काळरात्र

 काळरात्र


✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि कीर्तीची माहेरी जाण्याची गडबड सुरू झाली. यावर्षी किर्तीच्या माहेरी दिवाळी साजरी करण्याचा आमचा प्लॅन होता. कीर्ती म्हणजे माझी बायको !! आमचे लग्न होऊन आता चौदा वर्षे होतील. मोठी संध्या बारा वर्षांची तर धाकटा संदीप दहा वर्षांचा.... आमचं कुटुंब म्हणजे अगदी आदर्श "हम दो हमारे दो" टाइप आहे. सुंदर आणि सुशील पत्नी व दोन सद्गुणी गोंडस मुल यासाठी मी नेहमी देवाचे मनापासून आभार मानत असतो. कीर्तीचे माहेर कोकणातले !! खेड जवळील लव्हेल नजीक 'आईनामेटे' हे तसे दुर्गमच असलेलं गाव ... पण अलीकडे कोकणात चांगले रस्ते झाले असल्याकारणाने तेथे जाणे पहिल्यासारखं तितकं अवघड राहिलं नव्हतं.

दिवाळीच्या आधी दहा दिवस कीर्ती मुलांना घेऊन माहेरी गेली. मी मात्र पुण्यातच राहिलो. मला ऑफिसमधून इतकी मोठी रजा मिळणे शक्यच नव्हते. दिवाळीच्या आदल्या दिवशी आइनामेट्याला जाण्याचा माझा विचार होता. कीर्ती सुखरूप पोहोचल्याचा फोन आला आणी मला हायसं वाटलं ! त्यानंतरचा आठवडा ऑफिसच्या कामात कसा उलटला ते कळलच नाही. हा हा म्हणता दिवाळी आली. नरकचतुर्दशी रविवारी होती. म्हणजे मला शनिवारी संध्याकाळपर्यंत आईनामेट्याला पोहोचणे आवश्यक होते. खरंतर मी माझ्या बॉसला आधीच याबद्दल सांगितले होते. पण अर्जंट निघालेल्या कामामुळे शनिवारी दुपारी उशिरापर्यंत मला ऑफिसला थांबावे लागले. दोन-अडीचच्या सुमारास किर्तीचा फोन आला.

" अहो निघालात का?" तिने उत्साहाने विचारले.

"अगं नाही ...... अजून ऑफिस मध्येच आहे. अर्ध्या तासात मोकळा झालो की लगेच निघेन." मी घाईघाईत बोललो.

" बापरे !! अहो पण मग येईपर्यंत खूप उशीर होईल तुम्हाला..... कालच नाही का ओव्हरटाईम करून काम संपवायचं ? रात्री येणं रिस्की नाही का ?" चिंतायुक्त आवाजात ती म्हणाली.

" तू काळजी नको करूस! मी स्वतः ड्राईव्ह करत येणार आहे .आणि तशी गर्दीही नसेल रस्त्याला!! चार साडेचार तासात पोहोचेन सुद्धा मेट्याला!"  मी आश्वासक सुरात तिला म्हणालो .

"ठीक आहे. निघताना मला फोन करा. ठेवते मी फोन आता." तिने फोन ठेवला आणि मी पुन्हा काम संपवण्याच्या मागे लागलो.

निघे निघेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. पिरंगुट घाटातून पुढे ताम्हिणी मार्गे कोकणात उतरायचे मी ठरवले. पेट्रोलची टाकी फुल करून मी सुसाट वेगाने निघालो. ताम्हिणी घाटात पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा साडेसहा झाले होते. संध्याकाळच्या सुमारास ताम्हिणीतील रस्ता खूप भीतीदायक वाटतो ! आजूबाजूची झाडी ,एकाकी रस्ता आणि क्वचितच दिसणारी वाहने ... तसा मी 'घाबरट' कॅटॅगिरीतला नाही.भुतंखेंत, चकवा इत्यादी गोष्टींवरही माझा अजिबात विश्वास नाही. पण संध्याकाळ आणि रात्र यांच्या सीमेवरची ती कातरवेळ, माझ्यासारख्या निडर माणसाच्या छातीतही धडकी भरवणारी होती !! रेडिओवर किशोर कुमारची उडती गाणी ऐकत मी मनातल्या भीतीला पळवून लावत होतो. ताम्हिणी घाट उतरून मी मधली छोटी गावे झपाट्याने ओलांडली आणि मुंबई-गोवा हायवेच्या दिशेने प्रयाण केले. मुंबई-गोवा हायवे ला लागेपर्यंत सव्वा सात वाजून गेले होते.

रात्री आठच्या सुमारास एका नावाजलेल्या धाब्यावर मी गाडी थांबवली. येथे जेवूनच पुढे जाण्याचा माझा मानस होता .वातावरण थोडे ढगाळ होते. दिवाळीचे दिवस असूनही नावालाही थंडी नव्हती. उलट चांगले उकडतच होते. वॉशरूम मध्ये जाऊन मी चेहऱ्यावर भरपूर पाणी मारले आणि फ्रेश होऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण येण्यास थोडा वेळ होता तोपर्यंत मी कीर्तीला फोन केला आणि रात्री उशीर होईल म्हणून जेवूनच येत असल्याचे सांगितले. जेवण खरच खूप रुचकर होते. थोडे खाऊ म्हणता म्हणता मी खातच गेलो आणि पोट चांगलेच जड झाले. अशा भरपेट जेवणानंतर ड्रायव्हिंग करायचे खरंतर जिवावर आले होते... पण पर्याय नव्हता. रात्री पावणेनऊच्या सुमारास मी कशेडी घाटात पोहोचलो. येथून तासाभरात आईनामेटे!! गाडी घाट उतरत असतानाच आकाशात वीज चमकली आणि पावसाला सुरुवात झाली.

" च्यायला या पावसालाही आत्ताच मुहूर्त सापडला वाटतं !!" मनातल्या मनात शिवी हासडत मी आणखी वेगाने गाडी हाकू लागलो. घाट उतरून सरळ रस्त्याला लागलो आणि पावसाचा जोर वाढला. हा हा म्हणता मुसळधार पाऊस सुरू झाला.जोडीला सोसाट्याचा वारा सुटला. गाडीचा वायपर फुल स्पीडला ठेवून मी हळूहळू पुढे सरकत होतो. पावसामुळे दहा फुटापर्यंतचाही रस्ता दिसत नव्हता. रस्त्याच्या कडेला थोडे थांबावे आणि पाऊस जरा कमी झाल्यावर निघावे असा विचार करून मी गाडीचा वेग कमी करतोय न करतोय तोच प्रचंड वेगाने पुढच्या वळणावरून एक ट्रक येताना दिसला.

" संपले सगळे!!" क्षणार्धात माझ्या मनात विचार आला. हे धूड सरळ अंगावर येऊन धडकणार याची मला मनोमन खात्रीच पटली. रिफ्लेक्स ॲक्शन व्हावी तसे मी गाडीचे स्टेअरिंग डावीकडे वळवले आणि सरळ गाडी रस्त्यावरुन खाली उतरवली. माझ्या गाडीच्या उजव्या बाजूला चाटून तो ट्रक वेगाने निघून गेला आणि डोळे घट्ट मिटून मी काही वेळ तसाच बसून राहिलो .... गाडीची डावी चाके रस्त्याशेजारील चिखलात रुतली होती आणि उजवी चाके रस्त्यावर होती. डाव्या बाजूला झुकून तिरक्या अवस्थेत बंद पडलेली गाडी सुरू करण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण काही केल्या गाडी सुरू होईना. पावसाचा जोर कमी होण्याची कोणतीच चिन्हे नव्हती. माझ्या मनात अनामिक भीती दाटून आली. आता काय करायचे ? एवढ्या रात्री अशा पावसात जायचे तरी कोठे ? गाडीत मागे वळून ,मागच्या सीटवर ठेवलेली छत्री मी घेतली आणि दार उघडत गाडी बाहेर पडलो. थंडगार वार्‍याने माझे सर्वांग शहारले. कसेबसे स्वतःला सावरत मी छत्री उघडली आणि रस्त्याच्या कडेला उभा राहिलो.चारी बाजूला अंधार दाटलेला होता.  मोबाईल मधील घड्याळात मी नजर टाकली. रात्रीचे साडेनऊ झाले होते. कीर्तीला फोन लावायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी नेटवर्क नव्हते. उद्भवलेल्या परिस्थितीला मनातल्या मनात शिवी हासडत मी आजूबाजूला नजर टाकली. दूरवर एके ठिकाणी मिणमिणते दिवे दिसत होते. बाकी सगळ्या दिशा अंधाराने व्यापून टाकल्या होत्या. मी त्या प्रकाशाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली.

जवळजवळ अर्धा तास मी त्या मुसळधार पावसात चालत राहिलो,तरीही ते दिवे जवळ येण्याची कोणतीच चिन्हे नव्हती. जणु ते दिवेही माझ्यापासून दूर दूर जात होते. मला चकवा तर लागला नसेल ना ? त्या जीवघेण्या विचाराने माझ्या हृदयात धडकीच भरली. जोरजोराने डोके हलवून मी तो वाईट विचार डोक्यातून काढून टाकला आणि पुन्हा वेगाने त्या दिव्यांच्या दिशेने वाटचाल करू लागलो. थोड्याच वेळात ते दिवे एका वाड्यातील असल्याचे माझ्या लक्षात आले. अंधारातही त्या दुमजली वाड्याची बाह्यरेषा अंधुक दिसत होती. उत्साहाने मी भराभर पावले टाकू लागलो. पाचच मिनिटात मी त्या वाड्याच्या अंगणात पोहोचलो. वाड्याला फाटक नव्हते. वाड्याच्या दरवाजासमोरील व्हरांडा चढून मी पडवीत आलो, आणि छत्री बंद करून मी दरवाजाची कडी जोरजोराने वाजवली .

आश्चर्य म्हणजे क्षणार्धात दरवाजा उघडला गेला. जणू काही कोणीतरी मी कडी वाजवण्याचीच वाट पहात होतं !! क्षणभर मी दचकलो. दरवाजात एक जख्ख म्हातारा उभा होता. त्याच्या हातात मिणमिणता कंदील होता. अंगावर फक्त पांढरं धोतर नेसलेला तो म्हातारा बाकी उघडाबंब होता. म्हातारपणामुळे त्याच्या हातापायाच्या काड्या होऊन सर्वांगावर सुरकुत्या पडल्या होत्या. चेहऱ्याची त्वचा ओघळलेली होती, आणि डोक्यावरील केस कापसासारखे पांढरे शुभ्र होते. एखाद्या पिशाच्या प्रमाणे दिसणाऱ्या त्या म्हाताऱ्याचे दर्शन होताच, आल्यापावली मागच्या मागेच पळ काढण्याची तीव्र इच्छा मला झाली. परंतु पायात मणामणाच्या बेड्या पडल्यासारखा मी तेथेच उभा राहिलो. 

"ये आत ये ....... खूप भिजलेला दिसतोयस." घोगऱ्या आवाजात म्हातारा बोलला आणि माझे सर्वांग शहारले. कसेबसे स्वतःला सावरत मी आत शिरलो आणि माझ्या मागे म्हाताऱ्याने दरवाजा बंद करुन कडी लावली. हळूहळू चालत माझ्यासमोरून तो खोलीत गेला आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात मी पाहू लागलो. माजघरात चुली समोर एक पाठमोरी वयस्कर स्त्री बसलेली दिसत होती. बहुदा ती चुलीवर स्वयंपाक करत असावी. आतल्या खोलीतून एक जुनाट पंचा आणि झब्बा पायजमा घेऊन म्हातारा पुन्हा मी उभा असलेल्या खोलीत आला. ते कपडे माझ्या हाती देत त्याने त्याच्या टोकदार नजरेने माझ्याकडे रोखुन पहिले.

" जा पोरा ... तुझे कपडे बदलून ये .नाहीतर ओल्या कपड्यांमुळे आजारी पडशील." घोगर्‍या स्वरात तो पुटपुटला.

धडधडत्या हृदयाने मी शेजारील खोलीत शिरलो. पटकन मी माझे ओले कपडे काढले आणि म्हाताऱ्याने दिलेले कोरडे कपडे अंगात चढवले. त्या कपड्यांना येणाऱ्या वासाचा भपकारा माझ्या नाकात घुसला. कित्येक दिवसात न वापरलेल्या कपड्यांचा वास जसा असतो तसा तो वास होता. मी पुन्हा बाहेरच्या खोलीत आलो तेव्हा वरच्या मजल्यावर जाणारा जिना मला दिसला. त्या जिन्याने कोणीतरी वरच्या मजल्यावरून सावकाशपणे खाली येत होते. डोळे किलकिले करून मी बघू लागलो. क्षणभर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना !!!

हा तर सदा !! माझा कॉलेजमधील जानी दोस्त ...  हे सदाच घर आहे? मला आता हर्षवायूच व्हायचा बाकी होता. मला पाहिल्यावर सदा दचकला. त्याची नजर कावरीबावरी झाली.

" सदा ..... अरे किती दिवसांनी भेटतो आहेस !" चटकन पुढे होत मी सदाला मिठी मारली. सदाच्या शरीराचा स्पर्श मला थोडा वेगळा आणि विचित्र वाटला. कपडे घातलेल्या हाडांच्या सापळ्याला मिठीत घ्यावे असे मला वाटले .

"सदा ,अरे किती खराब झाला आहेस तब्येतीने !! आजारी आहेस का?" चिंतेच्या स्वरात मी विचारले.

" होय... काही दिवसांपासून बरं नाहीये मला. पण औषध घेतोय ... डॉक्टर म्हणाले, थोड्याच दिवसात बरे व्हाल!!" सदा बोलला. एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा त्याचा आवाज येत होता.

" थांब ...... तू भेटल्याची बातमी किर्तीला सांगतो!! आनंद होईल तिला!!!" मोबाईल खिशातून काढत मी म्हणालो. सदा काहीच बोलला नाही. बघतो तर मोबाईल बंद झालेला होता.

" अरेच्या बॅटरी संपली वाटतं !" मी उदगारलो. "किर्तीला आनंद झाला असता तुझ्याशी फोनवर बोलून. किती वर्षांनी भेटतोय आपण!" उत्साहाने मी म्हणालो. माझे आणि किर्तीचे  लग्न ठरले ते सदामुळे.... सदा आईनेमेट्याचा ...  त्याच्याकडे कॉलेजच्या सुट्टीत राहायला गेलो असताना माझी किर्तीशी ओळख झाली होती आणि त्या ओळखीचं पर्यवसन आमच्या प्रेमविवाहात झालं होतं, त्यामुळे आमच्या दोघांच्या मनात सदा विषयी एक हळुवार कोपरा होता.

आमचे बोलणे चालू असतानाच माजघरातून म्हातारी बाहेर आली. तिला पाहताच माझी तर पाचावर धारणच बसली. एखाद्या कुरूप चेटकिणीलाही लाजवेल असं रूप म्हातारीचं होतं. माझ्याकडे एकटक नजरेनं पाहात ती 'क्लॅक-क्लॅक' असा विचित्र आवाज करत बोळक्या तोंडाने हसली.

" चला जेवून घेऊ ... जेवण तयार आहे." भसाड्या आवाजात म्हातारी म्हणाली.

" आजी .... मी जेवणार नाही .माझे जेवण झाले आहे. तुम्ही तिघे घ्या जेवून !" मी इकडे तिकडे बघत बोललो. तिघांनीही मला अजिबात आग्रह केला नाही .आम्ही चौघेही माजघरात गेलो .म्हातारीने बहुदा नॉनव्हेज स्वयंपाक केला होता. मसाल्यांचा विचित्र वास माजघरात दाटून राहिला होता. न बोलता तिघांनीही जेवायला सुरुवात केली. मी बाजूला बसून पाहत होतो. शिकार केलेल्या भक्ष्यावर जनावरांनी तुटून पडावे अशा आविर्भावात तिघे जेवत होते. भाकरीची चवड हा हा म्हणता संपली.मोठ्या पातेल्यातील काठोकाठ भरलेल्या कालवणाचा फन्ना उडाला. सर्व अन्न संपल्यावरही तिघे जिभल्या चाटतच होते. त्यांचा अविर्भाव पाहून मी हबकून गेलो.

जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा बाहेरच्या खोलीत आलो. काहीतरी बोलायचं म्हणून मी सदाला म्हणालो,

" तुझ्या आई वडिलांची पहिल्यांदाच गाठ पडते आहे. कधी पाहिले नव्हते आधी!"

" हे माझे आई-वडील नाहीत." खोल आवाजात सदा म्हणाला. बोळक्या तोंडाने 'क्लॅक-क्लॅक' असा आवाज करून म्हातारी जोरात हसली आणि म्हाताऱ्याने ही हसून तिला साथ दिली. त्यांचा एकंदर आविर्भाव बघून ते कोण आहेत हे सदाला विचारायचं धाडस मला झालं नाही. सदाही पुढे काही बोलला नाही.

" सदा .... अरे उद्या पहाटे मला लवकर निघावे लागेल. उद्या नरकचतुर्दशी आहे. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने, घरी सगळे खोळंबतील माझ्यासाठी !!" सदाकडे पाहात मी म्हणालो. निर्विकारपणे सदा माझ्याकडे पाहात राहिला.

" उद्या चतुर्दशी ... म्हणजे अमावस्या आली की जवळ !!" म्हातारा, म्हातारी कडे पाहात आनंदाने उद्गारला. त्यावर 'क्लॅक-क्लॅक' आवाज करत म्हातारी जोरात हसली. त्या विचित्र बोलण्याचा मला काहीच अर्थबोध झाला नाही.

" चल .... तुझी झोपण्याची खोली दाखवतो." खोल आवाजात पुटपुटत सदा सावकाश उठला आणि जिन्याने वर जाऊ लागला. मीही त्याच्या मागे जिना चढू लागलो. आम्हाला वर जाताना पाहून इतका वेळ शांत बसलेला म्हातारा अचानक तिरमिरी आल्यासारखा आमच्याकडे धावला, आणि कर्णकर्कश्य आवाजात काहीतरी असंबद्ध बरळू लागला. शांतपणे सदा वळला आणि अंगावर येणाऱ्या म्हाताऱ्याच्या कानाखाली त्याने भडकावली. कुत्र्यासारखे केकाटत म्हातारा लांब पळाला. 'क्लॅक-क्लॅक'  आवाज करत म्हातारी आनंदाने हसू लागली. हा सर्व प्रकार पाहून माझी अक्षरशः दातखीळ बसली. वळून सदा पुन्हा जिना चढू लागला. मी मुकाट्याने त्याच्या मागे वर निघालो. खाली दूर पळालेला म्हातारा, लांबूनच एखाद्या श्वापदासारखा आम्हाला पाहून गुरगुरत होता.

मला एका खोलीत सोडून सदा पुन्हा खाली जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याने माझ्या हातात काहीतरी दिले.

" हे खा झोपण्यापूर्वी .....! " तो हे वाक्य  अशा काही स्वरात म्हणाला की मी पटकन ते तोंडात टाकले. बहुदा ते कलकत्ता मीठा पान असावे.

" खोलीला आतून कडी लावून झोप! काहीही झालं तरी कडी उघडून बाहेर यायचं नाही! पहाटे मी तुला उठवायला येईन." एवढे बोलून त्याने पाठ वळवली आणि तो सावकाशपणे जिना उतरू लागला. पटकन खोलीचा दरवाजा लावून मी कडी घातली. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात, पलंग आणि त्यावरचा बिछाना दिसत होता. दोन्ही हातांनी डोके गच्च पकडून काही वेळ मी तसाच उभा राहिलो. संध्याकाळ पासून आत्तापर्यंत झालेले सर्व प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन तरळून गेले. कोणत्यातरी भयंकर आणि अनाहूत संकटात सापडल्याची जाणीव मला झाली. म्हातारा आणि म्हातारीची तर मी भीतीच घेतली होती. केवळ सदा असल्यानेच इतका वेळ या भीषण वाड्यात मी थांबू शकलो होतो.

अचानक मला प्रचंड गुंगी आणि झोप येऊ लागली. बहुदा सदाने दिलेल्या कलकत्ता मीठा पानाचा परिणाम असावा. हेलपाटत मी बिछान्यावर येऊन पडलो आणि झोपेने मला घेरलं ! मध्यरात्री उशिरा कधीतरी माझी झोप चाळवली. कुठून तरी हिस्त्र श्वापदांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. जीव घेण्यासाठी एकमेकांवर तुटून पडल्यासारखी ही जनावरे भांडत असावीत. मी नक्की कोठे आहे हेच मला कळेना!! पण तर्कसंगत विचार करण्यापूर्वीच पुन्हा एकदा गाढ झोपेच्या गर्तेत मी हरवून गेलो. पहाटे लवकर दार वाजले आणि मी खडबडून जागा झालो.

" कोण आहे?" दरवाजाकडे जात कापऱ्या स्वरात मी विचारले.

" मी आहे सदा !! दार उघड. तुला निघायचे आहे घरी जायला!!" पटकन मी कडी उघडली. दरवाजाबाहेर सदा उभा होता. त्याचे केस विस्कटले होते .चेहऱ्यावर असंख्य जागी बोचकारल्याच्या खुणा दिसत होत्या. अंगावरील कपडे फाटून चिंध्या लोंबत होत्या.

" सदा तू बरा आहेस ना?" हबकून दोन पावले मागे सरकत मी विचारले.

" आता वेळ घालवू नकोस .... पटकन् निघ ! तुला उजाडायच्या आत घरी पोहोचायचं आहे. कीर्ती तुझी वाट पाहात असेल." खोल आवाजात सदा म्हणाला. एका दमात इतकं बोलल्यानं त्याला धाप लागली होती. चटकन कपडे बदलून मी खोलीबाहेर आलो. भरभर जिना उतरून सदा पाठोपाठ मी दरवाजाकडे निघालो. डोळ्याच्या कोपऱ्यातून माजघरात एका कोपऱ्यात निपचित पडलेले म्हातारा म्हातारी मला दिसले.

मी वाड्या बाहेर पडलो आणि थोडं अंतर गेल्यावर वळून मागे पाहिले. सदा दरवाज्यात उभा होता. त्याच्याकडे बघून मी हात हलवला आणि झपाट्याने गाडी होती त्या दिशेने निघालो. आश्चर्य म्हणजे पाचच मिनिटात मला रस्त्याच्या कडेला तिरक्या अवस्थेत उभी असलेली माझी गाडी दिसली. पटकन गाडीत बसून मी स्टार्टर मारला. झटक्यात गाडी सुरु झाली.गियर टाकून मी गाडी रस्त्यावर घेतली आणि सुसाट वेगाने आईनामेट्याकडे निघालो. किर्तीच्या घरी पोहोचलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. सर्व मंडळी चिंताग्रस्त चेहऱ्याने हॉल मध्ये बसली होती. मला पाहताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. किर्तीने तर पळत पळत येऊन मला घट्ट मिठीच मारली.

" अहो जावईबापू ... रात्रभर होता तरी कुठे ? तुमच्या काळजीने आमचा जीव अगदी अर्धा झाला होता." सासर्‍यांनी मला विचारले.

" बाबा... अहो पावसामुळे झाला हा सगळा घोटाळा!!" मी हसून उत्तरलो आणि घडलेला इत्यंभूत वृत्तांत त्यांना सांगितला. माझे बोलणे ऐकताना घरातील सर्वांचे चेहरे भीतीने पांढरे पडले होते. माझे बोलणे संपले आणि थोडावेळ घरात भयाण शांतता पसरली. खाकरून सासरे बोलू लागले,

" जावईबापू... आमच्या कीर्तीचे कुंकू बळकट म्हणूनच आज तुम्ही आम्हाला दिसताय !!"

" म्हणजे ? मी समजलो नाही!!" प्रश्नार्थक मुद्रेने मी सासऱ्यांना विचारले.

" आम्ही रात्रीच तुमचा शोध घ्यायला सुरवात केली होती. तुमचा मोबाईल बंद होता आणि तुमची गाडी बंद अवस्थेत गावातल्या स्मशानाशेजारी सापडली. पण तुमचा मात्र कुठेच पत्ता नव्हता.... तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की रात्रभर तुम्ही स्मशानातच होता !! कारण तेथे कुठलाही वाडा नाही !! आणि तुम्हाला भेटलेला तुमचा मित्र सदा,गेल्या आठवड्यात कॅन्सरने वारला आहे.... तुम्हाला दिवाळीत येथे आल्यावर कळेलच असं वाटल्याने, सांगितलं नव्हतं ..!" थरथरत्या आवाजात सासरे म्हणाले. आ वासून मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. अचानक बसलेल्या या धक्क्याने माझ्या तोंडातून शब्द फुटेना. थरथरत्या पायांनी मी खुर्चीपाशी गेलो आणि मटकन तेथेच बसलो. रात्री घडलेल्या सर्व प्रसंगांची तर्कसंगती आता लागली होती. कालच्या काळरात्री सदानेच माझी सुटका त्या भयंकर पिशाच्यानं पासून केली होती. भूतयोनीतही तो मैत्रीला जागला होता. दुःखातिशयाने मी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. थोड्या वेळाने किर्तीने जवळ येऊन मला धीर दिला.

पहाटेच्या आंघोळी उरकून आम्ही सर्वांनी फराळ केला. दिवाळीचे प्रसन्न वातावरण,आणि बाहेर वाजणारे फटाके यामुळे मन प्रफुल्लित झालं होतं. उजाडताच मंदिरात जाऊन मी देवाचे दर्शन घेतले आणि कालच्या जीवघेण्या प्रसंगातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले. उत्सुकतेपोटी मी आणि माझा मेव्हणा स्मशानाकडे निघालो. स्वच्छ सूर्यप्रकाशात आसमंत उजळला होता. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने काळं कुत्रही तेथे नव्हतं !! मी चोहीकडे नजर फिरवली. रात्री दिसलेल्या वाड्याचं, नामोनिशाणही कोठे नव्हतं !! एका विस्तीर्ण वृक्षाखाली माझी छत्री पडलेली दिसत होती. कालची काळरात्र हे स्वप्न नव्हते तर ती हकीकत होती हे जणू न बोलता ती मला सांगत होती !!!

समाप्त
वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

फोटोवर क्लिक करा आणि पाहा ही सुंदर कथा 


1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post