प्रश्न

 प्रश्न

✍️ अमृता देशपांडे


'अरे शार्दुल, हा टी-शर्ट कुणाचा तुझ्या बॅगेत?' शार्दुलची बॅग आवरताना आसावरी म्हणाली.

'अगं आई, त्या अंध काकांनीच घेऊन दिला गं. मी नको-नको म्हणत होतो त्यांना, पण आज माझा वाढदिवस आहे म्हटल्यावर  त्यांनी माझं काही ऐकलंच नाही.'- शार्दुल


 'अरे पण बाळा एकदम टी-शर्ट वगैरे?  तोही सातशे रूपयांचा?  एकदा  रस्ता ओलांडण्यात मदत काय केली, इतकी मेहेरबानी? काहीही म्हण बा शार्दुल, पण एकदम अनोळखी व्यक्तिकडून असली महागडी भेटवस्तू घेणं मला काही बरोबर वाटत नाही.' आसावरी


  'अगं आई, अनोळखी कुठे? त्या काकांची आणि माझी आता चांगली मैत्री झालीये. आणि तुला माहितेय का? परवा त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं, त्यांचं ऑफिस म्हणजे कोणती कम्पनी नाही काही, ती एक एन. जी. ओ. आहे. जी अंध लोकांना वाचता येतील अशी पुस्तकं बनवतात. ते म्हणाले, अंध लोकांसाठी वेगळी लिपी असते. काय बरं नाव सांगितलं त्यांनी... हा 'ब्रेल लिपी'! 'लुईस ब्रेल' नामक शास्त्रज्ञाने ती शोधून काढली. ए आई, यावेळी मी परिक्षेत 'लुईस ब्रेल' यांच्यावरच निबंध लिहेन हं! बरं मी आता खेळायला जाऊ?'  आसावरीनं मान डोलावून त्याला होकार दिला.

                                         ..................................................................


आज शाळेतून घरी आल्यावर शार्दुलने दप्तरातून एक वस्तू नाचवत- नाचवत बाहेर काढली, ती वस्तू बघताच आसावरीची तळपायाची आग मस्तकात गेली. शार्दुलला त्याच्या त्या काकांनी व्हिडिओ गेम घेऊन दिला होता. एकतर तिच्या घरी टि.व्ही. नव्हता; ती तो घेऊ शकत नव्हती असं नव्हे, पण मुळात  तिला या सगळ्या गोष्टीत शार्दुलनं वेळ फुकट घालवू नये असं वाटत होतं.  'उद्याच्या उद्या ऑफिसला हाफ् डे टाकून शार्दुलच्या शाळेत जायचं आणि ही वस्तू त्या गृहस्थाला परत करून यायचीच!' तिने मनाशी पक्कं केलं.

                                            ....................................................................


'काका, मी आलो!' - शार्दुल मधल्या सुट्टीत शाळेबाहेर पडला. धावत पळत एका लाल शर्टवाल्या माणसाजवळ गेला. 'आलास? तुझीच वाट बघत होतो.  चल आज 'आईसगोला' खाऊया' तो माणूसही तितक्याच उत्साहात म्हणाला.

'अहो महाशय, कुणाला विचारून तुम्ही माझ्या मुलाला 'आईसगोला' खायला नेताय? पुढच्या आठवड्यात परिक्षा आहे त्याची, आजारी पडला म्हणजे?' आसावरी. तिच्या त्या खणखणीत आवाजानं तो माणूस दचकला. आवाजाच्या दिशेनं त्यानं तोंड केलं. 'अं...माफ करा...मी' - तो, तो आवाज त्याला ओळखीचा वाटला. 


त्या माणसाचा चेहरा दिसताक्षणी आसावरी ओरडलीच, 'नचिकेत तू...'

'आ... आसावरी...' एव्हाना त्यानंही तिचा आवाज ओळखला होता. 'आमचा माग काढत तू इथपर्यंत आलास? स्वत: तर दारूच्या आहारी गेलायस, आता माझ्या पोरालाही नादी लावायचा विचार आहे का?  पण तुला आमचा पत्ता कोणी दिला?  दादा-वहिनीनं?  तुझ्यापासून लांब जायचं म्हणून मी पुणं सोडून इथे या अनोळखी शहरात येऊन राहिले; तर तू आता इथेही...' आसावरी


'ए आई, रागावू नकोस नं काकांना, काका खूप चांगले आहेत.' शार्दुल मध्येच.

'शार्दुल, तू शाळेत जा...' आसावरी

' पण आई...' 

'जा म्हटलं ना.' आसावरी आवाज चढवून, शार्दुल नाईलाजानं जातो.


'आसावरी तू इथे आहेस मला खरंच माहित नव्हतं गं. पण तू शार्दुलची आई म्हणजे....' नचिकेत. 

'का? प्रश्न पडला का, शार्दुलचा बाप कोण ते?  पण मी तुला ते सांगायला बांधिल नाही. तू शार्दुलचा बाप नाही,  तुझा आणि आमचा काही संबंध नाही...' तिनं पर्समधून तो व्हिडिओ गेम काढून त्याच्या हातावर आदळला, आणि म्हणाली, ' या असल्या फालतू वस्तूंची माझ्या शार्दुलला सवय नाहीये, आणि मला ती लावायचीही नाहीये. यानंतर मला किंवा माझ्या पोराला भेटण्याचा प्रयत्नही करू नका. गुड बाय मिस्टर नचिकेत सबनिस...' आसावरी जाऊ लागली.


' आसावरी, मला तुझ्याशी बोलायचंय...' नचिकेत 

' पण मला त्याची गरज वाटत नाही...' आसावरी

' पण मला गरज वाटतेय ना आसावरी, आज इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, खूप काही सांगायचंय, काही तुझ्याकडून ऐकायचंय. प्लीज थांब ना गं...'


' कशी आहेस?'  नचिकेत

 'मी अगदी मजेत! तू कसा आहेस... आणि डोळ्यांचं हे कसं झालं?' आसावरी

  'तू निघून गेल्यावर खूपच प्यायला लागलो ना... काही ताळमेळच राहिला नाही.  शूगरच्या गोळ्या घ्यायची आठवण नाही कि जेवायचं भान नाही. शूगर वाढली ना भरमसाठ. हळूहळू दृष्टी कमकूवत होत गेली. चार वर्षांपूर्वी पूर्ण अंधार झाला. आसावरी, ज्या मित्रांच्या संगतीत मी दारूला जवळ केलं, त्यांनीच मला बिझनेसमध्ये पुरतं फसवलं, पार रस्त्यावर आणून ठेवलं...' - नचिकेत


'मला हे सगळं चित्र आधीच दिसत होतं नचिकेत. मी तुला सावरण्याचा खूप प्रयत्न केला.  तू व्यसनातून बाहेर पडावं म्हणून काय-काय नाही केलं, तू स्वत: डॉक्टरकडे  यायला तयार नसायचास तेव्हा तुझ्या नकळत तुला जेवणातून औषधं दिली.  पण त्याचा तुझ्यावर काही परिणाम झाला नाही.  शुद्धीवर असताना किती व्यवस्थित वागायचास तू,  सकाळी घरून निघताना दारूला हात लावणार नाही म्हणायचास,  पण एकदा ती चांडाळचौकडी भेटली कि तुझी पावलं आपोआप डगमगायची.. आणि दारू पोटात शिरली कि तुझ्यातला सैतानचं जागा व्हायचा... तरीसुद्धा मी तुझं सगळं सहन करत होते आपल्या प्रेमाखातर.  पण एक दिवस तू सगळ्या मर्यादाच ओलांडल्या आणि मला आपल्या नात्यातील फोलपणा लक्षात आला.  त्याक्षणी मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तुझं घर सोडून आले'  आसावरी


'असं काय केलं होतं गं मी?  मला अजून माझा गुन्हाच कळलेला नाहीये,  प्लीज सांग ना आतातरी...' नचिकेत विनवणी करू लागला.

'ऐकायचंय? तर ऐक,  31 डिसेम्बर 2005 ची रात्र. मद्यधुंद अवस्थेत तू घरी आलास, तू  येण्याआधी तुझा मित्र केतन तुझ्याकडे काही कामानिमित्त आला होता. तुझी वाट बघत वेळ जावा म्हणून आम्ही कॉफी पीत बसलेलो. तू आम्हा दोघांना बघून भडकलास, नाही-नाही ते बरळलास.  नचिकेत त्यावेळीच मी सव्वा महिन्यांची प्रेग्नंट होते. मी तुला त्या तीन-चार दिवसांत हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला,  पण त्या दिवसांत तू सकाळी लवकर बाहेर जायचास आणि रात्री उशीरा पिऊनच घरी परतायचस.  मला तुला एवढी आनंदाची बातमी अशी घाईगडबडीत द्यायची नव्हती,  मला वाटत होतं,  आपण बाप होणार या जाणिवेनं तरी तू सावरशील,  दारूच्या नशेतून बाहेर येशील, थोडा जबाबदार होशील... पण त्या दिवशी  तू माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाच, पण त्याहून मोठी चूक म्हणजे माझ्या पोटावर लाथ मारून मला शिविगाळ केलीस. नचिकेत,  तू  मलाच नाही तर आपल्या बाळालाही एकाप्रकारे लाथाडलं होतंस, ज्याचा परीणाम काहीही होऊ शकला असता, आपलं बाळ पोटातच दगावलं असतं...' आसावरी बेभान होऊन बोलत सुटली. ती पुढे म्हणाली,


' त्या प्रसंगाने मी पूर्णपणे हादरले. त्या प्रसंगानं मला विचार करायला भाग पाडलं कि, जो माणूस नशेच्या आहारी जाऊन आपण काय बोलतोय, काय वागतोय याचं भान विसरतो, तो आपल्याला, आपल्या बाळाला कुठल्या प्रकारचं भविष्य देईल? या एका विचारासरशी मी तुझं घर सोडलं. त्यानं मला किंवा माझ्या बाळाला काही फरक पडला नाही हं!  हो, सुरवातीला थोडा त्रास झाला खरा... मला माहेरी जाऊन आईच्या डोक्यावर ओझं व्हायचं नव्ह्तं.  तरीसुद्धा बाळंतपण होईपर्यंत आईकडेच नागपूरला राहणं भाग होतं, तोवर राहिले.  आणि मग मी पडले घराबाहेर... दीड-दोन महिन्याच्या बाळाला घेऊन  अकोल्यासारख्या अनोळखी गावात येऊन राहणारी एकटी बाई पाहिल्यावर लोक नको त्या नजरेनं पहायचे, तर्हेतर्हेचे प्रश्न विचारायचेत,  सुरवातीला तर कोणी खोलीही किरायानं द्यायला तयार व्हायचे नाहीत,  पण मी हिम्मत सोडली नाही. एका भल्या गृहस्थानं माझी अडचण समजून मला किरायानं दोन खोल्यांचं घर दिलं,  आणि सुरू झाला माझा एकल संसार...  आज हातात चांगली नोकरी आहे,  शार्दुलला चांगल्या शाळेत शिकवतेय, चांगलं चाललंय आमचं.  थोडी धांदल होतेय, शार्दुलकरता आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावता- निभावता... पण आहे ते वास्तव स्विकारलंय मी आणि त्यानीही, त्यामुळे आता त्रास नाही होत.  कसं असतं ना,  माणसाला संकटांनी घेरल्याशिवाय त्याच्या आंतली शक्ती त्याला उमगत नाही.  या सार्या आव्हांनांना पेलता-पेलता मलाच मी नव्यानं समजू लागलेय...'  


'परमेश्वरा, किती अभागी आहे मी! स्वत:च्याच मुलाला ओळखू शकलो नाही मी?  देवानं बाप होण्याचं केवढं मोठं सुख माझ्या पदरात टाकलं,  पण मी ते स्वीकारू शकलो नाही.  आज मी ज्या एन्. जी. ओ. त काम करतो ना त्यांनी वाचवलं मला,  मला आधार दिला.  माझ्यावर औषधोपचार करून मला आधी त्या घाणेरड्या व्यसनातून सोडवलं.  मला त्यांच्या कामाचं प्रशिक्षण देऊन जगण्याचा नवीन अर्थ मिळवून दिला...' नचिकेत


'छान! म्हणजे जे काही होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणायचं आणि पुढे जायचं.  तू सावरलास याचा मला आनंदच आहे;  पण आता मात्र आपल्या दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत,  ते वेगळेच राहू दे...' आसावरी


'अगं पण आसावरी, आता सगळं चित्र पालटलंय, मला माझ्या चुकांची जाणीव आहे.  त्याकरता तू मला दिलेली शिक्षाही मला मान्य आहे, आणि मी ती भोगलीये बारा वर्ष माझ्या मुलापासून दूर राहून…  आता मला प्रायश्चित्त घेण्याचीही संधी दे.  शार्दुलवर माझ्यापेक्षा तुझाच जास्त हक्क आहे,  आणि तू त्याला समर्थपणे सांभाळतेयस यात शंकाच नाही.  पण त्याला वडीलांचंही प्रेम मिळायला हवंय ना?  प्लीज, मला तुमच्या आयुष्यात प्रवेश करू दे...' - नचिकेत विनवणी करू लागला.

'नचिकेत, ते आता शक्य नाहीये...'  आसावरी

'अगं पण का?' - नचिकेत


' नचिकेत.  मी तुला एकवेळ माफ करेनही, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे..  शार्दुलला मी त्याचे बाबा देवाघरी गेलेत असं सांगितलंय…  आता देवाघरी गेलेले बाबा परत कसे आलेत असं त्यानं विचारलं, तर उत्तर आहे तुझ्याकडे?...' आसावरी 

दोघेही स्तब्ध बसले होते, आणि आजूबाजूला भयाण शांतता होती....


सौ. अमृता श्रीरंग देशपांडे


वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post