मोल

 'मोल'

✍️ सचिन देशपांडे


शर्वरीची झोप चाळवली, तेव्हा सकाळचे चार वाजले होते. खरंतर झोप चाळवण्यासाठी, मुळात झोप अशी लागलीच नव्हती शर्वरीला रात्री. बराचवेळ टक्क जागी होती ती, ह्या कुशीवरुन त्या कुशीवर वळत. मोबाईल हातात घेऊन उगिचच सोशल साईट्सवर डोकावण्याचा, अजिबात मुड नव्हता तिचा. ना मुड होता स्वतःपुरता दिवा लाऊन, वपु किंवा शन्ना वाचण्याचा. शौनक तिच्याकडे नेहमीप्रमाणेच पाठ करुन निजला होता, एका लयीत मंदपणे घोरत. आणि दोन्ही मुलं त्यांच्या रुममध्ये, गाढ झोपेतच असणार होती. अखेरीस पावणेतीनच्या सुमारास बाथरुमला जाऊन येऊन, बाटली तोंडाला लावत घटघट पाणी पिऊन... शर्वरी पुन्हा अंथरुणावर जी पडली होती, ती आत्ता चार वाजता पुन्हा उठून बसली होती. म्हणजे जेमतेम तास-सव्वा तास डोळा लागला होता शर्वरीचा. 

पलंगावर बसल्या बसल्याच, तिने बाजूच्या काॅर्नरपीसवरुन उचलून मोबाईल हातात घेतला. आणि तीन अनरीड मेसेजेस दिसले, म्हणून ती व्हाॅट्सअॅप मध्ये गेली. तीन्ही मेसेजेस पुर्वाचेच होते. एकात होतं... 'Thnx a lot'. दुसर्‍यात होतं... 'Love u so much'. आणि तिसर्‍यात होते... तीनेक किसींग इमोजीज, तीनेक हार्ट्स. शर्वरीने फोन बंद करत, तो बेडवरच उशीजवळ टाकला. आणि किंचितशी हसली ती, मान हलवत. काही न सुचून हात लांब करत, पुन्हा शर्वरीने मोबाईल उचलला... आणि पुन्हा ती पुर्वाच्या मेसेजेसमध्ये गेली. काल रात्री दोनच्या दरम्यान आलेल्या, ह्या तीन लागोपाठच्या मेसेजेस आधीच्या मेसेजवर गेली ती. कालचा दुपारचा, दोन वाजताचा मेसेज होता पुर्वाचा. Hi Purva here... remember me? Purva Pradhan... its long long time yaar... 20 yrs almost right?... hw r u dear?... wanna meet u urgently... can we? 

शर्वरीने रिप्लायमध्ये, व्वाॅवचे इमोजीज पाठवले होते. त्यांच्या काॅलेज डेजच्या, काही शेलक्या शिव्या पाठवल्या होत्या. आणि पाचेक बुक्क्यांचे इमोजीजही पाठवले होते. त्यावर पुर्वाने... हात जोडल्याचे बारा - पंधरा इमोजीज, डझनभर वेळा साॅरी लिहून जोडले होते. आणि अखेरीस ह्या इमोजी वाॅरनंतर त्या दोघींचं... संध्याकाळी पाच वाजता, माटुंग्याला फाईव्ह गार्डन्समध्ये भेटायचं ठरलं होतं. 

शर्वरीने पुन्हा मोबाईल बंद केला. एकदा मागे मान वळवत तिने, अजूनही पाठमोर्‍या झोपलेल्या शौनककडे पाहिलं. आणि पुन्हा समोर बघतांना तिच्या मनात आलं... "झोपेतही किती आटापिटा करतो नै आपण, एकमेकांकडे पाठ ठेऊन झोपण्याचा". खिन्नपणे हसली शर्वरी. परत एकदा ती मनाने गेली होती फाईव्ह गार्डनच्या बाकड्यावर, आदल्या दिवशीच्या संध्याकाळच्या पाचच्या सुमारास. दहा मिनिटंच वाट पहावी लागली होती शर्वरीला, आणि दिसली होती तिला समोरुन पुर्वा येतांना. तिला बघताच शर्वरी जागची उठली होती. आणि पुर्वा जवळ पोहोचताच, दोघींनी कडकडून मिठी मारली होती एकमेकींना. दोघींचेही डोळे पाणावलेले... आणि दोघी फक्त बघत होत्या एकमेकींकडे नखशिखांत, पुढचा काही वेळ. 

बाकावर बसल्या मग दोघी, एकमेकींचा हात हातात धरुनच. सेकन्डरी स्कूलपासून ते काॅलेज फिनीश होईपर्यंत... अशी जवळपास दहा वर्षांची घट्ट मैत्री होती, शर्वरी नी पुर्वाची. पण पुर्वाच्या फॅमिलीने अचानकच मुंबई सोडलं विस वर्षांपुर्वी, आणि जबलपुरला शिफ्ट झाले ते. आणि तेव्हापासून... म्हणजेच तब्बल विस वर्षांपासून, शर्वरी नी पुर्वा एकमेकींना भेटूच काय... पण एकमेकींशी बोलूही शकल्या नव्हत्या. मुंबई सोडल्या दिवसापासूनच, पुर्वाचा जूना नंबरही बंद झाला होता. रादर बंद करुन टाकण्यात आला होता. आणि ह्या सगळ्या हातघाई मागे कारण होतं... गौरव... गौरव कांबळे. पुर्वाच्या घरी गौरवबद्दल कुणकूण लागली होती, आणि जणू काही तीव्र रिश्टर स्केलचा भुकंपच आला होता घरी. प्रधानांच्या घरी, कांबळे चालणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच पुर्वाच्या बाबांनी कुठलाही गाजावाजा न करता, तातडीने स्वतःची बदली जबलपुरला करुन घेतली होती. 

पुर्वा - गौरवची लव्हस्टोरी, क्षणार्धात तरळून गेली शर्वरीच्या भरल्या डोळ्यांतून. आणि ती पुर्वाला पुढे काही विचारणार, त्या आधीच पुर्वाने बोलायला सुरुवात केली... "मला माहितीये तू खूप उत्सुक आहेस जाणून घेण्यात, की where the hell was I for so many years... and what was I doing". Then let me start from the begining. तुला माहितीच आहे की... आम्ही जबलपुरला शिफ्ट झालो, आपल्या लास्ट इअरच्या एक्झॅमनंतर लगेचच. आणि माझा रिझल्ट यायच्या आतच, माझ्या बाबांनी माझं लग्नही ठरवलं आकाशसोबत. मी गौरवशी आता कधीच कुठल्याही प्रकारे संपर्कात राहणार नाही... ह्याच्या शपथा घालून, नी वचनं घेऊन. आणि मी ही अत्यंत काटेकोरपणे पाळला, बाबा - आईला दिलेला शब्द... आणि लग्न केलं आकाशशी. Aakash was really a nice person & a thorough gentleman. रोमान्सही हळूवारपणे, माझं मन जपत करायचा तो. जेव्हा मी डोळे मिटून छातीवर डोकं टेकत असे त्याच्या... तो त्याच्या त्या लांबसडक बोटाने माझ्या गालावर आलेली केसांची बट, हलकेच माझ्या कानामागे अडकवत असे. इतकं मोहरुन टाकणारा असे ना, त्याने माझ्या चेहर्‍यावर त्याच्या बोटाने काढलेला तो 'S'. पण...".

पुर्वा नवर्‍याबद्दल बोलतांना... भुतकाळ वापरु लागलेली पाहून, शर्वरीने चमकूनच बघितलं पुर्वाकडे. पुर्वाने शर्वरीच्या मांडीवर टॅप केलं हलकसं, पुढे बोलता बोलताच... "खूप छान चाललेला गं संसार आमचा. खूपच केअरींग होता आकाश. त्याच्या सोबतीत मी हळूहळू रुळत गेले, खुलत गेले. एक मुलगाही झाला आम्हाला. काळाच्या ओघात मी गौरवला पार, म्हणजे पार विसरुन गेले होते. सगळं कसं सुरळीतपणे चाललेलं... अगदी दृष्ट लागण्यासारखं. आणि... आणि... दृष्टच लागली अखेरीस. दोन वर्षांपुर्वी कामानिमित्त मुंबईला आलेल्या आकाशचा, रोड अॅक्सिडेंट झाला. आणि त्यातच सिव्हिअर ब्रेन हॅमरेज होऊन, आकाश कोमात गेला. मला कळल्यावर मी तातडीने मुंबईला आले. लेक आणि आई - बाबाही आले. पण इथे असे राहणार तरी किती दिवस ना? मग चार दिवस थांबून, ते तिघेही जबलपुरला परतले. तसाही आकाश कोमामध्येच होता, फक्त स्वतःच्या... स्वतःपुरत्याच असलेल्या रेस्ट्रीक्टेड जगात. मी मात्र होप्स हरले नव्हते. रात्रंदिवस मनापासून सेवा करत होते मी आकाशची. आणि बारा - पंधरा दिवसांनी... आकाशला माॅनिटर करणार्‍या डाॅक्टरांच्या टिमपैकी, प्रमुख डाॅक्टरांनी बोलावलं मला. ते मला म्हणाले की... आकाशच्या परिस्थितीत कणभरही सुधारणा नाहीये. आत्ता जर का त्याची पुर्ण सपोर्टींग सिस्टीम बंद केली... तर within couple of minutes, he will b declared brain dead. पण... पण जर तुम्ही ठरवलंत, तुमच्या मनाचा निग्रह दाखवलात... तर आपण त्याचं हार्ट नक्की प्रिझर्व्ह करु शकतो. मला नेमकं कळेचना, की ते डाॅक्टर काय बोलतायत. माझ्या पुर्णपणे लाॅस्ट चेहर्‍याकडे बघून, डाॅक्टर पुढे बोलले... हे बघा ब्रेनडेड डिक्लेअर झालेल्या माणसाचं हृदय चालू असतं. इतकंच काय आपण ते कुणा गरजू व्यक्तीच्या शरिरात, ट्रान्सप्लांटही करु शकतो. आणि... आणि त्यापुढे डाॅक्टरानी मला जे काही सांगितलं, ते ऐकून मी ढसाढसा रडू लागले होते". 

पुर्वा हे बोलत असतांनाच, पुर्वाच्या बाजूला... तिला बर्‍यापैकी खेटूनच एक माणूस येऊन बसला. "असा अनाहूत कोणी, कसा काय येऊन बसू शकतो आपल्या बाकड्यावर?"... असा विचार डोक्यात येऊन, शर्वरीची खिट्टीच हलली. ती त्या माणसाला काही बोलणार तोच, पुर्वाने तिला हाताने खूण करत अडवलं. आणि त्या माणसाकडे वळून त्याच्याकडे बघत, दिलखुलास हसली पुर्वा. पुन्हा शर्वरीकडे मान करत, पुर्वाने विचारलं तिला... "ह्याला ओळखलं नाहीस?". पुर्वाने असं विचारल्यावर, शर्वरीने त्या माणसाकडे जरा निरखून बघायला सुरुवात केली. आणि झरझर बदलले शर्वरीच्या चेहर्‍यावरचे भाव. आणि ती ओरडलीच... "व्हाॅट?... गौरव?... आय मीन गौरव तू?... तू इथे?". उंच, शिडशीडीत, डोक्यावरचे केस विरळ झालेला, रीमलेस चश्मा घातलेल्या त्याने... मंदसं स्मित करत शर्वरीकडे पाहिलं, नी म्हणाला... "गौरव म्हण किंवा आकाश म्हण... काहीही चालेल". इतकं बोलून त्याने हसतच पुर्वाकडे पाहिलं. पुर्वाचे डोळे टच्चकन भरुन आल्याचं, शर्वरीच्या डोळ्यांतून सुटू शकलं नव्हतं. एव्हाना पुरती बावचळलेली शर्वरी... काहीवेळ तसंच बघत बसली, आळीपाळीने दोघांकडेही. 

शर्वरीच्या चेहर्‍यावरचे ते भाव बघून, पुर्वा नी गौरव पुन्हा हसू लागले. आणि पुढे अधिक न ताणता, पुर्वा पुन्हा बोलू लागली... "I told u already की, आकाशचे डाॅक्टर मला काय म्हणाले ते. नंतर त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की, अगदी आत्ता काहीवेळापुर्वीच... एकजण आपल्याईथेच अॅडमिट झालाय. आणि त्याचं अत्यंत तातडीने, हार्ट ट्रान्सप्लांटचं आॅपरेशन करणं गरजेचं आहे. आम्ही रिक्वायर्ड मेडीकल टेस्ट्स आॅलरेडी करवल्यायत त्याच्या, आकाशसोबतच्या. And there is a perfect matching I would say. पण आता पुर्वा... हे फक्त तुमच्या हातात आहे की, आपला नवरा आहे म्हणून त्याला आणिक काही दिवस मेडिकल सपोर्टींग सिस्टीमवर नावालाच जिवंत ठेवायचं... की जो खर्‍या अर्थाने अजूनही जगू शकतो, त्याला जिवनदान द्यायचं. आणि हो... most important thing is that की, आकाशच्या बाबतीत अगदी ०.०1 पर्सेंटही चान्स उरलेला नाहीये. जो असता... तर आम्हीच हे असं काहीही, तुम्हाला कधीच विचारलं नसतं. खूप रडले मी त्या दिवशी... अगदी उर फुटेस्तोवर रडले. 

थोड्याच वेळात आकाशच्या सगळ्या सपोर्टींग सिस्टीम्स, बंद केल्या गेल्या. त्याची ब्रेनडेड बाॅडी, आॅपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असतांनाच... हृदयाची गरज असलेल्या त्या माणसाचीही अनकाॅन्शस बाॅडी, तिथे आली आत जाण्यासाठी. आणि... आणि तो... तो... गौरव होता. बाईकच्या अॅक्सिडेंटमध्ये फ्लायओव्हरवरुन खाली कोसळत, एका फेन्सींगमध्ये घुसली होती बाॅडी त्याची. अतिशय वाईट अवस्था होती गौरवची, पण तरीही हार्ट ट्रान्सप्लांटनंतर त्याचे जगायचे चान्सेस खूप हाय होते. अशा तर्‍हेने माझ्यासमोरच जणूकाही, आकाश नी गौरवमध्ये डिल झालं होतं... हृदयाच्या देवाण - घेवाणीचं. हा एक अनाकलनीय असा, कर्मधर्म संयोगच घडून आला होता माझ्या बाबतीत. बाईक अॅक्सिडेंटमध्ये गौरवची बायको, आॅन द स्पाॅट गेली होती... त्यांच्या बारा वर्षांच्या मुलाला मागे ठेऊन. गौरवची सर्जरी यशस्वी झाली. गौरव हाॅस्पिटलमधून जवळपास चार महिन्यांनी घरी आला. मध्ये आणिक काही दिवस गेल्यावर... मी माझ्या आई - बाबा नी लेकाला घेऊनच, त्याच्या घरी गेले. आणि... आणि मागणी घातली मी लग्नाची गौरवला... की... की आकाशला? कोणजाणे. पण ह्यावेळी माझे बाबाही, अगदी एका शब्दाने काही बोलले नाहीत मला. सहा महिन्यांपुर्वीच आमचं लग्न झालं. आणि आता आम्ही नी आमची दोन्ही मुलं, असे चौघेही आनंदात एकत्र राहतोय. तेवढ्यात पुर्वाचा हात आपल्या हातात घेत, तो स्वतःच्या छातीवर हलकासा टेकवत गौरव तिला म्हणाला... "चौघे नाही... पाचजण... आपण पाचजण एकत्र राहतोय... आनंदाने". हे ऐकून... पुर्वा गौरवच्या छातीवर डोकं ठेऊन, रडू लागली होती. आणि तो तिचे गालांवर आलेले केस, कानामागे अडकवत होता हळूवारपणे... तिच्या चेहर्‍यावर 'S' काढत.

तेवढ्यात अलार्म वाजला, नी शर्वरी दचकली. सहा वाजले होते. काल रात्री नेहमीप्रमाणे भांडणं होऊनच, शौनक - शर्वरी झोपले होते. "हे आपल्यातील भांडणाचं प्रमाण, हल्ली भलतंच वाढलंय"... ह्या विचारातच शर्वरीने शौनकच्या खांद्याला पकडून, विरुद्ध बाजूला तोंड करुन कुशीवर झोपलेल्या त्याला... हलकेच सरळ केलं. आणि आता तिच्या अगदी जवळ आलेल्या, त्याच्या छातीच्या डाव्या बाजूवर आपलं डोकं ठेऊन झोपली ती. शौनकच्या छातीतून ऐकू येणार्‍या... त्याच्याच हृदयाच्या धडधडीची, मनापासून माफी मागत. आणि आपल्या माणसाच्या हृदयाच्या अखंड चालू असण्याचं, खर्‍याअर्थी 'मोल' जाणत.


---सचिन श. देशपांडे

वरील कथा सचिन देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.
Post a Comment (0)
Previous Post Next Post