खोडरबर

 खोडरबर  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️रूपाली पंडित


आज परत ती ग्लानीत गेली होती. अणु रेणू भांडत होते आतून. किंचाळत उठली. सभोवती बंद खोली फिरता फॅन टेबलावरची केशरी रंगाची पाण्याची बाटली. शेजारी पेला. बळेच उठून पेला भरला नि घोट घोट पाणी पीत बसली.


       कातरवेळ होती. अशा कितीतरी कातरवेळा पचवल्या एकटीनं. आज मेंदू साथ देत नव्हता. अभेद्य समीकरण सुरू होते डोक्यात आणि डोळ्यात फ्लॅशबॅक. एकटीच बडबडली खोडरबर हवा आहे. डोक्याला पकडून परत रडत बसली. या असल्या वेदनेचा मग जाळ झाला नि खाडकन उठून मग तिने कपाटातल्या सगळ्या वस्तू काढल्या. सगळे इतिहास सैरावैरा गोळा होत होते. तिला खुणावत होते . हळूहळू जाळही थंडा झाला होता तोवर चुपचाप सारे गोळा करत तिने कपाटात पूर्ववत ठेवून दिले. गॅस वर काळा चहा ठेवला दालचिनी आणि मिरे घालून. तोवर कपडे बदलले. चहा पिऊन बाहेर पडली. डोकं गच्च झालं होतं पण मनाला आवर घालून झपाझप पावले टाकत तिने टॅक्सी पकडली  नि तिच्या आवडत्या ठिकाणी पोहोचली.


      आज फारशी वर्दळ नव्हती एका कठड्यावर किनारा न्याहाळत बसली. लाटांची गाज तिला डिवचत असल्यासारखी वाटत होती. किती तरी वेळ तशीच निस्तब्ध बसून राहिली. शेजारी एक जोडपे येऊन बसले. आज तीच जीवघेणी कालवाकालव. तिच्याही शेजारी हातांची गुंफण करून कुणीतरी बसल्याचा भास. ती भानावर आली तेव्हा बघते तर काय शेजारी एक आजी बसली होती. ते जोडपे कधीचेच उठले होते. जरा नजर भेट झाली आजी बोलली," एकटीच आलीस?" इतक्या दिवसात कुणीतरी आपल्याला विचारत ... हे सुसह्य होतं. ती " हो" म्हणाली. स्वतःला परत स्तब्धतेच्या अधीन केले लाटांची बोलगाणी सुरू होती रात्र खूप झाली म्हणून थेट घर गाठलं टॅक्सिंन.


    पोटात  काही बाही घालून झोपली. रात्री दोनच्या सुमारास मळमळलं ओकारीही झाली. काही कळेना भोवळ यायला लागली. एकटं राहायचं म्हणून सासर माहेर सोडलं तो गेल्यावर. माझं दुःख मीच मुरवेल म्हणत. दोन्हीकडची मंडळी समंजस. तुला जसे योग्य वाटेल तसं कर म्हणाल्या. या आठवड्यात तब्येत जरा जास्तच खालावत होती पण हट्ट आड येत होता. सकाळी डॉक्टर कडे गेली तपासण्या झाल्या आणि ऐकून सुन्न झाली. हसावे की रडावे हेच कळत नाही तेव्हा त्या चिरंतन अवस्थेला काय म्हणत असणार माहिती नाही. पण घरी आली तेव्हा  रित्या आयुष्यानं शरीरात ओझं दिलं होतं  त्याच्या तिच्या संसारातल्या या स्वप्नााचा असाही रंग तिला बघावा लागणार होता.काल आपण कुठल्या अवस्थेत स्वतःला नेत होतो खोडरबर हवाय म्हणून ओरडत होतो आणि आज नियतीने आपल्या पुढ्यात काय टाकले. ही आजची कातरवेळ नवखी होती. खुप दिवसानंतर दिवा लावावा वाटला ,खिडक्या उघडल्या गेल्या, निशिगंधाचा बेधुंद सुगंध डोळे बंद करून शरीरात पेरून घेतला. उगाचच गाणं ऐकावसं वाटलं, "एकाच-या-जन्मी-जणू-फिरुनी-नवे-जन्मेन-मी." इतका कमालीचा बदल आपल्यात? इतक्या दिवसात आनंदाचा लवलेशही नसताना ही परडी भरून फुल पुढ्यात कुणी ठेवलीे?त्याला कणकेचा शिरा आवडायचा आज तिने स्वतःसाठीच बनवला . रंग काढलेत. कॅनव्हास काढला. अर्धवट वाचून झालेली पुस्तकं काढलीत .पानावर टिप्पण लिहायची जुनी सवय एक वाचताना खाली पडला तिने हातात धरला-"जगण्यापेक्षा जगवणं कठीण असतं--"आणखी बरंच काही स्वतः च्या हस्ताक्षरात लिहिलेलं....  उगाच आरश्या समोर गेली. खोल डोळे रंग उडालेला चेहरा हडकुळे हात पाय गबाळे कपडे स्वतःच्याच प्रतिबिंबाला न्याहाळत बसली हळूहळू  हात एकदम पोटावर आला मन भरून आले मिटल्या डोळ्यात पाणी बराच वेळ स्थिरावले श्वासांची लय तिची आणि आतल्या जीवाचीही आसवांच्या पुरात पोहून किनाऱ्यावर आली.सुट्टी संपत आली होती चार दिवसांनी कॉलेजला रुजू व्हायचे होते अशा अवस्थेत काम झेपणार नाही म्हणून जुन्या कामवाली बाई ला निरोप दिला . दोघीही प्रश्नोत्तरे  नि चौकश्या न करता पहिल्यासारखा कामावर लागल्यात. मधेच शिकवताना लंच ब्रेकच्या आधी अपराधीपणाची  भावना उचंबळून यायची आपण   निष्पाप जीवाची खूप आबाळ केली. स्वतःकडे दुर्लक्ष करून, उपासमार करून हे प्रकर्षाने जाणवायचं. अजून पर्यंत ही बातमी तिने सासरी माहेरी कुठेही सांगितलेली नव्हती. तिचा हा उत्सव फक्त तिला आणि आकाशला साजरा करायचा होता. संध्याकाळी घरी आली की चहा पीत पीत त्याच्या फोटो समोर बसून त्याला गप्पा मारत बसणे हे रोजचेच झाले होते या बातमीनं त्याचं असणं तिनं असं झपाटल्यासारखं गृहीत घेतलं होतं त्याचा वावर पहिले सारखच वाटायचा घरात.


    पाच महिने झालेत अंग जड वाटायला लागलं. जरा तब्येत खराब म्हणून डॉक्टर कडे गेली तपासण्या केल्या." एकट्याने आलात?? ", डॉक्टर ने विचारताच म्हणाली," एकटी कुठे?बाळ आहे ना!" मग दोघीही हसल्या.  "अशा दिवसात आपली काळजी करणारं कुणीतरी हवं बरं का? ", ती मनात म्हणाली माझा आकाश आहे ना. येताना काय विचार आला कोण जाणे. आईला आणि सासूबाईंना फोन करून संध्याकाळी बोलावणे केले. पोट फारसं समोर आलेलं नव्हतं पण शरीर जाड झालं होतं चेहऱ्यावर सुस्तपणा दिसला तरी डोळे आनंदी होते दोघीही अवा्क झाल्यात अगदी दोघींचाही हातात हात घेऊन ती म्हणाली मला माफ करा मी आधीच सांगायला हवं होतं. त्याने जाताना माझ्या पुढ्यात स्वतःचा एक अंश दिलाय. पाच महिने झालेत. दोघीही जाम खुश आनंदाश्रू आवरेनात. पण आई काळजीत उभं आयुष्य एकटी कशी काढेल परत पुढ्यात हे बाळ . पुढेमागे हिला आपण लग्नासाठी बोललो असतोच ना तशी समजूतदार आहे ऐकलं असतं की नसतं माहिती नाही.


.


    सासुबाई मात्र आपला आकाश या बाळात दिसेल म्हणून डोळे भरभरून तिला जवळ घेत राहिली स्वार्थी मनोवृत्तीची दोन दृश्य. पण वास्तव दोघींनीही मान्य केले . आळीपाळीने दोघीही रुमानी कडे राहू लागल्यात. तिच्या आनंदात त्यांचा आनंद होता.


       काही दिवसांनी तिने रजा देखील टाकली. आई आणि सासुबाई दोघीही हौशी ने सगळं करत होत्या. खाण्यापिण्याची सरबराई होती. सल्लेही बरेच होते. रूमानी प्रत्येक गोष्ट आकाश सोबत गप्पा मारत त्याला सांगत बसायची. एक-दोनदा आईने आणि सासूबाईंनी बघितले तिला आकाश च्या फोटो समोर गप्पा मारत असताना. पण दोघीही काही बोलल्या नाहीत त्यांना वाटलं अधीर मन कमी वय त्यात तो गेला आठवण येतच असेल पण दिवस-रात्र हा तिचा दिनक्रम सुरूच राही. लहान-सहान गोष्टी  तक्रारी त्याचे फोटोजवळ जाऊनच. अक्षरशः त्याच्या समोर ठेवून हट्ट करायची भरव ना मला म्हणून. दोघीही तिचा वेडेपणा बघून एकांतात रडायच्या.  रात्री आरशात बघून पोटावर हात ठेवून म्हणायची ऐक ना तुला आवाज येतेा आकाश काय म्हणतेय बाळ ? नवव्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला काही मैत्रिणी आणि निवडक जवळची लोकं.  आईने हिरवी साडी घेतली सासूने सगळे घर सजवले सगळी तयारी झाली आणि चक्क ही बया आकाशी रंगाची साडी नेसून पाटावर बसली आकाश चा फोटो घेऊन. आई अवाक.सासुबाई म्हणाल्या थांबा मी बोलते ."अगं आज हिरवी साडी नेसतात जा बदल". आकाशला आकाशी रंग आवडायचा मी हीच साडी घालणार. आत्ताच तर तो म्हणाला हीच साडी छान दिसते तुला हो न आकाश. तिच्या भावनिक गोष्टींशी आंतरिक उमाळ्याशी कुठल्याही चालीरीतींना हुज्जत घालावी वाटली नाही आणि समारंभ पार पडला.

दिवसेंदिवस तिचे आकाशचे वेड वाढत होते काही कळत नव्हते.  पण नऊ महिने होत आले होते कुठल्याही क्षणी ही बाळंतीन होईल तेव्हा या विषयासंदर्भात कुठलाही समुपदेशकाकडे किंवा मानस तज्ञाकडे नेणे तूर्त तरी शक्य नव्हते. 


     रात्री वैरयासारखी वाटली दोघींना. रात्री एक पासून सारखी आकाश आकाश ओरडत होती आणि सासूने शेवटी पहाटे पाच वाजता दवाखान्यात भरती केले दवाखान्यात डिलिव्हरी होईपर्यंत दोघींच्याही घशाला कोरड पडली होती एक तर तिच्या आकाश वेडाने दोघीही चार महिन्यापासून चक्रावून गेल्या होत्या सगळे व्यवस्थित व्हावं म्हणून दोघीही हात जोडून प्रार्थना करीत होत्या तेवढ्यात नर्स आली बाहेर. मुलगी झाली म्हणून आकाशची आई थोडी नाराज झाली त्यांना वाटलं आकाश आला असता पुनर्जन्म घेऊन तर .पण हेही नसे थोडके त्याचा अंशच आहे ना 


      दोन-तीन तासांनी रुमानी शुद्धीवर आली बाजूला गुबगुबीत गोंडस बाळ बघून कधी एकदा हृदयाशी लावेल असं होऊ लागलं तिला. आकाश ने जाता जाता एका अल्लड  रूमानी ला आईची जबाबदारी दिली होती. आई आणि सासू बाई  दोघीही एकदमच बोलल्यात कन्यारत्न आलाय घरी. तिने बाळाला छातीशी धरले  पान्हयाला लावले आणि म्हणाली ,"आकाशी".


     दोघीही गप्प बसल्या एक जण घरी आणि एक जण दवाखान्यात सुट्टी होईपर्यंत सुरू होतं . एकदाचे बाळाचे आगमन घरी झाले रुमानी पार व्यस्त झाली आईसासूच्या लाडेकौतुकाने. दोन्ही आज्या व्यस्त झाल्यात दिवसभर रुमानी आणि आकाशीच्या कामात.रुमानी मात्र आकाशी आकाशी करत राहायची आकाशी ला भूक लागली कशी झोपली ही बघ रात्री-बेरात्री तिच्या चेहऱ्याकडे बघत रहायची आई झाल्याच्या रुबाबात स्वतःशीच निद्रिस्त हसायची. बारसे झाले रुमानी चा पहिला उच्चार आकाशी. हेच नाव ठेवले गेले . चार महिने आई सासू दोघीही जवळ प्रत्येक   गोष्टीत रूमानी चा सहभाग आकाशीला आंघोळ घालण्यापासून खेळण्यापासून दुध पाजन्यापासून झोपावंण्यापासून. रुमानी चे सगळं जग आकाशी पर्यंत येऊन ठेपल. या वयात हे सुख ही कमी नाही रुमानी ची सासू आईजवळ बोलली त्या हि हो म्हणाल्या. नव्या पोरीच्या येण्यानं आपली पोर माणसात आली असं वाटायला लागलं त्यांना. हळूहळू तिचं आकाश आकाश कमी होत आकाशीत शिरलं होतं हा नवा बदल दोघींनीही टिपला होता. पूर्णपणे त्याला विसरणं कधीही शक्य नव्हतं हे दोघींनाही कळून चुकलं होतं कारण त्याचा अंश आता तिला वाढवायचा होता बाप म्हणून त्याचं नाव तिच्या नावासमोर नेहमीच असणार होतं पण तरीही रिप्लेसमेंट मात्र नक्की झाली होती.


    रूमानी आनंदी होती थोडीफार का असेना. दुधाच्या पान्हाची नाळ मायेच्या पान्हयाशी जुळलेली असते अधेमध्ये हा बाबा बघ ना कुठे गेलाय बोलाव त्याला असं म्हणायची . आकाशी ला  घरात बाबा नाही खूप लवकर कळायला लागले . बाबा फक्त फोटोचत असतो हे बाळकडू तिला जन्मजातच मिळालेलं पण तरीही दोघी त्याच्या फोटो सोबत त्याचं अस्तित्व चौकटीत जरी बंद असलं तरी घरात सांभाळत होत्या.आई काही दिवसांनी परतली पण सासुबाई  दिराकडे न जाता इथेच राहिल्यात रुमानी आणि आकाशीजवळ-


    आकाशीचे बोबडे बोल तिचे खाणेपिणे तिचे दुडूदुडू धावणे त्यांचा पाय निघेना. एका आईने रुमानी ला आपलं मूल दिलं होतंआणि रुमानी ने आज आकाश च्या आईला आकाशी. दोन्ही आया आज समान होत्या गमावल्याचे दुःख असलं तरी आकाशीच्या रूपात आकाशचं असणं त्यांनी मान्य केलं होतं. 


      सांजवात झाली आणि आकाश ची आई आकाशच्या फोटो जवळ बसल्यात. रुमानी आली कॉलेज वरून दारात "आकाशी" आवाज देताच ती बिलगली येऊन . मग दोघींचे गोड गोड बोलणे.....  


आकाश ची आई हळूच फोटोकडे बघत म्हणाली,"  रूमानी पार वेडी झाली असती आकाश खोडरबर दिलास रे तुझ्या रूमानीला तू जातानाही".


समाप्त

Post a Comment (0)
Previous Post Next Post