शापित भाग ६
✍️ सोनाली जाधव
मागील भाग इथे वाचा
👇
पोलिस वॅन आणि ॲम्ब्युलन्स आल्यावर माधवने इकडे काय झाले ते अजून तरी कुणाला सांगू नका अस सगळ्यांना सांगितले. कारण त्यावर कुणी ही विश्वास ठेवला नसता. सगळे प्रवासी वॅन आणि अँब्युलन्समधून शहराकडे निघाले. सगळ्यांना उपचाराची गरज होती म्हणून सरकारी हॉस्पिटल मधे ठेवण्यात आले. त्यातून काही जणांना थोडी फार दुखापत झाली होती तर काहीच्या डोक्यावर परिणाम झाला होता. बरेच जण मनोरुग्ण झाले होते. लहान लहान मुलं अशक्त झाली होती. हे सगळं काय आहे कसे झाले
पोलिस त्यांना खोदून खोदून विचारत होते पण कुणी ही काही बोलू शकले नाही पुन्हा तो प्रसंग आठवला तरी भीतीने घाबरायला व्हायचं.
वर्तमान दिवस
माधव असाच हॉस्पिटलच्या खिडकीतून शून्यात नजर लावून बसला होता. डॉक्टरांनी त्याला जास्त ताण घेण्यास मनाई केली होती. झोपेचे इंजेक्शन देऊन ही त्याला झोप येत नव्हती. बरेच जणांचे नातेवाईक एव्हाना हॉस्पिटल मधे येऊन पोहचले होते.
काही जणांना घरी जाऊ देण्यात येत होते तर काहींची स्थिती खूप गंभीर होती.
एव्हाना दोन दिवसापूर्वी गायब झालेले बसचे प्रवासी सापडले आहेत ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली तशी तिथे गर्दी होऊ लागली.
माधवचा मित्र इन्स्पेक्टर आकाश, माधवची आई, माधवचे मामा हे पण हॉस्पिटल मधे पोहचले होतें. आईला बघताच त्याला गहिवरून आले. एका क्षणी तर त्याला अस वाटलं होते की पुन्हा या जन्मात आईला आपण परत कधीच भेटू शकणार नाही.
तो आईच्या कुशीत मनसोक्त रडला. आईला काही समजले नाही, पण तिने त्याला रडू दिलं .
आईसमोर माधव काहीही बोलला नाही. आई आणि मामा जाताच त्याच्या मित्राने त्याला विचारले,
"बोल काय झाले? मी तुला कधीही इतकं निराश बघितले नाही आजवर. नक्कीच काही तरी गंभीर झाले आहे."
आकाश माधवचा पक्का मित्र होता. माधवच्या लाईफची एक एक गोष्ट त्याला माहित होती.
माधवने त्याला घडलेला सगळा वृत्तांत थोडक्यात सांगितला.
"ओ माय गॉड!! अन बेलिवेबल ! आजच्या एकवीसव्या शतकात असे काही घडू शकते विश्वासच होत नाही." आकाशने प्रतिक्रिया दिली.
"हो मी जर प्रत्यक्ष स्वतः डोळ्यांनी पाहिलं नसतं तर मी ही विश्वास केला नसता. पण हे सगळं घडलं माझ्या डोळ्यादेखत." माधव बोलला.
"ते ठीक आहे माधव पण जे लोक यात मेले त्यांचं काय? कारण यावर कुणी ही विश्वास करणार नाही." आकाशने आपली शंका बोलून दाखवली. "ते आपण नंतर बघू आता तू आराम कर जास्त स्ट्रेस घेऊ नको ."असं बोलून आकाश तिथून निघून गेला.
दाराच्या आडून मामा हे सगळं ऐकत होते. माधवला काही ही केल्या चैन पडत नव्हता.
त्याने डॉक्टरांना भेटून लगेच डिस्चार्ज मागितला आणि तो घरी गेला.
त्याचे मामा आणि आई आपसात काही बोलत होते.
"माधवला हे सत्य काही ही झाले तरी कळता कामा नये. पार खचून जाईल तो. "
"तू खरंच हे सगळे ऐकलेस का?" माधवची आई मामाजवळ बोलत होती. यातले काही शब्द माधवच्या कानी पडले.
"काय मला कळता कामा नये आई?"
माधवचे शब्द ऐकून दोघं ही सावध झाले.
"अरे माधव तू कधी आला? मला बोलवलं असत, मी आलो असतो ना घ्यायला तुला." माधवचे मामा मधेच बोलले. माधव तिकडे लक्ष न देता सरळ आईजवळ गेला .
"आई! काय लपवत आहे तुम्ही माझ्यापासून ?"
"सगळ्या गोष्टी तुला सांगणं मला जरुरी वाटतं नाही. काही गोष्टी नाही कळल्या तेच बरं असते" म्हणत आई तिथून उठून रूममधे गेली.पाठोपाठ मामाही गेले.
माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मला सारखं वाटत आहे काही तरी तर आहे जे माझ्या पासून लपवलं जात आहे. पण ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार मला?"
माधव ची बेचैनी काही केल्या कमी होत नव्हती. तो रात्रभर विचार करत होता .अखेर त्याने पुन्हा त्या गावात जायचा निर्णय घेतला जिथे त्यांना आश्रय मिळाला होता.
माधव एकट्यानेच सकाळी सकाळी त्या गावाकडे निघाला. गावात कुणी ही त्याच्याशी या विषयावर बोलायला तय्यार नव्हते. त्याने खूप प्रयत्न केले पण काहीही उपयोग होत नव्हता. उलट सगळे त्याला या भानगडीत पडू नको म्हणून सांगत होते. जीव वाचला आहे याचा आनंद मान आणि जा इथून .
तो खूप निराश झाला आणि जायला निघालाच होता की एक झक्कड म्हाताऱ्याने त्याला थांबवलं.
"मी तुला सगळ सांगतो पण मला काही तरी द्यावं लागेल तुला." तो म्हातारा माधवला बोलला.
"हो नक्की, जे मागणार ते देईल." क्षणाचा ही विलंब न करता माधवने सांगून टाकले.
"चल मग तिकडे दूर शेतात जाऊ. इथे जर आपल्याला कुणी पाहिलं तर बोलता येणार नाही." म्हातारा बोलला.
ते दोघे दूर एका विहिरीजवळच्या झाडाजवळ जाऊन बसले. खरं तर माधवला त्या म्हाताऱ्याची भीती वाटत होती. त्याने जे अनुभव घेतले होते त्या नंतर त्याला कुणावरही विश्वास होत नव्हता.
"तुझ नाव काय?" बाबाने विचारले.
"माधव."
वडील, कुठे राहतो वगैरे प्रश्न केले. मग त्याने जे सांगितले ते ऐकून माधव चक्कच पडला.
बाबा सांगू लागले,
"ऐक, फार वर्षापूर्वी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी, राधापूर पण एक सामान्यच गाव होतं. त्याच नाव राधापूर नंतर झाले. त्याचे नाव आधी दुसरंच काही तरी होत. काय होतं बरं?" तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला.
"जाऊ दे ! तर राधापुर गावात एक तरुणी होती. राधा नाव तिचे. राधा नाव ऐकताच माधवला खूप गहिवरून आले. का ते त्याला ही नाही कळलं.
"राधा ही गावातल्या ब्राह्मणाची दत्तक मुलगी होती. खूप सुंदर होती दिसायला. स्वभावही खूप छान होता तिचा. सगळ्यांना मदत करणं, विचारपूस करणे ,मनमिळाऊ होती ती खूप. पण एक दिवस अचानक!"
"मग काय?" माधव उत्सुकतेने बोलला.
"एक दिवस गावतल्या सावकाराच्या मुलाची तिच्यावर वाईट दृष्टी पडली. त्याने तिला मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण राधा आणि तिचे आई वडील अजिबात तय्यार होत नव्हते. त्याला खूप राग आला आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. यात राधाकडून प्रतिकार करत असताना सावकाराच्या मुलाचा खून झाला. याचा राग येऊन सावकाराने तिला ती डाकीण आहे, गावातले लहान मुल खाते असा आरोप करून तिची निर्घृण हत्त्या केली. यात गावातले लोक पण सामील होते. यात तिचे आई वडील पण मेले. तिने मरता मरता पूर्ण गावाला श्राप दिला की मी जश्या यातना भोगत मरते आहे तसेच तुम्ही पण मरणार. मला डाकीण म्हणता आहात ना, तुम्ही पण एक दुसऱ्याचे मास खाणार, ना जगणार ना मरणार अशी तुमची स्थिती होईल. आणि तेव्हा पासून ते गाव हळू हळू पिशाच्च होऊन गेले."
"आणि तो सावकार "माधवने प्रश्न केला
"त्याच काय झाल काय माहीत. ही श्रापची बातमी सगळीकडे पसरली आणि कुणी ही त्या गावाशी संपर्क ठेवला नाही. तिथे एकाएकी दुष्काळ पडला उपासमार झाली. सगळं गाव होत्याच नव्हतं झालं."
"मग ते पिशाच इकडे आले तर कधी?" माधवचा पुन्हा प्रश्न.
"नाही येऊ शकत. गावाच्या हद्दीवर मारुतीचे देऊळ आहे तेच त्यांना इकडे येऊ देत नाही ."
श्या, विश्वास होत नाही. असं ही होऊ शकतं का? माधव विचारात पडला.
"काय माधव विश्वास होत नाही ना?!"
"अरे नाही बाबा, असं कधी ऐकल नाही ना म्हणून. बोला काय देऊ तुम्हाला?" माधवने बाबाला विचारले.
"मला काही नको पण एक वचन दे !"
"हो बोला ना. "
"त्या पोरीला मुक्त कर रे. तिचा काही दोष नाही." म्हणून ते बाबा रडायला लागले.
"मी? मी कसा मुक्त करणार मी एक सामान्य मनुष्य आहे." माधव बोलला.
"तू नाही तर कोण? राधा माधवची वाट बघतेय कधीची", असं अर्धवट बोलून माधव काही बोलण्या आधी ते निघून ही गेले.
माधवला विचारात टाकून.
आता पुढे काय!!?
कोण आहे राधा?
बघू पुढच्या भागात.
क्रमशः
पुढील भाग इथे वाचा
👇
वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.