ती मी नव्हेच भाग पाच

  "ती मी नव्हेच"भाग ५

✍️ सौ. उज्वला रहाणे 

भाग चार

मागील भागात आपण पाहिले. वकिल आणि शोभा शशांकच्या वेलप्लॅंनिंग प्रमाणे पुरते पोलीसांच्या जाळ्यात अडकले.


   शशांक व शीला या कटात सामील आहेत याची सुतराम शंका शोभाला आली नाही. त्यामुळे ती अजूनही शशांकवर आंधळा विश्वास ठेवूनच होती.


  सकाळी उठल्यावर सुरेशने शशांकला विचारले. "अरे तू घरी कसा हॉस्पिटलमध्ये गेला नाहीस का रात्री?"


  "हो बाबा गेलो होतो.आत्ताच परत येतो आहे. तुम्हांला छान झोप लागली होती म्हणून उठवले नाही. आताही तुम्ही आराम करा. आम्ही आहोत. काळजी नका करू."


   इतक्यात शीला नाष्टा घेऊन आली. 

"बाबा तुमचे आवरलं का नाष्टा करताय का? आणि हो आजही आॉफीसला जाऊ नका. तश्या तुमच्या बऱ्याच रजा बाकी आहेत ना मग कळवून टाका येत नाही म्हणून." शीला म्हणाली.


    "हो कळवतो. पण तुमच्या अभ्यासाचे काय? एका मागोमाग एक संकटे येताय धावून अगदी बोलावल्या सारखी. या विवंचनेत तुमचा अभ्यास  होतो का?"


   "त्याची काळजी नका करू बाबा. माझा अभ्यास पुर्ण झाला आहे. फक्त पेपर हाती येणे बाकी आहे."


"आणि हो माझा पण बाबा. यावेळी मी पण पहिल्या पाचात बर का!" शशांकने विषयांतर केले.


    सगळ्यांनी मिळून नाष्टा केला. दवाखान्याचे निमित्त करून शशांक बाहेर पडला.


      हळूच त्याने शीलाला सांगितले. "पुढील अपडेट मी देईल तुला फक्त फोन तुझ्या बाजूला असू दे. कदाचित काही इमर्जन्सी असेल तर तुला व मामाला यावे लागेल पोलीस ठाण्यात. तयारी ठेव.'

शीलाने होकार दर्शवला.


शशांक पोलीस ठाण्यात पोहचला. रात्रीची शिफ्ट चेंज झाल्यामुळे त्याला रात्रीचे एकही पोलीस दिसले नाहीत.   त्याने काऊंटरवर चौकशी केली. तेंव्हा समजले कालचे आरोपी आत आहेत. त्यांची चौकशी चालू आहे.


   इतक्यात कालचे एक पोलीस आत येताना शशांकला दिसले. शशांक धावतच गेला.


  शशांकला पाहताच पोलीस त्याला आदराने बोलले. "धन्यवाद पोरा, फार मोठे काम केलेस. या बाईच्या शोधात आम्ही बरेच दिवस होतो. पण ताकास सूर लागत नव्हता. ही बाई नावे बदलून फिरत होती.

पोरं पकडून विकणाऱ्या टोळीतील महत्वाची सुत्रधार आहे. हाती लागत नव्हती. तिचा मोरक्या जेलमध्ये सडतोय केंव्हाच हाती आलाय. त्यानेच हिच नाव सांगितले पण हाती मात्र लागत नव्हती.   आज तुझ्यामुळे पुन्हा ती फाईल उजेडात आली बघ." पोलिसांनी मग शशांकला तिच्या बाबतीत माहिती विचारली. शशांकने इत्यंभूत सगळी माहिती दिली.


   आता शशांकही निर्धास्त झाला. आणि पोलीसांची   पुढील कारवाईसाठी कामं सोपे झाले.


"तुम्ही जाऊ शकता मदत लागणार आहे." त्यांनी शशांकचा नंबर घेतला.


    जाताना पोलीस स्टेशनच्या गेटसमोर एक जोडपे रडताना शशांकला दिसले. पटकन् आत जाऊन पोलिसांना शशांकने खबर दिली.


  पोलीस म्हणाले, "ते रोज यावेळी येतात. खुप आर्जव करतात, रडतात, पडतात. मुलाचा शोध घ्या म्हणतात.  पण काय करणार? कसा शोध घेणार? काहीच पुरावा नाही. फक्त एक फोटो तोही लहानपणीचा. काही विचारले कि म्हणतात साहेब त्यांच्या उजव्या दंडावर जन्मखूण आहे. आता  हा पुरावा कसं सिध्द करणार. चांगले सुशिक्षित जोडपे पण आता अवस्था बघ."


    शशांकचे पाय या जोडप्या जवळ थबकले. काहीतरी जाणवले. त्याच्याकडे बघून त्यातील स्त्री म्हणाली, "आज माझं बाळ तुझ्या एवढेच असते रे, कोठे असेल? घराच्या बाहेर रांगते लेकरू खेळत होतं तिथूनच गायब झाले. याला मीच जबाबदार. मीच."


"अग स्वतःला कशाला दोष देतेस. मी तितकाच जबाबदार ग! पोलीस नुसतेच म्हणतात शोध घेतो आहे पण आजूनही आमचा मुलगा त्यांना मिळत कसा नाही. आमचा तर न्यायदेवतेवरचा विश्वास उडत चालला आहे."


दोघेही अगदी गलबलून बोलत होते. का कोणास ठाऊक शशांकच्या काळजाला त्यांचे बोल घर करत होते. त्यानी  दोघांचीही समजूत घातली.


घरी जायला सांगितले.नाही जाणार असे ते ठामपणे म्हणाले.  मग शशांक म्हणाला, "मी मदत करतो तुम्हांला. अश्वासन देतो मग तर झाले. मग चला आता घरी."


"नक्की ना?" त्यांनी एक फोटो शशांकला दाखवला.आणि जन्म खुण पण सांगितली. शशांकने रिक्षात बसवून त्यांना घरी सोडायला गेला.


घर छान होते घर कसले एक टुमदार बंगलाच. शशांक बघतच राहिला. त्या दोघांनी त्याला घरात येण्यासाठी विनंती केली. तो ही नाही म्हणू शकला नाही.


गेटवरची  डोअरबेल दाबताच एका स्त्रीने दार उघडले. इतक्यात मागच्या दाराने एक माणूस आला. तो म्हणाला. "साहेब कशाला जाता रोज त्या पोलीस स्टेशनचे खेटे घालायला. आपले राजूबाबू नाही मिळणार आता! २५ वर्ष झाली आता या घटनेला."


  शशांकने त्या माणसाला विचारले. नक्की काय प्रकरण आहे. त्या माणसाने जे सांगितले ते ऐकून शशांक पुरता हलवून गेला.
    "पोरा गेली २५वर्ष झाली त्यांचा पोटचा गोळा या गेटवरूनच गायब झाला. तेंव्हापासून ते त्या लेकराला शोधतायत.


मॅडम पोराला आतल्या गेटमध्ये खेळवत होत्या. इतक्यात एक भिकारीण आली. तिच्या कडेवर लेकरू होते. काहीतरी खायला द्या पोराला भूक लागली म्हणू लागली. मॅडमला दया आली. राजूबाबूला तिथेच सोडून तिला काहीतरी खाणे आणण्यासाठी आत गेल्या.


  तिने डाव साधला. गेट उघडून पटकन् राजूबाबूला उचचले आणि पळ काढला. मॅडम बाहेर आल्या ती बाई नव्हती आणि राजाबाबू पण दिसले नाही.


  खुप शोधले. तेंव्हा कळाले गावात पोरं चोरणारी टोळी वेग वेगळ्या वेशात फिरते.आहे त्यांनीच पळवले.


   कोठे नेले काय झाले आजगायत पत्ता नाही. पोलिसांनी खुप शोधले. शोधण्यासाठी बराच पैसा पाण्यासारखा ओतला. पण शोध लागत नाही.

  पोलिसांनी तर केंव्हाच फाईल क्लोज केली. वेडी आशा या दोघांचीही.


  बरोबर त्याच वेळेस दोघेही राजाबाबूला शोधत पोलीस ठाणं गाठतात. मग येतात हात हलवत.


   आज घरात सगळे ऐश्वर्य आहे. आम्ही दोघे नवरा बायको त्यांच्या सेवेला असतो. साहेब मोठ्या हुद्द्यावर आहेत. चारचाकी ती चारबांगडयावाली गाडी आहे. हा बंगला. मॅडम पण चांगल्या हुद्द्यावर होत्या पण राजीनामा देऊन घरी बसल्या." हे सगळे ऐकून शशांक सुन्न झाला


    शशांक आत गेला. त्याला ऐश्वर्यसंपन्न घराची प्रचिती आलीच. त्याला त्या स्त्रीने पाणी दिले. पाणी पिताना त्याचे लक्ष सहज भिंतीवर टांगलेल्या फोटो कडे गेले.


  'बापरे हा तर माझाच फोटो नाही ना! लहानपणीचा फोटो मी अगदी असाच दिसतो. मग ती खूण आपल्या उजव्या दंडावर तर खुण म्हणजे भाजलेल्याचा व्रण आहे. म्हणजे याच्याशी आपला काही संबंध नाही हे खरे.'   'नाही, नाही हे कसे शक्य आहे. लहानपणी सगळी बाळे सारखीच दिसतात.' म्हणत शशांक  त्या सभ्य लोकांचा निरोप घेऊन बाहेर पडला. पुन्हा येतो हे अश्वासन देऊन.


  चालताना तो विचार करत होता. शोभाई पण म्हणायची तू अनाथ आहेस. म्हणजे आपण पण पळवलेल्या बाळापैकी एक आहोत का?


   नुसता गुंता आहे सगळा एका संकटातून बाहेर पडतो तोच दुसरे आ वासून उभा राहते. नाही याप्रकरणाचा छडा लावायचाच.


   या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त शोभाईच देऊ शकते. तीच्याकडून वदवून घेणे गरजेचे. तिने मला पळवले कि, आणखी कोणी? मीच यांचा राजाबाबू कि, आणखी कोणी? या सभ्य लोकांना मी फसवणार नाही आणि त्यांची फसवणूक पण होऊ देणार नाही.


   या प्रकरणाचा छडा लावायला हवाच पण आता आपण शोभाई पर्यंत पोहचणार कसे?.


   बघूया प्रयत्न करुन यासाठी पोलीसच आपली मदत करतील.आजचा सगळा वृत्तांत घरी जाऊन त्यांने शीलाला सांगितला. बापरे किती कठीण आहे सगळे शीला पण अवाक्.

  बाबांना असेच थातूरमातूर कारणे देऊन शशांक आणि शीलाने वेळ निभावून नेली. आजचे मरण ऊद्यावर.


  ऊद्या नक्कीच काहीतरी या प्रकरणाचे धागे दोरे मिळतील बघूया प्रयत्न करून. आता शीलाची मदत आपल्याला घ्यावी लागणार.


   काय करणार शशांक?शीला करेल का त्याला मदत पाहूया पुढील भागात.


क्रमश:

भाग अंतिम

©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे


वरील कथा सौ. उज्वला रहाणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

3 Comments

  1. चौथा भाग नाही टाकला

    ReplyDelete
  2. पुढील भाग लवकर टाका

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post