जीवनाचे रंग

 जीवनाचे रंग 

✍️ सिध्दी रानडे      

"आताशा दिवस किती निवांत आहेत नाही?"श्यामरावांच्या बाजूला बसत रमाताई म्हणाल्या.

"हो ना अगं,नाहीतर आधी किती धावपळ असायची आपली. दिवस कधी संपायचा कळायचंच नाही." तिच्या बोलण्याला दुजोरा देत श्यामराव म्हणाले.

               श्यामराव आणि रमाताई ! दोघंही एकमेकांना साजेसेच! घरची फार श्रीमंती नसली तरी काटकसर करून दोघांनीही दिवस काढले होते. त्यांचा मुलगाही कष्टाळू, परिस्थितीची जाण असणारा! त्यामुळे त्याने आईबाबांच्या कष्टाची जाण ठेवून आपले शिक्षण पूर्ण केले होते व आता त्याचे व्यवस्थित मार्गी लागले होते.त्यामुळे आता ही दोघंही वृद्ध माणसे जुन्या आठवणींत रमत.

              आजदेखील बोलता बोलता श्यामरावांचे मन ५० वर्षे मागे जाऊन पोचले. त्यावेळी ते नुकतेच नोकरीला लागले होते. नोकरीनंतर काही दिवसांतच त्यांचे रमाताईंशी लग्न झाले होते. लग्न झाल्या झाल्या त्यांनी आपल्या नोकरीच्या गावी बि-हाड केले. जागा तशी लहानच होती. पण रमाताईंनी जुळवून घेतले. श्यामरावांच्या पगारातून त्यांनी संसाराला लागणा-या आवश्यक चीजवस्तू आणल्या होत्या. आणि त्यांच्या छोटेखानी संसाराला सुरुवात झाली होती.

  एकंदरीत तसे छान चालले होते. दरम्यान रमाताईंना दिवस गेले होते. त्यामुळे दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. पण एके दिवशी अचानक अघटित घडले. एके दिवशी सकाळी बँकेत जाताना श्यामरावांना अपघात झाला. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना बरं व्हायला जवळजवळ तीन आठवडे   लागणार होते. त्यामुळे त्यांची नोकरी सुटली.

                  घराचा सगळा भार रमाताईंवर आला. त्यात त्या अश्या नाजूक अवस्थेत. पण पदर खोचून कामाला लागल्या. शेजारीपाजारी मदतीला धावून आले. त्यांच्या मदतीने रमाताईंना स्वयंपाकीणीचे काम मिळाले. श्यामरावांची शुश्रुषा आणि स्वयंपाकीणीचे काम करत रमाताई घर चालवू लागल्या. महिनाभरानंतर श्यामरावांना बरे वाटले. पण त्यांना पूर्वीसारखे जलद चालता येईना. मग त्यांनी जवळच्या वाचनालयात एक छोटीशी नोकरी शोधली.

                रमाताईंचे दिवस भरत आले. त्यांनी गोंडस अश्या मुलाला जन्म दिला. मात्र आता परत रमाताईंचे काम बंद होणार होते. पण त्यांनी घरबसल्या कपडे शिवायचे काम घेतले. बाळाला लावायला शेजारच्या एक आजी येऊ लागल्या. त्यासुद्धा रमाताईंची खूप काळजी घेत. थोड्या दिवसांनी बाळाचे बारसे केले. बाळाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. सुरेश हळूहळू मोठा होत होता.

              तो थोडा मोठा झाल्यावर त्याला शेजारच्यांकडे ठेवून रमाताई पुन्हा कामाला जाऊ लागल्या. जरा ओढाताण होत होतीच. पण दोघंही नवराबायको समंजस होते. आहे त्यात समाधान मानून राहायची वृत्ती होती. तसा सुरेशही समजूतदार होता. कधीही कुठल्याही गोष्टीसाठी त्याचा हट्ट नसे. मात्र संकटं ही काही सांगून येत नाहीत.

   

            श्यामरावांच्या भावाभावांमध्ये गावातील घरावरुन वाद झाले. श्यामरावांनी त्यांना खूप समजावले पण त्यांनी कुणाचेच न ऐकता गावातील राहत्या घराची वाटणी केली. पण त्यांच्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी घ्यायला कोणीच उत्सुक नव्हते. श्यामरावांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली व आई-वडिलांना घेऊन ते आपल्या बिऱ्हाडी आले. पण आता खाणारी तोंडे वाढली होती. त्यामुळे रमाताईंनी स्वयंपाकाची वाढीव कामे घेतली. आणि सोबतीला शिवणकामही करु लागल्या. आता श्यामरावांनाही त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचे प्रामाणिक काम पाहून अधिक चांगल्या पगाराची नोकरी दिली.

                दिवस सरत होते. हळूहळू परिस्थिती सुधारत होती. सुरेशदेखील मन लावून अभ्यास करत असे. काळ पुढे सरकत होता. दरम्यान श्यामरावांच्या आईवडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते.

               सुरेशचेदेखील शिक्षण पूर्ण होऊन त्याला चांगली नोकरी मिळाली होती. काही दिवसांतच एका सुयोग्य मुलीशी त्याचे लग्न झाले होते. ती दोघंही श्यामराव आणि रमाताईंची व्यवस्थित काळजी घेत होते. श्यामराव आणि रमाताई घरच्या जबाबदाऱ्यांतून निवृत्त होऊन जुन्या आठवणींत आपला वेळ घालवत होते. सांजवेळी जुन्या आठवणींना अधिक उजाळा मिळायचा. मागे वळून पाहिले की दोघांचेही डोळे पाणावायचे.

        "सुरेश! अरे सुरेश! तुझ्या लक्षात आहे का?" करुणाने विचारलं.


"काय गं?" काहीच न समजून सुरेश उत्तरला.


"अरे आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना?"


"अग हो गं खरंच! मी विसरलोच होतो.बरं झालं आठवण केलीस."


"मी काय म्हणते आपण थाटात त्यांचा वाढदिवस साजरा करु. त्यांना कायम लक्षात राहिल अस गिफ्ट देऊ."


"हो हो चालेल. छान आयडिया आहे." आणि सुरेशच्या डोळ्यांत एकदम पाणी तरळले. त्यावर करुणा, सुरेशच्या बायकोने त्याच्या खांद्यावर थोपटले. आणि सुरेश एकदम बोलू लागला,"काय सांगू गं तुला? जुने दिवस आठवले एकदम! किती कष्ट करायचे आईबाबा माझ्यासाठी! मी पोटात असताना बाबांच्या पायाला फ्रॕक्चर झालेलं त्यामुळे आईवर सगळी घरची जबाबदारी!  पण हिंमतीने सावरलंन सगळं. बाबादेखील बर वाटल्यावर जवळ कामाला जायचे. माझ्यासाठी कष्ट करायचे.असे म्हणून कळतनकळत सुरेशने डोळे पुसले. 


त्यावर "असो!पण आता आहोत ना आपण आनंदात!मग आता हस बघू! आणि आपल्याला आईबाबांचा अभिमान वाटायला हवा. आणि त्यांना सुखाचे क्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे." करुणाने त्याला समजावलं.


        "हो बरोबरआहे तू म्हणतेस ते! आज आपण त्यांना मस्त सरप्राईज देऊ." आणि त्यांनी जय्यत तयारीला सुरुवात केली.


  "अरे कुठे आणलेस आम्हांला ह्या हाॕलमध्ये! आणि इथे तर नुसता काळोख?" श्यामराव काहीसे त्रस्त झाले. पण तेवढ्यात लाईट लागले. आणि सुरेशराव व रमाताई चकितच झाले. समोर त्यांचा मुलगा वसून व सगळे नातेवाईक उभे होते. सर्वांनी मोठ्या स्वरात त्यांना "हॕप्पी ॲनिव्हर्सरी"असे विश केली. दोघांसाठीही हा सुखद धक्का होता. मग सुरेशने त्यांना स्टेजकडे नेले व हे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सरप्राईज असल्याचे सांगितले. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. मग सुरेशने त्यांना आणखी एक सरप्राईज दिले. समोर होम पेटला होता व लग्नाला असते तसे सर्व साहित्य होते. सुरेशने हात धरून दोघांनाही पाटावर नेले. आज ते दोघ पुन्हा एकदा सप्तपदी करणार होते. थरथरत्या हातांनी त्यांनी रमाताईंचा हात हातात घेतला व दोघांनीही सप्तपदी पूर्ण केली. त्याबरोबर सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. श्यामराव व रमाताईंनी सुरेश व करुणाला जवळ घेतले. चौघांचेही डोळे पाणावले होते. एक आगळेवेगळे समाधान त्यांच्या मुखावर विलसत होते.


                  संसारातले चटके त्यांनी सहन केले होते. कटू-गोड अनुभव घेतले होते. पण शेवटी चांगले झाले होते.जीवनातला समाधानाचा रंग त्यांना कायम पुरणारा होता.

         -सिद्धी रानडे.

ही कथा तुम्हाला आवडेल, 👉 पाऊले चालती

वरील कथा सिध्दी रानडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post