळच्या स्वयंपाकाचे मी आणि अमृता मिळून करू.."मोहिनी म्हणाली..तिच्या त्या वाक्याने प्रमिला मनोमन सुखावली..मोहिनीचा प्रेमळ स्वभाव,सर्वांना सोबत वागायची पध्दत,कामात जमेल तशी मदत करण्याचा स्वभाव.खरोखरच मकरंद ची निवड योग्यच आहे त्या मनाशीच पुटपुटल्या..
आई,आज पावभाजी केली तर चालेल का..?मोहिनीने विचारले..
अग चालेल काय सगळ्यांच आवडेल मी काही मदत करू का.?
मी आणि अमृता करू तुम्ही आराम करा रोज तर आम्हाला हातात मिळतोच की डबा..
अमृतावरही तिचे प्रेम लहान बहिणीसारखेच.थोडासा तिचा कामाबाबतचा आळस तिला पटत नसे.माहेरी एकटी असली तरी सर्व कामाची सवय आणि आवड मोहिनीला होती.आपणही अमृताला सवय लावू कामाची असा तिला विश्वास होता..
  मकरंदला कामानिमित्त आठ दिवससाठी चेन्नईला जावे लागणार होते.त्यासाठी त्याची तयारी करून देण्यात मोहिनी व्यस्त होती.तसे मोहिनीला सोडून जाणे त्याच्या जीवावर आले होते पण इलाजही नव्हता.
"झाली का सर्व तयारी "मनोहरपंतानी विचारले..
"हो बाबा होतच आलीय.."  मकरंद म्हणाला.
संध्याकाळच्या ट्रेन ने मकरंद निघाला.आठ दिवस मकरंद शिवाय कसे काढायचे..माहेरी जावे का..?पण ते बरे दिसेल का..नाही नकोच ते योग्य वाटणार नाही..मोहिनीने मनाला समजावले..
दुस-या दिवशी ऑफिस मधून आल्यावर फ्रेश होवून अमृता सोबत गप्पा मारत बसली..थोड्या वेळाने तिला मोहिनी म्हणाली चल बघू या काय करायचे ते..
"ये वहिनी बाहेरूनच मागवून या काहीतरी.." अमृता म्हणाली.
मोहिनीला फारसे पटला नाही अमृता चा कंटाळा..पण फक्त आजच हं..मोहिनी म्हणाली..
अमृता आपल्या काॅलेज मधील गमतीजमती सांगत होती.आपल्या मित्रमैत्रिणी ,त्यांचे स्वभाव यावर ही अगदी मनमोकळी बोलत होती..तिचे हे काॅलेजचे शेवटचे वर्ष होते.
"आवडतो का कोणी तुला ..गृपमधील मित्र.."मध्येच मोहिनीने विचारले.तशी अमृता म्हणाली..अग अमोल आहे न त्याचा स्वभाव वागणे मला खूप आवडते.त्याचा कोणतीही समस्या शांतपणे सोडवण्याचा स्वभाव छानच आहे..
"हो..का..?"एवढेच बोलली मोहिनी त्यावर..
इतक्यात दारावरची बेल वाजली आणि त्यांच्या गप्पा थांबल्या.
"बहुतेक जेवण आले वाटते.." मोहिनी म्हणाली..
सर्वांची जेवण आटोपली.
"तुला दोन दिवस आईकडे जायचे असेल तर जावून ये मोहिनी." प्रमिलाताई म्हणाल्या.
आपल्या मनातलच बोलल्या आई..जावून यावेच.आईलाही बरे वाटेल..
"चालेल..मग उद्या ऑफिसमधून जावू का तिकडे.." मोहिनीने विचारले..
हो..तसेच कर तेच सोयिस्कर पडेल..
आईला फोन करून कळवून.ती बेडवर आडवी झाली.
दुस-या दिवशी ऑफिस मधून मोहिनी आईकडे गेली.सविताला काय करू आणि काय नाही असे झाले.मोहिनी पण खूप खूश होती..दोन दिवस पटकन निघून गेले.
मकरंदही चेन्नईहून परतला..दिवस भरभर जात होते..चांगली ऑफर मिळाल्याने मकरंदने नवीन कंपनी जाॅइन केली.अमृता साठी स्थळ बघायला सुरूवात करावी असे प्रमिला आणि मनोहरपंताना वाटू लागले..याबाबत ते दोघासोबत बोलले..
"तिच्या मनात काय आहे तु एकदा बोलून बघ मोहिनी.."प्रमिलाताई म्हणाल्या.
हो..हो..विचारते.
रविवारी असेच थोडी खरेदी करण्याच्या निमित्ताने मोहिनी आणि अमृता बाहेर पडल्या.शाॅपिंग हा अमृता चा आवडता विषय..
खरेदी झाल्यावर दोघी पावभाजी खाण्यासाठी होटेल मध्ये गेल्या..तिथे मोहिनीने विषय काढला.आईबाबा स्थळ बघायचे म्हणत आहे तुझ्यासाठी..तुझे काही..मोहिनी मध्येच थांबली..
अग वहिनी तो छानच आहे पण सर्वासोबत त्याची मैत्रीच  आहे. मी एकदा विचारले होते तुझ्या लाईफ पार्टनर बाबत काय विचार आहे..तर त्याने वेगळेच मत व्यक्त केले वरून तुम्हा सर्वाना नक्की बोलवीन म्हणाला.
ओके..म्हणजे..आपण आता स्थळ पाहायला हरकत नाही..खरे ना..मोहिनीने अमृताला स्पष्टच विचारले..
"हं..चालेल.."अमृता म्हणाली.
मग तसे तु आईबाबांना सांग तुझ्यासर्व अपेक्षा..
आणि अमृतासाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली.तिच्या मनासारखं मिळेपर्यत घाई करायची नाही घरातील सगळ्या नी ठरवले.
अमृता चा स्वभाव  घरातील सर्वाना माहित होताच.
मनोहरपंताच्या मित्राच्या ओळखीतील एक स्थळ सांगून आले.सर्वच गोष्टी जुळत असल्याने अमृताशी बोलून मुलासोबत वैयक्तिक अमृताने बोलल्यानंतर सर्व निश्चित करण्यात आले.प्रमिला ताई खूप खूश होत्या लाडक्या लेकीचे लग्न ठरल्याने.
खरेदी,कार्यालय,पत्रिका वाटप,इतर सर्व तयारीत सगळे व्यस्त होते.
अनिरुद्ध कडचे सर्व लोक ही स्वभावाने चांगलेच होते.प्रमिलाताई आणि मनोहरपंतानी अतिशय थाटामाटात लग्न करून दिले.लेक परगावाला जाणार हे दुःख होतेच थोडे.
सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर घर रिकामं वाटू लागले..त्यात तिघांचेही ऑफिस पूर्ववत सुरू झाले.प्रमिलाताईंना लेकीची आठवण येई.पण ती सवय करून घेणे भाग होते.हैद्राबाद मुंबई अंतर काही जवळचे नव्हते..
मंगळागौरीच्या निमित्ताने आपण अमृताला आठ दिवस जास्त ठेवून घेवू.तिलाही बरे वाटेल तसा आधीच फोन करू या.प्रमिलाताई मनोहरपंताना म्हणाल्या..
हो..चालेल की करू आपण फोन..मनोहरपंत म्हणाले..
मंगळागौरीची तयारी जोरात सुरू झाली.छोटा हाॅल बुक केला.घरी त्याच्याकडील लोक येणार म्हणून आवरासावर झाली..
सोमवारी सकाळीच चौघेजण आले.मकरंद त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर गेला होता.दोन दिवसाची मोहिनीनेही सुट्टीच घेतली होती.कामाची घरात धावपळ चालूच होती.मोहिनी जमेल तितके पटापट आवरत होती.अमृताच्या सासूला तिचे काम करण्याची पध्दत,निटनेटकेपणा आवडला.मनात अमृताचा विचार चालू होता..आणि दुपारी जेवण झाल्यावर प्रमिलाताई आणि मोहिनीकडे अमृता चा कामाबाबतचा आळस, सततचा मोबाईल यावर नाराजी व्यक्त केली..कमरेच्या त्रासामुळे काम पटपट होत नसल्याने अमृताने लक्ष घालावे हे त्यांनी बोलून दाखवले..
"होईल काकू सवय तिला.."मोहिनी म्हणाली.
"अग मी पण चार पाच महिन्यापासून हाच विचार करते आहे..तसे म्हणूनही पाहिले मी तिला तुम्ही दोघी बघाल सांगून.."अमृताच्या सासू बाई म्हणाल्या.
"हो..नक्की सांगू.." म्हणून सर्वासाठी चहा करायला मोहिनी स्वयंपाक घरात गेली..प्रमिलाताई मात्र यावर विचार करत बसल्या..
चला चला उद्याची तयारी करू या.हाॅलवर लवकर पोहोचायचे आहे.आणि सर्वजण कामाला लागली..दुस-या दिवशी नातेवाईक काही मित्रमंडळी पुजा व जेवणासाठी आली होती.मंगळागौर थाटात साजरी केली..
बुधवारी अनिरुद्ध त्याचे आई बाबा निघणार होते.अमृता आठ दिवस थांबणार होती.
जेवण झाल्यावर अनिरुद्ध आणि मकरंद चक्कर मारण्यासाठी बाहेर गेले.त्यावेळी दादा मला तुझ्यासोबत थोडे बोलायचे होते अनिरुद्ध म्हणाला..
अरे बोल न मग..
दादा, अमृताला आमच्या दोघांमधील संबंधाबाबत  रस नसतो तिला खूप वेगवेगळ्या पद्धतीने समजावले.पण ती त्याकडे लक्षच देत नाही.सतत तिचे काॅलेजचे मित्रमैत्रिणी यावर गप्पा..नाहीतर शाॅपिंग.कामातही तसेच पण आईची कुरकुर चाले त्यासाठी मागच्या महिन्यापासून पोळ्यासाठी पण बाई लावली..
"तु आणि वहिनी तिच्यासोबत बोलून पाहाल प्लीज..खरतर मी मागच्या महिन्यात फोनवर बोलणार होतो पण म्हटल प्रत्यक्ष भेटल्यावरच बोलू."अनिरूध्द म्हणाला.
अनिरुद्ध स्वभावाने  चांगलाच होता हे सुरूवातीलाच भेट झाल्यावर मकरंदने बाबांना बोलून दाखवले होते.आजची त्याचे म्हणणे ऐकून आपण मोहिनी सोबत बोलू आणि मार्ग काढू असे त्याने ठरवले.दुस-या दिवशी ठरल्या वेळी अनिरुद्ध  आणि त्याचे आईबाबा निघाले.सोबत फराळाचे आणि जेवणाचा डबा प्रमिलाताईनी दिला..
संध्याकाळी चौघांची जेवण झाली अमृता पटकन उठून सोफ्यात मोबाईल घेवून बसली.
अमृता थोडी वहिनीला मदत कर आवरासावर करायला.
हे काय ग आई ..मी माहेरी आली आहे न म्हणत अमृताने टाळले..
आपण लहानपणापासून हिचे प्रत्येकवेळी जास्तच लाड केले आहेत..तिच्या सासूबाई म्हटल्यापासून त्यांना सारखेच वाटत होते.हिला थोडं उद्या समजवायला हवं.दुस-या दिवशी सगळे ऑफिसला गेल्यावर त्यांनी अमृताला काम व इतर सर्वच गोष्टीबाबत समजावले.पण तिने त्याकडे फार से लक्ष न देता करते ग मी काम..म्हणत विषयाला कलाटणी दिली.
अनिरुद्ध जे बोलला त्याबाबत मकरंदने मोहिनी सोबत चर्चा केली.आणि दोघांनीही तिला समजावले.
बघता बघता आठ दिवस निघून गेले.अमृताची जायची वेळ आली.सर्वजण तिला निरोप द्यायला स्टेशनवर गेले.तिथेही मोहिनीने तिला एकटीत काही गोष्टी परत सांगितल्या..
अनिरुद्ध समोर सारखा मित्रमैत्रिणीचा विषय न काढता तुमचे नातेसंबंध चांगले करण्याचा प्रयत्न कर..घरकामात मदत करत जा.वैगेरे सांगितले.जशी ट्रेन आली तिचे सामान ठेवून तिला निरोप दिला..घरी आल्यावर घर एकदम रिकामे वाटले.पण अमृताच्या सासूबाईचा तक्रारीचा सूर आणि अनिरुद्ध ने मकरंद कडे मांडलेले त्याचे म्हणणे यानी सगळेच थोडे डिस्टर्ब होते..
लहानपणापासून घरात अमृताचे जास्तच लाड असत हे मकरंदने ब-याचदा बोलून ही दाखवले होते..
बघता बघता दिवस जात होते..दसरा दिवाळीची तयारी सुरू झाली.पहिलाच दिवाळसण अमृताचा सर्वाना निमंत्रणचा फोन केला पण तिच्या सासूसासरेनी जमणार नाही म्हणून कळवले.अनिरुद्ध आणि अमृता आले दिवाळी सणासाठी पण स्वभावात कोणताच फरक नसल्याने अनिरुद्ध नाराज होता.ते त्याच्या वागण्यात जाणवत होते.कुठलीही गोष्ट ती लक्षात घेत नाही दुर्लक्ष करते ही तक्रार कायम होती.तरीही सर्वांच्या निमंत्रणाला मान देवून तो आला होता.
दोन दिवस थांबून सुट्टी नसल्याने तो निघाला.अमृता घरून  निघतानांच मी थांबणार आहे माहेरी पंधरा दिवस म्हणून हट्ट करून आली होती .
इतका चांगला जावई असताना आपण अमृता ला  कसे समजावे तिचा संसार सुखाचा कसा होईल याचाच त्या विचार करत होत्या..
                       सौ.माधवी मिलींद खडक्कार..
                               तळेगाव (दाभाडे) 

Post a Comment (0)
Previous Post Next Post