अस्तित्व

 अस्तित्व   

✍️ सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर


आज रात्री 11 वाजेपर्यंत काम पुरलं ऑफिसचं. प्रियानी लिफ्ट दिली म्हणून कशीबशी शेवटची 11:40 ची लोकल गाठता आली. शेवटची असल्यामुळे गर्दी कमी होती आज. नेहमीच्या जागी नजर गेली आणि आश्चर्यचा धक्काच बसला. आज अनिषा भेटली चांगली 3-4 दिवसांनी, आमच्या नेहमीच्या सीटवर, पण ही यावेळी? इतक्या उशीरा?


जरा वेगळीच भासली. थोडी उदास, स्वत:तच गुरफटल्यासारखी! नेहमीसारखी बघून हसली नाही. मीच पुढाकार घेऊन तिच्याजवळ जाऊन बसले.

'हाय! काय गं किती दिवसांनी भेटलीयेस?  होतीस कुठे इतके दिवस? आणि आज यावेळी कशी काय? ' मी प्रश्नांचा भडीमार केला. पण माझ्या यासगळ्या प्रश्नांवर फक्त खिन्नपणे हसली ती, आणि परत शांतपणे बसली, खिडकीबाहेर बघत... रात्रीच्या शेवटच्या ११:४०च्या लोकलमध्ये तसे अगदी मोजकेच प्रवासी बसलेले. सगळे आपआपल्या घरी जायच्या ओढीने , दिवसभराच्या घामेजल्या कपड्यांनी शांतपणे बसलेले आपापल्या मोबाईलमध्ये डोकी घालून. मी परत तिच्याकडे बघितलं, 'काय झालंय हिला?' मी मनातल्या मनात विचार करत तिच्याकडे निरखून बघितलं. डोळे खोल गेलेले, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, खूप खूप रडून शुष्क  झालेली बुब्बुळं! घाबरलेच मी. तिला म्हटलं,

'काय झालंय अनिषा? नाही म्हणजे  तुला नसेल सांगायच्ं तर नको सांगूस. कारण खरंतर आपली फार काही ओळख नाही. रोजच्या ८:४०च्या लोकलचे सहप्रवासी आपण. गेली २ वर्ष आपण रोज संध्याकाळी लोकलमध्येच भेटतो. तू एका कॉर्पोरेट कंपनीत कामाला आणि मी एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला, एवढीच काय ती आपली ओळख! पण या दोन वर्षात मी तुला इतकं उदास, इतकं शांत कधीच पाहिलं नाही. सतत खळाळतं हसू आणि बोलके डोळे घेऊन वावरणारी तू आज अशी शांत का? मी दिवसभराच्या कामानी कितीही थकलेली का असेना, तुझा प्रसन्न चेहरा आणि मनमोकळं हसू पाहून थकवा कुठल्या कुठे पळून जायचा गं! तुझ्याशी गप्पा मारून मन मोकळं, ताजं तवानं होऊन जायचं! तुझ्याशी मी सगळं शेअर करायचे. सासूची कुरबुर, नवर्याचा इगो, मुलांचे नखरे, बॉसचं रागावणं आणि कामाचं टेंशन... सगळं तुझ्यापाशी बोलून रितं करायचे. तूही सगळं ऐकून घ्यायचीस. मला नेहमी सांगायचीस, 'हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळालंय निशा, जगून घे बिनधास्त! किती दिवस लोकांची बोलणी मनात ठेवून कुढत बसणारेस? घर, सासू, नवरा, मुलं,बॉस, काम सगळं कसं एकहाती सांभाळतेस? तसंच, त्याहून जास्त स्वत:ला, आपल्या मनाला सांभाळ. जप स्वत:ला!' तुझं ते बोलणं मी कायम  माझ्या मनात साठवून ठेवलंय. तसं जगायचा प्रयत्नही करतेय. आणि आता तूच जर अशी उदास झाली तर आमचं कसं व्हायचं मॅडम?' 

'कधी-कधी आयुष्यात अशा काही घटना घडतात की एखाद्याचं आयुष्यच बदलून जातं पूर्णपणे! आईवडिलांच्या घरात असताना किती-किती सप्न बघतो नं आपण मुली... आणि ती स्वप्न पुरी करण्यासाठी झटतो दिवसरात्र! आधी स्वता:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि मग ते टिकवण्यासाठी! एवढं सगळं करून लोकांच्या लेखी आपली किंमत फक्त एक स्त्री, एक उपभोगाची वस्तू! जिला ते मनात आलं की चुरगाळू शकतात... निशा तू मात्र स्वत:ला जप बाई!स्वतः साठी जगायला शिक!' एवढं बोलून, खिन्नपणे हसत अनिषा उठली. आणि आलेल्या स्टेशनवर उतरूनही गेली, मागे वळून नं बघता... तिचं ते अवेळी भेटण्ं, उदासवाणं शुन्यात बसून राहणं, कोड्यात बोलणं, मध्येच उठून भलत्याच स्टेशनवर उतरून जाणं सगळंच चमत्कारीक आणि तेवढंच गूढ...

माझं स्टेशन येईपर्यंत मी तिचाच विचार करत बसलेली. आपलं स्टेशन आल्यावर उतरली, नवरा आलाच होता घ्यायला. 'किती उशीर? परवा एका मुलीचा याच लोकलमध्ये बलात्कार झाला म्हणे! तुझ्या बॉसला सांग, जर परत इतका उशीर होणार असेल तर टॅक्सीची व्यवस्था करून द्या म्हणावं, नाहीतर सोड नोकरी! नाहीतरी काय गरज आहे आपल्याला तुझ्या नोकरीची...' नवरा वैतागून बोलत होता. मी फक्त मान डोलावली. घरी येऊन यांत्रिकपणे जेवले, अंथरूणावर पडले, तरी अनिषाचा तो उदासवाणा चेहरा, ते बोलणं, वागणं डोक्यातून जाईना. रात्री उशीरा केव्हातरी थकव्याने झोप लागली.

सकाळी जरा उशीराच जाग आली. सवयीने दरवाजा उघडून दुधाची पिशवी आणि वर्तमानपत्र आत घेतलं. गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र चाळायला घेतलं. नेहमीच्या राजकीय, खेळ, बॉलिवूडच्या बातम्यांवरून वरवर नजर फिरवून शहरातल्या आंतल्या पानावरच्या बातम्या वाचता वाचता परवाच्या लोकलमधील बलात्काराची बातमी दिसली. पीडीत युवतीच्या मृतदेहाची ओळख पटली होती... अनिषा दिघे, वय 28 वर्षे, राहणार ठाणे!

माझ्या हातून वर्तमानपत्र गळून पडलं, सुन्न मनानी मी तशीच उभी होते. 'अनिषा तर तीन दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेली, मग काल आपल्याला रात्री लोकलमध्ये कोण भेटलं? अनिषाचा... आता तिच्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ उलग़डू लागला. अनिषानेच एकदा सांगितलं होतं, अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून अनिषाचं बालपण गेलं. बाप आईला सोडून गेलेला, आई चार घरची धुणीभांडी करायची, हीसुद्धा थोडी मोठी झाल्यावर आईच्या कामाला हातभार म्हणून दोनतीन  घरी धुणीभांडी करत शिकू लागली. पुढे शिष्यवृत्तीवर उच्च शिक्षण घेतले. एम.बी.ए झाली, चांगल्या कंपनीत नोकरीला लागली. आता कुठे चांगले दिवस आले होते तिच्या आयुष्यात. अनिषाला खूप मोठं व्हायचं होतं, स्वत:सोबत लहान भावाचं शिक्षण करायचं होतं. गेली २ वर्ष माझ्यासोबत संध्याकाळी ८:४० च्या लोकलमध्ये माझ्या सोबत असायची. मला लोकलमध्येच तिनं सगळं सगळं सांगितलं होतं.

काय चुकीचं बोलली अनिषा ? आज जग बदललंय असं आपण म्हणतो. पण एका मुलीसाठी. स्त्रीसाठी ते खरंच बदललंय? आज शिक्षणाने स्त्री शहाणी झाली, स्वावलंबी झाली, स्वप्नं बघू लागली. तिने समाजात आपलं एक वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं. पण तिचं ते अस्तित्व समाजाने स्विकारलं का? त्यांच्या नजरेत ती स्त्री आजही एक मादी, उपभोगाची वस्तूच आहे का? की कोणीही यावं आणि आपल्या वासनेसाठी तिचं अस्तित्व काही क्षणात चुरगळून टाकावं?


परवा ती आली नाही तेव्हाच आश्चर्य वाटलेलं थोडं, पण असेल ऑफिसमध्ये थोडं जास्त काम म्हणून उशीर झाला असेल असा विचार करत आपणही घरी आलो. आणि त्याच रात्री तिच्यासोबत लोकलमध्ये...ओरडली असेल नं ती जीवाच्या आकांताने? मदतीसाठी भीक घातली असेल आजूबाजूच्या लोकांना...कोणीच का नसेल आलं तिच्या मदतीला? त्यांच्या लेखी तिचं अस्तित्व नव्हतंच का? संवेदना इतक्या बधिर झाल्या आहेत का आपल्या समाजाच्या ? की तेही मजा बघत, लाळ गाळत बसले होते? तिच्यात त्यांना आपली आई नाही दिसली? बहीण नाही दिसली? बायको - मुलगी नसेल दिसली? का तेही कदाचित हा विचार करत बसले, 'गरजच काय आहे एका स्त्रीला इतक्या उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याची?' म्हणूनच कदाचित ती वेडी मृत्यूनंतरही मला सावध करायला आली लोकलमध्ये. मला हे सांगायला, की 'बाई गं, आपल्या कुटुंबाला गरज आहे म्हणून, समाजात स्थान मिळवायला म्हणून नको करूस नोकरी! नोकरी कर स्वतः च स्वतःच्या समाधानासाठी, स्वाभिमानासाठी! शिक स्वतः चं अस्तित्व  जपायला, स्वतः चं संरक्षण स्वतः करायला...'

समाप्त 


वरील कथा सौ. अमृता श्रीरंग देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित. 


1 Comments

  1. सुन्न करून टाकणारी कथा, बाई कितीही शिकली तरी,शेवटी ही अवस्था,अस्तित्वच नाही काही

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post