आठवण

 

आठवण   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ सायली वझे


    मालती आणि मधुकर यांची  '१९७० अ लव स्टोरी ' .दोघांची कुटुंब एकाच वाड्यात राहत होती .साहजिकच अगदी लहानपणापासून एकत्र खेळलेले दोघे, भांडल्याशिवाय एक दिवस जात नसे दोघांचाही.इतर वेळी 'मालू आणि मधू ' हाक मारणारे ते भांडल्यावर मात्र ' माले आणि मध्या' होत असत.मोठे झाले तसतसे दोघांनाही जाणवलं , देवाने स्वर्गातच आपली गाठ बांधून पाठवलेली आहे. घरुन सुद्धा विरोध असायचं काही कारणंच नव्हतं .


      वर्षभरातच दोघांनाही नोकरी लागली आणि लगेचच शुभमंगल सावधान सुद्धा.दोघांची नोकरी मुंबईत असल्यामुळे मुंबईत भाड्याने एक छोटीशी खोली घेऊन राजाराणीचा संसार सुरु झाला.एवढ्या माणसातून उठून आल्यामुळे दोघांची नोकरी , घर सांभाळता सांभाळता खूपच तारांबळ उडू लागली.


    मधुमालतीचा संसार खऱ्या अर्थाने सुरु झाला.मधू सगळ्या कामामध्ये मालतीला कामात मदत करत होते.मालती देखील हौसेहौसेने नोकरी सांभाळून वेगवेगळे पदार्थ करत होती.घर सजवत होती.घराचा कोपरा न कोपरा तिने छान सजवला होता.टापटीपपणा स्वच्छता तिच्या नसानसात भिनलेली तर मधू अगदी उलट. 'विसरणे ' या बाबतीत तर मधुचा हात कोणी धरूच शकणार नव्हते.विसरणं त्याच्या पाचवीला पुजलं होतं.


    या विसरण्यावरुन दोघांमध्ये खूप वादावादी व्हायची. कुठलीही गोष्ट मालू ने सांगितली आणि ती न विसरता मधू ने केली असं व्हायचंच नाही.विसरणार म्हणून मालू ने जर ओरडून सांगितलं ," आता परत आठवण करणार नाही " .त्यावर  हसून लगेच मधू म्हणायचेदेखील ," असं म्हणून तू अजून १० वेळा तरी मला आठवण करणार आहेसच.मला माहितीये ". काही अंशी ते खरं देखील होतं .जो पर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मालू हात धुवून मागेच लागायची.


      वर्षभरातच दोघांना एक गोंडस , गुटगुटीत बाळ झालं . त्याच्या  संगोपनासाठी मालतीने नोकरी सोडली.दिवसभर बाळाचे करण्यात आणि घरची कामे करण्यात तिचा दिवस कसा संपायचा तिलाच कळायचे नाही.


     तिचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस जवळ आला की तिचे सुरु व्हायचे, " काय करुयात ? पिक्चर बघुयात का ? जेवायला काय करु  ? " परत वर म्हणायची देखील ," मी आधीपासून आठवण करते म्हणून नाहीतर हे सुद्धा विसरलात असतात." 


    नातेवाईक , त्यांचे वाढदिवस आणि इतर सगळेच कार्यक्रम ती सांभाळत होती.मधू ला मात्र त्यांच्या कडच्या नातेवाइकांचीही नावं लक्षात राहायची नाहीत.मालू म्हणायची ," नशीब माझं , अजून मला नाही विसरलात " यावर फक्त हसून ' हम्म ' म्हणून मधू वेळ मारुन नेत असत.


    मुलगा शाळेत जायला लागल्यावर तर एकदा विसरण्याची पराकाष्टा झाली.एकदाच मुलाला शाळेतून घरी आणायची जबाबदारी मधू वर सोपवण्यात आली होती.संध्याकाळी शाळा सुटून अर्धा तास झाला तरी या मुलाचे कोणीच कसे आले नाही म्हणत एका शिपायाकरवी मुलाला घरी पाठवले .मूल सुद्धा अगदी शांतच होते.मालूचा मात्र तोंडाचा पट्टा जोरात सुरु झाला.मधुने लगेच माफी मागितली पण कामाच्या नादात विसरलो हे कारण मात्र द्यायला विसरला नाही.


    यथावकाश मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला.लग्न करुन तिथेच सेटल  झाला.परत मधुमालती चा दोघांचाच संसार सुरु झाला.मालू ला तर अजिबात चैन पडत नव्हते.मधू मात्र मस्त रिटायर्ड लाईफ एन्जॉय करत होते.


    मधुमालती दोघांच्याही आयुष्यात आता व्हाट्सअप ने शिरकाव केला होता.फेसबुक , व्हाट्सअँप यात छान वेळ जाऊ लागला दोघांचाही. आता मात्र मधुचा ' विसरलो ' व्हाट्सअँप मेसेज मधूनच डोकावू लागला.आता तर म्हातारपणाचं कारण देत सारखंच असं होऊ लागलं.मालू मात्र अजूनही बोलायचा एक चान्स सोडत नव्हती.


     अशातच एक दिवस मालू आजारी पडली.मालू ला स्वतःच्या आजारपणापेक्षा मधुचे कसे होणार याचीच जास्त काळजी.मधू मात्र प्रत्येक गोष्ट अगदी वेळच्यावेळी , नीटनेटकी करुन मालूचेही औषधपाणी , तिची सेवा प्रेमाने करत होता.


    मालूच्या डोळ्यात अश्रू आले. मधुने हलकेच तिचे डोळे पुसले.नुसत्या एका स्पर्शानेच दोघांनाही एकमेकांशी काय बोलायचं आहे ते समजले.


        १५/२० दिवसात मालू बरी झाली.सकाळीच  ,"आज काय आहे ??" विचारत होती मधूला. मधुचे नेहमीचे उत्तर ," काय आहे ?? विसरलो. " मालू जरा निराश झाली.उठून बाहेर आली तर हॉल छानशा फुलांनी सजवला होता.दोघांचे लग्न झाल्यापासूनचे छान छान फोटो लावले होते.सुंदरशी सनई लावली होती.


     मधुने मालूला नवीन साडी दिली आणि लवकर तयार व्हायला सांगितले .आज त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस होता. त्यांचा मुलगाही अमेरिकेतून घरी पोहोचणारच होता. मित्रमैत्रिणी , नातेवाईक सगळ्यांना आमंत्रित केले होते.मालूला खूप आनंद झाला.


    नवीन साडी नेसून आल्यावर मधुने हळूच तिला डोळा मारला.एखाद्या नव्या नवरीसारखी लाजली मालू.मधुने मोगऱ्याचे गाजरे मालूच्या डोक्यात माळले आणि हलकेच तिच्या कानात ," आय लव यू  " म्हणले.


    आज मधुमालती सगळ्या छानशा आठवणीत रमणार होते. मालू सोडून बाकी सगळ्या गोष्टींचा मधूला आता विसर पडला होता.

सायली वझे

Post a Comment (0)
Previous Post Next Post