एका लग्नाची गोष्ट

      एका लग्नाची गोष्ट   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ अंजली देशमुख मुंगीकर 

"आई, मी चालले ग कॉलेज ला", असे म्हणून सई तिची निळ्या रंगाची लुना घेऊन बंगल्याच्या गेटबाहेर पडली. लुना मुख्य स्टॅन्ड वर लावून, त्यावर बसून, त्याचे paddle फिरवून, ती सईने स्टार्ट केली. सई हलकेच लुनाला धक्का देऊन स्टॅन्ड वरून काढत लुना पळवू लागली. सोसायटीच्या बाहेर पडून लुना मुख्य रस्त्याला लागली तशी एका झाडाखाली सईची मैत्रीण शामल उभीच होती. शामलला लुनावर डबल सीट घेतल्यावर सईने लुना सुसाट पळवायला सुरुवात केली. कॉलेजचा रस्ता, गावातील मुख्य रस्ता असल्याने बराच रहदारीचा होता, पण सई त्या गर्दीतून वाट काढत वेगाने पुढे जात होती. 

थोड्याच वेळात सई व शामल कॉलेजला पोहोचल्या. तिथे पोहोचल्यावर त्यांना कळाले कि "आज first semester च्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे".मधल्या सुट्टीनंतर सर्व first year ची मुले कॉलेजच्या ऑफिस बाहेर गोळा झाली. एक-दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर निकालाचे मार्कमेमो ऑफिसमध्ये आले. कॉम्प्युटरच्या शेंडे मॅडमवर मार्कमेमो वाटपाची जवाबदारी होती, त्यामुळे ऑफिसमधून मार्कमेमो घेऊन, मॅडम कॉम्पुटर लॅब कडे निघाल्या. ऑफिसच्या बाहेर जमलेली सर्व मुले-मुलीही मॅडमच्या मागे निघाली. त्यात सर्वात पुढे एक मुलगा आपल्या मित्रांसोबत घोषणा दिल्याप्रमाणे हातवारे करत जात होता. त्यांच्या मागेच सई आपल्या मैत्रिणींसोबत जात होती. सईला हे हातवारे बघून खूप हसू येत होते. तिचे हसणे ऐकून आणि मधूनच, हळूच मागे वळून तिचा हसरा चेहरा बघून त्या मुलाला अजूनच उत्साह येत होता आणि तो अजून अजून तसे हातवारे करत होता. या सर्व हसीमजाकमुळे सईचे परीक्षेच्या निकालाचे टेन्शन कुठल्या कुठे पळून गेले होते. एकदाची computer lab आली आणि सर्व मुलांच्या हातात मार्कमेमो पडले. काही अपवाद वगळता सर्व मुले-मुली आपले गुण बघून खुश झाले होते. तर अशी होती सई व तिच्या मनातल्या राजकुमाराची पहिली-वहिली नजरानजर. 

असेच दिवस जात होते व बघता बघता इंजिनीअरिंग कॉलेजचे सईचे पहिले ३ वर्ष पार पडले. या मधल्या काळात राजकुमारने त्याच्या मित्रांसोबत काही मुलामुलींचा एक ग्रुप बनवला. त्यात काही ज्युनिअर मुलीही होत्या. तो ग्रुप दर पंधरा-वीस दिवसाला Group Discussion साठी भेटायचा. राजकुमार त्या ज्युनिअर मुलींपैकी एकीवर भाळल्या गेला. हि बातमी कॉलेज मध्ये सर्वदूर लवकरच पसरली. त्यातच ती सईलाही कळाली. सईला मनात उगीच वाटे, "राजकुमारला आपण सोडून, हि अशी मुलगी, कशी काय आवडली?" पण सईचे हे सगळे विचार मनातच चालत असत. तिने हे कोणालाच सांगितले नव्हते, अगदी तिच्या मैत्रिणीला शामललाही नाही. राजकुमारशी ती तर कधी बोललीही नव्हती. बोलणार तरी कशी, कारण तिची आणि त्याची इंजिनीअरिंगची ब्रांच वेगवेगळी होती. त्याचे पूर्ण नावही तिला खूप उशिरा कळाले होते. 

मग सुरु झाले सई आणि राजकुमारचे इंजिनीअरिंगचे अंतिम वर्ष. अंतिम वर्षाचे प्रथम सत्र भुर्रकन उडाले आणि कॉलेजच्या cultural program चे दिवस आले. अंतिम वर्ष आहे म्हणून सईने सगळ्या स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला आणि गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्यासाठीही नाव नोंदणी केली. राजकुमारनेही मित्रांसोबत एक ग्रुप डान्स बसविला. सई मागील तीन वर्षात अभ्यासाव्यतिरिक्त कशातच नसे, त्यामुळे सगळ्यांना सूत्रसंचालनामध्ये तिचे नाव पाहून खूप आश्चर्य वाटले. काही मुलांनी तर एकमेकांमध्ये सईचे सूत्रसंचालन "फोल ठरणार कि चांगले होणार", ह्यावर पैजा लावल्या. बोटावर मोजण्याइतकीच मुले सईच्या बाजूने होती, कारण सईला जवळून ओळखणारी खूप कमी मुले-मुली कॉलेजमध्ये होती. सईने एकदा कॉलेज मध्ये एका मित्राची motorbike धूम चालवली होती. ते बघून सर्व मुलांनी तोंडात बोटे घातली होती. 

त्या वर्षीच्या कॉलेज gathering मध्ये सईने टेबल-टेनिस, बॅडमिंटन, चेस ह्यात पहिली-दुसरी बक्षिसे मिळविली. मग एके दिवशी डान्स चा प्रोग्रॅम झाला. राजकुमारने त्यात गुडघ्याला लाल रुमाल बांधून डान्स केला. तो डान्स बघताना सईचे फक्त राजकुमारकडेच लक्ष होते, इतर कोण त्या डान्स troop मध्ये आहेत, हे सईला काहीच दिसत नव्हते. 

त्यानंतरचा दिवस होता गाण्याच्या  स्पर्धेचा. सई तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन, एक फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसून, आपले कमरेइतके केस मोकळे सोडून, हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक लावून, कार्यक्रम सुरु व्हायच्या फक्त पाचच मिनिटे आधी बॅकस्टेजवर पोहोचली. नुकत्याच संपलेल्या, एका मुलीच्या गाण्याचा परफॉर्मन्स चांगला न झाल्याने audience खूप गोंधळ करत होती. तेवढ्यात सई आणि तिचा सूत्रसंचालनातील सहकारी batchmate  स्टेजवर आले. तरीही audience गोंधळ करायचे थांबले नाही . मग सईने माईक हातात घेतला व बोलायला सुरुवात केली. सईच्या सुमधुर आवाजाने सभागृहात एकाच शांतता पसरली. 

"अजी, गा तो हम भी सकते हैं, मगर आवाज नाही हैं।

बजा तो हम भी सकते हैं, मगर साज नाही हैं| 

ऐ मुशर्रफ, तू गर्व ना कर, हम काश्मीर तो क्या, पाकिस्तान भी छूडा ले सकते हैं ।।"

ह्याबरोबरच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अनेक उत्कृष्ट गाणी झाली आणि मध्येमध्ये सई व तिच्या सहकाऱ्याचे सुरेख सूत्रसंचालन झाले. सईला ह्यासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशा रीतीने कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या gathering मध्ये सईने खूप बक्षिसे मिळवली. 

त्यानंतर कॉलेज मध्ये campus recruitment  चे वारे सुरु झाले. एक-एक करत कंपन्या येत होत्या पण सई आणि राजकुमारच्या हाती निराशाच येत होती. मग एक भारतीय मोटर्स कंपनी कॅम्पस recruitment साठी आली. सईने व राजकुमारने written टेस्ट क्लिअर केली. पण सईच्या निष्काळजीपणामुळे तिला हे कळलेच नाही. पुढचा राऊंड Group Discussion (GD) चा होता. तो राऊंड सईने मिस केला. GD साठी सईचे नाव राजकुमारच्या ग्रुप मध्ये होते. Group Discussion करत असताना राजकुमार सारखा, "सई का आली नसेल", ह्याचाच विचार करत होता. त्या संध्याकाळी सईला आपले written टेस्ट मध्ये selection झाल्याचे कळते. त्यानंतर सई कॉलेजमधील सरांना भेटते, सर कंपनीतील लोकांशी बोलून सईचा direct interview राऊंड सेटअप करतात. सरते शेवटी राजकुमारचे त्या कंपनीत selection होते, पण सईचे होत नाही. 

दरम्यानच्या काळात राजकुमार चे क्रश सोबतचे सगळे तार तुटतात. सईचे व राजकुमारचे इंजिनीअरिंग उच्चश्रेणीत पूर्ण होते. राजकुमार कंपनीत जॉब करून लागतो आणि परदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी GRE ची तयारी करू लागतो. सई इकडे जॉब ची शोधाशोध करत असते. तिला तिच्याच कॉलेज मध्ये visiting lecturer म्हणून जॉब  मिळतो. 

एकेदिवशी मुलांना  शिकवून क्लास मधून बाहेर पडताना, अचानक सईसमोर, राजकुमार त्याच्या एका मित्रासोबत येतो. समोरासमोर आल्याने सई व राजकुमार एकमेकांशी बोलतात. राजकुमार सांगतो, " मी  MS साठी कॉलेज मधल्या सरांचे recommendation letter घ्यायला आलो आहे." सईला त्यादिवशी खूप छान वाटते. पण तिच्या मनात एकच विचार येत राहतो, "राजकुमारचे काम दुसऱ्या  डिपार्टमेंट मध्ये होते, मग तो इकडे माझ्या डिपार्टमेंटला कशासाठी आला? मला भेटण्यासाठी तर नाही आला ना?" आपण राजकुमारशी पहिल्यांदाच बोललो, आणि तेही इतके भरभरून, ह्याचेही सईला नवल वाटत राहते. 

त्यानंतर काही दिवसांनी सईच्या ई-मेल मध्ये एक ई-मेल येतो, त्यावरचे "फ्रॉमनाव" बघून सई खुशीने उडायला लागते. तो ई-मेल असतो, राजकुमारचा. सई मग खूप विचार करून त्या ई-मेलला रिप्लाय देते. तशातच एका ई-मेल मध्ये राजकुमार लिहितो, "मी परदेशी MS करण्यासाठी दोन वर्षे जाणार आहे. तू मला जाण्याआधी एकदा भेटशील का?" सई खूप विचार करून हो म्हणते. एका  बस स्टॉप वर त्यांचे भेटायचे ठिकाण ठरते. सईला वाटते राजकुमार ह्या भेटीत "तू  मला आवडतेस ", असे काहीतरी म्हणेल. पण तिचा हिरमोड होतो. राजकुमार फक्त हवापाण्याच्याच गप्पा मारतो. सई तरी विचारते, " तू मला कशासाठी भेटायला बोलावले?". तरीही राजकुमार "सहज" असेच उत्तर देतो. 

राजकुमार परदेशी गेल्यावरहि सईशी ई-मेल ने संपर्कात राहतो. काही दिवसांनी सईचे एका MNC कंपनीत selection होते. इकडे सईच्या घरी लग्नासाठी स्थळे बघणे सुरु होते. एक-दोन करत काही मुले बघून होतात आणि एक स्थळ जरा ओळखीचे येते.सईला वाटते, ह्या स्थळाला नाही म्हणणे अवघड होईल. पण सईच्या मनात राजकुमारचे विचार असतात. हिम्मत करून सई एकेदिवशी तिच्या आईपप्पाना राजकुमारबद्दल सांगते. ह्यावर सईचे पप्पा म्हणतात, " मला राजकुमारचे स्थळ, माझ्या एका मित्राने आधीच सुचविले होते, त्यामुळे आम्ही राजकुमारच्या घरी जाऊन आलो.  पण त्याच्या आईवडिलांनी, "राजकुमार आता MS करत आहे त्यामुळे आम्हाला सध्या त्याचे लग्न करायचे नाही", असे सांगितले आहे. "

सई म्हणते, "मी व राजकुमार ई-मेलवर बोलतो. त्याला मी आवडते असे मला वाटते. पण त्याने अजून स्पष्ट असे काहीच विचारले नाही आहे". 

आई म्हणते, " अग, तुला माहित नाही, तर कशाला अपेक्षा ठेवतेस?"

"आईपप्पा, मला थोडावेळ द्या. मीच राजकुमारशी बोलून काय ते तुम्हाला २-४ दिवसात सांगते", इति सई.  

मग दुसऱ्या दिवशी सई ऑफिस करून संध्याकाळी लवकरच बाहेर पडते. जवळचेच इंटरनेट कॅफे  गाठते. आताशा ती दोघे कधी कधी इंटरनेटवर chatting पण करत असत, त्यामुळे सई मेसेंजर वर लॉगिन करून राजकुमारला मेसेज करते. "chatting साठी थोडावेळ आहे का," असे ती विचारते. राजकुमार हो म्हणतो. 

सई डायरेक्ट लिहिते, "तुला मी आवडते का?"

राजकुमार, "हो", इतकाच रिप्लाय देतो. 

सई, "नुसतेच आवडून काय उपयोग, लग्न करशील का माझ्याशी?"

राजकुमार ह्यावर नुसताच हसरा smiley पाठवतो. 

सई, "आत्त्ता मला फोन करशील का ?"

ह्यावर राजकुमार काही रिप्लाय न देता लगेच सईला फोन लावतो. सई अर्ध्या रिंगमध्येच फोन उचलते. फोनवर राजकुमार लग्नासाठी हो म्हणतो. सई म्हणते, "तू नेहमीसाठी परदेशात राहणार आहेस का?"राजकुमार नाही म्हणतो. सई  राजकुमाराला सांगते,  "माझे आईपप्पा तुझ्या घरी गेले होते. पण तुझ्या घरचे लग्नासाठी नाही म्हणाले." राजकुमार म्हणतो, "मला वाटले तूच तुझ्या आईपप्पाना माझ्याघरी पाठवले."  सई  ह्यावर घरी घडलेली सगळी हकीकत सांगते. राजकुमार म्हणतो, तुझ्या आईपप्पाना परत माझ्या घरी पाठव. मी माझ्या आईबाबांशी बोलून सगळे सांगतो. 

राजकुमारच्या घरचे सईला भेटतात. पाहताक्षणीच सई सर्वांना आवडते. तरीही राजकुमारची आई म्हणते आम्हाला पत्रिका बघायची आहे. पत्रिका तर ३६ गुण जुळते, पण एक प्रॉब्लेम येतो, सई  चा blood group नेगेटिव्ह असतो आणि राजकुमारचा पॉझिटिव्ह. राजकुमार ह्याबद्दल सईशी बोलतो. सई म्हणते, "negative blood group चा  दुसऱ्या बाळंतपणात प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिल्या बाळंतपणात काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि आता एक injection  निघाले आहे, जे पहिल्या बाळंतपणात घेतले कि दुसऱ्या बाळालाही काही धोका राहत नाही". हे ऐकून सई च्या मेडिकेल information up-to-date असण्यावर राजकुमार खुश होतो. तरीही राजजकुमारची आई ओळखीच्या डॉक्टरांशी बोलून खात्री करून घेते, त्यानंतरच लग्नाची बोलणी पुढे सरकतात. 

एवढे करूनही सई आणि राजकुमारचे लग्न होईल कि नाही, हि खात्री नसते कारण राजकुमार डिसेंबर मध्ये येणार असतो. तेंव्हा त्याला फक्त एंगेजमेंटच करायची असते आणि सईच्या आईपप्पाना लग्नाचा बार उडवायचा असतो. राजकुमारला MS  करत असताना लग्न करायचे नसते. 

राजकुमार म्हणतो, "नोकरी मला नाही, मी छोकरी कशी आणू?"

ह्यावर सई म्हणते, "तू जॉब केल्यानंतर MS करत आहेस. त्यामुळे MS आणि previous job experience च्या जोरावर तुला लगेच नोकरी मिळेल, तू काळजी नको करुस". 

तरीही राजकुमारचे मन लग्नासाठी काही केल्या तयार होत नाही. 

मग राजकुमारची आई त्याला स्पष्टच सांगते, "सई तुला आवडली असेल तर डिसेम्बरमध्येच लग्न कर. नाहीतर सई शी लग्नाचा विचार सोडून दे". 

ह्यावर मग राजकुमार लग्नाला तयार होतो आणि 

सई व राजकुमारचे लग्न थाटात पार पडते. 

--  सौ. अंजली देशमुख मुंगीकर 

Post a Comment (0)
Previous Post Next Post