पूर्णांगिनी

        पूर्णांगिनी

✍️ स्मिता मुंगळे 

    "अग किती वेळा आत बाहेर करतेस मधुरा?चल लवकर.मुलं गाडीत बसली सुद्धा."धीरज म्हणाला.तसे "अरे,आलेच.काही राहिलं नाहीये ना ते बघतीये,"मधुरा उत्तरली.
    खरे तर हे नेहमीचेच होते.माहेरी आल्यानंतर सासरी निघताना मधुराचा पाय निघत नसे.गेल्या दोन वर्षात तर तिची आई गेल्यापासून वयोमानानुसार थकलेल्या वडिलांचा निरोप घेणं तिला खरंच अवघड जात असे.संवेदनशील मनाची मधुरा अशा वेळी खूप भावनिक होऊन जाई.
     आईच्या मागे दादा वहिनी खरं तर तिच्या बाबांची खूप काळजी घेत असत.पण ते त्यांच्या व्यापात आणि तिची भाचे मंडळी आता मोठी झाली होती. शाळा,कॉलेज, क्लास यात ती व्यस्त असत.त्यामुळे बाबांना अगदीच एकटेपण आलं होतं. पण मधुरा तरी काय करणार?ती देखील तिच्या संसारात पुरती गुंतली होती.
      यावेळी ती खूप दिवसांनी माहेरी आली होती. तेदेखील दादा म्हणाला,"एवढी का ग बिझी झाली आहेस?ये ग चार दिवस मुलांना घेऊन.बाबांनाही तेवढंच बरं वाटेल."बाबांच्याही हल्ली तब्येतीच्या काहीबाही तक्रारी सुरू असत त्यामुळे ते मधुराकडे जाऊ शकत नव्हते.म्हणून मग मुद्दामच ठरवून ती धीरज आणि दोन्ही मुलांना घेऊन माहेरी आली होती.
       वहिनीदेखील म्हणाली होती,"अग, आता अविधवा नवमी आहे.तशीही त्यादिवशी मी एक सवाष्ण जेवायला बोलावणार आहे,जर तू आलीस तर बरेच होईल ग.आई खरंच भाग्यवान, त्यांना अहेवपणी मरण आलं,असं सगळ्यांच्या नशिबात नसतं."
    वहिनी बोलत होती आणि मधुरा शांतपणे ऐकत होती.तिला वाटलं काय असतं हे 'अहेवपण'? आणि का स्त्रिया सवाष्ण जाण्याची इच्छा धरतात? या सगळ्या विचारांबरोबर मधुराला क्षणोक्षणी आईची आठवण येत होती.खरे तर आई बाबांच्या वयात बरेच अंतर होते.आई बाबांपेक्षा वयाने बरीच लहान होती.त्यात बाबांच्या तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी होत्या.आई कायम कामात व्यस्त.कधी विश्रांती म्हणून नाही की कधी रिकामे बसणे नाही.सतत काही ना काही काम करत राहणार.मधुराने आईला फोन जरी केला तरी ती, "बाबांची तब्येत कशी आहे?"असेच विचारी.आई ठणठणीत असणारच हे जणू गृहीत धरलेलं.मात्र घडलं वेगळंच.आईच्या तब्येतीला दृष्ट लागली आणि बघता बघता दोन महिन्यात आई हे जग सोडून गेली.मधुराला वाटे,तरी बरं... आईच्या आजाराचे शेवटच्या दोन महिन्यात तरी निदान झाले.नाहीतर जर अचानक आई गेली असती तर तो धक्का ती स्वतःच काय पण तिचा दादा,बाबा यांना देखील पचवणं अवघड झाले असते.कारण आई आपल्यासाठी कायम असणारच हेच नकळत गृहीत धरले होते.
     यावेळी मात्र बाबा खरंच खूप थकले असल्याचं तिला जाणवलं.लेकीला खूप दिवसांनी बघून त्यांचे डोळे भरून आले.नाही म्हणायला आता वरचेवर व्हिडीओ कॉल होत असे पण त्यातून स्पर्श थोडीच अनुभवता येतो?
     तीन चार दिवस सगळ्यांच्या सहवासात,वहिनीच्या हातचे नवनवीन पदार्थ चाखण्यात मजेत गेले.रात्री जागून गप्पाचे फड रंगत होते.माहेरपणाचे सुख ती उपभोगत होती पण काहीतरी कमी सतत जाणवत होती.दादा भाचेमंडळींचे लाड करण्यात रमला होता.त्यामुळे मुलं एकदम खुश होती.ती आली म्हणून गल्लीतल्या कोणीतरी वरचेवर येऊन जात होत्या.पण तरीही त्या भरल्या घरात आईची उणीव क्षणोक्षणी तिला भासत होती. त्या वास्तूमधल्या प्रत्येक वस्तूमध्ये तिला आईचं अस्तित्व जाणवत होतं.प्रत्येक गोष्टीची किती हौस असायची आईला.
      हॉलपासून ते स्वयंपाकघरापर्यंत सगळीकडे आईचा हात फिरलेला असे.अतिशय काटकसरीने संसार करत आईने हे घर उभे केले होते.कितीतरी माणसं तिने जोडली होती. या सगळ्यामध्ये स्वतःकडे मात्र तिचे दुर्लक्ष झाले.शरीर आपल्याला वेळोवेळी सूचना देत असते मात्र आपणच त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते फारसे मनावर घेत नाही असे तिला वाटले.आईने तरी दुसरे काय केले?आजही या विचारासरशी तिला आईचा खरचं राग आला आणि अपराधी देखील वाटलं.आपण आईकडे लक्ष द्यायला कमी पडलो का,हा प्रश्न हल्ली तिला छळत असे.आईने स्वतःकडे असे दुर्लक्ष का केले? या प्रश्नाचे उत्तर आता कधीच मिळणार नाही हे देखील मधुराला माहिती होते.
      "चला,निघायचे का?घेतले ना सगळे,काही राहिले नाही ना?" या धिरजच्या प्रश्नाला नक्की काय उत्तर द्यावे हे तिला कळेना.मधुराला वाटले,याला काय कळणार माझे इथे काय विसरले आहे ते?रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पांनी मन हलकं झाले असले तरी आता निघताना मात्र तिचे पाय जड झाले होते.ती परत निघाली म्हणून बाबा सारखे डोळे पुसत होते आणि खुणेनेच लवकर परत ये असे बजावत होते.बाबांना नमस्कार करताना त्यांच्याकडे बघण्याचे धाडस मधुराकडे नव्हते.कोण जाणे आत्तापर्यंत धरून ठेवलेला भावनांचा बांध फुटला तर?
       निघताना तिने आईच्या फोटोला नमस्कार केला तेव्हा तिला आईच्या डोळ्यात करुण भाव जाणवले.आई असताना देखील मधुरा सासरी निघाली की तिला आईच्या डोळ्यात कारुण्य दिसायचं.ती गमतीने म्हणायची देखील की माझी आई म्हणजे कारुण्याचा पुतळा आहे.आज जेव्हा ती आईच्या भूमिकेत आली आहे तेव्हा ती त्या भावना समजू शकत होती.
       निःशब्दपणे तिने सर्वाचा निरोप घेतला.काही क्षण दादा,वहिनीही इमोशनल झाले होते.धीरजने उगाच काहीतरी विनोद करून वातावरणातील ताण हलका केला.मुलं देखील गप्पगप्प होती.आईच्या डोळ्यातील अश्रू बघून त्यांना नक्की काय करावं हे कळत नव्हतं.
      कोपऱ्यावरच्या वळणावर गाडी वळेपर्यंत मधुरा हात हलवून निरोप देत होती.खरे तर डोळ्यातील अश्रूंच्या दाटीमुळे सगळे चेहरे तिला अस्पष्ट दिसत होते. गाडी मुख्य रस्त्याला लागली आणि एवढा वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला.खूप वेळ ती हुंदके देत राहिली.लहानपणीच्या,आईच्या,बालमैत्रिणींच्या कित्येक आठवणी मनात फेर धरू लागल्या.तिच्या मनात आलं,किती काय काय मागे सोडून आपण सासरी जातो.आपला संसार बहरतो तसे माहेरची ओढ नकळत कमी होते पण त्याच वेळी आपले आई वडील हळूहळू वृद्धत्वाकडे झुकू लागतात आणि त्यांची लेकीला,नातवंडांना भेटण्याची इच्छा प्रबळ होते.आपलेही मन पुन्हा आई बाबांकडे धाव घेऊ पहाटे पण वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आपण मात्र त्यांना म्हणावा तसा वेळ देऊ शकत नाही. त्याक्षणीही तिला नुसत्या विचाराने देखील अपराध्यासारखे वाटले.
       नेहमी अखंड बोलत राहणारी मधुरा आज एकदम गप्प आहे याचं धीरज आणि मुलांना आश्चर्य वाटले.तिचा मूड बदलण्यासाठी धीरज उगाच काहीतरी विषय काढून बोलत होता. मधुराला हे सगळं कळत होते. शेवटी न राहवून ती धीरजला म्हणाली,"बसू दे ना मला शांत.तू कितीही काही बोललास तरी आत्ता मी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये आणि हसणार तर अजिबातच नाही.मला थोडा वेळ दे रे.
       घरी पोहोचल्यावर माहेरच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी ती उगाच काहीबाही काम करत राहिली."फक्त खिचडी कर,तू पण दमली आहेस प्रवासाने",धीरज म्हणाला होता तरी तिने साग्रसंगीत स्वयंपाक केला.रात्री उशिरापर्यंत ती स्वयंपाकघरात वेळ घालवत राहिली.शेवटी धीरज म्हणालाच,"मधुरा, बास. झोप आता."ती म्हणाली,"तू झोप,मला आज झोप येईल असे वाटत नाही."रात्री बराच वेळ ती फक्त कूस बदलत राहिली.पहाटे कधीतरी तिला झोप लागली.
      सकाळी उठून तिचा रोजचा दिनक्रम सुरू झाला पण सगळी कामे आज यांत्रिकपणे होतायेत हे तिला जाणवत होते. शरीराने ती तिच्या घरी असली तरी मन माहेरीच धाव घेत होते. तिला वाटले,फोनवर आपण सगळ्यांची चौकशी करतो तेच ठीक आहे,'दृष्टीआड सृष्टी'.तिकडे जाऊन आलो की मात्र थकलेले,एकाकी पडलेले बाबा,आईविना पोरकं दिसणारे घर या गोष्टी सदैव डोळ्यासमोर येत राहतात आणि अस्वस्थ होतो आपण.मुलं दिवसभर शाळेत आणि धीरज ऑफिसमध्ये त्यामुळे तो पूर्ण दिवस तिने एकटीने अस्वस्थतेत घालवला. संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर तिला थोडं बरे वाटले.धीरज रात्री उशिरा घरी आला.तिची अस्वस्थता त्याला जाणवत होती तरी तो काही बोलला नाही.
     रात्रीचे जेवणही तसे शांततेच पार पडले.बेडरूममध्ये झोपायला गेल्यावर मात्र धीरजने तिला जवळ घेत म्हणालाच,"मधुरा,का त्रास करून घेतेस स्वतःला? तुझ्या त्रास करून घेण्याने परिस्थिती बदलणार आहे का?तुझ्या अश्या गप्प गप्प राहण्याने मुलं बघ कशी कावरीबावरी झाली आहेत.अग, नवरा बायको मधलं कोणीतरी आधी कोणी नंतर जाणारचं आणि हे असंच असतं. हे मान्य करायलाच हवं.शेवटी प्रत्येकाचं नशीब असतं. आपण नाही ते बदलू शकत."
     धिरजच्या अश्या बोलण्याने दिवसभर विचार करून थकलेल्या तिच्या मनाचा आणि भावनांचा बांध सुटला.धिरजच्या मिठीत शिरत तिने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. बराच वेळ ती हुंदके देत होती.शांत झाल्यावर धीरजला म्हणाली,"तुला आठवतं, जेव्हा कॉलेजमध्ये असताना आपण प्रेमात पडलो होतो आणि एकमेकांशिवाय एक क्षणही मनात दुसरा विचार  नसायचा,विरहाची कल्पनादेखील सहन व्हायची नाही,रोज भेटलो,फोनवर तासन तास बोललो तरी मनाचं समाधान होत नसे.तेव्हा मी कायम तुला काय म्हणायचे आठवतं?"
     मधुराचा मनात नक्की काय चालू आहे याचा धिरजला अंदाज येईना.खरं तर ते दोघे प्रेमात पडले तेव्हाची एकमेकांच्या बोलण्यातली सगळी वाक्य दोघांना आजही तोंडपाठ होती.कधीतरी गमतीने ते एकमेकांना ते सवांद ऐकवतात देखील.पण आज ती नक्की कशाबद्दल बोलत होती हे त्याच्या लक्षात येत नव्हते.
     शेवटी न राहवून तो म्हणाला,"मधुरा,तुला नक्की काय म्हणायचंय ते स्पष्ट बोल."तशी ती ।म्हणाली,"धीरज,मी नाही जाणार तुझ्या आधी."
त्याला काहीच अर्थबोध होत नाही हे कळून ती म्हणाली,"नवीन लग्न झालं तेव्हा मी नेहमी तुला म्हणायचे ना की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार.मी तुझ्या आधी जाणार.वरचं तिकीट पहिलं माझं असणार.पण तेव्हा मी लहान होते रे.आता वयाच्या या टप्प्यावर मला लक्षात आले आहे की जरी दोघांपैकी कोणीतरी आधी जात असले तरी जर पुरुष मागे राहिला तर तो स्त्रीच्या तुलनेत जास्त एकाकी पडतो.खाण्यापिण्याच्या बाबतीत ती पूर्णपणे परावलंबी होतो.नवऱ्याच्या मागे स्त्री तुलनेने इतकी एकाकी होत नसावी असे वाटते.कारण घरकाम करण्यात,नातवंडे सांभाळण्यात,काही छंद जोपासत ती स्वतःला रमवून घेते.जोडीदाराची कमी तर तिला जाणवत राहतेच रे पण ती स्वतः स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी व इतरांसाठी करू शकते.पूर्वीच्या काळी विधवांना खूप त्रास सहन करावा लागे, केशवपनासारख्या अनेक त्रासदायक रूढींना समोर जावे लागत असे त्यामुळे 'अहेवपणी मरण' चांगलं असा समज रुढ झाला असावा.आपल्याकडे मोठ्या लोकांना नमस्कार केल्यावर सुध्दा महिलांना 'अखंड सौभाग्यवती भव'असाच आशीर्वाद दिला जातो. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.स्त्रिया शिकू लागल्या आहेत,स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.असे  कोणतेही  क्षेत्र नाही जिथे स्त्रियांनी आपला ठसा उमटवला नाही.पती निधनानंतर देखील त्यांच्या वरची पूर्वीच्या काळातील बंधन कमी झाली आहेत.ग्रामीण भागातही आता हा बदल हळूहळू का होईना होतो आहे. मग एवढं सगळं माहिती असूनही,आजूबाजूच्या पुरुषांची पत्नीच्या मागे होणारी अवस्था बघूनदेखील स्त्रियांनी अहेवपणी मरण येणं भाग्यच असतं असं का म्हणावं?
मी नाही रे तुला असे एकट्याला मागे ठेवून जाणार." तिच्या अश्या बोलण्यावर धिरजला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना.तो मधुराला केवळ शांत करत राहिला,बराच वेळ.
    रात्रीच्या निरव शांततेत मधुराचे शब्द त्याच्या कानात आणि मनात खोलवर रुतून बसले.बऱ्याच उशिरा मधुराला झोप लागली मात्र धीरज रात्रभर जागाच होता.मधुराच्या बोलण्याने त्याच्या मनात प्रचंड उलथापालथ झाली होती.तो कितीतरी वेळ शांत झोपलेल्या मधुराच्या निरागस चेहऱ्याकडे पहात राहिला.त्याच्या मनात विचार आला,किती खरंय ही म्हणते ते,प्रत्येक गोष्टीसाठी हिच्यावर अवलंबून असणारे आपण कसे राहू शकू तिच्याशिवाय?  नवऱ्याच्या मागे कित्येक स्त्रिया स्वतःच्या हिमतीवर नेटाने संसार करून मुलांना मोठं करतात हे आपण कित्येकदा पाहतो पण पुरुष मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर मनाने खचून जातो.
      धिरजच्या मनात विचार आला, कोणी पत्नीसाठी आर्धागिनी हा शब्द शोधला असेल?खरे तर ती पूर्णांगिनी आहे.तिच्यामुळेच तर आपल्या आयुष्याला आणि संसाराला पूर्णत्व येते.तिच्याशिवाय जगण्याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही.विचारांची वादळं मनात घोंघावत असतानाच पहाटे कधीतरी त्याला झोप लागली.
                       सौ.स्मिता मुंगळे.
        

वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


हे वाचून पहा.

👇

पारिजातक

    

    

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post