सदर कथा माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.
मेघा-मल्हार भाग १
मेघा शांतपणे गॅलरीत उभी राहून रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आनंद घेत असते. हातात आलं घातलेला, वाफाळलेल्या चहाचा कप असतो. तेवढ्यात विज कडाडते, तशी आई तिला हाक मारते, "मेघा... ए मेघा... अगं बाहेर विजा चमकत आहेत, आत ये पाहू." बत्तिशी ओलांडली तरी आई साठी आपली पोरं लहानच असते, ती सहाजिकच आहे म्हणा.
मेघा आत येत, "अगं आई ! मी लहान का आहे आता, नको काळजी करू." आई तिची सुरू होऊन जाते, "मग काळजी करणारा शोध की आता, मी आणि हे किती दिवस पुरणार आहोत. यांना पॅरालिसीस झाल्यापासून धावपळ करणारं कोणीच नाही. लोकं तोंडाला वाट्टेल ते बोलतात की आम्हीच तुझं लग्न होऊ देत नाही."
आईला रडायला येतं, मेघा तिच्या जवळ जाऊन, तिला जवळ घेते आणि समजुत काढते, "आई अगं, लोकांना काय होतं बोलायला. ते तुम्हाला असं म्हणतात आणि मला काय म्हणतात माहिती आहे ? तुझ्या आई-वडीलांनी येवढं नवस करून जन्माला घातले आणि तु त्यांचा सांभाळ नाही करणार का ? तुझं लग्न झाल्यावर कोण पाहील त्यांच्या कडे ? तुच सांग आता की कोणत्या लोकांचे ऐकायचं, तुला बोलणाऱ्या की मला बोलणाऱ्या ?"
मेघा, "आई, आपण आपल्याला योग्य वाटेल तेच करायचं असं तुच शिकवलेस नं." आई दुजोरा देत, "हो गं बाळा."
मेघाला आईने बाळा म्हटलेलं खुप आवडतं, जगाच्या दृष्टीने मोठे झालो. पण आईने प्रेमाने बाळा म्हटले की कोणी तरी आहे अजूनही आपल्याला सांभाळायला, असं वाटून जातं. वडीलांची केविलवाणी नजर बरंच सांगुन जाते.
मेघा वडीलांजवळ जाऊन त्यांच्या आरामखुर्ची जवळ बसून त्यांच्या भोवती हात ठेवून त्यांच्या डोक्यावर डोकं ठेवून, "बी स्ट्रॉंग बाबा. सम थिंग गुड विल टर्न अप." बाबा मंदसे हसतात.
मेघा, "आई आणि बाबा, तुम्ही काळजी नका करू, जाईल मी उद्या शेखर सानेंना भेटायला. पण माझ्या सर्व कंडीशन्स् त्यांना मान्य असेल तर मी होकार देईल. ओ के."
आईची कळी खुलते, आज पहिल्यांदाच तिने कमीतकमी मुलगा पाहीला तरी होकार दिला. मुलगा तर नाही म्हणता येणार, विधुर आहे, लहान मुलगा आहे त्याला. मेघा साठी कठीण आहे, पण तिचं ठरलेलं आहे. त्याने जर आई-बाबां सोबत स्विकारले तरच ती मुलाला स्विकारणार.
मेघा आई-वडीलांची समजुत काढून तिच्या रूम मध्ये जाते. विचार करत असते, "हा सर्व खटाटोप समाजासाठी, लग्न नाही केलं तरी चालतं. पण लोकं भंडावून सोडतात. अक्षरशः ज्यांची लायकी पण नाही, ते सुद्धा अक्कल शिकवतात."
मेघा भूतकाळात शिरते....
एक काळ असा होता की आयुष्य नजर लागण्या ईतकं मस्त सुरू होते. नवसाची असल्या मुळे आई-वडीलांची लाडकी लेक, दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर, पुढे अभ्यासात पण फर्स्ट क्लास सोडला नाही.
अकरावीला ॲडमिशन झाली आणि सुरू झाले स्वच्छंदी कॉलेज लाईफ. युनिफॉर्म नसल्याने सगळ्या मैत्रिणी अगदी छान वेगवेगळ्या रंगांचे, फॅशनचे ड्रेसेस घालायच्या, जणू रोजच फॅन्सी ड्रेस स्पर्धाच. मला तर गोऱ्या रंगामुळे सर्व रंग शोभून दिसायचे. आधी शाळेत फक्त मैत्रिणीच होत्या, पण कॉलेज मुळे हळूहळू मित्र पण होऊ लागले. हळूहळू चार जणांचा मस्त ग्रुप झाला, चार जणांचे मस्त बॉंडींग जुळून यायचं.
त्यात होता मल्हार मोकाशी. सहा-दोन हाईट, जिममुळे मेंटेन शरीरयष्टी, गौरवर्ण. त्याच्या रूपावर भाळून तर मुली त्याच्याशी मैत्री करायला उत्सुक असायच्या. स्वभाव मनमिळाऊ आणि बोलण्यात हूशार, असं व्यक्तिमत्त्व ज्याला कुठे नाव ठेवायला जागा नव्हती.
तो ग्रुपमध्ये आल्यापासून इतर मुलींचा जळफळाट व्हायचा. हळूहळू मेघा आणि मल्हार अशी आमची छान केमिस्ट्री जुळून आली. मल्हार चे सारखं "मेघा.. मेघा" सुरू असायचे, मला चिडविणे, खोड्या काढणे अगदी माझ्या शिवाय त्याचे पान नाही हलायचे.
सगळ्यांना अगदी मला सुद्धा वाटायला लागलं होतं की मल्हारचे माझ्यावरच प्रेम आहे.
मेघा भुतकाळातुन बाहेर आली, विचार करू लागली कि मल्हार का दुर गेला ? बाबांना पॅरालिसीसचा अटॅक आल्यानंतर सर्व हळूहळू बदलत गेले. बाबांची नोकरी गेली, आर्थिक परिस्थिती ढासळली. माझं कॉलेज बंद होऊन, पार्ट टाइम जॉब करून एक्सटर्नली परीक्षा देऊन शिक्षण पुर्ण केले.
हळूहळू मल्हार किंवा ग्रुपशी संबंध संपत गेला. एके दिवशी ऑफिसला दांडी मारून मल्हारला भेटायची ईच्छा झाली, पण ते तिघेजण पिकनिकला गेल्याचे कळले.
खुप वाईट वाटले त्यादिवशी, हे कसलं बॉंडींग ? मला तर कोणीच विचारलं देखील नाही, अगदी मल्हारने सुद्धा. दुसऱ्या दिवशी मल्हारचा फोन आला.
मल्हार :- हॅलो, काल फोन केलेला ?
मी :- हो. अरे तुला भेटायची ईच्छा झाली, म्हणुन केला होता.
मल्हार :- बरं, आज भेटू आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये.
मी :- नको, आपण बीचवर भेटू.
मल्हार :- ओ.के. पोहच मग.
असं म्हणत फोन कट सुद्धा केला.
आधी मल्हार नेहमी म्हणायचा कि तु तयार रहा, मी येतो घ्यायला.
जुलै एंड असल्याने पाऊस मस्त सुरू होता, मी विचार करत होती की, "काल मला न विचारता ट्रिपला गेला तर माझी नाराजी दूर करण्यासाठी मला मनवेल. नंतर मग एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही चिंब पावसात भिजू. नंतर मग मी त्याला लग्ना बद्दल विचारेल आणि मला अपेक्षित उत्तर मिळेल."
मी मोरपंखी कलरचा कुर्ता आणि ब्ल्यु लेगींग घातली आणि निघाले. आईने गंमतीने म्हटलं, "पावसात मोर कुठे निघाला बागडायला ?" तिला मी मैत्रीणीच्या नावाने सांगुन निघाले.
तिथे गेल्यावर पाहते तर काय स्वप्ना, अनिमेष आणि मल्हार बसुन मस्त गप्पा मारत होते. मला आलेलं पाहून स्वप्ना म्हणाली, "बघ मोर आला." आणि तिघेही हसायला लागले. खरंतर स्वप्ना माझी बेस्ट फ्रेंड होती, पण आता त्या दोघांचे असणं मी एक्सपेक्ट केले नव्हते. म्हणुन त्यावेळी तिची मस्करी मी लाईटली नाही घेतली.
मी :- आज तुम्हाला पण बोलविले होते का मल्हारने ? मला वाटलं, काल मी सोडून तुम्ही सगळे होताच की दिवसभर सोबत. का अजूनही मन नाही भरलं ?
स्वप्नानी लाईटली घेतले, पण तिच्या लक्षात आले की मी चिडले आहे.
स्वप्ना :- सॉरी डिअर, आम्हांला वाटलं ऑफिसमध्ये बिझी असशील, पुन्हा घरचा व्याप. पण हॅलो ! तु माझ्या वर चिडु नकोस. ज्यानी ही ट्रिप प्लान केली, त्याला बोल.
मल्हार ओशाळून :- सॉरी मेघा, अगं मी यु.एस.ला जाणार म्हणून हे लोक मला ट्रीट मागत होते. म्हणुन मी गेट-टुगेदर ऑर्गनाईझ केली होती. पण जसं स्वप्ना म्हणाली तसा मी विचार केला की तुझं जमणार नाही. म्हणुन नाही विचारले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.
मेघा :- आणि यु.एस. बद्दल सांगावं पण नाही वाटलं का ? कि तु विचार केला की मी बिझी असेल, मला वेळ नसेल ऐकायला.
मल्हार कडे काही शब्द नव्हते. पावसाने जोर धरला.
अनिमेष :- चला आपण एखाद्या स्टॉल वर जाऊ.
मल्हारने माझा हात धरत :- चल मेघा.
ते दोघे निघाले. मी रडत होते, पण पावसाच्या पाण्यामुळे माझे अश्रु त्यात सामावुन गेले. मी त्याचा हात झटकून परत निघाले. मी वेगाने धावत होते. मागुन मल्हारचा आवाज "मेघा थांब...." त्याचा आवाज पावसाच्या आवाजाने हळूहळू विरत गेला.
चहाच्या टपरी वर गाणं वाजत होतं...
"मेघा रे मेघा.... मेघा रे मेघा,
मत परदेस जा रे...
आज तु प्रेम का संदेश बरसा रे..."
मेघाचं मन परत वर्तमानात आलं, तेच गाणं एफ एम वर सुरू होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सातला कराडला जायला निघाली. आईने बेस्ट लक दिले.
आई :- पोहचली की फोन कर गं. काकु वाट बघत असेल.
तीन-साडे तीन तासांचा प्रवास. डोक्यात असंख्य विचारांनी गर्दी केलेली. काल पासून पुन्हा मल्हारची का आठवण यायला लागली ? बाहेर हलका पाऊस सुरू होता. तिचं मन भरून आलं होतं, परत जावं... नको भेटायला शेखर सानेला. पण आईला दिलेला शब्द पाळला पाहिजे, वाटल्यास त्यांना नाही सांगु आणि पुढे मस्त गणपती पुळेला बाप्पा चे दर्शन घ्यावे आणि मग रश्मीकडे जाऊया.
कराडला पोहचल्यावर मेघाचा चुलत भाऊ पराग घ्यायला येतो. घरी पोहचल्यावर मेघा आईला कळविते.
काकु :- मेघा, चल फ्रेश होऊन थोडं खाऊन घे, मग आपण निघु. अकरा वाजता सानेंकडे पोहचायचे आहे.
मेघा काकुची आज्ञा पाळते. बरोबर अकरा वाजता मेघा, पराग आणि काकु पोहचतात. सानेंचे घर छान टुमदार असतं, समोर फुलांनी बहरलेली बाग, त्यावर पाळलेले ससे, मस्त बागडत असतात.
चाळीशी जवळ पोहचलेला व्यक्ती त्यांचे स्वागत करतो. भारदस्त व्यक्तिमत्व, म्हणजे शेखर साने असावा.
क्रमशः
पुढील भाग
👇
अनघा लिखिते ✍🏻
वरील कथा अनघा लिखिते यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत.
कथा मनाला चटका लावून गेली...
ReplyDelete