तृप्ती

तृप्ती 

✍️ बीना बाचल

रोमा आणि अंकुर डायनिंग टेबल वर त्यांच्या second home/weekend home च्या व्यवहाराबद्दल बोलत होते. सुंदर अशी  निळ्या  समुद्रकाठची ती बंगली चांगलीच मनात भरली होती दोघांच्या ,आणि नाव ही छान होतं" निळाई"! ते नाव ऐकूनच तिथे जाण्याचा मोह व्हावा. उद्या ऑफिस ला सुट्टी घेऊन जाऊन येऊ आणि फायनल व्यवहार उरकून टाकू असं पक्क ठरलं.
अंकुरच्या घरी नवरात्र बसलं होतं ,त्याची आई देवीचं सगळं मनापासून करे , तिची फार इच्छा असे की रोमा नेही किमान एकदा छान भरजरी साडी,बांगड्या, गजरा, कुंकू असा छान शृंगार करून देवीची पूजा करावी,पण रोमा अगदीच विरुद्ध विचारांची होती.तिला ह्या सगळ्या गोष्टी पटत नसत तिचा फक्त स्वतः च्या कामावर ,कर्तृत्वावर विश्वास होता.
आजही पहाटे दोघे जायला निघाले तेव्हा अंकुरच्या आईने दोघांना जाताना देवी च्या प्रसादाचा लाडू दिला ,पण इतक्या सकाळी इतकं heavy नाही खाऊ शकणार म्हणून तिनं नकारच दिला, अंकुर ने मात्र आईने प्रेमाने दिलेला प्रसाद खाल्ला. 
                दोघे आईंना नमस्कार करून निघाले. काही वेळ प्रवास केल्यावर त्यांना जाणवलं की हवा अचानक बदलतेय ,स्वच्छ निळं आभाळ अचानक झाकोळून आलं आणि पुढच्या क्षणाला पावसाला सुरुवात झाली. रोमा जाम खुश झाली' चला, पावसाळी ट्रिप साठी नाहीतरी वेळ मिळालंच नव्हता आपल्याला ,ती हौस ह्या निमित्ताने पूर्ण होईल!" अंकुरनेही हसून दुजोरा दिला.
पण काही अंतर जाताच त्यांची गाडी बंद पडली ! आणि अशा आडवाटेत त्यांच्या गाडीची दुरुस्त तरी कशी होणार !!
अंकुर आणि रोमा जरा नाराज झाले पण त्यांनी इथेच कुठेतरी थांबू यात ,असं ठरवलं. त्यांनी ' निळाई' बंगल्याच्या agent लाही तसं कळवलं.
मग अंकुर ने आपली कार  तिथेच बाजूला ठेवून जरा दूर पण एका मोठ्या वाड्याकडे मदत मिळतेय का ते बघायचे ठरवले.दोघेही बरसणाऱ्या पावसात चिंब भिजले होते.थोडं अंतर चालून आल्यावर ते त्या वाड्यासारख्या दिसणाऱ्या मोठ्या घरापाशी येऊन ठेपले..
  आतून बऱ्याच लोकांचा आवाज येत होता, म्हणून दोघेही आत शिरले तर आत देवीची आरती सुरू होती, नाईलाजाने का होईना दोघानंही आरती होईपर्यंत थांबावे लागले, रोमा कंटाळली पण ते आरती आणि इतर गोष्टी संपेनात, मग तिने जरा कान देऊन ती आरती ऐकली. देवीकडे शांत पणे पाहिलं, काही म्हणा    ते  शांत व्रतस्थ देवीच रूप  खरोखरच मनाला वेगळंच समाधान देत होतं.
रोमा ला स्वतः च आश्चर्य वाटलं की आपण इतकं मन लावून देवीला या आधी कधी पहिलंच नव्हतं.
आरती झाल्यावर त्या घराच्या मालकीणीच ह्या दोघांकडे लक्ष गेलं आणि मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत झालं, दोघांनी आपली अडचण सांगितली ,पण त्या लोकांनी त्यांना त्यांच्या ह्या घरातच थांबण्याचा आग्रह केला. शिवाय बाहेरून घरात येईपर्यंत दोघेही चिंब भिजले होते. त्यामुळे त्यांना कपडे बदलायचे होते आणि भूक ही फार लागली होती. 
रोमा त्यांचे वापरलेले कपडे घालायला तयार नव्हती ,हे त्या मालकिणीच्या नजरेतून सुटले नाही, मग तिनं रोमाला जवळ घेत सांगितलं" ताई मला माहितेय तुला आमची कापडं नको हायेत ,ही घे आताच देवीला कोणी साडी नेसवली आहे तीच नेस तू ,माझ्या घरातल्या देवीला कुठुन कुठून लोक येतात ते प्रेमाने असं काही आणतात मग मी ते गावातल्या बायांना देते ,आज तुला देते,घे ही साडी!"
रोमाला नाही म्हणणं शक्य नव्हतं,तिनं आत जाऊन ती साडी नेसली. बाहेर आली तर अंकुर अक्षरशः बघत च राहिला. नेहमी जीन्स आणि स्कर्ट्स मध्ये वावरणारी रोमा काय सुरेख दिसतेय साडीत! हा  रंग ही शोभतोय तिला!
हे सगळे होईपर्यंत जेवणाची पंगत बसली. कोणा एका दाम्पत्याचा नवस पूर्ण झाला म्हणून त्यांनी ह्या मालकिणीच्या घरातच हा जेवणाचा घाट घातला होता.
भराभर पानं मांडली, आज सर्व सवाष्णींचा मान आधी म्हणून सगळ्या बायकांची पंगत आधी बसली आणि त्यातच रोमाला बसवलं गेलं. पानात मसाले भात, बटाट्याची भाजी, पुरी आणि साजूक तुपातला बेसन लाडू!! रोमाला हे असले पदार्थ खाऊन कित्येक वर्ष लोटली असावीत असं वाटलं आणि नाहीही म्हणता येईना , भूकच इतकी लागली होती. पानं वाढून झाली आणि त्या बाईनं ओळीने सर्व बायकांना हळदी कुंकू लावलं, ती रोमा पाशी येऊन थबकली " अगो ,बाई माझे, हिच्या तर कपाळावर कुंकू नाही ,हातात बांगड्या नाहीत !! आण गो तिकडच  पूजेचं ताट 'म्हणत तिनं स्वतः च जाऊन एक ताट आणलं त्यातल्या बांगड्या रोमाच्या हातात चढवल्या, कपाळावर ठसठशीत कुंकू लावलं आणि केसात गजरा ही माळला!! रोमा ची अशी चिडचिड झाली ,' ridiculous!' असं पुटपुटत असताना अंकुर ने पाहिलं पण डोळ्यानेच तिला शांत राहा म्हणून समजावलं, खरं तर तो मनोमन खुश होता! इतकी वर्षे आई सुद्धा हिला अशा रुपात आणू शकली नव्हती हिला घाबरून पण आता ह्या अनोळखी बायकांनी मस्त रूप पालटलं हिचं!
अखेर जेवणं सुरू झाली आणि कधी नव्हे ते रोमा अक्षरशः पोट आणि मन भरून जेवली.तिला जाणवलं की ' डाएट फूड ने पोट तर भरत पण आज जेवणाची जी तृप्ती मिळाली आहे ती आपण अनुभवलीच नाहीये बरेच दिवसात!मध्ये अधे हरकत नाही असं जेवायला ! असं तिचं तिलाच वाटून गेलं.
आता निरोप घ्यायची वेळ आली होती. त्यांची गाडीही त्या वाड्यातल्या लोकांच्या मदतीने  एव्हाना दुरुस्त झाली होती.निघताना त्या मालकीण बाईंनी तिची ओटी भरली आणि आठवण म्हणून तिला देवीची छोटी मूर्तीही दिली. रोमाला हे सगळं वेगळंच वाटत होतं.
तेवढ्यात त्यांच्या agent चा फोन आला" साहेब,तुम्ही नशीबवान,तुमच्यावर देवीचा अशिर्वाद आहे हो, तुमची गाडी बंद पडली नसती तर काय झालं असतं कोण जाणे! तुम्ही घाटात पोहोचता तर ती घाटातली दरड तुमच्या गाडीवर कोसळली असती आणि होत्याच नव्हतं झालं असतं आज !! 
तुम्ही आता उद्याच या; रस्ता क्लिअर झाल्यावर .
तो फोन ऐकून रोमा आणि अंकुर च्या डोळ्यात अश्रू च आले . कधीही देवासमोर हात न जोडणारी रोमा आज देवीसमोर हात जोडून उभी अश्रू पुसत होती.
आणि देवी मात्र आपल्या  शांत व्रतस्थ रुपात उभी होती, आपल्या लेकरांची काळजी घेणाऱ्या आईप्रमाणे च!!
कर्तृत्व कितीही असलं तरी त्या अज्ञात शक्तीचे अशिर्वाद ही तितकेच महत्त्वाचे असतात हे मनोमन पटलं रोमाला !!

सौ बीना समीर बाचल

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेत व्यक्त केलेले विचार पूर्णपणे लेखिकेचे आहेत. 

तुम्हाला ही कथा सुध्दा आवडेल.
👇
Post a Comment (0)
Previous Post Next Post