तिची लढाई

 तिची लढाई !!!


लेखिका - चित्रा अविनाश नानिवडेकर 


आज शेवटचा तास मोकळाच असल्याने अनुप्रिया मनातून थोडी आनंदली.आज आबासाहेब तिला घेऊन राजेंकडे जाणार होते.हे अठरावे स्थळ.तिला सुद्धा आता ह्या सगळ्याचा उबग आला होता.पण मन नावाचं अजब रसायन पुन्हा पुन्हा उसळी मारून जीवनाकडे खेचून घेतच असतं ना. लहान सहान गोष्टीतून सकारात्मक सिग्नल शोधत असतं.सकाळपासून सगळ्या गोष्टी मनासारख्या होत होत्या.वेळेवर बस मिळाली. महाविद्यालयात वेळे आधीच पोहचली.तिसऱ्या वर्षाच्या मुलांची आज टेस्ट होती.चक्क मुलांनी लौकर  वेळेत संपवली. डिम्पल तिची मैत्रीण तिच्या साठी आवडती भाजी भरली वांगी घेऊन आली.ह्या सगळ्याच्या आधी मनभर पसरलेला रमण रानडेचा चेहरा डोळ्यापुढून जात नव्हता.काल आबासाहेबांन नी सगळ्यांना फोटो  दाखवला.साहजिकच कनूने; तिच्या बहिणीने आईच्या हातून खेचून घेतला.आणि म्हणाली ‘’आबा काय करतो हा रम्या?’’ आपल्याला अस्सा राग आला होता.भले त्याच्याशी काही नातं जडो वा न जडो असं बोलावं? पण कनूची सवयच आहे सगळ्या गोष्टीत असे वैगुण्य काढायची.


‘’बेटा बँकेत आहे. आई आणि तो दोघेच असतात.वडील अपघातात गेले.वडिलांच्या जागेवर लागलाय.घरची परिस्थिती बेताची आहे पण मुलगा उमदा वाटला.’’आबा शांतपणे म्हणाले.


‘’तुम्हाला काय माहिती?ते परांजपे काका तुम्हाला काहीतरी सांगत असतात  आणि तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवता.मुळात कोणी अव्यंग मुलगा अनु सारख्या अपंग.....सॉरी अनु...तुला दुखवायचा हेतू नाही माझा पण तू योग्यवेळी जागी व्हावीस म्हणून सांगतेय;का तयार होईल? काहीतरी मागणी केलीच असणार हो न आबा?’’आबांनी चपापून कनुप्रिया कडे पहात अनु ला म्हंटले. ‘’बेटा अनु तिच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस मी स्वतः रमण शी बोललोय.तो मला उदार विचारांचा वाटला.आईपण एकदम साधी आहे.’’


‘’पण आबा त्याचा पत्ता पाहिला काय लिहिलाय तो? फडके चाळ.चाळीत आपली अनु काय नळावर भांडी घासणार?’’


‘’बर झालं तू हा विषय काढलास. मालूss तू पण बाहेर ये मला तुम्हाला महत्वाचं सांगायचय.हे बघा आपला  ठाण्याचा ब्लॉक मी अनूला देणार आहे.त्याला लिफ्ट आहे आणि तिच्या कॉलेज पासून तो जवळ आहे.त्याची प्राथमिक रक्कम मी भरलीये.उरलेली अनु आणि तिचा नवरा तिच्या पगारातून भरेल.तुमचे काय मत असेल ते आत्ताच सांगा.’’


कनुप्रियाने तोंड वाकडे करत म्हटलं. ‘’अच्छा म्हणून रमण तयार झाला लग्नाला तरीच म्हटलं…!!’’अनुच्या पायांकडे पहात म्हटलं. तिच्या पुढे हात जोडत मालुताई म्हणाल्या 


‘’किती दुस्वास करशील माझे बाई...अग आज अनु च्या जागी तू असू शकली असतीस.तुम्हा दोघींना सारख्याच विषाणू मुळे ताप आला होता.नशिबाने तू बरी झालीस आणि ती ह्यात सापडली.ह्यात तिचा काय दोष? तिला बिचारीला आधीच सगळ्या हौसेला मुरड घालावी लागतेय.कथ्थकमध्ये अव्वल होती हे आठवतेय न तुला?उलट तुलाच सकाळी उठायचा कंटाळा म्हणून डान्स क्लास ला जायचे नव्हते.पण अनु अपंग झाल्यावर मात्र हट्टाने क्लास लावून तिच्या पुढे मोरा सारखी नाचत असायचीस.कोणत्या जन्माचा सूड घेतेस ग तिच्यावर?तुला सायन्स ला जायचे होते कारण डॉक्टर नाहीतर इंजिनीयर होऊन नाव कमवायचे होते.तुझ्या पेक्षा जास्त मार्क्स असूनही तिने प्रक्टिकल ला उभी राहू शकणार नाही हे कारण सांगून तुझा मार्ग मोकळा केला.तेव्हाच ह्यांनी आणि मी ठरवले होते अनु साठी आपल्या हयातीत सगळ्या सुख सोयी द्यायच्या.’’


‘’आणि म्हणूनच आम्ही तिच्यासाठी अव्यंग मुलगा बघतोय समजलं? ह्या पुढे अनुसाठी जे काही करू त्यात तू अजिबात पडायचे नाही.’’आबांनी पण मालुताई ची री ओढली.त्यावर स्पोर्ट्स शूज चढवत पाय आपटत कनुप्रिया म्हणाली ‘करा काय वाट्टेल ते करा पण माझे लग्न सुद्धा तेवढ्याच थाटामाटात झाले पाहिजे हे विसरू नका म्हणजे झालं.’’आत्ता अनुला त्यांच्याकडे जाताना हे आठवलं.


रमण काळासावळा पण सुदृढ बांध्याचा निरोगी तरुण होता..चेहऱ्यावर डाग,आणि तांबारलेले डोळे पाहून खरे तर अनु थोडी नर्व्हस झाली.पण बोलण्यात मात्र कमालीची नम्रता होती. आई खूपच साध्या वाटल्या अगदी आपुलकीने बोलत होत्या.रमण ने नोकरी बद्दल काही प्रश्न विचारले.आईनेच पोहे चहा आणले पण अनुने तत्परतेने कॅलीपर सांभाळत सगळ्यांना चहापोहे दिले. परांजपे काका त्यांना सांगत होते,अनु कामात एकदम चटपटीत आहे.सगळा स्वयंपाक करते.सतत काम करत असते.आणि नोकरी सांभाळून घरचे सगळे तीच बघते. अनुचे खूप कौतुक केले.जाताना रमण त्यांना सोडायला चाळीच्या बाहेर सुद्धा आला.आबा आणि काका जरा पुढे झाले तेव्हा हळूच कानाशी पुटपुटला ‘केस किती छान मोठे आहेत तुझे?गजरा का नाही माळलास?’


तिने नवलाने त्याच्या कडे पहिले तेंव्हा डोळाभर हसत त्याने मान डोलावली.आणि अनुच्या अंगावर जणू मोरपीस फुलले.एका अनोख्या नात्याने आपण आता ह्याच्या बरोबर बांधले गेलोय असे वाटले तिला.तिच्या आरस्पानी गालावर लज्जेची लाली फुलली.


अनुप्रिया आणि कनुप्रिया दोघी जुळ्या.आठवीत असताना दोघींना भरपूर ताप चढला.तो पोलियो चा होता.नशिबाने पोलीयोचा घाला अनु वर पडला.आणि कनू मात्र त्यातून बचावली.त्या घावाने अनुचे अवघे विश्वच इकडचे तिकडे झाले.अभ्यासात,खेळात नाचात सगळ्यात पुढे असणारी अनु एका धक्क्यात शिडीच्या तळाशी ढकलली गेली.पण आबासाहेब खचले नाहीत,त्यांनी तिला नॉर्मल मुलांसारखीच वाढवली.तिच्यात असलेले गुण हेरून तिला वेळोवेळी चित्रकला,गायन ह्याच्यासाठी प्रोत्साहित केले.अभ्यासात तर ती हुशार होतीच. एम.ए.झाली आणि ठाण्याच्या कॉलेजात फेलोशिप मिळाली.


आपल्या वैगुण्याचं तिने कधीच भांडवल केलं नाही. दोन बसेस बदलून कॉलेज ला जायची. तिला आई आबा म्हणायचे की तू रिक्षा लाव पण तिने ऐकले नाही. स्वतः दररोज चालत बस स्टॉप ला जायची. कॉलेज मध्ये सुद्धा सगळ्यांच्या आधी हिची हजेरी असायची. बरेचदा सहकर्मी खोटी कारणं देऊन कामं टाळायची पण अनू मात्र कामात कधीच चुकार नव्हती.त्यामुळे सगळे तिचं कौतुक करयचे.


कनू मात्र अनुला सगळे भाव देतात म्हणून तिच्यावर खार खाऊन असायची. चान्स मिळेल तेव्हा तिचा पाणऊतारा करत असे.पण अनु त्यावर काही बोलत नसे.तिने आपलं जग वेगळच आहे हे मान्य करून स्वतःला रमवून घेतले होते.तिला हल्लीच कळलं होतं की आपलं लग्न होणं शक्य नाही. लग्नाच्या बाजारात आपण खूप पोळणार आहोत. तीन चार ठिकाणी तिचं नांव आबांनी नोंदवलं होतं. पण अनुभव काही खास नव्हते. म्हणून शक्यतो ह्या भानगडीत पडायचेच नव्हते.पण आई, आबाना सतत काळजी वाटत असे कि आपल्या मागे तिचे कसं होणार?म्हणून तिचं न ऐकता तिच्या साठी धडधाकट जोडीदाराच्या  शोधात ते असायचे. तिची सर्वतोपरी काळजी घेऊ शकणारे घर तिला मिळावे.,तिला कसलीही तोशीस देणार नाही असा मुलगा त्यांना पाहिजे होता,त्या साठी त्यांनी खूप स्थळं बघितली.तिच्या भवितव्या साठीच त्यांनी एक घर सुद्धा घेऊन ठेवले होते. त्यांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला होता.त्यांचे स्नेही,मित्र त्यांना कितीतरी अपंग स्थळे सांगत पण ते मालुताईना म्हणत मी माझ्या हाताने मुलीचा हात अपंग मुलाच्या हातात कसा काय देऊ ग? त्यातल्या त्यात तरी धडधाकट असावा.आणि म्हणून ते जिकडे कोणाच्या ओळखीने एखादे मध्यम परिस्थितीचे जरी स्थळ आढळले तरी ते धाव घेत असत. 


    स्वतः अनुप्रिया मात्र अगदी समंजस विचारी झाली होती.ती मुळात अशी नव्हती.तिला सुद्धा इतर मुलींसारखी तरल,मुलायम सोनेरी दुनियेत विहरायला आवडले असते.पण ज्या दिवसापासून तिच्या पायात कॅलिपर चढले त्या दिवसापासून तिच्या आयुष्याची लढाई स्वतंत्रपणे सुरु झाली.तिने बहिणीला तर मनातून कधीच माफ करून टाकले.तिची आणि आपली आता बरोबरी होणार नाहीच.समाजातील लहानसहान बाबतीत तिला जो त्रास व्हायचा तो आईआबांना सांगून प्रथम ती खूप रडायची.शाळेत जाताना बस मध्ये अपंग सीट असायची पण मुलं हट्टाने तिला रडवण्या साठी त्यावर जाऊन बसायची.शाळेचा वर्ग दुसर्या मजल्यावर जायला लिफ्ट नाही.हळूहळू चालत जायला वेळ लागायचा म्हणून ती दहाच्या शाळेत नऊ पासून जायची.कॉलेजमध्ये तिच्या नोटसवर सगळ्यांचा डोळा असायचा पण गॅदरिंग साठी तिचे मात्र कोणी नांव घ्यायचे नाही.सार्वजनिक ठिकाणी बाथरूममध्ये जायला,पिरीयेड च्या वेळेस तिला कंपनी द्यायला कोणाला विनंती करताना तिला एवढी लाज वाटत असे.पण तिने सगळ्या आघाड्यांवर हळू हळू स्वतःला सिध्द केलं.ती जेवढी आत्मनिर्भर होत गेली कनुप्रियाला ह्याचाच त्रास होत असे.


  आत्तापर्यंत अनुच्या लग्नाचाच विषय घरात जोरदारपणे निघत असे.तिच्याच वयाची शिकलेली,सुंदर,एका मोठ्या कंपनीत काम करणारी म्हणून खरेतर कनू साठी स्थळे बघायला पाहिजेत.पण आबांना अनुचीच काळजी असायची.म्हणून कनू सगळा राग अनु वर काढायची.अनु बऱ्याचदा आईला विनवत असे की तुम्ही माझा विचार सोडा ह्या जगात अपंगत्व म्हणजे उणेपण आहे.कोणीच त्याकडे डोळसपणे पहात नाहीत.त्यांच्यावर एकतर कीवेचा वर्षाव नाहीतर दया दाखवतात.कोणीही सहानुभूती दाखवत नाही.तिने आपल्या सारख्या दिव्यांग व्यक्तींचा एक गट"दिव्य प्रभात "म्हणून शोधून काढला.सुट्टीच्या दिवशी त्यांच्यात काम करायला सुरुवात केली होती. तिकडे बरीच लोकप्रिय होत चालली ती. दिव्यांग मुलांचे कवि संमेलन, लहान सहान स्पर्धा, कुठे जवळपास सहली नेणं असे उपक्रम" दिव्य प्रभात"तर्फे होत ती आवडीने त्यात सहभागी होत असे. स्वतः सोमनाथ काळे आणि त्यांची बायको समिक्षा विकलांग होते.


अनु आई आबांना त्यांच्या कार्याबद्दल भरभरून सांगत असे जेणेकरून आपल्या साठी कोणी अपंग मुलगा बघितला तरी चालेल…सोमनाथ जसे समीक्षा ची आणि संस्थे ची काळजी घेतात तसंच कोणी घेईल की माझी काळजी. अन्यथा  का माझ्या लग्नाच्या मागे लागता?मी समर्थ आहे एकट्याने निभावायला.


बऱ्याचदा ती म्हणे "प्लीज तुम्ही कनुच्या लग्नाचं मनावर घ्या.हे आता रानडे कडचे शेवटचे स्थळ.ह्या पुढे मी आज्जीबात तुमचे ऐकणार नाही.खरे तर माझे कोलेज, ‘दिव्य प्रभात ’ संस्थेचे काम हेच माझ्यासाठी खूप आहे.’’


पण शेवटी आई आबांपुढे तिचे थोडंच काही चालणार होत.नशिबाने रमण कडून होकार आला.पुढे सगळ्या हालचाली वेगाने झाल्या.अनु तर जणू सातव्या अस्मानावर तरंगत होती. आपल्या आत्तापर्यंत सोसलेल्या वेदने वर फुंकर घालायला जणू देवाने रमणला धाडले असेच तिला वाटू लागले होते .रमण अगदी दररोज तिला संध्याकाळी फोन करायचा.त्या दोघांनी आईआबा बाहेर असतील ती वेळ साधली असल्याने ह्या बद्दल तिचे गुपित कोणाला समजलं नव्हते.साखरपुडया साठी खरेदी करायला ती आणि कनुप्रिया रमण बरोबर गेली तेंव्हा त्याच्या बोलण्याची भुरळ कनुला सुद्धा पडली.घरी येऊन अनुला ती म्हणाली  ‘’तसा बरा आहे,निदान मला वाटलेलं तसा मतलबी नाहीये.’’अनुला खूप बरं वाटलं.


आज आईआबा बोलावणी करायला गेलेत.कनू सुद्धा पार्लरमध्ये गेलीय.अचानक रमण ला दारात बघून अनूला काही सूचत नव्हतं.त्याला चहा देताना सुद्धा ती त्याच्याकडे न बघताच बोलत होती.शेवटी त्यानेच तिचे हात हातात घेत म्हटले ‘असं माझ्याकडे न बघतच संसार करणार का?’


तिने मानेने नाही म्हंटल.तशी तिची हनुवटी उचलून तिच्या डोळ्यात पहात तो म्हणाला ‘’अनु...डोळे उघड..हे बघ मी मी आज मुद्दाम तू एकटी असताना आलो.खरे म्हणजे त्या दिवशी खरेदीसाठी बाहेर गेलो तेव्हाच मला तुला काही सांगायचं होतं..पण तुझी बहिण सतत आपल्या बरोबर होती.’’


अनूच्या छातीत धस्स झाले आता काय ऐकावं लागणार?आत्तापर्यंत खूप नकार पचवले. पण ह्या वेळी तसे काही घडलेतरी नव्हते.आपले अपंगत्व तर ह्याच्या समोर आहे,आणि ते स्वीकारूनच ह्याने आपल्याला इतके पुढे आणलेय आता काय?काय एवढं सांगायचं ह्याला? ह्याचं आधीच प्रेम प्रकरण? असेना का…एवढा सुदृढ आहे. लघवी बोलणं आहे म्हणजे नक्कीच एखादे प्रकरण होऊन गेलं असणार…हरकत नाही. आपण एवढ्या मोठ्या मनाच्या आहोत. पण…आपल्याशी मात्र बेईमानी खपवून घ्यायची नाही. तसं काही असेल तर…भिडभाड न ठेवता लगेच माघार घ्यायची.


एव्हाना तिच्या मनाची तयारी झाली होती.फक्त काय कारण सांगतोय ते ऐकायचे होते.डोळे मिटून घेतले तिने.पण…पण तो अचानक तिच्या अगदी समीप आला. त्याने तिच्या कपाळावर आलेल्या केसांच्या बटा आपल्या बोटाशी गुंडाळत तिच्या केसांशी खेळत एका हाताने तिला जवळ ओढले.ह्या जवळिकीची कल्पना नसल्याने ती त्याच्या अंगावर जवळजवळ कोसळली तशी त्याने आवेगाने तिला करकचून जवळ घेत म्हटले... ‘’अनु मला लग्नाच्या आधी हेच टेस्ट करायचेय की...की आपल्यात ‘तसे’ काही होऊ शकते की नाही.तुला…तुला कळलं ना मला काय म्हणायचं ते? "तिच्या खांद्या वरची ओढणी काढत त्याने तिच्या ओठाकडे मोर्चा वळवला आणि घोगऱ्या आवाजात म्हणाला "अनु…आज मी म्हणूनच ठरवून आलो.’’ ती धडपडून उठत तिरस्काराने म्हणली 


‘’शी!! लाज नाही वाटत असे बोलायची तुम्हाला?’’


‘’लाज कसली अनु?तू आता माझीच आहेस.’’त्याच्या डोळ्यात आता पुरेपूर वासना उतरली होती.ती त्याच्या पासून दूर झाली मात्र त्याने तिच्यावर जबरदस्त पकड ठेवत म्हटलं ‘’धडपडू नकोस कोणी नाहीये घरात आणि तुला पळता येत नाही हे चांगलेच ठाऊक आहे मला.’’पण अनुच्या प्रसंगावधानी मनाने कोपऱ्यातल्या कुबड्या नजरेने हेरल्या आणि भिंतीशी सरकत सरकत तिने त्या ताब्यात घेत जोरात त्याच्यावर उगारत म्हंटले ‘दूर हो रमण मी....काहीही करू शकते,चांडाळ माणसा तुझ्या धडधाकट मनात केवढं अपंगत्व भरलेय…शीss!!थू....मी थुंकते तुझ्या सारख्या भेकडावर.जा जाऊन सांग  तुझ्या समाजाला एका कुबड्या अपंग मुलीने नाकारलं तूला.’’ 


आतल्या खोलीत जाऊन तिने आतली कडी लावून घेत जोरजोरात म्हटलं चालता हो माझ्या घरातून मी हे लग्न मोडतेय’’


घरी आल्यावर आई, आबा आणि कनू हयांना हा प्रकार सांगताना अनुला अपमानाने इतके रडायला येत होतं.आत्तापर्यंत तिच्यावर खूप प्रसंग आले होते.पण हा म्हणजे अस्तनीतला साप निघाला.ह्याने काय माझा आयुष्यभर सांभाळ केला असता?माझ्या भावनांना पायदळी तुडवून संसार केला असता.


 आई च्या कुशीत भरपूर वेळ रडून तिने आपल्या भावनांचा निचरा केला आणि दृढ निश्चयाने उठत आबांना म्हणली, ‘’बस्स झालं आबा आता माझा लढा मीच लढणार;जगाच्या पाठीवर जर कोणी सत्पुरुष माझ्यासाठी जन्मला असेल तर योग्य वेळी मला तो मिळेलच.मग तो अपंग,मुका बहिरा,दिव्यांग कसाही असला तरी चालेल.पण माझा लढा मीच लढणार.’’


आबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत आपले डोळे टिपले.



  चित्रा अविनाश नानिवडेकर 


  वरील कथा चित्रा नानिवडेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

तुम्हाला ही कथा ही आवडेल.

👇

मोल



Post a Comment (0)
Previous Post Next Post