पारिजातक

 पारिजातक

✍️ बीना बाचल

       एरवी माहेरी जायचंय असं नुसतं ठरलं तरी मनातल्या मनात उड्या मारणाऱ्या तिला आज मात्र माहेरी जायचं अगदी जीवावर आलं होतं.कितीही टाळू म्हटलं तरी काही क्षण,काही प्रसंग टाळता येत नाहीत. आजचा दिवस ही ह्याला अपवाद नव्हता. तिचे बाबा,तिचं सर्वस्व,ज्यांच्या शिवाय आयुष्य काय असू शकतं हे तिनं स्वप्नात ही पाहिलं नव्हतं.पण तिचे बाबा हे जग सोडून आता चार पाच महिने लोटून गेले होते आणि आईला भेटायला म्हणून तिला  माहेरी जायचं होतं . 'ज्या ठिकाणी जाऊन आता  बाबा  दिसणार नाहीत तिथे का आणि कशासाठी जायचं? आईसाठी जीव वरखाली होत होता पण तिची अवस्था ही आपल्याला पहावली जाईल की नाही हेही दुःख होतं च! पण कधी न कधी ह्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार होतंच. जाण्यापूर्वी च तिचं भाऊ,वहिनी दोघांशी बोलणं झालं होतं ,की आपण जायचं पण जास्तीत जास्त नॉर्मल वागायचं जणू ह्या प्रसंगातून आपण नक्कीच सावरलो आहोत वगरे, कोणीही आईला त्रास होईल असं वागायचं नाही.'असं सगळं ठरलं  आणि  आज जवळपास तीन एक महिन्यांनी ती माहेरी निघाली होती.बाबा गेल्यावर माहेरी जायची तिची ही पहिलीच वेळ!खरं तर माहेरी जायचं म्हटलं की सतत कुठवर पोहोचली म्हणून  सतत चौकशी करणारे बाबा तिला सतत डोळ्यासमोर दिसत होते, पण आता तिचा फोन आता खणखणणार नव्हता.'गाडी सावकाश चालवा, रस्त्यात काहीबाही खाऊ नका ,घरी सगळे वाट पाहत आहोत' असं बजावणारे बाबा आता दिसणार नव्हते.ती दारात येताच तिचं सामान घ्यायला ते धावत पुढे येणार नव्हते. अशा कित्येक गोष्टी आता  परत घडणार नव्हत्या.एरवी तिच्या आधी माहेरी पोहोचणारे तिचे मन आज मात्र जागचं हलायला तयार नव्हतं!

              बरं ह्यावेळी बंधनं तरी किती,'सतत हसरा चेहरा ठेवायचा, कोणीच डोळ्यातून पाणी काढायचे नाही,पुन्हा पुन्हा त्रास होईल असे विषय काढायचे नाहीत, एक न दोन!
अखेर ती माहेरी पोहोचली,तो दारात भाकर तुकडा टाकायला न आई दारात न कोणी. तिला ते अपेक्षित च होतं .असो,ती सामान हातात घेत आत घरात येती झाली.

माजघरात शांत मलूल चेहऱ्याच्या आई कडे बघवत नव्हतं. पण नाईलाजाने तिनं आईला घट्ट मिठी मारली आणि येत असलेला हुंदका आतच दाबला. किती आणि काय होतं त्या मिठीत हे फक्त त्या दोघीनाच माहीत!पण डोळ्यात पाणी आणायचं नव्हतं.

कारण सर्वांचं तसंच ठरलं होतं ना की आईला त्रास होईल असे काही करायचे नाही.
मग ती  नेहमीप्रमाणे हात पाय धुवायला परसदारात गेली तो नेहमी स्वच्छ टापटीप दिसणारी बाग अगदी उजाड दिसत होती. गळून गेलेली फुलं, सुकलेली पानं सगळ्याचा नुसता केर!

एरवीच्या डवरलेल्या पारिजातकाची तर अजूनच वाईट अवस्था होती,त्याच्या नाजूक फुलांचा त्याच्याच पायथ्याशी चिखल झाला होता.
जणू सगळ्या वास्तुनं त्यांच्या दुःखाचं मळभ स्वतः वर पांघरून घेतल्यासारखं वाटलं तिला!
ती काहीच बोलली नाही.

आत जाते तोवर चहा खाणं तयार होतं. तो चहा घेता घेता  उगाचच सर्वांच्या गाडी, रस्त्यातली गर्दी,पोहोचायला झालेला अंमळ उशीर ह्याबद्दल च्या गप्पा झाल्या.

आपलं मन नसताना असे ओढून ताणून होणारे संवाद किती नकोसे वाटतात हे आज पहिल्यांदा जाणवलं तिला नाहीतर एरवी ही माहेरी आलीये हे सांगण्यासाठी कुठलीही दवंडी पिटावी लागायची नाही! घरातल्या हसण्या खिदळण्याला आलेलं उधाण शेजाऱ्यांना सांगून जायचं की माहेरवाशीण आलेली दिसतेय!

आज तिला त्या गप्पा नकोशा झाल्या ती 'आलेच माडीवर (वरच्या मजल्यावर) सामान ठेवून' म्हणत वर गेली आणि तिथेच रेंगाळली.
वर आल्यावर मात्र तिचा बांध फुटला, तिनं अश्रूंना वाट करून दिली.

एखाद्या क्षणावर, परिस्थिती वर आपला शून्य ताबा असेल तेव्हा जी हतबलता येते न की ना ती परिस्थिती हाताळू शकत ना मान्य करू शकत; अशा विचित्र कात्रीत सापडल्यासारखं झालं तिला!

हळूहळू आपसुकच हुंदके कमी होत गेले आणि तिनं वरच्या मजल्यावरून खाली दिसणारी ती उजाड बाग पुन्हा एकदा न्याहाळली.
'का आलो असू ना आपण इथे?इथे आल्यावर, आईला भेटल्यावर बरं वाटण्या ऐवजी घुसमटून जायला होतंय .'माहेरी आल्या वर आज पहिल्यांदा तिला सगळं नकोसं वाटत होतं.
ती तशीच हताश पडून राहिली तिथेच पलंगावर आणि कधी तिचा डोळा लागला कोण जाणे!
  किती वेळ गेला कोणास ठाऊक पण तिला जाग आली तो खाली कसली तरी कुजबुज ऐकू आली तिला आणि ती कानोसा घेऊ लागली तर आई कोणा व्यक्ती शी बोलत होती बहुदा कोणी माळी असावा.'हे बघा, दादा उद्या पहाटेच आपण ही बाग स्वच्छ करु, सगळा केर ,फुलांचा चिखल सगळं साफ करून घेऊ.ताई आलीये माहेरी चार दिवसांसाठी, वाईट वाटलं असेल तिला ही बाग बघून आणि एवढयात मला मनच झालं नाही इकडे फिरकायचं.तेव्हा उद्या या'
'हो बाई'म्हणत तो माळी गेला आणि हिला आश्चर्य वाटलं की, 'आई स्वतः चं डोंगरएव्हढं दुःख बाजूला सारून मला वाईट वाटेल म्हणून स्वतः ही बाग साफ करणार आहे!'

'किती स्वतःच्या दुनियेत राहतो आपण!आपलंच दुःख मोठं म्हणून कुरवाळत राहतो त्याला! दुःख मनात ठेवून किमान समोरच्याला बरं वाटेल म्हणून काहीतरी हात पाय नको का हलवायला!'तिचा तिलाच राग आला.
संध्याकाळ होत आली तशी ती मनाशी काही ठरवून च खाली आली, स्वतः च आवरून आई सोबत थोड्या  गप्पा मारल्या, तिचं दुखणं खुपणं विचारलं आणि संध्याकाळी सर्वांसाठी तिच्या हातचा मसालेभात ही केला'

                दुसऱ्या दिवशी पहाटे  तिची आई उठली ; माळी बुवा आले असतील ह्या अंदाजाने बागेत आली तो सगळी बाग स्वच्छ झाली होती.सगळी पानगळ,गळलेली फुलं सगळं साफ झालं होतं. पाणी पिऊन झाडं ही मजेत डोलत होती.

आणि पारिजातकाच्या बुंध्याशी स्वच्छ पांढरा शुभ्र पंचा अंथरला होता लेकीनं, अगदी ती स्वतः रोज अंथरते तसाच म्हणजे मग नाजूक पारिजातकाच एखादं फूल झाडावरून ओघळल तरी ते माती लागून खराब न होता अलगद खाली पंचावर येईल आणि देवाच्या पूजेत ठेवता येईल!! आईचे डोळे उगाच भरून आल्यासारखे वाटले तिला. तिनं तो  मऊसूत पंचा भलेही पारिजातकाच्या च्या पायथ्याशी अंथरला होता पण त्याच्या  हव्याहव्याशा मऊशार  स्पर्शाने आईच्या दुखऱ्या मनावर जणू पांघरूण घातल्यासारखं झालं तिला!

आणि काल 'माहेरी का यायचं  आता' हा पडलेला प्रश्न आज सुटला !

'ह्या ईथल्या या' वठलेल्या  आणि एकट्या पडलेल्या 'पारिजातकाला आणि त्याच्या शांतपणे ओघळणाऱ्या फुलांना तो कोणीतरी अलगद झेलून  घेणारा मऊशार पंचा हवा होता आणि त्याचा तो मऊशार स्पर्श ही!

सौं बीना समीर बाचल, मुंबई

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

1 Comments

  1. खूप हृदयस्पर्शी कथा, बाबांच्या नंतर माहेरी जाताना खरंच पाय अडकतो...जीव उचलल्या सारखा होतो... जायची ओढ आणि आठवणींचा डोंगर ह्यात ओढाताण होते

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post