बंदिनी

 बंदिनी

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

माझी येरवडा तुरुंगात जेल सुपरिटेंडेंट म्हणून बदली झाली आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. कितीतरी दिवसांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं. युपीएससी ची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर मी इंडियन पोलीस सर्व्हिस ग्रुप निवडला होता. माझी प्रगती पाहूनच मला येरवडा तुरुंग अधिकारी हे पद मिळाले होते. मोठ्या उत्साहाने मी नव्या कामावर रुजू झाले. पहिल्याच दिवशी मी इतर सर्व अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग घेतली. जेलची सर्व माहिती करून घेतल्यावर मी वॉर्डन बरोबर सर्व बराकी मधून फेरफटका मारला. खरं तर मला महिला कैद्यांमध्ये विशेष रस होता. कोणत्या परिस्थितीमुळे या महिलांना तुरुंगवास भोगणे भाग पडते हे मला जाणून घ्यायचे होते. बराकीमध्ये बसलेल्या त्या महिला कैद्यांकडे मी उत्सुकतेने बघत होते.
"एकदा का यांच्याशी संबंध आला कि, कळतील सगळ्या गोष्टी हळूहळू !!" मी स्वतःशीच म्हणाले. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी महिला कैद्यांची नवनवीन माहिती मिळू लागली. वेगवेगळ्या गुन्ह्यासंदर्भात त्यांना शिक्षा झालेल्या होत्या. काही गुन्हे किरकोळ होते तर काही गंभीर! सदोष मनुष्यवधा सारखे !!

त्या दिवशी जेल वॉर्डन चिंताग्रस्त मुद्रेने मला भेटायला आली. आठ नंबरच्या बराकीतील दोन महिला कैद्यांना गेल्या आठवड्यापासून मुदतीचा ताप भरला होता. कैद्यांसाठीच्या दवाखान्यात ॲडमिट करण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे आमचा नाईलाज झाला. इतर कैद्यांना त्यांच्या सोबत ठेवणे धोकादायक होते. तापाची लागण इतरांनाही होऊ शकत होती. बाकी कैद्यांना दुसर्‍या बराकीत तात्पुरते हलवण्याचा निर्णय आम्ही घेतला. परंतु एक प्रौढ महिला कैदी बराक सोडून जाण्यास तयार नव्हती. 'जनाबाई शिवतारे'  या नावाची महिला कैदी त्याच बराकीत राहण्यावर ठाम होती. तेथेच राहून तापाने फणफणलेल्या महिला कैद्यांची सुश्रुषा करण्याची तिची इच्छा होती. मला मोठे आश्चर्य वाटले. रुग्ण कैदी महिलांच्या संपर्कात आल्यास आपल्यालाही या तापाची लागण होऊ शकते, हे माहीत असूनही तिने त्याच बराकीत राहण्याचा निर्णय घेतला होता. मग आम्हीही विरोध केला नाही. जनाबाईंनी दोन्ही रुग्णांची उत्तम काळजी घेतली. वेळेवर त्यांना औषधे देणे, त्यांना काही हवे नको ते पहाणे इत्यादी कामे त्या तत्परतेने पार पाडत होत्या. आठवड्याभरातच दोन्ही रुग्ण बरे झाले आणि परिस्थिती पूर्वपदावर आली. जनाबाईंचे मला कौतुक वाटले. उत्सुकतेपोटी मी त्यांची रेकॉर्ड फाईल मागवून घेतली आणि ती चाळताना मला आश्चर्याचा धक्काच बसला. सख्ख्या भावाच्या निघृण हत्येच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याने त्या जन्मठेपेची शिक्षा भोगत होत्या. तुरुंगातील आजारी सहचारिणींबाबत एवढ्या हळव्या असणाऱ्या जनाबाई ,सख्ख्या भावाचा खून करण्या इतक्या निष्ठुर होऊ शकतात ?? नक्कीच या सर्व प्रकरणामागे काहीतरी रहस्य असले पाहिजे .....
मी जनाबाईंची फाईल बारकाईने अभ्यासू लागले.

दहा वर्षांपूर्वी घडलेली ती घटना होती. त्यावेळी जनाबाई चाळिशीच्या होत्या. विधवा असल्याने एकुलत्या एक मुली सोबत त्या माहेरीच राहायच्या. त्यांचे आई-वडील, धाकटा भाऊ व त्यांची मुलगी एकत्र राहात असत. पैशांवरून भावा बहिणीत भांडणे होती असा पोलिसांचा निष्कर्ष होता. अशातच एके दिवशी भावाबरोबर झालेल्या पराकोटीच्या भांडणात रागाच्या भरात जनाबाईंच्या हातून भावाचा खून झाला होता. जनाबाईंनी पोळ्या लाटायच्या लाटण्याने भावाच्या डोक्यात वार केले होते. वार वर्मी लागून कवटी फुटल्याने भावाचा जागीच मृत्यू झाला होता. कोर्टात जनाबाईंच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष दर्शनी पुरावा म्हणून त्यांच्या विरुद्ध दिलेली साक्ष, कोर्टाला जनाबाईंना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यास पुरेशी होती ... माझा विश्वासच बसत नव्हता. मी विचार करू लागले. जनाबाईंच्या मुलीचे नाव कोठेही पोलीस रेकॉर्ड मध्ये नव्हते. तिची साक्ष ही पोलिसांनी घेतली नव्हती. त्या वेळी जनाबाईंच्या मुलीचे वय पंधरा वर्षे होते. म्हणजेच ती कळती सवरती  होती .... मग तिची साक्ष का घेतली गेली नाही ? अस्वस्थ मनाने मी माझ्या पुरता का होईना पण या प्रकरणाचा छडा लावायचे ठरवले .

दुसऱ्या दिवशी सकाळी मी जनाबाईंना माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले. महिला कैदी नेसतात त्या पांढर्‍या शुभ्र साडीत जनाबाई माझ्या केबिनमध्ये आल्या. गळ्यात रुद्राक्षांची माळ होती. कपाळावर पांढरा टिळा होता. शांत चेहरा आणि निग्रही नजर !! जनाबाई माझ्या समोर उभ्या राहिल्या. दोन्ही हात जोडून मला नमस्कार करत त्यांनी त्यांची नजर माझ्या नजरेस भिडवली.
"मला का बोलावलंत मॅडम ?"
शांत आणि हळू आवाजात त्यांनी मला विचारले .... एखाद्या देवळात देवासमोर भजन पठण करून अचानक आपल्या पुढ्यात आलेल्या एखाद्या आजीबाईंच्या चेहऱ्यावर असावी, तशी तृप्तता त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होती.
"बसा जनाबाई ...." पुढ्यातील खुर्चीकडे बोटाने निर्देश करत मी म्हणाले. जनाबाई पदर सावरून खुर्चीत बसल्या. प्रश्नार्थक मुद्रेने बघणाऱ्या त्यांच्याकडे पाहून मी स्मितहास्य केले.
"तुमचे कौतुक करण्यासाठी तुम्हाला बोलावलंय ..."  मी म्हणाले. काहीच न बोलता त्याच शांत नजरेनं त्या माझ्याकडे बघत राहिल्या.
"तुमच्या प्रेमळ शुश्रूषेंनं, आजारी पडलेल्या तुमच्या दोन्ही मैत्रिणी खडखडीत बऱ्या झाल्या, म्हणून तुमचं कौतुक करायचं आहे ."
त्या हसल्या. मी पहातच राहिले .... इतकं निर्मळ हास्य मी किती तरी दिवसांनी बघत होते. ते ही खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप झालेल्या कैद्याच्या  तोंडावर .....
"मॅडम अहो त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे ? आपल्या माणसांची सेवा आपण नाही करायची तर कोणी करायची ? त्यांच्या जागी मी असते तर त्यांनीही हेच केलं असतं ना ?" जनाबाई म्हणाल्या.
"कौतुक एवढ्यासाठी, की सर्वांमध्ये तुम्ही एकट्याच हे करायला पुढे आलात ... " मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाले. जनाबाई पुटपुटल्या, "पांडुरंग .... पांडुरंग "
"एक गोष्ट सांगू ?" त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवत मी विचारले. त्या होकारार्थी मुद्रेने नुसत्याच बघत राहिल्या.
"तुम्ही सख्ख्या भावाचा खून केला आहे या गोष्टीवर माझा विश्वास नाही." मी हळू आवाजात म्हणाले. माझे शब्द कानावर पडताच विजेचा झटका बसावा तशा जनाबाई खुर्चीतून उठल्या.
"खूप आभारी आहे मॅडम ... चलते मी !"
एवढं कसबसं बोलून त्या पाठ फिरवून दरवाजाकडे निघाल्या सुद्धा !!

"थांबा जनाबाई ...." खास पोलिसी आवाजात मी  म्हणाले आणि त्या जागीच थांबल्या .
"खरं काय ते मला कळलंच पाहिजे !!" मी म्हणाले .
"काय होणार आहे मॅडम भूतकाळातल्या गोष्टी उगाळून?" पाठमोऱ्या जनाबाई पुटपुटल्या.
"इथे माझ्यासमोर बसा जनाबाई .... आणि मला सगळं सांगा .... तुमच्या मुलीसारखी आहे मी .... किंवा तुमची मुलगीच आहे म्हणा, आणि सगळं सांगा मला !!" तीव्र आवाजात मी म्हणाले. पाठमोऱ्या जनाबाई गर्रकन वळल्या. पाण्याने भरलेल्या त्यांच्या डोळ्यात एक तीव्र वेदना स्पष्ट दिसत होती. नजर झुकवून त्या मटकन माझ्या समोरील खुर्चीत बसल्या.
"बोला जनाबाई ! मन मोकळं करा ! सगळं सांगा मला..." हळू आवाजात मी म्हणाले.
"दहा वर्षांपूर्वीची घटना आहे ही !!" मनाने भूतकाळात जात जनाबाई स्वतःशीच बोलल्यासारखे बोलू लागल्या.
"विधवा झाल्यानंतर पुन्हा एकदा माहेरच्या आश्रयाला गेले होते मी ...... पदरात तरणी पोर होती. पंधरा वर्षाची माझी पोर आणि मी शेजारीपाजारी धुण्याभांड्याची कामे करून आई-बापाच्या संसाराला हातभार लावत होतो. माझे आईबाप थकले होते. धाकटा भाऊ चंदू त्यांच्या लाडाने वाया गेला होता. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होता पण शिक्षण नसल्याने बेकार होता. गावातील थोरा मोठ्यांच्या घरात पडेल ती कामं करुन वेळ घालवायचा. माझी पोर गुणी होती. 'लता' तिचं नाव ...  शिक्षणाची खूप आवड होती तिला .....  दिवसभर राबून रात्री शाळेत जायची."
बोलता-बोलता जनाबाई थांबल्या. जुन्या विचारात हरवून गेल्या.
"पुढे काय झालं जनाबाई ?" मी त्यांना भानावर आणत विचारलं.
"दुर्दैव आमच्यासारख्या गरिबांची पाठ इतक्या सहजा सहजी सोडत नसतं मॅडम !" उदासपणे जनाबाई पुढे बोलू लागल्या.
"चंदूची वाईट नजर माझ्या लेकीवर आहे हे मी लवकरच ओळखलं. भरीस भर म्हणजे माझ्या आई-वडिलांची ही त्याला फूस होती.
'आपल्यात मामाला मुलगी देतात बरं का जना ...' असं बोलून आई मला आडून आडून सुचवत होती. माझ्या संतापाचा भडका उडाला. माझी गुणी पोर असल्या वाया गेलेल्या माणसासाठी नव्हती. सख्खा भाऊ असला म्हणून काय झालं ? त्याच्याशी लताच लग्न लावून देण्यापरीस मी तिला विहिरीत ढकलण जास्त पसंत केलं असतं!!" नागिणी सारखे फुत्कार टाकत जनाबाई म्हणाल्या. पुढ्यातील ग्लास मधलं पाणी घटाघटा पिऊन त्यांनी स्वतःला शांत केलं. कुठेतरी शुन्यात बघत त्या पुन्हा बोलू लागल्या,
"दोन-चार वेळा मी चंदूला कडक समज दिली होती. लताच्या मागे लागलास तर परिणाम वाईट होतील असा सज्जड दमही मी त्याला दिला होता. माझ्या परीने मी लताला ही सावध राहण्याचा सल्ला दिला होता. पण शेवटी व्हायचं ते झालंच .....

एके दिवशी अंगात थोडी कणकण असल्याने, लता घरीच झोपून राहिली होती. मी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास माझे वडील घाबऱ्या घाबऱ्या मला शोधत आले.
"चल लवकर .... विपरीतच घडलयं घरात ...." कापऱ्या आवाजात ते म्हणाले. मी पळतच घरी आले. आतल्या खोलीत चंदू अस्ताव्यस्त पडला होता. डोक्यातून रक्त वाहत होतं. शेजारी विमनस्क अवस्थेत लता बसली होती. तिच्या अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. ते दृश्य बघून माझ्या पायाखालची वाळूच सरकली. घाईघाईने हाताला येतील ती कापडं मी तिच्या अर्धनग्न शरीरावर पांघरली.
"काय झालं लता ?" मी ओरडून तिला विचारलं. पण ती नुसतीच माझ्याकडे पहात राहिली. रडण्याचे भान सुद्धा तिला राहिले नव्हते.
"ती अवदसा कशाला सांगेल काही .... मला विचार काय झालं ते ..." माझी आई एखाद्या डिवचलेल्या सापासारखी फुत्कारत म्हणाली.
"माझा पोर बिचारा, भाची आजारी आहे म्हणून जवळ जाऊन विचारपूस करत होता, तर या हडळीने त्याच्यावर हल्ला केला."
"आई काहीही बोलू नकोस ..." भान हरपून मी ओरडले.
"लता असं करणं शक्यच नाही. नक्कीच चंदू तिच्या अंगचटीला गेला असणार ! बोल लता .... तोंड उघड .... सांग मला काय झालं ते ....." लताला दोन्ही हातांनी गदागदा हलवत मी विचारलं. पण ती भानावर नव्हती. त्या भयानक घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता.
"अहो जा ..... पोलिसांना बोलावून घ्या ! नाही या अवदसेला फासावर लटकवली ,तर नाव नाही सांगणार मी...."  रागाने वेडीपिशी झालेली माझी आई, बाबांना ओरडून सांगत होती. क्षणार्धात मी भानावर आले. मनाशी निश्चय करून बाबांना म्हणाले,
"थांबा बाबा .... पोलिसांना बोलावण्याआधी मी काय म्हणते ते ऐका .... गेलेला चंदू आता परत येणार नाहीये ! चूक कोणाची का असेना, पण त्यासाठी माझ्या पोरीचं आयुष्य वाया जाता कामा नये. मी तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगेन !! आई ... तुझ्या मुलाच्या मृत्यूची शिक्षा मी भोगेन, पण माझ्या लेकराला माफ कर .... तिचं उभं आयुष्य पडलंय तिच्यासमोर !! माझं काय ... सरलंय सगळं आता .... भीक मागते मी तुझ्याकडे .... माझ्यावर इतके उपकार कर .... माझ्या लेकरा ऐवजी मी शिक्षा भोगेन ..." मी आईचे पाय धरून तिला विनवत राहीले. आश्चर्य म्हणजे आई द्रवली. पुढे रीतसर पोलिस केस झाली. आई-बाबांनी माझ्या विरुद्ध साक्ष दिली, आणि मला जन्मठेपेची शिक्षा झाली."
जनाबाई बोलायच्या थांबल्या. माझ्या केबिन मध्ये शांतता पसरली. पाणावलेले डोळे हलक्या हातानं पुसत मी जड आवाजात विचारले,
"लताचे काय झालं पुढं जनाबाई ?"
"लताला हे पसंत नव्हतं. तिनं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगावी हे तिला मान्य नव्हतं. पण मग मी तिला समजावलं..... शिकून मोठं व्हायचंय तिच स्वप्न पूर्ण करण्याची तिला शपथ घातली ..... चांगल्या वागणुकीनं मला जेल मधून लवकर सोडतील अशी आशा तिला दाखवली. खूप खूप शिकून माझे पांग फेडण्याचा वचन मी तिच्याकडून घेतलं .... शेवटी पोर बधली....
मी जेलमध्ये असताना खडतर जीवनाशी झगडत खूप शिकली .... एका बँकेत मोठी अधिकारी आहे आता !! बक्कळ पगार घेते !! शिकून आयुष्याचं सोनं झालं तिच्या ...... आणखी काय पाहिजे मला ? देव तिला अशीच सुखात ठेवो ....."
बोलता-बोलता कृतकृत्य झाल्याच्या अविर्भावात जनाबाई गप्प झाल्या. मग थोड्या वेळाने भानावर येऊन त्यांनी मला नमस्कार केला,
"येते मॅडम मी आता ... खूप कामं करायची बाकी आहेत ..." एवढं बोलून लगबगीनं निघून गेल्या. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे भरलेल्या डोळ्यांनी पहात असतानाच,
"बिचारी जनाबाई ... "
या वॉर्डरच्या उद्गारांनी मी भानावर आले.

खिडकीतून तिने सगळं काही ऐकलं होतं !
"मॅडम, जनाबाईंची खरी हकीकत आज समजली, आणि त्यांच्या बद्दलचा आदर दुपटीने वाढला !!" वॉर्डन म्हणाली.
"म्हणजे ?? " काहीच न कळून मी विचारले.
"इतके दिवस आम्ही जनाबाईनीच खून केला असं समजत होतो. दोन वर्षांपूर्वीपर्यंत लता आईला भेटायला यायची. मायलेकींचं चांगलंच गूळपीठ होतं ..... तासंतास दोघी गळ्यात गळे घालून बसायच्या .... पण नंतर अचानक तिनं येणं बंद केलं ... तिनं तिच्या बँकेतील कोणा सहकाऱ्या सोबत प्रेमविवाह केला. पण तिच्या नवर्याने एक अट तिला घातली होती ..... लग्नानंतर लतानं  जनाबाईंशी सगळे संबंध तोडायचे होते ..... बायकोच्या खूनी आईची सावली सुद्धा त्याला त्यांच्या संसारात नको होती ....

लतानं रडत रडत हि गोष्ट जनाबाईंना सांगितली. तिला हि अट मान्य नव्हती, त्यासाठी स्वतःच्या प्रेमाची आहुती द्यायचीही तयारी तिने केली होती. पण जनाबाईंनी तिला समजावले.आयुष्यात खऱ्या प्रेमाला अव्हेरून चूक करू नकोस असं ठणकावून सांगितलं. त्यांनी स्वतःच्या उतारवयात पोटच्या मुलीला कायमचं दूर करण्याचं विष सुद्धा पचवलं ...... तिच्या सुखासाठी यापुढे आयुष्यात तिला कधीही भेटायला न येण्याचं वचन घेऊन ......" गळा भरून आल्याने वॉर्डन बोलायची थांबली.  इतका वेळ कष्टाने रोखलेले माझे अश्रू मुक्तपणे वाहू लागले आणि लेकरासाठी उभ्या आयुष्याची होळी करणाऱ्या त्या जगावेगळ्या बंदिनीसाठी नकळत माझे हात जोडले गेले.

© मिलिंद अष्टपुत्रे


ही कथा तुम्हाला आवडेल, पंढरीची वाट आणि 

पॉझीटीविटी

वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

8 Comments

  1. खूपच हृदयस्पर्शी कथा

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर कथा

      Delete
  2. खूप सुंदर मनाला चटका लावणारी कथा अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  3. खुप छान कथा आई अशीच असते लेखकाने चे अभिनंदन

    ReplyDelete
  4. छान कथा, आवडली.. पुण्यात येरवडा कारागृहाजवळील भागात, प्रतिकनगर नाते वाईका कडे माझे जाणे होत होते, तेथून सुधारलेल्या कैद्यांना शेतकाम दिले जाते, तो पूर्ण भाग ईमारतीतून दिसायचा, जवळचआता मोठा रस्ता आणि बैठी वस्ती तयार झाली आहे.. कथेमुळे आठवणी ताज्या झाल्या..

    ReplyDelete
  5. खूपच छान

    ReplyDelete
  6. खूप सुंदर कथा मनाला भिडणारी

    ReplyDelete
  7. कथा छान ॖआहे आवडली

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post