सावली

 ##सावली##(दीर्घ कथा)

अपर्णा देशपांडे 

      दीदी,तुझी मेल आली ग s . मनू नि हाक मारली आणि सायली धावत वर गेली.ती अतिशय अधीरतेने वाट बघत होती .तिला GIBS मध्ये इंटरव्ह्यू साठी कॉल होता  . तिने तीन दिवसात मनुचं डोकं खाल्लं होतं. म्हणाली, तू माझी लकी चॅम्प आहेस,तूच हि मेल आधी वाचायचिस. 

 सोमवारी सकाळी अकरा वाजता रिपोर्ट करायला सांगितले होते.GIBS तशी बऱ्यापैकी दूर होती. हायवे ला लागून आत आठ किलोमीटर जावे लागत होते. सायली आई बाबांना नमस्कार करून निघाली. 

     काळ्या रंगाचे ब्लेझर, आत पांढरा शर्ट, तश्याच शेड ची फॉर्मल पॅन्ट एकदम कार्पोरेट लूक! मस्त दिसत होती. तिने दाट कुरळे केस क्लीप मध्ये फक्त पिन करून बाकी मोकळे सोडले होते. 

      

      " दीदी, जॉब तर तुला तुझ्या मेरिट वर मिळेलच ,पण आज पोरांचं काही खर नाही बघ. " मनू चिडवत म्हणाली; "उगाच बस नि नको जाऊस. कॅब बुक कर." 

" कॅब ? नाही बाई, चारशे, पाचशे जातील उगाच.  आणी बस स्टॉप तरी काय ,घराला लागूनच तर आहे ग .आधीच बाबांना इतकं  कर्ज आहे, आपण किमान जास्तीचा खर्च टाळू शकतो न ? " 

"  मग तर खूप जण घायाळ "

" का ग?" 

" का ग काय?? सॉलिड दिसतीएस ! खतरनाक !  कातिल!! "

  मनुचं बरोबर होतं. सायली मुळातच खुप सुंदर,त्यात  पाच फूट चार इंच ची उंची .  अतिशय समजूतदार , जबाबदारीची  आणि आपल्या घरच्या परिस्थिती ची तिला जाणीव होती. 

" पण दीदी,आता वेंधळेपणा करू नकोस ह? तू फार विसरभोळी आहेस बाबा " 

" नाही ग ,आता नाही विसरणार काही"

         सायली अगदी घराजवळच  बसस्टॉपवर वाट बघत उभी होती . बराच वेळ झाला तरी बस येईना. ती वेळ राखूनच निघाली होती,पण आता मात्र फार झालं , कॅब  बुक करूया . वाट पाहून शेवटी तिने कॅब बुक केलीच. 

       कॅब मध्ये बसल्या बसल्या तिने सोनालीला फोन लावला.

" ए निघाले एकदाची "

" ऑल द बेस्ट!! नीट जा. मोठ्या कंपनीत जात आहेस , बाई ग मलाच   धडधड करतंय." 

" ही कंपनी फार लांब आहे ग, सगळा  दिवस   जाईल बहुतेक." 

" सगळं घेतलंस ना नीट? कॉल लेटर?"

" घेतलं ग" 

" आपल्याला इंप्लान्ट ट्रेनिंग चे ,समर प्लेसमेंट चे सर्टिफिकेट मिळालंय ,घेतलंस? ........

अग बोल न घेतलं का? " 

".........न ..नाही , सोना तेवढंच काय मी मागच्या प्रोजेक्ट ची कॉपी पण विसरले...देवा!! आता? "

" अशी कशी ग ..'तिला मधेच थांबवत सायली म्हणाली , "तू आता  नुसतं ओरडणार की काही मदत करणारेस ??" 

" मी बघते, पण आज नेमकी गाडी नाहीए दादा घेऊन गेलाय .तू किती पुढे गेली???.......

.........रेंज गेली होती.

सायली ला खूप टेन्शन आलं होतं.असं कसं  आपण तीन महत्त्वाचे कागद ह्याला जोडले नाहीत? रात्री उशिरा xerox आणल्या, मग आईला बरं नव्हतं म्हणून आई जवळ बसलो, आणि ,......

...... " आपण किती पुढे आलोय?" तिने कॅब ड्राइवर ला वीचारले.

" बस पोहोचलोच " 

काय होईल ते होईल असं म्हणून तिने एकूण बिल बघितले .417  बिल झाले.

सुटे नसल्याने ड्रायव्हरने चक्क वरचे सतरा रुपये राहुद्या म्हटले. 

     

....... ती आत कंपनीत गेली. तिथले गेट, आतील परिसर सगळंच भव्य. आज  आपली निवड व्हायला पाहिजे,पण आपण तर ...सायली नि मनातल्या मनात स्वतःला खूप कोसलं....

स्वागत कक्षात गेल्यावर तिला कळाले की इंटरव्ह्यू अजून  दोन तासांनी होणार आहे. ' मग आणावेत का आपले सर्टिफिकेट?' तिला वाटले.विचार करण्यातच तास भर गेला,.

" मिस.सायली ?" 

" येस ," 

" तुम्हाला कुणीतरी भेटायला आले आहेत " 

सायलीला वाटले, 'इथे मला कोण ओळखतय ?'

बघते तर समोर तोच सकाळचा कॅब ड्राइवर! 

" तुम्ही ?" 

" ही घ्या तुमची सर्टिफिकेटस . लावून टाका लगेच फाईलला. ऑल द बेस्ट " 

" ओह ,तुम्ही इतक्या लांब पुन्हा गेलात? आणि तुम्हाला कसं कळलं माझ्या सर्टिफिकेट बद्द्ल?" 

" तुम्ही फोन वर बोलत होता न , त्यामुळे " 

" इतक्या लांब ?" 

" इट्स ओके .ऑल द बेस्ट " ती काही बोलायच्या आत तो निघून पण गेला.

         सायलीचा इंटरव्ह्यू खूप छान झाला,विशेषतः नेमके तेच  सर्टिफिकेटस  पाहून टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये तिला चांगले कॉमेंट्स मिळाले होते. तिला त्या कॅब ड्राइवर चे आभार पण मानता आले नाहीत. आजच्या काळात कोण करतं एवढ? त्या ड्रायव्हरचा पत्ता काढून त्याला बक्षिस द्यावे असे तिनी ठरवले.

     तासा भरानी तिला एच आर कडून पर्सनल इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले आणि तिथेच तिच्या सिलेक्शन ची बातमी मिळाली .

    तिने ताबडतोब घरी फोन केला.

  " दीदी, कॉंग्रेट्स!!" बातमी कळाल्याबरोबर मनू ओरडली. "तुला सर्टिफिकेट मिळाले ना?" 

" हो ग त्या ड्राइवर ची कमालच आहे.बरं मी येतेच आहे घरी,मग बोलू."

   सायलीच्या आई वडीलांना खूप आनंद झाला होता.आपल्या मुली कर्तृत्ववान निघाल्या याचे समाधान होते त्याना . 

   अतिशय आनंदात सायली घरी आली . 

" मनू  , अब तुझे क्या चाहीये बोल, तेरेलीये सब हाजीर यार!! तेरे दिदीको  s s  जॉ s s ब मिल गया !!!"

  " स्वतः साठी चांगल्या कुर्ती घे आधी ." 

  " अरे हा ! त्या कॅब वाल्याचे आभार मानायचेत ग ! सॉलिड निघाला माणूस !!  तूच दिलेस का सर्टिफिकेट त्याच्या जवळ ? " 

"  नाही ग आई होती घरी ...तू बुकिंग चेक कर न, नाव असेल ."

" अ  s.. ,हे ...,हा! हे बघ काय नाव ...

आनंद मोकाशी !! " 

" का s s य ?? आनंद मोकाशी? अग तो कॅब ड्राइवर नाहीये, तो मालकए मालक !!! आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स ( AT &T) कंपनीचा  मालक." 

" काय? शीट !! तुला कसं माहीत? " 

"आम्ही ह्या वर्षी कॉलेज मध्ये ह्यांनाच चीफ गेस्ट बोलावणार आहोत. कालच सरांनी आम्हा कमिटी मेम्बर्स ना बोलावून सांगितले . " मनू  म्हणाली.

" तरीच एवढा हॅन्डसम दिसत होता, आय मिन कॅब ड्राइवर कितीही देखणे असले तरी असे तेज येत नाहीगं ,मला वाटलंच  होतं की हा इतका स्मार्ट  कसा ......"

" ओ हो हो ,आता काही ही म्हण हं , पण तुला अजिबात लक्षात आले नाही  हे कबुल कर." 

" कबूल .पण आता थँक्स कसं म्हणू? सांग न " 

"  दीदी,तू खरच MBA झालीस का ग?    

     कसं म्हणे!

   सिम्पल!! आपण त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊ ."  

दोघींनी आनंद टूर्स चा ऑफिस फोन नंबर आणि पत्ता मिळवला. कॉल करून विचारले सर आहेत का ,आणि गेल्या शोधत . 

   

       ऑफिस अतिशय देखणे होते.कलात्मक रित्या सजवलेले. इतक्या मुख्य रस्त्यावर इतकी प्रशस्त जागा...सायलीला कमाल वाटली. 

खूप कमी वेळात भरपूर मजल मारली होती ह्या कंपनीने. नाशिकच्या इंडस्ट्रियल एरिया मध्ये सगळ्या कंपनी ला AT&,T च्याच गाड्या होत्या ने आण करण्यासाठी. शिवाय भारतात आणि भारताबाहेर टूर्स साठी प्रसिद्ध.

   आनंद मोकाशी, एक अतिशय बुध्धीमान ,स्मार्ट तरुण व्यावसायिक होता. अतिशय लवकर सगळे बारकावे आत्मसात करून त्याने मोठी उंची गाठली होती . आपल्या सहकारी कर्मचारी लोकांना  प्रेमाने कंपनीशी बांधून ठेवले होते. त्याची बोलण्याची शैली मिश्किल, विनोदी असे त्यामुळे ऑफिस चे वातवरण उत्साही आणि  आनंदी असायचे .

      त्यादिवशी इंटरव्ह्यू च्या दिवशी सायलीला पहील्यांदा बघितलं तेव्हाच त्याला ती आवडली होती. तिच्या एकूण व्यक्तिमत्वावर तो फिदा झाला होता. ती भेटायला येणार म्हटल्यावर त्याने पटकन   रोहित ला बोलावले . CCTV मध्ये दोघींना बाहेर बसलेलं बघितलं आणि काहीतरी सांगितलं .

.आनंद स्वतः केबिन च्या मागच्या बाजूने निघून गेला ,आणि कोट टाय मध्ये रोहित ला खुर्चीत बसवलं ...

सायली अन मनूला  आत बोलावण्यात आले.

     सायलीला घाम फुटला अशा वेळी तिचा मुळातला धांदरट स्वभाव आणखीन उसळ्या मारी. 

  दरवाजा उघडून आत येतांना आतल्या  

कार्पेट मध्ये पाय अडकून ती एकदम धडपडली, ते सरळ समोरच्या खुर्चीवर आणि धाडकन खुर्ची खाली पडली.

" सॉरी, सर, सॉरी.." म्हणून मनूने ती उचलली.

आनंद (रोहित) म्हणाला,

 " अरे, इट्स ओके " 

" सर, ते ....17 ड्राइवर चे ....सर्टिफिकेट द्यायला आलो.....न ...नाही ..ते..तुमचा इंटरव्ह्यू  झाला..." सायली ची बोबडी वळली.  (केबिन मागे आतल्या बाजूला आनंद ला खूप हसू येत होते .)

 " रिलॅक्स मिस सायली.आधी बसा तुम्ही " .

आयला ह्याला माझं नाव पण माहितेय. ...सायलीला वाटलं.

सायली ला गप्प रहायची खूण करून मनू बोलू लागली .." सर ,"

सायली मधेच म्हणाली  " पण त्या दिवशी तर  .."

" दीदी प्लिज .." मनू कुजबुजली . ती सायलीला बोलू देणार नव्हती .

ती म्हणाली , 

  " सर, तुम्ही काल स्वतः कॅब घेऊन आलात , सॉरी,आम्ही ओळखल नाही.शिवाय दीदी ची एवढी मदत केलीत  म्हणून आम्ही खास तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहोत." 

" इट्स एबसोलुटली फाईन ...... पण जॉब मिळाला न ? अभिनंदन! " त्याने सायलीला विचारलं.

" हो ..थॅंक्यु सर....हे पेढे ..आणि तुमचे सतरा रुपये. "   (आतमध्ये आनंद तोंड दाबून हसत होता)

  रोहीतला खूप हसू आलं.ही पोरगी    'सतरा'  चं पालुपद काही सोडत नाहीये.

" फक्त सतराच? मॅडम ,तुमच्या कागदपत्रांसाठी मी आणखी एक चक्कर केलीये..." 

"  ओह, सॉरी, त्याचे..किती?..." ती पर्स मध्ये हात घातला पैसे काढू लागली आणि रोहीत  मिश्कीलपणे मनुकडे बघून हसु लागला. 

" मॅडम, त्याचे चार्जेस मी नंतर घेईन" 

" हं? ओके !! ठीक , मी ऑफिस ला कॉन्टॅक्ट करिन .थॅंक्यु सर .सॉरी तुम्हाला त्रास दिला." 

      दोघी तिथून बाहेर पडल्या . लगेच समोर टॅक्सी येऊन थांबली. ड्राइवर म्हणाला,

" मॅडम,चलीये ,"  

' हमे नाही जाना " 

" साब ने ही भेजा है " आनंद नि गाडी पाठवली होती.

दोघीं चाचरतच गाडीत बसल्या.

" कांय ग दीदी, ते तुझी खेचत होते तुला कळलं नाही का,?  सतरा रुपये म्हणे !!

एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक तुझे इतकुसे पैसे घेणार का? हसत होते ते." 

हळूच तिच्या कानात म्हणाली,

" किती भारी दिसतात ग !!! हाय s s !" 

  " चूप !! एकदम चूप !! मला बोलू देशील का ? हा तो नाही "

" कांय बोलतेस दीदी?  मला कळत नाहीये .." 

" अग ,त्यादिवशी सर्टिफिकेट घ्यायला  आला तो ...हा  होता  का ? ." 

" मी कुठे होते घरी ,...आई होती "

" आग तो ड्रायव्हर वेगळा होता ...म्हणजे नाव आनंद मोकाशीच होतं ,पण दिसायला खूपच handsom होता .." 

" हाच ग ,दीदी ,मालक ना ग !! टेबल वर नाव नाही वाचलस  ?" 

" पण तो वेगळा , हा वेगळा ..नक्की !! काहीतरी गडबड आहे"

    इकडे आनंद पूर्णपणे सायलीच्या विचारात गढला होता. तिचं सीमित सौन्दर्य त्याला फार फार भावलं होतं. अशी MBA झालेली मुलगी आपल्या सोबत काम करेल तर कंपनी साठी सुध्धा चांगलेच असेल म्हणून त्याने रोहीत ला सांगून तिला AT&T कडून जॉब ऑफर पाठवायला  सांगितलं .   शिवाय सायली कायम सोबत असेल ...ह्या विचारानेच तो सुखावला. 'सोशल मीडियावर सध्या कुठेच माझा फोटो दिसू देऊ नका ' हे त्याने आवर्जून सांगितलं . रोहीत रिजनल मॅनेजर होता कंपनीचा. त्यानेही आपले थोडे नाही, सहा वर्ष दिले होते कंपनीला . त्याला आवडायचं इथे काम करायला. युरोप टूर चं  सगळं तोच बघायचा. 

रोहीत  म्हणाला , " सर ,मला कळाले नाही तुम्हीं  अचानक मला का समोर केलं ?" 

" काही नाही रे ...असंच !! थोडीशी गम्मत ! " 

" पण सर ,ते ..." 

" बोल न "

" ........"   

 " अरे बोल  की ! 

 लब्जो को युं आधा ना छोडा करो ,

जान जाएगी कभी सोचते सोचते " 

" वाव्हा !! क्या बात है सर !! "

" मला पण असं खूप काय काय लिहावं वाटतं पण जमतच नाही .तुमचं न सर एक पुस्तकच छापू आपण. त्यात तुमचे प्रवासातले सगळे थ्रिलिंग अनुभव आणि मध्ये मध्ये असे शेर ...कविता ..मजा येईल सर ! बेस्ट सेलर होईल सर एकदम !!! "

" कल्पना वाईट नाही , बघू , पण आत्ता ते लेटर .."

" येस सर !"

रोहित ने  HR हेड ला ऑफर लेटर तयार करायला सांगितलं. 

      

    *****   सायली ला GIBS कडून युनिफॉर्म सेट मिळाले होते. जर्मन कॅम्पनी असल्याने सगळं कसं शिस्तीत होतं. आज सायलीचा  कामाचा पहिला दिवस ..खूप खुश होती ती. आईची पण खूप लगबग चालली होती. ती  निघणार एवढ्यात कुरिअर आलं. AT&T चं ऑफर लेटर!!!!

     

        एक कंपनी जॉईन कारायच्याच दिवशी दुसरी ऑफर ?  सायली विचार करू लागली ...GIBS ही जर्मन कंपनी ,आपला जर्मन भाषेचा कोर्स पण झालाय , इथे खूप मोठा स्कोप आहे , मग दुसऱ्या कंपनीचा आत्ता तरी विचार नको .

  तिने पाकीट उघडून बघितलं , त्यात तिला खूप जास्त चांगला पगार , इसेंन्टिव्हस ऑफर केले होते .संध्याकाळी नम्र पणे नकार करू ,असा विचार करून ती निघाली .

     आज  बस एकदम वेळेवर आली . सायली ला जागाही मिळाली . पुढच्या स्टॉप वर बरेच जण चढले .तिने मान वर करून बघितले तर ...अरे ! हाच की तो कॅब ड्राइवर .काय योगायोग आहे ,बरं झालं ,आज त्याचे आभार मानते . 

      आनंद मुद्दाम तिची वाट पाहून बरोबर त्याच बस मध्ये चढला होता . त्याने ऑफिस बॉय ला त्यासाठी हाताशी घेतले होते. तिच्याकडे बघून आश्चर्य दाखवत तो म्हणाला , " अरे मॅडम ,तुम्ही ? " 

" हो ,ऑफिस ला चालले ,तिथेच ,जिथे तुम्ही त्यादिवशी ड्रॉप केलं होतं . थॅंक्यु बरका ,मला तुमची खूप मदत झाली त्या दिवशी . तुमचे पैसे पण द्यायचेत ."  

ती इतकी गोड दिसत होती , वाटलं सगळं खरं सांगून टाकावे .

पण त्याने आवरले स्वतः ला

" पैसे राहुद्या मॅडम , नोकरी मिळाली हे फार छान झालं ." 

" तुम्ही  बस मध्ये कसे ?."  

ही काय मागच्या जन्मी एन्काऊंटर स्पेशालिस्ट होती की काय ?

" मी कंपनीत जातोय न "

" AT & T ला ? ती तर उलट दिशेने आहे ,इकडे कुठे ? "  

त्याला वाटले ,आयला ,मेलो मी आज . ही तर माझी कुंडली काढतेय.

" ते ..अ ..आधी एक काम आहे , ते करून मग जाणार . " 

" एक मिनिट !!! बरे सापडलात !!!  तुमचं नाव काय म्हणालात ? आनंद मोकाशी ? हा ? ......नाही , तुम्ही मला मदत केली वगैरे ठीक आहे , पण हे असं ड्रायव्हर ने मालकाचं नाव टाकून ट्रिप बुकिंग घ्यावं ? हे तुमची सिस्टीम बरं चालून घेते ? "  

" ते काय न मॅडम , साहेब स्वतःच येणार होते , कुणीच  ड्रायव्हर जागेवर नव्हता , ते निघाले ,अन वेळेवर मी आलो ." आनंद वेळ मारून न्यायचा प्रयत्न करत होता .

" मग तर ही आमची फसवणूक झाली . नाव एकाचं , चालवतोय एक ...

तुमच्या मालकाला बरं जमतं हे ? हं ? "

तिने आपले मोठाले डोळे त्याच्यावर उगारले .

आनंद ला वाटले , हिने असाच जाब विचारावा , आणि मी असेच हिच्याकडे बघत बसावे  . किती गोड आहे ही ? पण जास्त उत्तरे द्यायचा नादात फसू आपण म्हणून तो उठला .

" येतो मॅडम , माझा स्टॉप आला ."  

***** GIBS सारख्या कंपनीत खूप काही शिकण्या सारखं आहे , आणि इथे आपली खूप प्रगती होऊ शकते हे सायली नि ओळखलं . कंपनी ची बस तिच्या घरावरूनच जात असे , पण ती सेवा दोन दिवसांनी मिळणार होती .

तिथून एक किलोमीटर वर सिटी बस स्टॉप होता . ती पायी चालली होती .

पंधरा मिनीटापूर्वीच आनंद तिथे येऊन थांबला होता . 

आपलं तिच्याकडे लक्षच नाही असं दाखवायचं होतं त्याला , पण कंपनीच्या त्या फॉर्मल युनिफॉर्म मध्ये ती इतकी आकर्षक दिसत होती , की नजर सारखी तिच्याचकडे जात होती . 

त्याने आपली जुनी मारुती कार आणली होती . सायलीचे त्याच्याकडे लक्षच नव्हते .  ती आता क्रॉस करून पुढे जाणार ,की त्याने हाक मारली 

" मॅडम जी " 

" अरे , तुम्ही इथे पण ? कसे काय ? "

" ते साहेबांनी पाठवलं होतं , आमच्या ऑफिसच्या एका साहेबांना सोडायला ..." 

सायलीला ते जर विचित्र वाटलं .अशी नर्व्हस होण्याची वेळ आली की तिची गडबड होत असे . 

" हो ....का ...ते ..बस सुटली न , आता पुढे जाऊन कंपनी पकडायचीये ...नाही ,स ..स्टॉप सुटलाय न .....मी जाते ." 

आनंद ला हसू आवरेना , तिला थोडं दोन पाऊल चालल्यावर तो म्हणाला ,  "मी सोडू का ?  तिकडेच वापस जायचंय ." 

सायलीला बिलकुल जायचं नव्हतं . 

'हा सगळीकडेच मला कसा भेटतोय ?

माझा पाठलाग करतोय का ? सकाळी बसमध्ये पण ....नाही बाबा . आजकाल काय काय ऐकतो आपण ...मी कंपनीच्या कुणाबरोबर जाऊ का ....' 

विचारातच ती बस स्टॉप वर आली .

मनू चा कॉल आला . तिला इतकं हायसं वाटलं ,

" हे मने , काय वेळेवर फोन केलास ग ! अग , तो ड्रायव्हर आहे  न ..

" दीदी , ऐक तो ..

" अग , आज सकाळी माझ्या बस  ..

" दीदी , अग ऐक न !! दीदी !!!! एक शब्द न बोलता माझं एक !!!! तो जो ड्रायव्हर तुला भेटला , सर्टिफिकेट आणून दिले , तो ड्रायव्हर नाही !!! तेच आनंद मोकाशी आहेत !!! त्यादिवशी त्यांच्या ऑफिस मध्ये होते ते त्यांचे एरिया मॅनेजर रोहित देशमुख होते ....

..दीदी ..हॅलो ....अग ...जागिएस ना ?"

" मनू , काय बोलतेस तू ? ...अग कार ..त्याला घेऊन ..वाट बघतेय ...म्हणजे ...

" दीदी , शांत हो . उगाच बावचळू नकोस . ये घरी , खूप काय काय दाखवायचंय ." 

  आता सायलीच्या जीवात जीव आला . 

म्हणजे आपल्या मागे लागलाय तो आनंद मोकाशी ?

तिला खूप आश्चर्य वाटलं ..

तिने बघतीले , अजूनही मारुती हळू हळू स्टॉपच्या दिशेने येतच होती . 

" अजून बस नाही आली मॅडम ? का संकोच करताय , मी सोडतो न ." 

सायली दार उघडून पुढे बसली .

" तुम्ही मला इतकी मदत केली , मला तुमचे नाव पण नाही माहीत ."

" मी ...प्रशांत ." 

' असं का बच्चू ? ' सायली मनात म्हणाली .

" तुमची भाषा छान शुद्ध आहे . Educated  वाटताय . " 

" हो , म्हणजे M .Com . झालंय , पण नोकरी लगे पर्यंत हे टॅक्सी चालवायचं काम करतोय ." आपल्या थापेवर तो खुश झाला 

" तुमच्या A T & T कंपनी चे ऑफर लेटर आलंय मला . पण तसेही माझा संबंध येणारच आहे , कारण लग्न ठरलय माझं .तुमच्याच कंपनीत आहे तो ..

कचकन ब्रेक लागले गाडीचे . 

" काय झालं प्रशांत भाऊ ?" तिने नाटकी पणाने विचारले .

उत्तर आले नाही , गाडीचा वेग मात्र वाढला होता . ' भाऊ ? भाऊ म्हणतेय मला ? आणि कुणाचे स्थळ असेल ? रोहितच ?...' 

सायली हळूच  डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होती ...त्याचा विचारात पडलेला चेहेरा बघून गम्मत वाटली तिला .

" बस ,बस आले घर ." ती उतरली , आणि खिडकीतून वाकून म्हणाली ,

" हे तुम्हाला घ्यावे लागेल . मागचे सतरा रुपये आणि काही उधारी पण आहेच ."

असे म्हणून तिने पाचशे ची नोट त्याच्या पुढे धरली . तो  बिलकुल बोलायचंय मूड मध्ये नव्हता .....त्याने ती नोट घेतली आणि जोरात गाडी पुढे नेली .

सायली मनातल्या मनात हसत होती ..माझी फिरकी घेतोस का बच्चू !!

 " दीदी , बघितलेस का आमच्या कार्यक्रमात आनंद मोकाशीचे फोटो ? तुला पाठवलेत मी .कसला मारू दिसतो ग !" 

" मनू ...मनू ..." 

" मनू , माझा मोबाईल ...गाडीतच राहिला !! " रडका चेहेरा करून सायली म्हणाली. 

" दीदी , पाय दाखव तुझे . साष्टांग नमस्कार  घालते !! कशी ग तू 

वेंधळी ? " 

" पण लॉक आहे मोबाईल ला  s s "

" गप उगी !! नको ते उद्योग करून ठेवते . आता जा , घेऊन ये मोबाईल ."

      आई आत आली .  " एक जण आलेत बाहेर . सायली , तुझे कुलीग आहेत का ? " 

सायली बाहेर पळाली . 

आता तिने नीट बहितले ....निळी जीन्स , पांढरा टी शर्ट ,स्टाईल  ..केसांची ठेवण ..पण..स्वतःला बजावले...आवर  सायली,तो  तुझ्यासाठी फक्त ड्रायव्हर आहे सध्या .....

" तुमचा फोन मॅडम ..." 

" thanks . पुन्हा तुमची मदत  

झाली . "  आणि ती लगेच वळली .

' शीट !!! पुन्हा मी एक चान्स घालवला ...' म्हणत आनंद खूप डिस्टर्ब होऊन वापस जायला निघाला .  

******* रात्रभर आनंद ला झोप आली नाही . आपल्या कंपनीत कोण असेल .......ती लग्न म्हणतेय चक्क ...

      सकाळी तो ऑफिस मध्ये बसला होता . आज चार पाच मोठ्या हॉटेल्स सोबत कंपनी चे टायअप करायचे होते . 

युरोप टूर मध्ये काही नवीन डेस्टिनेशन ऍड करायचे होते . पण डोळ्यासमोर सारखी सायलीच येत होती ......कुणाशी लग्न ..ठरले असेल ..

" तुकाराम , रोहीत सरांना बोलाव ." 

त्याला सरळ सरळ विचारायचे होते .

" येस सर ?" 

" अरे रोहीत , आपल्या कडे किती एरिया मॅनेजर आहेत ? "

" सर , मी पकडून सोळा . इथे नाशिक मध्ये चार ,आणि बाकी आपल्या इतर ऑफिस मध्ये ." 

" इथे फक्त तूच लग्नाचा आहेस न ? "

" सर ? ..म्हणजे ...." 

"  तू बघतोय का सध्या स्थळ वगैरे .."

" सर , मी सांगितले नाही ,पण लग्न ठरलंय माझं ..."

आनंद चे ठोके वाढले ...

" अरे वाह !! छुपा रुस्तुम !! कोण आहे रे ? "

" सर , ते आमच्या गावाचीच आहे जयश्री .."

आनंद चा चेहेरा एकदम असा का उजळला ...रोहित ला कळेना  ...

" congratulation !!! ग्रेट ...ok , दुपारी मीटिंग आहे ,तेव्हा भेटू . 

आनंद च्या मनावर मोरपीस फिरत होतं . म्हणजे सायली माझी टांग खेचतेय .. तो गालातल्या गालात हसला . 

***** सायलीला डिव्हिजनल मॅनेजर HR ने बोलावले .

" मिस सायली ,राईट ?" 

" येस सर "

" आपल्या कंपनीला नव्या commutation सर्विसेस ची गरज आहे . साडे आठशे कर्मचारी हे अशी बस सेवा वापरतात . आता काही बसेस आहेत तरीही किमान वीस तरी हॅचबॅक आणि सेदान पाहिजेत . तर लवकर सर्व्हे कर आणि संध्याकाळ पर्यंत रिपोर्ट कर ." 

अशी संधी !! सायलीने ताबडतोब AT&T च्या ऑफिसला फोन केला , आणि आपल्या कंपनीचा रेफरन्स दिला .

" हॅलो ,  आनंद मोकाशी हिअर !!"

तशी कंपनीच्या कामात ती फारच प्रॉम्प्ट आणि ठाम होती ..पण आता इथे मात्र तिची बोबडी वळली .

" हॅलो , सायली बोलताय ,मी मोकाशी ,..सॉरी गिब्स .. सर मी ...."

हाय रे देवा , का परीक्षा घेतोएस ?

" हाय मिस सायली. कूल डाउन ! बोला , कसा फोन केला ? "

तोपर्यंत ती सावरली होती .

" सर , आमच्या कंपनी ला 20 गाड्या हव्या आहेत . मी तुमच्या कंपनीचे नाव सुचवले . तर आम्हाला ...

"  थॅंक्यु सो मॅच ,पण त्यासाठी मीटिंग करावी लागेल मिस ... सायली ." त्याने पटकन बोलून टाकले . 

" मी येते , ऑफिस ला "

" ड्रायव्हर पाठवू ? "

" न ..न नको !! मी कंपनीच्या गाडीने येतेय " 

आनंद उत्साहात उठला . बॉय ला सांगून एक गुलाबाच्या फुलांचा बुके मागवला . स्वतःच कपडा घेऊन साफसफाई करायला लागला ...आज पहिल्यांदा सायलीला ' आनंद मोकाशी   म्हणून भेटणार होती . 

सायली आली . तुकाराम ने केबिन चे दार उघडले ..

" या सायली मॅडम.वेलकम "

" प्रशांत ? तुझी एवढी हिम्मत की आज साहेबांच्या केबिन मध्ये साहेब बनून बसलाय ? त्या आनंद मोकाशीला किती बदनाम करणार तू अजून ? माझ्या मागे काय लागतोस ? इथे काय बसतोस ..थांब तुला न .."

" सायली , सायली प्लिज..प्लिज ओरडू नकोस ,सगळं ऑफिस इथे गोळा होईल ....."

ती मोठ्या ने हसायला लागली ..

" नाटक काय फक्त तुम्हालाच करता येतं का मिस्टर आनंद ? " 

" ओहहह !! काय झाशीची राणी आहेस ग !! जाम टरकलो मी !! सॉलिड आहेस हं ! " तो एकटक तिच्याकडे बघत होता ... सायलीला पण  नजरेत नजर मिळवायची होती , पण पापण्यांनी संप पुकारला होता ..नजर उचलेचना . 

" लग्न ठरले म्हणून खोटं बोललीस न ?" 

" नाही ..ठरलंय .लग्न ."

" काय ?"

तिने पटकन वर पाहिले तो खट्याळ नजरेने बघत होता ..

आई ग s s सगळ्या अंगावर एक वेगळाच गोड रोमांच उठला ..हे कांय होतंय ? तिला वास्तवाचे भान आले , आणि म्हणाली ,

" आम्हाला तुमच्याकडून 20 गाड्या हव्या आहेत ."

" दिल्या ...सगळ्या दिल्या .."

" ड्राइवर सहित पर मंथ कसे चार्जेस असतील ? " मला सगळं कॉस्टिंग द्यावं लागेल 

"......."

" मिस्टर  आनंद ?"

 .........

एका वेगळ्याच जगात गेला होता आनंद . एकदम खुश.

सायलीमुळे त्याला खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते ,दोन वर्षांसाठी . 

 यानंतर दोघे वारंवार भेटू लागले . 

दोघेही एकमेकांना पसंद करत होते .

आनंद ने कितीदा तिला प्रपोज करायचा प्रयत्न केला , पण हिम्मतच होत नव्हती . 

"सायली , "

" हं ? बोल न "

"  कंपनीला मालकिणीची गरज आहे आता ."

" अच्छा ? मग आण ना ..मालकीण !!" ती मुद्दाम चिडवत म्हणाली.

" मालकीण बाई तयार आहेत ? GIBS सोडून यायला? " 

" त्यासाठी AT&T ला आमच्या घरी यावे लागेल ." 

" बघ हं उद्याच येईल मी "...तिच्या डोळ्यात खोल पहात म्हणाला ," येऊ न? "

" असे नको पाहुस ,  मला कसं तरी...." ती जातेय पाहून त्याने पटकन तिचा हात पकडला .

  " अ हं ..आता उद्याच भेटू ..घरी " आणि ती हात सोडवून पळाली.

   

******* रविवार चा दिवस म्हणून सायली आणि मनू निवांत होत्या . अचानक बेल वाजली तर दारात आनंद ! 

" तू ? इथे ? खरच आलास की ! "

" मग !! मला चांगलच माहितेय तुझं घर !! काल म्हणालो न ,येईन म्हणून ?"

" कोण ग सायली ?" आई ने आतून विचारले . 

" मी , आनंद मोकाशी ! " त्यानेच उत्तर दिले . 

आई भर भर बाहेर आली .

" या न . या , बसा ..पाणी आण ग मनू .." 

आतून बाबांनी हाक मारली .

" प्रमिला s s "

 सायलीचे बाबा काही वर्ष आजारी होते आणि गेल्या दोन वर्षांपासून तर झोपूनच होते . त्यांचे कमरेखाली पूर्ण शरीर लुळे  पडले होते .

आई धावतच आत गेली .

" कोण आलंय प्रमिला ? "

" अहो , मोठ्ठ्या कंपनीचे मालक आहेत ते . आनंद मोकाशी ." 

" आनंद मोकाशी ? संजय मोकाशींचा मुलगा ? " ते जोरात ओरडले , तसा आनंद आत आला . 

" तू ..संजय मोकाशीचा मुलगा ? "

" हो , तुम्ही ओळखता ?"

" सायली , यांना सांग आत्ताच्या आत्ता इथून जा !!! "

" बाबा , "

" सांगितलं न एकदा ? आत्ता बाहेर काढा ह्याला ."

" काय झालं बाबा ?"

"....."

" It's ok  , ठीक आहे सायली, मी जातो , पण नेमके कारण मला समजले पाहीजे. "  तो शांत पणे निघून गेला .

" काय झालं बाबा ? तुम्ही अचानक .."

" ह्या मुलाला तू पुन्हा कधीच भेटायचं नाही !!!"

  

       बाबांचे बोलणे ऐकून अजिबात न चिडता आनंद निघाला .

" आनंद , मी ..

" इट्स ओके सायली , उगाच नाही रागावले ते . काहीतरी कारण असेल. नीट शांतपणे बोल त्यांच्याशी , उद्या फोन वर बोलू , पण भेटायचं नाही सध्यातरी ." 

    सायली सुन्न होऊन घरात आली .

मनू तर नुसती पुतळ्या सारखी उभी होती . 

" दीदी , सॉरी यार ..असं का वागले बाबा ? " 

" मी बोलते त्यांच्याशी , आत्ता नाही , नंतर ."  

  सगळा दिवस सायली संयम ठेवून होती . 

"  आई , बाबा आणि संजय मोकाशी यांचं नेमकं काय झालं होतं ? या आधी तू कधीच बोलली नाहीस ? " 

" माहिती आहे मला सगळं , पण तू त्यांच्याशीच बोल . "  

******** सायली ला आतून उन्मळून येत होतं , इतक्यात आनंद चा कॉल आला . थरथरत्या हातानेच तिने कॉल घेतला . 

" सायली , काळजी करू नकोस .ठीक होईल सगळं . "

" ......"

" बरं मला सांग , काही वर्षांपूर्वी बाबा मुंबई ला कामाला होते ? " 

" हो , जवळपास दहा वर्षांपूर्वी . पण नंतर  आम्ही इथे नाशिक मध्ये आलो , करण इथे आमचं वडिलोपार्जित घर आहे .....का?"

" नाही ग , आमच्या मालकीण बाईंना सन्मानाने आणायचं तर हे सगळं करावं लागेल नं ! " तो हसला ." तू ऑफिस मध्ये असशील न , ठेव फोन " 

********* थकून सायली घरी आली . आता कंपनी ची बस होती त्यामुळे तसे सोपे झाले होते . 

" काय म्हणताय बाबा , औषधे घेतली का वेळेवर ? मी घेतलीये अपॉइंटमेंट डॉ . खाद्रा ची . ते एक महिन्या करता भारतात येत आहेत आत्ता ऑगस्ट मध्ये.

  तुम्हाला नक्की बरं करतील ते बाबा ."

" माझा सगळा पैसा ह्या ट्रीटमेंट मध्येच गेला बेटा . मी तुमचा अपराधी आहे ,."

" बाबा , ही भाषा कुठून आली अचानक ? मी MBA HR झालेय , मनू आत्ता hotel and tourisam मॅनेजमेंट पूर्ण करतेय ...ते तुम्हीच करवलं न? आम्ही दोघी सक्षम आहोत आता . सगळं एज्युकेशन लोन आम्ही फेडू . तुम्ही काही काळजी करू नका ." 

" प्रमिला , तिची उपम्याची प्लेट इथेच आण ग . भूक लागली असेल पोरीला ." 

मनू पण हळूच येऊन बसली .

" तुम्हाला माहितेय आधी आपण मुंबई ला होतो . मी 'मोकाशी कन्स्ट्रक्शन ' मध्ये मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह होतो . 

बाराव्या मजल्याचे काम सुरू होते . 

 माझ्या सोबत एक क्लाएंट होते . त्यांना आमच्या टाऊनशीप  मध्ये फ्लॅट बुक करायचा होता . मी त्यांना फ्लॅट दाखवत होतो . आम्ही गॅलरीत आलो आणि  पूर्ण  गॅलरीच कोसळली . बाराव्या मजल्यावरून तो सरळ खाली पडला ,आणि जागीच ..." त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या . 

" तुम्ही बाबा ? तुम्ही .." मनू चाचरत म्हणाली .

" मी माहीत नाही कसा ,पण एका बारीक लोखंडी बार मध्ये आधी अडकलो , तो वाकला ,आणि मी आपटत आपटत खाली आठव्या मजल्याच्या तिथून बाहेर आलेल्या सळाकांवर पडलो . "

" मग ?"

" जाग आली तर हॉस्पिटलमध्ये!! समोर तुमचा रमेश मामा आणि आई ! अनेक ठिकाणी हाडं मोडले होते . जवळपास अडीच महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो . लाखो रुपये खर्च झाले." 

" मग कंपनीने भरपाई .."

" पाच हजार !! माझ्या उर्वरित आयुष्याची किंमत !! "

" माझ्या कडून लढायला तुझा मामा बिचारा एकटा ...मालकाने अक्षरशः हाकलून लावले त्याला . " 

एक दिवस पेपर मध्ये बातमी आली तेवढंच . बाकी मालकाने मॅनेज केलं सगळं .

"  आणि मालक म्हणजे संजय मोकाशी ....बरं  सायली ,

आई पहिल्यांदा बोलली .. 

" आधी थोडं थोडं चालता येत होतं ,मग हळू हळू जाणिवा बंद होत गेल्या .आम्ही कितीतरी डॉक्टर पालथे घातले . तुम्ही एकट्या घरात रहायच्या ,आम्ही हॉस्पिटलमध्ये च असायचो . मग मुंबईत रहाणे अशक्य झाले . इथे निदान वर छत तरी आहे." 

"माझं वाटोळं करून तमाशा बघणाऱ्या त्या संजय मोकाशीला  मी कधीच माफ नाही करणार !!"

" तुम्ही केस केली कंपनी वर ? तुम्हाला कायद्या प्रमाणे  नुकसानभरपाई मिळायलाच हवी  बाबा ." 

" आधी खूप खेटे घातले कोर्टात , पण नंतर ताकद नाही राहिली .  मोकाशी एक बडी आसामी बेटा . त्यांच्या पुढे आम्ही हार मानली " 

त्या क्लाएंट च्या नातेवाईकांनी पण केस केली . त्यांना मिळाले बहुतेक कंपेनसेशन .

" दीदी , आपण लढू केस ! नक्की जिंकू बघ  . "

" नक्की  मनू ."  

*********सायली कंपनीच्या गेट वर पोहोचली . आनंद तिथे वाट बघत होता . 

" सायली , मला कळालंय सगळं .

मी एक चांगला वकील देतो करून ..तुमची बाजू मजबूत आहे .. निकाल तुमच्याच बाजूने लागणार . "

 तिने डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले ..

" डोळे पूस आधी . नीट ऐक सायली .

आपले नाते कसे वळण घेते हा आता नंतरचा विषय आहे ...माझ्या यशाच्या पायऱ्या अशा दुसऱ्याच्या दुःखावरून 

नाही जाऊ शकत . बाबांना न्याय मिळालाच पाहिजे . संध्याकाळी वकील येईल , त्याला मी नाही ,तू बोलावलं आहेस हं ! .....बोलू नकोस .....टेक केअर ! " 

सायली त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघतच राहिली . 

    बाबांची केस पुन्हा सुरू झाली होती . इतक्या वर्षांनी ती लढवणे अवघड होते ...पण आताची गोष्ट वेगळी होती . आनंदने खूप नामांकित वकील नेमून दिला होता . 

सायली घरी TV बघत बसली असतांना 

एक पाकीट येऊन पडले .

ते बँकेचं पत्र होतं . 

सायली वाचू लागली ....कर्जाचे हप्ते बराच काळ थकल्याने घरावर जप्ती येणार अशा आशयाचे पत्र होते . सायली गंभीर झाली .

ती ते वाचत असतांनाच आनंद चा फोन आला .

" सायली , मी बँकेत गेलो होतो तुमचे  कर्जाचे स्टेटस बघायला .

तिथे तुमच्या घराचे कागदपत्र दिसले . 

मी चौकशी केली ......."

पुढचे ऐकून सायली च्या डोळ्याला धाराच लागल्या . आपल्या घरावर जप्ती येणार हे कळाल्यावर  आनंद ने परस्पर काही रक्कम भरून जप्ती थांबवली होती .

कोणते आहे हे नाते ,  दोन  अडीच महिन्या पूर्वी एकमेकांना न ओळखणारे आम्ही ....त्याची मदत घेणे योग्य होईल ?

" पण  हे मला पटत नाहीये आनंद . 

मला अजून ओझ्याखाली नको टाकूस ." 

" आणि  आई बाबा? त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढणं पटतंय तुला !!! शहाणी बन आणि तुझ्या आई वडिलांना कळू पण देऊ नकोस ह्या पत्राबद्दल . "

" सोळा लाख म्हणजे लहान रक्कम नाही  आनंद ." 

"  पण मी कुठे सगळे पैसे भरलेत ? तू केस जिंकलीस.....आणि , जिकणारच ...तर माझ्या अंदाजाने चाळीस लाख सहज मिळतील ...तुमच्या हक्काचे !! 

उपकाराचे नाहीत . " 

" मला तुला भेटायचंय . आत्ता !!! ."

"नाही सायली . आपण आत्ता नाही भेटायचं . वेळ आल्यावर मी स्वतः तुला भेटायला येईन . आता मला माझे काम करू दे .... 

 मी उद्या U .S ला जातोय , कंपनीच्या कामाने . फोन करत राहील ..आल्यावर भेटू ..हस बघू आता ... हं....  बाय ." 

हातात ते पत्र घेऊन ती पुतळ्या सारखी बसली होती . 

" सायु "

आई येतीये म्हणून तिने ते पत्र लपवले .

 " सायली , आपल्या वकील साहेबांचा फोन होता . फायनल हिअरिंग ला मला अन तुला जावे  लागणार मुंबईला . तुला रजा घ्यावी लागेल न बेटा . "

" तारीख काय सांगितली ?" 

" ह्या महिन्याची अठरा  तारीख . अठरा जुलै . " 

"मग मोकाशी कन्स्ट्रक्शन कडून कोण असणार आहे ? खुद्द संजय 

मोकाशी ? " 

" नाही त्यांच्या वतीने कुणीतरी येईल , पॉवर ऑफ अटर्नि  घेऊन .......

.....सायु , आनंद खूप चांगला माणूस आहे , पण तू पुढे संबंध वाढवू नकोस. "

" कळतंय आई ,  काळजी करू नकोस , तुम्हाला  मुळीच मान खाली घालावी  नाही  लागणार ." 

आईने समाधानाने तिच्या गालावरून हात फिरवला . 

सायली ने ते पत्र तिच्या कपाटात लपवून ठेवले . 

***** सायलीचा पहिला पगार जमा झाला होता . ती अतिशय खुश होती .

घरी येतांना तिने आई साठी एक सुंदर साडी व मोगऱ्याचा गजरा घेतला . बाबांसाठी वॉकर स्टँड आणि मनू साठी फॉर्मल ड्रेस घेतला . 

आनंद साठी पण काहीतरी घेतले होते .

तिला त्याची खूप आठवण येत होती . 

......आनंद , तू माझी शक्ती बनलाएस .

प्रेम काय असतं असं कुणी विचारलं तर मी तुझ्याकडे बोट दाखवेन .........

......तू एकदा म्हणाला होतास ... "सायली , तू मला स्वीकारलं नाहीस तरीही चालेल , पण कायम लक्षात ठेव एक सच्चा मित्र म्हणून मी सतत तुझ्या सोबत असेल ..तुझी सावली बनून.....कायम ."

 "माझी सावली  ?. पण सावली तर रात्री दिसत नाही .." 

तो म्हणाला होता ,

" जे दाखवून सिध्द करावं लागतं ते प्रेम कसलं .".....

खरच रे ...जे  दाखवावं लागतं ते प्रेम कसलं .

विचारातच ती घरी आली .

 " म s नू , " तिने हाक मारली

" दीदी , तुझ्यासाठी सरप्राईज !!"

" आधी माझं सरप्राईज !! "

" नाही !! मी छोटी ना !!"

" ब s s र !! बोल "

" मला  AT & T मध्ये जॉब मिळालाय . रोहित सरांचा फोन होता ." 

"  wow !! ग्रेट !!आ जा मेरे शेर !! गले लग जा !" तिने मनूला मिठी मारली , आणि मनू रडायला लागली .

" ए वेडाबाई , काय झालं ? " 

" दीदी , ज्या व्यक्तीने आपल्या फॅमिली चे इतके नुकसान केले , बाबा ज्या माणसाचा गेल्या दहा वर्षांपासून प्रचंड तिरस्कार करतात , ज्यांनी आपल्याला इतकं हीन पणे वागवलं त्यांचा च मुलगा इतका देवमाणूस ?"  

"........." 

******सतरा तारखेला आई सोबत मुंबईला जाण्यासाठी सायली अर्धी सुटी काढून आली .

थोड्याच वेळात दारात गाडी उभी . 

ड्रायव्हर आत आला .

" रोहित सरांनी गाडी पाठवलीये ."

आई बाहेर आली .

" सायली ,गाडी वापस पाठव . आपल्याला कुणाचे उपकार घ्यायचे नाहीत .

... उपकार ?...हिला जर कळाले की घर जप्त झाले असते , ते कोणी वाचवले , तर सहन नाही होणार हिला ....तिच्या मनात आले . 

" आई , हे आपण उपकार मानायचे नाहीत . आतापर्यंत तुम्ही जे हाल सहन केलेत ते यांच्याच मूळे न ? " 

कशी बशी आई तयार झाली . 

रात्री  दोघींनी रमेश मामा कडे मुक्काम केला . सकाळी अकरा ला कोर्टात जायचं होतं . 

....... मोकाशी कन्स्ट्रक्शन कडून त्यांचे 

एक मॅनेजर आले होते . 

सूनवाई सुरू झाली  .

.............

.............. आणी निकाल सायलीच्या बाजूने लागला . अडोतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा कोर्टाचा आदेश होता . कंपनीला मान्य करावा लागला . इतक्या वर्षांनी त्यांना न्याय मिळाला होता . हे सगळं  आनंद मुळे शक्य झालं नाहीतर माहीत नाही आणखी किती काळ झगडावे लागले असते .

 ही आनंदाची बातमी मनूला कळवायची होती .

पण घडलं वेगळंच होतं ..

" दीदी ,  ऐक ! बाबांना आज सकाळी हार्ट ऍटॅक आला . त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय .  अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे .आईला काहीच सांगू नकोस . मी हँडल करिन सगळं . 

     .......का परीक्षा घेतोएस देवा . एक आनंद पदरात पडत नाही , की दुसरा धक्का देतोएस ....आता बाबांना काही झालं तर ... हा पैसा काय कामाचा ?

आपण ह्या आधीच डॉ खाद्रा ना दाखवायला हवं होतं का ?...

नाशिक ला पोहोचेपर्यंत ती अतिशय काळजीत होती . 

    आईला घरी सोडून ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेली .

I C U च्या समोरच तिला आनंद दिसला. आनंद !!! हा कधी आला ? 

मला सांगितले पण नाही . 

....आनंद ,do I really deserve you ? ...

ती तिथे पोहोचे पर्यंत तो निघून गेला होता .

.....हा का टाळतोय मला ? का भेटत नाहीये ...

अँजिओप्लास्टी झाली होती . बाबांना आता काही धोका नव्हता. 

ती रात्री ICU च्या बाहेर खुर्चीत अवघडून बसली होती ....बाहेर पाऊस पडत होता आणि मनात विचारांनी गर्दी केली होती .. ..माझी सावली ...सावली म्हणाला होतास ...मग .....…..

त्या गारव्यात तिचे डोळे मिटले ,आणि अंग चोरून ती तिथेच झोपली . तासाभराने जाग आली तर अंगावर शाल होती .....

.....आनंद !! ...आनंद !!...कुठे आहेस ...तिने भिर भिर बघितले ...तो तिथे नव्हता . तिच्या मनात कुठेतरी वाचलेल्या ओळी आल्या

              त्या निळ्याचा पावा  मनावर 

               फुंकर घालून गेला 

               माझ्या साठी ऐलतीरावर 

                 तो शेला ठेवून गेला .....

          आणि वाचून ती सुखावली .

                  

                      आता बाबांची प्रकृती छान होती .

दुसऱ्याच दिवशी त्यांना  कॉट वरच श्वासाचे व्यायाम पण सांगितलं होते . 

आनंद हॉस्पिटल ला आला , डॉ . निकम राउंड वरच होते .

" डॉ , कशी आहे त्यांची प्रगती ? "

" आता काही धोका नाही . तुम्ही अगदी देवदूत बनून आला आहात त्यांच्यासाठी .  टेक केअर ." 

" आज त्यांची मुलगी सगळे बिल भरेल . थँक्स तुम्ही सहकार्य केलंत ."

" mr. मोकाशी ,तुम्ही त्यांचे कोण ?" 

" मी त्यांचा वेल विशर ....किंवा कर्जदार म्हणा ."

तो तिथुन निघाला ,अन सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचली .

******** सायली ची तगमग होत होती . इतकं सगळं झालं पण आनंद भेटला नव्हता . ट्रीटमेंट चे सगळे पैसे सायलीने भरले . आणि त्याच्या ऑफिस ला गेली . तो नेमका तिथे नव्हता . 

त्याला फोन करणार की त्याचाच कॉल आला .

 " सायु  , तू म्हणाली होतीस न  ते डॉ . खाद्रा आत्ता याच आठवड्यात येत आहेत .मी अपॉइंटमेंट घेतलीये . आपण दाखवून घेऊया .  बाबांना हिंडते फिरते करण्याची ताकद आहे त्यांच्यात . " 

" तुला मला भेटायची इच्छा नाहीये ? ".

" प्रत्येक नात्याचा एक आदर असतो न सायली , तू बाबांना एम्ब्युलन्स मध्ये घालून तिथे घेऊन ये . मी त्यांच्या समोर येणार नाहीये ."

     डॉ . खाद्रा नि बाबांना तपासले , काही चाचण्या केल्या . ऑपरेशन करावे लागेल , काही महिने फिजिओथेरपी ,आणि ते ठीक होतील असे सांगितले . 

  ठरलेल्या दिवशी  डॉ. नि बाबांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं .

  मनू ने AT&T मधून सुट्टी घेतली होती . ती सायली सोबत OT च्य बाहेर बसली होती .

  अचानक सूट बुटात एक व्यक्ती समोर आली .

  " तुमच्या पैकी सायली कोण आहे ? " 

   " मी ." 

   " तुमच्या फॅमिली चा हा व्यवसायच आहे का? म्हणजे आधी बापाकडून पैसे उकळायचे आणि मग मुलावर पण फासे फेकायचे?"

     तिला अंदाज आला ...आणि तितकीच चीड पण आली...

    " तुम्ही ....मोकाशी साहेब का ? . हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे ...तुमच्या फॅमिलीचा हा व्यवसाय आहे का ,की आपल्याच एम्प्लॉई ला मरायला सोडून द्यायचं आणि त्याला तुडवून धंदा पुढे न्यायचा ? " 

" How dare you !! दिले न आता अडोतीस लाख !! " 

" हं !! मग बाबांचे ते दहा वर्ष पण वापस द्या सर ! . त्यांची फरपट , त्यांचे हाल ,असहायता ... ह्याची किंमत ?"

" अच्छा !! त्याची किंमत म्हणून आनंद ला शोधलत तुम्ही ? Stay away from him  miss Sayli !!" आणि अतिशय मग्रुरीत ते चालते झाले .

     

      सायली अवाक झाली होती . ह्यांना कसे कळाले आम्ही इथे आहोत . ते फक्त आनंद आणि माझ्या बद्दल बोलले असते तर समजण्यासारखं होतं . त्यांना पूर्ण अधिकार ही आहे , पण इतक्या वर्षांनंतरही बाबांना न्याय मिळावा असे यांना कसे वाटत नाही ! 

" इथे येऊन गेले मनू , बाबांवर आत शस्त्रक्रिया सुरू आहे , पण एका शब्दाने विचारलं नाही की ते कसे आहेत , जिवंत तरी आहेत का ?  ..इतके वर्ष त्यांच्या कंपनीत काम करूनही ? "

     मनू उठली . तिने सायलीला जवळ घेतले . शांत हो दीदी . तुझं बरोबर आहे , पण आपण आपल्या मर्यादेतच राहू . जे चूक ते चूकच . तू त्रास नको करून घेउस . 

     डॉ . बाहेर आले .ऑपरेशन यशस्वी झाले होते . पोरींनी तर नमस्कारच केला डॉ . खाद्रांना . 

हॉस्पिटलमध्ये एक छोटे गणपतीचे मंदिर होते . सायली तिथे जाऊन बसली . एकटक डोळे भरून देवाकडे बघत होती . ती स्वतः कमावती झाल्याबरोबर तिने ट्रीटमेंट चा निर्णय घ्यावा , नेमके त्याच वेळेला डॉ . भारतात यावे , सगळं ईश्वराने जुळवून आणलं होतं . तिला  मणांचं ओझं उतरल्या सारखं  वाटत असतानाच शेजारी हालचाल झाली . तिने वर बघितलं  तर आनंद आला होता .  तिच्या डोळ्यातलं पाणी वाट काढून गालावर आले होते . तिचे मोठे बोलके डोळे त्याच्या डोळ्यांना सारं सांगत होते .

त्याने हळूच तिच्या पाठीवर हात ठेवला . तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं . किती वर्षांचे जीवघेणे ओझे उतरले होते .

" नाराज आहेस माझ्यावर ? "

" आपल्याच सावली वर कोण नाराज होतं ? पण इतके दिवस का भेटला नाहीस  " 

" तुला सन्मानाने मालकीण बनवायचंय ग !! "

  त्या ने अलगद हाताने तिचे डोळे पुसले . विस्कटलेले केस नीट केले .

हळूच विचारले ,

" पप्पा आले होते न ? "

"........."

" प्रेमात खूप ताकद आहे सायली . सध्या विसरून जा की ते इथे आले होते .  मी डबा आणलाय , दोघी जेवुन घ्या . " 

" मनू ला जॉब दिलास ..

" काम करणारे खूप मिळतील ग , जीव ओतून करणारे मिळत नाहीत . म्हणून मनूला बोलावून घेतले . " 

******* बाबा आता वॉकर घेऊन घरातल्या घरात चालू शकत होते . आई अतिशय खुश होती . 

संध्याकाळी बाबांनी सायलीला बोलावले .

" सायली , तू आनंद बद्दल पुन्हा बोललीच नाहीस ." 

" बाबा ?" 

" डॉ निकम राऊंड वर आले होते ,तेव्हा आनंद शी बोलत होते  . मी शुद्धीत होतो . मला समजले सारे .

कमाल आहे पोराची . मला त्याची माफी मागायचिये . 

बापाच्या कर्माची शिक्षा पोराने का भोगायची ? अस्सल सोनं आहे हा पोरगा ....मला तुझा खूप अभिमान वाटतो ग ! . "

सायली समाधान ने भरून पावली .  

****** खूप उत्साहात सायली 

AT & T च्या ऑफिस मध्ये गेली . आता मोकळेपणाने आनंद शी खूप बोलायचं होतं .

रोहित होता ऑफिसमध्ये .

" या सायली मॅडम "

"  अरे ! मॅडम काय !! आनंद कुठाय ?" 

" सर मुंबई ला गेलेत कामानिमित्त . उद्या सकाळी येतील ." 

तिने फोन लावला .

" सायली , आपली परीक्षा अजून संपली नाहीये . पप्पांनी एक मुलगी बघितलीये आणि जिद्द घेऊन बसलेत की मी तिच्याशीच लग्न करावं . " 

" मग कर न ." सायली खट्याळपणे म्हणाली . 

" सावली ला आपले स्वतंत्र अस्तित्व असतं का ग ? ...फक्त सावली असं ? " 

" .......रोहित म्हणतो ते बरोबर आहे . तू खूप छान लिहू शकतोस . तुझ्या भाषेला वजन आहे .........आनंद ? ....हॅलो !!

....आनंद !! " 

" काहीतरी घडलंय सायली .....तू ....तुकारामशी बोल ...मी...

फोन कट झाला .

आनंद सोबत तुकाराम गेला होता .

सायलीने दहा मिनिटे वाट पाहून तुकारामला फोन लावला .

मोठ्या साहेबांचा खूप मोठा ऍकसिडेंट झालाय मॅडम . वाळू भरलेल्या ट्रक ने कारला धडक दिली . त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय . 

   त्याही परिस्थितीत सायली ला कसं वागावे ह्याचे भान होते .

" तुकाराम , मी उद्या , रविवारी तिथे येते . साहेबांना काहीच बोलू नकोस ."

********** ' ईश्वरा , मी आमची खुशी मागितली तुला ...दुसऱ्याचं सुख ओरबाडून ते आम्हाला नको देऊस ..आम्ही ते  पेलू शकत नाही रे . ' असा विचार करत सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचली .

लीलावती जवळ खूप गर्दी होती .

सायलीला वाटले , नेमकं कोण मोठं ? 

हे कामगार पहा , मालकाची वास्तपुस्त घायला लगेच आलेत ..आणि .........मालक ?

  " सायली ?? आलीस !!! " 

 उत्तरादाखल तिने त्याच्या खांद्यावर थोपटले . 

 " पपांनी तुझा अपमान केला ..

" अपमान मोठा की माणूस ?..मग बाबांनी तर तुला हाकललेच होते घरातून . "...." साहेब कसे आहेत ?"

" पाय अडकला होता सीट खाली . पूर्ण मोडलाय . ..कदाचित अँप्युट करावा लागेल . डाव्या मांडीत रॉड टाकावा लागेल . आणखी उजव्या हाताची बोटं पण..." 

" आयुष्य सरळ का नाही जात आनंद ? हे सगळं काय घडतंय ? " 

" संकटं आले ,पराभव होतोय म्हणून कुणीच हारत नसतं ग , आपण हारतो तेव्हा , जेव्हा प्रयत्नच सोडून देतो . आपण तर अजून प्रयत्न सोडलेले नाहीत न ?" 

डॉ . च्या म्हणण्यानुसार साहेबांना जीवाचा धोका न्हवता ,पण बराच काळ लागणार होता सगळं सुरळीत व्हायला .तेही एक पाय गुढग्यापासून नसतांना . किमान दोन आठवडे दवाखान्यात काढावे लागणार होते . 

आनंद मुंबईलाच थांबला . कंपनी ने 'वास्तू' हे पाच टॉवर्स आणि दोनशे फ्लॅट चे चॅलेंजिंग प्रोजेक्ट हाती घेतले होते .ते सगळं आता आनंद बघणार होता .

  *****  " हॅलो आनंद ! त्या  ' दुबई सखी ' ह्या खास महिलांच्या टूर साठी कैलास आणि  भावना सोबत मनू ला पाठवू का ? " 

" सायली , तू ऑफिस मध्ये ? Thats ग्रेट !!! रोहित काहीच बोलला नाही . ओह माय गॉड !!! " 

" मी GIBS सोडली आनंद !! आता फक्त  AT&T "

"...........शब्द अडकलेत ग घशात ! " 

  " तुझ्या फक्त  दोनच ओळीच ऐकव आनंद , बाकी शब्दांची दाटी कशाला ?" 

     इन  अटके हुये लब्जो को 

      ख्वाबो मे लिपट के सोने दो 

       आजाएंगे सिरहाने 

        तो लोरी गाके सुला देना ।  

तिच्या डोळ्यातून खळकन दोन थेंब खाली ओघळले . 

  आनंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने धडाधड  यशस्वी टूर्स ची मालिकाच सुरू केली . लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता . सायली ला मान वर करायला फुरसत नव्हती . 

आनंद शी सतत सल्लामसलत होत होती . 

मोकाशी कन्स्ट्रक्शन नि आपले अर्धवट राहिलेले  ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केले होते . सोबत पपांची अतिशय काळजी पण घेतली होती .

साहेब व्हील चेअर वर सगळी कडे फिरून आनंदाने सगळे बघत होते  . 

आपल्या मुलाचा त्यांना प्रचंड अभिमान वाटत होता . 

    सायली ऑफिस मध्ये असतांना बाबांचा फोन आला . सायली , कमालच झाली ग , मोकाशी साहेबांचा फोन आला होता . आपल्याला सगळ्यांना खूप आग्रहाचे आमंत्रण आहे , मुंबईला बोलावलंय . 

" अपमान करायला ? "

" नाही ,  ' वास्तू ' चे  हस्तांतरण आहे , मोठी पार्टी आहे म्हणे . आनंद तुला बोलला नाही ?" 

" नाही , पण जाऊया आपण ." 

***********  ' वास्तू ' चे दोनशे कुटुंब , संपुर्ण टीम ,आनंद आणि साहेब 

उपस्थित होते . सगळ्या टॉवर्स ला सुंदर रोषणाई केली होती . आनंद नुसता बेचैन झाला होता . हे असं ह्यापूर्वी कधीच वाटले नव्हते त्याला . त्याची नजर वारंवार प्रवेशद्वाराकडे जात होती . इतका काळ दाखवलेला संयम आज वाकुल्या दाखवत होता .

आणि समोरून सायली चे कुटुंब आले .

तिने खास गर्द निळी पैठणी आणि मोत्याचे माफक दागिने असा साधा पण आकर्षक पेहराव केला होता . 

साहेब स्वतः समोर आले . त्यांनी हात जोडून आई बाबांचे स्वागत केले . 

" झालं गेलं माफ करा ..

" अरे !! साहेब !! नमस्कार नका करू "

      आनंद नि मागच्या मागे सायलीला ओढले , आणि कनातीच्या मागे घेऊन गेला . 

" AT & T ची मालकीण शोभतेय अगदी !! पेशवाईण कुठली !!" 

" ........"

" वर बघ न सायली . "

" तुझे अडकलेले शब्द माझ्याकडे पाठवलेस ना ? मग कसे बोलणार ?" 

दोघेही मनमोकळे हसले .

.....साहेब ( व्हील चेअर वर ) , आई , बाबा आणि मनू डायस वर उभे होते . 

" नमस्कार मंडळी .  ' वास्तू ' हे माझे स्वप्न माझ्या मुलाने , आनंद ने पूर्ण केले . आणि आनंदचे स्वप्न सायलीने वेगळ्याच उंची वर यशस्वीपणे नेले . 

मी  दोघांना विनंती करतो की त्यांनी ही फीत कापून ' वास्तू ' चे शुभ हस्तांतरण करावे , आणि पहिल्या फ्लॅट च्या किल्ल्या त्या कुटुंबाकडे द्याव्यात .

      एकच टाळ्यांचा कडकडाट झाला .

जोडी खूपच छान दिसत होती . 

आई न बाबांच्या चेहेऱ्यावर आनंद मावत न्हवता . 

बाबा नि साहेब पुढे आले . त्यांनी आनंद चा हात सायलीच्या हातात ठेवला ......सायली लाजली ...

आणि मनू ने एक कडक शिट्टी मारली .

" काय मालकीण बाई , खुश ?"

 सायली म्हणाली ,

" सावली कधी बोलते  का ? "

  आणि त्याने खांद्यावर हात टाकून प्रेमाने तिला जवळ ओढले .

( समाप्त )

✍️ अपर्णा देशपांडे

वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

ही कथा वाचून पहा.

👇

प्रश्न






3 Comments

  1. सावली, खूपच सुंदर, अप्रतिम कथा

    ReplyDelete
  2. खूप सुंदर कथानक

    ReplyDelete
  3. छान होती कथा

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post