आधारवड

 

आधारवड  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ अश्विनी निवर्गी 

-----------------

' बंदर के गले मे मोतीयों की माला ' मामी हळूच बहिणीच्या कानात कुजबुजली. 

"हो ना गं.  किती विजोड जोडा आहे."  स्टेज कडे एक नजर टाकून ती म्हणाली. 

स्टेजवर सगुणा आणि पुंडलिक यांचं लग्न चालू होतं.  सगुणा दिसायला खूप सुंदर. गोरी गोरी पान बाहुली जणू. बी. ए. झालेली. खूप हुशार आणि पुढे शिकायची, नोकरी करायची आणि स्वतःच्या पायावर उभं राहायची स्वप्न बघणारी. मेरिट मध्ये आलेली बुद्धिमान मुलगी. पण सावत्र आई समोर काही चालत नव्हतं.  खरं तर इतक्या लवकर तिला लग्न करायचंच नव्हतं पण," तुला आता पुढे कोण पोसणार?  माझ्याच्याने पोसणं होत नाही बाई." असं म्हणून तिचे लग्न पुंडलिकशी लावलं. पुंडलिक बी.एस्सी. झालेला.  डीएमएलटी करून लॅबमध्ये लागला. पगार तसा जेमतेमच होता. आता आपण दोघेही साधारण एकाच पातळीवर शिक्षण झालेले.  त्यामुळे आता पुंडलिक आपल्याला पुढे शिकवेल ही शक्यताच नव्हती. सगुणा मनातून खट्टू झाली होती. पण सावत्र आई  पुढे काही चालत नव्हते. आणि ती खरंच रूपा बरोबर गुणांनीही चांगलीच होती. लोकांची कुजबुज तिला ऐकू येत नव्हती असं नाही. पण तिने त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं .शेजारी उभा असलेला पुंडलिक अगदीच काळ्या रंगाचा, आडदांड, जाड  ओठांचा, मोठ्या मिशांचा, चेहऱ्यावर वयाच्या मानाने खूप जास्त गंभीर भाव. त्यात तो अनाथ होता. त्यामुळे सासरीही कोणी नव्हतं . तो फारसा बोलतही नव्हता . आता अशा माणसासोबत आपलं पुढे कसं व्हायचं?  यामुळे सगुणा मनातून बरीच धास्तावली होती. इतक्या अबोल माणसाच्या मनात काय चाललंय काही अंदाज येत नव्हता.  खूप शिकायचं आहे पण पुढे त्याला कसं बोलणार?  सहसा पुरुषांना आपल्यापेक्षा जास्त शिकलेली बायको आवडत नाही. सगुणाने आजूबाजूला पाहिलं होतं. त्यामुळे आता आपला सगळा जन्म स्वयंपाक पाणी आणि मुलं जन्माला घालण्यात जाणार .सगुणा मनाशीच विचार करत होती.  या लग्नाला तिची परवानगी कोणी विचारलीच नव्हती.  पुंडलिकला दाखवलं आणि त्याचा होकार आल्याबरोबर सावत्र आईने तिला लग्नाला उभं केलं.

पुंडलिकच्या घरी लग्नाचा सत्यनारायण झाला. रात्री सजून सगुणा खोलीत गेली. मनामध्ये असंख्य विचार होते.  पुंडलिकशी काय आणि कसं बोलावं?  ती जाऊन सजवलेल्या पलंगावर बसली. पुंडलिक तिला म्हणाला,


" सगुणा मला माहित आहे, तुला सावत्र आई आहे .त्यामुळे तुझ्या होकार नकाराला काहीही महत्व न देता तिने तुझे लग्न माझ्याशी लावले आहे. सगुणाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली,


" नाही हो. तसं काही नाही.  एक सांगू का? आता तुम्ही लॅब मध्ये काम करत आहेत. आपल्या दोघांचे कसंही भागेल. मी व्यवस्थित संसार करेन. पण पुढे कसं व्हायचं?  मी फक्त बी.ए. झाले आहे. मला जर तुम्ही बी.एड. करायला परवानगी दिली तर मला ही नोकरी मिळेल. मग दोघांचा मिळून पगार येईल."

 पुंडलिक हसून म्हणाला," अगं शिक ना तू.  मी कुठे नाही म्हणतोय?  फक्त स्वतःच्या पायावर उभं राहायचं, पगार मिळावा, एवढ्यासाठी नको शिकू.  तर तुला त्यात आनंद मिळतो . तुझी मनातून शिकायची खूप इच्छा असणार .कारण तू प्रत्येक वर्षी वर्गात पहिली आलेली आहेस. तुझी शिक्षणाची इच्छा मी दाबून ठेवणार नाही. फक्त बी.एड.च कशाला? एम.ए. कर. पीएचडी कर. माझ्याकडून होईल तेवढा मी तुला सपोर्ट करेन."


  आपल्या कानांवर सगुणाचा विश्वासच बसत नव्हता.

 ती म्हणाली," खरंच तुम्हाला चालेल, मी पुढे शिकले तर?"

 तो म्हणाला," का नाही चालणार? माझ्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे मी यापेक्षा जास्त शिकू शकलो नाही. मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं रहाणं आवश्यक होतं. पण तुझ्या बाबतीत तसं नाही.  मी तुला शिकवीन आणि आपली परिस्थिती आयुष्यभर अशीच राहणार नाही. आपण दोघं मिळून आपली परिस्थिती बदलू."


सगुणा म्हणाली," खरंच किती मोठं मन आहे तुमचं .मी अनेक पुरुष आजूबाजूला बघते . आपल्या बायकोनं आपल्यापेक्षा जास्त शिकलेलं त्यांना मुळीच आवडत नाही."

  पुंडलिक म्हणाला," कोत्या मनाचे असतात ते पुरूष. नाही गं सगुणा, तसं नसतं. स्त्री-पुरुष समानता म्हणजे बायकोने सकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळी नवर्‍यानं करावा किंवा बायको चहा करत असेल आणि तिने साखर टाकली तर नवऱ्याने पत्ती टाकावी असा त्याचा अर्थ नाही. मुळामध्ये नवरा-बायको एकमेकांचे स्पर्धक नसतात तर ते एकमेकांचे सहकारी असतात. एकमेकांना पूरक असतात.  एकमेकांची कमी आपण भरून काढली पाहिजे . जिथे मी कमी आहे तिथे तू मला साथ दे आणि जिथे तू कमी पडशील तिथे मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी उभा राहून ती कमी भरून काढेन. एक व्यक्ती म्हणून तुला आणि तुझ्या  विचारांचा मी नेहमीच आदर करेन. तुला शिक्षण घेण्यासाठी परवानगी देणारा मी कोण आहे? मी काही तुझा मालक नाही. मी तुझा नवरा आहे. तुला जे आवडतं ते कर. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तुला करेन. आता मी सतत तुझ्या सोबत राहीन.  सावत्र आईने तुला खूप त्रास दिलाय हे मला माहिती आहे. इथून पुढे तुला तिथे जावसं वाटलं तरच जा. नाहीतर आपलं घर हे तुझंच घर आहे. हेच तुझं माहेर आणि हेच तुझं सासर. अगदी आपल्या बाळाचं सुद्धा सारं काही मी करेन."


  सगुणाला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. याच नशिबाला आणि देवाला मनातल्या मनात तिला अनेकदा कोसलं होतं की आपल्या लग्न अशा माणसाशी ठरवलं आहे आणि आता आपलं कसं व्हायचं ?


परंतु पुंडलिकचे विचार ऐकताना सगुणा मनातून फारच खुश झाली होती. 


ती म्हणाली," हो ना हो. मला फार इच्छा होती पुढे शिकायची पण सावत्र आईने शिकू दिलं नाही. पण आता तसे होणार नाही. मी तर शिकेनच पण आपण आपल्या मुलांना सुद्धा उत्तम शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करू."

पुंडलिक म्हणाला," आजची रात्र आपण फक्त बोलतच राहायचं आहे का?  मुलांना शिक्षण देण्यासाठी मुळात आधी मुलं व्हायला तर हवी.  हो ना?"

 सगुणा लाजली आणि त्याच्या मिठीत शिरली.

त्यांचा संसार एका वाड्यामधील दोन खोल्यात सुरू झाला .जमेल तेवढे काम करून सगुणा शिकत होती तर पुंडलिक कामे सांभाळून घरातील कामात तिला मदत करत होता.


 कित्येक वेळेस पुंडलिक झाडून काढायचा, बाहेरील नळा वरून पाणी आणून भरायचा. एवढंच नाही तर तिला यायला उशीर झाला तर स्वयंपाकात ही मदत करायचा. वाड्यातले सगळे लोक त्याला नावे ठेवायचे. बायल्याच आहे इथपासून ते बायकोचा बैल आहे पर्यंत. पण त्याने कधीच कुणाचं म्हणणं मनावर घेतलं नाही. ऐकू येणार्‍या टोमण्यांकडे तो चक्क दुर्लक्ष करायचा. एकदा सगुणाला हे सारं असह्य झालं.

ती पुंडलिक ला म्हणाली, " पहा हो कसे बोलतात हे शेजारी?"

 पण पुंडलिक शांतपणे म्हणाला " हे बघ संसार आपल्या दोघांचा आहे. आपण आपल्या दोघांना काय वाटतं याचाच विचार करायचा. आपल्या घरातील  अडचणी निस्तरायला शेजारी कधीच येत नाहीत. मग त्यांच्या बोलण्याचा आपल्या मनावर परिणाम का करून घ्यायचा? माझ्या दृष्टीने तू महत्त्वाची आहेस .मी फक्त तुझ्या मनाचा विचार करणार. बाकीच्यांना काय बोलायचं आहे ते बोलू दे. तू अजिबात लक्ष देऊ नकोस."

पुंडलिकने स्वतःचा शब्द खरा केला.  सगुणा संसारात चांगली  रमली होती. घर, संसार, कामे करून ती कॉलेजला जायची .घरी येऊन दिवसभर अभ्यास करायची. मुळातच बुद्धिमान असलेल्या सगुणाला पुंडलिक साथ देत होता. ती एम. ए. झाली. पीएचडी झाली. प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली. त्यांच्या संसारात एक चिमुकला पाहुणा आला. त्याचं नाव कौतुकाने अमेय ठेवले . पुंडलिकने त्याच्या अनेक जबाबदाऱ्या  स्वतःहून स्वीकारल्या. सगुणा रोज देवाची पूजा करायची आणि म्हणायची पुंडलिक सारखा नवरा माझ्या आयुष्यात आला. देवा तुला किती धन्यवाद देऊ? 


सगुणा पुंडलिक ला म्हणाली," तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय. आता माझी वेळ आहे की मी तुम्हाला साथ देणार आहे."

पुंडलिक म्हणाला,"  मला कळलं नाही."

 ती म्हणाली," हे बघा आता मला लाखभर पगार आहे. तुमचं शिक्षण अर्धवट राहिले आहे. तुम्ही ते पूर्ण करा."

 तो म्हणाला,"  नाही गं. आता बराच काळ गेलाय आणि आता मी शिकून काय करणार?  शिवाय मला तुझी सारखी शिक्षणामध्ये फारशी रुची पण नाही."

  ती म्हणाली,"  मग ठीक आहे. तुम्ही बिझनेस करा. भांडवल आपण मिळून उभं करू.  जे थोडेफार पैसे मी कमावले साठवले आहेत तेही आहेतच शिवाय बँकेतून कर्ज काढू पण तुम्ही आता लॅब मध्ये वर्कर म्हणून राहू नका."

 पुंडलिकने  तिचं म्हणणं मान्य केलं.

  दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे जात होती. संसारात दोघेही चांगले स्थिरावले होते. अमेय आता मोठा झाला होता. संसारात अनेक छोटी-मोठी वादळं येत होती. परंतु त्या वादळांना थोपवण्यासाठी वाघासारखा, निधड्या छातीचा नवरा सगुणाला मिळाला होता.


 ती पुंडलिकाला नेहमी म्हणायची तुम्ही माझे आधारवड आहात. मी म्हणजे एक साधी नाजूकशी वेल आहे. तुमच्या आधाराने मी उभी राहिले. तुमचा असा भक्कम आधार मला मिळाला नसता तर कोमेजून माझं काय झालं असतं? तुम्ही माझ्या मनाचा प्रत्येक वेळी आधी विचार करता. पुंडलिक हसून तिला जवळ घ्यायचा. सगुणा नंतर कधीच माहेरी गेली नाही.  तिचे वडील सावत्र आईच्या पूर्ण आहारी गेले होते. आणि सावत्र आईला हिच सुख कधीच बघवत नव्हतं.


तिने ही माहेर कायमचं तोडून टाकलं. 

अमेय आता मोठा झाला होता. पुंडलिक आणि सगुणाच्या संस्कारांनी अतिशय उत्तम व्यक्तिमत्वाचा अमेय इंजिनिअर झाला. आता त्याच्या लग्नाचे वेध दोघांना ही लागले.

अमेय साठी मुली बघत असताना सगुणाला रेवा भेटली. अतिशय गोड मुलगी. ही आपल्या घरची सून व्हावी अशी इच्छा सगुणाची होती. सगुणाने अमेयकडे विषय काढला. त्याला मुलगी दाखवली आणि रेवा सून म्हणून घरी आली. ही मुलगी सगुणाची अत्यंत आवडती होती. रेवानेही सासू सासरे, नवऱ्याचं मन जिंकलं. अमेय रेवाची जोडी दृष्ट लागण्या सारखी होती. सगळे सगुणाला म्हणायचे फार नशीबवान आहेस तू.  सगुणाही आपल्या नशिबावर खूष होती.परंतू आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं.


अमेय रेवाचा संसार फक्त दीड वर्षाचा झाला आणि मोटर सायकल वरून येत असताना अमेयला अपघात झाला. ट्रकच्या समोरच्या राॅड वर अमेयचं डोकं आदळलं आणि तो जागीच मृत्यू पावला. 


ही बातमी ऐकली आणि रेवा, सगुणा कोसळल्या. पुंडलिकला रेवाकडे बघावं की सगुणा कडे बघावं हे कळेना.  दोघीही दुःखात बुडालेल्या. पुंडलिक आपले दुःख काळजात ठेवून सगुणाला आणि रेवाला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. पण यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती ती सगुणाची. ती डिप्रेशन मध्ये गेली. सतत एका जागी बसून स्वतःशीच बडबड करत असायची.रेवा समोर आली की तिला शिवीगाळ करायला लागायची.  "पांढऱ्या पायाची, अवदसा, तुझ्यामुळे माझा मुलगा गेला. माझ्या मुलाला गिळून बसली . माझ्या नजरेसमोरून दूर हो. त्याच्या ऐवजी तू का मेली नाहीस?"


  रेवाला काय करावं तेच कळत नव्हतं. आपलं दुःख.  त्या दुःखातून सावरण्याच्या पूर्वीच सासू अशी वागायला लागली होती. एरवी मुलीसारखं वागवणारी आणि प्रत्येक गोष्टीत रेवाचा विचार करणारी सगुणा मुलाच्या जाण्यानं पुरती सैरभैर झाली होती. पुंडलिकच्या डोळ्यात पाणी यायचं. तो रेवाला स्वतः समजावून सांगायचा. सगुणा मनानं तशी नाही. ती आजारी पडली आहे आणि म्हणून तुला अशी त्रास देते. शेवटी मानसोपचारतज्ज्ञाकडे नेऊन सगुणाचा इलाज सुरू झाला. गोळ्या घेऊन  ती बराच वेळ झोपलेली असायची आणि जेंव्हा जागी असायची तेव्हा अबोल होऊन एकटीच विचार करत बसायची. तिची तब्येत हळूहळू सुधारत  होती. तिला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी पुंडलिक आणि रेवाने आटोकाट प्रयत्न केले आणि त्यातून सगुणा हळूहळू बाहेर येऊ लागली. तिची स्थिती पूर्ववत झाली . रेवा ही तिचं बोलणं मनावर न घेता तिची जमेल तेवढी सेवा करत होती.

  पुंडलिकला खूप त्रास होत होता पण तरी त्याने कुणालाही सांगितलं नाही. त्रास वाढला तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. कॅन्सर आहे ते म्हणाले. सगुणाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता पुंडलिक स्वतःही खचला होता. पण आता मात्र रेवा आणि सगुणा उभ्या राहिल्या. पुंडलिकच्या आयुष्याची दोरी संपत आली होती.


 शेवटचे सहा महिने राहिले होते. किमोथेरपी सुरू होती. आपल्यासाठी सतत पाठीशी उभ्या राहिलेल्या माणसाला असं खचलेला बघून सगुणा अधिकच थिजली होती. साता जन्मांचा जोडीदार या जन्मात अर्ध्यावर साथ सोडून पुढे निघाला होता. तिच्यासाठी कायम भक्कम आधार देणारा स्वतःच विकल होऊन पडला होता.

रेवा तर बिचारी कोवळी पोर. आधी नवरा गेला.मग सासू आजारी पडली. ती बरी झाली तर सासरा मरणाच्या दारात उभा होता. शेवटचे दिवस आहेत म्हणून दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. अनेक ठिकाणी सुया खुपसलेल्या, नळ्या लावलेल्या. सतत कुठल्या ना कुठल्या तरी टेस्ट चालू होत्या. शरीराची अक्षरशः चाळणी झालेली. पण त्याही पेक्षा आता हा आपल्या आयुष्यातून जाणार. आता आपलं कसं व्हायचं म्हणून सगुणा रात्रंदिवस विचार करत बसायची. तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. 

" सगुणा मला तुझ्याशी बोलायचंय" पुंडलिक म्हणाला.

" शांत पडून रहा बरं. तुम्ही त्रास करून घेऊ नका. काही हवंय का? काही आणून देऊ का?" सगुणा काळजीने म्हणाली.

" नाही गं सगुणा. मला बोलायचंय तुझ्याशी. आता माझं जाणं निश्चित आहे ."

"नका ना असं बोलू.  काळीज तुटत आहे माझं." सगुणा म्हणाली

" कदाचित नंतर फार उशीर होईल. तू ऐक. मी काय सांगतोय. तु मला म्हणतेस ना नेहमी की मी तुझा आधारवड आहे. आणि तू माझी वेल आहेस आधार वडावर आधाराने उभी राहिलेली. पण आता तू आणि मी वेगळे नाहीत. तर आता आपण दोघेही वड आहोत. वडाच्या झाडाला नंतर पारंब्या येतात आणि त्या खाली जमिनीत जाऊन त्याला मुळ्या धरतात. त्या खाली जाऊन मजबूत खोड होतात आणि मुख्य खोडाला आधार देतात.  त्याला पारंबी म्हणतात तशी तू माझ्या झाडाची पारंबी झाली आहेस. मी तुला काय सांगतो आहे ते नीट ऐक. आता आपल्या आयुष्यात जे करायचं होतं ते करून संपलं आहे. आपलं आयुष्य आता संपत आलं आहे पण रेवाचं आयुष्य अजून उभं राहायचं आहे. तू तिला आधार दे. तिचा राग राग करू नकोस. तिचा काही दोष नाही. कोवळी पोर दुःखानं थिजून गेली आहे. आपला अमेय गेला .त्याची आपली साथ सोबत एवढीच होती असं समजायचं आणि विसरायचं. त्याच्या आठवणी आपल्या मनात कायम ताज्या असतील पण नुसत्या आठवणीवर आयुष्य काढता येत नाही.  रेवाचं डोंगराएवढं आयुष्य समोर उभं आहे. आणि तिच्यासाठी नवा आधारवड शोध. तिचा आधारवड तिला मिळेपर्यंत तू सतत तिला साथ दे. पुढेही आयुष्यात तिच्यावर वाईट वेळ आली तर तिच्यासाठी खंबीरपणे उभी रहा. आपलं घर हे तिचं सासर आहे पण तिच्यासाठी ते पुढे माहेर होईल आणि या माहेरी ती कधीही हक्काने येऊ शकते. आपलं मन तुझ्याकडे मोकळं करू शकते इतका मोठा आधार तू तिला द्यायला हवा. सगुणा मला वचन दे. हे वचन तू शेवटपर्यंत निभावशील.

सगुणाला काय बोलावं ते सुचत नव्हतं .  मरणाच्या दारात उभा असलेला आधारवड त्याच्या पारंबी कडे वचन मागत होता. सगुणाने त्याच्या हातावर हात ठेवला. तिच्या डोळ्यातले अश्रू टपटप हातावर पडत होते.

 ती म्हणाली," मी वचन देते.  रेवा साठी आधारवड मी नक्की शोधून देईन."

पुंडलिकने समाधानाने डोळे मिटून घेतले.

अश्विनी निवर्गी,उदगीर


Post a Comment (0)
Previous Post Next Post