छबूताईंचा विडा

छबुताईंचा विडा!!

✍️ स्वाती शेंबेकर 


अगदी नावाप्रमाणे छबुच असणार्या आमच्या छबुताई भोळे, जराशा  वेंधळ्याच म्हणायला हरकत नाही. त्यात त्यांना कुणी , तुम्ही कित्ती छान दिसतय, म्हटलं की त्यांची गाडी  रूळावरून  जी घसरायची , ती बरीच फिरून यायची.
म्हणजे त्यांनी नेसलेली साडी कुणी दिली,  ती कितीवेळा धुतली, तिला इस्त्री कधी केली, नी ती गादीखालीच कशी राहिली. तिच्यावर अत्तापर्यंत कितीवेळा ब्लाऊज शिवले.  अस काहीबाही बोलत छबुताई विड्यावर जाऊन थांबायच्या.
अता छबुताईंचा विडा अमेरिकेत पण जाऊन पोचला हो.

अहो, कसं म्हणून काय विचारता??  छबुताईंची बहिण गंगूमावशी,  ती नाही का गेली अमेरिकेत. तेव्हा छबुताईंनी भाच्याला विडाच बनवून दिला.

अता छबुताई म्हणजे कोण?? असा प्रश्न तुम्हाला पडेलच ना??
तर, आमच्या छबुताई म्हणजे पणशीकरांच्या वाड्यावर पुढल्या बाजूने बोळकांडीतून डावीकडे गेलं की उजव्या दारात त्यांच बिर्हाड होतं बघा. बापरे पत्ता सांगतानाच मला धाप लागली. तर विडा कुटताना छबुताई दमत नसतील का हो?
पण विडा करावा तो छबुताईंनीच!!

अता वाडे गेले,  तिथे टोलेजंग इमारती आल्या. छबुताईंना पण चांगली मोक्याची जागा मिळाली.
पणशिकरांनी हो नाही म्हणताना बिर्हाडकरूंना झुकतच माप दिलं, अस छबुताई सांगत होत्या.
मला आपली बरं झालं, मी आणि छबुताईच काय ते पूर्वीच्या शेजारातले. बाकी सगळी मंडळी कुठेकुठे पांगली.
आमचे सोपाजी मागे उत्तर ध्रुवावर झेंडा फडकवायला गेले होते,  तेव्हापण छबुताईंनी विडाच दिला होता. थंड प्रदेशात तेवढीच रक्तात सळसळ!!

आमच्या शेजारी पणशीकर,  मागच्या बाजूला धूरी ,नी त्यांंच्या पूर्वेला दामोपंतांचा वाडा होता.
एकेका वाड्यात दहा तरी बिर्हाड, आणि पोरांचा हैदोस.
तो तर विचारायलाच नको. तेव्हा काय कोणाला बोर्डात येण्याची सक्ती नव्हती. रात्रीचं जेवण झालं की सगळा पोरवडा छबुताईंच्या घरी.
छबुताईंना विड्याची पानं पुसून देण्याच काम वाघू अण्णाचं.
आमचा वाघ्या घारा, गोरा नी शेंबडटच, पण त्याला सगळे वाघ्याच म्हणत. घारोळा ना तो, म्हणून!
वाघूने पानं पुसली की सुशी त्याला कात फासे आणि त्याआधी चुना मारायचं काम मी करी!
विड्याचं महत्व फार असतं म्हणे असं आमची दुर्गाआजी म्हणायची.
त्यात कायकाय हिशोबाने घालायच ते एक छबुताईच जाणत.
गौराई देवीचा विडा वेगळा अन महालक्ष्मीचा वेगळा.
असे कितीतरी विडे छबुताईंना अवगत होते .
त्रयोदशगुणी विड्याचं महात्म्य ऐकावं तर ते आमच्या छबुताईंकडूनच.
असा सर्वदूर किर्ती पसरलेला  छबुताईंचा विडा कसा करावा?? असे मी छबुताईंना एकदा विचारले.
मला वाटलं हल्ली सिक्रेट रेसिपी असते तसं त्यांच काही सिक्रेट आहे की काय ???...,विडा बनवण्याचं!!

पण आमच्या छबुताई थोड्या पाल्हाळिकच.
मला म्हणाल्या ,"सवडीनं ये. नाही तर ही आलीस की जाते जाते म्हणशील. "
मग मी एकदा सकाळी नाश्त्यालाच गेले छबुताईंकडे .
मला म्हणाल्या,"पोरी अग आमची पिढी निदान मायेने काही खाऊ घालेल, माया आहे म्हणून ये म्हणतेय. नाहीतर हल्ली पोरांना मोबाईलातनं डोकं वर काढायला वेळ नाही."
छबुताईंनी त्या दिवशी गरम उकड केली होती ताकातली. आणि पोह्याचा पापड भाजून त्यावर ती घालून दिली. अशी फर्मास लागली म्हणून सांगू.
पण अता मला विड्यात काय घालायच ते त्यांच्या तोंडून ऐकायचं होत .

छबुताईंना मधेच हरभर्याच्या झाडावर चढवावं लागे.  मग काय त्या खूषच!!  त्यांच बोलणं निरागस. त्या बोलू लागल्या की,  मला लहानपणीच्या बाहुलिची आठवण होई. तिला चावी दिली की ती हात एकमेकांवर आपटत गोल फिरू लागे. तसच काहीसं छबुताईंच होई. एकिकडे  हाताने भराभर  काम करताना त्या  पटापट बोलू लागत.
विड्याचे पान बनारसी, बंगाली, खायचे पान जे सहज घरात सावलीत वाढते,  अशा वेगवेगळ्या जातींचे असते, म्हणे .
छबुताईंचे यजमान कलकत्त्यात पण होते.  त्यामुळे बंगाली पान छबुताईंच्या मर्जीतलं.

छबुताई म्हणाल्या, " अग, ऐकतेस का??
विड्याची पान निवडताना हिरवा रंग पारखावा निरीक्षण केले की पक्व पान कोणते ते ओळखता येते. त्यांच्या शिरा बघून घ्याव्यात पानाची जात त्याची जाडी, त्याचा स्पर्श यावर त्यातले गुणधर्म अवलंबून असतात. "
अता मी परवाच गणपतीच्या पूजेला पान आणली तेव्हा पानं निवडताना किती कसरत करावी लागली. त्यात तिथे उडालेली झुंबड आणि वेळेचे नियोजन?? ते आठवून छबुताईंच्या या कसबाचंही मला कौतुकचं वाटलं.

घरी आल्यावर पानं धुवून पुसावीत व त्यांना तासभर उन दाखवावं. मग त्यांचे बारीक काप करून ते खलबत्त्यात कुटावेत. मिक्सर छबुताईंना मान्य नाही.
अता 10 पानांना दोन कानकोरणं भर कात व तीन कानकोरणं चुना! छबुताईंच्या सगळ्या पद्धती अजबचं. अता अलिकडच्या काळात अशी वजनमाप चालतील का?
ते झालं की चार काड्या केशर,  दोन वेलच्या, मग खमंग भाजून बारीक केलेलं सुख खोबरं!
गरम हवा असेल तेव्हा गुलकंद हवाच तो किती घालावा अस विचारताच छबुताई म्हणाल्या,   दोन खायचे चमच घाल.  अता प्रत्येक घरातला खायचा चमचा निराळा नाही का??


पण छबुताई म्हणतात, " अग मला  पारंपारिक पद्धतीच जमतात ग.  मन घातलं ना वस्तु करताना की झालं. मुलिंच हल्ली लक्षच नसत बघ, स्वयंंपाकात."
यावर मी काय बोलणार??
छबुताई वेलची का घालावी ते सांगत. केशर असेल तर वेलची नाही घालायची. एकतर वेलची घालावी नाहीतर केशर!!
10 पानांना दोन वेलच्यांचे दाणे!!
विड्याची पानं बाजूला करून बाकी सर्व मसाला कुटला की तो एकजीव करायचं काम छबुताई मन लावून करीत.


थोडक्यात विडा, चुना, कात हे महत्वाचे घटक, सुपारी घालायची ती बारीक कातरून!!! ती अडकित्त्यात धरायला पण कसब लागतं.
मग वेलची, केशर, गुलकंद, बाळंतशोपा, बडिशोप, आळशी हे घटक ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे.  तो संगतवार क्रम मी वहीतच लिहून घेतला.
खोकला, सर्दी वारंवार होत असेल तर ओवा आणि विडा हे जास्त गुणकारी, असं छबुताई सांगत.
थंडाई, पाकवलेल्या चेरी,  गुंजेचा पाला या हौशीच्या गोष्टी!! त्या ज्याने त्याने आपल्या मर्जीनुसार वापराव्यात, अस छबुताईंच म्हणण.
छबुताईंनी विड्याचा बोलबाला करत गाठीला चार पैसेही जमवले. मी गेले होते भेटायला तेव्हा त्यांनी मला हळूच किती पैसे जमले ते पण सांगितलं.  स्वकमाईचा आनंद काही वेगळाच. हे त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं.
त्या पैशाने त्या आपल्या छोट्या मोठ्या हौशी भागवतात.
एरवी वेंधळ्या वाटणार्या छबुताई पैशांची गुंतवणूक पण छान करतात.

कुठल्या बँकेत किती व्याज आहे, आणि  बायकांनी अडिनडीला पैसे कसे बाजूला ठेवावेत. ते छबुताई छान समजावून देतात.
अता मुलं, नातवंड यात छबुताई रमल्या आहेत. पूर्वीचे काटकसरीचे दिवस संपले. पण वेळ घालवायचं, संपर्काच साधन म्हणून छबुताई विड्याचा लघु उद्योग करतात.

आणि पुन्हा त्या गोष्टीवेल्हाळ, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा म्हणजे मनाला छान विरंगुळा!!

स्वाती शेंबेकर 

वरील कथा स्वाती शेंबेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post