द लास्ट कॉल

 सदर कथा - "द लास्ट कॉल" माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये."द लास्ट कॉल"          अबोलीला पहायला पुण्याहून मोहीले कुटुंबीय येणार होते, त्यांच्या मुलाचे स्थळ होते. धनंजय, हा मल्टी नॅशनल कंपनीत होता. बोलण्यात हुशार, दिसायला हॅन्डसम, चांगलं पॅकेज. अबोली कोकणात गावी राहत असल्याने दिसायला सुंदर जरी असली तरी, स्वभावाने भोळी, शांत, हळवी. पसंती झाली की लगेच साखरपुडा उरकायचा या तयारीनेच ते आले होते.           झालं कांदेपोह्याचा कार्यक्रम पार पडला. धनंजय आणि अबोली यांना एकमेकांशी बोलायचे असेल तर बोलुन घ्या, असं घरातल्या मोठ्या मंडळींनी सांगितले. अबोली ने मानेनेच नकार दिला की मला काही नाही बोलायचे. पण...          धनंजय, "पण मला बोलायचे आहे..."          तिच्या अशा लाजाळू स्वभावामुळे दोन चांगले स्थळं हातची गेली होती. तरी तिच्या वहीनीने आणि जीवलग मैत्रीण शांभवी ने तिला या कार्यक्रमाआधी चांगली ट्रेनिंग दिली होती. शांभवी बोल्ड आणि ब्युटीफूल, पटकन ओळख करून समोरच्याला आपलंसं करणारी. त्यामुळे तिने या कार्यक्रमात एन्ट्री करू नये, अशी सक्त ताकीद वहीनीने दिली होती. बाकी वहीनीला सुद्धा आवडायची, तिची सख्खी नणंद असल्यासारखे पटायचे दोघींचे.          वहीनीने पटकन म्हटले, "अबोली, त्यांना आमराईत ने."          अबोलीने लाजून मान हलवली. धनंजय साठी ही गोष्ट नवीनच होती. पुण्यात मुली किती बिनधास्त रहातात, नोकरीत मोठमोठ्या हुद्यांवर काम करतात, छोटे छोटे कपडे घालून वावरतात, मुलांसोबत फिरणं, सिगारेट ओढणं हे सर्रास करतात आणि ही अगदी आजीच्या काळातील, एकवेळ आपली आजी सुद्धा इतकी लाजरी नसेल. त्याला ती आवडली. कारण, आजकाल बॉयफ्रेंड बहुतेक ८०% मुलींना असतील, त्यात कोण किती पुढे गेलं असेल सांगता नाही यायचं. त्यामुळे आपल्या बरं भेटलं लाजाळू चे झाडं, म्हणून त्याचा होकार होता.          अबोली आणि धनंजय आमराईत फिरत होते.          "तुमचं नांव आधी पासूनच ठेवलं आहे का ? कि बदललं ?", धनंजय हसत म्हणाला.          आधीच भितीने तिची गाळण उडाली होती आणि असा विचित्र प्रश्न विचारायला त्याने आपल्याला. एकट्यात बोलायचे म्हटले फक्त हे विचारण्यासाठी. ती अडखळत म्हणाली, "अं.... मं...म्हणजे ?"          "अहो, म्हणजे तुमचं नाव अबोली आहे म्हणून तुम्ही बोलत नाही की तुम्ही बोलत नाही म्हणून तुमचं नाव बदलून अबोली ठेवलं ?", धनंजय हसत म्हणाला.          "नाही माझं नाव अबोली च आहे. चला, तुमचं विचारणं झालं तर जायचं ?", ती भीत भीत म्हणाली.           "अरे, हे थोडीच विचारायचे होते. ते तर तुम्ही सहज व्हाव्या, म्हणुन विचारले. तुमच्या लग्नानंतर काय अपेक्षा आहेत ?", धनंजय.          "काहीच नाही..."          "माझ्या नाही विचारणार ?"          "तुमच्या ?"          "माझ्या सोबत पार्टीज् मध्ये यायचे, पण असे काकुबाई सारखं नाही, मी ड्रिंक चा आग्रह नाही करणार, पण डान्स साठी माझी उत्तम पार्टनर म्हणून शोभावी, चार-चौघात व्यवस्थित वावरावं लागेल, असं लाजणं-बुजणं मला एक हद पर्यंत आवडेल. पण सोसायटी मध्ये रहायचं तर तसं स्टॅण्डर्ड मेंटेन करावं लागतं, ईत्यादी..", धनंजय.          तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले... धनंजयच्या लक्षात आले, त्याने लगेच सावध होऊन म्हटले, "ठिक आहे. मी लगेच अपेक्षा नाही करणार. पण शिकायची ईच्छा आहे नं ?" तिने मान डोलावली.           "बरं, तुम्ही मनाने तयार आहात नं ? म्हणजे उगाच मन मारून जबरदस्तीने माझ्याशी लग्न करू नका, काय असेल ते स्पष्टपणे सांगा, नंतर मग खंत नको..", धनंजयनी स्पष्टपणे विचारले.          "मी मनाने तयार आहे, फक्त मला जुळवून घ्यायला वेळ द्या, प्लीज."          त्याला आनंद झाला. तिने शांभवीला माझ्या आसपास रहा पण आमच्या घरच्यांना दिसु नको असं बजावून ठेवले होते. शांभवी आमराईत लपून पहात, ऐकत होती. तिला हेवा वाटला की किती हॅन्डसम आणि समजुतदार नवरा मिळतोय. मस्त पॅकेज, कार, पार्टीज्, ड्रिंक्स, फॅशनेबल कपडे, मजा आहे. काश, अबोलीला नकार मिळाला तर मी बाबांना सांगुन हे स्थळ हातचं जाऊ नाही देणार.          संध्याकाळी मस्त साखरपुडा पार पडला. धनंजय ने आधीच स्मार्टफोन घेऊन ठेवला होता. तो त्याने सर्वांच्या देखत तिला गिफ्ट केला. निघताना तो फ्रॅन्कली म्हणाला, "अबोली, बोलायला फोन दिला आहे बरं का...मी रोज सात वाजता करेल फोन." सगळे हसले. अबोली लाजून चूर झाली आणि आत पळून गेली. दोन्ही कुटुंब आनंदात होते. वहीनीच्या ओळखीने स्थळ आलं होतं.          वहीनी शांभवीला, "नणंदबाई, आता तुमच्या साठी पाहू का असं स्थळ ?"          ती खट्याळपणे म्हणाली, "हेच का नाही सुचवलं."          सगळ्यांनी नेहमी प्रमाणे तिचं बोलणं लाईटली घेतलं.           दुसऱ्या दिवशी दोघी मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या.          "शांभवी, तु ऐकलं नं, त्यांचं बोलणं. मला टेन्शन आलंय गं. मला जमेल असं वागणं, तुला छान जमतं.", अबोली.          "नको काळजी करू, मी शिकवते. करते तुला दोन महिन्यांत ट्रेन. पण मी सांगेल तसं ऐकावं लागेल. मंजूर ?"          "हो. पण फोन आला तर काय बोलु सगळ्यांसमोर ?", अबोली निरागसपणे म्हणाली.          "वेडा बाई ! अशा गोष्टी सगळ्यांच्या समोर थोडीच बोलायच्या असतात.", शांभवी.          "शीsss बाई उगाच त्यांनी फोन दिला."          "अगं तो काही बोलेल, मग आपण काही बोलायचे."          "ए शांभवी, तु बोलुन दाखवशील त्याचा फोन आला की. काही दिवस तुच बोल, मग नाही म्हणणार तुला... प्लीज नाही नको म्हणु."          शांभवी कशी बशी तयार झाली. दोघी बाहेर निघाल्या. वहीनीने मस्करी केली, "अबोली, सात वाजताहेत फोन आहे नं सोबत."          "वहीनी sss" म्हणत लाजली. आई सुद्धा तोंडाला पदर लावून खुदकन हसली.          दोघी आमराईत गेल्या. तेवढ्यात फोन वाजला, तिने घाबरत चक्क शांभवी कडे फेकला.          कॅच करत ती म्हणाली, "वेडीस का ? इतका महागाचा फोन आहे. इतकं काय घाबरली ? तो काय खंडणी थोडीच मागणार आहे."          "ते जाऊ दे बोल बाई आणि बिनधास्त नको बोलु, नाही तर शंका येईल त्यांना.", अबोली.          "हो... बोलते हो मॅडम. अगदी तुमच्या प्रमाणे चार शब्द, ते पण तोलुन-मापुन.", शांभवी.          पुन्हा फोन वाजला. शांभवी ने उचलला आणि स्पिकरवर टाकला.          "हॅलो !", शांभवी अबोली सारखं म्हणाली.          "कशी आहेस ?"          "मी छान..."          अबोली अजाणतेने हसत होती. तिला मजा वाटत होती.          "आणि तुम्ही ?", शांभवी.          "मी ? मी तुझ्या आठवणीत आकंठ बुडालेलो. आज ऑफिस मध्ये मनच लागत नव्हते. नजरेसमोर फक्त तुच..."          "ईश्श् sss काही तरीच तुमचं...", शांभवीला हे म्हणताना हसु येत होतं. पण तिने ते दाबले.          "ए, बस् कर नं आता तुम्ही म्हणणं. माझं नाव काय खराब आहे का ?", धनंजय.          "अहो...पण किती मोठं आहे. मी फक्त जय म्हटलं तर चालेल तुम्हाला ?"          "ओ यस. मला आवडेल. म्हण ना जय एकदा..."          "अय्या आत्ताच नाही हं, मला लाज वाटते. मी ठेवते फोन.", असं म्हणून शांभवीने फोन ठेवला सुद्धा.          दोघी खळखळून हसल्या. आता असं रोज होऊ लागले. दोन-तीन दिवसांनी शांभवी अधे-मधे त्याच्या लंच अवर मध्ये बोलु लागली, तिच्या फोनवरून. अबोली या बाबतीत अनभिज्ञ होती.          धनंजय सुद्धा खुष होता. त्याला वाटले की अबोली आता मनमोकळेपणाने बोलायली लागली आहे. बाकी मी शिकवेल तिला, चांगले ग्रास्प करतेय.          दुसरी कडे शांभवीचे मन खुप गुंतत चालले होते. अबोलीच्या लग्नाचे दिवस जस जसे जवळ येत होते. तस तशी ती अस्वस्थ होत होती. कोणाला काही सांगता येत नव्हते, नाही तर सगळे तिच्या विरोधात जाऊन गोष्ट बिघडू शकते, अगदी आपले आईवडील सुद्धा. काय करावं ? एकदा स्वतः बोलावं का जय सोबत. जय... मीच तर नांव दिले आहे त्याला. त्याला माझं बोलणं सुद्धा आवडायला लागले आहे. फक्त चेहरा अबोली चा आहे, तशी अबोली पेक्षा मी तर सुंदर आहे.           जर धनंजयनी स्वतः नकार दिला तर येवढं कोणाला वाईट नाही वाटणार. दुसऱ्या दिवशी ती समुद्राकाठी तिच्या रोजच्या जागी जाते नेहमी प्रमाणे बोलायला, पण स्वतःचा मोबाईल घेऊन. त्याला सर्व हकीकत सांगते. तो हक्का-बक्का होता. त्याला अबोली चा भयंकर राग येतो, असं फसवल्याबद्दल. तो ॲंगेजमेंट तोडण्याचा निर्णय घेतो.          "हे पहा मिस.....", धनंजय.          "शांभवी", ती आपलं नाव सांगते.          "हं शांभवी, मला आठवत नाही, तुम्ही कशा दिसता. मी न पाहता तुम्हाला होकार कसा देऊ ?", धनंजय.          "थांबा मी तुम्हाला आत्ताच सेल्फी काढून पाठवते. जर तुमचा मला कॉल आला, तर मी समजेल की तुम्हाला मी पसंत आहे. नाही तर हा आपला लास्ट कॉल असेल.", असं म्हणुन ती फोन ठेवते.           छान तयार होऊन आली असते आणि धनंजय पण जवळपास कन्विन्स् झालेला असतो. ती अधिरतेने स्वतःचे सेल्फी काढायला लागते. हवा तशी पोझ येत नाही, असं वाटतं. तर ती समुद्रात पुढे पुढे जात चिंब भिजून जाते आणि एक सुंदर सेल्फी घेते. पाण्यात ओलीचिंब झालेलं स्वतःचे मुर्तीमंत सौंदर्य पाहून हलकेच हसते. हा फोटो ती लगेच सेंड करते.           या सर्वात तिचं लक्ष नव्हतं की आपण किती पुढे आलोय. त्याचा लगेच रिप्लाय येतो - 👌😘.          ती आनंदाने "याहू sss " ओरडते. तेवढ्यात त्याचा फोन येतो.           तो हाय करतो आणि विचारतो, "विल यू मॅरी मी ?"          ती काही बोलणार, तेवढ्यात एक मोठ्ठी लाट 🌊 येते. तो ओरडतो, "शांभवी, वाचव स्वतःला." तिला सावरण्यासाठी वेळ नाही मिळत.           तो हतबलतेने पाहत राहतो. ती दुर गेलेली असते त्याच्या नजरे समोरून.          त्याचा होकार मिळूनही तिच्या साठी शब्दशः लास्ट कॉल ठरतो.समाप्त.अनघा लिखिते ✍🏻

वरील कथा अनघा लिखिते यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

ही कथा तुम्हाला आवडेल.

👇

तुला भीती कुणाचीPost a Comment (0)
Previous Post Next Post