काहे सताए आजा

 काहे सताए आजा

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

B.A. तिसऱ्या वर्षाचा वर्ग खच्चून भरला होता. इंग्रजी साहित्याचा तास होता. वर्गात नुसता कल्लोळ सुरू होता. प्राध्यापक अभ्यंकरांनी वर्गात पाऊल टाकले आणि अक्षरश: सेकंदात पुर्ण वर्ग चिडीचुप झाला. मुली डोळे विस्फारून तर मुलं आदराने प्राध्यापकांकडे पाहत होते.  

“So class we were discussing the great novel by Shakespeare Romeo and Juliet.” 

आपल्या धीरगंभीर आवाजात, स्पष्ट उच्चारात त्यांनी बोलायला सुरूवात केली. शेक्सपिअरची अजरामर कलाकृती अभ्यंकर इतक्या सुंदर पद्धतीने समजवत होते जणू ती त्यांनीच लिहिली असावी. 

‘But soft! What light through yonder window breaks?

It is the East, and Juliet is the sun!’

सर वाचत होते आणि मुली ज्यूलीयटच्या जागी स्वतःला आणि सर रोमियो असल्याचे कल्पत होत्या. 


प्राध्यापक योगेश अभ्यंकर, गोरेपान घाऱ्या डोळ्याचे, उंचेपुरे देखणे अवघ्या सदोतीस वर्षाचे विध्यार्थीप्रिय आणि महत्वाचे म्हणजे सिंगल  व्यक्तिमत्व. मुली त्यांच्या देखण्या  व्यक्तिमत्वावर फिदा होत्या तर अभ्यंकर ज्या पद्धतीने मुलांना वागवायचे, त्यांच्यात मिसळायचे त्यासाठी मुलं त्यांचा आदर करायचे.

तास संपल्याची घंटा वाजताच पुस्तक मिटून ‘see you tomorrow, have a good day’ म्हणत प्राध्यापक वर्गाबाहेर पडले. सोबत विद्यार्थ्यांचा घोळका होताच.


काॅलेज झाल्यावर योगेश घरी गेला. एका बेडरूमच्या त्याच्या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत होता. आईवडील योगेशच्या लहान भावासोबत गावी राहत होते. नोकरीसाठी योगेश पुण्यात राहायचा.

हातपाय धुवून स्वतःसाठी कपभर चहा बनवून योगेश आरामखुर्चीत विसावला. शांतपणे चहा घेवून त्याने मोबाईल हाती घेतला. काही मेसेज वाचून, रिप्लाय करून झाल्यावर त्याने आईला फोन लावला. रोजचा रिवाज होता तो त्याचा. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर आईने कळीचा प्रश्न विचारला,

“योग चार दिवसाची सुट्टी आहे तर तू गावी येशील ना? सुरेशमामाची मुलगी रजनी, मुलगा कमलाकरही येत आहेत.

लहानपणी एकत्र किती खेळायचात तुम्ही.” 

आईच्या शब्दात एक आशा होती. पण योगेशला हे अजिबात पसंत नव्हते. त्याला माहीत होते रजनीचे अजून लग्न झाले नाही आणि आईच्या मनात तिला योगेशची बायको, दुसरी बायको, बनवण्याचे होते. दुसरी बायको हा शब्द मनात येताच योगेशला जणू ठेच लागली. कामाचे कारण देवून बघू, सांगतो असे थातुरमातूर आश्वासन देवून त्याने फोन ठेवला.

फोन बाजूला ठेवून डोळे मिटताच तो प्रसंग त्याच्या नजरेसमोर जिवंत उभा राहिला.


योगेश आणि विशाखाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले होते. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पुजा झाल्यावर अलंकारांनी मढलेली विशाखा सगळ्यांची नजर चुकवून घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. तीन तासांनी तिचा फोन आला. तिच्या मनाविरूद्ध लग्न झाल्याने आपल्या प्रियकराबरोबर ती निघून गेली होती.

मानपमानाच्या, प्रतिष्ठेच्या नावाखाली तिच्या पालकांनी विशाखाचे जबरदस्तीने योगेशशी लग्न लावून दिले होते. ती स्वतःचे हित साधण्यासाठी योगेशवर त्याची काही चूक नसताना कायमचा बिजवराचा शिक्का मारून गेली. यथावकाश दोघांचा घटस्फोटही झाला परंतु योगेशला मात्र पुन्हा बोहल्यावर उभं राहावेसे वाटत नव्हते. पण नेमकी हीच गोष्ट त्याच्या आईच्या पचनी पडत नव्हती. 

फोनच्या घंटीच्या आवाजाने योगेशची तंद्री भंगली. त्याचा वर्गमित्र अभिजीत बोलत होता.

“योग्या चार दिवसांनी गावदेवीची जत्रा आहे, येतो का?” 

क्षणात योगेशने निर्णय घेतला. अनायासे सुट्टी होतीच. गावी जावून रजनीचे मुरके बघण्यापेक्षा मित्राकडे जावून जत्रेचा आनंद लुटलेला बरा.

“अभ्या मी उद्याच येतोय. तुला काय आणू सांग.”

“ये हुई ना बात, मला काही नको पण तुझ्यासाठी एक सोवळं घेवून ये. इथला रिवाज आहे, मंदिरात जाताना पुरुषांना सोवळं नेसावं लागतं.” मित्र येणार असल्याची खुशी अभिजीतच्या आवाजातून जाणवत होती. 


B.A.ला असताना अभिजीत आणि योगेश वर्गमित्र आणि रूममेटही होते.

दोघांना एकमेकांचा सहवास आवडायचा. पदवीनंतर अभिजीत त्याच्या गावी गेला तर योगेशने पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले. मार्ग जरी वेगळे झाले असले तरी मैत्रीत खंड पडला नव्हता. म्हणूनच अभिजीतचे निमंत्रण आल्यावर योगेश लगेच तयारीला लागला. खिचडी बनवायला टाकून त्याने फटाफट बॅग भरली.

आता फक्त सोवळं राहिलं होतं ते तो जाण्याआधी विकत घेणार होता. त्याने आईला काॅल करून येत नसल्याचे सांगून टाकले.  


दुसऱ्या दिवशी पुर्ण दिवस प्रवास करुन योगेश अभिजीतच्या गावी पोहोचला. अभिजीतचे कुटुंब  त्या गावाचे वतनदार होते.

त्यांचा भलामोठा वाडा होता, चिरेबंदी, काळ्या दगडात बांधलेला. वाड्यात प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा ओलांडून जावे लागे. आत प्रवेश करताच समोर दिसे सुंदर तुळशी वृंदावन, चौसेपी चौकात असलेले. उंच जोत्यावर चारी बाजूला पडवी आणि पडवीतून खोल्यांमध्ये जाणारे दरवाजे.

पडवीत येणाऱ्यांसाठी भारतीय बैठका, आधुनिक सोफासेट्स मांडलेले. एकंदरीत पारंपरिक आणि आधुनिकतेचा उत्तम संगम तिथे दिसत होता. 


अभिजीत स्वतः योगेशला घ्यायला स्टँडवर आला होता. अगदी छोटेसे गाव होते ते. एखाद्या चित्रातल्या प्रमाणे डोंगरांनी वेढलेले, हिरवाईने नटलेले.

बाईकवरून जाताना गावातील कमालीची स्वच्छता, नेटकेपणा, रस्त्यावर असलेले सौरदिवे नजरेत भरत होते. 


वाड्यात आल्यावर अभिजीतने योगेशला चौकात हातपाय धुवायला पाणी दिले. चार पायऱ्या चढून दोघे बैठकीत आले. तिथे अभिजीतचे वडीलबंधू अनिकेत बसले होते. त्यांनी योगेशची चौकशी केली, तो आल्याचा आनंद व्यक्त केला.

नंतर स्वयंपाकघरात हाक मारून चहा आणि नाश्ता पाठवण्यास सांगितले.   


थोड्या वेळात एक स्त्री ट्रेमध्ये चहाचे कप आणि पोह्याच्या प्लेट्स घेवून आली. अनिकेतने योगेशसोबत तिची ओळख करून दिली, 

“अनामिका, हे योगेश अभ्यंकर. अभिजीतचे मित्र.

प्राध्यापक आहेत, पुण्याला राहतात.

योगेश ही अनामिका, माझी मेव्हणी. ही पण पुण्याला राहते आणि प्राध्यापिका आहे. दरवर्षी जत्रेसाठी येते.”


चहा पोह्यांचा आस्वाद घेत योगेश आणि अनामिकाने एकमेकांच्या कामाची वगैरे माहितीची देवाणघेवाण केली.

अगदी अनौपचारिक वातावरण होते. पण अचानक अनिकेत बोलून गेला,

“राग मानू नका पण आपण कांदापोह्याच्या कार्यक्रमाला आलोय असं वाटतंय.”

शेरा ऐकून योगेशचा चेहरा उतरला तर अनामिका कपाळावर आठ्या घालून उठून निघून  गेली. वातावरणात आलेला तणाव कमी करण्यासाठी अभिजीत योगेशला घर दाखवायला घेवून गेला.

मागील दारी जुईच्या मांडवाखाली एक तरुण मुलगी पुस्तक वाचत बसली होती. यांची चाहूल लागताच तिने मान वर केली.  योगेश चकित झाला. ती जणू अनामिकाची प्रतिकृतीच वाटत होती.  

भावस्पर्शी निळे डोळे, नितळ केतकी वर्ण, भुरे केस, तरतरीत नाक आणि सुंदर ओठ. अतिशय सुंदर, मनस्वी रूप तिचे. 

“योगेश ही राधिका, अनिकेतची मुलगी.  B.A. च्या तिसऱ्या वर्षाला आहे. राधिका माझा जिवलग मित्र योगेश, प्रोफेसर आहे.” 

राधिकाने हात जोडून योगेशला नमस्कार केला.  

“नमस्ते काका, कसे आहात?”

काका! योगेश हसला. 

“अगं काका काय म्हणतेस, अजून लग्न नाही झालं त्याचं.” अभिजीत म्हणाला.

“बरं, मग योगेशजी म्हणेन. जर यांना चालत असेल तर.”  

“योगेशजी??? जरा आॅड नाही का वाटत ते मराठी कानाला?” योगेश म्हणाला.

“काकापेक्षा तरी नक्कीच चांगलं वाटेल ना?” राधिका हसत म्हणाली आणि निघून गेली. 


जेवण करून योगेश त्याला देण्यात आलेल्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला.

साधी स्वच्छ खोली झोपण्यासाठी तयार होती. योगेशने पलंगावर अंग टाकले. पडल्या पडल्या तो मोबाईल पाहू लागला. थोड्या वेळात त्याच्या कानावर गाण्याचे सूर येवू लागले, ‘रैना बीत जाए, शाम न आए’... रात्रीच्या त्या शांत वातावरणात तो मंजुळ आवाज... योगेश उठून बाहेर आला, आवाजाच्या दिशेने चालू लागला.

त्याची खोली सोडून तिसऱ्या खोलीत राधिका तंबोरा छेडत डोळे मिटून गात होती. मंत्रमुग्ध होवून योगेश तिथे उभा होता. 


गाणं संपल्यावर राधिकाने डोळे उघडले. समोर योगेशला पाहून ती संकोचली.

“किती सुंदर गातेस तू... गानसरस्वतीचे वरदान आहे तुला.” 

“थँक यू, योगेशजी. मी शिकते आहे गाणं.”

योगेश तिथेच बसला. राधिका सोबत बोलताना त्याला लक्षात आले, ती हुशार, बहुश्रुत आहे. अनेक पुस्तक वाचल्याने तिच्या विचारांची मांडणी पक्की आहे.  

“योगेशजी तुम्ही इंग्लिश साहित्य खूप सुंदर प्रकारे शिकवता असं ऐकलं मी.” 

“तुला कुणी सांगितलं?” 

“अनामिका मावशीने. खूप कौतुक करत होती तुमचं. मावशी खूप क्वचित कुणाचं कौतुक करते.” राधिका बोलत होती.

“राधिका, अनामिका मावशी अविवाहित आहे का?”

“ती एक दुःखद कहाणी आहे, योगेशजी. पण ट्रस्ट मी, ती घटना घडल्यापासून पहिल्यांदा मी मावशीला खूश बघितलं, तुमच्याबद्दल बोलताना.” 

यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते न उमजून योगेशने तिचा निरोप घेतला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी  नाश्ता झाल्यावर अभिजीतने अनामिकाला योगेशला मंदिर दाखवायला सांगितले. त्याला जत्रेच्या कामानिमित्त बाहेर जायचे होते. योगेशला अनामिकासोबत जायला थोडे ऑकवर्ड वाटत होते ते पाहून राधिकाही सोबत जायला तयार झाली.  


तिघेही तयार होवून निघाले. राधिका चाॅकलेटी रंगाच्या टाॅपमध्ये चाॅकलेटसारखीच गोड दिसत होती तर अनामिकाने पिस्ता रंगाची सुती साडी व्यवस्थित चोपून नेसली होती. लांब केसांचा शेपटा पाठीवर रूळत होता. डोळ्यांवर लावलेला काळ्या फ्रेमचा चश्मा आणि वय सोडले तर दोघी एकदम एकसारख्या दिसत होत्या.

गावातून फेरफटका मारत तिघे मंदिराकडे जात होते. रस्ताभर राधिकाची बडबड चालू होती तर अनामिका आपला करारी ॲटिट्यूड जपत होती.   


मंदिराचा कळस दुरूनही चमकत होता. सुंदर, सुबक काळ्या दगडांत बांधलेले गावदेवीचे मंदिर, पुढे भाविकांना बसण्यासाठी, भजन किर्तनादी कार्यक्रमांसाठी मोठे सभामंडप.

शांतता, स्वच्छता नजरेत भरण्याजोगी. गाभाऱ्यात देवीची मुर्ती, नजरेतील सात्विक, प्रेमळ भाव पाहून योगेशचे मन भरून आले. नकळत त्याने हात जोडून डोळे मिटले. अनामिकाने घरून आणलेली पूजेची थाळी पुजारीबुवांच्या हाती सोपवली. ती घेताना तिच्या बाजूला उभ्या योगेशकडे पाहून त्यांनी शेरा मारला,

“वा अनामिका ताई या वर्षी जोडीने आलात!”

“अहो नाही बाबा, हे अभी काकांचे मित्र आहेत. जत्रेसाठी आले आहेत.” राधिकाने परस्पर उत्तर दिले.

“अच्छा हो का, माफ करा साहेब. गैरसमज झाला होता माझा.” बाबा योगेशला म्हणाले. योगेशने हसून  काही हरकत नसल्याचे सांगितले. दर्शन झाल्यावर अनामिका राधिकाला म्हणाली, “तू यांना घेवून आपल्या नेहमीच्या जागी थांबतेस का? मी निमाला भेटून येते.” 

राधिकाने होकार दिला आणि ती योगेशला म्हणाली, “चला तुम्हाला आमची आवडती जागा दाखवते.”

मंदिरामागे थोडे चालल्यावर योगेशला ते दिसले. वळण घेत वाहणारी एक नदी, तिच्यावर पायऱ्या पायऱ्याचा घाट आणि शेजारी बांधून ठेवलेली एक नाव.

“ओह माय गाॅड, अगदी एखाद्या रोमॅंटिक कादंबरीसारखे दृष्य आहे हे!” योगेश उद्गारला. 

“आम्ही इकडे आलो की मावशी नेहमी पुजारीबाबांची मुलगी निमाला भेटायला जाते आणि मग मी इथे तिची वाट पाहत बसते. किती शांत छान वाटत या पायऱ्यांवर पाण्यात पाय सोडून बसायला.

मी जेव्हा लहान होते ना तेव्हा इथे बसून वाट पाहायची. वाटायचं पांढऱ्या घोड्यावरून दौडत जाणारा देखणा राजकुमार इथे नदीकाठी पाणी पिण्यासाठी थांबेल. मग माझ्याकडे त्याची दृष्टी वळेल. मग हळूच मला उचलून घोड्यावर बसवून भरधाव घेवून जाईल.” 

राधिकाचे स्वप्नाळू डोळे दूर कशाचा तरी वेध घेत होते. झाडांच्या पानांमधून पडणाऱ्या कवडशांमुळे तिचे भुरे केस सोनेरी रंगात न्हावून निघत होते. त्याक्षणी योगेशला ती आपल्या राजकुमाराची वाट पाहणारी सुंदर राजकुमारीच भासली. वयाचे अंतर पार करून नकळत तो तिच्याएवढा झाला होता. काय होवू पाहत होते?

“भरपूर परीकथा वाचण्याचा हा परिणाम, नाही का?” राधिका हसत म्हणाली आणि योगेश वास्तवात आला. 

तेवढ्यात अनामिका तिथे आली. योगेश आणि राधिकाला तिने प्रसाद दिला. योगेशला देताना अनामिका थोडीशी लाजली. ते पाहून राधिकाने मान फिरवली.  

उरलेले दिवस कधी अनामिकासोबत तर कधी तिच्याविना योगेश आणि राधिका रोजच नदीवर जात असत. उत्साही राधिकाचा मोकळा स्वभाव पाहून योगेशला परत माणसात आल्यासारखे वाटत होते. विशाखा गेल्यावर लोकांच्या कणवेच्या नजरेने त्याला लोकात मिसळताना बुजल्यासारखे वाटायचे.

पण आता मात्र सर्व जळमटांवरून बोळा फिरत होता. फिरूनी नवी जन्मेन मी अशी त्याची अवस्था झाली होती.  


घरात मात्र वेगळीच कुजबूज चालू होती. अनिकेतला अनामिका आणि योगेशचा जोडा अनुरूप वाटत होता. त्याने अभिजीतकडे याबद्दल योगेशसोबत बोलण्याची गळ घातली.

हे सर्व योगेशच्या नाही पण राधिकाच्या कानावर मात्र पडत होते. शेवटी जत्रा झाल्यावर हा विषय अनामिका आणि योगेशजवळ काढण्याचे ठरले, परंतु अभिजीतला मात्र पाहुणा म्हणून आलेल्या मित्राला असे काही सुचवावे हे पटत नव्हते.  

जत्रेचा दिवस उजाडला. भल्या पहाटे वाड्यात लगबग सुरू झाली.

स्नानादि कर्म उरकून पुरूषमंडळी सोवळं नेसून तर स्त्रिया साडी नेसून सालंकृत तयार झाल्या. गर्द गुलाबी रंगाचा रेशमी कद योगेशवर खुलून दिसत होता. उघड्या अंगावर अभिजीतने दिलेले उपरणं टाकून तो खाली आली. खाली उभ्या बायकांमध्ये त्याची नजर राधिकाला शोधू लागली. ती अनामिकाबरोबर बोलत उभी होती.

आज दोघींनी तयार होण्यासाठी थोडे जास्त परिश्रम घेतल्याचे जाणवत होते. योगेशने त्यांच्याकडे पाहून सुंदर अशी बोटांनी खूण केली. अनामिकाच्या गालांवर लाली पसरली. ते पाहून आपण चूक केल्याचे त्याच्या लक्षात आले. कारण त्याने राधिकाला दाद दिली होती. त्याच विचारात योगेश पुर्ण दिवस अस्वस्थ होता पण त्याला न्याहाळणाऱ्यांनी मात्र त्याचा सोयिस्कर अर्थ लावला.

“योगेश, दीपोत्सव पाहायला येतो आहेस ना?” 

अभिजीतच्या प्रश्नाने योगेश भानावर आला. तो विचारात मग्न होता. गेले चार दिवस त्याच्याबरोबर घडणाऱ्या घटना सुसंगतपणे लावण्याचा प्रयत्न करत होता. अनामिका...

अनामिकाबद्दल तो विचार करत होता. तिच्या आयुष्यात काय घडले होते हे त्याला नक्की माहीत नव्हते परंतु त्याचा परिणाम म्हणून अनमिकाचे शुष्क, कठोर स्त्रीमध्ये रूपांतर झाले होते. पण राधिकाच्या म्हणण्यानुसार योगेशच्या व्यक्तिमत्वाने, वागण्या-बोलण्याने तिचा हा मुखवटा उतरला होता. अवघ्या चार दिवसात अनामिका पुन्हा पहिल्यासारखी आनंदी, खेळकर दिसत होती.

“तुम्ही काहीही म्हणा योगेशजी पण तुम्ही ना त्या कथेतील राजकुमारासारखे आहात जो चिरंतन मोहनिद्रेतील राजकुमारीला चुंबनाने जागी करतो.” अनामिकाबद्दल बोलताना राधिका म्हणाली होती. 

“अरे ऐ माणसा, तुझ्याशीच बोलतोय मी.” अभिजीत योगेशला हलवत होता.

“अं? तू हो पुढे. मी येतो मागून. आता मला माहीत आहे मंदिर कुठे आहे ते.” योगेशने उत्तर दिले.  

अभिजीत निघून गेला आणि योगेश पुन्हा विचारात बुडला. राधिका...जवळ जवळ  आपल्या निम्या वयाची मुलगी पण मन मात्र तिच्यातच गुंततंय. हे चुकीचे आहे हे जाणवूनसुद्धा.

ती आहेच तशी लाघवी. नशीब आतापर्यंत तरी काही चुकीचे बोललो किंवा वागलो नाही. एक उसासा सोडून योगेश मंदिरात जाण्यासाठी उठला.  

दीपमाळ झगमगत होती. स्त्रिया, मुली दिवे उजळत होत्या. सर्वत्र उजेडाचे साम्राज्य होते, पवित्रता कणाकणात भरून वाहत होती.

योगेशला अभिजीतच्या घरची मंडळी दिसली. अनामिका, तिची बहीण, राधिका एकत्रित होवून दीप लावत होत्या. त्या दिव्यांच्या प्रकाशात त्यांचे दैवी सौंदर्य उजळले होते. अनामिकाने नजर उचलून योगेशकडे पाहून स्मित केले. योगेशने ही तसेच केले. काही वेळ थांबून तो परत घरी आला.

कपडे न बदलता दार नुसतं लोटून घेवून पलंगावर पडून राहिला. रात्री कधी झोप लागली हे समजले नाही. 

सकाळी उठल्यावर योगेशने आपली बॅग भरली. आज तो अभिजीतचा निरोप घेणार होता. याचा शेवट कसाही होवो पण सुंदर आठवणी मात्र कायमच्या मनात राहणार होत्या. जिना उतरून तो खाली आला.

अनिकेत, अभिजीत नाश्त्यासाठी त्याची वाट पाहत होते. प्रत्येकजण शांत होता. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती. खावून झाल्यावर अनिकेत विषयाला हात घालणारच होता आतून अनिकेतची बायको आली.

“अहो राधिका सकाळपासून दिसत नाही कुठे. जरा बघता का बाहेर?”

“अगं असेल इथेच कुठेतरी.” अनिकेत म्हणाला.  

“नाही हो, पहाटे मला दार उघडल्याचा आवाज आला होता.” ती रडवेली झाली होती.

अभिजीतसोबत योगेशही उठला. “चल, मी पण येतो” म्हणत तो निघाला. बाहेर आल्यावर अभिजीत राधिकाच्या मैत्रिणींकडे गेला तर योगेशने घाटाचा रस्ता धरला. ती तिथेच असली पाहिजे, तिच्या आवडत्या ठिकाणी.  

राधिका घाटावरच होती. पाण्यात पाय सोडून बसली होती. योगेश तिच्या जवळ जावून बसला. तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिले.

“तुम्हाला काय वाटते, राजकुमार असतात?” तिने प्रश्न केला.

“मला काय वाटते यापेक्षा तुला काय वाटते हे महत्वाचे नाही का?” योगेशने उत्तर दिले.

“असतात राजकुमार. मला एक भेटला. अगदी स्वप्नात असतो तसा, देखणा, सर्वगुणसंपन्न. पाहता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले. अगदी कशाचाही विचार न करता. काय करू मी योगेशजी? मला माहीत आहे ही अशक्य गोष्ट आहे. आज बाबा तुम्हाला अनामिका मावशीबद्दल विचारणार आहेत. काल रात्री मी हे ऐकलं.

एक मन मावशीबद्दल खूश आहे कारण जर तुम्ही होकार दिलात तर आयुष्यात पहिल्यांदा आणि मग पुर्ण आयुष्यभर ती सुखी होईल. तीसुद्धा तुमच्यावर प्रेम करू लागली आहे. आख़िर मावशी किसकी हैं!”  

राधिकाने विनोद करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. योगेश गंभीर होता.

“राधिका, बरं झालं तू मला इथे भेटलीस. काल रात्रीपर्यंत मी ही वाहवत गेलो होतो. तू म्हणतेस तसं ही गोष्ट अशक्य आहे. लग्न फक्त भावनांमुळे यशस्वी होत नाही तर त्यात अनेक फॅक्टर्स असतात. आपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्या आपल्याला मिळतातच असे नाही. That's the beauty of life.

आपल्याबद्दल सांगायचे तर तू माझ्या निम्म्या वयाची आहेस. कदाचित तू म्हणशील की हे महत्वाचे नाही. आता या गोष्टी साध्या वाटतात पण एकदा भावनेचा भर ओसरला की मागे राहतो तो फक्त पश्चाताप. आणि यामुळेच मी हे होवू देणार नाही मग तुझ्यासाठी माझ्या भावना काहीही असल्या तरी.

अनामिकाबद्दल बोलायचे झाले तर मी ते नंतर फिगर आऊट करेन पण तू माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरणारी गोड परी आहेस आणि कायम राहशील.” तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला.

योगेशने उठून राधिकाला हात दिला. दोघे हातात हात घालून पायऱ्या चढू लागले. मधेच राधिका थांबली.

“You know what, राजकुमार असतात. मला जो भेटला तो मी मावशीला दिला. मला दुसरा तसाच भेटेल. हो ना काका?” 

दोघांच्या मोकळ्या प्रसन्न हसण्याने वातावरण मुग्ध झाले. मनात मात्र वाजत होतं,

‘काहे सताएँ आजा...’

समाप्त

ही कथा तुम्हाला आवडेल, 👉 बाप उभा अंगणात

©️Savita Kirnale

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post