शापित - भाग ५
माधवला जरी कुणी काही दोष दिला नसला तरी त्याला मात्र अपराधी असल्यासारखे वाटत होते.
आता जवळ जवळ सगळेच बसमधून खाली उतरले होते. बाहेर काल रात्रीच्या हल्ल्यात मृत झलेल्या लोकांचे केवळ कपडे आणि हाडाचा खच पडलेला दिसत होता. त्याला बघून त्यांच्या नातेवाईकांनी टाहोच फोडला. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे नातेवाईक अगदी हिंसकरीतेने मारले गेले होते.
सगळीकडे रडारड सुरू होती. ते बघून माधवला अजूनच स्वतःचा राग येत होता.
"का? मी कालच इथून निघून गेलो नाही. जर आम्ही इकडून कालच निघून गेलो असतो तर हे सगळ घडल नसतं."
माधव स्वतःशीचं बोलला आणि त्याने पायाने जोरात एका दगडाला लाथ मारली. तो दगड एका पत्र्याला लागल्यासारखा आवाज आला तसा माधव तिकडे वळून बघू लागला. गावात पाऊल ठेवायची इच्छा आणि हिम्मत दोघंही नव्हत्या पण तरी त्यानी तिकडे जाऊन पाहिले. तिकडे एक पत्र्याचा बोर्ड जर्जरीत अवस्थेत पडला होता त्यावर लिहले होते, 'राधापुर' आणि खाली लिहले होते, 'गावात जाण्यास सक्त मनाई आहे '. हा बोर्ड काल कसा दिसला नाही. माधव स्वतःशीच बोलला. पाल्यापाचोळ्या खाली तो झाकला गेला होता. त्याने तो उचलून पुन्हा नीट लावला.
"श्या!!आता काय उपयोग आहे याचा जे अघटीत घडायचं होत ते काल घडून गेलं." माधव मनातच बोलला.
आता वेळ वाया घालवून काही उपयोग नव्हता. जे करायचं ते लवकरात लवकर करावं लागेल. माधवने जवळपासचा पालापाचोळा काही लाकडं जमा केली आणि तो सगळं हाडाचा भुगा, कपडे एकत्र करून त्याला जाळून टाकले.
"बिच्चारे ! नीट अंतिम संस्कार पण करता आला नाही त्यांच्यावर".
मधेच कुणी तरी बोलले तसं माधवला पण खूपच वाईट वाटले. त्याच्या पण डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते. राहून राहून त्याला दोषी असल्यासारखे वाटत होते.
पण आता इथे रडून काही होणार नाही इथून बाहेर पडायलाच हवे अस विचार करून माधव तिथून उठला .
"चला उठा लवकर आपल्याला काही ही करून इथून जायचे आहे."माधव बोलला.
"पण कसं जाणार? बस तर अजिबात हलत नाहीये."ड्रायव्हर बोलला.
"बस राहू देत इथेच. आता आपला जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. आपण इकडून चालत चालतच जाऊ या. बघू पुढे काही मदत मिळते का म्हणून." माधवने सर्वांना सांगितले .
पण कुणामधेही चालण्याची शक्ती राहिली नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता.
माधवने पुन्हा थोडं जोरात सांगितले, "उठा आता दुसरा काही ही उपाय नाही. सामान वैगरे काही ही घेऊ नका, उठा." असे म्हणत त्याने सगळ्यांना आधार देऊन उठवलं .पण खुद्द माधवचा पाय तिथून काही निघत नव्हता. माधवला कुणी तरी अज्ञात शक्ती खेचते आहे असंच सारखे वाटत होते त्याने तिकडे लक्ष दिलं नाही आणि तो चालू लागला.
सगळे जण तसेच त्याच्या पाठोपाठ चालू लागले. सकाळचे नऊ वाजत होते. ऊन जास्त नव्हते पण दोन दिवसाची उपासमारी आणि रात्रीचा तो हल्ला यामुळे कुणाच्याही अंगात त्राण नव्हते. त्यातून लहान मुलांना कडेवर घेऊन चालणं म्हणजे मोठी परीक्षाच होती.
माधव स्वतःही खूप थकला होता पण धीर सोडून चालणार नाही म्हणून त्याने सगळ्यांना प्रोत्साहित केलं.
"चला !! तुम्हाला हे करावंच लागेल आपल्या मुलांसाठी परिवारासाठी, स्वतःसाठी". त्याच्या बोलण्याने बराच हुरूप येत होता. थोडे फार चालून आल्यावर त्यांना एक मारुतीच देऊळ दिसले.
सैतानांच्या तावडीत सापडल्यानंतरच खर तर देवाची किंमत कळते. काही जण धावत जाऊन देवासमोर डोके टेकवू लागले तर काहीजण देवाला दोष देत होते. ते देऊळ बघून त्यांना खूप बरे वाटले. आपण खरचं किती मोठ्या संकटातून बाहेर पडलोय याची सगळ्यांना जाणीव होती. नाही तर त्या अमानवीय शक्तीपुढे निभाव लागणे कुणालाही शक्य नव्हते.
तिथे एक जुना हेंडपंप दिसला. माधव आणि काही जण तिथे लगबगीने गेले पंप चालवून पहिला. कदाचित तो खूप वर्षापासून बंद असावा म्हणून चालत नव्हता. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर यातून पाणी येऊ लागले. पाणी बघून सगळ्यांना खूप आनंद झाला .
सगळ्यांनी मनसोक्त पाणी पिले. दोन दिवसापासून पाण्याचा एक थेंबही पोटात गेला नव्हता. पाणी पिऊन सगळ्यांना थोडं बरं वाटायला लागलं. माधवने पुन्हा सगळ्यांना उठायला सांगितले .
"चला! चला ! वेळ वाया घालवून चालणार नाही. आपल्याला अजून बरंच चालावं लागेल."
खूप वेळापासून चालून चालून सगळे आता थकले होते पण कोणतेही गाव येत नव्हते.
पण तरी माधव त्यांना घेऊन पुढे पुढे जातच होता कधीतरी कोणते तरी गाव येईलच या अपेक्षेने.
आणि माधवची अपेक्षा खरी झाली. समोरच एक गाव दिसू लागले. जिवंत लोक, जनावरे, शेती दिसू लागली.
समोर गाव बघून सगळे खूप खुश झाले आणि काही तर तिथेच बेशुद्ध पडले. समोरून एवढे लोक येताना बघून गावातले लोक पण त्यांच्या दिशेने धावले. त्यांची अशी अवस्था बघून त्यांनी काहीही विचारलं नाही आणि लगबगीने ते गावातून मदत घेऊन आले. सगळ्यांना पटापट गावात घेऊन गेले. बसायला अंथरूण टाकले. काही बायका महिला लहान मुलांना घरात घेऊन गेल्या. त्यांची अवस्था इतकी वाईट झाली होती की कुणी ही काही ही बोलत नव्हत. मनसोक्त पाणी पिऊन सगळ्यांनी तिथेच अंग टाकलं.
खूप वेळानंतर माधव त्यांच्याशी बोलू लागला. आमची बस परवा सकाळी अचानक मागच्या एका गावात येऊन झाडाला ठोकली आणि पूर्णपणे खराब झाली. पुढे काही बोलण्याचे त्याचे धाडस होत नव्हते. मी जर यांना काही सांगितले आणि त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही तर. हे लोक आपल्याला वेड्यात काढतील. माधवच्या मनात विचार आले.
तो पुढे काहीही बोलत नाही हे पाहून एका गावकऱ्यांनी विचारलं, मग पुढे काय झालं, तुम्ही काल रात्रभर तिकडेच होते का? माधव फक्त हो म्हणाला.
त्याचा हो ऐकून सगळेच जन एकदम चमकले. तिथून उठून जाऊ लागले. माधवला काही समजत नव्हते हे असे का करत आहेत म्हणून. त्यांना असे जाताना बघून माधव बोलला, "अरे थांबा कुठे जाता आहात. आमची मदत करा प्लीज."
सगळे गांवकरी त्यांच्याकडे घृणेने बघत होते. तेवढ्यात गावाचे सरपंच आले. काही लोक त्यांच्याकडे जाऊन काही तरी कुजुबुजत होते.
सरपंच पुढे येऊन म्हणाले, "हे बघा तुम्ही त्या शापित गावातून आले आहात. आम्ही तुमची काही ही मदत करू शकत नाही. हवं तर तुम्हाला थोडं फार खायला वगैरे देऊ. पण तुम्ही लवकरात लवकर इकडून जा." असं म्हणून त्याने गावातल्या लोकांना जेवणाची व्यवस्था करायला सांगितली. माधव काहीही बोलू शकला नाही. थोडं फार जे काही खायला मिळाले त्यातच सगळ्यांनी समाधान मानले.
लहान लहान मुलांकडे बघून त्यांना थोडी दया आली म्हणून त्यांनी गावातून एक डॉक्टर बोलवला. थोडी फार औषध पाणी करून दिलं .
माधवने सरपंचला विनंती केली. "गावात जर एखादा फोन असेल तर प्लीज मला देता का?" सरपंचांनी त्याला आपला मोबाईल काढून दिला. माधवने मोबाईल लगेच हावरटसारखा घेतला आणि घरी फोन करून मी सुखरूप आहे असा निरोप दिला.
पुन्हा एक नंबर त्याने डायल केला. समोरून त्याच्या एका पोलिस मित्राने कॉल रिसिव्ह केला.
माधवने त्याला त्वरित इकडे मदत पाठवण्यास सांगितले. बाकी मी तिकडे आलो की मग सांगतो असे म्हणून फोन ठेवला.
त्याने वारंवार सरपंचाचे आभार मानले केली. तेवढी मदत खूप झाली असेही सांगितले .
काही वेळानंतर तिकडे पोलिस वॅन आणि अँब्युलन्स येऊन उभ्या राहिल्या.
काय आहे शापित गावाचं रहस्य !?
वाचूया पुढच्या भागात
क्रमशः
✍️सोनाली जाधव
वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
छान
ReplyDelete