शेअरिंग

 *शेयरिंग* 


मीनल आज सकाळपासून कामाच्या गडबडीत होती. उद्या तिच्या लाडक्या लेकाचा, पार्थचा वाढदिवस आहे.



 त्याच्या आवडीचा तीन मजली केकचा ऑर्डर सौरभने दिला होता तरी अजून बरीच तयारी करायची होती.



पार्थच्या दहा-बारा मित्रांची टोळी येणार होती, मुलांना आवडतील असे पदार्थ म्हणजे पास्ता, गुलाबजाम ,पावभाजी करायची ठरली होती.


 मीनलने गुलाबजाम कालच करून ठेवले होते..


"पाहू कसे झाले?" सौरभने म्हणताच, "थांब आधी देवापुढे ठेव, हे घे दोन" वाटीमध्ये  ठेवत मीनल म्हणाली. आणि मग दोघे एक एक घ्या. 



  टेस्ट करून, "यम्मी झालेत" अशी दाद देत एक अजून-- म्हणत सौरभने मीनलच्या वटारलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करत पटकन उचलून एक गुलाबजाम तोंडात टाकला.



"पहा पहा मम्मा--- बाबा चिटिंग करतोय."



"करू दे रे, आपण की नाही त्याला उद्या एक कमी देऊ मग तर झालं."




"बरं अजून काय काय उरले तुझं?" 


"मम्मा उद्या शाळेतल्या फ्रेंड्स ना द्यायला चॉकलेट??"


 "आहेत बाबांनी आणून ठेवले, सकाळी ठेवीन तुझ्या बॅगमध्ये!"


"मम्मा-  अप्पाआजोबा कुठे आहेत?"


 अरे फिरायला गेले."


  "पहा बर--  श्रीशा उठली वाटतं",  म्हणत मीनल बेडरूममध्ये वळली.



  दुसरे दिवशी संध्याकाळी पार्थचे खूप मित्र जमले होते. बर्थडे पार्टी खूप रंगली. मुलांसाठी एक मिनिट वाले गेम्स होते.


नंतर गाणी लावून डांस झाले, फोटो काढले गेले. केक कट केला, "हॅप्पी बर्थ डे डिअर पार्थ" म्हणत सर्वांनी टाळ्या वाजवल्या.


सर्वाचे खाणे झाले. सर्व दोस्तांनी त्याला गिफ्ट दिले, घरी परतताना त्यांच्या हातात रिटर्न गिफ्ट दिले गेले .



सौरभचे एक फॅमिली फ्रेंड पाटील आले होते. त्यांनी पार्थला एक मोठा सेलिब्रेशन कॅडबरी चॉकलेटचा पॅक दिला.



 पार्टी आटोपली तसे घरातल्यांनी खाऊन घेतले.



 पार्थला गिफ्ट पाह्यची घाई  झाली. तो भराभर पॅकेट उघडू लागला .


"अरे- अरे- थांब, असे फाडू नये.  सौरभने त्याला रॅपर सावकाशपणे उघडायला दाखवले . 

"बघ आता हा कागद नीट घडी करून ठेव. कामास येतो."


" काय कामास?"


"अरे काही कोणाला गिफ्ट देताना नवीन नको घ्यायला, आम्ही असेच करत असतो."



सर्व गिफ्ट पाहून झाले. पार्थ खूपच खुशीत होता. एक चाबीने चालणार खेळणं पाहून-- "हे काय आता मी हे खेळणार??" 


"असू दे रे , श्रीशा साठी.."


"नाही, मला मिळाले आहे ते मी नाही देणार .."


"बरं बरं आता आवर बरं."


"पार्थ पाटील काकांनी दिलेले चॉकलेट्स खूप सारे आहेत. ते एका बॉक्समध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवते. रोज एकच खायचे." बॉक्समध्ये घालून मीनल फ्रिजमध्ये ठेवत म्हणाली.



 दुसरे दिवशी दुपारी अभ्यास झाल्यावर खेळायला जाताना  पार्थला चॉकलेटची आठवण झाली .


"मम्मा मी चॉकलेट घेऊ ?"


"हो, काय घेतोय?"


" फाईव्ह स्टार."


" खूप मोठा आहे, अर्ध घे अर्ध नंतर-- "


"बरं मी अर्ध ठेवून दिल आहे,"  म्हणत पार्थ खेळायला पळाला.



 दोन दिवसांनी पार्थला चॉकलेटची आठवण झाली. त्यांनी बॉक्स उघडला ५ स्टार नव्हतेच.


"आई माझं फाईव्ह स्टार कुठे गेलं?"


"कुठे म्हणजे काय? तू ठेवलं होतं ना?"


 "हो अर्धच खाल्लं होतं अर्ध नाहीये."


"तू खाल्ला असशील रे तुला आठवत नसेल. दुसरे घे, आहे ना बरीच!"


 पार्थ दुसरे चॉकलेट घेऊन पळाला.



एका दिवशी 


 "सौरभ जरा इकडे ये रे, माझी चप्पल पलंगाखाली सरकली आहे ती काढून दे मला काही वाकून काढता येत नाही", अप्पानी आवाज दिला.


 "बरं अप्पा देतो मी तुम्हाला, तुम्ही आंघोळ करून या."


  सौरभने खाली वाकून चप्पल काढायला लागला. चप्पल सोबत फाईव्ह स्टारचे रॅपर ही बाहेर आले. ते पाहून सौरभ चमकला. पण काही न बोलता त्याने ते कचरा पेटीत टाकले.



एक दिवस कार खेळता खेळता पार्थने विचारले, "अप्पा आजोबा तुमच्या बर्थडेला किती गिफ्ट मिळायचे? आणि केक कोणता असायचा?"


  "बर्थडे आणि गिफ्ट आणि केक ?"


"आमच्या लहानपणी वाढदिवस असायचा बर्थडे नाही आणि तो फक्त घरातल्या घरात व्हायचा."



"कां, तुम्हाला फ्रेंड नव्हते?"



"अरे खूप,-- शाळेतले चाळीतले. पण त्यावेळी अशी पद्धत नव्हती वाढदिवसाला बोलवायची. घरीच आई आजी गोड करायच्या. जेवताना ताटाभोवती रांगोळी काढून चौरंग मांडून जेवायला बसवायच्या आणि औक्षण करायच्या एवढंच असायचं! पण काय भारी वाटायचं तेव्हा आपण कोणीतरी खास आहो त्या दिवसा पूरते तरी…"



  “तुला सांगतो पार्थ, एकदा आमच्याकडे माझे काका आले होते. त्यांनी आरेंज टाॅफीचे पूर्ण पाकीट मला दिले वाढदिवसाच. किती आनंद झाला होता. पण त्यावरूनही भांडण  उषा, अशोक, विजू आणि मी चार भावंडांना दोन दोन वाट्याला आल्या."


" पण तुम्ही का दिली?"


  "दिली म्हणजे अरे असे एकट्याने खायची पद्धत नव्हती. तेव्हा सगळं वाटून खायचं.


" खरं सांगू तेव्हा माझ्या वाटेला दोनच आले, पण जेव्हा आईसमोर आली तेव्हा मी एक आईच्या तोंडात पटकन घातले. ती नको नको म्हणत होती तरी .त्यावेळेस आईचा चेहरा इतका आनंदाने फुलला होता की काय सांगू. आम्ही दोघं टाॅफी चघळत  चघळत  हं--किती मस्त--- म्हणत पूर्ण संपवली. तो क्षण माझ्या मनाच्या कॅमेरात मी टिपून ठेवला आहे. आता तू आणि श्रिशा दोघं भावंडे पण तरीही शेअरिंग ही भावना खूप महत्त्वाची आहे, वस्तू कमी मिळाली तरी  वाटण्याचा आनंद मात्र किती तरी.”



"अरे नुसत खायच्या गोष्टींचच शेयरिंग नसायची."  बाहेर येत मीनल म्हणाली, "कपडे देखिल आम्ही बहिणी एकमेकीचे घालायचो."


"पुस्तक, देखिल आम्ही जुनी वापरत असायचो," अप्पा म्हणाले.


पार्थ हे सगळ आश्चर्याने ऐकत होता.


आजोबा आणि नातु यांच्यातला संवाद  सौरभ ऐकत होता.



पार्थ,ला समजले कि नाही माहित नाही पण सौरभ मात्र त्याच विचारात होता.


 आपल्या लहानपणी आज सारखा नसला तरी वाढदिवस छान साजरा होत असे. काही मित्रांना बोलवत असू. पण गिफ्ट फार नसत मिळत. जे मिळत दोघ भाऊ बहिण वाटून घ्यायचे.



अप्पांना काय आवडते किंवा त्यांना काही गरज आहे की नाही हा विचारही त्यावेळी मनात आला नव्हता.


 कितीतरी इच्छा त्यांनी आपल्या बाजूला ठेवल्या असाव्यात.  त्यांच्या लहानपणी इतके प्रकार बाजारात ही मिळत नसावे. सुमीचे लग्न, आपले उच्चशिक्षण, आला गेला असे अनेक खर्च कसे पार पाडले असतील? 



त्या वयात जरीही समजत नव्हते तरी आता आपण पालक झाल्यावर जबाबदारीची जाणीव झाल्यावर जाणवतंय. आई होती तोपर्यंत ती अप्पांकडे लक्ष देत असेलही पण आता अप्पा त्यांचं वय झालंय, म्हातारपण हे दुसरं बालपणच. आता घरात इतक्या नवनवीन खाण्यापिण्याच्या वस्तू येतात, अप्पांना ही त्या पाहून इच्छा होणारच.


 आणि काल पलंगाखाली मिळालेल्या चॉकलेटच्या  रेपरने अजूनच…


आता हीच जाणीव पार्थला ही व्हायला हवी आहे.



दोन दिवसांनी  पार्थ. श्रीशाला चावीवालं खेळणं खेळून दाखवत होता आणि ती आनंदाने हसत होती.


ते पाहून सौरभला बरं वाटलं.


तेवढ्यात कुरिअरवाला आला.


सुमी आत्याने  पार्थला वाढदिवसाचे  गिफ्ट पाठवले होते.



 पार्थ, मीनल, सौरभ आणि आप्पा आजोबा सगळेच उत्सुकतेने पाहू लागले. .


पार्थला पाह्यची घाई झाली, मी उघडणार मला आधी पाह्यचे आहे म्हणून त्यांनी उघडले. एक स्टोरी बुक आणि एक मोठ्ठं चॉकलेट होतं.



"पुस्तक तुला अप्पा वाचून दाखवतील." सौरभने पुस्तक पाहून म्हटले. तोपर्यंत पार्थने चॉकलेट उघडले  नी त्याचे तुकडे करून मीनल, सौरभ, व नंतर अप्पांच्या समोर धरले. 

"अरे अरे  मला कशाला?"


 "कां अप्पा? तुम्हाला ही आवडत न?"



अरे हो पण  म्हणेपर्यंत शेयरिंग म्हणत पार्थने त्यांच्या तोंडात घातले ही. त्यावेळीं पार्थच्या आणि आप्पांच्या डोळ्यातला आनंद पाहून  सौरभला चॉकलेट अजूनच गोड लागले.


-----------------------------------------


✍️ प्रतिभा परांजपे


वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.



Post a Comment (0)
Previous Post Next Post