पाऊले चालती

 पाऊले चालती

✍️ श्री. संभाजी बबन गायके 

दिवस उगवण्याआधीच पंगती बसल्या आणि दिंडीतल्या बहुतेकांनी बारस सोडली. द्वादशीला वारकरी बारस म्हणतात आणि हे भोजन अगदी सकाळी लवकर करण्याचा प्रघात आहे. एकादशीच्या व्रताचा खरं तर हा तिसरा दिवस. दशमीला एकवेळ अन्न घ्यायचं, एकादशीला पूर्ण उपवाशी रहायचं,द्वादशीला सूर्योदयापूर्वी थोडं अन्न ग्रहण करायचं आणि दुस-या दिवसापासून नियमित अन्नग्रहण करू लागायचं! चंद्राच्या कलेनुसार आहार कमी कमी करीत नंतर सामान्य करीत जायचं!

विसुभाऊ कुलकर्णी हेही या पंगतीमध्ये होते. त्यांना मात्र परतण्याची घाई नव्हती. त्यांनी नियमानुसार अगदी मोजकेच घास घेतले आणि इतरांचे होईस्तोवर ते पंगतीतच बसून त्यांना पाठ असलेले अभंग आठवत बसले. सारी पंगत आज काहीशा घाईनेच जेवत होती. आज सर्वांनाच घरी परतायचं होतं! व्यवहारीक जगाची गंमत हीच असते. मनाचा चेंडू संसाराच्या जमिनीवर जितका जोरात आपटला जाईल, तितका तो उंच जातो परंतू खाली येतानाही तितक्याच वेगाने परततो. संसाराचं गुरूत्वाकर्षण भेदून, भोगाची कक्षा पार करून वैराग्याच्या अवकाशात स्थिर होण्यासाठी मनाच्या चेंडूला महाप्रचंड ऊर्जा लागते. आणि ही ऊर्जा सामान्यांना सहजासहजी लाभत नाही. पण म्हणूनच वारीचं प्रयोजन...ऊर्जा गोळा करण्यासाठी!

पाहता-पाहता धर्मशाळेच्या आवारातील तंबू गुंडाळण्यात आले. मालवाहू वाहने लगबगीने निघाली. या वाहनांमध्ये दाटीवाटेने बसलेले वारकरी विठ्ठल मंदिराच्या दिशेने पाहत, हात जोडून ‘पुन्हा बोलवा देवा...” म्हणत मनाने वाहनाच्याही पुढे धावत निघालेले! आणि यात वावगं असं कुठं काय होतं? शेतातली ओली पिकं अनुभवी हातांची वाट पहात असतात, पोटासाठी केल्या जाणा-या व्यवसायाची विस्कटलेली घडी नीट करायची असते, कुणाच्या चाकरीत असलेली माणसं पुन्हा त्या रहाटगाडग्यात फिरण्यासाठी आणि शिरण्यासाठी मनाची तयारी करून बसलेली असतात. उत्तम व्यवहारे धन जोडोनिया पुन्हा उदास वेच करायला कामधंदा तर आवश्यकच! म्हणून वारी पेरणी झाल्यावर, पाऊस सुरू झाल्यावरच आणि तसे शिवारात शेतक-याला फारसे काही करण्यास नाही अशा दिवसांतच निघते...हा केवळ योगायोग नव्हे! व्यवहार आणि अध्यात्म असा मेळ घालणारी ही रीत!

विसुभाऊ म्हणजे या दिंडीचा मधुर आवाज. त्यांच्या वडिलांकडून त्यांना गाता गळा लाभला आणि हार्मोनियमवर तर त्यांची बोटं अशी नजाकतीनं चालत की शब्दांनी प्रत्यक्ष आकार घ्यावा श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर. विसुभाऊंचा पाठाही जबरदस्त होता. भजनीमालिका तोंडपाठ,तुकोबारायांच्या गाथ्यातील कित्येक अभंग विसुभाऊंच्या रसनेवर स्थिरावलेले होते. दिंडीत चालताना गाणं तसं अवघड. पण अंगी ताल आणि हाती टाळ असल्यावर चालणारी पावलं आणि मुखातून स्रवणारे अभंग एकमेकांच्या हातात हात घालून सहज वाटचाल करतात आणि पंढरी जवळ करतात. ज्ञानोबारायांचा हरिपाठ गाणं तरी किती सोपं! दिंडीच्या मुक्कामाचं ठिकाण जवळ येऊ लागताच संपूर्ण वारी हरिपाठात तल्लीन होऊन जाते.


 
एकाचवेळी लाखो कंठ शेकडो वर्षांपूर्वी एका राजस,कोवळ्या मुखातून पाझरलेले अमृतशब्द या काळात उच्चारताहेत, हे केवढे मनोरम दृश्य आणि श्रवणेद्रियांना नामरसात नखशिखान्त न्हाऊ घालणारं! समीपता,सलोकता,स्वरूपता आणि सायुज्यता ह्या चारही मुक्ती प्राप्त करून देण्याची शक्ती प्रदान करण्याची हमी देणारा हरिपाठ वारीत ऐकणं म्हणजे परमानंद! विसुभाऊंच्या मागोमाग सबंध दिंडी अगदी बिनचूक हरिपाठ म्हणत चालत असे. रात्रीच्या हरिजागरात विसुभाऊंच्या विविध रागातील चालींनी अभंग तरारून उठत, थकलेल्या शरीरांना उन्हा-तान्हातील वाटचालीचा विसर पडून जाई! संपूर्ण वारीकाळात विसुभाऊंचं एकतरी प्रवचन होईच. शेकडो कीर्तनं,प्रवचनं ऐकून ऐकून विसुभाऊंच्या स्मृतींमध्ये दृष्टांतांचा,रूपकांचा,प्रमाणांचा भरपूर साठा झालेला होता. असे असले तरी विसुभाऊ इतरांच्या प्रवचनांमध्ये अगदी भक्तीभावानं बसत आणि श्रवणानंद घेत असत.

विसुभाऊंची उमर आता पासष्टी पार झालेली होती. वडिलांकडून आलेली वारीची परंपरा विसुभाऊंनी आपल्या सरकारी नोकरीतील कारकुनीतून निवृत्त्त झाल्यावर नेटानं चालवलेली होती. नोकरीतून गावी परतल्यावर स्वत:च्या जमिनीच्या तुकड्यात राबायला विसुभाऊंनी कधी आढेवेढे घेतले नव्हते. जातीवंत शेतकरीही विसुभाऊंचं शेतीतलं कसब बघून आश्चर्यचकित होत असत. एक मात्र होतं,विसुभाऊ शेतातल्या प्रत्येक कामात गावातल्याच एखाद्या गरजवंताला मदतीला घेत पण प्रत्यक्ष विठ्ठलासही सोबतीला घेत,एका अंगाला ज्ञानोबाराय तर एका अंगाला तुकोबाराय असत. विसुभाऊंच्या हातून बैलांच्या पाठीवर कधी आसूड उठलेला कुणी पाहिला नव्हता. सावता महाराजांचे ‘कांदा मुळा भाजी...अवघी विठाई माझी’ हे शब्द विसुभाऊ प्रत्यक्षात जगत होते.

तसे विसुभाऊही बारस सोडल्यावर लगेच परतीच्या प्रवासाला निघत असत. पण यंदा त्यांची काही गडबड दिसेना तेंव्हा नरहरी बोवांनी त्यांना विचारलंच, “काका, यंदा काय परतवारी करायचा विचार आहे की काय? अहो, काय सोपं आहे का ते? यावर विसुभाऊ हसून म्हणाले “इतकी वर्षे चुकलंच. माऊलींना, तुकोबारायांना एवढं गोळामेळ्यानं पंढरीपर्यंत आणायचं आणि त्यांना परत पोहोचवताना त्यांची सोबत नको करायला? तेवढा आमच्या घरातल्या मंडळींना निरोप द्या...परत यायला आठ-दहा दिवस उशीर होईल म्हणावं. माऊलींना पोहोचवून येतोय म्हणावं आळंदीला.” यावर नरहरीबोवांनी नुसतीच मान हलवली आणि ते गावी जाणा-या ट्रकमध्ये चढले. विसुभाऊंचं गावी होतं तरी कोण म्हणा? काही वर्षांपूर्वी पत्नीनं पैलतीर गाठला. एक लेक तिच्या संसारात सासरी नांदत होती, पण ती दर आठ-पंधरा दिवसांनी फेरी मारून जायची म्हाता-या बापाला बघायला. तर चिरंजीव मुंबईला नोकरीत. तो सतत आग्रह करायचा...माझ्याकडे चला रहायला कायमचे. पण विसुभाऊंचा जीव गावात,शेतात रमलेला. नाही म्हणायला धाकट्या भावाचं बि-हाड मात्र होतं शेजारच्याच वाड्यात. त्यांच्याकडून दोन वेळचं जेवण येई.

इतरांना निरोप देऊन विसुभाऊ धर्मशाळेतल्या आपल्या खोलीत गेले. रात्रीच्या भजनातील निवडक चाली आठवत दुपारभर आराम केला. संध्याकाळी पुन्हा नगरप्रदिक्षणा केली. रात्री मंदिरापासून चालत चालत जाऊन चंद्रभागेत पाय बुडवून आले. गर्दी आता कमी कमी होत चाललेली होती. बारस सकाळीच सोडलेली असल्यानं रात्रीच्या जेवणाचा प्रश्नच नव्हता. धर्मशाळेत कायम राहणारी चार दोन माणसं होती. दुसरे दिवशी विसुभाऊंनी त्यांच्यकडून खराटा मागून घेतला. धर्मशाळेचे सबंध अंगण लख्ख झाडून घेतले. एकाला हाताशी घेऊन ओसरीवरच्या फरशा पाण्याने धुऊन काढल्या. दुपारचे थोडे भोजन धर्मशाळेतच उरकले आणि थेट दर्शंनबारी गाठली. आज पाच सहा तासात दर्शन होऊ शकते असा त्यांचा अंदाज खरा ठरला! एकादशीला कळसाचे दर्शन घेऊन थोपवून धरलेली दर्शनाची भूक आता डोळ्यांना सहन होत नव्हती. विठ्ठलाकडे पहात पहातच विसुभाऊ रूपे सुंदर सावळ्याजवळ पोहोचले आणि त्याच्या झिजलेल्या पावलांवर दोन्ही हात आणि कपाळ टेकवले....उण्यापु-या काही क्षणांचा तो स्पर्श म्हणजे सहस्रसूर्यांच्या चैतन्याशी जवळीक. पांडुरंगाकडे जायचे,दर्शन घ्यायचे मात्र काहीही मागायचे नाही हा परिपाठ विसुभाऊंनीही सांभाळला....मात्र संतसंग देई सदा अशी याचना केलीच मनाने. पंढरीश यावर हलकेच हसले असतील गालातल्या गालात. तुकोबारायांनी असलेच मागायला शिकवले आहे तुळशीमाला धारकांना! विसुभाऊ घाईघाईने मंदिराबाहेर पडले आणि धर्मशाळेत आले. तोवर रात्रीचे आठ वाजत आलेले होते. पहाटे लवकर उठायचे होते. विसुभाऊंनी आपली वळकटी,नित्योपयोगाच्या चीजा,पुजेची पत्र्याची छोटी पेटी,नेसण्याचे धोतर,उपरणे,टोपी,टाळ,पावसापासून थोडासा दिलासा देणारा अर्ध्या बाह्यांचा रेनकोट...रेनकोट कसला एक सैलसर डगलाच म्हणायचा,इत्यादी जामानिमा एकत्र ठेवला आणि ते आडवे झाले. उद्या गुरूपौर्णिमा. विठुमाऊली सर्व संतांना हृदयाशी धरून घट्ट आलिंगण देईल,मागे पहात,पहात ज्ञानोबा,तुकोबा,निवृत्तीनाथ,सोपानदेव,मुक्ताई,चोखोबा,निळोबाराय,गजानन महाराज इत्यादींची मांदियाळी परतीच्या वाटेला लागेल. समुद्राला भेटून नद्या अता आपल्या मूळच्या पात्रांत परतायला उलट दिशेने वाहू लागतील. विसूभाऊ पहाटच्या अंधाराचेच चंद्रभागेत पोहोचले. घाईघाईत स्नान उरकले आणि थेट माऊलींच्या रथाकडे गेले. सूर्योदय अजून व्हायचा होता....तेवढ्यात चोपदारांनी हातातील दंड उभारला...शिंगे वाजली...चौघडा निनादला आणि माऊली निघाल्या. तुकोबारायांचा रथही मार्गस्थ झाला होता. विसुभाऊंनी माऊलींसोबत चालणा-या दिंडीच्या मागोमाग रस्ता धरला. दिंडीत कुणी ओळखीचे नाही. कुठे मुक्काम पडेल, कुठे चार घास मिळतील याची काही माहिती नाही. येताना रस्त्याच्या दुतर्फा गर्दी बघत बघत प्रवास झालेला...सोबत दीड दोन लाखाचा समुदाय चालताना अनुभवलेला. आता परत जाताना सताठशेच्या वर समाज नव्हता. चालण्याचा वेग त्यामुळे दुप्पट. विसुभाऊंना तशी भराभर चालायची सवय असल्याने माऊलींचा रथ आणि त्यांच्यात फारसे अंतर पडत नव्हते... किंबहुना आता विसुभाऊ माऊलींच्या हवे तेवढे जवळ जाऊ शकत होते..गर्दी नाही की धक्काबुक्की नाही! सोबत चालणारे वारकरी,भजनकरी मात्र अत्यंत निवडक,पट्टीचे आणि अनुभवी! पट्टीचे पोहणारा-यांचा एक मोठा जथा वेगाने पोहत पोहत पैलतीरी निघाला आहे जणू! विसुभाऊंच्या आवाजाची,चालींची छाप दिंडीत चालणा-यांवर पडायला वेळ लागला नाही. काहीवेळाने तर विसुभाऊ गाताहेत आणि शेकडो वारकरी त्यांच्या मागोमाग गाताहेत असे मनोरम दृश्य दिसू लागले. पाहता पाहता पंढरीची वेस मागे पडली. रस्त्यावरच्या नेहमीच्याच रहदारीचा एक भाग बनून माऊलींचा,तुकोबारायांचा रथ आपल्या मूळ स्थानी निघाला होता. इतर छोट्या पालख्या तर वाहतुकीत हरवून गेलेल्या होत्या. पण विसुभाऊ खुशीत होते. कित्येक वर्षांची वारी आणि परतवारीही केलेल्या मोजक्या पण अस्सल वारक-यांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यांच्या ओळखी व्हायला उशीर लागला नाही. नव्या अभंग चाली,नव्या परंपरा शिकायला मिळाल्या विसुभाऊंना. पहाटेपासून मध्यान्हीपर्यंत अव्याहतपणे चालणे, वाटेत केवळ देह उपचार म्हणून घटकाभर विश्रांती की पुन्हा मुकामाच्या गावापर्यंत सूर्यास्ताआधी पोहोचायचे म्हणून पुन्हा दुप्पट वेगाने वाट चालायची. पोटाची चिंता तर देवाच्या हाती सोपवलेली, त्यामुळे वाटेत देवालाच भूक लागत होती, देवच घास भरवत होता स्वत:लाच. रात्री दगडावर डोई टेकवली तरी आईच्या मऊ मांडीची आठवण जागी होऊन शरीर निद्राधीन होत होता, वरून कोसळणारा पाऊस भिजवत नव्हता, ऊन लागत नव्हते, वाट तळपायांना चटके देत नव्हती. पहाटेचे एक-दीड वाजताच डोळे पटकन उघडत, मुक्कामाची जागा क्षणात परकी वाटत असे आणि पावले पुन्हा रस्त्याला लागत. पंधरा दिवसांचा प्रवास निम्म्या दिवसांत करायचा म्हणजे रात्रीचा दिवस करावा लागणारच ना? पाहता पाहता पुणं नजरेस पडलं, रात्रीतून मागंही पडलं...आळंदीचा मार्ग सुरू झाला. आता गर्दी थोडी वाढली होती. थोरल्या पादुकांपाशी सबंध अलंकापुरी माऊलींच्या स्वागतासाठी लोटली होती. तिकडे देहूकर तुकोबारयही त्यांच्या वेशीत पोहोचले असतील...विसुभाऊंना वाटले! टाळ-मृदंगांच्या तालावर माऊली आपल्या राज्यात पोहोचल्या...त्यांच्या राऊळाचा कळस अधिकच झळाळून उठलेला दिसला. विसुभाऊंनी इंद्रायणीचे पात्र जवळ केले. हात पाय धुतले..माऊलीच्या कळसाला पाहून प्रदक्षिणा मारली आणि गावी परतीची वाट धरली. दुस-या दिवशी सायंकाळी विसुभाऊ गावात पोहोचले. त्यांच्या दर्शनासाठी सारा गाव त्यांच्या ओसरीवर गोळा झाला. विसुभाऊंनी सोबत आणलेला अबीर सर्वांच्या कपाळाला लावला,साखरफुटाणे,लाह्या वाटल्या. परतवारीची सुखाची कहाणी विसुभाऊंनी फुललेल्या चेह-याने गावाला सांगितली. विसुभाऊ म्ह्णाले, “पुढच्या परतवारीला कोण कोण येणार माऊलींच्या सोबत? गर्दीतले अनेक हात उंचावले गेले...त्यात सर्वांत उंच हात होता तो ‘परतवारी काय सोपी आहे होय? म्हणणा-या नरहरी बोवांचा! पुढच्या वर्षी माऊलींच्या सोबत परत येणारे पाय आता वाढणार होते!

✍️ श्री. संभाजी बबन गायके

ही कथा तुम्हाला आवडेल, 👉 वसा

वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post